माझे वडील सरकारी B.Ed. कॉलेजचे प्राचार्य असल्यामुळे दर एक-दोन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे महाराष्ट्रातील काही खेडेगाव-वजा-शहरात माझं बालपण जास्त गेलं. मी बारा भानगडी केलेल्या नसल्या तरी बारा गावचं पाणी जरूर प्यालेला माणूस आहे! पुण्याच्या बाहेरच्या शाळा विशेषत: मराठवाड्यातल्या प्रचंड विनोदी होत्या. मराठवाडा तेव्हा मागासलेला होता त्यामुळे त्यांचा दर्जा पुण्यातल्या शाळांच्या खूप खाली आणि अभ्यासक्रम सुद्धा एक वर्ष अलिकडचा होता. नववी मधे पुण्यातल्या शाळेत आल्यावर मला समजलं की मला कुठल्याच विषयातलं काहीच समजत नाही आहे. पुण्यात आठवीतच संस्कृत विषय सुरू झाला होता आणि रामरक्षेतल्या थोड्या फार श्लोकांपलीकडे काही माहीत नव्हतं. गणितात सगळे प्रमेय व रायडर्स नामक अगम्य भाषा बोलायचे. आयुष्यात तेव्हा पहिल्यांदा मी खचलो. मला कुठलीच शाळा कधीच न आवडायला ते एक कारण झालं. कुठल्याही विषयाची गोडी लागली नाही, मराठीची देखील! माझा एक नंबरचा शत्रू म्हणजे कुठल्याही भाषेचं व्याकरण! 'हत्ती मेला आहे'.. व्याकरणाने चालवून दाखवा सारखे प्रश्न डोक्यात तिडिक आणायचे. निबंध झेपले नाहीत. त्यामुळे मला कुठल्याही भाषेतलं प्राविण्य नाही.. अगदी मराठीतलं सुद्धा!
नेटवर इतर लेखकांचे ओघवत्या मराठीतील लेख किंवा त्यांची शब्दसंपत्ती बघतो तेव्हा मला त्यांचं फार कौतुक वाटतं आणि माझ्यातलं वैगुण्य जाणवतं. कमी प्राविण्यामुळे लेख लिहायला मला खूप वेळ लागतो.. बर्याच वेळेला शब्द आठवत नाहीत, शब्दाचा अर्थ माहीत नसतो किंवा योग्य शब्द माहीत नसतो. काही वाचकांनी मला 'तुमची भाषा सोपी नी सुटसुटीत असते. उगीच भयंकर जड शब्द, ड्रॅमॅटीक नसते. मला वाचायला सोपी वाटते' अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याचं खरं कारण हे आहे की मी जड भाषेत लिहूच शकत नाही. मराठी शब्द सुचला नाही म्हणून बेधडक इंग्रजी शब्द वापरून पुढे जायला मला आवडत नाही. मला जे म्हणायचंय त्याला मराठीत नेमका शब्द/वाक्प्रचार शोधून देखील नाही मिळाला तरच मी नाईलाजास्तव इंग्रजी शब्द घालतो. पण मराठीतील नेहमीच्या वापरातले टेबल वगैरे सारखे इंग्रजी शब्द मी जसेच्या तसे वापरतो. तसंच जर कधी कथेतल्या पात्राची गरज असेल तर सरसकट इंग्रजी श्ब्द/वाक्य वापरतो. वैज्ञानिक विषयांवर लिहीताना इंग्रजी शब्दांना बर्याच वेळेला पर्याय नसतो.
माझ्या लहानपणी घरात रेडिओ नव्हता, तर टिव्ही भारतात पोचलेलाच नव्हता. माझं वय आत्ता 67 आहे त्यावरून तो काळ किती जुना होता याची कल्पना येईल. खेळाची साधनं कमीच होती. माझा जास्त वेळ उनाडक्या करण्यात नाही तर इतर मुलांबरोबर खेळण्यात जायचा. तरीही वेळ उरायचाच कारण आजच्या काळासारखी रोज कुठल्या न कुठल्या क्लासला जायची पद्धत नव्हती. तो वेळ मी पुस्तकं खाण्यात घालवत असे. मला वडिलांच्या कॉलेजच्या ग्रंथालयातली अनेक पुस्तके वाचायला मिळाली. लहान मुलांसाठी लिहीलेली जादुचा पोपट, फास्टर फेणे किंवा चांदोबा पासून त्या वयात न झेपणारी चि. वि. जोशी, पु. ल., अत्रे किंवा द. मा. मिरासदार यांची पुस्तके पण खाल्ली. पुढे कॉलेजात गेल्यावर इंग्रजी पुस्तकेही खाल्ली. या सगळ्या वाचनाचा माझ्यावर काही तरी परीणाम कळत नकळत झाला असणार, विशेषत: पुलंनी लिहीलेल्या व्यक्तिचित्रणांचा! कारण, कॉलेजच्या पहिल्या वर्षात (1972-73) नोटिस बोर्डावर वार्षिकासाठी लेख पाठवा हे वाचल्यावर झपाटून जाऊन मी एक व्यक्तिचित्र लिहीलं. त्यात माझ्या एका मित्राच्या आयुष्यातल्या आणि थोड्या काल्पनिक गमती होत्या. ते कॉलेजच्या वार्षिकात छापून आलं. काही मित्रांना आवडलं. ते लिखाण सहजपणे घडलं. मला काही प्रयास करावे लागले नाहीत. म्हणूनच बहुतेक मला त्याचं काही विशेष वाटलं नाही, अजूनही वाटत नाही.
कॉलेजच्या दुसर्या वर्षानंतर माझ्या वर्गातली हुशार मुलं इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला निघून गेली. सुमार बुद्धिमत्तेमुळे मला मार्क कमी पडले व कुठेच प्रवेश मिळाला नाही. मग मी धोपटमार्गा सोडू नकोस हे म्हणत B.Sc. करायचं ठरवलं. आमच्या बिल्डिंगमधला एक मित्र वर्ध्याला डॉक्टरकी करायला गेला. कधी झटका आला तर मी त्याला पत्र लिहीत असे. त्यात आमच्या बरोबर खेळणार्या मुलांचं सध्या काय चाललंय यावर विनोद असायचे. एकदा तो सुट्टीला घरी आला असताना मला म्हणाला की तुझी पत्रं फार छान विनोदी असतात. माझी फार करमणूक होते. माझीच नाही तर माझ्या रूम पार्टनरची पण! तो म्हणतो की.. हा कोण तुझा मित्र? काय मस्त पत्रं लिहीतो! ते ऐकल्यावर मला फार गार गार वाटलं.
कॉलेजच्या तिसर्या वर्षात माझी ज्ञानप्रबोधिनी मधून आलेल्या राजीव बसर्गेकरशी मैत्री झाली. भरपूर मार्क पडलेले असूनही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला न गेलेला माझ्या माहितीतला हा पहिला माणूस! तो हुशार तर होताच शिवाय हरहुन्नरी देखील! मला त्याचा आदर वाटायचा! त्याचा ज्ञानप्रबोधिनीतील मित्र अरविंद परांजपे याचीही मैत्री झाली. तो तबला छान वाजवायचा, अजूनही वाजवतो. संगिताची चांगली जाण असलेला माझ्या माहितीतला हा पहिला माणूस! तेव्हा बाबासाहेब पुरंदरे आमच्याच बिल्डिंगमधे रहात असत. त्यांचा मुलगा अमृत माझ्याच वयाचा! आमच्याच कॉलेजात होता. शिवापूरहून रोज कॉलेजला येजा करणारा उमेश देशपांडे, राजीव, अरविंद, अमृत आणि मी चांगले घट्ट मित्र झालो. अजूनही आहोत. त्याच वर्षात कॉलेजने एक एकांकिका स्पर्धा आयोजित केली. ती कॉलेजमधल्याच वेगवेगळ्या वर्षातल्या आणि शाखेतल्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित होती. प्रथम राजीवने त्यात भाग घ्यायची कल्पना मांडली. म्हणून आम्ही स्त्री पात्र नसलेल्या एकांकिका शोधायला लागलो. त्या काळात कॉलेजातली मुलं मुली एकमेकांशी फारशी बोलत नसत. नाटकात एकत्र काम करणं तर खूप पुढची गोष्ट!
आम्हाला हवी तशी एकांकिका न मिळाल्यामुळे राजीवने 'आपणच एक लिहू या' असं सहजपणे म्हंटल्यावर मी वासलेला ऑं मला अजून आठवतोय. कुणाला साधं लेखन कशाशी खातात हे देखील माहीत नाही त्यात हा नाटक लिहायचं म्हणतो म्हंटल्यावर ते साहजिकच होतं. त्याच्याही पुढे त्याचा वगनाट्य लिहण्याचा आग्रह होता. तो सोडता इतरांना साधं नाटक आणि वगनाट्य यातला फरक देखील माहीत नव्हता. मग त्याने वगनाट्यातल्या गण, गवळण व वग या भागांबद्दल सांगितलं. पण गवळण करायला मुली पाहिजेत, त्या कुठून आणणार? यावर खल करता करता गवळणींच्या जागी गवळी आणायचं ठरलं. आदल्या वर्षी कॉलेजच्या एका वर्गाची सहल लोणावळ्याला लोकलने गेली असता पोरांच्या व काही गवळ्यांच्या बाचाबाचीच पर्यवसान गवळ्यांनी पोरांना बदडण्यात झालं होतं. आम्ही त्या पार्श्वभूमीचा वापर केला. राजीवनेच सगळं लिखाण केलं. नंतर मी फक्त त्यात काही विनोद घुसडले.
हे वगनाट्य कसं झालं आहे याची चाचणी घेण्यासाठी राजीवने त्याचं वाचन आमच्याच वर्गातल्या काही मुलांसमोर केलं. त्यातल्या कुणालाही ते न आवडल्यामुळे आमचे चेहरे चांगलेच पडले. तरी स्पर्धेत एकांकिका करण्याबद्दल एकमत होतं. अरविंदने संगीत दिलं शिवाय ढोलकी वाजविण्याचं महत्वाचं कामही केलं. एकांकिकेत एक मित्राला राजाचं काम दिलं, उमेश कोतवाल तर मी प्रधान झालो. स्पर्धेत आमच्या एकांकिकेची सुरुवात झाल्यावर थोड्या वेळाने राजा व प्रधान रंगमंचावर असताना कोतवाल एंट्री घेतो. उमेशने त्या एंट्रीलाच इतका हशा पिकवला की मला रंगमंचावर हसू आवरेना. जबरदस्त अभिनयामुळे उमेशने परिक्षकांसकट सगळे प्रेक्षक खिशात घातले आणि आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं. तालमी करताना लोकांना ते इतकं विनोदी वाटेल किंवा आम्हाला पहिलं बक्षीस मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं! त्याचं सगळं श्रेय अर्थातच फक्त राजीव आणि उमेशला! आचार्य अत्रेंनी देखील अशा प्रकारचा अनुभव आल्याचं लिहीलं आहे. त्यांच्या एका विनोदी नाटकाची (मला वाटतं साष्टांग नमस्कार) रंगीत तालीम बघताना त्यांना व बघणार्यांना मुळीच हसू आलं नाही. नंतर त्यांनी फक्त एक दोन प्रयोग पुण्यात करून नंतर बाहेरगावी जायचा सल्ला दिला. पण प्रत्यक्ष पूर्ण भरलेल्या नाट्यगृहात जेव्हा ते सुरू झालं तेव्हा पहिल्या प्रवेशापासून शेवट पर्यंत लोक खो खो हसत होते. अत्रेंनी त्याचं कारण मूठभर लोकांच मन आणि समुदायाचं मन (crowd mind) याच्यातल्या फरकाला दिलं आहे.
एकांकिकेच्या लिखाणात माझं योगदान फारसं नसलं तरी मला एक चांगला अनुभव मिळाला व असं काही लिहीता येतं असा एक विश्वासही! पुढच्या वर्षी आम्ही दोघांनी अजून एक एकांकिका लिहीली पण तेव्हा पारितोषिक मिळालं नाही. या अनुभवाच्या जोरावर मी नंतर विद्यापीठातही गॅदरिंगला एकांकिका लिहील्या. विद्यापीठात असताना उमेशने एक वगनाट्य लिहून पुरुषोत्तम करंडकात दिग्दर्शनाचं पहिलं बक्षिस पटकावलं. तिथेच जब्बारने त्याला पाहिलं आणि तीन पैशाच्या तमाशात काम दिलं. तो हवालदाराचं व विष्णूचं काम करीत असे. विष्णूचा एक संवाद 'थांबा रे! अंधार करा मला अंतर्धान पाऊ द्या!' हमखास हशा मिळवायचा.
पदार्थविज्ञान विषयात M.Sc. केल्या नंतर मला कॉलेजात प्राध्यापकाच्या नोकरी शिवाय इतर फारसे पर्याय नव्हते. M.Sc. नंतर एका कॉलेजातील एक प्राध्यापिका बाळंतपणाच्या रजेवर गेल्या म्हणून त्यांच्या जागी तीन महिन्यासाठी माझी निवड झाली. त्या नंतर कॉलेज मला कायमची नोकरी द्यायला तयार होतं पण मला त्या तीन महिन्यातच त्या नोकरीचा पुरेसा कंटाळा आला. म्हणून मी विद्यापीठात संशोधन करायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. संशोधन करायच्या ऐवजी मी जास्त वेळ कॅरम खेळण्यातच घालवत असे. पण संशोधनच्या निमित्ताने मला कंप्युटर (विद्यापीठातला ICL नामक मेनफ्रेम) चांगला वापरता यायला लागला. त्या वापरामुळे माझ्याकडे कंप्युटरच्या पाठकोर्या कागदाची प्रचंड रद्दी असायची. कधी तरी फार ऊर्मी आली तर मी त्यावर काही खरडत असे. पण ते कुणालाच कधी दाखवलं नाही.
संशोधनाच्या निमित्ताने माझं जयकर ग्रंथालयात नेहमी जाणं येणं असे. तिथले काही कर्मचारी कधी कधी जरासे खडूसपणे बोलायचे. तसंच तिथे एखादं पुस्तक शोधणं एक दिव्य होतं, निदान मला तरी तसं वाटायचं. मग त्यावरती एक विनोदी लेख लिहीला. एकदा पदार्थविज्ञान विभागात एक सिंपोझियम झालं. ते तीन दिवस चालू होतं. त्यात देशातले बरेच संशोधक आलेले होते. त्याचं व्यवस्थापन करताना बर्याच गमती जमती झाल्या. त्या आणि आलेल्या संशोधकांच्या तर्हा व तर्हेवाईकपणा यावर एक लेख लिहीला. त्यात मी कॅरमचं सिंपोझियमचं व्यवस्थापन आणि कॅरमच्या विविध बाबींवर प्रकाश टाकणारी भाषणं यावर विनोद केले होते.
त्या सुमारास माझी बहीण विद्यापीठात मराठी मधे M.A. करत होती. डॉ अनिल अवचट विद्यापीठात काही संशोधनाच्या निमित्ताने रोज येत असत. कशी कुणास ठाऊक पण बहीणीची अवचटांबरोबर चांगली दोस्ती झाली. अवचटांना लेख/पुस्तके लिहायला कागदांची गरज असे. त्यामुळे तिने माझी आणि त्यांची ही ओळख करून दिली. आणि मी त्यांचा अधिकृत रद्दी पुरवठादार झालो. अवचट बर्याच वेळा आमच्या घरी येत असत. मी बहुतेक वेळा घरी रात्री उशीरा येत असल्यामुळे माझी आणि त्यांची फार वेळा भेट झाली नाही. एकदा ते घरी आले असताना बहीणीने माझा जयकर वरचा लेख वाचायला दिला. माझ्यामते तिला मी लेख लिहीतो हेच माहीत नसण्यामुळे तिने ते वाचले असण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण खरी परिस्थिती अर्थातच वेगळी होती. आश्चर्य म्हणजे त्यांना तो चक्क आवडला आणि त्यांनी तो मला न विचारता परस्पर मोहिनी अंकाला देऊनही टाकला. बहीणीने हे नंतर मला सांगितलं. मला फारच आनंद झाला अर्थात त्यातला जास्त तो अवचटांना आवडल्याचा होता. यथावकाश तो छापून आला आणि मला त्या अंकाची प्रत देखील मिळाली. त्या नंतर ते एकदा घरी आले असताना त्यानी स्वत:हून मी आणखी काही लिहीलंय का असं बहीणीला विचारलं. त्यावर तिने तो कॅरम सिंपोझियमचा लेख वाचायला दिला. त्यांना तो आवडला आणि त्यांनी तो ही मोहिनीत छापून आणला. इतकंच नाही तर त्यांनी स्वत:हून माझे काही मिळमिळीत शब्द बदलून चपखल शब्द घातले. या बद्दल मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. कुठला मोठा माणूस असं एखाद्या सामान्य मुलाच्या किरकोळ लेखांसाठी करेल? मी काही ते लेख स्वत:हून कुठल्या मासिकाकडे पाठवले नसते कारण माझ्या मते ते दोन्ही काही अवचटांसारख्या लेखकाचे लक्ष वेधण्याच्या लायकीचे नव्हते. अजूनही मला असं वाटतं की ते लेखांच्या दर्जा पेक्षा केवळ अवचटांनी सांगितलं म्हणून छापून आले असणार!
माझ्या संशोधना दरम्यान सगळ्या मित्रांची लग्नं झाली आणि मला वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडला. त्याच सुमारास अमृतची भेट झाली. त्याने 'पुरंदरे प्रकाशन' या नावाने पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय नुकताच चालू केला होता आणि वडिलांची पुस्तके पुन:प्रकाशित करायचा सपाटा लावला होता. तो बराच उद्योगी माणूस आहे, तेव्हा तो त्याचा दुसरा का तिसरा उद्योग होता. बोलता बोलता त्यानं इंग्रजीतील 'How And Why?' या लहान मुलांसाठी वैज्ञानिक विषयांवर (पॉप्युलर सायन्स) लिहीलेल्या पुस्तकांचा उल्लेख केला. त्या धर्तीवर एक मराठीतून मालिका करण्याच्या त्याच्या मानसाबद्दल सांगितलं. एका विषयावरचे प्रश्न लेखकाने स्वत:च उपस्थित करायचे आणि उत्तरंही त्यानेच द्यायची असं त्या पुस्तकांचं स्वरूप होतं. त्याकाळी कंप्युटर नवीन होता व बर्याच लोकांना त्याबद्दल कुतुहल होतं म्हणून पहिलं पुस्तक त्यावर लिहायला त्यानं मला सांगितलं.
यथावकाश बर्याच इंग्रजी पुस्तकांची मदत घेऊन मी 'गणकयंत्र' हे पुस्तक लिहीलं. अमृतने पुरंदरे प्रकाशनातर्फे पदार्थविज्ञान विभागाचे तेव्हाचे विभागप्रमुख डॉ. भिडे यांच्या हस्ते ते प्रसिद्ध केलं. ते नुसते पुस्तकाबद्दल नाही तर माझ्याबद्दल देखील चांगलं बोलले, पण जाता जाता मिश्किलपणे माझ्या कॅरम प्रेमाचा उल्लेख करून! खुद्द बाबासाहेबांनी देखील एक भाषण केलं. मला भाषण करायची सवय नसल्यामुळे आणि आपणच आपल्या पुस्तकाबद्दल काय बोलायचं हे न सुचल्यामुळे आधीच अमृतला मी बोलणार नाही हे सांगितलं होतं. त्यानही आग्रह धरला नाही पण त्याच्या भाषणात 'मी भाषण करणार नाही, पाहिजे तर अजून एक पुस्तक लिहून देईन' असं मी त्याला कबूल केल्याचं बेधडकपणे जाहीर केलं. कुणाचीही स्तुती करणं हे महापाप या महाराष्ट्रीय बाण्याला जागून माझ्या मित्रांनी 'एका गणंगाने संगणकावर लिहीलेले पुस्तक' किंवा 'कुठल्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केलास रे?' असं प्रेमळ, खास पुणेरी खडूस कौतुक केलं. हे पुस्तक माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त खपलं.
मी पदार्थविज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे अणू जिव्हाळ्याचा विषय होताच तसंच सामान्य लोकांना अणूत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्युट्रॉन या पलिकडे काही आहे हे तेव्हा तरी माहीत नव्हतं म्हणून पुढचं पुस्तक अणूवर लिहीलं. पुरंदरे प्रकाशनातर्फे तेही प्रकाशित झालं. तिसरं पुस्तक सूक्ष्मदर्शक यंत्रांवर लिहायचा विचार होता. त्यासाठी मी बरीच माहिती पण जमा केली होती. पण अचानक मला असं वाटलं की आधीच उपलब्ध असणारी माहिती वेगळ्या भाषेत व वेगळ्या स्वरूपात परत लिहीण्यात काही गंमत नाही. त्यात माझं काय कौशल्य किंवा वेगळेपण? हे काम कुणीही करू शकेल. आणि मी अमृतला सांगून ते काम थांबवलं. सुदैवाने, तो मला लहानपणापासून ओळखत असल्यामुळे आमच्या मैत्रीत काहीही फरक पडला नाही. अणू वर लिहायला सुरुवात करायच्या आधी केसरीने मला त्यांच्या रवीवारच्या पुरवणीत संगणकावर लेख लिहायची विनंती केली होती. आनंदाने मी काही आठवडे ते लिहीले, पण नंतर त्याचाही कंटाळा आल्यामुळे बंद केले. बहुतेक सकाळ मधे पण माझे एक दोन लेख प्रसिद्ध झाले असावेत, पण नक्की आठवत नाही.
शेवटचं लिखाण 88/89 साली झालं असावं त्यानंतर बरीच वर्ष खंड पडला. लग्न, संसार, काम व प्रदेशवार्या यात कधी वेळच मिळाला नाही. त्यानंतर मी 2006 साली इंग्लंडमधे आलो. इथे मला कामाचा फार ताण किंवा दबाव नसल्यामुळे मला जास्त वेळ मिळू लागला. एव्हाना कंप्युटरवर मराठी टायपिंग उपलब्ध झालेलं होतं. तरी सुद्धा लिहीण्याचं काही डोक्यात नव्हतं. सुरुवातीला मी जगभरची वर्तमानपत्र नेटवर वाचण्यात वेळ घालवत असे. त्याचा कंटाळा आल्यावर काही तरी शोधता शोधता मला मायबोलीची साईट सापडली. स्वत:चा ब्लॉग देखील मराठी भाषेत एक पैसा पण न खर्च करता लिहीता येतो हा शोधही याच काळातला! शिवाय कुठल्याही प्रकाशकाकडे न पाठवता आपला लेख तत्काळ प्रसिद्ध करण्याच्या अभूतपूर्व सोयीचं मला जास्त आकर्षण वाटलं, अजूनही आहे. काही दिवस लोकांचे लेख वाचण्यात घालवले मग मला लिहायची ऊर्मी आली. कंप्युटरवर काम केल्याचा परिणाम म्हणा किंवा पूर्वीचं लेखन हरवल्याचा सल म्हणा मी लेख मायबोली व ब्लॉगवर एकाच वेळी टाकायला लागलो. कारण, कुठलंही एक स्थळ बंद पडलं तरीही माझं लेखन दुसर्या स्थळावर मिळू शकेल म्हणून! मला माझ्या लिखाणाची मित्रांमधे व नातेवाईकांमधे जाहिरात करायची नव्हती. तसंच चुकून त्यांनी कुठे माझा लेख वाचलाच तर तो मी लिहीला आहे असं त्यांना समजू नये म्हणून मी सुरुवातीला 'चिमण गोखले' या टोपण नावाने लिखाण करू लागलो.
मी पहिला लेख 2008 साली प्रसिद्ध केला. आत्तापर्यंत साठच्या वर लेख पाडले आहेत. अजूनही अधून मधून काही तरी पाडत असतो. खूप लोकांनी मला लेखन आवडल्याचं आवर्जून सांगितलंय. तसंच काही लोकांनी काही लेख न आवडल्याचं मनमोकळेपणे सांगितलं आहे. काही जणांनी माझ्या लेखांच्या लिंका त्यांच्या मित्रमैत्रिणींना पाठवल्याचं सांगून वरती त्यांची काय प्रतिक्रिया आली ते पण सांगितलं. मी या सर्वांचा खूप आभारी आहे व मला सर्व प्रतिक्रियांचा आदर आहे. माझे लेख सर्व लोकांना आवडणं शक्य नाही याची मला पूर्ण जाणीव पण आहे. त्याच बरोबर लोकांनी माझे लेख वाचल्याचा प्रचंड आनंद पण आहे. जसजसे जास्त लोक माझ्याशी खाजगीत संपर्क करू लागले तसं मला माझा बनावट अवतार संभाळणं अवघड होऊ लागलं. शेवटी एकदा मी दोन्ही साईटवर माझं खरं नाव लावलं. माझ्या काही मित्रांना पण सांगितलं. तरी अजूनही लेखात माझा उल्लेख चिमण असाच करतो. बर्याच लोकांनी मला हे कळवलं आहे की जेव्हा त्यांचा मूड ठीक नसतो किंवा मन ठिकाणावर नसते तेव्हा ते मन उल्हसित करण्यासाठी आवर्जून माझे लेख वाचतात. या आणि अशा प्रकारच्या प्रतिक्रिया वाचून किती धन्य वाटतं ते प्रभावीपणे सांगण्याइतकं लेखन कौशल्य दुर्दैवाने माझ्याकडे नाही. या सगळ्यांना मी इतकंच सांगू इच्छितो की जेव्हा मला उदास वाटत असतं, मूड बरोबर नसतो किंवा केवळ नवीन लिहायची स्फुर्ती हवी असते तेव्हा मी माझ्या लेखांवरच्या प्रतिक्रिया वाचतो. मग माझं डोकं रेस सुरू व्हायच्या आधी मोटारीं करतात तसं घूंsss घूंsss करायला लागतं.
पुष्कळ लोक मला विचारतात की अमुक तमुक सुचले कसे? खरं सांगायचं तर मलाही कधी कधी हाच प्रश्न पडतो. कधी मी माझाच एखादा लेख वाचायला घेतला तर काही कोट्या/विनोद मला हाच विचार करायला लावतात. त्यावर विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की हे जास्त 'Getting into the zone' बद्दल आहे. पहिल्या नाटकाच्या तालमींच्या वेळी आम्हाला असं जाणवलं होतं की बर्याच वेळेला उमेश संवाद बोलताना अडखळतो किंवा विसरतो. मग आम्ही त्याला संवाद पाठ कर रे बाबा, चांगले.. हा संवाद अशा पद्धतीने म्हणालास तर बरा वाटेल असे काही बाही सल्ले आमच्या परीने द्यायचो. त्या सगळ्या वर त्याचं एकच उत्तर असायचं.. तुम्ही काळजी करू नका. एकदा 'मोशन' मधे आलो की सगळं व्यवस्थित करतो बघा! आणि तसंच झालं. मलाही ते आता पटायला लागलंय. एकदा लिहायच्या 'मोशन' मधे गेलो की काही अफलातून कोट्या/विनोद सहज सुचून जातात.
आत्तापर्यंत दोन पुस्तके आणि काही लेख पाडले असले तरी मी मला लेखक समजत नाही. माझा युक्तिवाद असा आहे की जसं गल्ली क्रिकेट खेळणार्याला क्रिकेटपटू म्हणत नाहीत तसंच ज्याचे लेख थोड्या लोकांनीच वाचले आहेत त्याला लेखक म्हणता येत नाही. पण लोकांनी एखाद्याला लेखक म्हणणे न म्हणणे सर्वस्वी त्यांच्या मनावर आहे. त्यामुळे ते मला लेखक म्हणत असतील तर माझी तक्रार नाही. शेवटी, माझ्या मनात मी मला काय समजतो ते महत्वाचं!
आत्तापर्यंतचं माझं लिखाण व्यक्तिचित्रणं (वादळ, नुस्ता स.दे., सोबती, क्लोज एन्काऊंटर्स ऑफ द चाईनीज काईंड इ.), एखाद्या घडलेल्या घटनेवर आधारित संपूर्ण काल्पनिक कथा (वाघोभरारी, सप्राईझ, तेथे पाहिजे जातीचे मालिका इ.), ऐतिहासिक विषय (ऑपरेशन मिन्समीट, महाराजाची विहीर इ.), वैज्ञानिक विषय (अवकाश वेध, एक खगोलशास्त्रीय दुर्मीळ घटना इ.), इंग्लंड मधील निवासवर्णनं (ऑक्सफर्डचा फेरफटका, इंग्लंडमधील भत्ताचारी लोक इ.), फार्सिकल कथा (एका मुलीचं रहस्य, प्रेमा तुझा गंज कसा इ.) अशा प्रकारात झालं आहे. काही सांगण्यासारखे अनुभव आले असतील तरच मला प्रवासवर्णन करावेसे वाटते. कारण, हल्ली कुठल्याही प्रेक्षणीय स्थळाची माहिती नेटवर उपलब्ध असते, तीच परत आपल्या भाषेत सांगण्यात मला मजा वाटत नाही. नवीन चित्रपट मी सहसा पहायला जात नसल्यामुळे चित्रपट परीक्षण कधी केले नाही. अधून मधून मला एखादी रहस्य कथा लिहावसं वाटतं. कदाचित लिहीनही एखादी! पण माझा कल खुसखुशीत नर्म विनोदी लिखाणाकडे जास्त असतो.
मी आत्तापर्यंत का लिहीलं याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे लोकांना काही तरी नवीन माहिती देण्याचा उद्देश! म्हणून मी भारतात सहसा न दिसणार्या किंवा अनुभवास न येणार्या गोष्टींबद्दल लिहीतो. मग ती एखादी ऐतिहासिक गोष्ट असेल, महत्वाची घटना/व्यक्ती असेल, वा वैज्ञानिक दृष्ट्या नवलाईची वस्तू असेल. दुसरं कारण, लोकांची करमणूक! यात मी आम जनतेवर लादल्या सततच्या भडिमारातील विसंगती शोधून त्यावर काही मार्मिक लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. बर्याचदा मी मला आलेले अनुभव विनोदी पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला आहे. काही वेळा भविष्यात काय होऊ शकेल ते माझ्या परीने लिहीलं आहे. कधी माझं मन एखादी असंभाव्य गोष्ट घडली तर काय होईल या विचाराने भरकटतं, मग त्याचीच एक कथा होते. काही तरी पाहून, वाचून, किंवा ऐकून माझ्या मनात एक विचारचक्र सुरू होतं. कधी कधी ते चार पाच दिवस सलग चालू असतं. त्यामुळे बर्याचवेळेला माझ्या झोपेचं खोबरं पण झालेलं आहे. जेव्हा मला ते चक्र एखाद्या लेखाचा ऐवज आहे असं वाटतं तेव्हा मला ते लिहून काढायची सण्णक येते.
धन्यवाद!
No comments:
Post a Comment