त्यांची माती, त्यांची माणसं!
'कुठल्याही देशात जा स्थानिक लोकं बाहेरून आलेल्या लोकांबद्दल चीड व तिरस्कार व्यक्त करताना दिसून येतील. एका दृष्टीने ते बरोबर आहे म्हणा! स्वतःचा प्रदेश ही बर्याच प्राण्यांच्या डोक्यात गोंदवलेली गोष्ट आहे. कुत्री, लांडग्यांपासून आदिमानवानापर्यंत आपल्या प्रदेशाचं रक्षण करणं, त्याच्या जवळपास कुणी येत नाही ना ते बघणं हे डिनए मधेच आहे. शिवाय, उपरे लोक त्यांच्या त्यांच्या विश्वात मग्न असतात, स्थानिक लोकात मिसळत नाहीत. म्हणून त्यांनी त्यांच्या कोषातून बाहेर पडायला हवं, इथल्या मातीत मिसळायला हवं!'... कुणाचं तरी भाषण मी जांभया देत ऐकत होतो. पण भाषणा नंतर जेवण असणार होतं त्यामुळे उठून पण जाता येईना. मनाशी म्हंटलं मी ह्यांच्या गर्दीत मिसळलो तरी मला एकाकी वाटतं तर मातीत काय मिसळणार? त्यातल्या त्यात पबात मिसळण्याची कल्पना भुरळ घालणारी आहे म्हणा! इकडचे पब हे आपल्या गावाकडच्या पारासारखे चकाट्या पिटायची प्रमुख ठिकाणं असतात. 'स्टिफ अपर लिप' वाले असले तरी या गोर्यांची पण जीभ तरल द्रव्यानं सैल होतेच व मग अदृश्य सांस्कृतिक भिंती कोलमडून पडतात. पण पबाचा उपयोग मातीत मिसळण्यासाठी करायचा असेल...