Friday, October 16, 2020

महाराजाची विहीर

इंग्लंड मधील काही भू-प्रदेशांना उत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्यानं नटलेले भू-प्रदेश ( Area of Oustanding Natural Beauty) असा दर्जा इथल्या सरकारने दिलेला आहे. ऑक्सफर्डच्या जवळ असे दोन भू-प्रदेश आहेत.. कॉट्सवोल्ड आणि चिल्टर्न! छोटे छोटे हिरवेगार डोंगर, हिरव्या रंगाच्या विविध छटांची झाडं, मधेच वहाणारी एखादी नदी आणि रमणीय शेतं या नेहमीच्याच गोष्टी विविध बाजुंनी वेगवेगळ्या कोनांमधून इतक्या विलोभनीय दिसतात की तिथून हलावसं वाटत नाही. दोन्ही प्रदेशात बरीच छोटी छोटी सुंदर गावं वसलेली आहेत. मी त्यातल्याच चिल्टर्न भागातील हेंली-ऑन-थेम्स या थेम्स नदीवर वसलेल्या गावाला भेट द्यायला जायचं ठरवलं. ऑक्सफर्ड पासून हे केवळ 25 मैलांवर ( 40 किमी) असल्यामुळे जायला फार वेळ लागणार नव्हता. मार्गी लागल्यावर हेंली गावाच्या अलिकडे रस्त्यातील एका पाटीने लक्ष वेधलं (चित्र-1 पहा). रस्त्यावरची पाटी
चित्र-1: रस्त्यावरची पाटी

तपकिरी रंगाच्या पाटीवर 'Maharajah's Well' असं वाचल्यावर मी नक्की चुकीचं वाचलं याची मला खात्रीच होती. इकडे प्रेक्षणीय स्थळांच्या पाट्या तपकिरी रंगाच्या करण्याची पद्धत असल्यामुळे बघू या तरी हे एक काय आहे ते असा विचार करून मी पटकन गाडी तिकडे वळवली व स्टोक रो या गावात ठेपलो. तिथे जे काही पाहीलं आणि वाचलं ते सगळंच कल्पनेच्या पलिकडलं आणि आत्तापर्यंतच्या माझ्या समजुतीला तडा देणारं निघालं. नंतर मी त्या बद्दल नेट वरतीही वाचलं त्याचा सारांश पुढे देतो आहे. बनारसचे महाराज श्री ईश्वरी प्रसाद नारायण सिंग (1822-1889) व त्या वेळचा अ‍ॅक्टिंग गव्हर्नर जनरल एडवर्ड रीड यांची चांगली मैत्री होती (चित्र-2 पहा). हा काळ साधारणपणे 1857 च्या नंतरचा आहे. दोघांच्या बर्‍याच वेळा गप्पाटप्पा चालायच्या. रीडने तेव्हा राजाच्या नागरिकांसाठी एक विहीर बांधली होती. तो चिल्टर्न भागातल्या इप्सडेन गावात 1806 साली जन्माला आला. नंतर 1828 साली भारतात आल्यावर वेगवेगळ्या हुद्यांवर काम करत करत 1860 मधे, तब्बल 32 वर्षं भारतात घालवल्यावर, निवृत्त होऊन परत इप्सडेन मधे येऊन रहायला लागला. भारतात तो स्थानिक लोकांशी मिळून मिसळून रहायचा व त्याने भारतीय भाषातील प्राविण्याबद्दल सुवर्णपदक पण मिळवलं होतं. भारतीय लोकांना त्याच्याबद्दल आपुलकी वाटण्याचं हे सुद्धा कारण असू शकेल. तो लहानपणी स्टोक रो गावाजवळ चेरी गोळा करायला यायचा. इप्सडेन पासून स्टोक रो फार लांब नाही.. सुमारे 4 मैल (6 किमी) अंतर आहे. चिल्टर्नच्या या भागात उन्हाळ्यात नेहमी पाण्याची टंचाई असे त्या काळी! थेम्स नदी जरी या भागातून वहात असली तरी ती दररोज पुरेसं पाणी सहजपणे आणण्याइतकी जवळ नव्हती. एकदा तो चेरी आणायला आलेला असताना त्याला एक बाई तिच्या लहान मुलाला त्यानं घरातलं शेवटचं पाणी पिऊन संपवलं म्हणून मारताना दिसली. त्यानं मधे पडायचा प्रयत्न केल्यावर त्या बाईने त्याला पण बदडायची धमकी दिली. ही गोष्ट त्याने एकदा राजाला सांगितल्यावर राजानं त्यांच्या मैत्रीखातर व रीडने राजाला केलेल्या मदतीची परतफेड म्हणून स्वखर्चानं त्या भागात विहीर बांधायचं ठरवलं. महाराज श्री ईश्वरी प्रसाद नारायण सिंग
चित्र-2: महाराज श्री ईश्वरी प्रसाद नारायण सिंग

स्टोक रो गावातली ही विहीर बांधायला 14 महिने लागले व ती मे 1864 मधे खुली झाली. 368 फूट खोल व 4 फुट व्यासाची ही विहीर बांधायला तेव्हा 353 पौंड 13 शिलिंग व 7 डाईम खर्च आला. विहिरीवरचा रहाट व त्या वरील सुंदर घुमट बांधायला आणखी 39 पौंड व 10 शिलिंग लागले. चित्र 3, 4 व 5 मधे विहीर, रहाट व बाजूचा परिसर दिसेल. रहाटावरचा हत्ती 1870 मधे बसवला. नुसती विहीर बांधून राजा थांबला नाही तर त्यानं विहीरीची देखभाल करणार्‍या माणसाला रहाण्यासाठी एक घर पण बांधलं (चित्र 6). विहिरीजवळील चार एकर चेरीची बागही राजाने घेऊन विहिरीच्या परिसरात समाविष्ट केली. महाराजाची विहीर व परिसर
चित्र-3: महाराजाची विहीर व परिसर

महाराजाची विहीर
चित्र-4: महाराजाची विहीर

रहाट व त्यावरील सोनेरी हत्ती
चित्र-5: रहाट व त्यावरील सोनेरी हत्ती

विहीर रक्षकाचं घर
चित्र-6: विहीर रक्षकाचं घर

विहीरीची माहिती
चित्र-7: विहीरीची माहिती

विहीरीचा विश्वस्त म्हणून रीडने त्याच्या उतारवयापर्यंत काम पाहीलं. या विहीरीचा वापर नागरिकांनी अगदी दुसर्‍या महायुद्धापर्यंत केला. 1961 मधे राजाच्या वंशजांने एलिझाबेथ राणीला विहीरीची प्रतिकृती भेट दिली. त्या नंतर तिची डागडुजी करून 1964 साली विहीरीची शताब्दी देखील साजरी केली. त्या साठी राणीचा नवरा प्रिंस फिलिप व राजाचे प्रतिनिधित्व करणारे काही जण हजर होते. त्या वेळी एका कलशातून आणलेलं गंगेचं पाणी विहीरीच्या पाण्यात मिसळलं गेलं. चार्लस व डायानाच्या1981 सालच्या विवाहाची स्मृतीचिन्हं विहीरीच्या पायात त्याच साली बसवली गेली. या विहीरीची अधुन मधून डागडुजी करून ती आणि परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवला जातो. 2014 साली या विहीरीला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक समारंभ पण झाला. या विहीरीला आता ग्रेड-2 लिस्टेड बिल्डिंगचा दर्जा प्राप्त झाला आहे. 

या विहीरीने श्रीमंत भारतीय आणि राजे यांच्यात एक नवीनच पायंडा पाडला. त्यातून इंग्लंडमधे अजून काही विहिरी ( त्यातली एक इप्सडेन मधे पण झाली) तसंच लंडन मधे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. एक पिण्याच्या पाण्याची टाकी सर कोवास्जी जहांगीर(त्याचं रेडी मनी हे टोपणनाव होतं) या एका श्रीमंत पारशाने लंडनच्या रिजंट नामक प्रसिद्ध बागेत बांधली. इथे त्याची माहिती व चित्र पाहू शकता. अशी या विहिरीची कहाणी दोन कारणांमुळे अनोखी वाटते! एक म्हणजे, आपल्याला नेहमी परदेशी लोकांनी भारतात दानधर्म केल्याच्या कहाण्या ऐकायला मिळतात. मग भारतीयांनी परदेशात इतक्या जुन्या काळी ते सुद्धा देश पारतंत्र्यात असताना केलेले दानधर्म परिकथाच म्हणायला पाहीजे! दुसरं कारण म्हणजे इंग्रजी महासत्तेला चिल्टर्न या लंडन जवळच्या भागातल्या पाण्याच्या दुर्भिक्षाबद्दल नक्कीच माहिती असली पाहीजे आणि त्यांनी त्या बद्दल काहीही केलं नाही. विहीर बांधायचा खर्च सरकारला सहज परवडण्यासारखा होता. इंग्रजांचं राज्य भारतावर होतं तरीही त्यांना एका राजाकडून दान स्विकारताना काही अपमान किंवा मानहानी वगैरे वाटली नाही. तसंच नंतर हा इतिहास दडपण्याचा प्रयत्न पण झाले नाहीत. उलट, ही विहीर पर्यटकांचं आकर्षण होण्यासाठी सर्व काही केलं गेलं. 

तळटीप: या लेखातील सर्व चित्रे नेटवरून साभार! 

-- समाप्त --