Sunday, July 8, 2012

वाघोभरारी

'संकेत! इकडे ये! हे हीन अभिरुचीचे फोटो उद्या पर्यंत निघाले नाहीत तर मी स्वतः ते काढून जाळून टाकेन!'.. संध्याकाळी घरी आलेल्या शहाणे मास्तरांनी विलायती कपड्यांची होळी करणार्‍यांच्या आवेषात ठणकावलं. त्यांचा आवाज होताच तसा.. ठणठणीत! त्यांनी वाहतुकीच्या गोंगाटाच्या वरताण सूर लावला की प्रत्येक पोराला ते आपल्याच कानात ओरडताहेत असं वाटायचं!

'हीन अभिरुची काय बाबा? ते सही फोटो आहेत बरं का! एकदम फट्टाक! तुम्हाला नाही समजायचं त्यातलं! सारखी उगीच नावं ठेवता तुम्ही!'.. हा डायलॉग ऐकल्यावर लव-कुशांनी खुद्द वाल्मिकींना रामायण शिकवल्यासारखं मास्तरांना वाटलं.

'तू ही... ही जी अर्ध्या मुर्ध्या कपड्यातल्या बायकांची चित्रं लावली आहेत ना?.. त्याला हीन अभिरुची म्हणतात.. देहाचं हिडिस प्रदर्शन म्हणतात.. सौंदर्याची जाण नाही! कोणीतरी मूर्ख ढुढ्ढाचार्य उठतो.. नग्ननेत सौंदर्य आहे म्हणतो.. झापडं काढून बघायला हवं म्हणतो.. मग तुझ्यासारखे अर्धशिक्षित अपरिपक्व बाजीराव ओढतात त्याची री! त्यापेक्षा जरा स्वतःकडे झापडं काढून बघा! गलिच्छपणाची किळसवाणी जाणीव होईल'.. मास्तर हात नाचवत परत एकदा ठणठणले.. शिकवताना हातातली छडी नाचवायचे, एरवी नुसता हातच!

'तसं काही नाही हां! लतिका सुंदरच आहे.. एकदम सामान! एलपीडी मधे काय फुल्टु सुंदर दिसते ती! आई शप्पत!'.. भिंतीवरच्या फोटोंकडे बघत संकेतने कुकरची शिट्टी वाजल्यासारखा सुस्कारा सोडला.

'एलपीडी? म्हणजे काय?'.. कॅल्सी, समस, गबोल, धतिंग.. असली नवीन पीढीची संक्षिप्त विक्षिप्त रुपं ऐकली की मास्तरांना गटारात पडल्यासारखं गलिच्छ वाटायचं.

'लिंगाणा पे धिंगाणा! लतिकाचा नवीन पिक्चर आहे'

'शाब्बास! नावातच धिंगाणा! मग प्रत्यक्षात बघायलाच नको!'

'बाबा! त्यात काही धिंगाणा वगैरे काय नाहीये हां! एकदम टचिंग पिक्चर आहे तो! लतिकेचं काम काय सही झालंय! डोळ्यातून पाणी काढते ती अगदी!'

'ती? पाणी काढते?'.. मास्तर खवचटपणे हसले.. 'कपडे काढण्याशिवाय काही येतं का हल्लीच्या नट्यांना? हे सगळे फोटो लतिकेचेच का?'

'हो! उद्या सकाळी इथे येणार आहे ती शूटिंगला! लॉ कॉलेजच्या टेकडीवर! मी जाणार आहे बघायला'.. संकेतनं घुश्शात बापाकडे नीट निरखून पाहीलं. काळा वर्ण, पोट सुटलेलं, डोक्यावर मधोमध टक्कल, काळसर पांढर्‍या झालेल्या मिशा, कानातून केस बाहेर आलेले, अंगात इस्त्री न केलेले साधे कपडे, गबाळी पँट, न खोचलेला शर्ट.. काय पण अवतार? श्या! आपला बाप लतिकेच्या शेजारी कसा दिसेल?.. सुंदर पैलू पाडलेल्या हिर्‍याच्या नाजूक दागिन्यापाशी ठेवलेल्या लोखंडाच्या गंजलेल्या पत्र्यासारखा?

'अजिबात जायचं नाही! तू गेला नाहीस तर ती काही शूटिंग रद्द वगैरे करणार नाहीये. फॅनगिरी करायचं सोड रे! ती तुला तिची गाडी धुवायला देखील ठेवणार नाही हे लक्षात घे. लाळ घोटत नुसता मागे फिरू नकोस! त्यापेक्षा पोटापाण्याचं बघ.. अभ्यास कर, नाव कमव जरा! थोडं फार कर्तृत्व दाखवायचं बघ!'

'बाबा पण नुसतं शूटिंग बघायला जाणं म्हणजे लाळ घोटत मागे फिरणं होतं का? तुम्ही कधी बघितलंय का शूटिंग? काहीतरीच बोलायचं उगाच!'.. 'हीन अभिरुची' नामक शिखंडीच्या आडून झालेल्या अभ्यास रुपी बाणांच्या हल्ल्याकडे त्यानं तत्परतेने दुर्लक्ष केलं. पण शैक्षणिक कुबड्या अजून निघालेल्या नसल्यामुळे संकेतला पडतं घेणं अपरिहार्य होतं.

'आणि मी ते फोटो काढून टाकेन ना!'

'बरं! ठीक आहे. फोटो आजच निघाले पाहीजेत. या घरात तिला स्थान नाही. आणि शूटिंग संपल्यावर लगेच घरी ये. उगीच घोटाळत बसू नकोस.. समजलं?'.. मास्तरांना फारसं भांडण न होता ते किळसवाणे फोटो काढायला लावल्याचा आनंद झाला. आईविना वाढणार्‍या पोराला वळण लावायच्या अनेक आडवळणातलं एक अवघड वळण होतं ते!

------***-----------***---------
'मॅडम, पिरंगुट मधे संचारबंदी का केली आहे?'.. रवी सोनार या 'दैनिक भुंगा' च्या वार्ताहरानं एक भुंगा पोलीस उपनिरीक्षक रंजना जाधव यांच्या समोर सोडला.

'अतिरेकी फरार आहेत म्हणून जाहीर केलंय ना सकाळीच! परत परत तेच तेच विचारू नका हो, मला वेळ नाहीये अजिबात'.. मॅडमनी त्याला झटकला.

'मॅडम! एक वाघीण अतिरेकी कधी पासून झाली?'.. मॅडम चपापल्या. या सोनाराचे कान कुणी फुंकले?

'पिरंगुटात कुठली वाघीण?'.. मॅडमनी एक चाचपणी वजा प्रश्न टाकला.

'मॅडम! उगा वेड पांघरून पेडगावला जाऊ नका! तुम्हाला माहितीये मी काय म्हणतोय ते.'

'हम्म्म! तुम्हाला काय समजलंय ते आधी सांगा'

'हेच की ती वाघीण डॉ. तालेवार यांनी लहानपणापासून पाळलेली आहे.. किंवा होती म्हणू फार तर! तिचं नाव राणी आहे! तिला ते कात्रज उद्यानात देण्यासाठी सोमवारी रात्री व्हॅन मधून घेऊन चालले असताना त्यांच्या वर चोरीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला झाला.. पिरंगुटात! लुटारूंनी व्हॅनचं मागचं दार उघडल्यावर राणी त्यांच्यावर झेपावली. त्यात एक लुटारू मेला. बाकीचे फरार झाले. हे असं काहीतरी घडलंय ना?'

'हो. ज्या वाघिणीने २ माणसांचे बळी घेतले ती अतिरेकीच म्हणायला नको का?'

'अहो २ कुठले? एकच फार फार तर! डॉक्टरांचा मृत्यू चोरांच्या हल्ल्यामुळे झाला. राणी कशी मारेल आपल्याच मालकाला? अंगावर उडी पडल्यामुळे एक मेला असेल आणि तिच्या अंगाला रक्त लागलं असेल! बाकीचे लुटारू पळून गेल्यावर ती मालकाला चाटत उभी असेल किंवा जवळ उभी असेल. ते पाहिल्यावर कुणाचाही गैरसमज होईलच ना?'

'हम्म! हे पहा सोनार! तुम्हाला जे काही समजलंय ते आत्ता कृपया तुमच्या पुरतंच ठेवा. मला लोक उगीच घाबरून जायला नको आहेत!'

'ते ठीक आहे! पण अतिरेकी फरार असं सांगितल्यावर लोक जास्तच घाबरले असतील ना?'

'त्याला कारणं आहेत सोनार! सगळं कसं मी पब्लिकला सांगणार? दुपारीच अँटीटेरर स्क्वॅड कडून सतर्क रहाण्याची सूचना आली आहे. समजा, वाघ हे डायव्हर्जन असलं तर? कुणाला माहिती? तेव्हा ते तुमच्या पुरतंच ठेवा! आम्हाला आमच्या प्रोसिजर प्रमाणे जाउ द्या! ओके?'

सोनार ओके म्हणाला पण त्याला काही ते पटलेलं नव्हतं. पोलिसांचं काम म्हणजे चोराने जिचं मंगळसूत्र मारलंय तिलाच काळजी घेतली नाही म्हणून झापण्यातला प्रकार असतो असं सोनाराचं ठाम मत होतं.

------***-----------***---------
नटी आणि नकटी हे केवळ एका अक्षराचं अंतर असलेले दोन शब्द लतिकाचं वर्णन करायला पुरेसे होते. तिच्या नकटेपणाचं व्यंग्य विविध अंगप्रत्यंग-दर्शनामुळे झाकलं जातं असं काही सौंदर्य मिमांसकांचं मत होतं!

शूटिंग पहाणार्‍यांच्या प्रचंड गर्दीत संकेत व त्याच्या मित्रांना जेमतेम उभं रहायची जागा मिळाली, ती पण लांबच!

'कुठल्या पिच्चरचं शूटिंग आहे रे?'

'काय घेणं आहे? आपल्याला फक्त लतिकेशी घेणं आहे.'.. संकेतचा फंडा क्लिअर होता.

'वाघिणीचं साहस, नामक एका झ दर्जाचा गल्लाभरू सिनेमा आहे म्हणे'.. सामान्यत: सगळेच सिनेमे गल्ला भरायलाच बनवलेले असतात तरी फक्त अत्यंत टुकार सिनेमांसाठी गल्लाभरू हे विशेषण का राखीव असतं कुणास ठाऊक!

'जंगलातल्या खडतर जीवनाच्या व संकटांच्या कात्रीत सापडलेल्या असहाय तरुणीची ती कहाणी आहे, असं सकाळ मधे आलं होतं!'

'म्हणजे अधिकृतपणे चोळ्या चिंचोळ्या करून सेन्सॉरची कात्री बोथट करायची पळवाट!'

लतिका हे तिचं पडद्यावरचं नाव, खरं नाव गंगा येडेकर! लाखो तरुणांना येडं करून तिनं आपलं नाव सार्थ केलं होतं. तिला प्राण्यांची फार भीती वाटायची. कुठलाही प्राणी समोर आला तरी तिचे प्राण कंठाशी यायचे. असं असलं तरी या चित्रपटात अभिनयाला प्रचंड वाव आहे हे ठसवलं गेल्यामुळे जराशा अनिच्छेने ती काम करायला तयार झाली होती. 'सौंदर्याचा फसफसता सोडा', 'धगधगत्या ज्वानीचा जल्लोष' असल्या विशेषणांनी गाजणार्‍या तिच्या कारकिर्दीत एखादा फिल्मफेअर अ‍ॅवार्ड सारखा मानाचा तुरा खोवून तिला लब्धप्रतिष्ठीत टीकाकारांची तोंडं बंद करायची होती. म्हणूनच, जिवंत वाघीणी बरोबर चित्रीकरण करायला तिनं एक व्यावसायिक धर्मसंकट समजून कशीबशी मान्यता दिली होती.

डायरेक्टरने लतिकेला सीन समजावून दिला.. 'तू आणि ही वाघीण जंगलात बरोबरीने वाढलेल्या आहात. तिचं नाव 'बिंदी'! तुमची घनिष्ट मैत्री आहे. तू त्या गुहेतून तिला हाका मारत, शोधल्यासारखं करत यायचं, या झाडापर्यंत! या झाडाखाली ती लोळत पडलेली दिसेल!'.. तिच्या चेहर्‍यावरची काळजी पाहून डायरेक्टर म्हणाला.. 'घाबरू नकोस! या सीन मधे वाघीणीला हलायचं काम नाहीये म्हणून खर्‍या वाघीणीसारखं दिसणारं सॉफ्ट टॉय ठेवलंय. तर तू तिकडून आलीस की तिला कुरवाळून तिच्या पोटावर डोकं ठेवून, लोळत लोळत तिच्याशी गप्पा मारायच्या! समजलं?'

जंगल सुंदरी साकारायची असल्यामुळे सौंदर्य प्रसाधनांवर बंदी होती.. ते तिला रॅकेट शिवाय बॅडमिंटन खेळल्यासारखं वाटत होतं! तरीही कोरलेल्या भुवया व इतर अनावश्यक केसांची केलेली दाढी जाणकारांच्या नजरेतून सुटत नव्हती. केसातल्या भरगच्च फुलांमुळे तिनं डोक्यात फुलं घातलियेत की फुलात डोकं ते समजत नव्हतं!

'ठीके! लतिका तू गुहेत जा बरं! रिहर्सल करू या!'.. डायरेक्टर ओरडला आणि रिहर्सल सुरू झाली. लतिका बाहेर येऊन फारच लचकत मुरडत चालायला लागली.

'लतिका! तू कॅटवॉक वरून चाललेली नाहीयेस!'

'आssss! ओ माय गॉड! डायरेक्टssर! हे खडे आहेत की खिळे?'

'मग जंगलात काय लुसलुशीत गालिचा असणारे?'.. तिच्या चेहर्‍यावरचा वेदनांचा ट्रॅफिक जॅम पाहून डायरेक्टरने तिला सीनची आठवण करून दिली.

'अगदी गालिचा नको, पण दुसरं काही तरी बघाना! चप्पल घालू का?'

'बरं घाल!'.. नंतर लतिकेच्या उंच टाचाच्या चपला पाहून डायरेक्टर खडूसपणे म्हणाला.. 'नशीब माझं! मनगटावर घड्याळ आणि हातात पर्स नाचवत नाही आलीस त्या बद्दल!'..

'मला बसणारी साधी चप्पल नाहीये इथे!'.. त्यामुळे लतिकेचं चालणं स्लो मोशन ब्रेक डान्स वाटत होता.

चित्रीकरणासाठी लतिकेला गुहेत गेली नि दिग्दर्शक 'कॅमेरा, अ‍ॅक्शन' असं ओरडताच कॅमेरा बसलेल्या वाघिणीवर फिरून हळूहळू गुहेकडे वळता वळता मधेच एक वाघ चालत येताना दिसला.. ती राणी होती पण ते कुणालाच माहीत नव्हतं. कॅमेरामन हडबडला. कॅमेर्‍यातलं चित्र थरथरायला लागलं.. शूटिंगचा वाघ आत्ता अपेक्षित नव्हता.. बरोबर कुणी माणूस दिसत नव्हता.. शिवाय त्याचं तोंड रक्तानं माखलेलं दिसत होतं. जिवंत वाघासमोर उभं रहायला एक तर वाघाची किंवा रिंगमास्तरची तरी छाती पाहीजे. कॅमेरामनने जोरात ओरडायचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून ब्र सुद्धा आलं नाही. त्याने वाघाच्या दिशेने हातवारे केले व पळत सुटला.. पळता पळता त्याने राणीच्या डोळ्यात धूळ फेकायला खोटी वाघीण पाठीवर घेतली.. सगळेच भेदरून पळायला लागल्यामुळे पडापडी, धक्काबु़क्की व चेंगराचेंगरीला ऊत आला. प्रत्येकालाच आपला जीव प्यारा मग लतिकाला कोण विचारतो?

राणीला कुणाच्याही मागे पळायचं नव्हतं, ती बसायची जागा शोधत होती. नेमकी तिला खोट्या वाघाची जागाच सापडली. गुहेतल्या लतिकेला आरडाओरडा ऐकू आला पण तिला तो शूटिंग पहायला आलेल्या गर्दीचा वाटला. ती लचकत-मुरडत बाहेर आली, लाडिक बोलत बोलत वाघापाशी येऊन आरामात बसणार तोच तिला खरीखुरी डरकाळी ऐकू आली. एकदम तिच्या अंगातून एक विद्युत लहर गेल्याचं जाणवलं. जीवघेणी किंकाळी फोडायला तिनं तोंड उघडलं पण तो खोटा वाघ आहे हे आठवल्यावर तिनं एक आवंढा गिळून घशाची कोरड शमवायचा प्रयत्न केला. मग तिला त्या इफेक्टचं कौतुक वाटलं. निर्धास्त होऊन ती आणखी पुढे होताच राणी उडी घेऊन तिथून पसार झाली.. तिला अचानक कुणी तरी भॉक केल्यासारखं झालं! ती घाबरून फटकन दोन पावलं मागे सरली आणि दगडाला अडखळून पडली.. थोडं फार खरचटलं. जिवाच्या भीतीने पटकन उठली व नखशिखांत थरथरत ती विरुद्ध दिशेला पळू लागली. पळता पळता नको त्या भानगडीत पडल्याबद्दल हातवारे करत स्वतःला शिव्या घालत होती. जरी वाघ बघितलेला होता तरी तिचा चेहरा भूत बघितल्यासारखा झाला होता!

पळणार्‍यातली काही माणसं आता लॉ कॉलेज रस्त्यावर आली.. रस्ता नेहमी प्रमाणेच तुंबलेल्या गटारासारखा गच्च भरलेला होता. पळणार्‍या माणसांना बघून दुकानदारांनी फटाफट शटरं बंद केली. पण वाघानं धरलेल्या माणसाला पाहून ही दंगल नसून भुताखेताचा प्रकार आहे असं वाटलं.. मग मात्र मधमाशांच्या अनेक पोळ्यांवर दगड मारल्यासारखा हलकल्लोळ झाला. लोक दिसेल त्या बिल्डिंगमधे घुसायला लागले.. बिल्डिंगांची दारं फटाफट बंद व्हायला लागली.. सर्व रस्ते तुंबले. वहानं एकमेकात गुंतून पडली. कर्कश्य हॉर्न मारणे, इंचभर जागा दिसलीच तर त्यात गाडी घालून बोळा घट्ट करणे, खिडकीतून हातवारे करून दुसर्‍याला उपदेश करणे असे नेहमीचे प्रकार चालू होतेच. मग खेचाखेच, चिरडाचिरडी, धक्काबुक्की सर्व काही आलंच! आंधळे भिकारी डोळस झाले, पांगळे भिकारी मॅरॅथॉन पळायला लागले. सिग्नल नुसते लागून जात होते वहानं तिथल्या तिथेच होती. असल्या गर्दीपुढे मारुतीला घाम आल्याच्या वेळची गर्दी काहीच नव्हती. या गोंधळात मिडीयाचे लोक 'आपको कैसा लग रहा है?' अशी विचारपूस करत होते. याच मिडीयातल्या एखाद्याचं कधी चुकून तंगडं बिंगडं मोडलं तर हाच प्रश्न निर्विकारपणे विचारून बघितला पाहीजे!

------***-----------***---------
'आँ! वाघ म्हणजे काय मांजर आहे का घेऊन पळायला? ते १५० किलोचं धूड असतं महाराजा!'.. फोनवर बातमी ऐकून जाधव मॅडमांचा स्वतःच्या कानावर विश्वास बसेना.. नंतर टीव्हीवर पाहून डोळ्यावरही!

'मॅडम, वाघाचं कातडं अंगावर घेऊन पळणारा माणूस अतिरेकी तर नसेल ना?'.. एका इन्स्पेक्टराने अतिरेक केला.

'हम्म्म! असं पण असू शकेल नाही का?'.. मॅडमनी मिनीट भर विचार करून लगोलग हुकूम सोडले.. 'लॉ कॉलेज रस्ता, विद्यापीठ रस्ता, सेनापती बापट रस्ता आणि टेकड्यांच्या बाजूच्या सर्व रस्त्यांची नाकेबंदी करा. ताबडतोब. कुणाला जाऊ देऊ नका. कुठल्याही वाघाला बाँब वगैरे लावलेले आहेत का ते बघा.'

'मॅडम! आज बरेचसे पोलीस शूटिंगच्या कामाला लावलेत.'

'तिथे आता कसला बंदोबस्त करणार ते? एक माणूस शिल्लक नाही तिथे! ते पोलिस पण कामाला लावा. शिवाय होमगार्ड, राखीव पोलीस दल अशा सगळ्यांची मदत घ्या.'

मागून पळत येणारी राणी आता लॉ कॉलेज रस्त्यावर आली.. इतका गोंगाट ऐकून ती बावचळली.. माणसांची सवय असली तरी इतक्या गोंगाटाची नव्हती. मग ती पण बुजली व वाघ पाठीमागे लागल्यासारखी सैरावैरा धावायला लागली (कधी मराठी भाषा तोकडी पडते ती अशी!).. तिला बघताच सायकलवाले, स्कूटरवाले आपली वहानं तिथेच टाकून पळत सुटले.. चारचाकीवाले काचा वरती करून मान खाली घालून टेन्शन मधे फोन फिरवू लागले. पण फोन करण्याचं प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे पूर्ण नेटवर्क फापललं.

'आता हा तिसरा वाघ कुठून आला?'.. वायरलेसवर बातमी ऐकल्यावर मॅडमना आपण नक्की पुण्यात आहोत की अ‍ॅमेझॉनच्या जंगलात असा प्रश्न पडला.

'मॅडम! कात्रज उद्यानातून एखादा वाघ सुटला आहे का त्याची चौकशी करतो.'

'अहो! कात्रज मधले मरतुकडे वाघ लॉ कॉलेज पर्यंत चालत जाणं शक्य आहे का? त्यापेक्षा असं करा वाघाला दिसताक्षणी गोळ्या घालायचे आदेश द्या. तो नरभक्षक वाघ आहे हे लक्षात घ्या! त्यानं आणखी माणसं मारली तर काय तोंड दाखवणार आपण? आणि आसपासच्या झोपडपट्ट्यातली माणसं हलवा. आणि अतिरेक्यांबद्दल पण सतर्क रहा.'

मिडीयाचं तोंड धरलं तरी आधुनिक मिडीयाचा कीबोर्ड धरता येत नाही हे मागासलेल्या पोलिसांच्या लक्षात आलं नाही! मोकाट वाघ नरभक्षक असल्याची बातमी फोन, एसेमेस, फेसबुक, ट्विटर इ. किलर माध्यमातून प्रकाशलहरींच्या वेगाने पसरली. त्यांना गोळ्या घालू नयेत म्हणून फेसबुकावर तर 'सेव्ह पुने टायगर्स' असली पानं पण निघाली. दुपार पर्यंत त्या बातमीचा अनेक वाघ मोकाट सुटलेले असून आत्तापर्यंत अनेक माणसांचा बळी गेलेले आहेत असा ब्रह्मराक्षस झाला.

------***-----------***---------
टेकड्यांकडे जाणार्‍या येणार्‍या रस्त्यांवर माणसांचा महापूर आहे म्हंटल्यावर सर्व बागांपाशी तळ ठोकलेल्या तमाम वडापाववाल्यांनी, चहावाल्यांनी, भेळ/पाणीपुरीवाल्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. त्या रस्त्यांवर रहाणार्‍या लोकांनी आपल्या गच्च्या १० मिनिटाला १०० रु. भाड्याने देऊन वाहत्या गंगेत हात धुवून घेतला. कोण म्हणतो मराठी माणसाला बिझनेस कळत नाही म्हणून?

मास्तरांना वाघाची बातमी शाळेत समजल्या समजल्या संकेतची काळजी लागली.. त्यांनी पटकन त्याचा मोबाईल नंबर फिरवला.. नेटवर्क जॅममुळे तो लागला नाही.. लागला असता तरी त्यानं उचलला नसता. कारण तो पळत असताना कुठेतरी पडला होता. पोलिसांचाही नंबर लागत नाही म्हंटल्यावर मास्तरांना स्वतःच पावलं उचलण्याशिवाय पर्याय नव्हता.

------***-----------***---------
सर्कशीतला वाघ घेऊन एक रिंगमास्टर आणि ड्रायव्हर शूटिंगसाठी निघालेले असताना नुकत्याच बंद झालेल्या रस्त्यांमुळे चतु:शृंगी जवळ अडकले. अचानक बंद झालेले रस्ते व गस्त घालणारे पोलिस बघून त्यांना एखाद्या छटाक आमदार खासदाराची सदिच्छा भेट असेल असं वाटलं. घुसाघुशीचा प्रयत्न चालू असताना पोलिसांनी ती गाडी हेरली. आज अतिरेकी 'लायसन' मिळालेलं.. त्यात आपापली फॅमिली सोडून एका खिडुक मंत्र्याच्या फॅमिलीची तैनात केलेली.. यामुळे पोलीसांच्या वर्दीच्या गुर्मीला उकळी फुटली.

'गाडीत काय आहे?'.. गाडीवर दंडुका आपटत एक हवालदार गुरकला.

'राजा हे सायेब! म्हंजे वाघ हे सायेब! राजा नाव हे त्येचं!'.. वाघाचा उल्लेख ऐकून पोलीसांनी एकमेकांकडे बघून डोळे मारले.

'तुझ्या बापाने कधी वाघ नेला होता का रे गाडीतून भोxxxx?'.. परत जोरात दंडुका!

'नाही सायेब, म्हंजे हो सायेब! बरेचदा नेलाय! सर्कशीत कामाला हे सायेब! खरंच वाघ हे! त्ये दांडकं मारू नका सायेब तो खवळंल!'

'उघड गाडी तुझ्या माxxx'

'आय शप्पत सांगतो सायेब, खरं वाघ हे'

'आता उघडतो का आत टाकू रे xxx'.. नाईलाजाने गाडीच्या दाराचं कुलूप काढून ड्रायव्हर बाजूला झाला.. पोलीसांनी अति उत्साहानं दार उघडल्यावर व्हायचं तेच झालं. अंगावर उडी पडल्यामुळे एक हवालदाराची गुर्मी जागीच गारद झाली.. बाकीचे हवालदार हवालदील झाले.

चौथ्या वाघाची बातमी आल्यावर मॅडमना अतिरेकी परवडले पण वाघ नको असं झालं..'आरे इतक्या वर्षात एक पण वाघ सुटला नाही. आता एकाच दिवशी एकदम चार चार? वाघांची साथबिथ आलीये काय?'

'आता घरी कोचावर चहा पीत बसलेला एखादा वाघ दिसला नाही म्हणजे मिळवली'.. मॅडम स्वतःशीच पुटपुटल्या.

मॅडम पुढे दरम्यान दोन समस्या उभ्या राहील्या. झोपड्यातल्या लोकांना हलवायची मोहीम सुरू करताच अनेक राजकीय पक्षांना अचानक झोपडपट्टीवासियांबद्दल सहानुभूती निर्माण झाली. त्यांनी वाघांचा सुळसुळाट नसलेल्या भागातल्या रस्त्यांवर बसकण मारून धरणं धरलं.. नक्राश्रू ढाळले.. वाघ आल्याची अफवा पसरवून गरिबांना बेघरं करायचा व त्यांना रस्त्यावर आणायचा काळा कावा आहे अशी बोंबाबोंब केली.

पोलिसांचा वाघांना गोळ्या घालायचा प्लॅन प्राणी मित्रांच्या संघटनांना समजल्यावर त्यांनी ही आवाज उठवला. जंगलांची बेसुमार तोड झाल्यावर गरीब वाघांना शहराकडे फिरकण्याशिवाय काय पर्याय रहाणार असा खडा सवाल त्यांनी केला. तसंच हे वाघ मारले तर वाघ हा प्राणी भारतातून नामशेष होईल असा निर्वाणीचा इशारा दिला. मग नाईलाजाने मॅडमनी गुंगीचं औषध लावलेले बाण मारायचा हुकूम सोडला.

------***-----------***---------
मास्तरांचे शूटिंगच्या जागी जायचे सर्व प्रयत्न रस्ते बंद असल्यामुळे असफल झाले. गस्तीवरचे पोलिस त्यांना 'तुम्ही कसली काळजी करू नका! आम्ही सगळ्यांना वाचवायचे आटोकाट प्रयत्न करू' या फुसक्या आश्वासना पलिकडे काही दाद लागू देत नव्हते. त्यांना कुणाचीही मदत मिळेना. शेवटी ते नजर चुकवून पाषाण रस्त्याच्या बाजूने टेकडी चढायला लागले.. सवय नसल्यामुळे जबरी धाप लागली.. झाडाची एक पडलेली छोटी फांदी उचलून तिच्या आधाराने ते कसे बसे टेकडी चढले.. मग हाशहुश करत टकलावरचा घाम पुसत ते लॉ कॉलेज टेकडीकडे निघाले. बराच वेळ चालल्यावर त्यांना संकेत पळताना दिसला. 'संकेत! संकेत!' त्यांनी जिवाच्या आकांताने हाका मारल्या.

'बाबा! पळा! वाघ!'.. पळता पळता संकेत कसाबसा ओरडला. पण मागून उड्या मारत येणार्‍या फुलांच्या गुच्छाला तो वाघ का म्हणतोय ते मास्तरांना कळेना. गुच्छ आणखी जवळ आल्यावर ती जेमतेम कपड्यातली एक आदिवासी मुलगी आहे असा साक्षात्कार झाला.

'अरे वाघ नाहीये, कुणी आदिवासी दिसतेय बिचारी!'.. मास्तर ओरडले. राजकपूरच्या सिनेमातून मिळालेलं आदिवासींचं ज्ञान असं बाहेर आलं. शिवाय त्यांचं लक्ष उंच टाचांचे बूट कोरलेल्या भुवया इ. कडे गेलं नाही. 'वाचवा! वाचवा!'.. मुलीने त्यांना येऊन मिठी मारल्यावर लक्ष जाणं शक्य पण नव्हतं.

'घाबरू नकोस मुली! घाबरू नकोस! मी तुझ्या पाठीशी आहे! नाव काय तुझं?'

'ल ति का'.. बेफाट दम लागलेल्यामुळे कसंबसं उत्तर बाहेर आलं.

'अरे वा! आदिवासी असलीस तरी नाव आधुनिक आहे एकदम!'.. बोलता बोलता त्यांना मागून पळत येणारा सर्कशीतला वाघ दिसला. राजाला बघून मास्तर किंचाळले, त्यांचा स्वतःवरचा ताबा पूर्ण सुटला.. ते भ्रमिष्टासारखे अचानक म्हणाले.. 'पळतोस कुठे? इकडे ये आणि अंगठे धरून उभा रहा' आणि हातातली काठी जवळच्या एका जागेवर आपटली. राजा त्या ठिकाणी मुकाटपणे जाऊन बसला. कधी नव्हे ते कुणी तरी पटकन ऐकल्यामुळे मास्तरांचा आत्मविश्वास थोडा वाढला.

'अरे राजा! बोल! आज तू गणवेष का नाही घातलास? उघडं नागडं फिरायला लाज नाही वाटली?' .. नावाने हाक मारल्यामुळे राजा वाघ त्यांच्याकडे आपुलकीनं पाहून गुरगुरला. त्यांना इतकंच जाणवलं की काही तरी सतत त्याच्याशी बोलत रहायला पाहीजे.. मग त्यांनी फर्मावलं.. 'हां! माझ्या बरोबरीने प्रतिज्ञा म्हण आता...
भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे।'

मास्तर छडी वाघासमोर नाचवत होते आणि थंडपणे गुरगुरत राजा पंजाने बाजूला करत होता. 'गाढवा, मी तुला सांगतेय भिंतीला नाही'.

मास्तरांनी वाघाला पण गाढव ठरविण्याचा अद्भुत प्रकार लतिका डोळे विस्फारून पहात होती. तिच्या मनात अनेक विचार सुरू होते.. 'माझ्या कुठल्याही हिरोने असलं भारी शौर्य दाखवलं असतं काय? शक्यच नाही! काय धाडस आहे या माणसाचं? प्रत्यक्ष वाघाला शाळेतल्या पोरासारखं वागवतोय! इथे माझ्यावर जीव ओवाळून टाकायला लाखो तरूण तयार आहेत आणि हा मला ओळखत पण नाही?'

तत्क्षणी ती वाघाचा पार ससा करणार्‍या मास्तरांच्या प्रेमात पडली. तिने आपली मिठी अजूनच घट्ट केली.

तिकडे संकेतचेही डोळे विस्फारलेले होते.. कारण गंजलेल्या पत्र्याने काखोटीला मारलेला हिर्‍याचा दागिना! आणि तो फक्त एका काठीने वाघाला नमवत होता! संकेतला बापाच्या कर्तृत्वाची जाणीव होऊन प्रथमच आदर वगैरे वाटायला लागला. मधेच मास्तर संकेत कडे बघून ओरडले.. 'अरे! मी इथे वाघाचे खेळ करणारा वाटलो का तुला? शुंभासारखा बघत उभा राहू नकोस. पळ आधी आणि मदत घेऊन ये लवकर!'

त्याच वेळी राणी तिथे पळत पळत आली. मास्तरांनी तिच्याशी पण बोलायला सुरुवात केली.. 'तू कुठे उंडारत होतास? चल बस इकडे!'.. राणीला बर्‍याचे वेळाने आपल्याशी कुणी तरी बोलल्याचा आनंद झाला. ती पटकन मास्तरांच्या जवळ आली आणि मागच्या पायावर उभी राहून मास्तरांना चाटायला लागली. ती जवळ आल्यावर मास्तरांची हवा टाईट झाली होती खरी पण ते पाय जमिनीला शिवल्यासारखे जागच्या जागीच उभे राहीले.

------***-----------***---------
कॅमेरामनला आपण अंगावर उगीचच ओझं घेऊन पळतोय अशी जाणीव झाली. मग त्यानं ते धूड लॉ कॉलेज रस्त्यावरच्या गल्लीतल्या एका चारचाकीवर ठेवलं आणि पळून गेला. लोकांना गाडीवर वाघ दिसल्याची खबर आल्यावर पोलिस तिथे आले. त्यांनी सावकाशपणे वाघाला जाग येऊ न देता बाण मारून त्याला बेशुद्ध केलं. मग थोड्या वेळानंतर काही हालचाल दिसत नाही म्हणून हळूच, घाबरत घाबरत त्याच्या जवळ जाऊन त्याला हलवलं. तो खेळण्यातला वाघ आहे हे पाहून त्यांचे चेहरे पडले. पण मग सतर्कता दाखवायला उगीचच त्यांनी वाघ ठेवलेल्या चारचाकीची झडती घेतली.. आणि काय आश्चर्य? त्यात काही बाँब सापडले.

------***-----------***---------
संकेतने बोलावून आणल्यानंतर पोलीसांनी शिताफीने राजा व राणीला बेशुद्ध करून त्यांची सुटका केली. पोलिसांच्या पाठोपाठ आलेल्या मिडियाने मास्तरांचे, मिठी मारलेल्या लतिकेसकट, हजारो फोटो काढले. मास्तर मुलाखतीत म्हणाले.. 'प्राणी मुलांसारखेच निरागस असले तरी दोघांनाही वठणीवर आणायला छडीच लागते.'

'थॅक्यू हं! आज तुम्ही नसता तर मला वाघानं फाडून खाल्लं असतं! तुम्ही फारच असामान्य आहात! तुमचे आभार कसे मानावेत ते समजत नाहीये मला!'.. सगळं स्थिरस्थावर झाल्यावर लतिका उद्गारली.

'अहो, मी एक साधासुधा सामान्य माणूस आहे'

'छे हो! असामान्य माणूस सामान्यच असतो पण असामान्य प्रसंगात असामान्य धैर्य दाखवतो!'.. लतिकेला कुठल्या तरी पिक्चरचा डायलॉग आठवला.

'अहो कुणीही हेच केलं असतं! पण मला माफ करा हं! मी तुम्हाला आदिवासी मुलगी समजलो.'.. मास्तर ओशाळवाणं हसत म्हणाले.

'कुणीही हे केलं नसतं हो! आमच्या यूनिटचेच लोक बघा ना! सगळे पाय लावून पळून गेले. तुम्ही खरंच खूप शूर धाडशी आहात. मी तुमची फॅन झालेय, आता तुम्हीच माझे हीरो'

'आँ! हीs, हीs, हीs रो?'.. जे दोन वाघांना जमलं नाही ते लतिकेच्या एका डायलॉगात झालं.. मास्तरांना भीतीने कंप सुटला.

नंतरच्या काही दिवसात बर्‍याच घटना घडल्या.....

अतिरेक्यांचा डाव उधळून लावल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक रंजना जाधव यांची सगळ्यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली. त्यांना महानिरीक्षक म्हणून बढती मिळाली.

आपल्या वाघाला नमवल्यामुळे भारावलेल्या सर्कशीच्या मालकाने मास्तरांना रिंगमास्तरच्या जॉबची ऑफर दिली. लतिकेने फक्त मास्तरांशीच लग्न करण्याचं जाहीर केलं आणि पिंजर्‍याचा रिमेक झाला.

'संकेत! इकडे ये! हे काय हीन अभिरुचीचे फोटो लावलेत?'.. संकेतच्या खोलीच्या भिंतीवर मास्तरांची नेहमी प्रमाणे नजर गेली.

'हीन अभिरुची काय बाबा? ते सही फोटो आहेत बरं का! नीट बघा जरा!'.. आपल्याच मिठीतल्या लतिकेचे फोटो पाहून त्यांना आता पोरापुढे काय डोंबल आदर्श ठेवणार असं झालं!

'बाबा! जाळून टाकू?'.. संकेतच्या मिष्किलपणामुळे मास्तरांना त्याच्या कानाखाली एक आवाज काढावासा वाटला.. 'बाबा! पण तिला या घरात प्रवेश नाही असं तुम्ही ठणकावलं होत ना?'

'अरे! तिला कुठे या घरात आणणार आहे मी? मीच तिच्या घरात जाणार आहे.'

मास्तरांना तिनं येडं केलं.. आणि मास्तरांच्या दुसर्‍या लग्नाची पहिली गोष्ट सुरू झाली.. लवकरच ती येडेकर-शहाणे झाली.. मास्तर आपल्या 'शहाणे करुनि सोडावे सकळ जन' या व्यवसाय धर्माला जागले.

=== समाप्त ===