Thursday, March 17, 2022

शॅकल्टनची अफाट साहस कथा

शॅकल्टनचे हरवलेले एंड्युरंस जहाज 107 वर्षानंतर सापडले (चित्र-5) ही नुकतीच आलेली बातमी वाचली आणि माझ्या मनात घर करून राहिलेल्या त्याच्या अचाट साहसकथेला परत उजाळा मिळाला. सुमारे 40/45 वर्षांपूर्वी रीडर्स डायजेस्ट मधे ती वाचली होती तेव्हापासून अर्नेस्ट शॅकल्टन हे नाव आणि त्याचं साहस माझ्या कायमचं लक्षात राहिलं आहे. तसं पाहिलं तर अनेक साहसवीरांनी केलेल्या अनेक मोहिमांसारखीच त्याची पण एक मोहीम! अनेक संकटं, धोके व साहसांनी भरलेली!आणि ती यशस्वी पण नाही झाली. मग असं काय विशेष होतं त्यात? ते जाणण्यासाठी त्या मोहिमेची नीट माहिती सांगितली पाहिजे मग मला त्यातलं काय नक्की भावलं ते सांगता येईल. तो काळ दोन्ही धृवांवर प्रथम कोण पाय ठेवतो या जीवघेण्या स्पर्धेचा होता. त्यासाठी अनेक देशांच्या मोहिमा झाल्या. शॅकल्टनने रॉबर्ट स्कॉटच्या दक्षिण धृवाच्या शोध मोहिमेत (1901-04) भाग घेतला होता. ती त्याची पहिली मोहीम, पण त्याला ती प्रकृतीने साथ न दिल्यामुळे अर्धवट सोडावी लागली. स्कॉट दक्षिणेला 82 अंशापर्यंत जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर शॅकल्टनने केलेल्या मोहिमेत ((1907-09) तो 88 अंशापर्यंत पोचला, दक्षिण धृवापासून केवळ 180 किमी! या विक्रमामुळे त्याला 'सर' ही पदवी दिली गेली. शेवटी नॉर्वेच्या आमुंडसेनने (हे नाव खूप बंगाली वाटते ना?) 1911 मधे दक्षिण धृव पादाक्रांत करून स्पर्धा जिंकली. मग शॅकल्टनने अंटार्क्टिका बर्फावरून ओलांडायची मोहीम ((1914-17) आखली. शॅकल्टनच्या महत्वाकांक्षी मोहिमेची आखणी अशी होती: मोहिमेत दोन गट आणि दोन जहाजं असणार होती. वेडेल समुद्र गटातील माणसं एंड्युरंस जहाजातून वाहसेल बे भागापर्यंत येणार होती. तिथे 14 जण उतरणार होती, त्यातले शॅकल्टन धरून 6 जण 69 कुत्र्यांसकट जवळपास 2900 किमी प्रवास करून अंटार्क्टिकाच्या दुसर्‍या टोकाला रॉस समुद्राकडे जाणार होते. दुसर्‍या गटातली माणसं अरोरा जहाजावरून रॉस समुद्राकडे जाणार होती. तिथे उतरून ते बिअर्डमोर हिमनदीवर तळ उभारून दुसर्‍या गटाची वाट पहाणार होते. या मोहिमेचा नकाशा चित्र-1 मधे आहे. मोहिमेचा नकाशा
चित्र-1: मोहिमेचा नकाशा

असल्या धाडशी आणि अति खर्चिक मोहिमा करायच्या कल्पना या लोकांना कशा सुचतात व त्यांना पैसे देणार्‍यांना त्यातून काय मिळायची अपेक्षा असते असे प्रश्न माझ्या मध्यमवर्गीय भारतीय मनाला नेहमी पडतात. पण ते इकडे कुणाला पडत नाहीत हे आत्तापर्यंत झालेल्या व अजूनही चालू असलेल्या मोहिमांवरून अगदी उघड आहे. यासाठी एकूण 50,000 पाऊंड (त्या काळातले) लागतील असा अंदाज होता. शॅकल्टनला सरकारकडून 10,000 मिळाले, उरलेले त्याने सधन व्यापार्‍यांकडून जमवले. या मोहिमेसाठी माणसं मिळवण्यासाठी शॅकल्टनने खालील जाहिरात दिली असं ऐकिवात आहे, पण त्या जाहिरातीचा काही पुरावा उपलब्ध नाही. "माणसं हवीत: अत्यंत धोकादायक मोहिमेसाठी, कमी पगार, अतिप्रचंड थंडी, पूर्ण अंधाराचे लांब महिने, कायमची संकटं, परतीच्या प्रवासाच्या यशाची खात्री नाही. यश मिळाले तर मात्र कीर्ती व सन्मान ! -- सर अर्नेस्ट शॅकल्टन" अशा आत्मघातकी मोहिमेत भाग घेण्याचा वेडेपणा कोण करेल? पण हाही प्रश्न इकडे पडत नाही कुणाला! शॅकल्टनकडे या मोहिमेसाठी 5000 लोकांनी अर्ज केला, त्यातला एका अर्ज तीन मुलींनी मिळून केला होता. शॅकल्टनला कामातल्या कौशल्याइतकंच स्वभाव, चारित्र्य व प्रवृत्ती महत्वाची होती म्हणून तो मुलाखतीत तर्‍हेवाईक प्रश्न विचारायचा.. रेगिनाल्ड जेम्स या पदार्थवैज्ञानिकाला तुला गाता येतं का असं त्यानं विचारलं. विल्यम बेकवेल व त्याचा मित्र पर्सी ब्लॅकबरो या दोघांनी पण अर्ज केले होते. पण त्यातल्या फक्त विल्यमला घेतल्यामुळे पर्सी कुणाच्याही नकळत एंड्युरंस जहाजावर घुसला. केवढी ती हौस! प्रत्येक गटासाठी 28 अशी एकूण 56 माणसं झाली, पर्सी धरून! मोहिमेची सुरुवात व्हायच्या काही दिवस आधी पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. तेव्हा शॅकल्टनने बरेच महिने खपून उभारलेली मोहीम गुंडाळून जमवलेली माणसं जहाजांसकट सरकारला युद्धासाठी देऊ केली. पण त्यावेळचा फर्स्ट लॉर्ड ऑफ अ‍ॅडमिराल्टी, विन्स्टन चर्चिलने उदार मनाने त्याला मोहिम पुढे नेण्याची परवानगी दिली. अशारितीने शेवटी एंड्युरंस जहाज प्लिमथ बंदरातून 8 ऑगस्ट 1914 रोजी निघाले. 5 नोव्हेंबरला दक्षिण जॉर्जिया येथील ग्रिटविकन या देवमाशांच्या शिकार केंद्रात पोचल्यावर, बर्फ कमी होण्यासाठी, तिथे एक महिनाभर मुक्काम केला. तरीही त्याला भरपूर बर्फ लागल्यामुळे प्रवास अगदी संथ व जिकीरीचा होऊ लागला. जितके ते दक्षिणेला सरकत होते तितकी बर्फाची स्थिती गंभीर होत होती. शेवटी, 18 जानेवारी 1915 ला एंड्युरंस जहाज बर्फात चहूबाजुंनी अडकले. बर्फ फोडून जहाज सोडविण्याचा प्रयत्न फोल झाला. काहीच करता येत नसल्यामुळे अगतिकपणे सगळे जहाजावर उन्हाळ्याची वाट पहात राहीले व जहाज बर्फाबरोबर हळूहळू उत्तरेला सरकत राहीले. बर्फाच्या असह्य दाबामुळे शेवटी जहाजाची स्थिती नाजुक झाली. एंड्युरंसची स्थिती काय झाली होती ते चित्र-2 मधे दिसेल. 27 ऑक्टोबरला पाणी आत झिरपायला लागल्यावर मात्र शॅकल्टनने जहाज सोडायचा निर्णय घेतला. सर्व सामान बर्फावर हलवले गेले तेव्हा तापमान -26 °C होते. 21 नोव्हेंबरला एंड्युरंस बुडाले. एंड्युरंसची स्थिती
चित्र-2: एंड्युरंसची स्थिती

एंड्युरंसच्या अंतानंतर मात्र शॅकल्टनने रॉस समुद्राकडे जाणं रद्द करून माणसं मृत्युपासून वाचविण्यावर लक्ष केंद्रित करायचं ठरविलं. त्याच्या माहितीप्रमाणे उत्तरेला काही बेटांवर त्यांना खाद्यपदार्थाचे साठे मिळण्याची शक्यता होती. पॉलेट बेट, स्नो हिल बेट व रॉबर्टसन बेट ही ती बेटं होती जिथे पूर्वी झालेल्या मोहिमांच्या आणीबाणी साठी केलेले साठे ठेवले गेले होते. यातल्या एका बेटावर पोचल्यानंतर ग्रॅहॅम लॅंड ओलांडून पुढे विल्हेमिना बे ठिकाणच्या देवमाशांच्या शिकार केंद्रात जायचं असं ठरवलं. तिथून त्यांना पुढील प्रवासासाठी मदत मिळाली असती. त्यांच्या आकडेमोडीप्रमाणे एंड्युरंस सोडलेल्या जागेपासून पॉलेट बेट 557 किमी अंतरावर तर स्नो हिल बेट 500 किमी वर होते. तिथून विल्हेमिना बे पुढे अजून 190 किमी लांब होता. दोन लाईफबोटी स्लेजवर टाकून 30 ऑक्टोबरला त्यांनी कूच केलं. पण थोडा देखील बर्फाचा पृष्ठभाग सपाट नसल्याकारणाने प्रवास अत्यंत कष्टाचा व मंदगतीने झाला. तीन दिवसात जेमतेम 3 किमीच अंतर कापले गेल्यामुळे चालत जाण्याची कल्पना रद्द केली गेली. त्या ऐवजी त्यांनी त्या हिमनगावर तळ ठोकला आणि हिमनगाच्या गतीने हळूहळू सरकत राहीले. 17 मार्च 1916 ला ते पॉलेट बेटाच्या अक्षांशावर पण 97 किमी पूर्वेला होते. पण लाईफबोटीतून मधले हिमनग चुकवत चुकवत तिथे पोचायला फारच वेळ लागला असता म्हणून ते हिमनगाबरोबर जात राहीले. पॉलेट बेट मागे पडल्यामुळे त्यांचं पुढचं लक्ष्य होतं एलेफंट बेट किंवा क्लॅरेंस बेट! पण या दोन्ही बेटांकडे देवमाश्यांच्या शिकारी बोटी जात नसल्यामुळे शॅकल्टनला तिकडे जाण्यात रस नव्हता. त्या ऐवजी त्याला साउथ शेटलंड बेटांकडे जायचं होतं. पण त्याच्या हातात फारसं काही नव्हतं. 8 एप्रिलला त्या हिमनगाचे दोन तुकडे झाल्यावर पुढील प्रवास लाईफबोटीतून करण्याचा निर्णय घेतला. 9 एप्रिलला बोटी पाण्यात घातल्या पण त्या बर्फाच्या छोट्या मोठ्या तुकड्यांनी सतत घेरलेल्या राहिल्या. शेवटी 15 एप्रिलला अथक प्रयत्नानंतर ते कसेबसे एलेफंट बेटावर पोचले. जिथे ते पोचले तो किनारा फारसा सुरक्षित न वाटल्यामुळे त्यांनी त्यांचा तळ 11 किमी पश्चिमेला हलवला. शॅकल्टनच्या गटाचा एकूण प्रवास कसा कसा झाला त्याचा नकाशा चित्र-3 मधे दिसेल. प्रवासाचा नकाश
चित्र-3: प्रवासाचा नकाशा

गटातल्या बर्‍याच जणांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे शॅकल्टनने त्या सगळ्यांना घेऊन मदत मिळू शकेल अशा दुसर्‍या जवळच्या बेटावर जायचा बेत रद्द केला. त्या ऐवजी फक्त काही लोकांना घेऊन पूर्वेकडे 1100 किमी असलेल्या दक्षिण जॉर्जिया, जिथे ते येताना थांबले होते तिथे, जाऊन मदत मिळवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी एका लाईफबोटीची डागडुजी करून ती त्या लांबच्या प्रवासाला शक्य तितकी टिकेल अशी सुधारली. शॅकल्टन धरून 6 जणांनी 24 एप्रिलला कूच केलं. बरोबर फक्त महिनाभर पुरेल इतकीच सामग्री होती. कधी वल्ही मारत तर कधी वार्‍याची मदत घेत बर्फाइतकं थंडगार पाणी सतत अंगावर घेत घेत एकदाचे ते दक्षिण जॉर्जियाच्या किंग हाकोन बे इथे 10 मे रोजी टेकले. दुर्देवाने हे ठिकाण त्यांना जिथं जायचं होतं, ग्रिटविकन, त्याच्या बरोबर विरुद्ध टोकाला स्ट्रॉमनेस बे मधे होतं. आता त्यांच्या पुढे दोनच पर्याय होते. एक म्हणजे, परत बोटीत बसून बेटाला वळसा घालून तिकडे जायचं व दुसरा म्हणजे, पायी मधले डोंगर पार करून पलिकडे जायचं. त्यांच्यातल्या दोघांची खालावलेली प्रकृती व बोटीची एकूण दुर्दशा पाहून शॅकल्टनने चालत जायचा निर्णय घेतला. 19 मेला पहाटे 2 वाजता शॅकल्टनने वोर्सली व क्रीन या दोघांना बरोबर घेऊन प्रयाण केलं. बाकीचे तिघे तिथेच थांबले. प्रवासाला जाण्याआधी बर्फात पाय घसरू नयेत म्हणून त्यांनी त्यांच्या बुटाच्या तळव्यांना स्क्रू बसवले. दुसर्‍या दिवशी संध्याकाळ पर्यंत ते 3000 फूट उंच डोंगरावर आले. रात्र जवळ येऊ लागल्यावर तापमान झपाझप खाली जायला लागलं व दाट धुक्यामुळे काहीही दिसेना झालं. त्यांना लवकरात लवकर त्या डोंगराच्या पायथ्याशी जाणं भाग होतं नाही तर ते नक्की गारठून मेले असते. प्रथम त्यांनी डोंगर उतारावर पायर्‍या खणत खाली उतरायचा प्रयत्न केला पण लवकरच त्यातला फोलपणा शॅकल्टनच्या लक्षात आला. चित्र-4 मधे डाव्या बाजुला किंग हाकोन बे व उजवीकडे स्ट्रॉमनेस बे दिसतील. शॅकल्टन वोर्सली व क्रीन यांचा ट्रेक
चित्र-4: शॅकल्टन वोर्सली व क्रीन यांचा ट्रेक

यापुढे जे त्याने ठरवलं व केलं त्याबद्दल मला त्याचं कौतुक वाटतं तसंच प्रचंड आदर पण! त्यांनी त्यांच्या जवळच्या दोरखंडाची गुंडाळी करून तीन छोट्या बैठकी बनवल्या. सगळ्यात पुढच्या बैठकीवर शॅकल्टन बसला, त्याच्या मागे वोर्सली व त्याच्या मागे क्रीन. वोर्सलीचे पाय शॅकल्टनच्या कमरेभोवती तसंच क्रीनचे वोर्सलीच्या कमरेभोवती होते. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्या तिघांनी त्या दाट धुक्याने भरलेल्या अंधारी उतारावरून झोकून दिले. पुढे काय वाढुन ठेवलंय याची तमा न बाळगता! कदाचित ते एखाद्या कड्यावरून खोल दरीत कोसळून मेलेही असते. कदाचित मधल्या एखाद्या मोठ्या दगडावर आपटले असते व हातपाय मोडुन तिथेच खितपत पडले असते. प्रचंड वेगाने खाली घसरत जाऊन ते सुरक्षितपणे पायथ्याशी पोचल्यावर त्यांनी आनंदाने हस्तांदोलन केले. नंतर शॅकल्टन इतकंच म्हणाला 'अशी गोष्ट नेहमी करणं फारसं योग्य नाही'. सगळे प्रचंड दमले होते तरी त्यापुढे अथक प्रवास करत करत एकूण 36 तासात त्यांनी जवळपास 40 किमी अंतर कापून शिकार केंद्रात पाय ठेवला. तेव्हा त्यांना 18 महिन्यात प्रथमच इतर माणसांचं दर्शन झालं व आवाज ऐकायला मिळाले. पुढे फारसा वेळ न घालवता त्यांनी बेटाच्या दुसर्‍या टोकाला अडकलेल्या तीन माणसांची सुटका 21 मे च्या संध्याकाळ पर्यंत केली. एलेफंट बेटावर अडकलेल्यांची सुटका करायला मात्र वेळ लागला. खराब हवामान, खवळलेला समुद्र व समुद्रातला बर्फअशा कारणांनी त्यांचे पहिले 3 प्रयत्न फोल ठरले. शेवटी, 30 ऑगस्टला त्यांच्या चौथ्या प्रयत्नाला यश येऊन इतरांची सुटका झाली. या सफरीत 28 पैकी एकही माणूस दगावला नाही ही विशेष नमूद करण्याची गोष्ट आहे. शॅकल्टन, वोर्सली व क्रीन यांच्या 36 तासांच्या खडतर प्रवासाची पुनरावृत्ती 100 वर्षानंतर केली गेली. त्याचा एक व्हिडिओही बनवला. तो शेवटचे 36 इथे बघता येईल. नुकतेच सापडलेले एंड्युरंस
चित्र-5: नुकतेच सापडलेले एंड्युरंस

तळटीप: या लेखातील सर्व चित्रे नेटवरून साभार!
संदर्भ/क्रेडिट्स :-
--------
1) https://en.wikipedia.org/wiki/Ernest_Shackleton
2> https://en.wikipedia.org/wiki/Imperial_Trans-Antarctic_Expedition
3> https://www.history.com/news/shackleton-endurance-survival?cmpid=email-hist-inside-history-2022-0309-03092022&om_rid=&~campaign=hist-inside-history-2022-0309 : इथे शॅकल्टनच्या फोटोग्राफरचे मूळ फोटो बघता येतील.
4> https://www.britannica.com/biography/Ernest-Henry-Shackleton : प्रवासाचा नकाशा

-- समाप्त --

No comments: