Sunday, September 26, 2010

भूतचुंबक

बंड्या वाघ माझा शाळासोबती! आम्ही शाळेत असताना त्याला साप चावला होता. त्याचं असं झालं.. त्याच्या घरात आई-वडील कुणी नव्हतं.. तो एकटाच खेळत होता.. मधेच त्याला काहीतरी बांधायला दोरीची आवश्यकता भासली.. म्हणून तो घरात आला.. तर आतल्या दरवाज्यावरच एक, त्याला हवी होती तशी, दोरी लोंबकळताना दिसली.. क्षणाचाही वेळ न घालवता त्यानं ती धरली आणि ओढली.. त्याच्या दुर्दैवाने तो विषारी साप होता.. सापानं त्याचं काम चोख बजावलं.. त्यावर बंड्याला काय करावं ते सुचेना.. आईला शोधून काढून दवाखान्यात जाई पर्यंत थोडा उशीर झाला.. म्हणजे बंड्याला दवाखान्यातच अ‍ॅडमिट करावं लागलं.. थोडे आधी उपचार झाले असते तर लगेच घरी जाता आलं असतं इतकंच.. अपघात असल्यामुळे ती एक पोलीस केस पण झाली. बंड्या वाचला खरा पण घरच्यांच्या आणि आमच्या तोंडचं पाणी पळवलं त्यानं!

दुसरे दिवशी एका भुक्कड पेपरात चक्क बंड्याच्या मृत्यूची वार्ता छापून आली.. जिचा त्याच्या घरच्यांना काहीच पत्ता नव्हता.. लगेच शाळेला सुट्टी देण्यात आली.. धक्का बसलेल्या अवस्थेत वर्गातली काही मुलं आणि एक दोन मास्तर सुतकी चेहर्‍याने त्याच्या घरी गेले.. घरी फक्त वडील होते त्याचे.. वडलांना वाटले सगळे चौकशीसाठी आले आहेत म्हणून त्यांनी हसत हसत 'अरे वा! या या या' असं म्हंटलं.. लोकांना विचित्र वाटायला लागलं.. एव्हढा स्वतःचा मुलगा गेला आणि हा माणूस सरळ हसतोय? बहुतेक एकुलता एक मुलगा गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं सगळ्यांना वाटलं आणि परिस्थिती आणखीनच विचित्र झाली.. कसंबसं चाचरत चाचरत एका मास्तराने 'अं अं अं, मि. वाघ... बंडू असा अचानक गेला.. तुमच्या.....' वगैरे बोलायला सुरुवात केली. पण वडिलांनी त्यांना मधेच तोडून 'बंडू कुठे गेला? तो तर दवाखान्यात आहे. उद्या घरी येईल.' असं सांगितल्यावर आमची खात्रीच झाली की वडिलांच्या डोक्यावर नक्की परिणाम झालाय.. असा बराच सनसनाटी गोंधळ झाल्यावर कुणीतरी दवाखान्यात त्याला बघायला जायची आयडिया टाकली आणि खरी परिस्थिती समोर आली.

असा हा बंड्या वाघ एक अद्भुत भूतचुंबक आहे. तुम्ही भूतचुंबक हा शब्द ऐकला आहे का? नसेलच ऐकला! कसा ऐकणार म्हणा कारण मी तो आत्ताच तयार केलाय! मी तो लोहचुंबक किंवा कवडीचुंबक असल्या शब्दावरूनच बनवला आहे. तर, लोहचुंबका भोवती जसे एक अदृश्य चुंबकीय क्षेत्र असते ज्यामुळे आजुबाजूचे लोह त्याच्याकडे खेचले जाते तसेच भूतचुंबका भोवतीही एक अभूतपूर्व चुंबकीय क्षेत्र असते ज्यामुळे आजुबाजूची भुतं आकर्षित होतात. फरक इतकाच आहे की यातली ही भुतं ही भूतदया शब्दातली 'मुकी बिचारी कुणी हाका' टाईप भुतं असतात.

तर अशा कुठल्याही भुताला आकर्षित करण्याचा बंड्यात एक अंगभूत गुण आहे. सगळं छान चाललेलं असताना, आजुबाजूचा एखादा प्राणी मुद्दाम वाट वाकडी करून त्याला आडवा जाणार! मांजरं तर हमखास! तो दिसला की कुंपणावरचे सरडे जमिनीशी ४५ अंशाचा कोन करून, गळ्यातल्या गळ्यात धापा टाकत, रंग न बदलता एखाद्या मानवंदना देणार्‍या सैनिकाप्रमाणे समोर निश्चल बघत रहातात. कुत्रीही जवळ येऊन वास घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.. अगदी पिसाळलेली देखील. मी त्याच्या बरोबर असलो आणि एखादं कुत्रं दिसलंच तर माझी अवस्था रस्त्याच्या कडेच्या खांबासारखी होते. पक्ष्यांना तर त्याचं डोकं वरून टॉयलेट सारखं दिसतं की काय कुणास ठाऊक!

एकदा आम्ही दोघं कँटीनला, आमच्या पोटातल्या कावळ्यांची शांत करण्यासाठी, जात असताना एका कावळ्यानं त्याच्या डोक्याच्या दिशेने झडप मारली.. त्याच्याही पोटात कावळेच ओरडत होते की काय माहीत नाही.. नशिबानं समोरून झडप मारली म्हणून बरं.. कावळा त्याला दिसला तरी.. त्यानं त्याला कसंबसं चुकवून मागं वळून पाहिलं.. तर त्याला तो कावळा यू टर्न मारून परत हल्ला करण्याच्या तयारीत दिसला.. मग विमानातून गुंड कसे जमिनीवरील एकट्या हिरोच्या मागे लागतात तशा धर्तीवर काही हल्ले झाले.. बाजुच्या पोरांनी आरडाओरडा केल्यावर कावळा पळून गेला आणि बंड्या काकबळी होता होता वाचला. आपल्या घरट्यातलं पिल्लू आपलं नसून कोकीळेचं आहे असा कावळ्याला साक्षात्कार होतो तेव्हा चिडून जाऊन तो असे हल्ले करतो म्हणे! आपल्या बिनडोकपणाचं खापर आपल्याशी दुरान्वयानेही संबंधित नसलेल्यांवर फोडणे ही फक्त माणसाचीच मक्तेदारी नाहीये हे मी त्यातून काढलेलं एक गाळीव रत्न!

कॉलेजात बंड्या स्कॉलर म्हणून प्रसिद्ध झाला होता. त्या प्रसिद्धीला या काकभरार्‍यांमुळे जरा नजर लागली. तो येताना दिसला की काव काव करून काव आणण्याचे प्रकार सुरू झाले. तरी बंड्या शांत होता. त्याला माहिती होतं की परीक्षा जवळ आल्या की हेच सगळे कावळे त्याला गूळ लावायला येणार आहेत.. अगदी मुली पण! मुली तर इतक्या घोळात घ्यायचा प्रयत्न करायच्या की सगळ्याच त्याच्या प्रेमात पडल्या आहेत असं लोकांना वाटावं.. त्यानंही स्वतःचा एक दोन वेळा तसा गैरसमज करून घेऊन प्रेमभंगाचे एकतर्फी झटके खाल्ले होते.. नाही असं नाही. पण आता तो मुलींच गोड बोलणं व्यवस्थित गाळून ऐकायला शिकला होता.

वास्तविक, त्याच्या सगळ्या प्रेमभंगांचं मूळ मुली नव्हत्या. एका प्रेमभंगाला एक 'भूत' पण कारणी'भूत' झालं होतं. तेव्हा त्याची शीला बरोबर पिक्चरला जायची पहिली वहिली डेट ठरली होती.. थेटरवरच भेटणार होते ते. थेटरकडे जायच्या वेळेला आईने त्याला पोस्टात एक पत्र टाकायला सांगीतलं. जवळच्या पेटीत पत्र टाकल्यावर त्याला ते पेटीच्या तोंडात अडकून पडलेलं दिसलं म्हणून जरा आत हात घालून ढकलणार.. तो.. आत बसलेल्या विंचवाची ब्रह्मानंदी लागलेली टाळी भंग झाली आणि त्यानं एक प्रेमळ दंश केला. ठो ठो बोंबलत हात बाहेर खेचल्या बरोबर विंचूही बाहेर आला. आपल्याला 'ते' जालीम प्रकरण चावलंय हे पाहून बंड्या वाघ पाठीमागे लागल्यासारखा धावत डॉक्टरकडे गेला. मोबाईलचा जमाना नसल्यामुळे औषधपाणी, मलमपट्टी होईपर्यंत तिकडे शीलाची कोनशीला झाली आणि नंतर बंड्याला शीला नामक इंगळी पण डसली. बंड्यानं खरं कारण सांगायचा प्रयत्न केला पण तिचा विश्वास बसला नाही.. आफ्टरॉल, विंचू चावणं हे डास चावण्याइतकं काही कॉमन नाहीये हो!

पण जस्सीची गोष्ट वेगळी होती. ती त्याच्या प्रेमाच्या दलदलीत रुतत चालली होती. कॉलेज क्वीन जस्सी म्हणजे पोरांच्या भाषेत एक 'सामान' होती. कॉलेजच्या पोरांमधे जस्सी प्रश्न काश्मीर प्रश्नापेक्षा जास्त चिघळलेला होता. पोरांची हृदयं पायदळी तुडवत ती कॉलेजला आली की सगळे जण 'शब्द एक पुरे जस्सीचा, वर्षाव पडो मरणाचा' या आकांताने तिच्याशी काहीबाही बोलायचा प्रयत्न करीत असत. पण जस्सीची नजर बंड्याचा शोध घेत भिरभिरायची. तो दिसला की त्याच्याशी काही तरी कारण काढून बोलल्याशिवाय ती त्याला सोडत नसे. पण बंड्या जस्सी सारखी लस्सी देखील फुंकून फुंकूनच प्यायचा. इतकंच काय, पण ती दिसली तर त्याची तिला चुकवायची धडपड चालायची.

पण परमेश्वराची लीला कशी अगाध असते पहा.. अजून एका प्राण्यानं वाट वाकडी केली आणि बंड्याच्या आणि जस्सीच्या प्रेमाचा मार्ग सरळ झाला. त्याचं असं झालं.. बंड्या सायकल वरून कॉलेजला येत होता. जवळच्या फुटपाथ वरून जस्सी कॉलेज कडेच निघालेली होती. बंड्याचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. तो त्याच्याच तंद्रीत होता. इतक्यात समोरून एक उधळलेली म्हैस सुसाट वेगाने त्याच्याच रोखाने पळत येताना दिसली. तिला चुकवायला म्हणून बंड्यानं सायकल पटकन फुटपाथकडे वळवायचा प्रयत्न केला. पण तितका वेळ मिळाला नाही. म्हशीच्या धडकेनं सायकलच्या दोन्ही चाकाचे द्रोण झाले. बंड्याला खूप लागलं, शिवाय एका पायाचं हाड मोडलं.. त्याला काही सुधरत नव्हतं.. म्हशीच्या भीमटोल्यामुळे आजुबाजूला एकच गलका झाला. लोकांचा त्याच्या भोवती गराडा पडला.. जस्सी मधे घुसून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती.. 'बंडू! बंडू!'.. तिच्याकडे त्याचं लक्ष गेल्यावर तो 'म्हैस! म्हैस!' ओरडला.. लोक घाबरून भराभरा बाजूला झाले.. जस्सीचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं.. तिला खरं तर 'बंडू! बंडू! तुम ठीक तो हो ना?' असं काहीतरी विचारायचं होतं.. पण तिची 'बंडू! बंडू!' याच्या पलीकडे गाडी जात नव्हती.. आणि बंडूची 'म्हैस! म्हैस!' या पलीकडे! त्यांच ते 'बंडू! बंडू!.. म्हैस! म्हैस!' ऐकून ती म्हैस पण जबड्यातल्या जबड्यात खिंकाळली असती. शेवटी त्याला लोकांनी उचलून परस्पर हॉस्पिटलात नेलं.

पण जस्सीचा असा गोड गैरसमज झाला की बंड्यांनं केवळ तिला वाचवायला सायकल मधे घातली.. कारण तिनं त्या दिवशी लाल रंगाचा टॉप घातला होता म्हणून त्या म्हशीला 'घेतलं शिंगावर'चा प्रयोग तिच्यावर करायला ते एक आमंत्रण होतं.. आता तिच्या प्रेमाचा दाब ४४० व्होल्टच्या पलीकडे गेला.. तिला त्याच्या शिवाय काही सुचेना.. कुठल्याही म्हशीच्या चेहर्‍याऐवजी बंड्याची छबी दिसायची.. म्हशीच्या काळ्याभोर डोळ्यातून बंड्या तिच्याकडे प्रेमाने बघतोय आणि म्हणतोय.. 'जस्सी! जस्सी!'. बंड्याच्या आठवणी अशा सारख्या दाटून यायच्या. तिचं कशातच लक्ष लागेना. ती नित्यनेमाने दवाखान्यात रोज त्याच्या चौकशीला जायची. दवाखान्यातून तो घरी गेल्यावर घरीही जायला लागली. बाकीचे मित्रमैत्रिणी पण यायचे पण जस्सीसारखे रोज नाही.. ते बंड्याच्याही लक्षात आलं आणि तो तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहू लागला. आणि मग त्याच्या लक्षात आलं 'जस्सी जैसी कोई नहीं!'

म्हशीनं बंड्याला दिलेल्या अनपेक्षित 'कलाटणी'मुळे ती दोघं प्रेमात पडल्यानंतर त्यांनी एकत्र सिनेमाला जाणं काही अनपेक्षित नव्हतं. ते जुवेल थीफ बघायला गेले.. तनुजा देवानंदला पटवायचा प्रयत्न करत असते तो सीन चालू होता आणि बंड्याच्या हातावर जस्सीनं हात ठेवला.. किंवा बंड्याला तरी तसं वाटलं.. तो सुखावला.. 'रात अकेली है, बुझ गये दिये' तनुजाचं गाणं सुरू झालं आणि बंड्याला कळेना की जस्सीचा हात इतका खरखरीत कसा? अंधारात त्यानं डोळे ताणून ताणून पाहीलं तर त्याला त्याच्या हातावर एक मोठी घूस बसलेली दिसली. त्यानं घाबरून हात झटकला आणि ती जस्सीच्या मांडीवर पडली... 'आके मेरे पास, कानोमें मेरे.... अ‍ॅssssssss'.. आशाच्या मादक आवाजामुळे मोरपीस फिरल्यासारखे वाटतंय न वाटतंय तोच जस्सीच्या थिएटरभेदी किंकाळीमुळे रोंगटे खडे हो गये! ती उठून उभी राहिली आणि तिनं अंगावरचं धूड उचलून फेकलं ते पुढच्या रांगेतल्या कुण्या बाईच्या डोक्यावर पडलं. 'अ‍ॅssssssss'.. दुसरी थिएटरभेदी किंकाळी आली. किंकाळ्यांच्या बॅकग्राऊंड वर घुशीची रांगेरांगेतून आगेकूच चालू होती. देवानंद तनुजाला काय करावे कळेना. जस्सी भीतिने चांगलीच थरथरत होती मग सिनेमा अर्धवट टाकून ते निघून आले.

बंडू आणि जस्सी प्रेम प्रकरण आता कॉलेजभर झालं होतं.. कॉलेजचं शेवटचं वर्ष संपत आलं होतं.. त्यांनीही शिक्षण संपल्या संपल्या लग्न करायचा निर्णय घेतला होता. साहजिकच जस्सीच्या बापाला भेटणं आवश्यक होतं. तिचा बाप आर्मीतला एक रिटायर्ड कर्नल होता. त्यांच्या घरी बंड्या गेल्यावर जस्सी बापाला बोलवायला गेली. बंड्या त्यांच्या दिवाणखान्यातल्या वेगवेगळ्या बंदुकींचं निरीक्षण करत होता.

मागून अचानक बापाचा आवाज आला.. 'चल मी तुला पिस्तूल कसं चालवायचं ते शिकवतो'.. हातात पिस्तूल, भरदार पांढरी दाढी, कल्लेदार मिश्या करडा आवाज या सगळ्यांच्या एकत्रित परिणामांमुळे बंड्या थरथरायला लागला. बापानं त्याला बागेत नेलं.. पिस्तुलाचा सेफ्टी कॅच काढल्याशिवाय गोळी उडत नाही ते सांगीतलं.. मग तो कसा काढायचा ते दाखवलं.. एका लांबच्या झाडावर नेम धरून त्यानं गोळी झाडली.. ती बरोब्बर त्यानं सांगितलं होतं तिथं घुसली होती.. बंड्याची थरथर अजूनच वाढली.. मग त्यानं सेफ्टी कॅच लावला आणि पिस्तूल बंड्याच्या कानशीलावर रोखलं.. म्हणाला.. 'घाबरू नकोस. गोळी उडणार नाही'.. बंड्या आता लटलटायला लागला होता.. कानशीलापासून फक्त एक फुटावर मरण उभे होते.. सेफ्टी कॅच लावलेला असताना सुद्धा चुकून गोळी उडाली तर?.. बंड्याला घाम फुटला.. हृदय डेक्कन क्वीनसारखं धडधडत होतं.. बापाने सावकाश ट्रिगर ओढला.. टिक.. गोळी उडाली नाही. बंड्याला हुश्श्श झालं! आता घामाच्या धारा वहात होत्या.. ते सगळं अनावर होऊन शेवटी बंड्या कोसळला.. नंतर तापाने फणफणला.. त्यात तो पिस्तूल, सेफ्टी कॅच, गोळी, ढिश्यांव असलं काहीबाही बरळायचा.

तिच्या बापाला एखादा वाघासारखा मर्द माणूस जावई म्हणून हवा होता.. झाल्या घटने वरून बापाने बंड्या वाघ आहे पण मर्द नाही असा निष्कर्ष काढला आणि लग्नाला साफ नकार दिला! या खेपेला बाप नावाचा प्राणी बंड्याला आडवा आला. पण जस्सीनं पळून जाऊन लग्न करायचं ठरवलं.. आमच्या अजून एका मित्राच्या ओळखीचे भटजी लग्न लावून द्यायला तयार झाले.. जवळच्या दुसर्‍या एका गावातल्या मंदिरात जायचं आणि लग्न करायचं असा प्लॅन ठरला.. ठरल्या प्रमाणे काही मित्रमैत्रिणी, बंड्या, जस्सी, बंड्याचे आई वडील आणि ते भटजी मंदिरात आले.. लग्न सुरू झालं.. बंड्या आणि जस्सी हातात माळा घेऊन उभे होते.. मंगलाष्टकांचा शेवट जवळ आला त्याच वेळेला बंड्याला तिचा बाप येताना दिसला.. त्यानं मानेनेच बाजुच्या मित्रांना खुणावलं.. भटजी आता शेवटचं 'शुभमंगल सावधान!' म्हणणार इतक्यात बंड्याच्या पँटिच्या आतमधे मांडीपाशी काहीतरी खसफसलं.. बंड्यानं हार टाकला आणि एका हातानं मांडी जवळचा भाग घट्ट धरून सूंबाल्या केला तो थेट मंदिरा बाहेर! जस्सीच्या बापामुळे त्याचा धीर खचला असं काहींच मत होतं.. तर 'शुभमंगल सावधान!' ऐकताच पळ काढणारा बंड्या हा रामदासांचा आधुनिक अवतार आहे असं काहींच! तिकडे बंड्या धावत धावत एका झाडामागे गेला.. मागे मित्र होतेच.. बंड्यानं घाईघाईने पँट काढली आणि झटकली.. त्यातून एक पाल बाहेर पडली.. बंड्या पँट चढवून परत आला.. त्याची आणि तिच्या बापाची नजरानजर झाली.. बंड्याच्या चेहर्‍यावर चिंतेचं जाळं पसरलं.. ते पाहून 'डोंट वरी! मै तुम्हे आशीर्वाद देने आया हूं!' असं बाप म्हणाला आणि सगळ्यांचच टेन्शन गेलं.. नंतर लग्न यथासांग पार पडलं.

अजूनही बंड्याच्या आयुष्यात भुतं लुडबुडत असतात.. लेकिन वो किस्से फिर कभी!

== समाप्त ==

Wednesday, September 1, 2010

ऐका हो ऐका!

दिल्या: 'अरे मक्या! काय झालं? इतका काय विचार करतोयस?'.. कधी नव्हे ते भरलेल्या साप्ताहिक सभेत विचारमग्न मक्या डोक्याला हात लावून शून्यात बघत बसलेला होता.. हो. बरेच दिवसांनी आमच्या साप्ताहिक सभेचा कोरम फुल्ल होता.. म्हणजे सगळ्या बायका आलेल्या होत्या.. कधी नव्हे ते तिघींना टीव्हीवर कुठलीही मालिका बघायची नव्हती.. कुठेही नवीन सेल लागलेला नसल्यामुळे आणि चालू सेलना भेटी देऊन झालेल्या असल्यामुळे शॉपिंगला जायचं नव्हतं.. 'हसून हसून पोट दुखायला लागेल' अशी जाहिरात केलेलं कुठलंही विनोदी नाटक कम सर्कस बघायची नव्हती... आणि कुठल्याही गोssड हिरोचा पिक्चर लागलेला नव्हता.

मी: 'माया! तू ह्याला तुझ्या जडीबुटीतलं काय उगाळून दिलंस?'.. मी मायाच्या आयुर्वेदिक पदवीवर थोडे शिंतोडे उडवून वातावरणात जान आणायचा प्रयत्न केला.

माया: 'माझी कुठलिही मात्रा त्याच्यावर चालत नाही!'

मक्या: 'अरे बाबा! आम्ही एक नवीन पॅकेज तयार केलंय.. डॉक्टरांसाठी. छोट्या मोठ्या दवाखान्यातनं जे पेशंट येतात ना.. त्यांच्या अपॉइंटमेंटच्या नोंदी.. त्यांची मेडिकल हिस्टरी.. त्यांच्या टेस्टचे निकाल.. त्यांना वेळोवेळी लावलेले पैसे.. त्यांना दिलेली प्रिस्क्रिप्शन्स.. असं सगळं त्यात ठेवता येतं. ते त्या डॉक्टरांना उपयोगी पडेल खूप!'

दिल्या: 'हो पडेल ना! मग त्यात तू विचार करण्यासारखं काय आहे? मायाला दवाखाना घेऊन देतो आहेस काय?'

मक्या: 'अरे बॉस मलाच त्याचं मार्केटिंग बघायला सांगतोय'

मी: "त्यात काय विशेष आहे? एक हातगाडी घे, त्यावर तुझ्या पॅकेजच्या सीड्या टाक आणि भंगारवाल्यासारखं गल्लीबोळातून ओरडत फिर 'एss! पॅकेजवालेssय!'".. माझ्या ओरडण्यामुळं बाजुच्या लोकांना खरच भंगारवाला आल्याचा संशय आला.

दिल्या: 'तू मार्केटिंग बघायचं हे कुणाचं मेंदुबालक?'.. मेंदुबालक म्हणजे ब्रेनचाईल्ड हे कळायला मला जरासा वेळच लागला.. आम्ही पूर्वी केलेल्या मराठवळण्याच्या रेट्याचे दणके असे अधून मधून आम्हालाच बसतात.

मक्या: 'आरे! आमचा मार्केटिंग मॅनेजर सोडून गेला.. आता नवीन शोधतोय.. पण जाता जाता त्यानं बॉसच्या डोक्यात 'तोपर्यंत मी मार्केटिंग करू शकेन' असं घुसवलं. त्याच्या मते ते माझ्या रक्तात आहे.'

माया: 'काही रक्तात वगैरे नाहीय्ये हां! तो मार्केट मधून भाजी आणण्याला मार्केटिंग म्हणायचा'.. मायाला सात्विक का कसला तरी संताप आलेला दिसला.. बहुतेक कौटुंबिक असावा.

सरिता: 'ए! पण ते भंगारवाल्यासारखं ओरडत फिरणं हे त्याच्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही हां!'

माया: 'प्रतिष्ठा?'.. मायाच्या सूचक नजरेत त्यांच्यातल्या ताज्या भांडणाचे पडसाद असावेत असं मला वाटून गेलं.

दिल्या: 'रिक्षातून ओरडत फिरणं जास्त प्रतिष्ठेचं वाटेल का? हे चित्र कसं वाटतंय?.. रिक्षाच्या दोन्ही बाजुला पोस्टरं लावलेली आहेत.. आणि एक लाउडस्पीकर.. मक्या ड्रायव्हर शेजारी अंग चोरून बसलेला आहे.. रिक्षाच्या मागनं दोन चार उघडी नागडी पोरं नाचत चाल्लीयत.. आणि मक्या ओरडतोय
ऐका हो ऐका!
समस्त डाक्टरान्नो ऐका!
तुमच्यासाठी आणलंय हे
खास पॅकेज बर्का!'.

दिल्याच्या सचित्र वर्णनामुळे मक्या सैल झाला, त्याचा डोक्यावरचा हात निघाला, मिशीतल्या मिशीत हसत तो म्हणाला -

मक्या: 'आयला! काय धमाल येईल ना? सुरुवात माझ्या बॉसच्या घरापासनंच करतो.'

मी: 'म्हणजे तुझ्या रक्तातलं मार्केटिंग बघून रक्तदाब वाढायचा त्याचा!'

माया: 'नको. नको. त्याच गल्लीत माझं माहेर आहे. मक्याच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून आईचा रक्तदाब वाढेल नक्की.'

सरिता: 'म्हणजे? अजून कल्पना नाही त्यांना?'

दिल्या: 'कल्पना...... मला आहे.'.. आम्हाला गरीब विनोद कळत नाहीत असं दिल्याला वाटलं की काय कुणास ठाऊक! पण त्यानं आपल्या बायकोकडे, कल्पनाकडे, बोट दाखवलं.

मक्या: 'पण मला या टीव्हीवरच्या जाहिराती लोकांवर नक्की कशा परिणाम करतात त्याची खरच माहिती काढायचीय. एखादी जाहिरात द्यावी असा विचार चाल्लाय माझा.'

कल्पना: 'ते मी सांगू शकेन. मी अभ्यास केलाय त्याचा.'.. कल्पनेला एकदाच तोंड फुटलं.

मक्या: 'मग सांग ना!'

कल्पना: 'जाहिरातींची बरीच तंत्र आहेत. काही जाहिरातीत अतिशयोक्तीचं तंत्र वापरतात. तुम्हाला काय सांगायचंय त्याचीच अतिशयोक्ती करायची'.

सरिता: 'म्हणजे?'

कल्पना: 'म्हणजे असं बघ.. एखादी वॉशिंग पावडरची जाहिरात घे.. चिखलाचे डाग पडलेले पोरांचे कपडे हातात घेऊन एक सुबक गृहिणी हे डाग कसे जाणार अशी चिंता करीत उभी असते..'

दिल्या: 'ती सुबक गृहिणी असते. जाहिरातीतल्या गृहिणी सुबकच असाव्या लागतात'.

सरिता: 'ही अतिशयोक्ती आहे?'

कल्पना: 'तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस!'

मी: 'आयुष्यात तिला तेवढी एकच चिंता असते.. ती मिटली की तिचं जीवन सुखासमाधानाने कसं फुलून जाणार असतं.. मुलं आनंदातिरेकाने तिला 'मम्मीsss!' म्हणून मिठी मारणार असतात.. बॉसने केलेली धुलाई विसरून नवरा तिच्या धुलाईची(!) प्रशंसा करणार असतो.. सासूच्या पांढर्‍या साडीला ट्यूबच्या प्रकाशाची झळाळी मिळणार असते.. इ.इ.'

दिल्या: 'पण डाग घालवणार कोण? धोब्याला तर कपडे देता येत नाहीत, कारण तो असं गाणं म्हणण्याची शक्यता जास्त...
दाग जो तूने दिया, हमसे मिटाया न गया
हमसे धोया न गया, तुमसे धुलाया न गया'.. दिल्यानं ते 'हमसे आया न गया' च्या चालीवर म्हंटल्यावर आम्ही ओशाळून आजुबाजुला पाहिलं. नेमके सगळे आमच्याचकडे दयार्द्र नजरेने बघत होते.

मी: 'नशीब त्या तलतच! तो हयात असताना ही गाणी म्हंटली असतीस तर उगीच त्या बिचार्‍याच्या पोटावर पाय आला असता.'

सरिता: 'ए! गपा रे! हं! तू सांग गं कल्पना!'

कल्पना: 'अशा सुबक संभ्रमात ती सुबक गृहिणी पडलेली असतानाच अजून एक सुबक उपटसुंभीण कुठलीशी वॉशिंग पावडर घेऊन उपटते आणि बजावते.. बाई गं! तुझ्या सर्व समस्यांच मूळ तू वापरतेस त्या यःकश्चित पावडरमधे आहे. ही पावडर वापर की लगेच डाग साफ'.

दिल्या: 'पावडरवालीच्या साडीतून फुले पडत असतात.. ते पाहून आपण 'फुले का पडती शेजारी?' या विचारात पडतो.. जरा जास्त पैसे मोजले असते तर फुलं न पडणारी चांगली साडी मिळाली असती असही वाटून जातं.. अर्थात् असे प्रश्न फक्त पुरुषांनाच पडतात.. स्त्रियांकडे त्याचं, त्यांच्यामते, अगदी तर्कशुद्ध स्प्ष्टीकरण असतं.'

कल्पना: 'फिरत्या विक्रेत्यांना हाडहुड करून दारातून घालवून देणार्‍या त्या बाईला ती पावडरवाली आपल्या घरात अशी कशी घुसली हा प्रश्न अजिबात पडत नाही.. तरी पण पडत्या फुलाची आज्ञा घेऊन ती त्या पावडरचा वापर अखेर करतेच. मग कपड्यांच्या बोळ्यातून, फसफसणार्‍या सोड्यासारखा, भसभस माती सुटताना दाखवण्याचा सीन हमखास येतोच. वास्तविक, बचकभर चिखलात माखलेले कपडे साध्या पाण्यात घातले तरी माती बाहेर पडतेच याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केलं जातं. प्रेक्षक पहिल्या सुबकिणीच्या चेहर्‍यावरच्या परमोच्च आनंदात विरघळून जातात.'

मी: 'या नंतरचा एक महत्वाचा सीन मुद्दामच कापलेला असतो.. मी म्हणून तुम्हाला सांगतो.. त्या धुण्यात सासरेबुवांचा निळा शर्ट पूर्णपणे पांढरा होतो.. ते पाहिल्याबरोबर त्यांचे डोळेही पांढरे होतात! त्यावर सासुबाई 'निळा काय? पहिल्या पासून पांढराच होता तो' असं ठणकावतात.. त्यामुळे त्यांची कवळीखीळही बसते.'.. ऐनवेळेला दातखीळीला खीळ घालून त्याची कवळीखीळ केल्याचा मलाच आनंद झाला.

माया: 'जाहिरातवाल्यांच एक बरं असतं.. त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायला लागत नाहीत. जाहिरात करणं हे त्यांच कर्म पण फळं गिर्‍हाईकं भोगतात.. त्यांच्या सांगण्याच्या आविर्भावावरून असं वाटतं की ती पावडर वापरून कुठलेही डाग जातील मग ते कपड्यावरचे असोत किंवा चारित्र्यावरचे असोत नाही तर सामानाचे!... नंतर खिसा साफ होण्याचं फळ आणि कळ गिर्‍हाईकं भोगतात.'

कल्पना: 'तर याच्यात त्या पावडरने कुठलाही डाग जातो याची अतिशयोक्ती केली आहे हे तुमच्या सारख्या सुजाण लोकांच्या लक्षात आलेच असेल.'

सरिता: 'हे तू सांगेपर्यंत नव्हतं आलं हं लक्षात!'.. तिच्या खरंच लक्षात आलं नव्हतं की ती गंमत करत होती ते काही कळालं नाही मला.. बायकांच्या बोलण्यावरून नक्की त्यांच्या मनात काय आहे ते फक्त इतर बायकांच जाणे!

मी: 'मला टूथपेस्टच्या जाहिरातीची एक आयडीया आलीये. युवराजसिंग बॅटिंग करतोय.. शोएब बोलिंगला उभा आहे. पहिला बॉल टाकतो तो उसळून धाडकन युवराजच्या थोबाडावर बसतो.. तो हेल्मेटमुळे वाचतो.. पण चिडून युवराज हेल्मेट काढतो आणि परत पाठवून देतो. पुढचा बॉल पण जोरात उसळतो आणि त्याच्या दातावर आपटून फाइनलेगला चौकार बसतो. अंपायर दाताला हात लावून चौकाराची खूण करतो.. बस्स! यानंतर काही बोलायचं नाही.. नुसता कॅमेरा त्या टूथपेस्ट वर मारायचा.'

सरिता: 'म्हणजे काय? माझ्या काही नाही आलं हं लक्षात!'.. दिल्यानं कपाळावर हात मारला. नेहमी तिची बाजू घेणारा तो, पण आज त्याचाही कपाळमोक्ष झाला. मी डोकं आपटायला योग्य भिंतीचा शोध घेऊ लागलो.. त्या हॉटेलात भिंतींना सगळीकडे अणुकुचीदार बांबूचं डिझाईन होतं त्यामुळे घाई घाईने शोध थांबवला. सगळ्याच बायकांचे प्रश्नार्थक चेहेरे बघून शेवटी मक्यानं 'टूथ बाईज' असं सांगीतलं.. तरीही काही सुधरेना म्हंटल्यावर 'लेग बाईज' पासून सुरुवात करून ते गूढ उकलून दिलं.. मग सर्व महिलांनी फार महत्वाची गोष्ट समजल्यासारखा चेहरा केला.

माझ्या आयडीयाची अशी तुफानी वादळात सापडलेल्या डासासारखी झालेली वाताहात बघून मी ती टूथपेस्ट कंपनीला विकायचे बेत रद्द केले. बरोबरच आहे.. कारण, ती जाहिरात कमितकमी ५०% जनतेच्या डोक्यावरून शोएबच्या बंपरसारखी जाणार असेल तर काय उपयोग? आणि दुर्दैवाने नेमकी तीच जनता घरात कुठली वस्तू विकत आणायची याचा निर्णय घेते हो!

कल्पना: 'एखाद्या लोकप्रसिद्ध माणसाला त्या वस्तूबद्दलची स्लोगन बोलायला लावणे, लोकांना एखाद्या गोष्टीची भीति घालून मग विक्रीची वस्तू कशी त्यांना वाचवेल हे ठसवणे अशी पण तंत्रं आहेत.'

दिल्या: 'ए! तंत्रं खूप झाली आता! मक्या आपण तुझी जाहिरातच तयार करू ना त्यापेक्षा!'

माया: 'हां चालेल! पण स्लोगन काय करू या?'

कल्पना: 'पॅकेजचं नाव काय आहे रे?'

मक्या: 'अजून ठरलेलं नाही!'

दिल्या: 'असे कसे रे तुम्ही नाव न ठेवता पॅकेज विकायला काढता? बारसं व्हायच्या आधीच लग्न झाल्यासारखं वाटतं.'

सरिता: 'चला आपण नाव पण ठरवू या.'

माया: 'क्लिनीसॉफ्ट कसंय?'

मक्या: 'श्या! ते नॅपीचं नाव वाटतं अगदी! त्यापेक्षा मेड-एड बरं आहे. सध्या तेच घेऊन चालू.'

कल्पना: 'हे कसं वाटतंय? दवाखान्यातल्या एका रिसेप्शनिस्ट भोवती १७६० पेशंट गोळा झालेत. एक अपॉइन्टमेन्ट मागतोय, एक बिल मागतोय, एक टेस्ट रिझल्ट मागतोय... असा सगळा सावळा गोंधळ आहे. तिकडे ती रिसेप्शनिस्ट प्रचंड बावरली आहे. ती एकाची रिसीट दुसर्‍याला, दुसर्‍याचा रिझल्ट तिसर्‍याला असं करून अजून भर घालतेय.. पेशंटांच्या चेहर्‍यांवर वैताग स्पष्ट दिसतो आहे.. त्यामुळे तिच्या डोक्यातून धूरच यायचा बाकी आहे फक्त! शेवटी, पुढचा पेशंट बराच वेळ आत नाही आला म्हणून डॉक्टर बाहेर येतात आणि समोरचं दृश्य पाहून हतबुद्ध होतात.'

दिल्या: 'रिसेप्शनिस्ट सुबक पाहीजे. बाहेर येणारा डॉक्टर नको. ती डॉक्टरीण पाहीजे.. आणि सुबक पण.'

कल्पना: 'अरे हो रे! तू आधी तुझी सुबक सुबक ही बकबक थांबव बरं जरा! हां! तर तो डॉक्टर बधीर होऊन स्वतःच अपॉइन्टमेन्टची वही घेऊन पुढचा पेशंट कोण आहे ते बघायला लागतो.. पण ते त्याला नीट समजत नाही.. कारण काही नाव खोडलेली असतात, तर काही नावांच्या पुढे वर खाली जाणारे बाण असतात.. शिवाय तिचं अक्षर त्याला समजत नाही.'

माया: 'हा हा! खुद्द डॉक्टरला दुसर्‍याचं अक्षर समजत नाही हे मस्त वाटेल बघायला.'

सरिता: 'तेव्हढ्यात त्याचा दुसरा डॉक्टर मित्र येतो. आणि त्याला मेडएड वापरायला सांगतो. लगेच पुढच्या सीनमधे एकदम आमूलाग्र बदल दाखवायचा. तीच खोली पेशंटांनी गच्च भरलेली आहे.. पण सारं कसं शिस्तीत चाललं आहे.. कुठेही गडबड गोंधळ नाही.. एक भयाण शांतता आहे.. स्मशानात असावी इतकी.. '

मी: 'मघाची ती धूर उडवणारी रिसेप्शनिस्ट आता स्मितहास्य फेकताना दाखवायची. तिला आता भरपूर वेळ आहे.. तिला एका छोट्या आरशात बघून मेकप करताना दाखवलं की झालं.'

सरिता: 'मग डॉक्टरच्या खोलीत कॅमेरा.. तो कंप्यूटरवर काही तरी टायपतोय. ते अर्थातच मेडएड पॅकेज असतं. मग डॉक्टर अत्यंत आनंदी चेहर्‍यानं म्हणतो 'मेडएडने होत आहे रे आधी मेडएडची पाहीजे'. ही स्लोगन कशी आहे?'

मक्या: 'किंवा.. तो डॉक्टर आणि त्याची बायको मस्त बीचवर फिरताहेत.. त्याची बायको म्हणते मेडएड ब्रिंग्ज पीपल टुगेदर'.

दिल्या: 'आता पेशंटांच्या चेहर्‍यांवर पराकोटीचं समाधान नांदतय.. जसे काही ते सदेह वैकुंठाला चालले आहेत... त्यातला एक म्हणतो.. उरलो उपचारापुरता'.

माया: 'ही मस्त आहे रे दिल्या!'

मक्या: 'ठीक आहे! मला चांगल्या आयडिया मिळाल्या आहेत सध्या पुरत्या! पुढचा महीनाभर ते पॅकेज खूप डॉक्टरांना दाखवायचं आहे. मग त्यांच मत कळेल. त्यानंतर जाहिरातीचं फायनल करणार आहोत. तर आता एकदम महीन्या नंतर भेटू'.

नेहमी प्रमाणे बराच उशीर झाला होता. सगळे ताबडतोब जे पांगले ते एकदम महीन्यानंतर मक्या आल्यावर भेटले. मक्याचा चेहरा आजही विचारमग्न दिसत होता. आजही कोरम फुल्ल होता.. आजही कुठली मालिका, सेल, नाटक सिनेमा असलं काही आड आलं नव्हतं. दिल्यानं तोंड फोडलं..

दिल्या: 'आज काय झालं रे? नवीन मार्केटिंग मॅनेजर घेतला का?'

मक्या: 'नाही रे! ते पॅकेज इतक्या डॉक्टरांना दाखवलं पण कुणालाच आवडलं नाही'

सगळे: 'व्हॉsssट?'

मक्या: 'अरे त्यात सगळं अकाउटिंग पण आहे ना, ते नकोय कुणालाच.'

दिल्या: 'आयला! खरंच की रे! त्यांचा सगळा कॅशचा व्यवहार असतो नाही का! हम्म्म! ते सोडून बाकीचं वापरा म्हणावं'.

मक्या: 'अकाउटिंग काढलं तर फार मोठा फायदा होणार नाही ते वापरून. आता माझ्यावरच 'उरलो उपचारापुरता' म्हणायची वेळ आलीय.'

मी: 'आता नक्कीच तुला त्या सीड्या हातगाडीवर टाकून 'एss! पॅकेजवालेssय!' ओरडत फिरायला पाहीजे.'


== समाप्त ==