Sunday, November 20, 2011

दुसरे महायुद्ध : ऑपरेशन मिंसमीट

मधे बीबीसी वर दुसर्‍या महायुद्धातल्या ऑपरेशन मिंसमीटबद्दल एक अफलातून माहितीपट दाखविला. ऑपरेशन मिंसमीट हे जर्मन सैन्याला गंडविण्यासाठी ब्रिटिशांनी रचलेल्या एका सापळ्याचं नाव होतं.. ती एक अफलातून गंडवागंडवी होती ज्यामुळे हजारो प्राण पुढे वाचले. त्या माहितीपटात ऐकलेली आणि विकीपीडिया सारख्या सायटींवरून उचलेली ही माहिती आहे.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश हेर खात्यातल्या काही सुपिक टाळक्यांनी व्यवस्थित नियोजन करून एक भेदी पुडी सोडली. ती इतकी बेमालूम होती की तिच्या वावटळीत खुद्द हिटलर गुंडाळला गेला. आणि सर्वात विशेष म्हणजे त्या पुडीचा नायक होता एक मृत देह.. एक प्रेत! (१).

१९४२ च्या शेवटी शेवटी दोस्त राष्ट्रांनी उघडलेली मोरोक्को, अल्जिरिया, पोर्तुगाल व ट्युनिशिया येथील आघाडी यशस्वी होऊ घातली होती. युद्धाची पुढील पायरी म्हणून भूमध्य समुद्राच्या उत्तर भागात मुसंडी मारायचा विचार चालू होता. उत्तर आफ्रिकेतून एक तर इटलीतून किंवा ग्रीसमधून हल्ला चढविला तर पलिकडून येणार्‍या रशियाच्या सैन्यामुळे जर्मन कोंडित सापडणं शक्य होतं. त्यात पण सिसिलीचा (इटली) ताबा मिळविला तर दोस्तांच्या नौदलाला भूमध्य समुद्रातून निर्धोकपणे फिरता येणार होतं आणि पश्चिम युरोपावर हल्ले करणं शक्य झालं असतं. जानेवारी १९४३ पर्यंत दोस्तांचं दीड लाखाच्यावर सैन्य युरोप वर हल्ला चढविण्यासाठी उत्तर आफ्रिकेत जमलेलं होतं. सगळ्यांनाच हल्ला होणार हे माहिती होतं.. जर्मनांना पण! त्यामुळेच, चर्चिलनं 'एक मूर्ख सोडता बाकी कुणालाही सिसिलीवरच हल्ला होणार हे लगेच कळेल' अशी टिप्पणी केली होती.

म्हणूनच, सिसिली सोडून भलतीकडेच हल्ला होणार आहे अशी हुलकावणी जर्मनांना दिल्याशिवाय ते त्यांचं थोड फार सैन्य दुसरीकडे हलवणं आणि सिसिली काबीज करणं अवघड गेलं असतं. पूर्वीही बिटिशांनी जर्मनांना यशस्वीरित्या गंडवण्याचे प्रयोग केलेले असल्यामुळे त्यात ते थोडे फार तरबेज झालेले होते म्हणून बनवाबनवीची कल्पना ब्रिटिशांच्या डोक्यात घट्ट व्हायला लागली होती.

प्रत्यक्ष हल्ल्याच्या बरेच महीने आधी, ब्रिटिश हेरखात्यातील (MI5) फ्लाईट लेफ्टनंट चोल्मंडले यानं फाटक्या पॅराशूटला बांधलेलं एक प्रेत जर्मनांना सापडेल अशा ठिकाणी फ्रान्स मधे सोडायची कल्पना (२) मांडली. त्यातून एका विमान अपघातात त्या माणसानं उडी मारली पण फाटक्या पॅराशूटमुळे तो मेला हे जर्मनांना दाखवायचं होतं. त्या प्रेताबरोबर एक रेडिओ ट्रान्समीटर पण तो ठेवणार होता. त्याला असं भासवायचं होतं की तो देह एका ब्रिटिश हेराचा आहे आणि त्याचा ट्रान्समीटर जर्मनांच्या हातात पडला आहे याचा ब्रिटिशांना पत्ता नाही. तसं झालं तर ब्रिटिशांना त्या ट्रान्समीटर वरून बनावट माहिती जर्मनांना पुरविणं शक्य झालं असतं. ही कल्पना व्यवहार्य नाही म्हणून निकालात काढली तरी ती दुसर्‍या एका विभागाने (ट्वेन्टी कमिटी (३)) उचलून धरली. चोल्मंडले ट्वेन्टी कमिटीत होता. त्याच कमिटीत लेफ्टनंट कमांडर माँटेग पण होता. दोघांनी मिळून त्या कल्पनेचा विस्तार करायला सुरुवात केली.. पण एक बदल करून.. ट्रान्समीटर ऐवजी त्या प्रेताबरोबर काही पत्रं ठेवायचं ठरवलं (४). पण त्यात थोडी गोची होती.. महत्वाची कागदपत्रं शत्रुच्या क्षेत्रातून न्यायची नाहीत हा दोस्तांचा दंडक आहे हे जर्मनांना माहिती होतं. म्हणून, ते प्रेत एका विमान अपघाताचा बळी आहे आणि ते स्पेन मधे (फ्रान्सच्या ऐवजी) सापडविण्याची योजना केली. कारण, स्पेन मधलं तथाकथित तटस्थ सरकार 'आबवेहर'ला (जर्मन हेर खाते) सहकार्य करतं हे ब्रिटिशांना माहीत होतं. त्यामुळे, ते प्रेताबरोबर सापडलेली कागदपत्रं जर्मन हेरांना बघायला देतील याची खात्री होती.

त्यांना पाण्यात बुडून व बराच काळ थंड राहिल्यामुळे (हायपोथर्मिया) मेलेल्या प्रेताची गरज लागेल असं एका पॅथॉलॉजिस्टनं सांगितलं. अगदी असं प्रेत सोडा पण साधं प्रेत तरी कसं मिळवायचं हा मोठा प्रश्न होता. कारण मेलेल्या माणसाच्या नातेवाईकांना काय व कसं सांगणार? शिवाय, त्या सगळ्या प्रकाराची वाच्यता होऊन चालणार नव्हतं. पण नशिबाने त्यांना लंडन मधे एका ३४ वर्षीय वेल्श तरुणाचा देह मिळाला. त्याचं नाव होतं ग्लिंड्विर मायकेल! त्याचे आईवडील वारलेले होते आणि कुणीच जवळचे नातेवाईक मिळाले नाहीत. काहीही कामधंदा नसलेला तो लंडनमधे उपाशीपोटी फिरत होता. भूक अनावर झाल्यामुळे त्यानं रस्त्यावर पडलेला ब्रेड खाल्ला. दुर्दैवाने, त्यात उंदराचं वीष घातलेलं होतं. उंदीरांच्या सुळसुळाटामुळे तेव्हा लंडनमधे उंदीर मारण्यासाठी वीष घातलेले ब्रेड टाकले जायचे. उंदराच्या विषातील फॉस्फरसची पोटातल्या हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड बरोबर प्रक्रिया होऊन एक अत्यंत विषारी गॅस, फॉस्फिन, तयार होतो. त्यामुळे माणूस मरतो. तो ताबडतोब मेला नव्हता कारण त्याच्या पोटात पुरेसं वीष गेलेलं नसल्यामुळे जास्त फॉस्फिन तयार झालं नव्हतं! पण जेव्हढं काही तयार झालं होतं त्यानं त्याची लिव्हर बंद पडली आणि तो मेला. वरवरच्या तपासणीतून तो पाण्यात बुडण्याशिवाय इतर कशाने मेला आहे हे सहज समजलं नसतं.

रंगभूमीवरचं पात्र रंगवतात तसं त्या शवाला एक नवीन ओळख दिली गेली. तो रॉयल नेव्हीसाठी कंबाईन्ड ऑपरेशन्स हेडक्वार्टर (५) मधे काम करणारा कॅप्टन (अ‍ॅक्टिंग मेजर) विल्यम (बिल) मार्टिन झाला. तो १९०७ मधे वेल्स मधल्या कार्डिफ या गावी जन्माला आला होता. कंबाईन्ड ऑपरेशन्स साठी काम करत असल्यामुळे तो मूळचा नौदलाचा असला तरी पायदळाचा पोशाख घालू शकत होता. किंबहुना, त्याला मुद्दाम नौदलाचा पोशाख नाही घालायचं असं ठरवलं कारण नौदलाचे पोशाख गीव्हज नामक शिंप्याकडूनच बनवावे लागत आणि त्याला प्रेताची मापं घ्यायला लावली असती तर भलताच गाजावाजा झाला असता. पण तो पायदळातला माणूस आहे हे पण दाखवायचं नव्हतं कारण पायदळाच्या कार्यालयातल्या लोकांना पटवणं (बनावट ओळख संभाळण्यासाठी) जास्त कठीण होतं. त्याच्या अ‍ॅक्टिंग मेजर दर्जामुळे तो अत्यंत महत्वाची कागदपत्रं नेण्याइतक्या वरच्या दर्जाचा अधिकारी होता, त्याच बरोबर, खूप लोकांना माहीत असण्याइतक्या वरच्या दर्जाचा पण नव्हता. मार्टिन नावाचे, त्याच दर्जाचे, बरेच अधिकारी असल्यामुळेच त्याला ते नाव देण्यात आलं.

त्याच्या बरोबर त्याच्या होणार्‍या बायकोचा, पॅमचा, फोटो (हा फोटो MI5 मधे कामाला असलेल्या एका मुलीचा होता); तसंच दोन प्रेमपत्रं; साखरपुड्यासाठी घेतलेल्या हिर्‍याच्या अंगठीची, १९ एप्रिल १९४३ तारखेची, सुमारे £53 किमतीची एस जे फिलिप्स या भारी जवाहिर्‍याची पावती; त्याच्याबद्दलच्या अभिमानाने ओथंबलेलं त्याच्या वडलांचं एक पत्रं; लॉईड्स बँकेच्या मॅनेजरचं सुमारे £79 ओव्हरड्राफ्ट झाल्याबद्दल पैशाची मागणी करणारं पत्रं; एक सिल्व्हर क्रॉस आणि सेंट ख्रिस्तोफरचं पदक (६); किल्ल्यांचा जुडगा; एक वापरलेलं बसचं तिकीट; एक नाटकाचं तिकीट; सैन्याच्या क्लबमधे ४ दिवस राहिल्याची पावती; गीव्हजकडून घेतलेल्या नवीन शर्टाची पावती (७) अशा गोष्टी होत्या. त्याच्या भूमिकेत अजून रंग भरण्यासाठी त्याला थोडा निष्काळजी दाखविण्यात आलं.. त्याचं आयडी कार्ड हरविल्यामुळे नवीन दिलं आहे तसंच त्याचा ऑफिसच्या पासच्या नूतनीकरणाची तारीख उलटून गेलेली आहे असं दाखवलं गेलं.

संशयाला वाव मिळू नये म्हणून त्याच्या सारख्या अधिकार्‍याची अंतर्वस्त्रं त्याच्या दर्जाला शोभेलशी हवी होती. पण रेशनिंग असल्यामुळे वूलन अंडरवेअर मिळवणं दुरापास्त होतं. त्याच सुमारास हर्बर्ट फिशर या ऑक्सफर्ड मधील न्यू कॉलेजच्या प्राध्यापकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू झाला. त्याची अंतर्वस्त्रं मिळविण्यात आली.

सगळ्यात महत्वाचं पत्र लेफ्टनंट जनरल सर आर्ची (आर्चीबॉल्ड) नाय, व्हाइस चीफ ऑफ इंपीरियल जनरल स्टाफ, याने जनरल सर हॅरॉल्ड अलेक्झांडर, कमांडर १८वा आर्मी ग्रुप अल्जिरिया आणि ट्युनिशिया, याला लिहीलं होतं. पत्र १००% खरं वाटावं म्हणून खुद्द आर्चीकडूनच ते लिहून घेतलं. त्यात काही, गार्डस ब्रिगेडच्या नवीन कमांडरची नेमणूक या सारखे, संवेदनशील विषय होते. जनरल विल्सन ग्रीसवर हल्ला चढविणार आहे आणि जनरल अलेक्झांडरने सार्डिनियावर हल्ला करावा असा आदेश होता. शेवटी, खुंटी हलवून बंडल भक्कम करणारं असंही एक वाक्य टाकलं होतं -- 'आपल्याला विजयाची शक्यता खूप आहे कारण जर्मन लोकं आपण सिसिलीवरच हल्ला करणार हे धरून चालले आहेत'. ही कागदपत्रं एका छोट्या बॅगमधे घालून ती त्याच्या थंडीच्या लांब कोटाच्या पट्ट्याला साखळीने अडकविण्यात आली.

मेजर मार्टिनला कोरड्या बर्फाने (गोठवलेला कार्बन-डायॉक्साईड) भरलेल्या एका शवपेटीत कागदपत्रांसह ठेवून ती पेटी स्कॉटलंड मधील होली लॉक या गावतल्या पाणबुडींच्या तळावरील एचएमएस सेराफ या पाणबुडीवर चढविण्यात आली. कार्बन-डायॉक्साईड काही काळाने वितळून पेटीतल्या प्राणवायूला बाहेर हाकलून पेटी व्यापून टाकेल आणि शव टिकायला मदत होईल हा हेतू होता. त्या पेटीत नक्की काय आहे ते पाणबुडीवरच्या फक्त काही लोकांनाच माहिती होतं, बाकीच्यांना त्यात हवामानखात्याला लागणारं अत्यंत गुप्त यंत्र आहे असं सांगितलं होतं. १९ एप्रिलला पाणबुडीने जी बुडी मारली ती स्पेनच्या ह्युएल्व्हा बंदरापासून सुमारे एक मैलावर ३० तारखेला पहाटे ०४:३० वाजता बाहेर आली. ह्युएल्व्हा मधे आबवेहरचा एक हेर आहे आणि त्याचं स्पॅनिश अधिकार्‍यांशी साटलोटं आहे हे ब्रिटिशांना चांगलं माहिती होतं. ठरल्याप्रमाणे पाणबुडीचा कप्तान पेटी आणि अधिकार्‍यांना घेऊन बाहेर आला. सर्व बारक्या सैनिकांना खाली पाठवून दिलं. तिथे कप्तानाने अधिकार्‍यांना खर्‍या प्रकाराची कल्पना दिली. मग पेटी उघडून मेजर मार्टिनला कोट, छोटी बॅग, लाईफ जॅकेट इ. इ. चढवून जलसमाधी देण्यात आली. त्या आधी कप्तानाने बायबल मधील ३९वं त्साम (अध्याय) वाचलं (हे स्क्रिप्ट मधे नव्हतं तरीही). नंतर ते शव सुमारे ९:३० वाजता एका स्पॅनिश कोळ्याला मिळालं.

तीन दिवसानंतर ते प्रेत स्पेन मधील ब्रिटिश नेव्हल अ‍ॅटाशेला मिळालं आणि ४ मेला ह्युएल्व्हा येथे मानवंदनेसकट दफन करण्यात आलं. दरम्यान, ब्रिटिश नौदलाचे अधिकारी, मुद्दाम, ती कागदपत्रं मिळविण्याबद्दल अ‍ॅटाशेला बिनतारी संदेश पाठवत होते. जर्मन लोक ते संदेश पकडतात हे त्यांना माहीत होतं. त्यात ते असंही ठसवत होते की स्पॅनिश लोकांना कुठलाही संशय येऊ न देता ती कागदपत्रं हस्तगत करावीत. गम्मत म्हणजे ती कागदपत्रं स्पॅनिश नौदलाकडून सुप्रीम जनरल स्टाफकडे गेली होती आणि तिथून सकृतदर्शनी ती चक्क गहाळ झाली होती. पण ब्रिटिशांनी सोडलेल्या फुसक्या संदेशांमुळे आबवेहरचे हेर सतर्क झाले आणि त्यांच्या दबावामुळे स्पॅनिश लोकांनी ती कागदपत्रं शोधली. ती संशय येणार नाही अशा पद्धतीने उघडून जर्मन लोकांना कॉपी करू दिली. त्या नंतर परत ती पूर्वीसारखी दिसतील अशा प्रकारे बंद करून अ‍ॅटाशेकडे सुपूर्त केली. त्याची नीट तपासणी केल्यावर ते पाकीट उघडलेलं होतं हे ब्रिटिशांना समजलं आणि तेव्हा अमेरिकेत असलेल्या चर्चिलला संदेश गेला 'Mincemeat Swallowed Whole'.

त्या हुलकावणीने हिटलर मात्र जाम गंडला. त्याने मुसोलिनीचा सर्व विरोध मोडित काढून असा आदेश दिला की सिसिलीवर हल्ला होणार नाही आणि झालाच तर ती हुलकावणी समजावी. बरचसं सैन्य, कुमक, बोटी, दारुगोळा इ. ग्रीसकडे हलवलं गेलं. ९ जुलैला दोस्तांनी सिसिलीवर हल्ला चढविला. तरीही दोन आठवड्यांपर्यंत जर्मन लोक मुख्य हल्ला सार्डिनिया व ग्रीस इकडेच होणार हे धरून चालले.

साहजिकच सिसिली दोस्तांनी काबीज केलं. पण ते पत्र एक जालीम हुलकावणी होती याचा इतका धसका हिटलरने घेतला की पुढे खरीखुरी पत्रं/नकाशे हातात पडले तरी ती हुलकावणीच आहे असं त्यानं गृहीत धरलं.

पुढे माँटेगने या घटनेवर 'द मॅन हू नेव्हर वॉज' अशी गोष्ट लिहीली आणि त्यावर त्याच नावाचा सिनेमा पण निघाला.

जानेवारी १९९८ मधे मेजर मार्टिनच्या ह्युएल्व्हा इथल्या थडग्यावर 'ग्लिंड्विर मायकेलने मेजर मार्टिनचं काम केलं' अशी टीप टाकण्यात आली.

पुढेही थापेबाजी बिटिशांचं एक प्रमुख अस्त्र राहीलं. त्यावर चर्चिल असं म्हणत असे.. 'सत्य इतकं अमूल्य असतं की ते सतत असत्याच्या कोंदणात लपवावं लागतं'.

तळटीपा --

(१) - ऑपरेशन मिंसमीट हा ऑपरेशन बार्कलेचा एक भाग होता. ऑपरेशन बार्कलेचं ध्येय जर्मनांना सिसिलीवर हल्ला होणार आहे हे समजू न देणं हे होतं. त्यात, पूर्व आफ्रिकेत १२ डिव्हिजन्सचं पूर्णपणे बनावट सैन्य आहे हे भासवणं, ग्रीक दुभाषांना उगीचच कामावर घेणं, बनावट संदेश पाठवणं, दुहेरांतर्फे (डबल एजंट) अफवा पसरवणं इ. इ. बरीच फसवाफसवी होती. सिसिलीवरच्या हल्ल्याला ऑपरेशन हस्की असं नाव होतं.

(२) - प्रेतातर्फे शत्रू पक्षात अफवा पसरवायची कल्पना चोल्मंडलेला इयान फ्लेमिंग (जेम्स बाँडचा लेखक) कडून मिळाली. खुद्द इयान फ्लेमिंगला ती एका रहस्य कथेतून मिळाली होती.

(३) - ट्वेन्टी कमिटीचं मुख्य काम दुहेर (डबल एजंट) सांभाळण्याचं होतं. जर्मन हेरांना पकडल्यावर त्यांना फितवून त्यांच्या तर्फे चुकीची माहिती जर्मनांना पुरविण्याचं काम किंवा डबल क्रॉसिंग ते करायचे. त्याला ट्वेन्टी म्हणण्याचं कारण डबल क्रॉस म्हणजे XX म्हणजे रोमन आकड्यांप्रमाणे ट्वेन्टी!

(४) - प्रेताबरोबर महत्वाची फसवी कागदपत्रं ठेवायची युक्ती नवीन नव्हती. ब्रिटिशांनी प्रथम ती पहिल्या महायुद्धात वापरली. नंतर, ऑगस्ट ४२ मधे उत्तर आफ्रिकेत एका जीपच्या स्फोटात मेलेल्या प्रेताजवळ सुरुंग कुठे लावले आहेत त्याचे नकाशे ठेवून रोमेलच्या सैन्याला फसवलं होतं. परत सप्टेंबर ४२ मधे एका प्रेताबरोबर सैन्य कधी उतरवणार आहेत त्याची फसवी तारीख सांगणारं पत्रं ठेवलं होतं. पण ते त्यांनी उघडलंच नाही किंवा उघडलं पण त्यांना ते काही कारणाने बनावट वाटलं.

(५) - कंबाईन्ड ऑपरेशन्स हे हवाईदल, नौदल आणि पायदळ यातील निवडक जवानांतर्फे, जर्मनांना संत्रस्त करण्यासाठी, कमांडो पद्धतीचे हल्ले करत असे.

(६) - सेंट ख्रिस्तोफर हा एक प्रसिद्ध रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होता. त्या प्रेताचे कॅथॉलिक पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत हा उद्देश ते पदक बरोबर ठेवण्यामागे होता.

(७) - गीव्हज कडून घेतलेल्या शर्टाच्या पावतीत एक बारीक चूक होती. त्या पावतीप्रमाणे तो शर्ट रोख पैसे देऊन खरेदी केला असं दिसत होतं. परंतु, गीव्हजला कुणीही अधिकारी रोख पैसे देत नसत. सुदैवाने, जर्मनांच्या ते लक्षात आलं नाही.

संदर्भ --

अ - इथे दुसर्‍या महायुद्धात दिलेल्या काही यशस्वी हुलकावण्यांबद्दल तसंच त्या का यशस्वी झाल्या त्याचं विश्लेषण वाचता येईल : http://www.au.af.mil/au/awc/awcgate/wright/wf05.pdf

ब - विकीपीडिया : http://en.wikipedia.org/wiki/Operation_Mincemeat

-- समाप्त --