Wednesday, September 7, 2011

वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन

जॉर्ज बुश त्याच्या टेक्सास मधल्या रँच वरच्या तळ्यात पाय बुडवून निवांतपणे विचारशून्य अवस्थेत मासे पकडत बसला होता. तसं 'विचारशून्य बुश' हे गाईचं गोमूत्र किंवा पिवळा पीतांबर म्हंटल्या सारखचं! आजुबाजूला ४-५ बॉडीगार्डस आपण त्या गावचेच नाही असं भासवायचा प्रयत्न करत उभे होते. वॉर ऑन टेररची घोषणा करून वर्ष दीड वर्ष होऊन गेलेलं होतं. जिकडे तिकडे विविध देशांचे सैनिक बिन-लादेन साठी गळ टाकून बसले होते, पण तो बिन-धास्त होता. दोन्हीही गळ टाकूंना यश नव्हतं.. आता गळ म्हंटल्यावर कसं कोण सापडणार? खरं तर बुशला 'ओसामा बिन लादेन' हे नाव मनातून फार आवडायचं, भारदस्त वाटायचं. डोक्यात खोल कुठेतरी स्वत:च नाव 'ओसामा बिन बुशेन' असं काहीतरी करावं असा पण विचार चालायचा. काही झालं तरी बुशच्या लोकप्रियतेला बिन लादेन मुळे उधाण आलं होतं.. अल्ला मेहरबान तो गधा पेहलवान म्हणतात तसं.. त्याबद्दल बुशला कृतज्ञता होती.. पण हे तो उघडपणे बोलू शकत नव्हता.

'मि. प्रेसिडेन्ट, आपल्याला डोनल्ड रम्सफेल्ड साहेबांचा फोन आहे'.. अचानक त्याची खाजगी सचिव, मार्गारेट ऊर्फ मॅगी, चिवचिवली आणि बुश एका विचारशून्य अवस्थेतून दुसर्‍या विचारशून्य अवस्थेत गेला. आधीची सेक्रेटरी, नताशा, बाळंतपणाच्या रजेवर गेल्यानंतर मॅगी नुकतीच जॉईन झाली होती.. पण अजून ती बुशच्या अंगवळणी पडली नव्हती.

'आयला! तू कोण? सिक्युरिटीssssssssssssssssss!'.. जरासा अनोळखी चेहरा दिसला तरी बुशला ती अतिरेक्यांची चाल वाटून छातीत धडधड व्हायची! पण आजुबाजूच्या ४-५ बॉडीगार्डस पैकी एकही धावत आला नाही. त्यांच्या ते अंगवळणी पडलेलं होतं!

'सर! मी मॅगी! नवीन सेक्रेटरी!'.. मॅगीनं न कंटाळता सुमारे ७३व्यांदा तेच उत्तर दिलं.

'मॅगी? ही नताशा आताशा दिसत नाही ती? कुठे गेली?'

'सर, ती बाळंतपणाच्या रजेवर गेली आहे! आणि आपल्याला डोनल्ड रम्सफेल्ड साहेबांचा फोन आहे'.. मॅगी थंड सुरात म्हणाली. बुशच्या दुर्लक्षामुळे मॅगीला उपेक्षितांचे अंतरंग अंतर्बाह्य उमजलं होतं.. कधी कधी तिला वाटायचं - एकवेळ क्लिंटनचं 'संपूर्ण' लक्ष चालेल पण बुशचं दुर्लक्ष नको!

'आयला! या डोनल्ड डकला हीच वेळ सापडली का? त्याला सांग एक मासा गावला की लगेच फोन करतो म्हणून!'.. माशांबरोबर चाललेल्या लपंडावात व्यत्यय आलेला बुशला खपत नाही.

'पण सर! ते अर्जंट मॅटर आहे म्हणतात!'.. त्यावर बुशचा चेहरा शँपेन मधे माशी पडल्यासारखा झाला.

'अगं! माशांचं मॅटर पण अर्जंटच आहे म्हणावं! तळलेले मासे तर फारच डिलिशस मॅटर असतं! ऑsss!'.. बुशच्या पायाला अचानक एक मासा चावून गेल्यानं तो कळवळला.. गळाला लावलेल्या मॅटर पेक्षा माशांना बुशच्या पायाचं मॅटर जास्त डिलिशस वाटलं असावं.

'सर! खरंच फार सीरियस मॅटर आहे म्हणत होते'.. मॅगी काकुळतीला आली.

'व्हॉटिज द मॅटर?'

'वेल! ते म्हणत होते की .. इटिज द मॅटर ऑफ द अँटी मॅटर दॅटिज द मोस्ट इंपॉर्टन्ट मॅटर! अ‍ॅज अ मॅटर ऑफ फॅक्ट, इटिज नॉट एक्झॅक्टली अ मॅटर देअरफर नॉट अ‍ॅन ऑर्डिनरी मॅटर, बट अ मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ!.. असं बर्‍याच वेळा मॅटर मॅटर म्हणाले! त्यावरून मला काहीतरी अर्जंट मॅटर आहे इतकंच समजलं!'.. कशाचाही अर्थबोध न होणारी सर्व वाक्यं लक्षात ठेवून, जशीच्या तशी, एका पाठोपाठ एक, धडाधड फेकण्याचं तिचं कौशल्य खरंच अफलातून होतं.. आपल्याकडच्या कुठल्याही परीक्षेत ती सहज पहिली आली असती.

'ओ माय गॉड! व्हॉटिज द मॅटर विथ यू?'.. मॅटरची मात्रा उगाळून उगाळून लावल्याने बुशच्या ग्रे मॅटरची पुरती वाट लागली.

'सर! आय मीन, देअर इज सम अर्जंट मॅटर ऑफ द अँटी मॅटर!'

'आँ! अगं नक्की काय ते सांग ना! अर्जंट मॅटर की अँटी मॅटर?'.. काही लोकांना बेडरुम, बाथरुम सारखंच मशरुम पण वाटतं त्यातला प्रकार!

'सर, दोन्हीही!'

'श्या! काय छपरी आहे लेकाची! साध्या एका मॅटर बद्दल धड बोलेल तर शप्पत! नुसती मॅटर मॅटर करतेय.. हिला पण मॅटर्निटी लीव्हवर पाठवायला पाहीजे' .. बुश स्वतःशीच पुटपुटला, मग तिला म्हणाला.. 'बरं जा! मॅटर घेऊन ये.. आय मीन.. फोन घेऊन ये!'

'सर, फोन इकडे आणता येत नाही! सिक्युअर लाईन आहे'

'आयला! सिक्युअर म्हणजे लाईन काय खांबाला सिक्युअर केली आहे काय? बरं! मी येतो तिकडे!'

बुश गळ टाकून.. म्हणजे सोडून.. फोन घ्यायला गेला.
'अरे डोनल्ड! लेका काय जगबुडी आली की काय? तुला मी कित्ती वेळा सांगितलंय की मला मासे पकडत असताना पकडू नकोस.. आय मीन.. डिस्टर्ब करू नकोस म्हणून! पटकन सांग आता काय मॅटर आहे ते? तिकडे मासे माझी वाट पहात आहेत!'

'सॉरी मि. प्रेसिडेन्ट! पण काय करणार मॅटरच तसं आहे! फॅक्ट ऑफ द मॅटर इज, मला तुम्हाला सांगणं भागच होतं, नो मॅटर व्हॉट यू आर डुइंग! इट्स अ मॅटर ऑफ द अँटी मॅटर! यू नो? देअर इज धिस अँटी मॅटर विच इज नॉट रिअली ए मॅटर!'. आज सगळ्यांना मॅटरची ढाळ का लागली आहे ते बुशच्या आकलनशक्तीच्या बाहेरचं होतं.

'डोन्या! मला जरा नीट सांगशील का?'

'सर! ते फोनवर सांगता येणार नाही! देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. तुम्ही ताबडतोब वॉशिंग्टनला या! मी डिफेन्सच्या शास्त्रज्ञांबरोबर आपली एक मिटिंग अ‍ॅरेंज केलेली आहे. त्यात सगळा उलगडा होईल'. देशाची सुरक्षितता म्हंटल्यावर बुशला काही पर्याय राहीला नाही. ९/११ च्या आधी असंच दुर्लक्ष केल्यामुळे फार मोठी नामुष्की झाली होती.. जगज्जेत्या मुष्टिधारकाच्या आकडेबाज मिशा त्याच्याच नाकावर बसून दिवसाढवळ्या कुरतडल्यासारखी! परत तसंच केलं तर तो निवडून येण्याची शक्यताच नव्हती. मॅगीला त्याने ताबडतोब एका विमानाची व्यवस्था करायचं फर्मान सोडलं.

'सर! एअरफोर्स वन विमानतळावर सज्ज आहे!'.. तिला कल्पना होतीच.

'अगं! मी येताना त्याच विमानाने आलो ना? आता जाताना एअरफोर्स टू ने जातो. म्हणजे अतिरेक्यांवर सॉलिड गेम पडेल. हे बघ! ९/११ नंतर मी प्लॅन केलेलं काहीच करायचं नाही असं ठरवलंय!'.. बुश 'व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी!' असा चेहरा करून डोळे मिचकावत म्हणाला.

'सर! ते 'एअरफोर्स टू'च आहे. पाटी बदलली आहे फक्त!'.. आता मॅगीने 'व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी!' असा चेहरा करून डोळे मिचकावले.

'वा! वा! ब्रिलियंट! बहोत खूब!'.. 'आपण त्याचं घर उन्हात बांधू हां!' म्हंटल्यावर पोरं कशी खुलतात तसा बुश खूष झाला.. आणि त्याला प्रथमच मॅगीबद्दल थोडा आदर वाटायला लागला.

व्हाईट हाऊसच्या मिटिंग रूम मधे बुशने पाऊल ठेवलं. तिथे स्टेट सेक्रेटरी कॉलिन पॉवेल, डिफेन्स सेक्रेटरी डोनल्ड रम्सफेल्ड, सेक्रेटरी ऑफ होमलॅन्ड सिक्युरिटी टॉम रिज आणि असेच बरेचसे सटर फटर सेक्रेटरी व डिफेन्स मधले तज्ज्ञ शक्य तितके लांब चेहरे करून बसले होते. मधून मधून शेजारच्याशी हलक्या आवाजात हातातल्या कागदांवर काहीतरी खुणा करत बोलत होते.

'हं! बोला काय प्रॉब्लेम आहे ते!'.. बुशने वेळ न घालवता मुद्द्याला हात घातला.. कारण त्याला लगेच परत जाऊन माशांना हात घालायचा होता.

'सर! सीआयए कडून एक इंटेलिजन्स रिपोर्ट आलाय. इराक वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन बनविण्याच्या प्रयत्नात आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यात तालिबान पण सामील असावं असा अंदाज आहे. ते जर खरं असेल तर तालिबान इथे 'रिटर्न ऑफ ९/११' करून हलकल्लोळ माजवेल'.. टॉम रिजने सूतोवाच केलं.

'आपल्याला माहिती पण नसलेलं असं कुठलं वेपन असणार ते? कुठलंही असलं तरी नोहाऊ आपल्याकडूनच ढापला असणार ना त्यांनी!'.. बुशला अमेरिकेच्या तंत्रज्ञानातल्या आघाडीबद्दल तिळमात्र देखील शंका नव्हती.

'नाही सर! त्याचा नोहाऊ आपल्याकडे नाही!'.. बुशला परत माश्याने चावा घेतल्याचं फिलिंग आलं.

'आँ! असं काय आहे जगात की जे अमेरिकन शास्त्रज्ञांनी शोधलेलं नाही!'

'आहे सर! इंटरनेट!'.. एक शास्त्रज्ञ पचकला.. तो मूळचा युरोपातला होता.

'हॅ! इंटरनेटसारखं चिल्लर काहीतरी नका सांगू हो! असो! काय नवीन वेपन आहे ते?'

'सर, ते अँटी मॅटर बाँब बनवत आहेत असं सीआयएचं म्हणणं आहे'.. परत मॅटरने डोकं वर काढल्यामुळे बुश खवळला.

'आरे! काय सकाळपासनं सगळे मॅटर अँटी मॅटर बडबडताहेत? मला कुणी साध्या सोप्प्या भाषेत या मॅटर बद्दल सांगणार आहे का?'.. पॉवेलनं एका शास्त्रज्ञाला खूण केली आणि तो बोलू लागला.

'मि. प्रेसिडेन्ट! आपल्या विश्वातल्या सर्व वस्तू ज्या पासून बनलेल्या आहेत त्याला मॅटर म्हणतात.. हे पेन, कागद, टेबल, कपडे, जमीन, गाड्या, घरं सगळं सगळं मॅटर पासून बनलंय! अँटी मॅटर म्हणजे असं मॅटर की जे मॅटर नाहीये.. पण मॅटरसारखं आहे. म्हणजे आपण अँटी मॅटरने बनलेल्या जगाची कल्पना केली तर त्यात सुद्धा हे पेन, कागद, टेबल, कपडे, जमीन, गाड्या, घरं.. सगळं सगळं असेल पण अँटी मॅटर पासून बनलेलं! त्यात अँटी माणसं असतील अँटी ऑक्सीजनवर जगणारी आणि अँटी जमिनीवर चालणारी, अँटी प्रोटॉन आणि अँटी इलेक्ट्रॉन म्हणजे पॉझिट्रॉन पासून बनलेला अँटी हायड्रोजन वायू असेल, असे प्रत्येक गोष्टींचे अँटी अवतार असतील. पण.. पण.. (इथे एक ड्रॅमॅटिक पॉझ) मॅटर आणि अँटी मॅटर एकत्र राहू शकत नाहीत. ते एकमेकांच्या संसर्गात आल्यावर एकमेकांना नष्ट करतात. व्हेन मॅटर अँड अँटी मॅटर इंटरॅक्ट, बोथ मॅटर अँड अँटी मॅटर सीझ टु मॅटर'.

'ऑं? नष्ट करतात? म्हणजे नक्की काय करतात?'

'म्हणजे एक ग्रॅम मॅटर आणि एक ग्रॅम अँटी मॅटर एकत्र आले तर २ ग्रॅम इतके मास (वस्तुमान) भस्मसात होऊन प्रचंड ऊर्जा बाहेर पडते.. E=mc**2 या सूत्राप्रमाणे! काहीही शिल्लक रहात नाही.'

'काहीच शिल्लक रहात नाही?.. राख, धूर वगैरे तरी राहीलच की!'.. बुशला ती कल्पना अल्कोहोल विरहीत बिअर सारखी वाटली.

'नो सर! काहीच नाही! नो मास! म्हणून तर आम्ही त्याला वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतो!'.. आता जोर 'मास' वर आला.

'आय सी! इटिज नॉट अ स्मॉल मॅटर देन!'.. बुशला नवीन शस्त्राची अंधुक कल्पना आल्यासारखं वाटलं.

'सर! बट देअरिज नो मॅटर लेफ्ट'.. 'नो' वर जोर देत शास्त्रज्ञ म्हणाला.. शास्त्रज्ञांना सगळं कसं अगदी प्रिस्साईज बोलायला लागतं.

'ओके ओके! पण मला सांगा, हे त्या लोकांनी कसं शोधलं? आपल्या शास्त्रज्ञांना कसं काय माहिती नाही याबद्दल?'.. माणसाची निर्मिती पण अमेरिकन शास्त्रज्ञांनीच केली असणार इतका बुशचा त्यांच्यावर अंध विश्वास होता!

'सर! आपल्याला माहिती होतं त्याबद्दल! पॉल डिरॅक या इंग्लिश शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावलाय.. खूप पूर्वी.. १९२८ मधे. पण कुणाला त्याचा बाँब बनवता येईल असं का वाटलं नाही ते माहीत नाही!'.. मधेच पॉवेलनं आपलं ज्ञान पाजळलं.

'त्याचं काय आहे सर, अँटी मॅटर सहजा सहजी मिळत नाही! खरं तर विश्वाची निर्मिती झाली तेव्हा मॅटर आणि अँटी मॅटर सम प्रमाणात निर्माण झालं होतं. पण आत्ता पाहीलं तर विश्वात सर्वत्र मॅटरच पसरलेलं दिसतंय. अँटी मॅटर कुठे गुल झालंय कुणास ठाऊक? त्याचा पत्ताच नाही'.. आता रम्सफेल्डला पण चेव चढला.

'अरे! तुम्ही गुगल करून पहा. गुल झालेल्या सर्व गोष्टी गुगल मधे सापडतात'.. ही सूचना ट्रॅफिक जॅम मधे सापडलेल्याला पार्किंग तिकीट देण्याइतकी मूर्खपणाची होती. आपल्यालाही थोडं फार समजतं असं शास्त्रज्ञांना दाखवायची खुजली बुशला नेहमीच व्हायची.

'विथ ड्यु रिस्पेक्ट मि. प्रेसिडेन्ट! पण नाही सापडलं!'.. आलेला सर्व वैताग 'मि. प्रेसिडेन्ट'च्या उच्चारात कोंबत एक शास्त्रज्ञ फणकारला.. मोठ्या पदावरच्या माणसाबरोबर बोलताना झालेली चिडचिड त्याच्या पदाच्या उल्लेखात दडपायची असते हे सर्वज्ञात होतं.

'मग नक्कीच ते अतिरेक्यांनी पळवलं असणार. दुसरं काय?'.. कधी मासे मिळाले नाही तर त्याचा ठपका बुश अतिरेक्यांवर ठेवायचा.

'एक्झॅक्टॅली सर! सीआयएचं तेच म्हणणं आहे. अतिरेक्यांनी ते पळवून इराकच्या आटलेल्या तेलविहीरीत लपवून ठेवलं आहे असा संशय आहे. तुम्ही नुसता इशारा करा, ८ दिवसात इराकवर कब्जा करून सगळं अँटी मॅटर तुमच्यापुढे हजर करतो. दॅट विल एंड द मॅटर वन्स अँड फॉर ऑल'.. युद्ध पिपासू रम्सफेल्ड चुकून एक शास्त्रीय सत्य बोलून गेला. सर्व शास्त्रज्ञांच्या कळपाला मात्र अँटी मॅटरचा आडोसा करून मोठी रिसर्च ग्रँट मिळवण्यात जास्त रस होता.

'अरे भाऊ! पण असा कसा काय एकदम हल्ला करता येईल? काही तरी ठोस कारण हवं! यूएन काय म्हणेल?'.. पॉवेलची राजनैतिकता जागी झाली. अँटी मॅटर वापरून इराक वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन बनविण्याच्या प्रयत्नात आहे, हे जगाला सांगितलं तर, अँटी-वॉर लॉबी आपल्याला उघडपणे विरोध करेल, असं वाटल्यामुळे, कुठेही अँटी मॅटरचा उल्लेख न करता, नुसतंच वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असं म्हणायचं ठरलं.

'पण मला एक सांगा! या अँटी मॅटर बाँबची वात मॅटरची असेल की अँटी मॅटरची?'.. बुशच्या वातुळ प्रश्नाने शास्त्रज्ञांना वात आला.. सर्व सेक्रेटरींनी मख्ख चेहरा करून शास्त्रज्ञांकडे पाहीलं. शास्त्रज्ञांच्या डोळ्यासमोर उदबत्तीने लवंगी फटाका लावणारा बुश आला. परत एकदा 'ड्यु रिस्पेक्ट' दिल्यावर एका शास्त्रज्ञाने त्याला अँटी मॅटर आणि मॅटर यांची भेसळ करून चालत नाही याची परत आठवण करून दिली.

'येस्स्स! मला एक आयडिया सुचली आहे. आपण अँटी मॅटर वापरून अँटी टेररिस्ट निर्माण करू या! म्हणजे, जेव्हा टेररिस्ट आणि अँटी टेररिस्ट दोन्ही एकमेकांना भेटतील तेव्हा एकमेकांना कायमचे नष्ट करतील'.. बुशची अजून एक 'व्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी!' मोमेंट!

'ग्रेट आयडिया! खरच सॉलिड आयडिया!'.. रम्सफेल्डनं भरभरून दाद दिली आणि बुशने मान ताठ करून बाकिच्यांकडे पाहीलं.

'मला वाटतं, आपण अँटी मॅटर वापरून टेररिस्ट निर्माण करायला पाहीजेत. कारण, अँटी-मॅटर वापरून केलेले अँटी-टेररिस्ट हे टेररिस्टच होतील.. दोन अँटी एकमेकांना कॅन्सल करतील म्हणून'.. टॉम रिजचं एक अभ्यासपूर्ण मत!

'मला वाटतं हे सगळं संशोधन करण्यासाठी आपल्याला एक नवीन सुसज्ज प्रयोगशाळा हवी. 'नवीन' या साठी की त्यामुळे ती आपल्याला गुप्त ठेवता येईल!'.. एका शास्त्रज्ञाची 'लोहा गरम है हाथोडा मार दो' मोमेंट!

ताबडतोब बुशने उदार मनाने कित्येक हजार कोटी डॉलरचं बजेट गुप्त प्रयोगशाळेसाठी दिलं. अँटी मॅटर अस्तित्वात असलं तरी ते काही मिली सेकंदाच्या वर टिकत नाही, हे शास्त्रज्ञांना माहिती होतं.. त्यांच्या वर्तुळात अँटी मॅटर ही एक टर उडवायची गोष्ट झाली होती. वॉर ऑन टेरर मुळे संशोधनाचं बजेट कमी करून डिफेन्सचं वाढवलेलं होतं. त्यामुळेच त्यांनी ते पैसे आनंदाने घेऊन त्यांच्या आवडत्या संशोधनावर घालवले. असामान्य गुप्ततेमुळे कुणालाच ते शास्त्रज्ञ कशावर आणि का काम करत आहेत ते समजायला मार्ग नव्हता.

दरम्यान, तिकडे प्रचार यंत्रणांनी, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनचा बागुलबुवा दाखवून युद्धाची संमती मिळवली. युद्ध करून, इराक काबीज करण्यात आलं. लगेच तिकडे शास्त्रज्ञांची टीम अँटी मॅटरचा शोध घ्यायला पाठविण्यात आली. अपेक्षेप्रमाणे, त्यांच्या हाताला अँटी मॅटरच काय कुठलंही सटर फटर मॅटर लागलं नाही.

शेवटी, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शनचं मॅटर क्लोज केल्यामुळे एक अँटी क्लायमॅक्स मात्र झाला.


-- समाप्त --