Tuesday, November 9, 2010

कोडग्यांची शाळा

'तुमच्या वेळेला कंप्युटर होता?'.. नव्या युगातल्या एका सळसळत्या रक्ताच्या अजाण कोडग्याने (प्रोग्रॅमरने) आश्चर्याने मला हा प्रश्न चॅट करताना विचारल्यावर हे नेट दुभंगून त्याला पोटात घेईल तर बरं असं वाटलं. हा शेंबड्या किती बोलतो? माझ्या लग्नाला जितकी वर्ष झालीयेत तेव्हढं याचं वय पण नाही. आणि हा त्या कालातल्या पुण्याच्या आयटीतल्या स्थानाबद्दल हे उद्गार काढतो? क्षणभर, गुहेतून बाहेर पडून वल्कलं संभाळत लकडी पुलापाशी शिकारीला जाण्याची दृश्यं तरळून गेली. पण क्षणभरच, मग विचार केला.. हल्लीचे लोक एखादी माहिती गुगलून नाही मिळाली तर ती अस्तित्वातच नव्हती असं सर्रास समजतात. नशीबानं, या बालकानं त्याचं अज्ञान माझ्यासमोर उघड केलं. अजून माझ्यासारखे, पुण्यातल्या आयटी रेव्होल्युशनचा पाया रचणारे, जुन्या पीढीतले कोडगे जिवंत आहेत. त्या काळी सुवर्णाक्षरांनी लिहीलेला आणि आत्ताच काळाच्या पडद्याआड चाललेला तो इतिहास आम्ही पुनरुज्जीवित करू शकतो. नाही केला तर पुढे याचं पण अयोध्या प्रकरण होऊ शकेल. तस्मात्, हा लेख तमाम कोडग्यांच्या डोक्यातली अज्ञानाची जळमटं व्हॅक्यूमने खेचून तिथे योग्य इतिहासाची लागवड करण्यासाठी लिहीला आहे.

तर, तुमच्या वेळेला कंप्युटर होता का? याचं थोडक्यात उत्तर 'हो' असं आहे. पुण्यात तर टीव्ही यायच्या आधीपासून कंप्युटर अस्तित्वात होता हे विधान मी कुठलही नशापाणी न करता करतो आहे. तुम्हाला ते 'वेदांमधे सगळ्या शोधांबद्दल माहिती आहे' छाप वाटू शकेल.

मी एसेस्स्तीत (१९७२) असताना पहिल्यांदा कंप्युटर पाहीला तेव्हा बाबा एसेस्सी बोर्डातच कामाला होते. त्या वेळेला त्यांनी, बोर्डात घेतलेला नवीन कंप्युटर दाखवायला, मला रंगलेल्या खेळातून ओढून, हट्टाने नेलं होतं. हल्ली पोरांना कंप्युटर वरच्या खेळातून ओढून मैदानावर न्यावं लागतं! आम्ही गेलो तेव्हा बोर्डातली दोन माणसं त्या कंप्युटरच्या एका सर्किट बोर्ड सदृश ठोकळ्याला वायरी जोडत होती. अनंत वायरींनी लगडलेला तो ठोकळा जटा पिंजारलेल्या साधूच्या डोक्यासारखा दिसत होता. नवीन वायर खुपसायची नेमकी जागा पहाण्यासाठी त्यांना केस बाजूला सारून ऊ शोधण्याची कसरत करावी लागत होती. त्यांनी मला खूपशा वायरी दाखवून जे बरच काहीबाही सांगीतलं त्या वरून कंप्युटरचं काम करायला इलेक्ट्रिशियन व्हायला लागतं हे पक्क ठसलं. पुढे मी एसेस्सीचा अडथळा निर्विघ्नपणे पार केला. त्या मागे माझ्या बाबांचा मोठा हात आहे असं माझ्या हितचिंतकांच ठाम मत आहे.. मला ते त्या कंप्युटरचं चुकून झालेलं चुकीचं वायरिंग वाटतं. पण ते काही मी त्यांना पटवू शकलो नाही! आजच्या कंप्युटरची बरोबरी जर माणसाशी केली तर त्या कंप्युटरला माकड म्हणायला लागेल इतक्या प्राथमिक अवस्थेतला तो होता.

मी जेव्हा कंप्युटरचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली त्या काळात एक विलक्षण गूढ वलय होतं कंप्युटर भोवती आणि शिकणार्‍यांभोवती! त्यामुळे सर्वसामान्यांमधे जरी एक आदराची भावना होती तरी आतल्या गाठीचे, खास मासलेवाईक, प्रश्न शनवार/सदाशिव पेठी लोकांकडूनच यायचे.. कंप्युटर तर सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरं देतोच मग तुमचा काय उपयोग? गणित चांगलं आल्याशिवाय कंप्युटर येत नाही अशी, सारसबागेच्या गणपतीला गेल्याशिवाय पेपर चांगला जात नाही सारखी, हूल कुणी तरी (बहुतेक गणिताच्या मास्तरांनी) उठवलेली होती. त्या सर्व गैरसमजुतींचा फायदा घेऊन काही धूर्त लोक आपल्या चुका बिनबोभाटपणे कंप्युटरवर ढकलायचे. पेपरात 'कंप्युटरच्या चुकीमुळे विद्यार्थी नापास' अशा सनसनाटी बातम्या झळकायच्या. कामगार संघटना 'नोकर्‍या जाणार, नोकर्‍या जाणार' म्हणून कंप्युटर धोपटायला बघायच्या. पूर्वीच्या आई बापांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडून दुसरं काही शिक्षण जगात असतं हे माहितीच नव्हतं.

हल्ली सगळं बदललंय. हल्ली सन्मान्य कोर्सचं शिक्षण पोरांना झेपत नसेल तर कंप्युटर शिकायचा सल्ला मिळतो! नेटभर बागडून आणि नाही नाही ते पाहून डोळे बिघडले तरी ठपका मॉनिटरवर ठेवला जातो. त्याचं भांडवल करून, वाढीव पैशाच्या मोबदल्यात, कामगार संघटना लोकांच्या नोकर्‍यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतात.

माझ्या माहितीत तेव्हाच्या पुण्यात दोनच कंप्युटर होते.. एक एसएससी बोर्डात आणि दुसरा विद्यापीठात.. बाकी अजून एक दोन पुण्याच्या खाजगी कंपनीत असावेत. विद्यापीठातला ICL 1904 नामक एक मेनफ्रेम कंप्युटर होता. त्याच सगळंच अवाढव्य होतं. स्वेटर न घालता गेलं तर थंडी भरून न्युमोनिया होईल अश्या गारढोण आणि भल्या मोठ्या जागेत तो बंदिस्त होता. तिथे फक्त कंप्युटर सेंटरच्या लोकांना प्रवेश होता. त्यांना पायताणं बाहेर काढून वेगळ्या सपाता घालून आत जावं लागे. आत जाणारे लोक बाहेरच्या गर्दीकडे तुच्छ नजरा टाकत आत जायचे. आत मधे, भिंतीच्या एका बाजूला मोठ्या वॉशिंग मशीनसारखी दिसणारी ४ कपाटं होती. एक कपाट म्हणजे ६४ एमबी इतकी दांडगी जागा असलेली हार्ड डिस्क होती.. त्या काळी ६४ एमबी म्हणजे अगदी झोपायला जागा आहे असं वाटायचं! आता असं वाटतं की त्या कपाटात मधाच्या पोळ्यासारखी खुराडी करून, पोळ्याच्या प्रत्येक षटकोनात एकेक बाईट ठेवला तरी ६४ एमबी पेक्षा जास्त बसले असते.

भिंतीच्या दुसर्‍या बाजूला, भस्म्या रोग झाल्यासारखा सतत कार्ड खाणारा कार्ड रीडर होता. दर मिनीटाला सुमारे हजारेक कार्ड तो फस्त करायचा. त्याच्याच शेजारी, स्वच्छ भिंतीवर ग्राफिटी करणार्‍यांची हलकी मनोवृत्ती असलेला आणि सतत कागदांच्या भेंडोळ्या ओकणारा प्रिंटर होता. तो छापखाना इतका कर्णकर्कश्य आवाज करायचा की ऑपरेटर बाहेर आल्यावर पण ओरडूनच बोलायचे. एकदा, बीएससीच्या पहिल्या सेमिस्टरचा निकाल होता.. एक जानेवारीला लावणार होते. आदल्या आठवड्यात रात्रभर बसून कित्येक हजार पानांचा तो निकाल छापला.. नंतर तो प्रत्येक सेंटर प्रमाणे पाकिटात घालताना लक्षात आलं की त्या वरची तारीख एक जानेवारी असली तरी वर्ष जुनच आहे.

तिसर्‍या बाजूला दोन महाकाय टेप ड्राईव्हज होते.. कॅसेट रेकॉर्डर समोर ते टॉर्च पुढे गॅसबत्ती सारखे वाटायचे. शेजारच्या मोठ्या कपाटात टेपा ठेवायची व्यवस्था होती. चौथ्या बाजूला सीपीयू आणि इतर गोष्टी असलेलं कपाट आणि एक ऑपरेटर कंसोल. त्या कंसोलला एक वेगळा प्रिंटर होता.. त्यावर कंप्युटर कडून ऑपरेटरला सूचना यायच्या. त्या वाचून ऑपरेटरची सीपीयू, टेप, रीडर आणि प्रिंटर यांच्यामधे पळापळ चालायची. कंप्युटरची मेन मेमरी १२८ केबी इतकी जबरा होती. या कंप्युटरला टर्मिनल्स नव्हती. प्रोग्रॅम आणि त्याला लागणारी माहिती कार्डांनी पुरवली जायची आणि प्रोग्रॅमचे फलित (आउटपुट) छापील कागदावर मिळायचं! हल्लीच्या काळात त्याला मेनफ्रेम म्हणणं म्हणजे डासाला डायनासॉर म्हणण्यासारखं वाटेल.

विद्यापीठात सामान्यत: कुठल्याही कोर्सची जबाबदारी एखाद्या विभागाकडे असते. त्या वेळेला कंप्युटर शिक्षणासाठी वेगळा विभाग नव्हता. त्यामुळे आमच्या या अनौरस कोर्सचं व्यवस्थापन इतर विभागातल्या एखाद्या मास्तरच्या गळ्यात घातलं जायचं. विषयांचे मास्तर बाहेरून आयात केले जायचे. आमच्या कोर्सचं सर्व प्रोग्रॅमिंग मेनफ्रेम वर चालायचं. प्रोग्रॅम पळवण्यासाठी आधी कार्डं पंच करायची. त्यासाठी प्रोग्रॅम हा प्रोग्रॅमिंग शीट वर लिहायचा आणि ते कागद पंच ऑपरेटरला (आमच्या भाषेत पंचर) द्यायचे. प्रोग्रॅमिंग शीटवरची एक ओळ म्हणजे एक कार्ड. पंचरच्या दुकानात सिद्धिविनायकासारखी मोठी रांग असायची. कधी कधी प्रोग्रॅम पंच होऊन मिळायला आठवडा पण लागायचा. स्वतःचा प्रोग्रॅम स्वतः पंच करायची सोय होती. पण त्यासाठी स्वतःची कार्ड वापरायला लागत. एका कार्डाला ५ पैसे पडायचे, तेव्हा ३०-३५ कार्डांच्या प्रोग्रॅमचे पैसे पाहीले की तोंडाला फेस यायचा हो! पंचरकडे काम दिलं की कसं सगळं फुकटात व्हायचं!

पंच झालेला प्रोग्रॅम, म्हणजे एका रबर बँडने मुसक्या बांधलेला कार्डांचा गठ्ठा, हातात पडला की तो कंप्युटर ऑपरेटरला नेऊन द्यायचा. अल्पावधीतच आमच्याकडे ढिगानी रबर बँड जमली.. कुठल्याही खिशात हात घातला तरी पैसे नाही पण रबर बँड नक्कीच सापडायचं. आम्हा बँडवाल्यांना त्या ढिगाचं काय करायचं हा यक्ष प्रश्न होता. थोड्याच दिवसात, रबर बँड विशिष्ट पद्धतीने बोटांना अडकवलं तर गोळीसारखे मारता येतं असा शोध काही अत्राप कार्ट्यांनी लावला. मग काय? जरा वेळ मिळाला की तुंबळ बँड वॉर सुरू व्हायचं. (रबर बँड कसं मारायचं याच्या अधिक माहिती साठी मला भेटा अगर लिहा. चांगल्या वर्तणुकीचा दाखला आवश्यक!).

कोर्सचे प्रोग्रॅम दळण्याच्या दोनच वेळा होत्या, सकाळी ११ आणि दुपारी ३. बाकीच्या सर्व वेळ खाजगी कंपन्यांना आणि विद्यापीठाला वापरायला दिलेला होता. या वेळांच्या आत कार्डांचे गठ्ठे देण्यासाठी धुमश्चक्री चालायची.. त्यात पंचरला पटविण्यापासून त्याच्याकडच्या रांगेचं अवैध मॅनिप्युलेशन पर्यंत सर्व चालायचं. गठ्ठे दळायला आत गेले की तिथे मॅटर्निटी वॉर्डच्या बाहेरचं वातावरण व्हायचं. सगळ्यांच्या चेहर्‍यावर काळजी मिश्रीत हुरहुर आणि शंका... कस्सं होणार? या वेळेला तरी टॅहँ ऐकू येणार का?

कार्डांच्या गठ्ठ्याला बांधलेली फलिताची (प्रिंटाउटची) सुरळी या स्वरूपात दळण बाहेर यायचं. कधी कधी, गहू दिल्यावर हळद दळून मिळाल्यासारखं, आपल्या कार्डांना भलत्याचीच सुरळी चिकटून यायची. तसं झालं की 'माझ्या प्रोग्रॅमची सुरळी हरवली, ती मला सापडली' असल्या बडबडगीतांनी सेंटर आणि कँटिन दणाणून जायचं. दळण आलं की उत्सुकतेने सुरळी उघडून बघितली जाई. बहुतेक वेळेला काही ना काही तरी चुकलेलंच असायचंच. त्यामुळे टॅहँ ऐवजी टाहोच जास्ती ऐकू यायचा. मग काय चुकलंय ते चहा बिडी मारून सुप्त मेंदुला चालना दिल्या शिवाय समजायचं नाही.

चूक सापडली की गठ्ठ्यातली चुकीची कार्ड शोधून त्याजागी नवीन कार्डं पंचून घालायला लागायची.. ते काम पंचरला दिलं तर ते कधी मिळेल त्याचा भरवसा नसायचा. त्यावर आम्ही एक जालीम उपाय शोधून काढला होता. एका कार्डावर १२ ओळी व ८० कॉलम असतात. एका कॉलम मधे एकच कॅरॅक्टर पंच करता येतं. एका कॉलम मधे कुठल्या ओळीवर भोकं मारली आहेत त्यावरून कुठलं कॅरॅक्टर पंच केलंय ते कळतं. एका कॉलममधे जास्तीत जास्त ३ ओळींवरच भोकं असतात. एकही भोक नसेल तर ते स्पेस कॅरॅक्टर. पोथी वाचणारे काय वाचतील इतक्या सराईतपणे आम्ही नुसती भोकं बघून कार्ड वाचायला शिकलो होतो. त्यामुळे कोर्स संपल्यावर सेंटर मधे निदान स्टँडबाय कार्ड रीडरची नोकरी पक्की होती. आम्ही पंचिंग रूम मधून भोकं पाडल्यावर पडतात त्या टिकल्या जमा करायचो. त्या टिकल्यांनी फॉल्टी कार्डावरची अनावश्यक भोकं बुजवून परत योग्य भोकं पाडून वापरायचो. अशी होलिस्टिकली मॉडिफाईड कार्ड रीडरला चालायची. फक्त, कार्ड थोडं ओलं असेल किंवा वापरून वापरून मऊ पडलं असेल तर रीडर मधे ते अडकायचं आणि पुढचे २०-२५ गठ्ठ्यांच्या राई राई एवढ्या चिंधड्या मिळायच्या. 'हेचि फळ काय मम प्रोग्रॅमला' अशी खंत करत कोडगे ते तुकडे कवटाळत भग्न हृदयाने कँटीनला जायचे.

या सर्व प्रक्रियेमधे एक प्रोग्रॅम सुरळीत व्हायला (तसे सर्व प्रोग्रॅम सुरळीतच मिळायचे, पण इथे सुरळीतचा रूढ अर्थ अपेक्षित आहे.) किमान दोन आठवडे तरी जायचेच. ही परिस्थिती जरा तरी बरी होती. कंप्युटर आणायच्या आधी विद्यापीठात फोर्ट्रान प्रोग्रॅमिंगचा एक कोर्स चालायचा. त्याचे प्रोग्रॅम तर मुंबईत टिआयएफारला दळायला जायचे. पंचर सगळे प्रोग्रॅम घेऊन मंगळवारी सकाळी मुंबईला जायचा, दळण झालं की सुरळ्या घेऊन रात्री पुण्यात यायचा. बुधवारी सगळ्यांनी चुका दुरुस्त करून दिल्या की गुरुवारी अजून एक दळण व्हायचं. यातच दळणवळण शब्दाची उत्पत्ती दडली आहे की काय कोण जाणे! अशा प्रकारे एक प्रोग्रॅम बरोबर चालायला किती आठवडे लागतील त्याचा हिशेब वाचकांना गृहपाठ म्हणून दिलेला आहे!

प्रोग्रॅम सुरळीत होण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी, आम्ही लिहीलेला प्रोग्रॅम १०-१० वेळा तपासून मगच पंचरला द्यायचो. पंच झालेला गठ्ठा स्वतःच वाचून त्यातली चुकीची कार्ड आधीच दुरुस्त करायचो. या पद्धतीने शिकण्याचा एक प्रचंड फायदा झाला.. तो म्हणजे, स्वतःच्या प्रोग्रॅमला 'आपला तो बाळ्या' अशी पक्षपाती वागणूक न देण्याची सवय आपोआपच लागली. हल्लीच्या कोडग्यांसारखं १० ओळी लिहून लगेच डिबगर खाली त्या चालवणं म्हणजे कन्याकुमारी ते दिल्ली बस प्रवासात दर १० मिनीटांनी, 'आलं का दिल्ली?' असं विचारण्यासारखं वाटतं मला!

जितकी मजा कंप्युटरला जोडलेली यंत्रं करायची तितकीच आमचे मास्तर आणि पोरं करायची. मला फोर्ट्रान शिकवायला एक अत्यंत तिरसट, खडूस आणि विक्षिप्त मास्तर होता. बोलायच्या ऐवजी तो खेकसायचाच! जर का एखाद्याची चूक त्याला दिसली तर तो त्याला कार्ड रीडरसारखा फाडून खायचा. त्याला आम्ही तिरसिंगराव म्हणायचो. कोर्स सुरू होऊन महिना होऊन गेला तरी पठ्ठ्या शिकवायला उगवलाच नाही. पोरांनी कंटाळून लेक्चरला येणं बंद केलं. कुणी तरी 'वर' तक्रार वगैरे केल्यावर एक दिवस तो उगवला. वर्गात कमी पोरं बघून लगेच खेकसला.. 'बाकीचे कुठे आहेत? सगळे आल्याशिवाय मी लेक्चर घेणार नाही'.. आणि गेला. पुढच्या लेक्चरला सगळ्या पोरांना बाबापुता करून जमवलं. वर्गात आल्या आल्या तो गरजला 'प्रत्येकाकडे फुलस्केप वही आणि पेन्सील पाहीजे. त्या शिवाय मी लेक्चर घेणार नाही.' आयला! पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे की शाळा? पण करतो काय? आलिया तिरसटाशी असावे सादर! पुढच्या लेक्चरला सगळे वही पेन्सील घेऊन हजर! म्हंटलं, चला! आता तरी याची सगळी कारणं संपली असतील.

पण कसचं काय? तो सवाई तिरसिंगराव निघाला. लेक्चरला आल्या आल्या त्यानं फळ्यावर लिहीलं 'I = 1' आणि गुरकावला 'सांगा, याचा अर्थ काय होतो?'. पहिलीतल्या पोरांना वर्गमूळ काढायला सांगितल्यावर त्यांचं जे काय होईल तेच आमचं झालं. बरेच जण माना खाली घालून बसले. खरे कोडगे खिडकी बाहेरच्या हिरवळीचं रसग्रहण करत बसले. दोन मिनिटातच तो 'याचं उत्तर आल्याशिवाय मी लेक्चर घेणार नाही' असं ठणकावून निघून गेला. मग परत सगळे 'वर' गेल्यावर तो 'खाली' आला आणि पुढचं शिक्षण नीट सुरू झालं. लवकरच 'I = 1' म्हणजे काय ते समजलं पण गाडी 'I = I + 1' वर अडली. दोन्ही कडचे I कॅन्सल होऊन 0 = 1 होतं आणि तरीही कंप्युटरला ते चालतं हे समजण्यात आणखी काही दिवस गेले. बाकी, त्याचा मूड चांगला असला तर तो शिकवायचा मात्र उत्तम!

काही वर्षानंतर मी मुंबईहून डेक्कन क्वीनने पुण्याला येत असताना माझ्या वर्गातली दोन तीन मुलं भेटली. गप्पाटप्पात तिरसिंगरावाचा विषय निघाला. सगळे त्याची नक्कल करत करत त्याचे किस्से सांगून मनमुराद खिदळत होते.. इतक्यात, समोरचा एक वृद्ध माणूस पुसता झाला.. 'तुम्ही हे त्या विद्यापीठातल्या अमुक अमुक प्रोफेसरबद्दल बोलताय का?'. होकारार्थी उत्तर मिळाल्यावर त्या गृहस्थांनी गुगली टाकला.. 'नशीबवान आहात, थोडक्यात सुटलात'. आँ! म्हणजे काय? हा माणूस बालवाडीपासून त्याचा विद्यार्थी आहे की काय? कुणालाच काही समजलं नाही. भुवया उंचावून प्रश्नार्थक मुद्रेने एकमेकांकडे पाहिल्यावर एकाने विचारलं 'म्हणजे? तुमचं म्हणणं समजलं नाही हो नीट!'. त्यावर तो कळवळून 'अहो! तो माझा जावई आहे हो!' म्हणताच एकदम सगळ्यांचा कडेलोट झाला.

आमचा दुसरा एक मास्तर अगदी हसतमुख होता, कधीही चिडायचा नाही. तो विद्यापीठा जवळच रहायचा, खूप हुषार होता आणि खूप वेगवेगळे विषय शिकवू शकायचा. साहजिकच, प्रत्येक वर्षाला काहीना काही तरी तो शिकवायचाच. फक्त, प्रचंड विसरभोळेपणा हा एकच त्याचा प्रॉब्लेम होता.. त्याचा म्हणण्यापेक्षा आमचा! त्याला लेक्चरची वेळ कधीही आठवायची नाही. आठवलीच तर काय विषय शिकवतोय ते आठवायचं नाही. आणि चुकून हे सगळं आठवलंच तर मागच्या लेक्चरला कुठपर्यंत शिकवलं होतं ते आठवायचं नाही. कित्येक वेळेला लेक्चरच्या वेळेला तो आम्हाला न सांगता बाहेर गेलेला असायचा. त्यामुळे त्याचा विषय मागे पडायचा. मग रविवारी जादा लेक्चर व्हायची. एका रविवारी सकाळी ११ वाजता त्याच्या लेक्चरला गेलो.. नेहमी प्रमाणे त्याचा पत्ताच नव्हता. मग घरी बोलवायला गेलो.. पायजमा शर्ट असल्या कपड्यात तो घरी निवांत होता. आम्हाला दारात पहाताच हसत हसत म्हणाला 'मी काहीतरी विसरलोय ना? काय विसरलोय?'. हा इसम, खुद्द त्याच्या बायकोला दिलेला शब्द पण विसरायचा. हे तो मुद्दाम करायचा की नाही याबद्दल तज्ज्ञात मतभेद आहेत. तरीही अजून त्यांचा संसार मात्र सुरळीत चालू आहे.

कोबॉलचा प्रोग्रॅम म्हणजे एक मोठ्ठाच्या मोठ्ठा निबंध असतो. त्यात सुरुवातीच्या भागात CONFIGURATION SECTION आणि त्या नंतर SOURCE-COMPUTER असं लिहून कंप्युटरचं नाव लिहायचं असतं. एका पोराने त्याच्या प्रोग्रॅम मधे एकदा SOURCE-COMPUTER चं स्पेलिंग चुकवलं. साहजिकच, कंप्युटरने झापड मारली 'SOURCE-COMPUTER MISSING'. त्याला त्याचा अर्थच कळाला नाही. बिच्चारा! जातीचा सरदार होता तो, अगदी त्यांच्या लौकिकाला साजेलसं वागला.. ऑपरेटरला कंप्युटर हरवला आहे का असं विचारून आला!

मी पास झाल्यावर (या खेपेला कंप्युटरची काहीही चूक नव्हती, कारण निकाल मुळात कंप्युटरवर काढलेला नव्हता) काही वर्षांनी कंप्युटर शिक्षणाचा स्वतंत्र विभाग झाला. त्या विभागाने त्यांच्या कोर्सेस साठी स्वतंत्र कंप्युटर घेतला. कालांतराने मेनफ्रेमचे ते सेंटर बंद होऊन ती जागा सीडॅकला देण्यात आली.

== समाप्त ==