Sunday, December 27, 2009

गोट्याचा घोळ

"... सीआयडी मागे लागलाय".. घरातून बाहेर पडता पडता मला गोट्याचं बोलणं अर्धवट ऐकू आलं. तो शेजारच्या दीपाशी बोलत होता. गोट्या म्हणजे आमचं एकुलतं एक कार्ट. गोट्याचे कारनामे हळूच कान देऊन ऐकायला मला आवडलं असतं, खरं तर.. पण कामाला जाणं भाग होतं.. अनिच्छेनेच मी निघालो. मला नेहमी भरपूर काम असतं.. डोकं वर काढायलाही फुरसत नसते.. पण दिवसभर 'आयला! ह्या गोट्यानं काय घोळ घातला?' या प्रश्नानं मला, चपलेला चिकटलेल्या च्युईंगम सारखं छळलं. मग बँकेतून दिल्याला फोन करून सीआयडी ऑफिसातून काही माहिती मिळतेय का ते पहायला सांगीतलं. त्याला काही फारशी माहिती मिळाली नाही. सीआयडीचे लोक काळाबाजार करणारे, तस्करी करणारे नाही तर अतिरेकी लोकांच्या मागावर असतात अशी एक मोघम माहिती मिळाली. विमनस्क अवस्थेत संध्याकाळी घरी आल्यावर सरीताला झालेला प्रकार सांगीतला.

सरीता: "अय्या खरंच सीआयडी मागे लागलाय? मला बघायचाय खराखुरा सीआयडी कसा दिसतो ते.".. हिचा बालिशपणा कधी उफाळून येईल त्याचा काही नेम नसतो.
मी: "सीआयडी म्हणजे काय गणपतीची आरास आहे का बघायला? दारावर विकायला येणार्‍या माणसांसारखी अगदी सामान्य दिसणारी माणसं असतात ती. मुद्दामच तशी माणसं घेतात ते. मी सुध्दा त्यांच्यापुढे हिरोसारखा वाटेन तुला. त्यापेक्षा गोट्याकडे बघ. त्यानं काही तरी जबरी घोळ घातलाय. आधीच लग्न ठरत नाहीये त्याचं.. त्यात आता हे. तुला काही त्याच्यात बदल जाणवलाय का एवढ्यात?"
सरीता: "अंsss हो! थोडा विचित्र वागतो हल्ली."
मी: "हां म्हणजे हल्ली जास्त तिरसटासारखा करतो... नेहमी खोलीचं दार बंद करून बसतो... आपण खोलीत गेलो की चिडचिड करतो न् लगेच लॅपटॉप बंद करतो.. हेच ना? मला वाटतं, त्याला त्याचं लग्न ठरत नाही याचं जास्त टेन्शन आलंय, त्यामुळे असेल. त्याच्या बरोबरीच्या सगळ्यांची लग्न झाली की आता."
सरीता: "ते असेल रे! पण त्याहून थोडा जास्त विचित्र."
मी: "म्हणजे?"
सरीता: "हल्ली तो मधुनच मुलीसारखा बोलतो."
मी: "काssssss य? मुलीsssssssssssssss?" मी जोरात ओरडलो. आधीच माझा आवाज ठणठणीत.. त्यातून मी ओरडलो की संपलंच. माझा ठणाणा ऐकून दीपा धावत आली.
दीपा: "काय झालं अंकल?" अंकल? हल्लीच्या पोरांना कुणी तरी काका म्हणायला शिकवा हो! सगळ्या शब्दांना मराठीत शब्द नाहीत असं का वाटतं यांना?

त्याक्षणी दीपाला समोर बघायची माझी मानसिक तयारी मुळीच नव्हती.. मला काय झालं तेही तिला मुळीच सांगायचं नव्हतं. गोट्या मुलीसारखा बोलतो ही काय तिला सांगायची गोष्ट आहे? पण खरंच सांगीतलं असतं तर तिची काय प्रतिक्रिया आली असती? 'अय्या! कित्ती गोssड!' असं काहीतरी निरर्थक बोलून नवीन मैत्रीण मिळाल्याचा आनंद व्यक्त केला असता तिनं कदाचित! या नवीन पीढीचं काही सांगता येत नाही.
मी: "काही नाही. काही नाही. हिला मुलगी... आपलं.. एक उंदीर दिसला." मला तिचा वीक पॉईन्ट माहिती होता.
सरीता: "काहीही काय बोलतोस? कुठाय उंदीर? आपण तर..." बाप रे! माझ्या डोळ्यांच्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करून गेम टाकणार आता ही.
मी: "हो! हो! आपणच तर त्याला या दारावरून त्या वायर वरून त्या दाराकडे जाताना पाहीलं ना!" मी बरेचसे अतिरंजित हातवारे करत बोलल्यावर तिच्या डोक्यात थोडा प्रकाश पडल्यासारखा वाटला. तेवढ्यात दीपाच्या बापानं तिला हाक मारली.. "दीपा! काही विशेष झालेलं नाही.. तू जा आता.. त्या उंदराला काय हवं नको ते मी बघतो." दीपाची पीडा 'बाssय' म्हणून गेल्या गेल्या मी सरीताला जाब विचारायला लागलो..
मी: "काय गं? तुला माझ्या खाणाखुणा कळत नाहीत का? तोंड उघडण्यापूर्वी बघावं एकदा माझ्या चेहर्‍याकडे!"
सरीता: "काय राहीलंय तुझ्या चेहर्‍यात बघण्यासारखं?" माझ्यासमोरून एक कवटी खालच्या दोन हाडांच्या फुली सकट तरंगत गेली. पाहिलंत ना! कुठला विषय कुठे नेला ते तिनं? हेच मी तिला बोललो असतो तर तडक माहेरी निघून गेली असती.. असो. विषय कवटीवरून हलवणं भाग होतं..
मी: "बरं ते जाऊ दे! गोट्या काय मुलीसारखा वागतो?"
सरीता: "अरे तो मधेच मुलीसारखा बोलतो.. मग लगेच चूक सुधारतो. परवा मी त्याला चहा प्यायला बोलावलं तर आधी म्हणाला 'आले! आले!'. मग लगेच म्हणाला 'आलो! आलो!'. असं बर्‍याच वेळेला झालंय हल्ली.. मला सांगायचंच होतं तुला."
मी: "मग तो काय साडी घालायची वाट बघत होतीस? आधी का नाही सांगीतलंस?"
सरीता: "अरे पण माझी खात्री व्हायला हवी ना आधी!"
मी: "हे सगळं तुझ्या मुळे झालंय. तूच लहानपणी त्याचा उल्लेख मुलीसारखा करायचीस.. 'उठली का माझी छकुली?' असं काहीतरी!"
सरीता: "आणि तू पण त्याला मुलींचे कपडे आणायचास!"
मी: "ते मी एकदाच आणले होते, तेही तुझ्यासाठी." चूक लपविण्याचा माझा आटोकाट प्रयत्न!
सरीता: "माझ्यासाठी? लहान मुलीचे कपडे?"
मी: "हो! तू लहान मुलीसारखी वागतेस म्हणून." माझ्या कवटीचा माफक बदला घेण्यात यशस्वी झालो.
सरीता: "हेच ते नेहमीच तुझं! अंगावर उलटलं की एक फालतू जोक करायचा."
मी: "बरं ते जाऊ दे. इथं पोराला आयडेंटिटी क्रायसिस झालाय आणि तू भांडत बसली आहेस. त्याला कुठल्या पोरीनं झपाटलं असेल का?"
सरीता: "आयडेंटिटी क्रायसिस नाही त्याला जेंडर क्रायसिस म्हण. प्रेमात पडल्यावर असं होतं का पुरुषांना?"
मी: "मी कुठे प्रेमात पडल्यावर म्हणालो? आणि बापाचं झालेलं माकड पहाता तो प्रेमात पडेल असं वाटत नाही कधी. मला म्हणायचं होतं की कुठल्या स्त्रीलिंगी भुतानं झपाटलं असेल का त्याला?"
सरीता: "स्त्रीलिंगी भूत नाही रे म्हणत.. हडळ म्हणतात." अख्ख्या जीवनात समस्त मास्तर वर्गानं काढल्या नसतील एवढ्या माझ्या चुका तिनं आत्तापर्यंत काढल्या आहेत.
मी: "बाकीच्या पुरुषांच माहीत नाही. पण तुझ्या प्रेमात पडल्यावर मला नेहमी पायाचे अंगठे धरायला लावलेल्या विद्यार्थ्यासारखं वाटायचं. असो. तू त्याच्यावर बारीक लक्ष ठेव. मी बघतो काय करायचं ते."

मी गोट्याच्या पाळतीवर रहायचं मनोमन ठरवलं. दुसर्‍या दिवशी गोट्या कुणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं की गोट्या आणि फोनवरचा किंवा फोनवरची लक्ष्मी रोडवरच्या महालक्ष्मी रेस्टॉरंट पाशी भेटणार आहेत. गोट्या गेल्यावर, त्याला संशय येऊ नये म्हणून, तब्बल ५ मिनीटांनी निघालो. मला ते रेस्टॉरंट नक्की कुठे आहे ते माहीत नव्हतं.. पण म्हंटलं ते शोधायला असा किती वेळ लागणार? लक्ष्मी रोडच्या एका टोकापासून सुरुवात करून दुसर्‍या टोकापर्यंत आलो.. रेस्टॉरंट सापडलं नाही.. मग एका दुकानात विचारलं.. त्याला माहीत नव्हतं.. परत पहिल्या टोकापासून शोधत आलो.. तरीही दिसलं नाही म्हणून अजून एका दुकानात विचारलं आणि पुणेरी झटका बसला.. 'अहो! मगाशी तुम्ही मलाच विचारून गेलात. मी तेव्हाच तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगीतलं. सक्काळी सक्काळी लावली काय?' ते शेवटचं वाक्य फक्त पुणेरीच म्हणू शकतात. माझा चेहरा दोन वेगळे बूट घालून ऑफिसला गेल्या सारखा झाला.. त्याला कसंबसं सॉरी म्हंटलं आणि त्या दुकानाचा नाव पत्ता लिहून घेतला.. हो! नाहीतर परत त्याच्याचकडे जायचो चुकून.. या भानगडीत त्या रेस्टॉरंटचं नाव मी विसरलो.. मग लोकांना कडकलक्ष्मी पासून महामाया पर्यंतची सर्व वैविध्यपूर्ण नावं विचारून मी बरीच स्कूटरपीट करून घेतली.. काही लोकं काय बदमाश असतात.. मुद्दाम चुकीचा पत्ता सांगतात. दोन तासानंतर आता काय करावं असा विचार करीत मी उभा होतो तेव्हा अचानक ते समोर दिसलं.. तोपर्यंत फारच उशीर झाला होता.

यापुढे गोट्याचा जवळूनच पाठलाग करायचा असं ठरवलं.. त्यानं मला ओळखू नये म्हणून मिशी लावली.. गोलमाल पिक्चर स्टाईल.. मग काय.. गोट्या निघाल्यावर लगेच त्याच्या मागे निघालो.. एका ठिकाणी गोट्या थांबला.. ५ मिनिटांनी तिथे एक फाटका माणूस आला.. गोट्यानं त्याला एक पुडकं दिलं.. त्यानं गोट्याला पैसे दिले.. आयला! गोट्या गर्द वगैरे विकतो की काय? नो वंडर, सीआयडी त्याच्या मागावर आहे.. मग गोट्या निघाला आणि त्याच्या ऑफिसात गेला.. मी स्कूटर लांब लावून चालत ऑफिसपाशी गेलो.. ऑफिसातून तो संध्याकाळ शिवाय निघणार नाही हे लक्षात येताच मी तिथून निघणार, तेवढ्यात खांद्यावर कुणीतरी हात ठेवला.. वरती 'बाबा! तुम्ही काय करताय इथे?' असे शब्द आले.. मागे वळून पाहीलं तर खुद्द गोट्याच होता.. बोंबला! हा माझ्या नकळत ऑफिसच्या बाहेर कसा आला? कोण कोणावर पाळत ठेऊन आहे नक्की? पण त्याला ओळख दाखवून चालणार नव्हतं.. ती गोलमाल मोमेंट होती.. आता उत्तम अभिनयच मला तारु शकणार होता.. तशी मी कॉलेजात अभिनयाची उत्तेजनार्थ बक्षीसं मिळवली होती म्हणा.. ते आठवून जरा आत्मविश्वास आला.. मग एकदम वळलो.. त्याला शांतपणे आपादमस्तक न्याहाळलं.. मग थंड कोरड्या आवाजात आणि आवाज थोडा बदलून मी म्हंटलं -
मी: "तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिस्टर. मी तुमचा बाप नाही."
गोट्या: "काहीतरी काय बोलताय बाबा! मी गोट्या! तुमचा मुलगा! तुमच्या डोक्याला मार वगैरे लागलाय का? काहीच कसं आठवत नाहीये तुम्हाला?"
मी: "सॉरी! मला मुलगा नाहीये".. मग त्याच्याकडे थोडं निरखून पाहिल्यासारखं करत मी पुढचा बाँब टाकला.. "तुम्ही... अंss.. तू चिमणचा मुलगा का? चिमण माझा जुळा भाऊ! विनायक माझं नाव! मी लहानपणी घरातून पळून गेलो होतो म्हणून बाबानी माझ्याशी संबंध तोडले आणि सगळ्यांना तोडायला लावले. कसा आहे चिमण?"
एव्हाना गोट्या पुरता भंजाळल्यासारखा वाटत होता.. माझ्याकडे अविश्वसनीय नजरेने बघत होता.. मी मनातल्या मनात मला अजून एक उत्तेजनार्थ बक्षीस देऊन टाकलं.
गोट्या: "अंss! बाबा ठीक आहेत. तुम्ही घरी या ना रात्री."
मी: "छान! सांग त्याला मी भेटलो होतो म्हणून." मग शून्यात बघत एक खोल उसासा टाकत मी पुढे म्हणालो.. "काही गोष्टी परत जुळवता येत नाहीत, गोट्या! चल! मला आता जायला पाहीजे. आनंद वाटला तुला भेटून." गोट्याला बोलायची काही संधी न देता मी तिथून फुटलो.

संध्याकाळी घरी आल्यावर गोट्या आणि सरीताचं बोलणं ऐकलं - "आई! बाबांच्या डोक्यावर परिणाम झालाय."
सरीता: "त्याच्या नाही तुझ्याच झालाय".. वा! वा! बायको असावी तर अशी.
गोट्या: "अगं आई! खरंच झालाय. आज मला ऑफिस बाहेर भेटले होते. ओळखच दाखवली नाही. वरती मी बाबांचा जुळा भाऊ आहे असं म्हणत होते."
सरीता: "जुळा भाऊ? मला कसं माहीत नाही त्याबद्दल".. इथं मी नाट्यमय एंट्री घेतली.. आवाज अगदी नेहमीसारखा ठेवला..
मी: "कुणाचा जुळा भाऊ?"
सरीता: "हा सांगत होता तुला जुळा भाऊ आहे म्हणून. त्याला भेटला होता म्हणे." ते ऐकताच मी अजून एक उत्कृष्ट अभिनयाचा नमुना पेश केला.. गोट्याचे खांदे पकडून गदागदा हलवले आणि आनंदातिरेकाने म्हंटलं - "कोण विनायक? विन्या भेटला होता तुला?". उत्तरादाखल गोट्या खो खो हसत सुटला. माझ्या अभिनयाची ही किंमत? बर्‍याच वेळाने हसणं कसंबसं थांबवून म्हणाला - "तो माणूस गेल्यावर मी वॉचमनला त्याच्या गाडीचा नंबर लिहून आणायला सांगीतला." मला नासकं अंड अंगावर बसल्यासारखं झालं.. प्रचंड चिडचिड झाली.. कानातून धूर यायचा बाकी होता फक्त.. माझ्या अभिनयाचं बेअरिंग पडून इतस्ततः बॉल बेअरिंग सारखं घरंगळायला लागलं. तिकडे सरीताची उत्सुकता शिगेस पोचली.
सरीता: "मग?"
गोट्या: "मग काय? तो आपल्याच गाडीचा नंबर होता."
सरीता: "असं कसं झालं?" गोट्यानं कपाळावर हात मारला.
गोट्या: "अगं आई! तो माणूस बाबाच होता. मला उगाच जुळ्याच्या बंडला मारल्या त्यांनी. बाबा! काय अँक्टिंग मारता पण! निदान कपडे तरी वेगळे घालायचे ना!" मी मला दिलेलं उत्तेजनार्थ बक्षीस चडफडत रद्द केलं आणि वैतागून खिशातली मिशी कचर्‍यात टाकली.
सरीता: "का रे तू असं केलंस?" यावर मी जुळ्याच्या भूमिकेतून डिटेक्टिव्हच्या भूमिकेत शिरलो.
मी: "गोट्या! तू काही विकण्याचा धंदा करतोयस काय?"
गोट्या: "छे!"
मी: "मी आजच तुला एका माणसाला एक पुडकं देताना पाहीलंय."
गोट्या: "ओ! ते होय! तो माझ्या ऑफिसमधल्या एकानं त्याच्यासाठी परदेशातून आणलेला पर्फ्यूम होता." .. मी आता डिटेक्टिव्हच्या भूमिकेत पार आत पर्यंत गेलो होतो.
मी: "अच्छा! तू एकाने दुसर्‍यासाठी आणलेला पर्फ्यूम फक्त देण्याचं काम केलंस तर! पण तू एक छोटीशी चूक केलीस. त्याच्याकडून पैसे घेतलेस. ते का?"
गोट्या: "कमाल आहे बाबा? अहो ते पर्फ्यूमचे पैसे होते. ते ऑफिसमधल्या कलीगला द्यायचे आहेत." .. मी त्याला एवढ्यावरच सोडला तर मी कसला डिटेक्टिव्ह? माझी केस वॉटरटाईट होती.
मी: "गोट्या! कुणीतरी तुझ्या मागे लागलंय.. बरोबर ना?" गोळी बरोबर बसली.. गोट्या लगेच वरमला.
गोट्या: "अं अं अं हो! पण तुम्हाला कसं कळलं?" मी लगेच विजयी हास्य केलं. पुढे जाऊन गोट्याच्या छातीवर बोट आपटत म्हणालो "हॅ हॅ हॅ! हमारे जासूस चारो तरफ फैले हुए हैं!"
सरीता: "हो रे गोट्या? कोण मागं लागलंय तुझ्या? आणि कशाला?"
गोट्या: "हरे राम! आता मला सांगावच लागणार सगळं. अगं आई! मी मायबोली नावाच्या साईटवर रजिस्टर झालोय."
सरीता: "ते काय असतं? वधूवर सूचक मंडळ आहे का?"
गोट्या: "नाही गं!"
सरीता: "मग वधूवर मेळाव्याचं ठिकाण आहे का?"
गोट्या: "अगं नाही गं! थांब मी तुला दाखवतोच.".. गोट्याला मायबोलीची अब्रू नुकसानी पहावेना.. २ मिनिटानी गोट्या आतून त्याचा लॅपटॉप घेऊन उगवला. "ही ती साईट. इथे वेगवेगळ्या देशातले मराठी बोलणारे लोक असतात. काही गप्पा मारतात. काही कविता/लेख लिहीतात."
सरीता: "मग हे 'गजरा', 'खट्याळ' काय आहे? अशी त्यांची नावं आहेत?"
गोट्या: "अगं ही त्यांची खरी नावं नाहीयेत काही. टोपण नावं आहेत. त्याला आयडी म्हणतात."
सरीता: "बरं बरं! तुझा आयडी काय आहे?"
गोट्या: "सदाखुळी"
सरीता: "शीsss! असला कसला आयडी? आणि हा तर मुलीचा वाटतोय."
गोट्या: "हो मुद्दाम मी मुलीचं नाव घेतलंय."
सरीता: "का?"
गोट्या: "म्हणजे मग जास्त संशय न येता इतर मुलीं बरोबर ओळख वाढवता येईल की नाही? मला या जेट-सेट युगात थेट-नेट प्रेम करायचंय."
सरीता: "अच्छा! तरीच तू हल्ली मुलीसारखा बोलतोस.. बोलतेस.. मग तू काय करतेस... करतोस?" जेंडर क्रायसिसची लागण सरीतालाही झाली आता.
गोट्या: "मी कविता करतो.. जास्त करून विडंबनं."
सरीता: "तू कविता करतेस... करतोस?" यावर पायाच्या अंगठ्यानं जमिनीवर रेघा काढल्यासारखं करत गोट्यानं अंग घुसळलं. कसं होणार या गोट्याचं देव जाणे. "अरे वा! दाखव बघू तुझं एखादं विडंबन." गोट्यानं एक पान उघडून वाचायला दिलं.. सरीतानं ते मोठ्यांदा वाचलं....

'शब्दा वाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले' चे विडंबन

चपले वाचुन खुपले सारे, चपलेच्या पलिकडले
प्रथम तिला काढियले आणिक रुतू नये ते रुतले

टोच नवी पायास मिळाली
खोच नवी अन् बोच निराळी
त्या दिवशी का प्रथमच माझे खूर सांग कळवळले

आठवते देवाच्या द्वारी
पादत्राण लांबवले रात्री
खट्याळ तुझिया हास्याने मम दु:ख अजुनि फळफळले

सरीता: "मस्त आहे रे गोट्या! पण या सगळ्याचा आणि तुझ्या मागे कुणी लागण्याचा संबंध काय?".. गोट्यानं त्याच्या विचारपुशीचं पान वाचायला दिलं.. "हे बघ! टकलूहैवान नावाच्या आयडीनं मला काय काय लिहीलं आहे ते वाच!"

तिनं मोठ्यांदा वाचलं..

'तुझ्याकडे प्रचंड प्रतिभा आहे. तुला न विचारताच अगं तुगं करतोय चालेल ना?'
'काय धमाल विडंबन करतेस गं तू? अगदी हहपुवा!'
.....
.....
.....
'मला तुझ्याशी ओळख वाढवायला आवडेल. आपण कुठेतरी भेटु या का?'
.....
.....
'तुझ्या गळा माझ्या गळा' च्या चालीवर माझं पण एक विडंबन
सदाखुळे सदाखुळे
मी भरकटलो तुझ्यामुळे'
.....
'तुला भेटल्या शिवाय मला करमणार नाही. मला फोन कर - ५२३२२ ७८५६४'

सरीता: "पण तुझ्या मागे सीआयडी लागला होता ना?"
गोट्या: "सीआयडी? कुणी सांगीतलं?"
सरीता: "अरे तू दीपाला तुझ्या मागे सीआयडी लागलाय म्हणून सांगीतलंस ना? बाबानं ऐकलं ते."
गोट्या: "बाबांना काहीही ऐकू येतं. परवा तू त्यांना गवार आणायला सांगीतलीस तर ते मटार नाही का घेऊन आले? तसंच. मी तिला एक आयडी मागे लागलाय म्हणून सांगीतलं फक्त." .. आता सरीताला हसू आवरेना.. माझा डिटेक्टिव्ह पार भुईसपाट झाला होता.
सरीता: "कान आहेत का भोकं आहेत रे तुझी? मी आता या टकलूहैवानाला फोन करून फैलावर घेते चांगला. तुझ्यामुळे भरकटतोय काय?" .. तिनं फोन लावला.. जे मला मुळीच अपेक्षित नव्हतं.. कारण माझा, ऑफिसनं नुकताच मला दिलेला मोबाईल वाजला.. माझं बिंग फुटलं.. आणि ती किंचाळली
सरीता: "म्हणजे तू टकलूहैवान? चिमण! ही काय भानगड आहे?"
मी: "कसली भानगड? अगं हा गोट्या आपला कायदेशीर मुलगा आहे! भानगड नाहीये काही."
सरीता: "तू परत फालतू जोक मारून वेळ मारून नेऊ नकोस. माझ्या नकळत तू पोरीबाळींच्या मागे फिरतोयस, खरं ना?"
मी: "हे बघ! पोरीबाळींच्या मागे फिरायचं असेल तर तुला सांगून कसं फिरणार? तुझ्या नकळतच फिरणार ना? आणि तुला जे वाटतंय ते मुळीच खरं नाहीये. मी गोट्यासाठी मुली शोधत होतो. माझ्यासाठी नाही काय." .. पुढं बरच पानिपत झालं.. शेवटी एका तहावर सुटका झाली.. डिटेक्टिव्हचा आता एक पराजित योध्दा झाला होता. मी मायबोलीवर कधीही जायचं नाही, तिचं अखंड मांडलिकत्व पत्करायचं, तिला वर्षातून २५ साड्या व ४ सोन्याचे दागिने नजराणा द्यायचा.. या बोलीवर मोठ्या मनानं, तिनं माहेरी जायचं रद्द केलं.

काही दिवसांनी गोट्यानं मला आणि सरीताला त्याच्या थेट-नेट प्रेमाचा गौप्यस्फोट केला. त्याचं मायबोलीवरच्या पिपाणी नावाच्या आयडीशी जमलं होतं. ती पिपाणी दुसरी तिसरी कुणी नसून आमच्याच शेजारी वाजणारी दीपा निघाली.
मी: "कसला मठ्ठ आहेस तू? लहानपणापासून तिला ओळखतोस, तरी तुला कळलं नाही?"
गोट्या: "अहो बाबा! प्रेम आंधळं असतं ना?"
सरीता: "अगदी बापावर गेलाय. त्याला तरी कुठे कळलं होतं?"

म्हणतात ना.. काखेत कळसा अन् नेटला वळसा.

-- समाप्त --

(तळटीपः टकलूहैवान हा आयडी विकावू आहे. इच्छुकांनी माझ्याशी संपर्क करावा. आयडी सोबत पासवर्ड फुकट मिळेल.)

Tuesday, December 1, 2009

नुस्ता स.दे.

"एखाद्या अनोळखी माणसाला मी दिलेलं गाणं गुणगुणताना ऐकणं यापेक्षा इतर कशानही मला जास्त आनंद होत नाही. एकदा कलकत्त्या पासून सुमारे २० मैल लांबच्या एका तलावात, एकदा मी गळ टाकून बसलो होतो. मासे पकडत बसणे हा माझा एक छंद आहे. त्यादिवशी माझं नशीब चांगलं नव्हतं.. कारण दिवसभर बसून एकही मासा मिळाला नाही. निराश होऊन मी निघणार एवढ्यात एका १० वर्षाच्या पोराने तलावात सूर मारला.. आणि तो 'तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले' हे माझं बाझी तलं गाणं गाऊ लागला. त्याला याची कल्पनाही नसणार की हे गाणं देणारा माणूस पलिकडच्या तीरावर गळ टाकून बसलाय! तो माझ्या आयुष्यातला मला मिळालेला सगळ्यात मोठा मासा आहे.

असंच एकदा मी बांद्रा स्टेशनवर मालाडला जाण्यासाठी उभा होतो. जवळंच काही कामगार कुदळ फावड्यांच्या हालचालींच्या ठेक्यावर माझं शबनम चित्रपटातलं गाणं गात होते. ते ऐकता ऐकता मी इतका गुंग झालो की ती लोकल कधी आली अन् गेली ते मला कळलंच नाही."

हे खुद्द सचिनदेव बर्मन याचं भाष्य आहे! काही लोक त्याला एसडी बर्मन म्हणतात तर काही दादा बर्मन.. माझ्या लेखी तो 'नुस्ता सदे' आहे.. कारण त्याचं गाणं आवडलं की मी फक्त 'वाss! नुस्ता सदे!' एवढंच म्हणू शकतो.

पिया तोसे नैना लागे रे (गाईड), तेरे नैना तलाश (तलाश), सुन मेरे बंधू रे (बंदिनी), दिवाना मस्ताना हुआ दिल (बंबईका बाबू), जाने वो कैसे लोग थे जिनके (प्यासा), वक्तने किया क्या हँसी सितम (कागजके फूल), फुलोंकी रंगसे दिलकी कलमसे (प्रेमपुजारी), हम बेखुदीमें तुमको पुकारे (काला पानी), जलते हैं जिसके लिए (सुजाता), छोड दो आँचल जमाना क्या कहेगा (पेईंग गेस्ट)... अशी कितीतरी त्याची गाणी.. यातलं एक जरी ऐकलं तरी दिवसभर ते मनात घोळत रहातं.. मधेच एखादा संगीताचा तुकडा आठवतो नाहीतर एखादी ओळ आणि नकळत दाद दिली जाते.. 'वाss! नुस्ता सदे!'

लोकांच्या तोंडात पटकन बसणारी अविस्मरणीय गाणी बनवायला त्याला कसं काय जमायचं यामागे एक किस्सा आहे. १९४४ साली शशधर मुखर्जीच्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी सदे कलकत्त्याहून मुंबईला आला. रोज दुपारी जेवणानंतर मुखर्जीच्या खोलीत पेटी नेऊन नवीन रचना ऐकवणे हा त्याचा कार्यक्रम होता. मुखर्जी धुन ऐकता ऐकता डोळे मिटायचा आणि थोड्या वेळाने चक्क घोरायला लागायचा. त्याचं घोरणं हे गाणं न आवडल्याचा संकेत होता. हे प्रकरण २ महिने चाललं. मग मात्र सदेच्या सहनशक्तीचा अंत व्हायची वेळ आली.. रोज मुखर्जीला अंगाईगीत गाऊन झोपवण्यासाठी आपण मुंबईला आलो आहोत काय? असा विचार घोळू लागला.. शेवटी, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून सदे एक दिवस त्याच्या खोलीत पेटी घेऊन गाऊ लागला.. नेहमीप्रमाणे त्यानं डोळे मिटले.. आता काय? त्या घोरण्याच्या कातिल सुरांची वाट पहायची, गाशा गुंडाळायचा आणि घरी जायचं.. अचानक मुखर्जीनं डोळे उघडले आणि म्हणाला 'तू हे गाण रेकॉर्ड करून घे. सगळ्या वादकांना बोलव आणि रेकॉर्ड कर." सदेला कळेना की इतक्या सगळ्या गाण्यातून त्यानं हेच गाणं का निवडलं? त्याचं उत्तर त्याला त्याच रात्री मिळालं.. रेकॉर्डिंग संपवून बाहेर येताना सदेनं डोअरकीपरला तेच गाणं गुणगुणताना ऐकलं.. तो नुसता गुणगुणत नव्हता तर बरोबर म्हणत होता. गाणं सर्वस्पर्शी असलं पाहीजे.. ऐकणारा उभ्या भारतात कुठेही रहाणारा असला तरी त्याला ते गाणं भावलं पाहीजे.. हे सगळं स्वतःच्या शैलीशी तडजोड न करता करायचं या मुखर्जीच्या कानमंत्रामुळेच सदेनं पुढची ३० वर्ष हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली.

सोप्पी पण कर्णमधुर चाल.. आम जनतेला आपलिशी वाटेल अशी, तरीही बाळबोध नाही.. जोडीला कमितकमी वाद्यांची समर्पक साथ.. गाण्यातले भाव आणि वातावरण उंचावणारी.. लोकसंगीताचा भरपूर वापर.. हे सदेच्या शैलीचं व्यवच्छेदक लक्षण.

गमतीची गोष्ट अशी आहे की, सदे बंगालमधे गायक म्हणून प्रसिध्द आहे तर बंगालबाहेर संगीतकार म्हणून. सदेनं फार कमी गाणी हिंदी चित्रपटात गायली.. 'माझं गाणं चित्रपटात कुणाच्याही तोंडी असता कामा नये' अशी त्याची एक अट असायची.. त्याचा आवाज कुणालाही साजेसा नव्हता हे एक कारण असेल कदाचित!.. पण सदेचं गाणं बॅकग्राउंडला असलं तर चित्रपटात मस्त वातावरण निर्मिती करून जातं. आठवा गाईडमधलं 'वहाँ कौन है तेरा'. सदेचा आवाज फार चांगला आहे असं काही मी म्हणणार नाही.. मलाही त्याचा आवाज सुरुवातीला आवडत नसे.. त्याचा आवाज बिअरसारखा आहे.. प्रथम कडू लागल्यामुळे नकोशी वाटते.. नंतर पिऊन पिऊन चटक लागते आणि नशा चढते. त्याचं गाणं आतून येतं.. पाण्याच्या प्रवाहाला असते तशी ओढ आहे त्याच्या आवाजात.. 'मेरे साजन है उस पार' मधे किती आर्जवी होतो त्याचा स्वर!

त्याच्या गाण्याच्या शैलीला भटियाली ढंग म्हणतात.. भटियाली म्हणजे बंगालचं कोळीगीत.. गाताना कुठे थोडासा कंप, कुठे एखादा तुटक सूर तर कुठे थोडासा चिरका आवाज हे भटियाली ढंगाचं वैशिष्ट्य! 'सफल होगी तेरी आराधना' हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.. सुरुवातीच्या 'बनेगी आशा एक दिन तेरी ये निराशा' या ओळीतला 'आशा' शब्द कसा म्हंटलाय ते ऐका. ही शैली त्यानं फकीर, बैरागी, पीर, भिकारी किंवा घरातले नोकर अशासारख्यांची अनेक गाणी ऐकून आत्मसात केली. त्यांची गाणी ऐकूनच तो बहुश्रुत झाला असं म्हणायला पाहीजे. 'इतकी वर्ष मी गाणी दिली तरी तो लोकगीतांचा साठा अजून संपलेला नाही' असं एकदा सदे म्हणाला होता.

सदेची काही बंगाली गाणी मला इथे सापडली: - 'सदेनं गायलेली बंगाली गाणी.' यातली काही गाणी नंतर हिंदीत आली. ती मूळ गाणी ऐकताना सदेची स्वतःची खास शैली जाणवते.. भाषा समजत नसली तरी मी ती परत परत ऐकून 'वाss! नुस्ता सदे!' करत राहीलो.

१. बार्ने गंधे छंदे - फुलोंकी रंगसे दिलकी कलमसे (किशोर, प्रेम पुजारी)
२. मानो दिलोना बधु - जाने क्या तूने कही (गीतादत्त, प्यासा)
३. घुम भुलेशी - हम बेखुदीमें तुमको (रफी, काला पानी)
४. कांदिबोना फागुन गेले - अबके ना सावन बरसे (लता, किनारा) हे पंचमने दिलेलं गाणं.

त्याचा जन्म (१ ऑक्टोबर १९०६) जरी त्रिपुरेच्या एका राजघराण्यात झाला होता तरी त्याच्या वडिलांनी त्याच्या सामान्य लोकांबरोबरच्या मैत्रीला कधीच आक्षेप घेतला नाही. वडिलांच्या सतार वादनामुळे त्याला संगीताची गोडी लागली ती कायमचीच! १९२४ मधे बीए झाल्यावर एमए करायच्या ऐवजी त्यानं संगीताचं शिक्षण घेणं सुरू केलं. के. सी. डे (मन्ना डे चे काका) सारख्या काही बड्या लोकांकडे तो शिकला. १९३० साली वडील गेल्यावर सदेचा फार मोठा आधार गेला. तो स्वतः उत्तम तबला आणि बासरी वाजवायचा. त्याच्या बहुतेक गाण्यात बासरी कुठेतरी हजेरी लावून जाते त्याच हे एक कारण असेल. १९३२ साली त्याची पहिली गाण्याची रेकॉर्ड बंगालमधे तुफान लोकप्रिय झाली. १९३८ साली मीरा नावाच्या गायिकेशी त्याचा विवाह झाला आणि १९३९ मधे राहुलदेव उर्फ पंचम चा जन्म झाला. मीरा राजघराण्यातील नसल्याने लग्नाला घरून खूप विरोध झाला. शिवाय राजघराण्याच्या लौकिकाला त्याच्या पेशामुळे बट्टा लागतो असा आरोप सतत व्हायचा. या सगळ्याचं पर्यवसान घराण्याचे संबंध तोडण्यात झालं. आज हे राजघराण सदेमुळं ओळखलं जातं.

१९४४ पर्यंत त्याची अनेक बंगाली गाणी गाजली. त्यानंतर त्यानं मुंबईत पाऊल ठेवलं. सुरुवातीच्या दोन तीन चित्रपटातली गाणी चांगली झाली तरी लोकांच्या मनात म्हणावा तेव्हढा तो ठसला नव्हता. याच कारणामुळे त्यानं कलकत्त्याला परत जायचा निर्णय घेतला. अशोककुमारने 'मशाल चित्रपटाला संगीत दे आणि मग काहीही कर' अशी गळ घातल्यावर त्यानं थोडं थांबायचं ठरवलं. मशालला अभूतपूर्व यश मिळालं आणि त्यानंतर त्याच्या मृत्युपर्यंत (३१ ऑक्टोबर १९७५) त्यानं अनेक अविस्मरणीय हिंदी गाणी दिली.

एक राजपुत्र असूनही त्याचं वागणं बोलणं अगदी साधं होतं.. त्यात माज किंवा ऐट नव्हती.. धोतर कुडता आणि अंगावर एक शाल असा साधा वेष असायचा.. कुडत्याला असलेली सोन्याची बटणं हीच त्यातल्या त्यात राजघराण्याची खूण! कधी हट्टीपणा करणारा तर कधी लहान मुलासारखा वागणारा सदे कायम संगीतात बुडालेला असायचा. बरीच गाणी त्याला मासे पकडताना नाहीतर चालत फिरताना सुचलेली आहेत. त्याचं संगीत त्यामुळेच इतकं उत्स्फुर्त वाटतं. गाणं चांगलं झालं की खूष होऊन गायकाला किंवा गायिकेला तो त्याचं खास पान बक्षीस म्हणून द्यायचा.

कुठल्या गायकाचा आवाज कुठल्या गाण्याला चांगला वाटेल याबद्दल त्याचे स्वतःचे आडाखे होते.. पडद्यावर कुठला हिरो ते गाणार आहे ही बाब त्याच्या दृष्टीने दुय्यम असायची.. म्हणूनच देव आनंदला किशोर, रफी किंवा हेमंतकुमार यांनी आवाज दिला आहे.. तसंच अमिताभलाही रफी, किशोर आणि मनहर यांचा आवाज अभिमान मधे आहे. गाण्यात वाद्यांपेक्षा तो गायकाचा आवाज आणि गाणं कसं गायला पाहीजे यावर जास्त भर द्यायचा. 'छोड दो आँचल' मधला 'हाs' किंवा 'रात अकेली है' मधली कुजबुजत्या स्वरात होणारी सुरुवात हा खास सदे टच.

देव आनंदचं नवकेतन सदेशिवाय दुसर्‍या कुणालाही संगीतकार म्हणून घेत नसे. सदे आजारी होता म्हणून देव आनंदनं गाईड काही महीने पुढे ढकलला.. इतरानी बराच पाठपुरावा केला तरीही. आणि सदेनंही उत्कृष्ठ संगीत देऊन त्याचा विश्वास सार्थ ठरवला.. पण दुर्देवाने गाईडला संगीताचं फिल्मफेअर नाही मिळालं. आनंदबंधू आणि सदे चांगलं संगीत होण्यासाठी किती झगडायचे याचा एक किस्सा आहे.. गाईडसाठी रफीचं एक गाणं रेकॉर्ड झालं.. गाणं ऐकल्यावर देव आणि गोल्डी यांना ते मुळीच आवडलं नाही.. त्यानी सदेला फोन करून तसं सांगीतलं.. सदेनं तेच गाणं त्या प्रसंगाला योग्य आहे म्हणून फोन ठेऊन दिला.. अर्ध्या तासाने सदेनं फोन करून सांगीतलं की "तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. मी उद्या सकाळी येतो आणि नवीन धुन ऐकवतो." सकाळी सदेनं येऊन 'दिन ढल जाए' ची धुन ऐकवताच दोघे खूष झाले. ताबडतोब शैलेंद्रला बोलावलं आणि त्यानं ५ मिनिटात त्या गाण्याचा मुखडा लिहीला. आधी चाल मग गीत ही प्रथा सदेनंच सुरू केली. ती फक्त प्यासासाठी मोडली कारण त्यात शब्दांना जास्त महत्व आहे हे त्याला मनोमन पटलं म्हणून.



सदे वर्षाला ४/५ चित्रपटापेक्षा जास्त काम क्वचितच अंगावर घ्यायचा.. तेही चित्रपटाची कथा ऐकल्यावर आपण याला न्याय देऊ शकू असं सदेला वाटलं तर! 'हरे रामा हरे कृष्णा चित्रपटाचं संगीत मला जमणार नाही, त्यापेक्षा पंचम चांगलं संगीत देईल' असं सदेनं देव आनंदला निक्षून सांगीतलं. तरीही देवने 'ठीक आहे, पंचमला संगीत देऊ दे. पण तू मुख्य संगीतकार रहा' अशी तडजोड सुचवली. त्यालाही सदेनं ठाम नकार दिल्यावर देवचा नाईलाज झाला. पण जेवढं काम सदे अंगावर घ्यायचा ते मात्र मन लावून करायचा.. गाईड च्या चित्रीकरणासाठी सगळे जयपूरला जायची वेळ झाली तरी सदेचं गाणं तयार नव्हतं.. 'तू माझ्यावर विश्वास ठेव. मी असं गाणं पाठवेन जे सगळ्या जगाच्या लक्षात राहील.' असं सदेनं देवला पटवलं. थोड्याच दिवसानंतर त्यानं 'आज फिर जीनेकी तमन्ना है' पाठवलं. या गोष्टीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली त्यावेळेला चित्रपट होता 'ज्युवेल थीफ' आणि गाणं होतं 'होठोंपे ऐसी बात'!

गाण्यातल्या तालवाद्याला एखाद्या तंतुवाद्याची साथ देऊन तालाचा नाद वाढवायचा ही एक सदेची खासियत! 'सुन मेरे बंधु', 'मेरी दुनिया है माँ (तलाश)' यात तालवाद्या बरोबर एक तंतुवाद्य सतत वाजलेलं ऐकू येईल. कधी गाण्याची चाल त्यातल्या तालाबरोबर अशी मस्त झुलते की त्याबरोबर आपण पण झुलायला लागतो.. 'खायी है रे हमने कसम (तलाश)', 'खोया खोया चाँद' मधील कडव्याची चाल, 'दीवाना मस्ताना हुआ दिल' मधील कडव्याची चाल, 'मोरा गोरा अंग लैले', 'तेरे नैना तलाश', 'फुलोंकी रंगसे', 'लिखा है तेरी आँखोमे' अशी काही उदाहरणं आहेत त्याची.

सदेच्या बहुतेक गाण्यात थोडीच वाद्य वाजतात पण उत्तम वातावरण निर्मिती करतात. 'दिल पुकारे' चं सुरुवातीचं संगीत आपल्याला घरातून उचलून थेट डोंगरदर्‍यात घेऊन जातं. गाईड मधलं 'पिया तोसे' हा त्याला अपवाद म्हणावा लागेल. खमाज मधे बांधलेल्या या गाण्यात विविध प्रकारची वाद्य कुठेही कर्कशपणा न जाणवता अचूक परिणाम साधलाय. हे गाणं तब्बल ८ मिनीटाचं आहे.. पण सीडीवर विकत मिळणारं गाणं निम्मच आहे.. 'मूळ ८ मिनिटांचं गाणं.'

सदे गेल्यावर किशोरने एक खास रेडिओ प्रोग्रॅम करून त्याला श्रध्दांजली वाहिली. त्यात त्याच्या काही गमती जमती सांगीतल्या त्याची नक्कल करत.. ते किस्से मी मुद्दामच या लेखात लिहीले नाहीत. ते किशोरच्या तोंडून ऐकण्यातच जास्त मजा आहे.. त्याच्या प्रोग्रॅमचा काही भाग इथे ऐकायला मिळेल:- 'किशोरची श्रध्दांजली.'

दाद असो वा श्रध्दांजली मी फक्त 'वाss! नुस्ता सदे!' पेक्षा जास्त काही बोलू शकत नाही.

-- समाप्त --

(टीपः या लेखासाठी स्मिता गद्रे पटवर्धन यांची बहुमोल मदत झाली आहे.)

Monday, October 19, 2009

एका परंपरेचा अस्त

ज्यानी कुणी आपल्या वाढत्या वयातली महत्वाची वर्षं पुणे विद्यापीठात काढली (घालवली आहेत असं मी म्हणणार नाही) आहेत त्यानं विद्यापीठातल्या 'अनिकेत' कँटिनबद्दल ऐकलं नसेल तर तो एकतर ठार बहिरा असला पाहीजे किंवा त्याला स्मृतिभ्रंश तरी झाला असला पाहीजे. कारण ते नुसतं कँटिन नव्हतं.. ती एक मास्तर विरहित शिक्षण संस्था होती.. हल्ली HR ची लोकं, त्यांच्या नोकर्‍या जस्टिफाय करायला, कसले कसले सॉफ्ट स्किलचे ट्रेनिंग प्रोग्रॅम घेऊन बिचार्‍या कर्मचार्‍यांचा जीव नकोसा करतात ते सगळं ट्रेनिंग इथे नकळत होऊन जायचं.

तिथले पदार्थ फार चविष्ट होते अशातला काही भाग नव्हता, पण स्वस्त मात्र होते. खरं आकर्षण तिथल्या वातावरणाचं होतं. भारत क्रिकेटची मॅच जिंकत असेल तर मैदानावर जसं वातावरण असतं तसं वातावरण कायम! पीढीजात सुतकी चेहर्‍यावर देखील स्मित झळकवण्याची क्षमता त्या वातावरणात होती. परीक्षेत नापास झाल्याचा वैताग, मास्तरनं झापल्यानं आलेली कटुता, बापाशी झालेल्या भांडणाचं वैषम्य, प्रेमभंगाचं दु:ख, आपल्याला आयुष्यात काही करायला जमणार नाही ही भीति.. असल्या मन पोखरणार्‍या विचारांचा निचरा करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे अनिकेत!

विद्यापीठातल्या सगळ्या वाटा अनिकेतमधून जातात असं लोक गमतीनं म्हणायचे. लेक्चरला जायच्या आधी व नंतर, ग्रंथालयात जाण्याआधी मानसिक तयारी करण्यासाठी आणि जाऊन आल्यावर मेंदुवरचा ताण हलका करण्यासाठी, फी भरायला जाण्याआधी आणि नंतर असं कुठेही जायचं असलं तरीही व्हाया कँटिन जायची पध्दत होती. कँटिन हा एक भोज्या होता.. त्याला हात लावल्याशिवाय कुठल्याही कामाला मुहूर्त लागत नसे. हे ठसवायला त्या वेळी केलेलं 'पाऊले चालती पंढरीची वाट' याचं केलेलं विडंबन थोडं फार आठवतंय -

पाऊले चालती कँटिनची वाट
सर्व अभ्यासाला मारुनिया चाट
पाऊले चालती कँटिनची वाट

माझ्यासारख्या बर्‍याच रिकामटेकड्यांचा प्रवास अर्थात् कँटिनमधेच संपायचा. सकाळी विद्यापीठात दमून भागून आल्यावर आम्ही कँटिनला जे ठिय्या मारायचो ते संध्याकाळी कँटिन बंद होईपर्यंत! हां, कधी मधी परीक्षा देणे किंवा फी भरणे अशा फुटकळ कामाला नाईलाजास्तव बाहेर पडायचो, नाही असं नाही! ज्यानी कुणी कँटिनचं 'अनिकेत' नाव ठेवलं तो फार मोठा द्रष्टा असला पाहीजे कारण ती उपाधी आम्हाला १००% लागू होती. तिथल्या हॉलमधे असलेल्या कॅरम आणि टीटी या खेळात आम्हाला विशेष रस होता. तसे तिथे बुध्दिबळ खेळणारेही होते पण माझ्यासारखी जड बुध्दिची माणसं त्याच्या वाटेला अजिबात जायची नाहीत. आणि टीटी पेक्षाही आमची कॅरमला जास्त पसंती होती कारण कॅरम चहा-बिडी मारत निवांतपणे, शरीर न झिजवता, खेळता यायचा.

सुरवातीचे काही महीने इतर रथि-महारथिंचा खेळ बघून तोंडात बोटं घालण्यात गेला. हळूहळू आमचाही गेम सुधारला आणि विद्यापीठातली कॅरमची विवक्षित भाषा व नियम अवगत झाले. नियम थोडे वेगळे होते. सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे सोंगटी (विद्यापीठाच्या भाषेत गोटी) जर आपल्या स्ट्रायकर ठेवायच्या रेषांना चिकटली असेल किंवा त्यापेक्षा खाली असेल (म्हणजे बेसमधे असेल) तर तिला सरळ मारता यायचं नाही.. रिबाउंड मारूनच घ्यायची. या नियमामुळे प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कौशल्य कमी असलं तरी थोडी फार झुंज देता यायची.. त्यांच्या बेसमधे गोट्या घालून. दुसर्‍यांच्या गोट्यांना सरळ मारून त्यांच्या बेसमधे घालता नाही यायचं.. एकतर रिबाउंड मारून घालायच्या किंवा कुठेतरी आपल्याही गोटीला धक्का लागेल असं बघायचं.

काही शॉट्सना अभिनव नावं होती. पार्टनरच्या बेसमधल्या गोटीला बोर्डाच्या डाव्या किंवा उजव्या कडेवर स्ट्रायकर आपटून मारलं तर तो 'झाडू' शॉट! 'पंच मारणे' म्हणजे कडेला चिकटलेल्या गोटीला एक झापड मारून तशीच चिकटलेल्या अवस्थेत भोकात घालवणे. 'डबलशॉट' मधे आपली गोटी घेता घेता स्ट्रायकरने दुसर्‍याची गोटी त्याच्या बेसमधे घालायची किंवा आपली एखादी गोटी सोप्पी करायची.. हा एक बहुपयोगी शॉट होता पण फार लोकांना तो जमायचा नाही.. ज्यांना जमायचा त्यांची पत कॅरमच्या बाजारात वरची असायची. 'स्लाईड' शॉटमधे एखाद्या गोटीचा घसरगुंडीसारखा उपयोग करून स्ट्रायकर तिच्यावरून घसरवायचा आणि दुसरी गोटी घ्यायची.

काही जण आपली गोटी भोकापाशी गस्तीला बसवून दुसर्‍याला बूच लावण्यात वाकबगार होते.. त्यांना बुचर म्हंटलं जायचं. तसेच काही जण ती बूचं बाजुला करून आपली गोटी घेण्यात पटाईत होते.. त्यांना डिबुचर म्हणायचो. बूच बाजुला करणे शक्य नसेल तेव्हा ती गोटी 'तोडली' जायची.. म्हणजे तिला जोरात ताड्या मारून बोर्डावरून उडवली जायची किंवा आयुष्यातून उठवली जायची.. गोटीच्या त्या प्रवासाचं गोईंग बाय बोईंग असं मार्मिक वर्णन केलं जायचं. प्रत्येक गेम मधे पावडर टाकायची जबाबदारी एक खेळाडू घ्यायचा.. तो पावडरमॅन. खेळाडूच्या डाव्या आणि उजव्या बाजुला बसलेल्यांचा बेस म्हणजे 'समास' हा भाग. समासातली गोटी घ्यायची वेळ आली की तो सामासिक प्रॉब्लेम व्हायचा. जर कुणाला गोटी घ्यायला जमत नसेल आणि तो नुसता भोकाच्या अवतीभवती फिरवत असेल तर त्याला 'घुमायून' अशी पदवी मिळायची.

झुंज द्यायचं दुसरं महत्वाचं शस्त्र म्हणजे हल्लीच्या भाषेतलं स्लेजिंग.. आम्ही त्याला मानसिक खच्चीकरण म्हणायचो. हा प्रकार हरभजन - सायमंडस् यांच्यामुळे आत्ता आत्ता लोकांना कळाला.. आम्ही तो फार पूर्वीच आत्मसात केला होता.. आमचं त्यातलं प्राविण्य स्टीव वॉला समजलं असतं तर त्यानं अख्खी ऑस्ट्रेलियाची टीम आमच्याकडे ट्रेनिंगला पाठवली असती. अर्थात् आमच्या स्लेजिंगमधे शिव्यागाळी किंवा हीन दर्जाचं बोलणं नसायचं.. ते पूर्णपणे विनोदी असायचं आणि अगदी मोक्याच्या वेळेस म्हंटलं जायचं.. जेणेकरून प्रतिस्पर्धी हसता हसता गोटी फुकायचा.

खच्चीकरणासाठी प्रत्येकाच्या खेळायच्या शैलीचा अभ्यास कामाला येतो. उदा. रंग्या गोट्या जोरात मारतो. नेम चांगला असेल तर गोट्या जातात नाही तर तितक्याच वेगाने परत येतात. त्याचा नेम सहसा चुकत नाही पण त्याच्या मनात शंका निर्माण केली की संधी असते. तो क्वीन किंवा कव्हर अशी महत्वाची गोटी घेत असेल तेव्हा 'हळू मार रे रंगा' ही ओळ 'एक हंसका जोडा' या चालीत सुरू व्हायची. त्यापुढची ओळ 'हळु मार रंगाs आs आs' ही 'सख्या चला बागामधी रंग खेळू चला' यातल्या 'रंग खेळू चलाs आs आs' या कोरसासारखी तारस्वरात ओरडली जायची.. की लगेच ती शंका त्याला भेडसवायची.

बंड्या नेहमी अस्वस्थ असतो.. शांतपणे आपली खेळी यायची वाट बघत नाही.. कधी भकाभका बिडी ओढेल तर कधी गटागटा चहा ढोसेल नाहीतर कधी जरूर नसताना पावडर टाकेल. त्याचे डोळे एका जागी स्थिर नसतात.. सतत इकडे तिकडे हलत असतात. खेळी आली की तो पटपट खेळून मोकळा होतो.. जास्त टीपी करत नाही आणि इतरांनी केलेला त्याला आवडतही नाही. अर्थातच तो जेव्हा खेळायला बसतो तेव्हा तोच पावडरमॅन असतो. विवक्षित वेळेला बंड्याच्या अलिकडला उगीचच जास्त टीपी करेल.. कुठली गोटी घ्यायची यावर पार्टनरबरोबर खूप विचारविनिमय करेल. मग 'अरे, काय बुध्दिबळं खेळताय की कॅरम?' असा सवाल बंड्याकडून आला की समजायचं - लोहा गरम है, हाथोडा मार दो.

हातातून स्ट्रायकर सुटताना दिल्या कमरेपासून मागे झुकतो.. हे रिकॉईल मुळे होतं असा विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. त्यांच्या मते स्ट्रायकर सोडायला त्याला फार जोर लावायला लागतो. स्ट्रायकर सोडणे आणि मागे झुकणे या हालचाली सहज एकसंध झाल्या तर गोटी जाते नाहीतर हुकते. वजन उचलायच्या वेळेस कामगार मंडळी जसा 'हुप्पा हुंय्या' असा आवाज करतात तसाच स्ट्रायकर सोडायच्या वेळेस केला की इप्सित साध्य व्हायचं.

मोक्याच्या वेळेला गोटी फुकायला लावण्यासाठी विनोदाचा सढळ तोंडाने वापर व्हायचा. कुणी क्वीनला नेम लावायला लागला की 'कशाला राणीच्या मागे जवानी बरबाद करतोस?' असा फंडू सवाल यायचा. तरीही क्वीन घेतली आणि कव्हर थोडं जरी अवघड असलं तर लगेच 'बारावी झालास. आता पुढे काय?'. कुणी पटपट गोट्या घ्यायला लागलाच तर 'अरे, पार्टनरला थोड्या ठेव!' असा अनाहूत सल्ला मिळायचा किंवा 'सोप्या गोट्या घेऊन भाव खातोय रे' असा विलंबित आक्रोश व्हायचा... जर कधी त्याला बूच लावायचा आग्रह झाला तर 'त्याला बूच लावणं म्हंजे रिकाम्या बाटलीला बूच लावण्यासारखं आहे' असं म्हणून झिडकारला जायचा. एखाद्याला चुकून गोटी गेली तर 'मटका लागला रे' म्हणून बाकीचे विव्हळायचे, पण तो मटकेवाला 'अरे हा शॉट अ‍ॅडव्हान्स कॅरम व्हॉल्यूम ४ मधे आहे' असं समर्थन करायचा.

सगळ्यात बाका प्रसंग म्हणजे प्रतिस्पर्धी जिंकायला आले आहेत.. शेवटची गोटी घ्यायची राहिली आहे.. ती घ्यायला नेम लावलेला आहे.. एव्हढ्यात हरणारे दोघे एकदम उठून 'जन गण मन अधिनायक जय हे' हे समारोपाचं गाणं चालू करतात.. मग कसली गोटी जातेय?

असो. असे अनेक किस्से, घटना डोळ्यासमोरून गेल्या त्यावेळेला मी अनिकेत मधे खूप वर्षांनंतर उभा होतो आणि अजूनही तसंच आहे का ते शोधत होतो. दुर्दैवाने अनिकेत मधलं 'ते' वातावरण आता नामशेष झालं आहे. आता कॅरम आणि टीटी खेळायच्या जागी एक दुकान थाटले आहे आणि खेळायला पर्यायी जागा पण दिलेली नाही असं ऐकून आहे. थोडक्यात, एका महान परंपरेचा अंत झालाय.

-- समाप्त --

Saturday, July 4, 2009

रिसेशन - एक काथ्याकूट

(टीपः या लेखातील पात्रे 'ठरविले अनंते' या लेखातून उचलली आहेत. तो लेख माझाच असल्यामुळे लेखकाची पूर्वपरवानगी घेण्याची गरज वाटली नाही. किंबहुना, लोकांनी तो लेख वाचावा या निर्मळ हेतुनेच हा प्रपंच केला आहे.)

"अरे चिमण्या, आजकाल सगळं ग्लोबल झालंय. तिकडे खुट्ट झालं की इकडे पटापट दारं लावतात. तिकडे माशी शिंकली की इकडे लोकं सर्दीची औषधं घेतात. इकडच्या बिळात अल कायदा सरपटला तर तिकडचे लोक काठ्या घेऊन मारायला निघतात. इतकंच काय, साधं वॉर्मिंग पण ग्लोबल झालंय तर!".. 'रिसेशन ग्लोबल आहे की नाही' या माझ्या भाबड्या प्रश्नावर दिल्यानं आख्यान लावलं होतं. आमची साप्ताहिक सभा भरली होती. मी, सरिता, दिल्या आणि कल्पना एवढेच उपस्थित होते.. मक्या आणि माया अजून उगवले नव्हते. मला अजूनही कल्पनाच्या डोळ्यांकडे पहायचं डेरिंग होत नाही. काहीतरी बोलायचं म्हणून मी दिल्याला चावी मारली होती अन् माझ्या कर्माची फळं भोगत होतो. कल्पना तन्मयतेनं दिल्याचं बोलणं ऐकत होती.. दिल्याच्या गाढ्या नॉलेजवरचा विश्वास उडण्या एवढे दिवस त्यांच्या लग्नाला झाले नव्हते, त्याचं हे लक्षण. सरिता सुध्दा मन लावून त्याचं बोलणं ऐकत होती. लग्न मुरल्यानंतर, नवर्‍यापेक्षा त्याचे मित्रच जास्त समंजस आणि हुशार आहेत, असं बायकांना वाटायला लागतं, त्याचं हे लक्षण.

दिल्या: "आता हेच बघ ना. तिकडच्या मार्केटनं राम म्हंटल्यावर इकडच्या मार्केटनं लक्ष्मण म्हंटलं. अरे, माझा धंदा सुध्दा २ टक्क्यावर आला तर!"

"दो टकेके आदमीका धंदा कितना होगा?".. दिल्याच्या मागून आवाज आला. दिल्यानं वैतागून बघितलं.. मक्याची नाट्यमय एंट्री झाली. त्याच्या मागून मायाने प्रवेश घेताच 'अय्या! किती छान ड्रेस आहे. कुठे घेतलास?" असले ठराविक बायकी चित्कार झाले. एकमेकींच्या कपड्यांचं नेहमीचं कौतुक चालू असताना आम्ही मक्याची दारु ऑर्डर करण्याचं महत्वाचं काम उरकलं.

मक्या: "यार! ट्रिपला जाऊ या कुठेतरी. लेट्स चिलाउट फॉ सम टाईम." जरा कुठे स्थिरस्थावर होतोय तोच मक्याचा अमेरिकन भडिमार सुरु झाला. पण त्याच्याकडून आलेली ट्रिपची मागणी चांगलीच अनपेक्षित होती. कारण आत्तापर्यंत कधीही त्याला आमच्या बरोबर ट्रिपला यायला जमलं नव्हतं.. आज काय क्लायंटचा कॉल, उद्या प्रोजेक्टची डेडलाईन तर परवा अमेरिकेची वारी असल्या नाना शेंड्या त्यानं आम्हाला लावल्या होत्या. त्यामुळे हे असलं प्रपोजल म्हणजे मुंग्या आणि मेरु पर्वत यातली बाब होती.

मी: "मक्या! तुला क्लायंटची भाजी आणणं किंवा त्याच्या पोरांना शाळेत सोडणं यातलं एकही काम कसं नाहीये रे? तुला ट्रिप कशी काय सुचतेय?"

मक्या: "अरे बाबांनो! आयॅम फायर्ड! माझी नोकरी गेली. काल माझा शेवटचा दिवस होता". हे म्हणताच वातावरण थोडं तंग झालं. ते लक्षात येताच तो पुढे म्हणाला - "ट्रिपच्या निमित्ताने आमचा तिसरा हनीमून तरी होईल". यावर मायाने लगेच भुवया उंचावत यक्ष प्रश्न केला - "म्हंजे? दुसरा कधी झाला?".

"नशीब! मला वाटलं तू म्हणतेयस 'पहिला कधी झाला?'" सरिताच्या खडूस बोलण्यावर मायाची आणि तिची टाळाटाळी (म्हणजे टाळ्यांची देवाण घेवाण) झाली.

मी: "अरे! काय चाल्लंय काय? दिल्याचा धंदा बसला. तुझी नोकरी गेली. आता माझी कधी जातेय एवढंच बघायचं".

मक्या: "तुझी कसली जातेय? तुझी जिव्हाळ्याची बँक आहे. माझ्या क्लायंटची दिवाळ्याची होती. इट वेंट डाऊन द ड्रेन.. सो वेंट द क्लायंट. तो गेल्यावर माझी गरज संपली आणि कंपनीनं मला नारळ, पुष्पगुच्छ देऊन सांगितलं 'या आता!'".. क्लायंट गेला तरी मक्याचं अमेरिकन काही डाऊन द ड्रेन जाण्याची चिन्हं नव्हती.

दिल्या: "मला कळत नाहीये की तुझी गरज नाही हे कळायला त्यांना इतकी वर्ष का लागली?".. दिल्यानं २ टक्क्याचा सूड उगवला.

कल्पना: "दिलीप! अरे तू काहीही काय बोलतोस?" कल्पनाच्या चेहर्‍यावर 'ह्या दिल्याला कुठे न्यायची सोय नाही' असे भाव होते.. तिला अजून आमच्या अतिरेकी खडूस पणाची सवय झाली नव्हती.. मायानं तिच्या कानात कुजबुज करून 'सगळं ठीकठाक आहे' असं समजावलं असावं.. कारण तिच्या चेहर्‍यावर परत 'दिल्या ग्रेट आहे' असे भाव उगवले.

सरिता: "चला बरं झालं. मायाला डबा द्यायला नको आता. बाय द वे, तू त्याला डब्यात रोज काय द्यायचीस?"

मक्या: "धम्मक लाडू". मायानं त्याच्या डोक्यावर एक टप्पल दिली त्यामुळे तोंडाकडे जात असलेल्या बिअरच्या ग्लासावर त्याचे दात आपटले. परिणामी त्याच्या शर्टानं बिअरचा घोट घेतला.

मी: "शाब्बास! म्हंजे नोकरी गेली म्हणून तू ट्रिपा काढणार! चलन फुगवटा जास्त झालाय वाटतं?" .. आमच्या भाषेत खिशात जास्त पैसे असण्याला चलन फुगवटा होणे म्हणतात.

मक्या: "छे! छे! उलट चलन दुखवटा आहे. सगळी गुंतवणूक सपाट झालीये.. लाखाचे बारा हजार झाले म्हणतात तसं.. थँक्स टू दिल्या!".

दिल्या: "ए भाऊ! माझा काही दोष नाही हां! संपूर्ण मार्केट झोपलं त्याला मी काय करणार?".. नेमकं दुखर्‍या भागावर बोट ठेवल्यामुळे दिल्या पिसाळला.

मी: "तरी मी तुला सांगत होतो.. बँकेत पैसे ठेव म्हणून.. पण तुला जास्त हाव सुटली"

सरिता: "त्यापेक्षा तू ४-५ वर्षांपूर्वी दुकान घेऊन मायाला दवाखाना तरी काढून द्यायला पाहीजे होतास. म्हंजे आत्तापर्यंत तिचा चांगला जम बसला असता"

मक्या: "जम कसला बसला असता? धंदा बसला असता. अगं! तिचं एकही औषधं मला लागू पडत नाही, मग इतरांची काय कथा?"

माया: "माझी औषधं फक्त माणसांसाठी असतात". मक्याला घरचा आहेर मिळाला.

दिल्या: "दवाखाना नसता चालला तर अंडी तरी विकायला ठेवता आली असती."

मक्या: "काहीही काय? अंडी काय विकायची? मला नाही कुणाची अंडी पिल्ली बाहेर काढायला आवडत."

दिल्या: "तुला अंडी विकणं एवढं कमीपणाचं वाटत असेल तर एक आयडिया आहे. एक पाटी लावायची - 'येथे अंडी मिळतील'. खालती दुसरी पाटी लावायची - 'अंडी संपली आहेत' आणि खाली पेपर वाचत बसायचं."

कल्पना: "दिलीप, तू असले सल्ले देतोस लोकांना? आणि तरी तुझ्याकडे लोक येतात?" कल्पनाने चिंताग्रस्त चेहर्‍यानं विचारलं. दिल्याच्या ज्ञानाबद्दल तिच्या मनात अनेक शंकांची जळमटं निर्माण झाल्यासारखं वाटलं.

मक्या: "येतात म्हणण्यापेक्षा यायचे म्हंटलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल"

दिल्या: "अंडी विकण्याचं काही झंझट नाही ना पण! ते फक्त निमित्त! शिवाय प्रॉपर्टीचे भाव काही न करता आपोआप वाढतातच" कल्पनाला परत आपल्या नवर्‍याबद्दल थोडा आदर वाटायला लागला, पण एकूण परिस्थिती आणि त्यावरील चर्चा तिला अयोग्य वाटत होती.

कल्पना: "इथं त्याची नोकरी गेलीय, त्याची काळजी करायची सोडून तुम्ही त्याची टिंगल करताय. तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे की नाही? उलट्या काळजाचे आहात अगदी!".

मी: "उलट्या काळजाचे असलो तरी आम्हाला काळीज नक्की आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. राहिली नोकरीची बाब.. ती त्याला मिळेलच. आत्तापर्यंत २५ वेळा तरी नोकरी बदलली असेल त्यानं. दर वेळेला विचारलं की वेगळ्याच कंपनीचं नाव सांगायचा तो."

मक्या: "आता रिसेशन मधे कुठली नोकरी मिळणारेय लवकर? शिवाय माझं वयही झालंय जास्त"

दिल्या: "अगं पण आम्ही विनोद करून त्याच्या मनावरचा ताण हलका करायचं बघतोय" दिल्याची सारवासारवी.

मक्या: "माझ्या मनाला फक्त मायाच ताण देऊ शकते". अजून एका टपलीने शर्टाला घोट मिळाला. "आज बिअर माझ्या नशिबात दिसत नाहीये. मगापासून माझ्या घशाची आणि बिअरची गाठभेट काही होत नाहीये".

दिल्या: "मक्या पण तू धीर सोडू नकोस. पॉझिटिव्ह रहा. माझंच बघ ना. धंदा कमी झाला म्हणून मी आता पुस्तक लिहायला घेतलंय".

मी: "हरे राम! मित्राला पडत्या काळात आर्थिक मदत म्हणून ते आम्हाला आता विकत घ्यायला लागणार!"

माया: "अरे वा! नाव काय पुस्तकाचं?"

मी: "शेअरबाजारात कसे पडावे?". योग्य परिणामासाठी मी पडण्याचा अभिनय केला.

दिल्या: "अजून ठरवलं नाहीये. प्रकाशक पण शोधला नाहीये अजून"

मक्या: "मी छापतो तुझं पुस्तक"

मी: "धन्य आहे तुझी! डायरेक्ट रद्दी छापणारा पहिला प्रकाशक म्हणून इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल तुझी"

मक्या: "माझी आयडिया अशी आहे. एक दुकान घेऊन वर पाटी लावायची 'माया प्रकाशन' आणि दिल्याचं पुस्तक विकायला ठेवायचं. पुस्तक फारसं खपणार नाहीच म्हणून दुकानाच्या मागे रद्दीच दुकान उघडायचं.. 'माया रद्दी डेपो'. पुस्तकं खपेनाशी झाली की हळुहळू मागे नेऊन रद्दीत काढायची"

सरिता: "ए! तू त्यापेक्षा कॉलेजात शिकवत का नाहीस? तुला एवढा अनुभव आहे आणि त्यांना चांगले शिक्षक मिळत नाहीत. तेवढंच पोरांच कल्याण होईल"

मक्या: "काय डोंबल शिकवणार? आणि पोरांना कुठं शिकायचं असतं? माझ्या सहकार्‍याचा अनुभव सांगतो. त्याला शिकवण्याची फार खाज होती म्हणून एका कॉलेजात शिकवायला गेला. एक आठवडा शिकवल्यावर त्यानं एक महत्वाचा होमवर्क दिला. तो केल्याशिवाय पुढंच समजलंच नसतं म्हणून त्यानं वर्गात सांगितलं की होमवर्क केल्याशिवाय पुढंच शिकवणार नाही. एवढं सांगूनही, त्यापुढचे काही आठवडे कुणीच होमवर्क केलं नाही, म्हणून त्यानं शेवटी कॉलेजला रामराम ठोकला, तो कायमचाच"

मी: "दिल्या! बघं. होमवर्क बद्दल कोण बोलतंय? यावर मला मक्याचा किस्सा सांगायलाच पाहीजे. शाळेत असताना आम्हाला एक निबंध लिहून आणायला सांगितला होता. मी आणि दिल्यानं लिहीला होता. मक्यानं नव्हता लिहीला. मास्तरनं प्रत्येकाला आपापला निबंध वाचून दाखवायला सांगितला. मी पहिल्या बाकावर बसायचो आणि मक्या न् दिल्या शेजारी शेजारी, शेवटच्या बाकावर. दिल्याचाच निबंध परत लगेच वाचला असता तर मास्तरला कळलं असतं म्हणून माझा वाचून झाल्यावर मक्यानं माझी वही मागून घेतली मास्तरच्या नकळत. त्याचा नंबर आल्यावर धडाधडा वाचायला सुरुवात केली. मास्तरला काहीच कळलं नाही. पण पोरं फिदीफिदी हसायला लागली म्हणून मास्तरनं 'काय हसताय?' म्हणून विचारलं. कुणीतरी चुगली केली आणि मक्याला फटके बसले"

मक्या: "मी विसरलो होतो. पण बर्‍याच जणांनी लिहीला होता ना? तेव्हा तुमचे कुठलेही उपाय मला मंजूर नाहीत. मी आता काही दिवस लॉटर्‍या लावायचा विचार करतोय"

दिल्या: "लॉटरी ही अशी गोष्ट आहे की जी आपण सोडून सगळ्यांना लागते. यावर मला 'काटा रुते कुणाला' चं एक विडंबन माहिती आहे".

पैसा मिळे कुणाला, आक्रंदतात कोणी
मज लॉटरी न लागे, हा दैवयोग आहे

सांगु कशी कुणाला कळ आतल्या जिवाची
चिरदाह चणचणीचा मज शाप हाच आहे

पैसा कमवु पहातो रुजतो अनर्थ तेथे
हे वेड लॉटरीचे विपरीत होत आहे

हा खेळ वंचना की काहीच आकळेना
तिकिटे ही साचवूनि मी रिक्तहस्त आहे

गडगडाटी हास्याने साप्ताहिक सभेची सांगता झाली.


-- समाप्त --

Monday, May 25, 2009

हे बगचि माझे विश्व

मी प्रोग्रॅमर नामक पामराला कोडगा म्हणतो. एकतर तो कुणाच्याही आकलन शक्ती बाहेरचा कोड पाडून स्वतःला आणि दुसर्‍याला कोड्यात टाकतो म्हणून, आणि ऑफिसात बारक्या सारक्या चुकांवरून बॉसच्या शिव्या खाऊन खाऊन, वेळेवर घरी न गेल्यामुळे घरच्यांची मुक्ताफळं झेलून झेलून, क्लाएंटनं येता जाता केलेला अपमान सहन करून करून तो मनाची एक विशिष्ट अवस्था गाठतो - अर्थात् त्याचा 'कोडगा' होतो.

येता जाता चुका काढणे, सदैव किरकिर करणे, चांगल्या कामाचं चुकूनही कौतुक न करणे, आपल्या चुका दुसर्‍याच्या माथी मारणे, पगारवाढीच्या काळात हटकून तोंडघशी पाडणे अशी कुठल्याही बॉसची काही ठळक स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. माझा बॉस, वैद्य, याला अपवाद नव्हता. त्याचं वागणं बोलणं चालणं पाहून आणि वैद्य नावाशी मस्त यमक जुळतं म्हणून आम्ही त्याला दैत्य म्हणायचो. आमच्या ग्रुपमधे दहा-बारा कोडगे होते. गुलामांवर नजर ठेवणार्‍या रोमन मुजोरड्याप्रमाणे तो अधून मधून राऊंडवर यायचा. तो येतोय असं दिसलं की सगळीकडे एकदम शांतता पसरायची. काम करतोय हे ठसवण्यासाठी जिवाच्या आकांताने कीबोर्ड बडवला जायचा. काही धाडसी कोडगे शेवटच्या क्षणापर्यंत मायबोलीवर टीपी करत असत... अगदी शेवटी ऑल्ट-टॅब ने स्क्रीन बदलत असत. पण त्याची घारी सारखी नजर तो सूक्ष्म बदलही पकडायची. कधी कधी एखादा इरसाल कोडगा साळसूद चेहर्‍याने एखादी निरर्थक शंका विचारून मधेच त्याचा एन्कॉउन्टर करत असे. मग त्याचं उत्तर खोट्या खोट्या गांभिर्यानं ऐकणं, आजुबाजुच्या खसखशी मुळे, त्याला अवघड जात असे.

आमचा ग्रुप बँकांसाठी एक पॅकेज तयार करण्यात गुंतला होता. म्हणजे आम्हीच बराचसा गुंता केला होता आणि आम्हीच त्यात अडकलो होतो. आमचं पॅकेज नीटसं तयार नव्हतं तरीही एका सहकारी बँकेनं त्यांच्या काही ब्रँचमधे वापरायचा, वेड्या महंमदाला शोभेल असा, निर्णय घेतला. पॅकेज नीट चालतंय ना हे पहाण्यासाठी पहिले काही महीने मॅन्युअल सिस्टम आणि आमचं पॅकेज बरोबरीनं (पॅरलल रन) चालवायचं ठरवलं. पॅकेज कधीच त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चाललं नाही. आमची कंपनी छोटी होती त्यामुळे टेस्टिंग सारखी ऐश आम्हाला परवडायची नाही. घोळ झाला की आम्ही दणादण कोड बदलून बँकेत टाकायचो आणि नवीन घोळ करायचो. हे करता करता माझ्यासकट सर्व कोडग्यांचा स्वतःवरचा विश्वास उडाला. आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करु शकतो हे स्वतःबद्दलचे कटु सत्य त्यामागे होते. कधी कधी वाटतं की बहिणाबाई आमच्या ग्रुपमध्ये असत्या तर त्यांनी या आधुनिक जगात प्रोग्रॅम दळता दळता अशा काही ओव्या रचल्या असत्या -

अरे प्रोग्रॅम प्रोग्रॅम, झाला कधी म्हणू नये
कागदांच्या ढिगार्‍याला स्पेक्स कधी म्हणू नये

अरे प्रोग्रॅम प्रोग्रॅम, नुस्ता बगांचा बाजार
बग एक मारताना, नवे जन्मति हजार

ती बँक सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या वेळात सुरु असायची. त्यावेळात हमखास बँकेतून फोन यायचा. तेव्हा काही कोडगे आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करायचे. पण पोचलेले कोडगे आज काय नवीन घोळ झाला अशी पृच्छा स्थितप्रज्ञ चेहर्‍याने करायचे. एकदा असाच फोन वाजला आणि दैत्यानं तो घेतला. फोन झाल्यावर धाप धाप पावलं टाकत माझ्याकडे आला. स्वरयंत्राच्या सर्व तारा गंजल्यावरच येऊ शकेल अशा त्याच्या विशिष्ट आवाजात गरजला -

दैत्यः 'चिमण! कोडमधे काय बदल केलास तू?'
मी: 'मी खूप बदल केलेत, त्यातला कुठला?'
दैत्यः 'अकाउंटचं स्टेटमेंट चुकतंय. कुठल्याही अकाउंटचं मागितलं तरी एकाच अकाउंटचं येतंय.'
मी: 'हां! हां! तो! मी नवीन क्वेरी घातलीय'
दैत्यः 'अरे काय हे! तुला कुणी सांगीतलं ती बदलायला?'
मी: 'तुम्हीच म्हणता ना चेंज इज इन्-एव्हिटेबल म्हणून! माझी क्वेरी स्लो आहे म्हणून तुम्हीच बदलायला सांगीतली.' मी विनाकारण त्याला उचकवला.
दैत्यः 'हां! हां! माहीतीये! माहीतीये! मला कोड दाखव तुझा. तू नक्की काहीतरी शेण खाल्लयंस'

माझा कोड पाहिल्यावर हिरोला आपल्या जाळ्यात पकडणार्‍या व्हिलनसारखा त्याला आनंद झाला. मी त्याची क्वेरी जशीच्या तशी वापरली होती.. त्यानं ती कशी चालते ते दाखविण्यासाठी त्यात एक अकाउंट नंबर घातला होता तो तसाच ठेऊन!

दैत्यः 'बघिटलास! अजिबात डोकं वापरत नाहीस. आहे तस्सं घालून मोकळा'. 'बघिटलास' हा त्याचा आवडता शब्द होता. स्वतःवर खूष असला की वापरायचा तो नेहमी.
मी: 'हम्म! तो कॉपी पेस्ट केल्यावर बदलायचा राहीला.' कॉपी पेस्ट केल्यावर आवश्यक ते बदल न करणं हा माझा ष्ट्यँडर्ड घोळ! त्याचं मूळ परीक्षेत केलेल्या कॉप्यांमधे असावं.
दैत्यः 'आता लगेच बँकेत जाऊन कोड बदल'
मी: 'हो! चहा पिऊन लगेच जातो'
दैत्यः 'आत्ताच्या आत्ता जा! तिथं आग लागलीये अन् तुला चहा सुचतोय. एक दिवस चहा नाही प्यायलास तर मरणार नाहीस तू'.

दैत्याचा फ्यूज उडाला आणि मी आजुबाजुच्या फिसफिशीकडे दुर्लक्ष करत सटकलो. आम्ही जन्माचे हाडवैरी असल्यासारखे हा दैत्य आमच्या अंगावर येतो. पोरींच्या चुका मात्र त्यांच्याशी गोड बोलून सांगतो. पोरी मात्र 'सर! तुमच्यामुळे खूप शिकायला मिळतं मला!' असा गूळ लावून त्याला घोळात घ्यायच्या.

तिकडे जाऊन आवश्यक तो बदल केला. एका ठिकाणच्या अनावश्यक कोडमुळे प्रोग्रॅम विनाकारण स्लो चालेल असं लक्षात आल्यावर जाता जाता अजून एक बदल केला. आपल्याला हे कळलं म्हणून मनातल्या मनात स्वतःची पाठ थोपटली. मग लोकांची स्टेटमेंट नीट यायला लागली आहेत हे पाहून परत गेलो.

दोन दिवसांनी बँकेतून आमच्याच एका कोडग्याचा फोन आला. दबक्या आवाजात त्यानं सांगीतलं की एका तारखेनंतरची कुणाचीच ट्रॅन्झॅक्शन्स दिसत नाहीयेत. ती तारीख मी बदल केलेल्या दिवसाचीच होती. प्रोग्रॅम जोरात पळवायचा उपद्व्याप माझ्याच अंगाशी आला काय? कुणालाही काहीही न सांगता मी बँकेत दाखल झालो.. सगळं नीट बघितलं.. माझ्या बदलाचाच तो प्रताप होता.. जुना कोडच बरोबर होता.. एका टेबलात सगळी ट्रॅन्झॅक्शन्स जायला पाहीजे होती ती गेलीच नव्हती. घाई घाईनं परत जुना कोड टाकला. त्या दिवशी रात्री उशीरा पर्यंत बँकेत बसून सगळं सरळ केलं आणि घरी गेलो.

दैत्याला हे लफडं कुठून तरी कळालंच. दुसर्‍या दिवशी दैत्यानं कडक शब्दात सगळ्यांसमोर माझी हजेरी घेतली. वरती अजून एक चूक झाली तर नोकरीवरून काढायची धमकी दिली. मी बग गिळून गप्प बसलो. एवढा पाणउतारा झाल्यावर त्यावर दारु हाच एकमेव उतारा होता. संध्याकाळी त्याचा अवलंब केला.

असेच काही महीने गेले. दरम्यान त्याच बँकेच्या सातार्‍याच्या शाखेचं काम सुरु झालं. एका कोडग्याला तिथलं काम संपेपर्यंत बसविण्यात आलं. तेव्हा एकदा दैत्य दोन कागद नाचवत माझ्याकडे आला नि ओरडला -
दैत्यः 'हे, हे काय आहे?'
मी: 'अकाउंटचं व्याज काढलेलं दिसतंय' मी कागदांकडे पाहीलं मग त्याच्याकडे निर्व्याज चेहर्‍याने पहात म्हंटलं.
दैत्य: 'बघिटलास! यालाच मी म्हणतो डोकं न वापरणं. ह्या कागदावर एका अकाउंटचं हाताने काढलेलं व्याज आहे. ह्या दुसर्‍या कागदावर त्याच अकाउंटचं आपल्या प्रोग्रॅममधून काढलेलं व्याज आहे. नीट बघ.' त्यानं दोन्ही कागद आवेशाने माझ्या टेबलावर आपटले.
मी: 'दोन्हीत फरक आहे. कसा काय?'
दैत्यः 'शाब्बास! ते तू मलाच विचार. तू काय काय गोंधळ घातलेत ते मला काय माहीत?'
मी: 'पण मी तर तुम्ही दिलेलंच लॉजिक घातलंय.' बँकेच्या व्यवहाराची माहिती घेण्याचं काम दैत्यानं स्वतःच्या अंगावर घेतलं होतं. अर्थात् त्याला तेवढंच जालीम कारण होतं. पूर्वी एकदा माहिती घ्यायला गेलो असताना 'अकाउंटला क्रेडिट करायचं म्हणजे प्लस करायचं की मायनस?' असा मूलभूत प्रश्न विचारून मी सगळ्यांची दाणादाण उडवली होती. त्यानंतर बँकेनं 'जरा अकाउंटिंग समजणारी माणसं पाठवा' अशी दैत्याची कान उघाडणी केल्यावर त्यानं ते काम कुणालाच द्यायचं धाडस केलं नाही.
दैत्यः 'अरे मी तुला ढीग लॉजिक देईन. बहिर्‍याला मोबाईल देऊन काही उपयोग आहे का? तसं आहे ते. शेवटी तू त्याची तुझ्या पध्दतीने वाट लावणारच ना? ते काही नाही. आज याचा छडा लावल्या शिवाय घरी जायचं नाही.'

आता थुका लावून सगळं बघण्या शिवाय पर्याय नव्हता. काय करणार? दिवस वाईट होते. नोकरी गेली तर दुसरी मिळण्याची शक्यताच नव्हती. आधीच रिसेशन, तशातही दैत्य कोपला अशी अवस्था! प्रथम मला मी जादुने गायब केलेल्या ट्रॅन्झॅक्शन्सची शंका आली. पण सगळी जागच्या जागी होती. मग मी हाताने व्याज काढलं.. ते प्रोग्रॅमनी काढलेल्या व्याजाशी जुळलं. माझा विश्वासच बसला नाही.. दैत्यानं बोलून बोलून माझं मानसिक खच्चीकरण केल्याचा दुष्परिणाम!.. मी परत एकदा काढलं.. तरी ते जुळलं. चला! तुका म्हणे त्यातल्या त्यात! निदान माझं कोडिंग तरी चुकलं नव्हतं! आता असलाच घोळ तर दैत्याच्या लॉजिकमधेच असणार.

दुसर्‍या दिवशी मी एक बग कसा सोडवायचा ते एकाला दाखवीत होतो तेवढ्यात दैत्य तिथे आला. त्यानं थोडा वेळ आमचं बोलणं ऐकलं आणि तडक आपल्या खोलीत गेला. थोड्या वेळानं त्यानं मला बोलावलं आणि व्याजाच्या गोंधळाबद्दल विचारलं. मी त्याला माझा कोड कसा बरोबर आहे ते पटवलं. मग आम्ही बॅंकेच्या माणसांशी चर्चा करायला गेलो. सगळं ऐकून घेतल्यावर तिथला एक कारकून म्हणाला 'व्याज काढायची पध्दत बरोबर आहे. आम्ही असंच व्याज काढतो. पण काही काही ग्राहक आम्हाला फार त्रास देतात. त्यांना आम्ही थोडे जास्त व्याज लावतो. तेही कधी चेक करत नाहीत. केलंच तर आम्ही फक्त तेवढंच दुरुस्त करतो'.

परत जाताना दैत्य मला खुशीत येऊन म्हणाला 'बघिटलास! माझं लॉजिक बरोबर होतं'. मला मात्र तो तावडीतून सुटल्याचं दु:ख झालं.

दुसर्‍या दिवशी ऑफिसात गेल्या गेल्या दैत्यानं मला बोलावून सांगीतलं.
दैत्यः 'आत्ताच्या आत्ता घरी परत जा'. मी हादरलो. कायतरी नवीन घोळ झाला असणार आणि त्यानं मला डच्चू दिला असणार.
मी: 'का? काय झालं?'
दैत्यः 'घरी जा! बॅग भर आणि पहील्या गाडीनं सातार्‍याला जा.'
मी: 'एवढा मोठा काय प्रॉब्लेम आला?'
दैत्यः 'अरे काल रात्री ३ वाजता सातार्‍याहून फोन आला. तिथं नवीन अकाउंट ओपन होत नाहीये'
मी: 'असं कसं झालं एकदम? त्यानं काही तरी बदल केला का?'
दैत्यः 'हो. मी त्याला एक बदल करायला सांगीतला.'
मी: 'कुठला?'
दैत्यः 'तो तू काल सांगत होतास ना.. एका बग बद्दल.. तो.'
मी: 'काय काय बदल सांगीतला?'. त्यावर दैत्यानं मला सविस्तर सगळं सांगीतलं. ते ऐकल्यावर त्यानं अर्धवटच बदल करायला सांगीतल्याचं मला समजलं. मग मी त्याला उरलेला बदल सांगीतला. त्यानं सातार्‍याला फोन करून लगेच तसा बदल करायला सांगीतला. त्यानंतर खाती व्यवस्थित उघडायला लागली. मला कृतकृत्य झालं. मी त्याला 'बघिटलास!' असं म्हणणारच होतो पण बॉस इज ऑलवेज राईट म्हणून सोडून दिलं.


-- समाप्त --

Sunday, April 26, 2009

गिरमिट

काल परत एकदा ते घडलं. परीक्षा द्यायला बसलो होतो. पेपर बघून तोंडाला फेस आला होता. प्रश्न ओळखीचे होते पण पाठ केलेलं काहीच आठवत नव्हतं. शेजारच्या बाकावर बसलेल्या मक्याकडे पाहीलं. तो ठणाठण लिहीत सुटला होता. ह्याला कशी काय आज माझी मदत लागत नाहीये? नेहमी आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो. आम्हा दोघांना बर्‍याच वेळा पूर्ण उत्तर, पहिले एक दोन शब्द सांगीतल्याशिवाय, आठवतच नाही. एकदा शब्द कळाले की पुढचं धडाधड बाहेर पडतं. ते एक दोन शब्द आम्ही एकमेकांना हळूच सुचवत असतो. पण आज हा गडी बघायलाच तयार नाही. आता पेपर कोरा जाणार. म्हणजे एक वर्ष गेलं ना कामातून! भयाण टेंशन आलं. अंगाचा थरकाप झाला. प्रचंड घाम फुटला आणि मला जाग आली. शेजारी बायको निवांत झोपली होती. हळूहळू स्वप्न पडल्याचं लक्षात आलं आणि सुटकेचा निश्वास टाकला. हुश्श!

ही अशी परीक्षेची स्वप्नं मला अजून पडतात. तेच तेच पेपर मी परत परत देत असतो.. अगदी स्वप्नात सुध्दा पूर्वी हा पेपर दिला आहे याची मला जाणीव असते. लोकांना कशी गोड गोड स्वप्नं पडतात? असल्या स्वप्नांच्या मागे कोवळ्या वयातले, मनावर खोलवर परिणाम करणारे, धकाधकीचे प्रसंग लपलेले असतात असं मी कुठेतरी वाचलेलं होतं.. ते इतकं खरं असेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. काही म्हणा, आपला मेंदू पण काय सॉलीड यंत्र आहे ना? योग्य नोंदी न ठेवता भलभलत्याच ठेवतो. मी सगळ्या परीक्षा (कशाबशा का होईना) पास झाल्याची मेंदूत काहीच कशी नोंद नाही? आहे ती फक्त परीक्षा आल्यावर तंतरण्याची किंवा परीक्षा हुकल्याची.

का बरं हे परीक्षेचं भूत अजूनही पछाडतंय मला? माझ्या डोक्याला जबरी भुंगा लागला आणि माझी प्राणप्रिय झोप उडाली. अशा किती परीक्षा दिल्या मी? शाळेपासून विद्यापीठापर्यंतच्या सर्व परीक्षा... अधिक स्कॉलरशिप नावाच्या दोन भीषण परीक्षा.. त्यात एसेसीच्या, अनाठायी गाजावाजा झालेल्या, मी कष्ट घेऊन विसरायचा प्रयत्न केला तरीही इतरांनी टोचून टोचून सतत लक्षात आणून दिलेल्या, परीक्षेचा विशेष उल्लेख हवा.. मग नोकरी साठी दिलेल्या परीक्षा आणि मुलाखती.. या सगळ्यांनी पुरेसा छळ होत नाही म्हणून मायक्रोसॉफ्ट, ऑरॅकल सारख्या बड्या बड्या धेंडांनी काढलेल्या त्यांच्या त्यांच्या प्रमाणपत्र परीक्षा!

कधी कधी तर मला वाटतं की माणसानं माणसावर केलेला बौध्दिक अत्याचार म्हणजे परीक्षा. एकेक विषय म्हणजे लांब पल्ल्याची शोकांतिका.. सुरवातीचा आणि मधला भाग थोडा फार वेगळा असला तरी शेवट एकच.. तोंडाचं पाणी डोळ्यावाटे बाहेर काढणारा. शाळेत चित्रकला या विषयानं मजबूत काव आणल्याचं मला चांगलं स्मरतंय. माझं नि चित्रकलेचं पीढीजात वैर.. आमच्या घराण्यात एकही चित्रकार झाला नाही हा त्याचा ठसठशीत पुरावा! खुराड्यापेक्षा आकाराने मोठ्या कोंबड्या, अर्धांगवायू झाल्यासारखी वाटणारी माणसं असे माझ्या चित्रांचे काही ठळक नमुने.. नाही म्हणायला, एक चित्र मला त्यातल्या त्यात जमायचं - दोन डोंगर, मधे उगवणारा सूर्य, एक वाहणारी नदी, उडणारे पक्षी इ.इ. बाकी माझी चित्रं, कोंबडीच्या पायांना रंग लावून तिला कागदावर भांगडा करायला लावल्यास जे काही होईल, तशी असायची.. मॉडर्न आर्ट म्हणून नक्की खपली असती.. पण दुर्देवाने माझ्या चित्रकलेच्या मास्तरला तेवढी समज नव्हती.. आणि भारत देश एका अभिजात कलावंताला मुकला. मास्तरनं मला काठावर पास करून वरच्या वर्गात ढकलून द्यायची सहृदयता दाखवली म्हणून वाचलो, नाहीतर आयुष्यभर शाळेतच रहायची वेळ आली असती.. अर्थात् नुसता मीच वाचलो असं म्हणणं तितकसं बरोबर नाही.. मास्तरही वाचला असं म्हणायला पाहीजे खरं. आता तर मला हे दुसरंच कारण जास्त उचित वाटायला लागलंय.

चित्रकला विषय सुटल्यावर मी सुटलो असं वाटलं होतं पण गणित, विज्ञान यातल्या आकृत्यांनी परत डोकं उठवलं. आकृत्यांमधे तर काय सरळ रेषाच जास्त करून काढायच्या असतात.. पण पट्टी पेन्सील वापरून देखील माझ्या रेषा कधी सरळ यायच्या नाहीत. कधी पट्टीला नको तिथे पडलेल्या खळ्या माझ्या रेषांना पडायच्या, कधी पेन्सीलीच्या पिचलेल्या टोकामुळे दोन दोन सरळ रेषा यायच्या, कधी रेघ मारताना पट्टीच हलायची, तर कधी पट्टीवर ठेवलेल्या बोटाचा आकार रेघेला प्राप्त व्हायचा. भूमितीतले माझे त्रिकोण क्वचितच तीन कोनी व्हायचे. कधी टेस्टट्युबच्या रेघा सरळ मारण्यात महान यश मिळालंच तर ते क्षणभंगुर ठरायचं.. कारण त्या दोन समांतर रेघा, रेल्वेचे रूळ जसे लांबवर पाहिल्यावर एकमेकांना भेटल्यासारखे वाटतात, तशा भेटायच्या.

इतिहासात माझा दारुण पराभव हमखास ठरलेला. 'अफझलखानाचा वध कुणी केला, सांग' असं मास्तरनं दरडावून विचारलं की 'मी.. मी नाही केला' एवढंच चाचरत चाचरत सांगू शकायचो. इतिहासाची परीक्षा म्हणजे, कुणी कोणावर कधी हल्ला केला, कुठल्या राजानं काय सुधारणा केल्या, अमुक राजाचा जन्म केव्हा झाला असल्या निव्वळ टिनपाट प्रश्नांची बजबजपुरी.. यांचा अभ्यास पाठांतर न करता कसा करणार? एके दिवशी वैतागून 'अभ्यास कसा करावा' असं एक पुस्तक घरी आणलं. त्यात त्यांनी विषय नीट वाचून त्याचे मुद्दे काढावेत व त्यांच रोज मनन करावं असं लिहीलं होतं. सनावळ्यांचे काय डोंबल मुद्दे काढणार? फायदा एवढाच झाला की पाठांतराला मनन असा नवीन शब्द समजला.

त्याच पुस्तकात उत्तरं कशी लिहू नयेत याचंही एक उदाहरण होतं. प्रश्न होता, 'शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन करा'. उत्तर होतं, 'अहाहा! काय तो राज्याभिषेकाचा थाट! अहाहा! काय ती त्यांची भवानी तलवार! अहाहा! काय ते त्यांचे सिंहासन'. असे बरेचसे 'अहाहा' झाल्यावर उजव्या बाजुला लाल अक्षरात परीक्षकानं 'अहाहा! काय ते मार्क!' असं लिहून पुढे मोठ्ठ शून्य काढलं होतं. हे उत्तर चुकीचं कसं काय आहे हे मला अजूनही कळलेलं नाहीये.

इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इंग्रजीतली स्पेलिंग, व्याख्या, प्रमेय, संस्कृत हे आणि असे इतर कितीतरी गनीम तर केवळ मननाचे आयटम. परीक्षा आली की धुण्याची काठी घेऊन मी मननाला बसत असे. प्रश्नाचं उत्तर वाचायचं नि मग मोठमोठ्या आवाजात (घरच्यांना कळलं पाहीजे ना, मी अभ्यास करतोय ते), पुस्तक बंद करून, ते म्हणायचं. मग पुस्तक उघडून सगळं बरोबर आलं की नाही ते पहायचं. चुकलं की जोरात काठी आपटायची. या भानगडीत किती काठ्या मोडल्या याचा हिशेब आमच्या दुकानदाराकडे असेल. नंतर नंतर परीक्षा जवळ आली की आई धुण्याची काठी लपवून ठेवायला लागली. माझ्या पुढील शैक्षणिक र्‍हासाला ते एक मोठ्ठ कारण झालं.

कॉलेजच्या पहिल्या वर्षी जीवशास्त्र नामक जीवघेणं शास्त्र जीव खाऊन मागे लागलं. जगातल्या निरनिराळ्या जीवांचे वर्गीकरण करणे हा या शास्त्राचा आवडता छंद! माझ्या मते जगात फक्त दोनच प्रकारचे जीव होते.. एक पिडणारे आणि दुसरे पिडलेले.. पण आमच्या बाईचा पुस्तकी ज्ञानावर गाढा विश्वास असल्याने माझं सुटसुटीकरण तिच्या पचनी पडलं नाही. शिवाय, या विषयात येता जाता अगणित चित्रं काढायला लागायची.. त्यानं माझं उरलं सुरलं अवसान गळालं. त्यातल्या त्यात मला अमिबाचं चित्र थोडं फार जमायचं.. कारण कुठल्याही प्राण्याची मी काढलेली चित्रं साधारण अमिबा सारखीच यायची.. पण मी अमिबा म्हणून काढलेल्या माझ्या चित्रास, 'हे काय काढलंय?' असा हिणकस शेरा आमच्या कॉलेजच्या जीवशास्त्राच्या बाईनं मारला.. त्यानंतर मात्र मी पहिल्या संधीला त्या शास्त्राला कायमचा रामराम ठोकला.

गणित, शास्त्र हे विषय नस्ते उपद्व्याप, चांभारचौकशा आणि नस्ती उठाठेव करणार्‍या काही विकृत लोकांनी जन्माला घातलेत. आर्किमिडीज हा विकृत माणूस होता. त्याशिवाय तो रस्त्यावर त्या विशिष्ट अवस्थेत कसा पळाला असता? भारतात पळाला असता तर लोकांनी त्याला परत त्याच्या टबमधे घालून बुडवला असता. त्रिकोणाच्या कोनांची बेरीज १८० अंश का असते? लोखंड पाण्यात बुडते पण लोखंडी जहाज का तरंगते? असल्या प्रश्नांना चांभारचौकशा आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी केलेल्या उद्योगांना नस्ते उपद्व्याप म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? काटकोन त्रिकोणातल्या दोन बाजुंच्या लांबीवरून तिसर्‍या बाजूची लांबी काढायचं सूत्र पायथागोरसनं काढलं त्याला नस्ती उठाठेव या शिवाय अन्य काही समर्पक शब्द नाही. हा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा सरळ तिसर्‍या बाजूची लांबी मोजावी ना?

भाषा विषय पण चांगले पीळदार असतात. मराठी मातृभाषा असूनही तिचा अभ्यास करताना तिच्याबद्दलचा अभिमान वगैरे गळून पडायचा. अमुक अमुक वृत्त चालवा म्हंटलं की माझ्या मनात निवृत्तीचे विचार घोळायचे. सगळ्यात जालीम प्रकार म्हणजे रसग्रहण. बालकवींच्या फुलराणी कवितेचं माझं सरळसोप्पं, निरागस रसग्रहण असं सुरु व्हायचं - 'फुलराणीचा वेळ जात नव्हता म्हणून ती गवतावर खेळत होती'.. कशाचंही काय रसग्रहण करायचं? उद्या, 'भैरु उठला, भैरुनं दात घासले, नाश्ता करून भैरु गवतावर खेळत बसला', याचंही रसग्रहण करा म्हणतील. संस्कृतच्या परीक्षेत भाषांतरं पाठ केली की पोटापाण्यापुरते मार्क मिळायचे. परीक्षा आली की गाईड आणि काठी घ्यायची, की सुरु - झक्कू ताड्या घोट्या, घण घण घण. इंग्रजी भाषेत स्पेलिंग आणि उच्चार यांचा एकमेकांशी नाममात्रच संबंध आहे. उदा. कर्नल या शद्बाचा उच्चार मराठी माणसानं केला असावा किंवा स्पेलिंग बोबड्या माणसानं केलं असावं याबद्दल तुमचं काय मत आहे? इंग्रजीतून निबंध लिहीणं ही मोठ्ठी सर्कस होती.. आधी मराठीतून वाक्य तयार करायचं, मग त्यासाठी मनातल्या मनात इंग्रजी शब्द शोधायचे. ते कधी सापडायचे नाहीतच. मग मराठी वाक्य बदलून परत शोध चालू. हे सगळं करता करता वेळ संपायला आला की मी टेन्स होऊन वाक्यांच्या टेन्सचा खून करायचो.

असे कितीतरी विषय आणि त्यांच्याशी झालेल्या खडाजंगी लढाया! एक एक विषय मास्तरांनी डोक्याला गिरमिट लावून घुसवला. परिणामतः डोकं सच्छिद्र झालं व त्यात काहीच शिल्लक राहीलं नाही. मग डोकं गमावलेल्या मुरारबाजी प्रमाणे मी परीक्षा लढलो यात नवल ते काय? आणि आता इतक्या परीक्षांतून गेल्यावर चरकातून बाहेर पडलेल्या उसाच्या चिपाडासारखं वाटतंय.

असो. आता मी थकलोय. फार झोप यायला लागलीय. हे वाचून तुम्हाला असली स्वप्नं न पडोत एवढीच प्रार्थना! एवढा सखोल विचार करूनही शेवटी स्वप्नांचं मूळ सापडलं नाही ते नाहीच. तुम्हाला काही सुचलं तर सांगा. शुभ पहाट!

--- समाप्त --

Tuesday, April 14, 2009

भेजा फ्राय!

"नमस्कार, ब्रिटीश टेलिकॉमवर आपलं स्वागत आहे. कृपया पुढील पर्याय कान देऊन ऐका आणि योग्य तो पर्याय निवडा", फोनवरून धमकीवजा सूचना आली. मी घर बदलतोय हे मला बी.टी.ला सांगायचं होतं. त्याचं काय आहे.. आम्हाला अधूनमधून घर बदलल्याशिवाय चैन पडत नाही. वर्षानुवर्ष एकाच घरात काय रहायचं? शीss!.. एकाच गावात रहात असलो तरी काय झालं? काहीतरी नवेच करा ही त्या मागची प्रेरणा, हल्लीच्या भाषेत - ड्रायव्हिंग फोर्स!

पर्यायांचं पाल्हाळ लागलं, मी कान दिलेलाच होता, फक्त पर्याय निवडणं बाकी होतं.
"तुम्हाला नवीन टेलिफोन कनेक्शन घ्यायचं असल्यास १ दाबा."
"तुम्हाला नवीन बीटी ब्रॉडबँड हवे असल्यास २ दाबा."
"तुमच्या बीटी ब्रॉडबँडबद्दल काही विचारायचे असल्यास ३ दाबा."
"तुम्हाला टेलिफोनच्या बिलाबद्दल काही शंका असल्यास ४ दाबा."
"तुमचा टेलिफोन बिघडला असल्यास ५ दाबा."
"वरील पैकी काहीच करायचे नसल्यास ६ दाबा", मी ६ चं बटण दाबलं.

"बीटीच्या नवीन ऑफर्सबद्दल माहिती हवी असल्यास १ दाबा"
"बीटीच्या कस्टमर सर्व्हेमधे भाग घ्यायचा असल्यास २ दाबा"
"टेलिफोन कनेक्शन बंद करायचं असल्यास ३ दाबा"
"वरील पैकी काहीच करायचे नसल्यास ४ दाबा". जसं आपण गल्लीतल्या भँक भँक करणार्‍या कुत्र्याकडे थोडा वेळ बघतो अन मग दुर्लक्ष करतो, तसं माझं झालं.. त्यामुळे मला शेवटचा पर्याय "वरील पैकी काहीच करायचे नसल्यास फोन ठेऊन द्या" असा वाटला.. फोन ठेवणारच होतो तेवढ्यात मला ते मूळ वाक्य लख्खं दिसलं आणि मी ४ चं बटण दाबलं. परत भली मोठी भँक भँक झाली.. बरेचसे पर्याय उलथे पालथे करत एकदाचा घर बदलण्याच्या पर्यायाला पोचलो. मग "तुमचा कॉल आम्हाला महत्वाचा आहे. सध्या आमची सर्व माणसं कामात गढलेली आहेत. कृपया प्रतीक्षा करा."... ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ..."तुमचा कॉल आम्हाला महत्वाचा आहे. सध्या आमची सर्व माणसं कामात गढलेली आहेत. कृपया प्रतीक्षा करा."... ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ... असं भलं मोठ्ठं लूप सुरु झालं, ते चांगलं २० मिनिटं चाललं. त्यानंतर एका कामात गढलेल्या बाईला टीपी करायचा मूड आला आणि केवळ कीव येऊन तिनं माझा कॉल घेतला.

"गुडमॉर्निंग. मा नेमिजॅना, हौकॅना हेल्प्यूs?" अनेक शब्दांच्या अनेक संध्या (संधीचं अनेकवचन) करून वाक्य फेकल्यामुळे तिचं नाव समजून घेण्याची संधी मला मिळाली नाही.
"गुडमॉर्निंग! मी घर हलवतोय. मला टेलिफोन पण हलवायचा आहे, नवीन जागी." फार लांबड लावली तर ती फोन ठेऊन देईल या काळजीनं मी पटकन मुद्द्याचं बोललो.
"तुमचा टेलिफोन नंबर काय?"
"०१८६५ ३४४ २३२"
"तुमचं नाव काय?"
"चिंतामण गोखले"
"तुमचा पत्ता काय?"
"१८, ऑक्सफर्ड स्ट्रीट, ऑक्सफर्ड, ओएक्स १, ४एमडी"
"४एनपी?"
"नाही, नाही. एम अ‍ॅज इन मेरी, डी अ‍ॅज इन डेव्हिड", फोनवर कुणालाच पहिल्या फटक्यात माझा पोस्टकोड कळत नाही, त्यामुळे मेरी व डेव्हिडशी नाळ जोडणे हा सवयीचा भाग होऊन गेला आहे.
"तुमचा अकाउंट नंबर?"
"२३२४४३५६"
"थँक्यू मि. गॉखाल. तुमचा नवीन पत्ता सांगा"
"२५, लंडन रोड, ऑक्सफर्ड, ओएक्स २, ४एनपी"
"४एमडी?"
"नाही, नाही. एन अ‍ॅज इन नॅन्सी, पी अ‍ॅज इन पीटर"
"मघाशी तुम्ही ४एमडी सांगीतलंत?", लहानपणी ही नर्सच्या हातातून डोक्यावर पडली होती का? काय हा ग्रेड वन मठ्ठपणा? कसाबसा राग गिळून मी विनोद केला.. "हा! हा! दॅट वॉज व्हेरी फनी, सुझॅना! तो माझ्या जुन्या पत्त्याचा पोस्टकोड आहे. मी परत त्याच घरात नाही चाललो. हा! हा!". अशावेळेला पलिकडच्या बाईचं नाव घेतलं की तिला बरं वाटतं आणि ती थोडी जास्त मदतोत्सुक होते असा माझा अनुभव आहे.
"ओ! आsसी! पण माझं नाव सुझॅना नाही, अ‍ॅना आहे", बोंबला.. माझ्या भरवशाच्या अनुभवाने पडक्या चेहर्‍याला जन्म दिला.. तिला तो दिसत नाहीये ते किती छान!
"ओ! अ‍ॅम सो सॉरी, अ‍ॅना", कसंबसं अपेक्षाभंगाचं दु:ख दाबलं.
"इट्स ओके! तुम्ही कधी पासून तिकडच्या घरी जाणार?", ते तिनं असं काही विचारलं की माझ्या मनात 'निघाले आज तिकडच्या घरी' चे सूर नांदु लागले.
"७ फेब्रुवारी पासून! तिथे बीटीची लाईन उपलब्ध आहे का? नसेल तर मला त्यासाठी लागणारे १२०पौंड भरायचे नाहीत". इंग्लंडमधे असलो म्हणून काय झालं? कोकणस्थी बाणा थोडाच सोडणार होतो मी!
"लेम्मी चेक दॅट!" थोडा वेळ टाईपण्याचा आवाज आला. "ओके! मि. गॉखाल, सॉरी टु कीप यू वेटिंग! तिथे बीटीची लाईन उपलब्ध आहे. तुम्हाला कसलाही खर्च येणार नाही. तुमचा फोन ९ फेब्रुवारीला सकाळी चालू होईल, तुमचा टेलिफोन नंबर आहे तोच राहील. आत्ता आमची सिस्टिम डाऊन आहे, सुरु झाली की तुमची ऑर्डर काढते. आणखी काही सेवा हवी आहे का?".
"नाही. नाही. सध्या एवढं पुरे आहे. थँक्यू! बाय!" हुश्श करून फोन ठेऊन दिला. एक काम झाल्यानं जरा बरं वाटलं!

माझ्या घरातलं एओएलचं ब्रॉडबँड बीटीच्या लाईनवर चालतं. म्हणून, एकदा बीटी सुरु झालं की एओएलला फोन करून ते हलवायचा प्रपंच करायचं ठरवलं होतं. यथावकाश नवीन घरात गेलो. ९ तारखेला सकाळी फोन सुरु झाला का ते बघितलं. त्याच्यात कसलीही धुगधुगी नव्हती. घरात आणखी एक फोनचं सॉकेट आहे का ते पाहिलं. ते नव्हतंच. आता परत बीटीला फोन करणं आलं.. मला टेंशन आलं.. इंग्लंडमधे असल्या कामाचे फोन फुकट नसतात.. मोबाईलवरून फोन लावला.. पैसे जास्त पडणार होते.. पण काही इलाज नव्हता.. मनाचा हिय्या करून फोन लावला. अनंत पर्यायातून मार्ग काढत, मेंदुला झिणझिण्या आणणारं ढॅणटॅण ढॅणटॅण संगीत ऐकल्यावर एकदाचा बाईचा आवाज कानावर पडला.
"गुडमॉर्निंग. मा नेमिझेलन, हौकॅना हेल्प्यूs?", या बाईचं नाव काय असावं? एक गूढ प्रश्न.. यावेळेला मी भलतं सलतं नाव घेऊन घोळ घालणार नव्हतो. परत एकदा माझी उलटतपासणी झाली आणि तिनं बाँब टाकला.
"मि. गोक्-हेल तुमचा फोन ११ तारखेला सुरु होईल."
"का? मला तर ९ तारखेला सकाळीच सुरु होईल म्हणून सांगीतलं होतं"
"हो का! मला तर इथं तशी काहीच नोंद दिसत नाहीये! मी आता परत ऑर्डर काढते", म्हणजे अ‍ॅना ऑर्डर काढायची विसरली होती तर.. किंवा अ‍ॅनाची सुझॅना केल्याबद्दल तिनं मला कॉल सेंटर पुरस्कृत शिक्षा दिली होती.
"ठीक आहे. थँक्यू! बाय!" वैतागून फोन ठेऊन दिला. आयुष्यात माणसाला इतर भोग कमी पडतात असं वाटून आकाशातल्या बापानं हा कॉल सेंटरचा भोग आपल्या मागे लावला असेल का?

११ तारखेलाही फोन सुरु न झाल्यानं माझा धीर खचला.. आता काय झालं असेल?.. परत ढॅणटॅढॅणच्या तालावर वाजत गाजत दाखल झालो.
"गुडमॉर्निंग. मा नेमिज्कॅथी, हौकॅना हेल्प्यूs?". सगळ्या खानदानाची चौकशी झाल्यावर माझ्या समस्येला वाचा फोडली.
"मि. गॉखाले, आमच्याकडे सगळा सेटप झाला आहे. तुमच्या इथे दोन फोनची सॉकेट्स आहेत का?", हिनं तर मला इटालियनच करून टाकला.
"मला तरी नाही दिसली"
"तुमच्या सॉकेटवर बीटी लिहीलेलं आहे का?"
"नाही गं बाई! त्यावर सॉकेट असं पण लिहीलेलं नाही", वैताग वाक्यावाक्यातून कारंजासारखा थुई थुई उडायला लागला.
"मग मी इंजिनिअरला तुमच्या घरी भेट द्यायला सांगते"
"नको. नको. त्याचा खर्च मला परवडणार नाही"
"एकूण खर्च, लाईन दुरुस्त करायचे १२० पौंड अधिक इंजिनिअरचे तासाला १०० पौंड, इतकाच होईल फक्त". फक्त दोन-तीनशे पौंडाचा फणस? मला राणीचा नातू वगैरे समजते की काय ही?
"हे बघ. मी फोन इकडे हलवायच्या आधी मला काही खर्च पडणार नाही याची खात्री केली होती. आता कसला खर्च पडेल म्हणून सांगतेस? मला नको तुमचा फोन. मला ऑर्डर कॅन्सल करायचीय आता"
"आता कॅन्सल करायची असेल तर १२ महिन्यांचं फोनचं भाडं भरावं लागेल, १३२पौंड फक्त"
"काय? का नाही कॅन्सल होणार?"
"मी काही करु शकत नाही त्याबाबतीत. आमची सिस्टम तुम्हाला १२ महिन्याचं भाडं भरल्याशिवाय कॅन्सल करु देत नाहीये"
"मला तुझ्या बॉसशी बोलायचंय"
"ठीक आहे. थँक्यू फॉकॉलिंग बीटी". त्याच्यावर मी आभार न मानताच फोन ठेवला, ठेवता ठेवता तिच्या ७ पिढ्या कॉल सेंटरवर जातील असा जळजळीत शाप दिला.


बराचवेळ ढॅणटॅढॅणचा मारा सहन केल्यावर एकजण 'काय शिंची कटकट आहे' थाटात उगवला, निदान मला तरी तसं वाटलं.
"गुडमॉर्निंग. मा नेमिज्पिटर, हौकॅना हेल्प्यूs?". ही फोनवरची भुतं आपली नावं का सांगतात? मला काय घेणं आहे ह्याच नाव पीटर आहे, की ज्युपीटर आहे, की रिपीटर आहे त्याच्याशी? उसन्या उत्साहाने त्यानं मला ते नेहमीचे प्रश्न विचारले. या रेटनं माझं नाव, गाव पत्ता अख्ख्या बीटीला माहीत होणार असा रंग दिसायला लागला होता. मला फोन कॅन्सल करायचा आहे असं त्याला स्वच्छ सांगीतलं.
"ओह! तुम्ही सोडून जाताय याचं फार दु:ख आहे आम्हाला. तुम्हाला १३२ पौंड भरायला लागतील". हा काय न्याव? तुम्हाला फार दु:ख आहे ते मला १३२ पौंडाचा दांडु लावून हलकं करायचं काय रे टोणग्या तुला? आँ!
"हे बघ! मी तो फोन वापरला नाही. त्याचे पैसे मी भरणार नाही", माझ्या अंगात लो. टिळक संचारले.
"सॉरी मि. गोहेल! तो निर्णय मी घेऊ शकत नाही". आयला, यानं तर माझ्या नावातल्या 'के'ला सायलेंसर लावून नरकात पाठवला.
"मग कोण घेऊ शकतं?"
"तुम्हाला कस्टमर सर्व्हिसला जायला लागेल."
"आँ? मग मी आत्ता आहे कुठे?"
"सर! तुम्ही अकाउंट्सला आहात", त्या गधडीनं मला बॉसच्या ऐवजी अकाउंट्सच्या तोंडी दिला होता तर.
"अरे बाबा! मी त्या बाईला तिच्या बॉसकडे पाठव म्हणून सांगीतलं होतं. मला तिकडे पाठवशील का प्लीज?" आवाजात शक्य तितका गोडवा आणून मी साकडं घातलं.
"हो सर! मी पोचवतो तिकडे", आणखी कुठे कुठे पोचवणार आहेत कुणास ठाऊक, नरकात पोचवून तर झालं आहेच.

ढॅणटॅढॅण "गुडमॉर्निंग. मा नेमिज्रायन, हौकॅना हेल्प्यूs?". गुन्हेगाराची नेहमीची चौकशी झाली. प्रथम त्याला मी कुठल्या विभागात आलोय ते विचारलं.
"सर्व्हिस डिपार्टमेंट मि. गोखले. मी आपल्याला काय मदत करु शकतो?", त्या हलकटानं मला चांगलाच पोचवलाय की.. याला टेलिकम्युट म्हणतात की टेलिफिरक्या? असो. 'माझ्या डोक्याचं सर्व्हिसिंग करायचंय' हे म्हणायची ऊर्मी दाबली. माझं नाव बरोब्बर उच्चारल्यामुळे मला बरं वाटलं होतं, हे नक्की.
"अरे पण मला कस्टमर सर्व्हिसला पाठवायला सांगीतलं होतं. तू तरी मला तिकडे पाठवशील का प्लीssज?" माझा सूर चांगलाच आर्त झाला असणार, कारण मला घरघर लागल्यासारखं वाटलं.
"हो सर! त्याआधी तुम्हाला एक सांगायचंय. इंजिनिअर तुमच्या घराकडे जायला निघालाय. अर्ध्या तासात तो पोचेल. तुम्ही त्याआधी घरी जाऊ शकाल का प्लीssज?", हा मला खरंच विनंती करतोय की नक्कल?
"थॅक्यू! बाय!" मी फोन आदळला आणि ऑफिसमधून धावत पळत घरी आलो. फोन हलवण्याचं एक य:कश्चित प्रकरण बघता बघता चांगलंच वातुळ झालं होतं. त्यात दोन-तीनशे पौंडानं माझा चलनफुगवटा कमी होणार याचं प्रचंड दु:ख! बीटीच्या धनुष्यातून इंजिनिअरचा बाण, मी प्रत्यंचा सोडली नव्हती तरी, सुटला होता.. माझ्या खिशाला तो केवढं भोक पाडतोय ते जड अंतःकरणाने बघण्याशिवाय मी काहीही करु शकत नव्हतो.

इंजिनिअरनं बीटीची लाईन जिथपर्यंत येते तो घराचा भाग शोधला. तिथं नुसता प्लॅस्टिकचा ठोकळा होता, त्याला सॉकेटच नव्हतं. ते त्यानं बसवलं, तरीही फोन चालू होईना. तो घालवत असलेल्या प्रत्येक मिन्टागणिक माझा खिसा पौंडापौंडाने हलका होत होता. नंतर तो खांबावर चढला आणि तिथं काहीतरी खुडबुड करायला लागला. त्याला त्या खांबालाच लटकवून, खालून मिरच्यांची धुरी द्यायची तीव्र इच्छा मला झाली.. महत्प्रयासानं ती दाबली. तो परत आला. त्यानंतर मात्र फोन चालू झाला नि लगेच मी त्याला कटवला. त्यानंतरची बिलं मी श्वास रोखून, धडधडत्या छातीनं उघडत होतो, पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बीटीने आजतागायत कसलेच पैसे मला लावलेले नाहीत. उलट काही दिवस फोन बंद राहिल्यामुळे काही पौंड मला क्रेडिट केले. हे कसं झालं असेल? चांगला प्रश्न आहे, ज्याचं उत्तर मला मुळीच जाणून घ्यायचं नाहीये. तुम्ही उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यास तुमच्या डोक्याची १०० शकलं होऊन तुमच्याच पायाशी लोळू लागतील.

बीटीचा किल्ला फत्ते झाला असला तरी अजून एओएलचा गड सर करणं बाकी होतं. सर्व धीर एकवटून फोन लावला. विविध पर्याय व रँटॅटॅ रँटॅटॅ "तुमचा कॉल आम्हाला महत्वाचा आहे, सध्या आमची सर्व माणसं कामात गढलेली आहेत, कृपया प्रतीक्षा करा", या चक्रव्यूहातून एका अदृश्य बाईपाशी येऊन ठेपलो. नाव, गाव, पत्ता, जन्मतारीख, 'डाव्या पायाला बोटं किती?' असली टुकार, निरर्थक वळणं घेत घेत गाडी स्टेशनला आली.
"२० वर्किंग दिवस लागतील", तिनं विजयोन्मादानं निकाल दिला.
"काय? २०? कसं काय? माझा फोन नंबर तर तोच आहे"
"म्हणून तर जास्त वेळ लागेल. नंबर बदलला असता तर कमी वेळ लागला असता". मला कळत नाही म्हणून काहीही बंडला मारायच्या काय?
"बरं! ठीक आहे. तू मला काही पर्याय ठेवला नाहीयेस"
"तसं साधारणपणे १५ दिवसाच्या आत होतं, पण आम्ही नेहमी जास्त सांगतो". आहे की नाही चालुगिरी?

दर आठवड्याला नेट सुरु झालं की नाही ते नेमाने बघत होतो. ३ आठवड्यांनी धीर सुटला. परत चक्रव्युहात प्रवेश केला.
"तुमची ऑर्डर नाहीये", त्या बाईनं माझ्या पायाखालचं कार्पेट काढून घेतलं.
"नाहीये म्हणजे काय? गेली कुठे?"
"सॉरी सर! मला माहीत नाही"
"माझं अकाउंट? ते तरी आहे का?"
"नो सर! ते बंद झालंय ९ फेबला"
"आँ! बंद झालं? असं कसं बंद झालं. आणि बंद झाल्यावरसुध्दा तुम्ही माझ्याकडून पुढच्या महिन्याचे पैसे कसे घेतले?"
"सॉरी सर! मला माहीत नाही. तुम्हाला हवं असेल तर मी परत ऑर्डर घालीन बापडी"
"हो. घाल. पण यापुढे २० दिवस लागणार?"
"नाही. नाही. यावेळेला आम्ही १० दिवसात करू"
"ठीक आहे. पण त्या ऑर्डरचा नंबर मला दे". हे म्हणजे दुधानं तोंड पोळलं की....
"ओके! हा नंबर घ्या, ७८७६४५२३". मी मुकाटपणे लिहून घेतला आणि आणखी काही दिवसांच्या नेट वनवासाची मानसिक तयारी केली.

दोन आठवड्यांनी परिस्थितीत ढिम्मसुध्दा फरक पडला नव्हता. माझ्याकडून अजून एका महिन्याचे पैसे मात्र निर्लज्जपणे काढून घेतले होते. आज लढायच्या तयारीनंच फोन फिरवला. बीटीच्या कारकुंड्यांनी 'गोखले' हा शब्द किती प्रकारे चालवता येतो याचे धडे दिलेच होते, त्यात एओएलच्या कारकुंड्यांनी घातलेल्या मौलिक भरीकडे दुर्लक्ष करीत मी कडाडलो.
"माझं ब्रॉडबँड अजून सुरु झालं नाहीये. माझा ऑर्डर नंबर ७८७६४५२३ आहे"
"सॉरी सर! असा नंबर अस्तित्वात नाही". आता नुसतं कार्पेट नाही तर आख्खी जमीन माझ्या पायाखालून काढून घेतली.
"असा कसा नाहीये? मी स्वतः मुद्दाम त्या बाईकडून नंबर मागून घेतला होता"
"सॉरी सर! इथं कुठलीही ऑर्डर दिसत नाहीये. पाहिजे तर मी नवीन ऑर्डर टाकते". अरे! ह्यांची सिस्टम आहे का ब्लॅकहोल? घातलेल्या ऑर्डरी गायब होतात म्हणजे भुताटकीच झाली म्हणायची! रागानं लालबुंद व्हायच्या ऐवजी एकदम काहीतरी आठवून मी शांत झालो. माझ्यासारख्याच कुण्या एका भंपक प्रोग्रॅमरने शेण खाल्लेलं असणार, दुसरं काय? मनाशी हसून मी त्या व्यवसायबंधूला उदार मनाने माफ केलं.. पण आज सोक्षमोक्ष लावायचाच होता.. युध्द पुढे सुरु झालं.
"हे पहा! तू नवीन ऑर्डर काही टाकू नकोस. त्यापेक्षा मला तुझ्या बॉसकडे पाठव"
"सर! मला इथून पाठवता येणार नाही, तुम्ही फोन ठेवा आणि हा दुसरा नंबर फिरवा"
"हो. मी फिरवतो. पण तिथं परत १७६० पर्याय देतील त्यातला कुठला घेऊ ते सांग"
"कस्टमर सर्व्हिसकडे जा, सर! ऑलराईट?" तिनं हसत हसत सांगीतलं. याला म्हणतात सर्व्हिस विथ अ स्माईल!

कस्टमर सर्व्हिसकडे गेल्यावर एक बारक्या भेटला. त्यानंही परत तेच तुणतुण लावलं. त्याची मदत होणार नाही हे मला माहिती होतंच. मी त्याला बॉसकडे पाठवायला सांगीतलं. थोडा वेळ रँटॅटॅ झाल्यावर एक जण अवतरला.
"माझं नाव चिंतामण गोखले, पत्ता अमुक अमुक, जन्मतारीख अमुक अमुक, तू काय करतोस ते सांग", मी तिरसटपणे त्याच्यावर डाफरलो.
"सर! तुमचा अकाउंट नंबर राहिला". हा गृहस्थ म्हणजे स्थितप्रज्ञ कसा असावा याचं उत्तम उदाहरण!
"१२३४५५६७८९", मी अजून तिरसटपणा केला.
"सर! सर! एवढा मोठ्ठा नंबर नसतो"
"दहा, अकरा, बारा, तेरा", माझा पारा १००च्यावर गेला होता.
"सर! सर! तुमची काहीतरी चूक होतेय! एवढा मोठ्ठा नंबर नसतो आमच्यात"
"माहिती आहे मला. मी राग शांत करण्यासाठी १ ते १०० आकडे म्हणत होतो. माझा नंबर गेला खड्ड्यात! तू काय करतोस ते सांग", मी गुरगुरलो.
"सर! मी फर्स्ट लेव्हल सपोर्टला आहे". मघाच्या गाढवानं मला बॉसकडे पाठवायच्या ऐवजी दुसर्‍या एका बारक्याकडे पाठवला होता. माझ्या सर्व खंग्री शिव्याशापांना ते सगळे पुरून उरले होते. वर माझ्याशी उंदीरमांजराचा खेळ पण खेळत होते. शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये तसंच शहाण्या माणसानं कॉल सेंटरचे फोन फिरवू नये असंही म्हणायला पाहीजे. पण कलियुगात, कॉल सेंटर नुसत्या पाचवीलाच नाही तर पहिलीपासून सर्व इयत्तांना पुजलेलं आहे. हे कंपन्यांनी सामान्य माणसाची पध्दतशीर गळचेपी करण्यासाठी काढलेलं एक षडयंत्र आहे.
"मला तुझ्याशी बोलायंच नाही, तू बॉसकडे पाठव"

यावेळेला मात्र बॉसकडेच गेलो.. मलाही आश्चर्याचा धक्का बसला. सर्व परिस्थिती ऐकल्यावर तो म्हणाला, "सॉरी सर! सध्या ग्राहकांच्या खूप तक्रारी आहेत ऑर्डर्स गायब होण्याबद्दल. आता मी परत एक ऑर्डर काढतो"
"अरे भाऊ! जर ऑर्डर गायब होतायत तर तू काढून तरी काय उपयोग?", मी म्हंटलं. नक्की कुणाच्या डोक्यावर परिणाम झालाय? माझ्या की त्याच्या?
"नाही सर! मी लेखी ऑर्डर काढणारेय"
"ठीक आहे. मला ऑर्डर नंबर मेल कर अमुक अमुक पत्त्यावर. आणि माझ्याकडून उगीचच पैसे घेताहात ते परत करणार असं पण त्यात लिही"
"काळजी करु नका, सर! मी मेल पाठवतो"
"आता मी किती दिवस हरी हरी करु?"
"फक्त दोन आठवडे, सर!"

दोन आठवड्यांनी नेट सुरु झालं आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. चला! आता परत घर हलवे पर्यंत, म्हणजे दोन-एक वर्ष तरी काळजी नाही. काही महिन्यांनी माझ्या बॉसने माझी दुसर्‍या गावी बदली झाल्याची कटु बातमी दिली आणि मला ब्रह्मांड आठवलं.. मनात म्हंटलं 'ओ नो! नॉट अगेन!"

-- समाप्त --

Monday, March 23, 2009

कैच्या कै संगीतिका

(टीपः- एका बंगल्यात दुपारच्या वेळी निवांत बसलेलो असताना अचानक मागच्या दारातून दोन पाली आणि पाठोपाठ एक सरडा प्रवेश करते झाले. त्यांनी क्षण दोन क्षण थांबून माझ्याकडे पाहीलं आणि लगेच पुढच्या दारातून पसार झाले. यावर आधारित बाकीचा हा कल्पना उल्हास आहे! )

एक आटपाट शेत होतं. शेताला खडबडित बांध होता. त्या बांधाच्या खबदाडीत 'देसरडा' नावाचं सरडा कुटुंब रहात असे. रणबीर हा देसरडांचा एकुलता एक मुलगा. बांधापलीकडे एक बंगला होता. त्याच्या भिंतींवर 'पाल' नावाचे पालींचे कुटुंब विहार करायचे. दीपिका ही पालांची एकुलती एक मुलगी.

लहानपणापासून रणबिरला पालींच्या चुक चुक आवाजाचं विलक्षण आकर्षण होतं. पालींचा चुक चुक आवाज आला की तो नेहमी आईच्या मागे लागायचा.

(चालः टप टप टप काय बाहेर वाजतंय)
चुक चुक चुक काय बाहेर वाजतंय ते पाहू
चल ग आई चल ग आई बंगल्यात जाऊ

पण आई, सरड्याची धाव कुंपणापर्यंत या सरडा नीतिनुसार, कधीही त्याला बंगल्यात घेऊन गेली नाही. तो हिरमुसला व्हायचा. लहान असल्यामुळे फारसं काही करूही शकत नव्हता बिचारा! पण मोठा झाल्यावर एकवार बंगल्यात घुसून त्या आवाजाचा शोध घ्यायचा या वेडानं त्याला झपाटलं होतं. आईबापाचं ऐकेल तर तो मुलगा कसला?

इकडे लहानगी दीपिका तिच्या सख्यांबरोबर दिवसभर हुंदडत भिंती कोळपत असे. तिला आईने बरीच गाणी शिकवली होती. त्यातलं हे गाणं तिला विशेष आवडायचं.

(चालः लकडीकी काठी )
लकडीकी काठी काठी पे सरडा
सरडेकी दुम पर जो मारा हातोडा
दौडा दौडा दौडा सरडा दुम दबाके दौडा

यथावकाश दोघे वयात आले. त्याला तारुण्य पीटिका यायला आणि दीपिका दिसायला एकच गाठ पडली. त्याचं असं झालं.. एकदा रणबीर नजर चुकवून बंगल्यात घुसला. दारावर चढून दरवाजाच्या फटीतून त्यानं आत पाहीलं. भिंतीवर दीपिका अन् तिच्या सख्या 'मै चली मै चली देखो प्यारकी गली' हे गाणं म्हणत कमरतोड नृत्य करीत होत्या. रणबीर भान हरपून बघतच राहीला. दीपिकानं क्षणात त्याचं चित्त हरण केलं. त्यानं एवढा अवखळपणा कधी पाहीलाच नव्हता. शेवटी व्हायचं तेच झालं. तो अक्षरशः तिच्या प्रेमात दारावरून पडला. तो पडताच दीपिकाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. ती आपल्याकडेच बघते आहे हे समजताच रणबीर गोरामोरा झाला, मग लाजेनं लाल, मग लगेच घाबरून त्यानं टाईल्सचा करडा रंग धारण केला. इतक्या झपाट्यानं रंगबदल करणारा रंगीला रतन दीपिकानं कधी पाहिला नव्हता. तिचीही नजर त्याच्यावरून हटेना. तिच्या सख्यांनाही ती एकटक कुठे बघतेय ते प्रथम कळेना. नंतर तिचा चित्तचोर दिसताच त्यांनी दीपिकाला चिडवायला सुरुवात केली.

(चालः एक परदेसी मेरा दिल ले गया )
एक परदेसी तेरा दिल ले गया
जाते जाते दीपिकाको गम दे गया

ते ऐकताच रणबीरनं तिथून सूंबाल्या केला पण जाता जाता त्या गाण्यातून तिचं नाव दीपिका आहे हे कळलं मात्र! रणबीर मग बंगल्याच्या रोज वार्‍या करायला लागला. 'भींतिवरी दीsपिका असावी' अशी प्रार्थना, 'भींतिवरी कालनिर्णय असावे' च्या चालीवर, मनोमन करीत तो बंगल्यात शिरत असे. कधी ती दिसे तर कधी नाही. आपल्याला बघताच दीपिकाची नजर आपल्यावर खिळते हे लक्षात आल्यावर रणबीर थोडा जास्त धीट झाला आणि त्यानं खड्या सुरात हे गाणं गायलं.

(चालः ही चाल तुरुतुरु )
तुझी चाल तुरुतुरु
हल्ते शेपुट हळुहळु
डाव्या डोळ्यावर किडे फिरती
जशा मावळत्या दिव्यात
कचर्‍याच्या डब्यात
माश्या गं भणभणती

गाणं संपल्यावर रणबीर दीपिकाच्या जवळ गेला. त्यानं आपली ओळख करून दिली. दीपिकानंही आढेवेढे न घेता स्वतःचं नाव सांगीतल्यावर त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. हळुहळू त्यांची उरली सुरली भीड चेपली.. नंतर ते प्राण्यांच्या नजरा चुकवून जोडीने कुठेही फिरू लागले. कधी दीपिका नटुन थटुन बांधावर त्याला भेटायला आली तर रणबीर 'इस रंग बदलती दुनियामे, सरडोंकी नीयत ठीक नहीं' हे गाणं म्हणायचा. कधी जास्त उन्हामुळे दीपिका सावलीत थांबली तर 'गोरे रंगपे ना इतना गुमान कर' हे म्हणायचा. एकदा बांधावर संधीप्रकाशात बसलेले असताना इस्टमनकलर रणबीरने धीटपणे दीपिकाची शेपूट धरली. त्यावर दीपिकाने लगेच असं म्हंटलं --

(चालः छोड दो आंचल जमाना क्या कहेगा )
दीपिका: हाS, छोड दो ना दुम, जमाना क्या कहेगा?
रणबीरः हां हां हां इन अदाओंका, जमाना भी है दीवाना
दीवाना क्या कहेगा?

दीपिकाचं रणबीरशी जमायच्या आधी पाल संप्रदायातल्या एका तरुणाशी, युवराज पालकरशी, जुळलं होतं. पण रणबीरच्या झंझावातामुळे युवराजबद्दल वाटणारं प्रेम पालापाचोळ्या सारखं उडून गेलं. युवराजबद्दलचं तिचं प्रेम आधी रणबीरला माहीत नव्हतं. जेव्हा ते त्याला कळलं तेव्हा युवराजचा पत्ता आधीच कट झालाय हेही माहीत नव्हतं. तो फार व्यथित झाला आणि दोन दिवस तिला भेटलाच नाही. तो न भेटल्यानं दीपिका सैरभैर झाली. एका संध्याकाळी तिनं बांधावर बसून 'सरड्या, का धरिला परदेस' असा आक्रोश केला. त्यातल्या भावनांची सच्चाई, जवळच्या खबदाडात बसून ऐकत असलेल्या, रणबीरच्या हृदयापर्यंत पोचली. त्वरित तो हे गाणं म्हणत म्हणत बाहेर आला.

(चालः परदा है परदा )
सरडा हूं सरडा हूं
सरडा हूं सरडा हूं

सरडा हूं सरडा, सरडेके पीछे, पाल पडी है, हो सरडा
सरडा हूं सरडा, सरडेके पीछे, पाल पडी है
ये दीपिकाको देsसरडा न कर दूँ
तो तो तो तो रणबिर मेरा नाम नही है

मावळत्या सूर्याच्या साक्षीनं त्यानी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. सूर्याकडे बघत रणबीर म्हणाला --
रणबीर: "मावळत्या सूर्याचा केशरी गोळा बघ ना, काय छान दिसतोय"
दीपिका: "चुक चुक"
रणबीर: "रंग कसले सॉलिड दिसतायेत ना?"
दीपिका: "चुक चुक"
रणबीर(वैतागून): "हे चुक चुक म्हणजे नक्की काय? चूक की बरोबर?

इकडे दीपिकाच्या नकारामुळे युवराजचं डोकं भनकलं होतं. त्यानं दीपिकाच्या आणि रणबीरच्या वडीलांच्या कानात वीष ओतलं. बाबा पाल आणि आई पाल यांनी दीपिकाला खूप झापलं अन् वर हा सल्ला दिला.

(चालः डाव मांडुन भांडुन मोडु नको )
बांध कोळपत कोळपत हिंडु नको
भिंत सोडु नको, भिंत सोडु नको

तिकडे बाबा देसरडांनी आई देसरडाशी गंभीर चर्चा केली.
बाबा: "तुमचे चिरंजीव बाहेर काय रंग उधळताहेत, माहितीये?. घराण्याची अब्रू पार धुळीला मिळवलीय."
आई: "आता सरड्याची जात म्हंटल्यावर रंग उधळणार नाहीतर काय करणार?" आईचा निरागस प्रश्न.
बाबा: "तो एका पालीच्या प्रेमात पडलाय. त्याला मी ती पांढर्‍या पायाची पाल मुळीच घरात आणू देणार नाही. तुम्ही लाडावून ठेवलाय त्याला."
आई: "पण मी म्हणते, एवढी नगरपालीका गावात असताना एवढ्या पाली का?". आईला सगळा दोष पालींचाच वाटणं स्वाभाविक होतं.
बाबा: "तुम्ही उगीच फाटे फोडू नका हो! काय हे! लग्नाआधीच पांढरं फटफटीत कपाळ? छे! छे! सरडेश्वरा! हे दिवस दाखविण्यासाठीच जिवंत ठेवलंस का रे मला?" तेवढ्यात तिथे रणबीर उगवला. एकंदर रागरंग बघून त्याला पुढील परिणामांची कल्पना आलीच. त्याला पाहून आईनं मुद्याला हात घातला.
आई: "राणू! हे काय ऐकते आहे मी? सरड्यासारखा सरडा तू, एका पालीच्या प्रेमात पडलास?"
रणबीरः "हो आई! दीपिका तिचं नाव! ती एक छान गोड पाल आहे. आम्ही लग्न करणार आहोत."
बाबा: "(आईकडे बघून) बघा! ऐकलत! मी म्हणत नव्हतो? (रणबीरकडे बघून) अरे मूर्खा! असले आंतरप्राणीय विवाह आपल्या नि त्यांच्या, दोन्ही सांप्रदायात मान्य नाही हेही तुला माहीत नाही?"
रणबीरः "बाबा आता शास्त्र फार पुढे गेलंय. हल्ली भिन्नलिंगी, स्त्रीलिंगी पुल्लिंगी अशी सर्व प्रकारची लग्नं होतात."
बाबा: "मठ्ठ मुला! तुमचं लग्न यापैकी कशातच बसत नाही हे कळलंय का तुला? पिल्लं तरी कशी होणार रे तुम्हाला?
रणबीरः "तो विचार केलाय आम्ही बाबा! आम्ही दत्तक घेणार आहोत."
बाबा: "ते काही नाही. मी तिला या घरात पाऊल सुध्दा ठेऊ देणार नाही. आणि तू! तू तिला यापुढे अजिबात भेटायचं नाही". बाबांचं निर्वाणीचं वाक्य ऐकून रणबीर तणतणत बांधावर गेला. मावळत्या सूर्याकडे बघत त्यानं मनाची तगमग अशी बोलून दाखवली.

मजबूर ये हालात, इधर भी है उधर भी
तनहाई की एक रात, इधर भी है उधर भी
कहने को बहुत कुछ है, मगर किससे कहें हम
कब तक यूँही खामोश रहे और सहें हम
दिल कहता है दुनिया की हर एक रस्म उठा दे

(बंगल्याच्या भींतिकडे हताशपणे बघत)
दीवार जो हम दोनो में हैं, आज गिरा दे
क्यूँ दिल में सुलगते रहें, लोगोंको बता दे
हां हम को मोहब्बत है, मोहब्बत है, मोहब्बत
अब दिलमें यहीं बात, इधर भी है उधर भी

दरम्यान तिकडे युवराजनं दीपिकाच्या बापाला पटवून तिच्याबरोबर लग्नाचा घाट घातला. पण दीपिकानं आत्महत्या करायची धमकी दिल्यामुळे त्यानं तिला हिप्नोटाईज केलं. त्यामुळे तिला तो रणबीरच भासू लागला. युवराजनं तिला पळून जाऊन लग्न करायची आयडिया टाकली. प्रभावाखाली तिनं ती तात्काळ मान्य केली. ते दोघं पळायला लागले. रणबीरनं त्यांना पाहीलं आणि त्याला शंका आली. त्याला दीपिकाच्या प्रेमाची खात्री होती म्हणून तिला युवराजपासून सोडवायला तोही त्यांच्यामागून पळू लागला. युवराजने रणबीर दिसताच पळण्याचा वेग वाढवला. अंमलाखाली दीपिकानंही वेग वाढवला. पळत पळत ते दोघे बंगल्यात आले. थांबून तिथे बसलेल्या माणसाकडे क्षणभर पाहीलं. मागून रणबीर येत होताच. या माणसाची काही मदत होणार नाही हे लक्षात आल्यावर युवराज दीपिका ही जोडी पुढच्या दारातून सुसाट बाहेर गेली... त्यांच्या मागोमाग रणबीरही. पळणार्‍या पालींकडे वरून फिरणार्‍या घारीचं लक्ष गेलं.. तिचं लक्ष गेलंय हे रणबीरच्या लक्षात आलं. त्यानं वेग वाढवून स्वतःला दीपिकाच्या अंगावर झोकून बाजुच्या गवता-मातीचा रंग धारण केला. झपाट्यानं आलेल्या घारीला फक्त युवराज दिसला आणि तिनं त्याला अलगद पायात पकडून आकाशात झेप घेतली. अशारीतिनं युवराजचा काटा परस्पर निघाला. हे सगळं होईपर्यंत दोघांचे आईबाबा तिथे पोचले होते.. त्यांना त्या दोघांच्या दैवी प्रेमाचा साक्षात्कार होऊन गहिवरून आलं.

दीपिका अजूनही संमोहित अवस्थेत होती. कसंबसं मन घट्ट करून रणबीरनं तिच्या थोबाडीत लावली. जोरदार फटक्यामुळे दीपिका परत जागृतावस्थेत आली. रणबीरनं आपल्याला मारलं हे जाणवल्यामुळे ती चिडून म्हणाली.

दीपिका: "तुमने मुझे मारा?"
रणबीरः "मै तो तुम्हारे प्यारका मारा! मै तुम्हे कैसे मार सकता हूं? मैने तो तुम्हारे मनके शैतानको मारा". यावर सगळे उपस्थित हसले.

दीपिकाचं समाधान झालं आणि नंतर ते दोघे सुखासमाधानाने राहू लागले.

-- समाप्त --

(टीपः मावळत्या सूर्यासंबंधीची वाक्यं ललिताच्या 'गेला सूर्यास्त कुणीकडे' या लेखातून ढापली आहेत. त्यात कुठेही तिची किंवा त्या लेखाची टिंगल करण्याचा हेतू नाही. ती वाक्ये वापरण्यासाठी ललिताची परवानगी मिळवली आहे.)

Tuesday, March 10, 2009

अंतिम सsप्राईज!

(टीपः- बरं झालं मी 'ताणलेलं सsप्राईज!' आधी लिहीलं ते. का ते तुम्हाला ह्या 'अनु'दिनीतील निवडक उतार्‍यांवरून कळेल! )

वास पूर्णपणे जायला २ दिवस लागले. च्युईंगम सारखा तो संपतच नव्हता. तोपर्यंत मला वासांसि अजीर्णानि झालं. हल्ली तर मला जळी स्थळी काष्ठी पाषाणी अनुच दिसायला लागली होती... मी संपूर्णपणे अनुरक्त झालो होतो.. अगदी गाडी चालवताना सुद्धा. त्या भानगडीत मी एकदा सिग्नल तोडला. नशिबानं मागून राजेश येत होता. त्यानं फोन करून मला त्याच्या दुकानावर यायला सांगीतलं. दुकानात त्यानं मला जे दाखवलं आणि सांगीतलं ते ऐकून मी मुळापासून हादरलो.. बॉसने टीपी करताना पकडावं तसा. कारण एका ताज्या साप्ताहिक समाचार मधे एका पोटार्थी पापाराझीनं माझा चांगलाच समाचार घेतला होता. ती सनसनाटी बातमी अशी होती -

****************************************************
अमली पदार्थांच्या तस्करीबद्दल एका लफंग्यास अटक:- आमच्या इंग्लंडच्या बातमीदाराकडून

मागच्या आठवड्यात वरकरणी साळसूद दिसणार्‍या एका सराईत ड्रग विक्रेत्यास पोलीसांनी शिताफीने पकडले.


प्रकाश माटे असं नाव सांगणारा हा भामटा रस्त्यावरून चालला असताना एका कुत्र्यानं त्याला धरले. या इसमाच्या सर्वांगाला ड्रगचा विचित्र वास येत होता. हे कुत्रं ड्रगचा वास ओळखण्यात तरबेज आहे असा दावा त्या कुत्र्याची मालकीण केट हडसन यांनी केला. पण आपल्या कुत्र्यानं एका अनोळखी माणसास उगीचच धरले आहे असे समजून केट त्या इसमाला सोडवायला गेल्या तेव्हा त्यांनाही त्या वासाने मळमळायला लागलं.


हा इसम नेहमीच या रस्त्यानं ये-जा करतो असे येथील रहिवाश्यांचं म्हणणं पडलं. त्यानंतर त्या इसमाने एका तरुणीस, तिच्या घरी जाऊन, गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रयत्न केला. गुंगीच्या औषधामुळे क्षणातच ती तरुणी जमिनीवर कोसळली. तो आवाज ऐकून तिचे वडील धावत आल्याने पुढचा अनर्थ टळला.



तिच्या वडीलांनी तातडीने पोलीसात कळवल्याने पळणार्‍या लफंग्यास पोलीसांनी शिताफीने अटक केली. यामागे एक मोठी टोळी असण्याची शक्यता पोलीसातील काही अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. पोलीसांनी नागरिकांना सावध रहाण्याचा इशारा दिला आहे. इन्स्पेक्टर जेम्स स्टुअर्ट पुढील तपास करीत आहेत.



****************************************************

आज रस्त्यात काही लोकं माझ्याकडे बोटं दाखवित होते ते यामुळेच तर! काय मिळवलं त्या नराधम पापाराझीनं माझा झेंडा असा 'अटके'पार लावून? .. आणि माझ्या प्रेमप्रकरणाची (प्रकरण? हो आता प्रकरणच म्हणायला पाहीजे) चमचमीत मिसळ करून? त्यात "इसम", "लफंगा", "भामटा" असले राखीव उल्लेख चिकटवलेले! मला अगदी गाढवावरून धिंड काढल्यासारखं वाटलं. पण आत्ता राजेशच्या मनाचा पेस्टकंट्रोल करण्याव्यतिरिक्त काही करू शकत नव्हतो. अजिजीच्या सुरात त्याला म्हंटल "राजेशभाय! मी त्यातला नाही आहे हो! हे सगळं बनावट आहे! मला गुंतवण्याचा पध्दतशीर प्रयत्न आहे हा". परत एकदा ते फोटो नीट पाहीले.. आणि अचानक युवराज काय घेईल असा कॅच पकडला. मी ओरडलो "हे बघा! ही कुत्र्यानं पकडलेल्या माणसाची पँट आणि बेड्या घातलेल्या माणसाची पँट - दोन्ही वेगवेगळ्या आहेत. मला अटक वगैरे काही झालेली नाही. ही गंडवागंडवी आहे". सुदैवाने राजेशला ते पटलं आणि मला हायसं वाटलं.. अगदी पहील्या फटक्यात पेन्सीलला नीट टोक करायला जमल्यासारखं. राजेशने पोलीस स्टेशनला फोन करून जेम्स स्टुअर्टचा शोध घेतला. असा कोणी इन्स्पेक्टर अस्तित्वात नव्हता. हुश्श! मग राजेशने पेपरच्या ऑफिसला फोन करून तक्रार नोंदवली पण पेपरवाल्यांनी त्याला "चौकशी करतो" अशी त्याच साप्ताहिकाची पानं पुसली.

त्यादिवशी एका ज्योतिषाला चॅटवर सगळं सांगीतलं. माझ्या पत्रिकेत बरेचसे ग्रह वेगवेगळ्या घरात फतकल मारून बसले होते.. तर्‍हेवाईक नजरांनी बघत होते.. आपण स्टेशनवर उगीचच इतरांकडे बघतो तसे. त्यातले काही लुकिंग लंडन टॉकिंग टोक्यो पण होते. कुठे बघत होते कुणास ठाऊक! त्यातला पापाराझीचा ग्रह कुठला ते त्याच्या गूढ भाषेमुळे उमजलं नाही. पण काही ग्रह उलटे फिरत होते त्यातलाच एक असावा.

तो: "अरे! कन्या राशीला नुकतीच साडे-साती लागली आहे!" ज्योतीषशास्त्रात स्त्रीला साडे-साती म्हणतात असं वाटून त्यानं नेमक्या गोष्टीवर बोट ठेवल्याचा हर्ष मला झाला.
मी: "हां! हां! तीच तर माझी हृदयदेवता!".
तो: "ती नाही रे बाबा! साडे-सातीमुळं तुला कामाची फळं मिळायला वेळ लागतोय."
मी: "अरे! पण इथं मी न केलेल्या कामाची फळं भोगतोय त्याचं काय?" त्यानं परत काही ग्रहांच्या दूषित 'नजरा'ण्यांचा उल्लेख केला.. ग्रहांना पण मोतिबिंदु सारख्या रोगांपासून मुक्ती नव्हती तर. इथे मला माझ्या पत्रिकेतल्या प्रत्येक घरावर 'बुरी नजरवाले तेरा मुह काला' अशी पाटी लावावीशी वाटली, पण ग्रह भारतातल्या डायवरांसारखेच पाट्या न बघताच चालतात हे कळल्यावर नाईलाज झाला. थोडक्यात त्यांच्या नजरकैदेतून सुटण्याचा काही मार्ग नव्हता.
मी: "पण माझं नि अनुचं जमेल की नाही?"
तो: "ते मी कसं सांगणार? सगळ्या गाठी वरती मारलेल्या असतात."
मी: "पण भगवंतरावांना गाठ मारण्यासाठी माझी दोरीच सापडत नसेल तर?" शंकांचं अगदी उलटं असतं.. त्या दाबल्या तर दुसर्‍या बाजुने बाहेर येतात.
तो: "ते मी बघतो. तू मला तिची जन्म तारीख, वेळ व जन्मगाव सांग फक्त!" हे शक्य नव्हतं. एकवेळ मी बॉसला तो किती चांगला आहे ते सांगू शकलो असतो, पण हे शक्य नव्हतं. तिला काय सांगून ती माहिती मिळवणार होतो मी?
मी: "ते जमणार नाही. त्यापेक्षा त्या ग्रहांच्या दृष्टी आड माझी सृष्टी होईल असं काही नाही का करता येणार?"
तो: "येईल ना! त्यासाठी शांत करावी लागेल."
मी: "शांत? ती कशी करायची?"
तो: "मी करेन ना! त्यासाठी हजार-एक रुपये खर्च येईल". आयला! म्हणजे हे ग्रह दूरवरून माझ्या व्यक्तिगत जीवनात कारण नसताना ढवळाढवळ करणार आणि त्यांची नजर चुकवण्याचा फणस मी खाणार. मी हा खर्च न करण्याचं ठरवलं. हो! थोड्या दिवसांनी ग्रहांची नजर फिरली तर कोण जबाबदार? ग्रहांना शांत करण्यापेक्षा त्याच पैशात माझं पोटतरी शांत होईल.
मी: "मी सांगतो तुला थोड्या दिवसांनी" मी त्याला बळी पडलो नाही.. कारण कुणीतरी म्हंटलच आहे.. काय फसलासी दाखविल्या गाजरा?
तो: "ठीक आहे! पण एक सांगतो. अगदी शेवटच्या क्षणी तुझ्या जीवनात एक स्त्री येणार आहे." शेवटच्या क्षणी म्हणजे? शेवटच्या घटकेला? तेव्हा जीवनात स्त्री आली काय अन् अप्सरा आली काय काही फरक पडणार आहे का? मला काहीच अर्थबोध न झाल्यानं मी दुर्लक्ष केलं.

त्या रात्री साप्ताहिक संगीत कत्तलीला संजयकडे गेलो. वेळेवर गेल्यामुळे सगळ्यांच्या आधी पोचलो होतो. माझ्या तथाकथित अटकेची वार्ता एवढ्यात षटकर्णी झाल्याचं मला माहीत नव्हतं. मी गेल्या गेल्या संजय म्हणाला.
संजय: "ये ये! कधी सुटलास?" मला वाटलं तो ऑफिसमधनं कधी सुटलो ते विचारतोय.
मी: "नेहमीप्रमाणेच"
संजय: "म्हणजे? तुझं नेहमीच जाणं येणं असतं तिथं?" यात त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काय होतं? आता कांता पण आली.
मी: "म्हणजे काय संजयभाय? पोटाचा प्रश्न आहे हा!"
कांता: "भलती सलती साहसं करु नको रे बाबा! जपून रहा! काळजी घे" म्हणजे कांतानेही मला सिग्नल तोडताना पाहिलं होतं तर.
मी: "हो! हो!"
संजय: "घरचे काय म्हणताहेत?"
मी: "घरचे एकदम मजेत. एकदा चक्कर टाक म्हणताहेत. इकडचा माल मिळाला नाही बरेच दिवसात म्हणाले". 'माल' हा शब्द ऐकल्यावर ते दोघे चमकले. हा माणूस खानदानी गंजेडी आहे आणि आपल्याला त्याचा पत्ता इतके दिवस नव्हता, असं त्यांना नक्की वाटलं असणार!
संजयः "बरं! वकीलाची वगैरे मदत लागली तर मला सांग. माझ्या ओळखीत एक चांगला वकील आहे". वकील? हा कुठल्या ट्रॅकवर आहे? सागर तर अजून आलेला दिसत नाही... ओ हो हो... माझ्या डोक्यात प्रकाश पडला. प्रकाश पडल्याशिवाय दिसत नाही हे खरं बाकी. मग मी पुढचा अर्धा तास त्या दोघांना माझ्या आणि अनुच्या सरळ रेषेला तो पापाराझीचा लंब कसा छेद देतोय हे समजावलं. आता वातावरणात नेहमीचा मोकळेपणा आला. संजय धीर देत म्हणाला "अरे! जब तुम दोनो होंगे राजी तो क्या करेगा पापाराझी?". कांता म्हणाली "भिऊ नकोस!"... त्यापुढे मला "मी तुझ्या पाठीशी आहे!" असं अस्पष्ट ऐकू आलं. पण ती सांगत होती "अनु आमच्या नात्यातलीच आहे. मी तिच्या बापाचा कान पकडून 'हो' म्हणायला लावेन".
"धन्यवाद कांताबेन! पण तिचा बाप 'हो' म्हणाला तर माझी धडगत नाही".. मी लगेच एक फुसका विनोद केला. चला! बरं झालं त्यांना सगळं सांगीतलं ते! निदान तिच्या बापाचं वक्रीभवन कांताचा लोलक सरळ करण्याची शक्यता तरी निर्माण झाली.

कांता आत गेली आणि आमची संगीत झटापट सुरु झाली. शेवटपर्यंत अनु आलीच नाही. मला भेटायला डबा घेऊन तुरुंगात गेली की काय? निराश मनाने मग मी 'सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगी' याची चिरफाड केली. मूळ गाणं बार्शीलाईट स्पीड मधे असून देखील कॅराओकेत ते डेक्कन क्वीनच्या वेगाचं निघालं. वेग पकडता पकडता घायकुतीला आलो.. त्यात पट्टी पण मूळच्यापेक्षा वरची.. त्यामुळे माझं काही बरं-वाईट झालं की काय म्हणून कांता धावत आली.

दुसर्‍या दिवशी ऑफिसला जाताना एक केस पिंजारलेला, डोळे खोल गेलेला, दाढीचे खुंट वाढलेला भीषण इसम माझ्याकडे करंट मागायला आला. मात्र बिडी पेटवता पेटवता इकडे तिकडे बघत हळूच 'माल है क्या' हे विचारल्यावर मला त्याला यथेच्छ बदडावंसं वाटलं.. त्याबद्दल मला नक्की अटक झाली असती हे लक्षात घेऊन त्याच्या कानात मी हळूच 'पोलीस! पोलीस!' ओरडल्यावर तो कुठेही न बघता सुसाट सुटला. या प्रकारानंतर पुढचे काही दिवस मी 'ड्रग स्टोअर' अशी पाटी वाचली तरी, माझा त्याच्याशी काही संबंध नाही हे ठसविण्यासाठी, रस्ता ओलांडून पलीकडे जात असे.

अगतिक मनाने मी अनुला फोन केला. मला पापाराझीनं पछाडलं होतं तसं तिला सर्दीनं. तिला बातमीतला भंपकपणा वाचल्या वाचल्याच कळला होता. तरी पण ती तिच्या झळकलेल्या फोटोवर खूष होती. कुणाला काय तर कुणाला काय. इथं माझ्या चारित्र्यावर 'गर्द' डाग पडले होते आणि ती फोटोवर खूष! पण तिनं परत एका पिक्चरचा प्रस्ताव टाकताच मनातली सगळी जळमटं धुतली गेली.

यावेळेस कुठलाही वास येणार नाही याची काळजी घेत मी तिच्या घरी दाखल झालो. दरम्यान त्या साप्ताहिकाने चुकीची बातमी छापल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मी आनंदात होतो. अनुनेच दार उघडलं. ती परत घरच्याच कपड्यात होती.. कारण पिक्चर तिच्या घरीच डीव्हीडी लावून बघायचा होता.. बोंबला, म्हणजे फॅमिली ड्रामाच की! छान रंगवलेल्या स्वप्नांवर डांबर फेकल्यासारखं वाटलं. पण लक्षात कोण घेतो? जड मनाने एका कोचात बसकण मारली. शेजारी तिचा बाप बसला होता.. आम्ही दोघं एकमेकांकडे बघून परत कोरडे हसलो. कोचाच्या डाव्या बाजुच्या खुर्चीत अनु आणि दुसर्‍या बाजुच्या खुर्चीत तिची आई. पिक्चरपण फॅमिली ड्रामाच निघाला.. डोळ्यातून पाण्याचे पाट नाही वाहिले तर पैसे परत असा! सूंssss! सूंssss! डावीकडून आवाज आला. पाहतो तर अनुचा बांध फुटला होता. थोड्यावेळानं.. फँssss! फँssss! उजवीकडून तिच्या आईनं नाकातून सूर लावला. मला हसू येत होतं.. कसंबसं दाबत होतो. मधेच बापाकडे पाहीलं.. तो गाढ झोपला होता.. बायको मुसमुसत असताना ब्रह्मानंदी टाळी लावू शकणारा थोर पुरुष होता तो.. नंतर तो घोरायलाही लागला. आता ते सूं सूं फँ फँ चं स्टिरीओफोनिक म्युझिक मधेच घुर्रर्र करून सम गाठायला लागलं. अवघ्या तीन तासात दोघींनी खोकंभर पेपर नॅपकिन भिजवले होते. होता होता पिक्चर संपला आणि बाप आपोआप जागा झाला. नंतर तिथेच जेवण झालं. काही म्हणा, पण त्या निमित्ताने माझा त्या घरातला संचार वाढला. मी एकटाच असतो हे कळल्यावर तिची आई मला वारंवार घरी जेवायला बोलावू लागली. काही विशेष केलं असेल तर आठवणीनं ठेऊ लागली. अधून मधून पिक्चर, शॉपिंग इ. इ. मुळे माझी आणि अनुची जवळीक बरीच वाढली. तीन महीन्यात झालेल्या वेगवान वाटचाली मुळे माझे भारतातले मित्र 'आता किती दिवस वाट पहाणार आहेस? विचारून टाक लवकर. नाहीतर म्हातारपणी काठी टेकत टेकत विचारणारेस काय?' म्हणून मागे लागले.

तो मिल्यन डॉलर प्रश्न तिला विचारण्याच्या कल्पनेनंच माझी तंतरली होती. तिच्याबरोबर 'आज मुझे कुछ कहना है' हे गाणं बर्‍याच वेळा म्हणून तिला हिंट दिली.. पण तिला काही कळलं नाही.. किंवा तिनं तसं दाखवलं नाही. शेवटी एकदा आईस्क्रीम खाता खाता, हृदय कुकरच्या शिट्टीसारखं थडथडत असताना, मी विचारलंच. पुढची ३-४ मिनिटं ती काहीच बोलली नाही. भयाण शांतता पसरली. मला कुठून विचारलं असं झालं. मग तिनं बाँब टाकला.
ती: "सॉरी प्रकाश! पण आपलं जमणार नाही असं मला वाटतं." फुस्स्स! कुकरची शिट्टी तिनं अलगद काढल्यावर माझ्या प्रेमाच्या वाफेचं पाणी पाणी झालं.
मी: "का?"
ती: "मी तुला फक्त मित्र मानते. मी त्या दृष्टीनं कधी पाहीलं नाही!" अरे! आता हिच्या दॄष्टीशी पण सामना? आधीच ग्रहांच्या दॄष्टीशी झटापट चालू आहे. पण तिचा निर्णय मान्य करण्याव्यतिरिक्त काय करु शकलो असतो? झालेल्या वेदना प्रयत्नपूर्वक गिळून चेहरा निर्वीकार ठेवित मी म्हणालो.
मी: "ठीक आहे. तुझा निर्णय मला मान्य आहे. निदान आपली मैत्री अशीच ठेवायला तरी काही हरकत नाही ना तुझी?"
ती: "हो! हो! मला तुझी कंपनी आवडते."

तिच्या नकाराच्या सुईनं माझ्या भ्रमाचा फुगा फट्टकन फुटला होता. पुढचे काही दिवस काही सुचलं नाही.. आपण अगदीच टाकाऊ आहोत असं वाटायला लागलं.. म्हणजे मी मनातनं मला टाकाऊच समजतो.. पण असं काही घडलं की आपण जगायला नालायक आहोत, मच्छर आहोत असं पण वाटायला लागतं.

पण नकारामुळे एक बदल झाला. मी तिच्याशी जास्त मोकळेपणाने वागायला लागलो.. पूर्वी मी माझ्या तिच्याबद्दलच्या भावना तिला कळू नयेत असा प्रयत्न करीत असे. ते दडपण गेलं होतं. आता लपविण्यासारखं काहीच नव्हतं. आमचं भटकणं, भेटीगाठी पूर्वीसारखंच चालू होतं. असेच सहा महीने उलटले. इकडे घरचे लग्न कर म्हणून मागे लागले होते. सगळ्या सबबी संपल्यावर होकार दिला.. नाही तरी अनुचा नकारच होता. आलेल्या फोटोंवरून पसंती कळवायचं काम करायला अनु मदत करीत होती. भारतात जाऊन मुली बघितल्या.. त्यातली एक आवडली. तिचं नाव आरती. तिनंही होकार दिला.. विशेष म्हणजे माझ्या एकतर्फी प्रेमाची कहाणी ऐकून देखील तिनं होकार कायम ठेवला.. मग साखरपुडा करूनच परत आलो. आल्यावर अनुला इत्थंभूत माहिती दिली. तिलाही आनंद झाला.

लग्नाला दोन महीने अवकाश होता. असंच मी तिला एकदा पिक्चरचं आमंत्रण दिलं. त्यादिवशी ऑफिसमधील बिनकामाच्या मीटिंगमुळे थोडा उशीरा घरी आलो. मला तिला घ्यायला जायचं होतं. मग घाईघाईत अंघोळ करून निघण्याच्या नादात मोबाईल घरातच विसरलो. कुलूप लावून खाली आल्यावर लक्षात आलं. मी बाईलवेडा नसलो तरी मोबाईलवेडा नक्कीच आहे. पण आता ५ मिनीटात अनु भेटेलच मग कशाला पाहीजे मोबाईल असा विचार करून गाडीकडे निघालो. जाता जाता किल्ली काढली अन् तेवढ्यात ती हातातून सटकून खाली पडली.. सरळ गटाराच्या झाकणातील दांड्यांच्या फटीतून आत जाऊन तिनं गटारसमाधी घेतली. मी वाकून वाकून काही दिसतंय का ते पहायला लागलो. शेजारी बरीच कार्टी खेळत होती. त्यांचा उपद्रव सुरु झाला. एकानं 'तुझी गाडी कुठली' विचारलं. ती मी दाखवल्यावर 'खूप खराब आहे. धुवून देऊ? फक्त ५० पेन्स.' मी नको सांगीतलं. एका पोरानं 'तुला हिरवा शर्ट घातलेला मुलगा सायकलवरून जाताना दिसला का?' विचारलं. दुसर्‍यानं 'मी त्या भींतिमागे लपतोय. कुणी विचारलं तर सांगू नकोस' असं बजावलं. एक पोरगी डोळे मोठे करत म्हणाली 'ती पोरं मला त्रास देताहेत.' तिला मी माझ्याजवळ थांबायला सांगीतलं. मग ती म्हणाली 'पण मला त्यांच्यात खेळायचंय.' आता काय करावं? तेवढ्यात तिचं कुतुहल जागृत झालं. 'तू काय बघतोयस?' एव्हाना माझी सहनशक्ती संपली होती. मी तिला 'मर्मेड बघतोय' म्हणालो. त्यावर तिचे डोळे चांगलेच विस्फारले. तिनंही बघण्याचा प्रयत्न केला. काहीच दिसलं नाही म्हणून शेवटी निघून गेली.

मी झाकण उचलायचा प्रयत्न केला.. ते बाजुच्या फटींमघे माती जाऊन चांगलं जॅम झालं होतं. किल्ली शोधणं भाग होतं. कारण त्या जुडग्यात घराची किल्ली पण होती. घराच्या एजंटकडून दुसरी किल्ली घेणं शक्य नव्हतं.. कारण त्याचं ऑफीस बंद झालं होतं. आता नेसत्या कपड्यानिशी घराबाहेर पडणे किंवा काहीही करून किल्ली काढणे एवढेच पर्याय होते. मी तिथं पडलेली झाडाची छोटी काटकी घेतली.. गुडघे टेकवून आत घालून काही मिळतंय का ते बघायला लागलो. त्या मघाच्या मुलीनं बरीच जत्रा मर्मेड पहायला गोळा करून आणली. सगळ्यांना एकदमच गटारात बघायचं होतं. त्यांच्या उत्साहाचा भर ओसरेपर्यंत मी तिथेच काटकी टेकून गुडघ्यावर बसून राहीलो. नेमका माझ्या ऑफिसमधला सहकारी तिथून जाता जाता मला बघून थांबला.
तो: "हॅलो मेट!" हा माझ्या आडनावाचा उच्चार मुद्दाम असा करतो असा मला खूप दिवस संशय आहे. "यू आरंट अ मुस्लिम, आर यु?" या जडबुध्दीच्या माणसाला मी गुडघे टेकून नमाज पढतोय असं वाटलं की ह्याला ब्रिटीश सेन्स ऑफ ह्युमर म्हणायचं? इंग्रजी बोलणं नेहमीच असं सीमारेषेवरचं असतं त्यामुळे माझी फार कुचंबणा होते.
मी: "यू आर नॉट जोकिंग, आर यू?" मी बदला घेतला. त्याचं नाव जो किंग आहे. ह्या विनोदाचा त्याला प्रचंड कंटाळा आला असणार, तरीही त्यानं हाहा:कार केला.
जो: "व्हॉस्सप मेट?" परत मेट? फुल्या फुल्या.
मी: "नथिंग इज अप! एव्हरिथिंग इज डाऊन! अरे, माझी किल्ली आत पडलीये" अजून एक सीमारेषेवरचा विनोद.
जो: "आपल्याला झाकण उचलायला लागेल. आयॅम अफ्रेड!" तमाम ब्रिटीश लोकं घाबरट असतात. येता जाता आयॅम अफ्रेड, आयॅम अफ्रेड करतात. मग आम्ही दोघांनी जोर लावून ते झाकण कसंबसं उचललं. पूर्ण वाकूनसुध्दा हात शेवटपर्यंत पोचत नव्हता.
जो: "आत उतरायला लागेल. आयॅम अफ्रेड!" झालं! कधीतरी न टरकता बोल की रे!

नंतर मी उघड्या डोळ्यांनी, कुठलही नशापाणी न करता, त्यात प्रवेश करता झालो. आज गटारी अमावास्या असण्याची घनदाट शक्यता होती. गटार मंथन करून एक बाहुली, काही खेळण्यातल्या छोट्या गाड्या, एक फ्रिस्बी, माझी किल्ली मिळवली आणि बाहेर आलो. जोच्या मदतीनं झाकण लावलं. त्याचे आभार मानले. तो जाण्याआधी त्याच्याशी हस्तांदोलन करण्याचा मोह मात्र टाळला.

अचानक अनु दिसली. तिला पाहताच मी तिच्यापासून लांब जात म्हंटल 'घरी ये. मी दार उघडं ठेवतो. आधी मला अंघोळ करायला पाहीजे.' हो. न जाणो. त्या गटारगंधामुळे तिची परत शुध्द हरपायची. धावत धावत घरी गेलो.. गटारगंगा धुऊन बाहेर आलो. अनु माझ्या भावी बायकोचा फोटो निरखत होती. प्रथम तिला माझ्या गटार विहाराचं कारण सांगीतलं. मी तिला घ्यायला न गेल्यामुळे आणि फोनही न उचलल्यामुळे काळजी वाटून ती माझ्या घरी आली, तेव्हा मी गटारात होतो.
ती: "तू खरंच लग्न करणारेस?" म्हणजे काय? गटाराचा नि लग्नाचा काय संबंध?
मी: "छे! छे! मी नुसती तिला घरी घेऊन येणार आहे माझ्याबरोबर सारीपाट खेळायला." मी थट्टेच्या सुरात म्हंटल. असं का विचारतीय? हिला काय माहीत नाही का माझं लग्न होणारेय ते?
ती: "पण तुला खरंच तिच्याशी लग्न करावसं वाटतंय?" मामला गंभीर होत चालला होता.
मी: "तू नाही म्हणालीस. नाहीतर तुझ्याशीच करणार होतो."
ती: "आता मला तुझ्याशी लग्न करायचंय." माझा माझ्या कानांवर विश्वास बसला नाही. गटारात मादक द्रव्य वगैरे असतात का?
मी: "काय? तू गम्मत करतीयस ना?"
ती: "नाही. आता मला तुझ्याशी लग्न करायचंय." ती परत शांतपणे म्हणाली. आता तिच्या डोळ्यात पाणी पण चमकायला लागलं होतं. मी चांगलाच भंजाळलो.
मी: "हम्म! एवढं काय घडलं तुझं मत बदलायला?"
ती: "तुझं लग्न झाल्यावर आपल्या भेटी पूर्वीसारख्या होणार नाहीत. हे मला जाणवलं. आय विल मिस यू! मनात कुठेतरी तुझ्याबद्दल प्रेम होतं ते मला इतके दिवस जाणवलं नव्हतं!" आयला! ही किल्ली काही महीने आधी का नाही पडली?
मी: "अनु! किती उशीरा सांगितलंस. मला थोडा वेळ दे विचार करायला!" मी एवढंच म्हणू शकलो.
ती: "चल! मी आता जाते. तुझ्या निर्णयाची वाट पहाते".

अंतिम सsप्राईज देऊन ती मला एका चक्रव्यूहात टाकून निघून गेली.. ज्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग मला माहीत नाही. माझ्यापुढे दोनच पर्याय होते. पहीला म्हणजे ठरलेलं लग्न मोडायचं.. जिच्यासाठी इतके दिवस जीव टाकला तिच्याशी लग्न करायचं. पण हे तर धर्मसंकट होतं. आरतीला दिलेला शब्द, तिचा काहीही दोष नसताना, मोडायचा. तिनंही माझ्यावर विश्वास टाकला होता. स्वप्न रंगवली असतील. त्यांचा चुराडा करायचा. नकार मिळाल्यावर कसं वाटतं ते मी अनुभवलं होतंच.. तोच प्रसंग तिच्यावर आणायचा. मला आयुष्यभर टोचणी लागली असती. दुसरा, माझ्या प्रेमाचा गळा घोटून आरतीशी लग्न करायचं. बळ हेचि दुर्बलांना अशी ज्याची ख्याती त्या प्रेमाचाच बळी द्यायचा? दोन्ही पर्याय मला पटत नव्हते.

(तळटीपः रेसीपीच्या शेवटी जसं आवडीप्रमाणे मीठ तिखट घालून घ्या म्हणतात त्याप्रमाणे याही लेखाचा शेवट आपापल्या आवडीप्रमाणे करून घ्यावा!)

-- आता नक्कीच समाप्त --