कधी कधी अकस्मात काय घडेल काही सांगता येत नाही. मी एकदा रात्री साडे अकराच्या सुमारास मित्राकडून परत येत होतो. तो रहातो ऑक्सफर्ड पासून सुमारे 100 मैल लांब! निम्मा अधिक रस्त्ता कापून झाला होता आणि शेवटी एका हायवेला लागायचं होतं. हायवेची एक खासियत आहे. चुकून भलत्याच बाजूकडे जाणारा रस्ता पकडला की 10/15 मैलांचा फटका बसू शकतो कारण मधेच कुठे यू-टर्न घ्यायची सोय नसते. पुढचा एक्झिट घेऊन तिथे हायवे ओलांडून उलट्या बाजूचा रस्ता घ्यावा लागतो. त्या रात्री मी नेमका चुकीच्या बाजूचा हायवे धरला. अशा चुका मला नवीन नाही म्हणा! आत्तापर्यंत पुष्कळ वेळा ते करून बसलोय. पण आता घरी पोचायला आणखी उशीर होणार म्हणून स्वत:ला शिव्या देत देत पुढचा एक्झिट घेतला, फिरून उलट्या दिशेने हायवेकडे जाणारा रस्ता (स्लिप रोड) पकडला. आता फक्त वेग वाढवून हायवेच्या गर्दीत घुसणं बाकी होतं. इथल्या हायवेंची कमाल वेगमर्यादा 70 मैल आहे. त्यामुळे गाडी सुमारे 60 मैलाच्या वेगाने मारली तर हायवेच्या प्रवाहात मिसळायला सोप्पं जातं. वेग वाढवायला सुरुवात केली तोच डाव्या बाजूच्या झाडीत थोडीशी हालचाल झालेली डोळ्याच्या कोपर्यानं टिपली. म्हणून ब्रेक मारतोय न मारतोय तोच एक हरणाचं पिल्लू डावीकडून जोरात मुसंडी मारून गाडीसमोर आलं. मोठ्ठा धाड आवाज झाला आणि ते डाव्या हेडलाईटच्या जवळ ते धडकलं.
सुमारे 30/35 मैल वेगाच्या गाडीची धडक प्राणघातक ठरू शकते. कचकन ब्रेक मारून मी गाडी थांबवली. खूप रात्र झालेली असल्यामुळे स्लिप रोडला गर्दी नव्हती. ते माझं नशीबच म्हणायचं, नाही तर मागच्या बाजूलाही धाड आवाज झाला असता. पिल्लाचा मागमूस नव्हता. आयला! मेलं की काय बिचारं? इंजिनाची धडधड थांबली पण माझ्या छातीची धडधड बेसुमार वाढली. हाताला कंप सुटला. अरेरे! गेलं बिचारं पिल्लू बहुतेक! मला फार वाईट वाटायला लागलं. आता खाली उतरून त्या पिल्लाचं काय झालंय ते बघावं असा विचार मनात येतोय न येतोय तोच अचानक ते पिल्लू उठलं, हेलपाटत हेलपाटत उजवीकडच्या हिरवळीवर (स्लिप रोड व हायवेच्या मधल्या) गेलं व माझ्याकडे निरागस, निष्पाप नजरेने बघत उभं राहीलं. अशा नजरेनं फक्त लहान मुलं आणि प्राणीच बघू शकतात. पण त्याला बघून मनावरचं एक मोठं दडपण गेलं. ते जिवंत आहे आणि चालू शकतंय याचा आनंद प्रचंड होता. त्याचं डोकं बॉनेट वर आपटल्यामुळे ते बधीर होऊन हेलपाटलं असणार, असा निष्कर्ष मी काढला.
काय विचार घोळत असतील त्याच्या डोक्यात, काय माहिती? अरे काय गाडी चालवतोस का काय करतोस? इतक्या वेगात गाडी मारायची गरज होती का? समोर कोण येतंय बघायला नको? डोळे आहेत की भोकं? छ्या! हे विचार नक्कीच नसतील. यावर अगदी माणसाची छाप आहे. तो कदाचित म्हणत असेल.. हा माझा प्रांत आहे, तुला इथे तडमडायचं काय कारण होतं? किंवा, त्याचं तरुण रक्त असल्यामुळे असंही वाटलं असेल.. आयला! माझा अंदाज चुकला कसा? मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त वेगानं आला हा प्राणी! पुढच्या वेळेला आणखी वेगाने जायला पाहीजे.
माझ्या आयुष्यात पूर्ण बधीर हरणाचं पिल्लू बघण्याची पहिलीच वेळ होती. गाडीला धडकण्याची पिल्लाचीही पहिलीच वेळ असायची खूप शक्यता होती. माझ्या डोक्यात अनेक विचार घोळत होते.. काय नडलं होतं याचं त्याचा कळप व कुरण सोडून हायवे वर भटकण्याचं? काहीच कशी अक्कल नाही याला? यांच्या जीवाला कुणीच किंमत देत नाही, नाही का? एका वर्षात फक्त युके मधे 40,000 हरणं गाडीखाली येतात पण त्याची कुणी साधी दखलही घेत नाही. हो, 40,000! मधे लंडनच्या एका इमारतीला आग लागून काही माणसं मेली तर गदारोळ झाला. रस्त्यारस्त्याला 'सावधान! हरणं येण्याची शक्यता आहे' अशा पाट्या लावलेल्या आहेत. पण त्यानं काय भागणार? समजा, एखादं हरीण गाडी खाली आलं तर पेपरात बातमी तर सोडाच पण त्याचं प्रेत सुद्धा लगेच हलविण्याची शक्यता नसते. गाडीखाली येऊन एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर व्यवस्थित पंचनामा व चौकशी इ. इ. सगळं होतं. गरीब बिचारं हरीण मेलं तर? कुणाला घेणं नसतं. हरणांना कुठे संघटीत होऊन मोर्चे काढता येतात? तसे त्यांनी काढले तर विरोधी पक्षाला लोकसभेत गोंधळ घालायला एक विषय मिळेल. अन्यथा, मुक्या प्राण्यांसाठी कोण तोंडाची वाफ दवडणार?
गंमत म्हणजे हरणांच्या किंवा इतर कुठल्याही प्राण्याच्या दुर्दशेचं मूळ कारण माणूसच आहे. माणसाला अवाजवी अक्कल देऊन देवाने सर्वात मोठा घोटाळा केला आहे. इतर प्राण्यांइतकीच जेमतेम अक्कल माणसाला असती तर माणूस आपोआप त्याला निसर्गानं नेमून दिलेल्या गोष्टी करत राहीला असता व निसर्गाचं संतुलन कधीच बिघडलं नसतं. माणसानं अकलेच्या जोरावर स्वत:ची प्रचंड प्रगती केली. मुख्य म्हणजे स्वत:चं आयुष्यमान वाढवलं. आता जगाची लोकसंख्या आवाक्याबाहेर गेली आहे आणि ती क्षणाक्षणाला वाढतेच आहे. एके काळी प्राण्यांच्या बरोबरीने रहाणारा माणूस आता त्यांच्या हक्काच्या जागांवर बेधडकपणे अतिक्रमण करायला लागला आहे. प्राण्यांच्या भू-प्रदेशातून हायवे काढल्यावर ते गाड्यांखाली येऊन मरणार नाहीत तर काय होणार?
आता त्याचा बधीरपणा गेला असावा कारण त्यानं उजवीकडे वळून हायवेच्या दिशेने पाहीलं व माझे विचार थांबले. ओ नो! अरे बाबा, नको तिकडे जाऊ नकोस रे मठ्ठा! नुकताच माझ्या गाडीखाली येता येता वाचलास ना रे? आता परत कशाला 6 लेनचा हायवे पार करण्याचं धाडस करतोस? माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोचल्या नाहीत. सुसाट वेगाने ते झेपावलं, हायवेच्या अलिकडे त्याचा एक करड्या रंगाचा ठिपका दिसला. त्यानंतर ते अदृश झालं. मला अगदी खात्री होती की पुढच्या 2/3 मिनिटात कर्कश्य ब्रेकचे व गाड्या आपटण्याचे आवाज येणार! मी चांगला पाच मिनिटं थांबलो. सुदैवाने, हायवे वरची वाहतूक सुरळीत चालू होती. काही वावगं घडल्याची कोणतीही खूण नव्हती.
हुश्श! पिल्लू वाचलं तर! एक सुटकेचा निश्वास टाकून मी मार्गाला लागलो. एका क्षुल्लक य:कश्चित जीवाने फार मोठ्या शक्तीच्या शत्रु विरुद्ध छोटासा विजय मिळविल्याचा आनंद अवर्णनीय होता.
==== समाप्त ====
No comments:
Post a Comment