Thursday, November 15, 2018

इकडंच ... तिकडंच!

इंग्लंडच्या राजाराणीच्या स्वागताप्रित्यर्थ गेटवे ऑफ इंडिया बांधला तसा सहार विमानतळ तमाम आयटीच्या लोकांच्या परदेशगमनाप्रित्यर्थ गेट आउट ऑफ इंडिया म्हणून बांधलाय की काय अशी शंका येण्याइतपत बाहेर जाणार्‍यांची संख्या वाढायला लागलेली होती. 'तो' काळ म्हणजे बिल गेट्स घरोदारी डेस्कटॉप असण्याची स्वप्न बघत होता तो काळ, भारतातून बाहेर जाताना फक्त ५०० डॉलर नेता यायचे तो काळ, विमानात/ऑफिसात बिनधास्तपणे सिगरेटी पिता यायच्या तो काळ, परदेशी जाणार्‍यांकडे आदराने बघायचा काळ, नंबर लावल्यावर फोन / गॅस मिळायला ४/५ वर्ष लागायची तो काळ!!

त्या काळी भाड्याने प्रोग्रॅमर परदेशी पाठवून पैसे कमविणे हा झटपट श्रीमंत होण्याचा एक मार्ग होता. आमची कंपनी पण त्यात घुसायच्या प्रयत्नात होती. पण प्रोग्रॅमर ट्रॅफिकिंग मधे बर्‍याच कंपन्यांनी आधी पासून जम बसविलेला असल्यामुळे घुसणं अवघड होतं. आमचे सीव्ही पॉलिश करून पाठवले जायचे. कुणाचाही सीव्ही वाचला तरी सारखाच वाटायचा.. आम्ही सगळेच टीम प्लेयर, हार्ड वर्किंग, गुड कम्युनिकेशन स्किल्स असलेले उत्कृष्ट प्रोग्रॅमर होतो. त्यामुळे कुणाला घ्यावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असणार. म्हणुनच एका अमेरिकन कंपनीनं आमचा 'सी' प्रोग्रॅमिंग वर टेलिफोन इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं. ज्याचा इंटरव्ह्यू असेल त्यानंच फक्त खोलीत असणं त्यांना अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात आम्ही सगळेच खोलीत होतो. फोन लावल्यावर बॉस त्यांच्याशी थोडं बोलला मग पहिल्या कँडिडेटला बोलवून आणतो म्हणाला. मग थोडा वेळ फोन नुसताच धरून त्यानं कँडिडेट आत आला असं सागितलं. नंतर मी बाहेर जातो असं खोटं सांगून तो तिथेच बसून राहीला. इंटरव्ह्यूला कंपनीतला एक चांगला 'सी' येणारा पण होता, त्याचं नाव चंदू! प्रश्न विचारला की तो त्याचं उत्तर कागदावर लिहायचा आणि कँडिडेट वाजपेयी स्टाईल पॉज घेत घेत वाचून दाखवायचा. अशी आम्ही सगळ्यांनी एक्सपर्ट सारखी उत्तरं दिली. चंद्याचा इंटरव्ह्यू चालू असताना मला शिंक आली. ती मी खूप दाबली आणि बाकीच्यांनी हसू दाबलं तरी आमच्या बनावाचा बल्ल्या झालाच. त्यांनी कुणालाच घेतलं नाही. चंद्यानं माझ्यावर डूख धरला. नंतर तो दुसर्‍या कंपनीतून अमेरिकेत गेला.

एका जर्मन कंपनीला त्यांचे 'सी' मधे लिहीलेले प्रोग्रॅम एका प्रकारच्या कंप्युटरवरून दुसर्‍या प्रकारच्या कंप्युटरवर हलविण्यासाठी माणसं हवी होती. प्रोग्रॅमिंगचं काम हे नखांसारखं आहे. कायम वाढतच असतं. त्यामुळेच जगातली प्रोग्रॅमिंगची कामं कधी संपणं शक्य नाहीत. बॉसने कोटेशन देण्याअगोदर एक प्राथमिक अभ्यास करायचं पिल्लू सोडलं. दोन माणसांनी तिकडं जायचं त्यांच्या एका छोट्या प्रोग्रॅमचा आणि कंप्युटरांचा अभ्यास करून परत यायचं. गंमत म्हणजे त्यांनाही ते पटलं. चंद्या गेलेला असल्यामुळे जाणार्‍यात माझी वर्णी लागली. फक्त  १० दिवसांसाठीच जायचं होतं तरी काय झालं? पुण्याच्या बाहेर फारसं न पडलेल्या मला ते प्रकरण 'जायंट स्टेप फॉर अ मॅन काईंड' इतकं गंभीर होतं! माझ्यासारख्या गरीब मध्यमवर्गातल्या न्यूनगंड भारित पोरामधे आत्मविश्वास हा पुण्याच्या वाहतुक शिस्ती इतका दुर्मिळ! त्यातल्या त्यात जमेची गोष्ट म्हणजे माझ्या बुडत्या आत्मविश्वासाला बरोबर असणार्‍या सहकार्‍याच्या काडीचा आधार असणार होता.. त्याचं आडनाव दांडगे पण अंगापिडाने अगदीच खिडुक! तसा मीही खिडुकच होतो पण माझं नाव दांडगे नव्हतं इतकंच! आपल्याकडे विसंगत नावं ठेवण्याची पद्धत खूप जुनी असली पाहीजे नाहीतर 'नाव सोनुबाई.....' सारख्या म्हणी आल्या नसत्या.

विमानतळ नवीन, विमान प्रवास नवीन, देश नवीन, भाषा नवीन आणि माणसं नवीन... इतक्या सगळ्या नाविन्य पूर्ण गोष्टींच्या विचारांची गर्दी होऊन डोक्याची चेरापुंजी झाली. त्यातल्या त्यात एप्रिल मधे जायचं असल्यामुळे थंडीची भीति नव्हती इतकंच. तिकडे जायचंय म्हणून परवडत नसतानाही एखादा सूट घ्यावा काय या विचाराला 'हॅ! १० दिवसांसाठी कशाला हवाय?' अशा कोकणस्थी खोडरबरानं पुसलं. नाईलाजाने मग जवळचे त्यातल्या त्यात बरे कपडे आणि बाबांचे दोन जुने कोट कोंबले! बाबा स्थूल असल्यामुळे मी तो कोट घालून आलो की बुजगावणं चालत आल्यासारखं वाटायचं. अशा जाम्यानिम्यात चार्ली चॅप्लीननं मला पाहीलं असतं तर तो अंगाला राख फासून हिमालयात तपश्चर्येला बसला असता! माझं साहेबी पोशाखाचं ज्ञान कोटावर बूटच हवेत या पलिकडे नव्हतं म्हणून बूट मात्र घेतले. कोटावर चप्पल घालणं रेनकोटावर शर्ट घालण्याइतकं विसंगत वाटायचं मला! शाळेत १५ ऑगस्ट/२६ जानेवारी सारख्या सणांना पांढरं पॉलिश फासून घालायच्या कॅनवासच्या बुटां पलिकडे माझं बौटिक ज्ञान नव्हतं. त्यामुळे परत आल्यावर वापरता येतील असे कॅज्युअल बूट घेऊन आलो. एक नवी सुटकेस ही घेतली कारण आमच्या घरात होल्डॉल आणि ट्रंका सोडता सामान भरण्यायोग्य काही नव्हतं. होल्डॉल आणि ट्रंक घेऊन विमानतळावर जाणं म्हणजे सोवळं नेसून पळी पंचपात्र घेऊन चिकन आणायला जाणं हो! होल्डॉल आणि ट्रंक घेऊन बावळटासारखा चेकिनला उभा राहीलो असतो तर मला तिथल्या बाईनं तिकीट बिकीट न बघता सरळ यष्टी ष्ट्यांडवर पाठवलं असतं.

थोडं फार जर्मन समजावं व बोलता यावं म्हणून कंपनीनं जर्मनच्या क्रॅश कोर्सचा घाट घातला. क्रॅश कोर्सने कुणालाही कोणताही विषय शिकविता येतो असा सर्व कंपन्यांचा समज आहे. डिग्रीत जे मिळत नाही ते क्रॅश कोर्स कसं देणार? विमान चालविण्याचा क्रॅश कोर्स विमान क्रॅश करण्याचा कोर्स होणार नाही का? या बाबत क्रॅश कोर्स विकणार्‍यांच्या मार्केटिंगचं कौतुक करायला पाहीजे मात्र! उद्या ते '८ दिवसात घडाघड वेद म्हणायला शिका' अशी जाहिरात करून कोर्स काढतील आणि त्याला अनेक रेडे येतील. असो, माझ्या खिशातली कॅश जाणार नसल्यामुळे मी तक्रार केली नाही. दरम्यान, आमच्या फ्यॅमिलीतला मी पहिलाच परदेशी जाणारा असल्यामुळे नातेवाईकांनी माझं केळवण करायचा चंग बांधला. हो! चक्क केळवण! एका नातेवाईकानं माझं केळवण करून जाहिरात केल्यावर बाकीच्यांना पण ऊत आला. पिअर प्रेशर, दुसरं काय?

मधेच कुणी तरी पासपोर्ट वर 'Emigration check not required' असा शिक्का पाहीजे असं पिल्लू सोडून जोडीला आपल्या अमक्या तमक्याला तो शिक्का नसल्यामुळे कसं विमानतळावरून परत यावं लागलं याचं तिखटमीठ लावून वर्णन केलं. तेव्हा immigration आणि emigration यातला फरक समजण्या इतका अनुभव गाठीशी नव्हता! शिवाय दोन्हींचे उच्चार सारखेच असल्यामुळे एक अमेरिकन स्पेलिंग असणार याची खात्रीच होती मला! आमच्या दोघांच्या पासपोर्टांवर तो शिक्का नव्हता. लोकांनी एजंटाकडे द्यायचा सल्ला दिला. एकंदरित लोकांची एजंटावर मदार फार! नशीब ते स्वत:च्या लग्नाला एजंटाला उभा करत नाहीत. पण आम्ही बाणेदारपणे स्वतःच ते करायचं ठरवलं आणि झक मारत पहाटेच्या गाडीनं मुंबई गाठली, कारण ते ऑफिस १२ वाजेपर्यंतच अर्ज घ्यायचं. रीतसर विविध रांगांमधे उभे राहून एकदाचा तो फॉर्म भरला. ८ दिवसांच्या आत पासपोर्ट घरी आल्यावर मला काही लोकांनी त्यांच्या पासपोर्ट संबंधीची कामं करून देण्याबद्दल विचारणा केली.

वेगवेगळ्या आघाड्यांवर लढता लढता अखेरीस जायचा दिवस आला. रात्री दीडच विमान होतं. एशियाडनं मुंबईला जायला तेव्हा कितीही वेळ लागू शकायचा कारण रस्त्यालाही पदर असू शकतात हे कुणाच्या गावी नव्हतं आणि मोठे रस्ते बांधण्यातसुद्धा पैसे खाता येतात हे ज्ञान मंत्र्यांना झालेलं नव्हतं. त्यामुळे इंद्रायणीने दादरला उतरून टॅक्सीनं विमानतळ गाठला. पुढे नक्की काय करायचं ते माहीत नव्हतं. एस्टी आणि रेल्वेच्या प्रवासाचा अनुभव कुचकामी होता. आत जायला एअरलाईनींच्या नावानुसार गेटं होती. प्रत्येक गेटावर पोलीस तिकीट आणि पासपोर्ट बघून आत सोडत होते. भलत्याच गेटनं आत गेलो तर भलत्याच प्लॅटफॉर्मला लागू ही भीती होती. मग विमानतळा बाहेर थांबलेल्या अनंत लोकांकडे तुच्छतेची नजर टाकून एअर इंडियाच्या गेटातून रुबाबात आत गेलो. आत गेल्यावर समजलं की कुठल्याही गेटानं आत आलो असतो तरी काहीही फरक पडला नसता. आत बर्‍याच जणांकडे सामानांची बोचकी दिसल्यावर माझ्या होल्डॉलकडे बघून कुणी नाकं मुरडली नसती. करोनी देशाटन, चातुर्य येतं ते हेच असावं!

विमानतळावरची प्रत्येक गोष्ट चातुर्यात भर टाकत होती. त्या काळात कॅमेरा, दागिने इ. ड्युटीचुंबक गोष्टी (लॅपटॉप जन्मले नव्हते) भारता बाहेर न्यायच्या असतील व येताना परत घेऊन यायच्या असतील तर कस्टम मधे जाहीर करावं लागायचं. नाही तर येताना ड्युटी किंवा लाच द्यावी लागायची. जाहीर केल्यावर एक पावती मिळायची ती परत येताना कस्टम मधे दाखवायची की झालं! माझ्याकडे नातेवाईकाकडून मोठ्या मिनतवारीने आणलेला एक जुनापाना कामचलाऊ कॅमेरा होता. तो मी मोठ्या हुशारीने जाहीर करायला गेल्यावर तिथल्या कारकुनाने त्यावर ओझरती नजर फेकून 'काही गरज नाही' असं सांगितलं. मला अर्थातच तो त्यांचा लाच उकळायचा डाव वाटला. आता कॅमेरा जाहीर करून घेण्यासाठी लाच द्यावी की काय या संभ्रमात असताना त्यानं कॅमेरा खूप जुना आहे येताना कुणी विचारणार नाही अशी ग्वाही दिल्यावर मी तिथं घुटमळणं सोडून दिलं.

मग मी टॉयलेटच्या तपासणीला गेलो. कारण 'A station is known by the toilet it keeps' असं मला वाटतं. मनाची पूर्ण तयाची करून आत पाऊल ठेवलं आणि थक्क झालो. तो पर्यंत भारताच्या कुठल्याही स्टेशनवर इतकं स्वच्छ टॉयलेट मी पाहीलेलं नव्हतं. घाण वास नाही, काही तुंबलेलं नाही, चालू स्थितीतले नळ, सुस्थितीतले पाईप, कुठे जळमटं धूळ कळकटपणा नाही हे पाहिल्यावर मला विमानतळाबद्दल वाटायला लागलेला आदर नंतर फ्रँकफर्टचं टॉयलेट पाहिल्यावर 'प्रगतीला वाव आहे' मधे बदलला. मी बाहेर आल्या नंतर भारलेल्या नजरेनं माझी निरीक्षणं चालू ठेवली तेव्हा दांडगे टॉयलेटला गेला. परदेशी बायकांचे कपडे तर तोकडेपणाचा कळस होते, अगदी पायातले मोजेसुद्धा तोकडे? नाहीतर आमची हेलन! कॅबेरेतही स्किनकलरचे का होईना पण अंगभर कपडे घालायची हो! बिनधास्तपणे सिगरेटी फुंकणार्‍या व दारू पिणार्‍या बायका फक्त सिनेमातच नसतात हे मौलिक ज्ञान तेव्हाचच!

जागोजागी लावलेल्या फलकांवर कुठलं विमान कधी आणि कुठल्या गेटवरून उडणार ते पाहून मी थक्क झालो. एस्टी स्टँड सारखं 'सव्वा ११ची मुंबई कोल्हापूर मुतारीच्या बाजूला उभी आहे. प्रवाशांनी लाभ घ्यावा!' हे निवेदन ११ वाजून २० मिनिटांनी करून प्रवाशांची दाणादाण करायची भानगड इथे नव्हती. आमची एअर इंडियाची फ्लाईट ४० मिनिटं उशीरा उडणार होती. एअर इंडियानं मात्र त्यांच्या 'या' कामगिरीत अजूनही सातत्य राखलं आहे मात्र! 
'मामानं टॉयलेट मधे २० डॉलर मागितले'.. दांडगे परत येऊन म्हणाला.
'आँ! कशाबद्दल?'.. दांडगेनं खांदे उडवले.
'तू दिलेस?'
'हो!'
'का?'.. परत दांडगेनं खांदे उडवले.
'अरे! नाही द्यायचे!'.. हा माझ्या आत्मविश्वासाचा बुडबुडा! त्याच्या ऐवजी मी असतो तर मीही मुकाटपणे दिले असते. मी मात्र विमान सुटेपर्यंत टॉयलेट मधे न जायचा निर्णय घेतला. उरलेला वेळ दुकानातल्या वस्तूंच्या डॉलर मधल्या अचाट किमती बघून आ वासून डोळे विस्फारण्यात गेला. डॉलर मोजून चहा कॉफी पिणार्‍यांचा आदर करीत गेटावरून विमानाच्या अद्भुत दुनियेत आलो. अगदी काळाची टेप फास्ट फॉरवर्ड करून पाहीलेल्या जगाइतकं अद्भुत! नेहमी बसायची नाहीतर पाठ टेकायची फळी निघालेली शिटं बघायची सवय झालेल्या मला सगळी स्वच्छ, रंग न उडालेली व न डगमगणारी शिटं पाहून कससंच झालं. विमानातलं टॉयलेट तर अफलातून! एव्हढ्याश्या जागेत आवश्यक सर्व गोष्टी इतक्या खुबीने आणि चपखलपणे बसविणार्‍या डिझायनरचं कौतुक वाटलं! विमानाच्या तिकीटात सिनेमे, दारू आणि खाणं समाविष्ट असणं ही तर सुखाची परिसीमा!

फ्रँकफर्टला विमान उतरल्यावर आम्हाला अजून एका विमानातून पुढचा प्रवास करायचा होता. ते विमान सुटायला तीन तास अवकाश होता. इतर लोक त्यांच्या बॅगा बेल्ट वरून उचलत होते. 'आपलं सामान दुसर्‍या विमानात ते हलवतील' असं म्हणत तिकडे जाणार्‍या दांडगेला मी रोखलं. आमच्या विमानाचं गेट लागायचं असल्यामुळे आम्ही एका बेंचवर टाईमपास करत बसलो. अर्ध्या तासा नंतर दांडगेला राहवलं नाही, तो मला हट्टाने बॅगांच्या बेल्टपाशी घेऊन गेला. तिथे एका कोपर्‍यात आमच्या बॅगा दीनवाण्या नजरेनं उभ्या असलेल्या सापडल्या. हेच जर सध्याच्या काळात घडलं असतं तर अख्खा विमानतळ खाली करून आम्हाला दहशतवादी म्हणून आत टाकलं असतं. पुढचं विमान एकदम चिमणं होतं. जेमतेम १४ सिटं. १  X १ अशी सिटांची रचना! बसल्या जागेवरून आम्हाला पायलट आणि त्यांचे स्क्रीन दिसत होते. हवाईसुंदरी वगैरे भानगड नाही. विमान उडाल्यावर एका पायलटनेच सँडविच व पेयं असलेली एक टोपली मागे ढकलली. सेल्फ सर्व्हिस! त्यावर बाकीचे प्रवासी तुटून पडले तरी चारचौघात हावरटासारखं घ्यायचं नाही ही शिकवण असल्यामुळे मी उगीचच थोडंस घेतल्यासारखं केलं. 

ते विमान उतरलं तो विमानतळही छोटाच होता. विमानातून उतरायला एक शिडी लावली. मी खाली उतरायला शिडीवर उभा राहीलो आणि अति गारव्यामुळे पोटरीत गोळा आला. मला उतरणं मुश्कील झालं. एप्रिल मधे किती थंडी असून असून असणारे असा विचार करून कुठलेही गरम कपडे न घेता मी बिनधास्तपणे आलो होतो. कुणाला माहिती होतं यांची एप्रिलची थंडी पुण्याच्या डिसेंबरतल्या पेक्षा जास्त असते ते? पुण्याच्या गारव्याला थंडी म्हणणं म्हणजे शॉवरला मुसळधार पाऊस म्हणण्यासारखं आहे. मनातल्या मनात बापुजींना नमस्कार केला व पाय चोळत चोळत कसाबसा खाली उतरलो. न्यायल्या आलेल्या गाडीतून हॉटेलवर जाताना हिरव्या झाडीनं गच्च भरलेल्या टेकड्या पाहिल्यावर वाटलं आपल्याकडे 'रिकाम'टेकड्यांचं प्रस्थ जास्त आहे. हिरव्या रंगाच्या किती त्या छटा! वा! गाडीचा स्पीडोमीटर अधून मधून मी पहात होतो. विमानतळावरून बाहेर पडताना तिचा वेग ६० किमी होता तो हायवे लागल्यावर  २०० किमीच्या पलिकडे गेलेला पाहून मी त्याहून जास्त वेगाने देवाचा धावा करायला लागलो. डेक्कन क्वीनपेक्षा जोरात जाणारी गाडी असू शकते हे तेव्हा माझ्या गावीही नव्हतं.

रात्री जेवायला जाण्यासाठी खोलीच्या बाहेर पाऊल ठेवलं आणि एकदम लॉबीतले दिवे लागले. कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवली आहे की काय असं वाटून मी दचकलो. नंतर लक्षात आलं की ते लॉबीत हालचाल झाली की आपोआप लागणारे होते. हॉटेलातल्या १/२ लोकांना इंग्रजी येत होतं म्हणून हॉटेलातच खायचं ठरवलं. पण ते दर वेळेला हजर असण्याची गॅरंटी नव्हती. इकडचे वेटर आणि वेटरिणी आपण टेबलावर बसल्यावर हसतमुखानं स्वत:ची ओळख करून देतात व पहिल्यांदा काय पिणार म्हणून विचारतात. आमच्याकडचे वेटर कंटाळलेल्या चेहर्‍यानं आपण टेबलावर बसल्या बसल्या कळकट बोटं बुचकळलेला पाण्याचा ग्लास आणि मेन्यू समोर आपटतात. अमृततुल्यात तर 'फडका मार रे बारक्या!' असा मालकानं आवाज दिल्याशिवाय टेबल पण पुसायची तसदी घेतली जात नाही. इकडे आल्यावर पहिल्यांदा समजलं की दारू किंवा ज्यूस या जेवणाबरोबर प्यायच्या गोष्टी आहेत. दोन तीन दिवस करून बिअर बरोबर जेवलो. पण पाणी ते पाणीच! मग मात्र सरळ पाणी मागितलं. त्यामुळे पाणी ही पण प्यायची गोष्ट असते ते वेटरला पहिल्यांदा समजलं. हॉटेलातला मेन्यू वाचण्याचा घोळ नको म्हणून आम्ही ज्या हॉटेलात रहात होतो तिथल्याच रेस्टॉरंट मधे खायचो.. कारण, तिथे दोन्ही भाषेतले मेन्यू होते.. पण, इंग्रजी मेन्यू मधे फक्त चार पाचच नावं होती. जर्मन मेन्यू मधे ढीगभर होती. काही दिवस इंग्रजी मेन्यू खाऊन कंटाळल्यावर मी जर्मन मेन्यूतलं खाण्याचा धाडशी निर्णय घेतला. उच्चार करण्याची बोंबच असल्यामुळे मी वेट्रेस आल्यावर जर्मन मेन्यूवर एका ठिकाणी बोट ठेवून आत्मविश्वासाने ऑर्डर ठोकली. जे आलं ती स्वीट डिश होती. ते गिळून झाल्यावर मेनूच्या दुसर्‍या भागात बोट ठेवलं. जे आलं तो मेन कोर्स होता. पण स्वीट डिशनंतर मेन कोर्स खाणारा म्हणून आजुबाजूच्या गिर्‍हाईकांची फुकटची करमणूक मात्र केली.

दांडगे पक्का शाकाहारी होता. त्याला कंपनी म्हणून १/२ दिवस सॅलड नामक पालापाचोळा खाल्ला. 'त्या' काळी शाकाहारी जेवण असू शकतं याची त्यांना कल्पना नव्हती आणि बाहेर शाकाहारी मिळायचा वांधा असतो याची आम्हाला! रिसेप्शन मधे एका टोपलीत फळं ठेवलेली असायची. मला आधी तो डेकोरेशनचा प्रकार वाटला. भुकेलेल्या दांडगेनं न राहवून एकदा रिसेप्शनिस्टला विचारल्यावर फळं घेण्यासाठीच ठेवली आहेत हे समजलं. असं काही दांडगेच करू जाणे! माझं काही तिला विचारायचं धाडस झालं नसतं. आणखी काही दिवस सॅलड खाल्लं तर मी बकरीसारखा बँ बँ करायला लागेन अशी भीती वाटल्यामुळे मी सर्रास चिकन वगैरे मागवायला लागलो तो पर्यंत त्याची मशरूम आमलेट पर्यंत प्रगती झाली. आणखी दोन दिवसानंतर त्याची विकेट पडली व तो ही बिनधास्त चिकन मागवायला लागला.

दुसर्‍या दिवशी त्यांच्या ऑफिसात गेलो. कुठं ते भलं मोठ्ठं ऑफिस व प्रचंड कार पार्क आणि कुठं ते आमचं एका तिमजली बिल्डिंग मधल्या बारक्या फ्लॅट मधलं! काही तुलनाच नाही. कार्ड सरकवून ऑफिसची दारं उघडायची आयडिया तर भन्नाट! आमच्या पुण्याच्या ऑफिसच्या किल्ल्या २/३ लोकांकडेच असायच्या. त्यातला एक जण येईपर्यंत झक मारत बाहेर उभं रहायला लागायचं. तिथे आम्हाला एक खोली मिळाली, त्यात आम्हाला लागणारं सगळं होतं. आठवडाभर इथे बसून त्यांच्या कोडवर डोकं आपटायचं होतं! कोड बघून मात्र तोंडाला फेस आला. आधीच दुसर्‍याचा कोड वाचणं ही शिक्षा असते. मला तर मी लिहीलेलाच कोड काही दिवसांनी समजत नाही. आणि त्यात जर्मन मधे कॉमेंट व व्हेरिएबलची नावं असलेला कोड म्हणजे तर काळ्या पाण्याची शिक्षा! अर्थात कोड दुसर्‍या कंप्युटरवर नेण्यासाठी सगळा समजण्याची गरज नव्हती. जो कोड दुसर्‍या कंप्युटरवर जसाच्या तसा चालणार नाही तोच फक्त समजण्याशी मतलब होता. सुदैवाने मला त्यांच्या कोडमधे काही चुका दिसल्या. अशा चुका चंद्या माझ्या कोड मधून नेहमी काढायचा. म्हणतात ना दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं इ. इ.? पण त्या चुकांमुळे मला त्यांच्यात आणि माझ्या कुवती मधे एक प्रचंड दरी आहे असं जे वाटत होतं ते कमी झालं. हे जाणवलं की सगळे कोडगे एका माळेचे मणी!

दरम्यान जर्मन ऑफिस मधल्या एकानं, फ्रेडीनं, नवीन गाडी घेतली म्हणून सगळ्यांना पार्टी द्यायचं ठरवलं. त्याकाळी भारतात घरी गाडी असणं म्हणजे अति श्रीमंतीचं लक्षण! खाजगी गाडीत बसण्याचा अनुभव नाहीच त्यामुळे! तो आम्हाला स्वतःच्या गाडीतून पार्टीला घेऊन जाण्यासाठी आला. आम्ही दोघेही मागे बसायला लागल्यावर त्यानं मला पुढे बसायला सांगितलं. त्या पार्टीत एक बाई तिच्या फॅमिली बद्दल सांगत होती. ती आणि तो कसे शाळेत बरोबर होते पण तेव्हा कसं त्यांना एकमेकांबद्दल प्रेम वाटत नव्हते. मग एका पार्टीत कसे भेटले, आता किती मुलं आहेत इ. इ. मी मधेच नाक खुपसलं.. मग लग्न केव्हा झालं? तर ती एकदम दचकली आणि माझ्याकडे 'लग्न म्हणजे काय असतं?' अशा चेहर्‍यानं बघत मान या कानापासून त्या कानापर्यंत हलवत म्हणाली... 'नोssssss! वुई आरन्ट मॅरीड!' बों ब ला! बाकी परदेशी गेल्यावर सांस्कृतिक धक्के आणि शिष्टाचारौत्पाताला ऊतच येतो! पार्टी नंतर परत हॉटेलवर जाण्यासाठी कंपनीची गाडी आली होती. फ्रेडी पण टाटा करायला आला. मी पुढे बसायला निघालो तर त्यानं मला मागे बसायची खूण केली. मी खलास! त्याला विचारल्यावर तो म्हणाला 'अरे गाडी शोफर चालवणार असेल तर मागे नाहीतर पुढे!

आम्ही संध्याकाळी गावात चक्कर मारीत असू. तिथली दुकानं तिथले भाव असं बघत फिरायचो. न्हाव्याच्या दुकानातले भाव बघून वाटलं इथला न्हावी केस आणि खिसा एकदमच कापतो की काय? क्रॅश कोर्सनं मला एक दोन जर्मन वाक्यं पढवली होती. त्यातलं एक म्हणजे 'मला जर्मन बोलता येत नाही' हे होतं. लहानपणी आपण कसं मुंगूस दिसल्यावर 'मुंगसा! मुंगसा! तोंड दाखव नाही तर तुला रामाची शप्पथ आहे' असलं काहीतरी म्हणायचो तसं मी ते ठेवणीतलं वाक्य कुणी जर्मन मुंगूस अंगावर आलं की फेकायचो. एकदा धीर करून एका दुकानात काय आहे ते बघायला गेलो तर तिथली बाई जर्मन भाषेत फाडफाड काहीतरी बरळली. मी 'मला जर्मन बोलता येत नाही' हे घाईघाईनं तिच्यावर फेकलं. आता ती तोडक्या मोडक्या इंग्रजीत बोलेल अशी माझी अपेक्षा होती.. पण तिने ती मगाचीच जर्मन वाक्यं डेक्कन क्वीनच्या स्पीड ऐवजी बार्शी लाईटच्या स्पीडनं टाकली. मी बधीर! मग उगीचच मान हलवून समजल्यासारखं 'या! या! डान्क! डान्क!' असं म्हणत तिथून सटकलो.

परतीच्या प्रवासासाठी भल्या पहाटे उठून गाडीनं विमानतळाकडे निघालो. येताना दिसलेले हिरवे कंच डोंगर जाताना धुक्याचा मफलर मानेभोवती गुंडाळून एकटक समोर बघत बसलेल्या म्हातार्‍यासारखे दिसत होते. परतीच्या प्रवासात चेकिनसुंदरीनं एका सरदारजीचं जास्तीचं सामान आमच्या नावावर घ्यायची विनंती केली ते सोडता विशेष काही घडलं नाही. मुंबईत उतरल्या उतरल्या तो विशिष्ट दर्प नाकात शिरताच मला अगदी तुरुंगवासातून सुटका झाल्यासारखं मोकळं मोकळं वाटलं. मार्केटिंग मॅनेजरनं आम्हाला सापडलेल्या चुकांचं भांडवल करून प्रोजेक्ट मिळवल्याचं सांगितलं तेव्हा माझ्या अंगावर जे मूठभर मांस चढलं ते अजून उतरलेलं नाहीये!

== समाप्त ==

Monday, October 29, 2018

आर्किमिडीजचा स्क्रू!

आर्किमिडीजचं नाव घेतलं की बहुतेकांना त्याचा शोध नक्की काय होता ते भले सांगता येणार नाही पण तो नग्नावस्थेत युरेका! युरेका! (खरा उच्चार युरिका आहे म्हणे) ओरडत रस्त्यातून पळाला होता हे डोळ्यासमोर नक्की येईल! पाठ्यपुस्तकं रंजक करण्यासाठी ज्या गोष्टी घालतात नेमक्या त्याच जन्मभर लक्षात रहातात. असो! आर्किमिडीजने बरीच उपयुक्त यंत्रं बनविली त्यातलंच एक आर्किमिडीजचा स्क्रू आहे!

आर्किमिडीजचा स्क्रूचा वापर करून पाणी वर खेचता येतं! आर्किमिडीजचा स्क्रू हा एक मोठ्या आकाराचा स्क्रूच आहे. त्याचं एक टोक पाण्यात बुडवून तो फिरविला की पाणी त्या स्क्रुच्या आट्यातून वर वर येतं. चित्र-१ मधे पाणी वर चढविण्यासाठी एक मुलगा पायाने तो स्क्रू फिरवतो आहे.

आर्किमिडीजचा स्क्रू: एक बागेतलं खेळणं

चित्र-१: आर्किमिडीजचा स्क्रू कसा चालतो ते समजण्यासाठी केलेलं फॉलकर्क या स्कॉटलंड मधील गावातल्या एका बागेतलं खेळणं.

या उलट पाणी स्क्रू मधून सोडलं की स्क्रू फिरायला लागतो. या तत्वाचा वापर केला आहे वीजनिर्मितीसाठी! अशा पद्धतीच्या उलट सुलट क्रिया प्रक्रिया तंत्रज्ञानात इतरत्र पण वापरल्या गेल्या आहेत. उदा. तारेच्या भेंडोळ्याने चुंबकीय क्षेत्र छेदलं की तारेत वीजप्रवाह निर्माण होतो. याचा उपयोग जनित्राने वीजनिर्मिती करण्यासाठी केला जातो. तसंच तारेतून वीजप्रवाह सोडला तर तिच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जवळचा चुंबक खेचला किंवा ढकलला जातो. इलेक्ट्रिक मोटर या तत्वावर चालते.

आर्किमिडीजचा स्क्रू वापरून वीज निर्मिती

चित्र-२: आर्किमिडीजचा स्क्रू नदीतल्या बांधावर बसवून वीज निर्मिती कशी करता येते त्याची आकृती!


आर्किमिडीजचा स्क्रू पद्धतीच्या वीजनिर्मितीचे अ‍ॅनिमेशन

वीजनिर्मिती साठी स्क्रू फिरवायला पाण्याला फक्त पुरेसा दाब हवा! बांधाची उंची सुमारे १ मीटर ते १० मीटर या मधे आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग सेकंदाला सुमारे ०.०१ मीटर क्युब ते सेकंदाला १० मीटर क्युब या मधे असला की झालं. इंग्लंड मधील बर्‍याच नद्यांमधे जागोजागी बांध आधीपासून आहेत. पूर्वी बांधात अडविलेल्या पाण्याच्या जोरावर गिरण्या चालवीत असत. आता त्या बंद पडल्या असल्या तरी बांध तसेच आहेत.

ऑक्सफर्ड मधे गेल्या तीन वर्षात थेम्स नदीवरील दोन बांधांवर या तत्वावर वीजनिर्मिती सुरू झाली आहे. त्यातला पहिला प्रकल्प ऑक्सफर्ड मधील ऑस्नी गावात २०१५ मे मधे सुरू झाला. त्या प्रकल्पाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे बहुतांश भागिदार हे ऑस्नी गावातले रहिवासीच आहेत. दुसरा प्रकल्प ऑक्सफर्ड मधील सॅन्डफर्ड गावात २०१७ मधे सुरू झाला. तो ही रहिवाशांच्या भागिदारीतून उभारलेला आहे. सॅन्डफर्ड येथील बांधाची उंची ७ मीटर इतकी आहे. यातून प्रति वर्षी १.६ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होऊ शकते. सॅन्डफर्ड मधे एका शेजारी एक असे तीन स्क्रू बसविलेले आहेत. चित्र-३ पहा. 

सॅन्डफर्ड येथील तीन स्क्रू

सॅन्डफर्ड येथील तीन स्क्रू

चित्र-३: सॅन्डफर्ड मधे बसविलेले तीन आर्किमिडीजचे स्क्रू
प्रत्येक स्क्रू महाकाय आहे. एकेका स्क्रूचं वजन २२ टन आहे. चित्र-४ पहा.

महाकाय स्क्रू

चित्र-४: सॅन्डफर्ड मधील एका आर्किमिडीजचा स्क्रू चा आकार

आर्किमिडीजचा स्क्रूचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे तो प्रवाहाच्या दिशेने जाणार्‍या माशांना कुठल्याही प्रकारचा अडथळा करीत नाही. वरील व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे मासे स्क्रू मधील पाण्या बरोबर सहजपणे वहात वहात जाऊ शकतात. प्रवाहाच्या उलट दिशेने जाणार्‍या माशांसाठी सर्व धरणांच्या बाजूला एक खास पाण्याचा प्रवाह ठेवलेला असतो त्याला फिश लॅडर म्हणतात. दर वर्षी उन्हाळ्यामधे सालमन मासे समुद्रातून नद्यांमधे प्रजननासाठी येतात. त्यांना काय खुजली असते काय माहिती! पण ते बारक्या सारक्या अडथळ्यांना न जुमानता प्रवाहाच्या विरुद्ध जातात. खालील व्हिडिओत ते छोट्या छोट्या धबधब्यांवरून सरळ उड्या मारत जाताना दिसतील.


तसंच अतिवृष्टी मुळे नदी जवळच्या रस्त्यावरून पाणी वहात असेल तर ते रस्ता ओलांडायलाही कचरत नाहीत.


माशांना धरणाच्या बाजूने वर जायला रस्ता आहे हे कसं समजतं ते देवाला ठाऊक! पण त्यांना तो सापडतो हे मात्र खरं आहे. हे सर्व उपाय एका विशिष्ट आकारापर्यंतच्या माशांसाठी ठीक आहेत म्हणा! अगदी मोठ्या आकाराचे मासे नदीच्या खाडीत फार फार तर येतात पुढे जात नाहीत. सप्टेंबर २०१८च्या शेवटी एक बेलुगा जातीचा देवमासा लंडन मधे थेम्स नदीत ४/५ दिवस घुटमळत होता. अर्थातच तो चुकला होता.

-- समाप्त --

Tuesday, October 23, 2018

ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या....

'दिवाळीचा काय प्लॅन आहे रे बंड्या?'.. अष्टपुत्रेंनी आठव्यांदा विचारल्यावर बंड्या 'पुण्याला जायचा विचार आहे' असं गुळमुळीतपणे पुटपुटला. त्याला कारण तसंच होतं. अष्टपुत्रेंना विषय मिळायचा अवकाश की ते त्यावर तासनतास ब्रेथलेस गाण्यासारखे बोलू शकायचे. पण त्यांना टाळता येणं शक्य नव्हतं. कारण त्याच्या गावात मराठी टाळकी कमी असल्यामुळे कुठल्याही समारंभात तीच तीच पुनःपुन्हा भेटायची. इंग्लंडातली मराठी मंडळी चक्क एकमेकांना धरून असतात हे समजलं तर अखिल महाराष्ट्रातले कट्टर मराठी झीट येऊन पडतील. असो! पण बंड्याच्या चावीमुळे लंडन पुणे प्रवासावरचा त्यांचा हातखंडा एकपात्री प्रयोग सुरू झाला!

'मी सांगतो तुला बंड्या! सकाळच्या विमानाने अजिबात जाऊ नकोस.'
'क क का? तिकीट स्वस्त आहे!'.. बंड्याचा चेहरा पडला.
'अरे असं किती स्वस्त असणारे? फार तर फार १५ पौंड! पण कटकट बघ किती होते. सकाळी ९ च्या आसपास विमान असतं म्हणजे ७ च्या सुमारास हिथ्रोवर पोचायला हवं! इथून हिथ्रोला जायला दीड तास तरी लागतोच लागतो. म्हणजे साडे पाचला निघायला हवं! त्यासाठी ४/४:३० ला उठायचं म्हणजे किती कटकट! इतकं करून मधे कुठे ट्रॅफिक जॅम होत नाही ना याची धाकधुक! विमान पोचतं रात्री ११ च्या सुमारास! मग टॅक्सी घेऊन पुण्याला पोचेपर्यंत पहाटेचे ३ तरी वाजतातच. आपण गेल्यावर सगळे उठतात. मग चहा पाणी आणि प्रत्येक जण आपली उलटतपासणी करेपर्यंत सकाळ होते. म्हणजे झोपेचं भजं!'
'पण माझा आदल्या रात्री तिथे जवळच्या हॉटेलात रहायचा प्लॅन आहे'.. बंड्या आपल्यालाही विचार करता येतो याची चुणुक दाखवायला गेला आणि ये रे बैला करून बसला.
'आयला! तू १५ पौंड वाचवायला १०० पौंडाच्या हॉटेलात रहाणार? देशस्थ शोभतोस अगदी! हा हा हा! अर्थात मी ते पण करून बसलोय म्हणा! त्याची पण गंमत सांगतो तुला!'.. अजून जेवायला वेळ होता तो पर्यंत आख्यानातुन सुटका नव्हती.......

मी एक स्वस्तातलं हॉटेल घेतलं होतं ज्यांची हिथ्रोवर न्यायची आणायची फुकट सेवा होती. स्वस्त म्हणजे तरी ७० पौंड बरं का? मग इथून थेट हिथ्रोची बस घेऊन महाशय आदल्या दिवशी संध्याकाळी हिथ्रोच्या फलाटावर दाखल झाले. तिथून हॉटेलला गाडी पाठविण्यासाठी फोन लावला. अष्टपुत्रेंनी कानापाशी मूठ नेली.
'तू कुठे आहेस?'.. रिसेप्शनिस्ट म्हणाला.
'टर्मिनल ४ वर, अरायव्हल पाशी'
'ठीके. मी गाडी पाठवतो. गाडीचा नंबर आहे.. एक्स एल ५२ व्ही आर वाय. तू असं कर. टेक अ लिफ्ट अँड गो टू डिपार्चर गेट जी अ‍ॅज इन गॅरी'
'ओके.' तो गाडी कुठे पाठवतोय ते ऐकता ऐकता गाडीचा नंबर विसरलो. त्यांना काय सांगायचं ते तोंडपाठ असतं, ते वाघ पाठीमागे लागल्यासारखे एका दमात सगळं सांगतात, आपण त्याच दमात विसरतो.
लिफ्ट घेऊन डिपार्चर मधे आलो. ते शिंचं गेट जी काही सापडेना. इकडे तिकडे केल्यावर शेवटी तिथल्या एका कामगाराला विचारलं..
'अरे भाऊ! इथे गेट जी कुठे आहे?'
'गेट जी? असं काही नसतं. इथल्या गेटांना नंबर आहेत. एक दोन तीन असे'
म्हंटलं हा रिसेप्शनिस्ट पुरूष असूनही असं कसं भलतंच सांगतो? बाई असती तर समजू शकलो असतो मी! बायका तोंडाला येईल ते बोलतात. जिथं उजवीकडे वळायला हवं असतं तिथं खुशाल डावीकडे वळ म्हणतात.

'मी ऐकतेय हांssssss!... आतून सौंचा आवाज आल्यावर अष्टपुत्रेंनी मिष्किल हसत डोळा मारला आणि मानेनेच 'पाहिलंस?' असं विचारलं.
'मग?'.. बंड्याला त्यांचं आख्यान लवकर संपण्यात जास्त रस होता.
'मग काय? परत फोन.'.. परत कानापाशी मूठ!
'अरे बाबा! मी तो मगाच्चाच टर्मिनल ४ वाला. इथे गेट जी असं काही नाहीये रे!'
'अहो! मी गेट जी नाही म्हणालो. तुला गेट ऐवजी चुकून दुसरं काही वाटू नये म्हणून मी पहिलं अक्षर सांगितलं. जी!'.. त्या रिसेप्शनिस्टला मनातल्या मनात मी निवडक शेलक्या शिव्या हासडल्या.
'ओके. मग मी काय करू आता?'
'तू आत्ता कुठे आहेस?'
'डिपार्चर'
'लेट्स डू धिस केअरफुली नाऊ! तू अरायव्हला जा. तिथून लिफ्टने डिपार्चरला ये. मग गेट मधून बाहेर पड. तिथे बरेच बसस्टॉप दिसतील तिथे थांब'
अरे माठ्या! मी डिपार्चरलाच आहे. असं जोरात ओरडून सांगावसं वाटलं मला. म्हंटलं हा रिसेपशनिस्ट आहे की गणितज्ज्ञ?

'गणितज्ज्ञ?'... बंड्याला आपल्या क्रिकेटपटुंसारखी त्याच त्याच चुका करून आउट व्हायची सवय आहे. त्याच्या प्रश्नामुळे एक उप-आख्यान सुरू झालं.
अरे! तुला माहिती आहे का? कुठल्याही नवीन प्रश्नाचं रुपांतर ज्याचं उत्तर माहिती आहे अशा प्रश्नात करण्यामधे गणितज्ज्ञांचा हातखंडा असतो. समजा एका गणितज्ज्ञाला असा प्रश्न टाकला... तुला एक पातेलं, चहा, साखर, गॅस, दूध, पाणी इ. सगळं दिलेलं आहे. तर तू चहा कसा करशील? तर तो सांगेल.. पातेल्यात चहा, साखर पाणी घालून गॅस पेटवून त्यावर ते उकळायला ठेवेन. उकळल्यावर त्यात दूध घालून अजून एक उकळी आणेन. मग कपात चहा गाळून घेईन... मग त्याला जरा वेगळा प्रश्न टाकला.. समजा आता तुला पेटवलेल्या गॅसवर पातेलं ठेवून दिलेलं आहे. पातेल्यात चहा साखर पाणी घातलेलं आहे. तर आता चहा कसा करशील?
तर तो काय म्हणेल? पातेलं गॅसवरून उतरवेन. त्यातलं सगळं पाणी फेकून देईन. म्हणजे मग या प्रश्नाचं रुपांतर पहिल्या प्रश्नात होईल ज्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. आता बोल! हा हा हा हा हा!.. अष्टपुत्रे बेदम हसले व बंड्या कसंनुसं हसला.

'काय सांगत होतो मी?'.. अष्टेकरांनी गेट हरवल्यासारखा चेहरा केला.
'चहा कसा करायचा'
हां!.. मग एकदाचा हॉटेलवर पोचलो. स्वस्तातलं हॉटेल घेतल्यामुळे रुममधे टॉयलेट/बाथरूम नव्हतं. होतं फक्त बेसिन! पहाटे उठून जायचं असल्यामुळे रात्रीच अंघोळ उरकण्याचं ठरवलं. माझ्या मजल्यावर कुठेही बाथरूम नव्हती. शोधाशोध केल्यावर ती वरच्या मजल्यावर सापडली. कुणीतरी गेलेलं होतं. म्हणजे समजलं का? जवळपास १५ खोल्यांमधे एकच बाथरूम होती. परत खोलीत गेलो. दोन-चार वेळा वरखाली केल्यावर एकदाची ती बाथरूम रिकामी सापडली आणि अंघोळ उरकली.
सकाळी उठून तयार होऊन विमानतळावर नेणार्‍या गाडीसाठी रिसेप्शन मधे आलो. मी धरून ७ लोक तिथे होते. गाडीत ड्रायव्हर सोडून ७ च शिटं होती. पण एका  जोडप्याकडे भला मोठा लांबडा सर्फिंग बोर्ड होता. तो दोन रांगेतल्या दोन माणसांच्या मानांमधून पार डिकीपासून ड्रायव्हर पर्यंत पसरला. गाडीच्या प्रत्येक वळणाबरोबर बोर्ड गालाशी नको तितकी सलगी करत होता. मला 'सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना गाल-ए-कातिल में है?' असं ताठ मानेनं म्हणावसं वाटलं. एकदाचं सर्फर लोकांचं टर्मिनल आलं आणि ते बोर्डासकट गुल्ल्याड झाले आणि मी यथावकाश टर्मिनल स्थित झालो.

घुssssssर्रsssssssss! एव्हाना बंड्यानंही झोपेचं टर्मिनल गाठलेलं होतं.

------***-----------***---------

बंड्यानं अष्टपुत्रेंच्या सल्ल्यापेक्षा नंतरच्या आख्यानांना घाबरून रात्रीच्या विमानाचं तिकीट काढलं. ट्रॅफिक जॅममुळे अर्धा तास उशीरा विमानतळावर पोचला. विमानतळ कसला? प्रवासीतळच म्हणायला पाहिजे खरं तर! आता बंड्या पण इथे तळ ठोकून बसणार नव्हता का?.. विमान धक्क्याला लागेपर्यंत? विमानतळ म्हणतात तसं बसतळ किंवा रेल्वेतळ का नाही म्हणत? किंवा उलट विमानस्थानक का नाही?

चेकिन झाल्यावर सुरक्षा तपासणीच्या भल्या मोठ्या रांगेत उभं राहून एकदाचा तो सुरक्षा अधिकार्‍यापाशी पोचला. त्याच्याकडे फक्त एक खांद्यावरची बॅग होती. बंड्याला सुरक्षा तपासणीत कधीच सुरक्षित वाटायचं नाही. बॅग क्ष किरणातून गेल्यावर तिथल्या बाईला काही तरी संशय आला. तिनं त्याची बॅग उघडून काही कपडे, चॉकलेटं आणि काही छोटी खेळणी बाहेर काढली. सुरक्षा तपासणी ही आमच्या खाजगी आयुष्यावरील लज्जास्पद अतिक्रमण आहे असं काही म्हणता येत नाही दुर्दैवाने! तिनं शेव्हिंग फोम उचलून कचर्‍यात टाकला. बंड्यानं प्रश्नार्थक मुद्रा करताच तिनं तडफदारपणे '१०० एमएलच्या वरती न्यायला परवानगी नाही. लिहीलंय सर्व ठिकाणी!' असं 'काय गावठी लोक प्रवास करतात हल्ली' अशा अर्थानं मान वेळावत ठणकावलं. बंड्यानं 'अहो! पण त्यात काही फार शिल्लक नाहीये' असं काकुळतीने सांगितल्यावर तिनं विजयी मुद्रेनं तो डबा कचर्‍यातून बाहेर काढला त्या शेव्हिंग फोमच्या डब्यावर २०० एमएल लिहीलेलं दाखवलं आणि परत शेव्हिंग फोमम् समर्पयामि केला. मग तिनं त्यातल्या एका खेळण्याचं प्लॅस्टिक पॅकिंग फोडून एक चिमुकला स्क्रू-ड्रायव्हर काढून 'शार्प ऑब्जेक्ट्स नॉट अलाउड' म्हणत स्क्रू-ड्रायव्हरम् समर्पयामि केला. बंड्यानं तिलाच उचलून सुरक्षा नारिम् समर्पयामि करायची ऊर्मी कशीबशी दाबली.

शेवटी बंड्यानं एकदाचं विमानातल्या शिटावर बूड टेकवलं. शेजारची दोन शिटं रिकामी होती. बंड्यानं ती तशीच रिकामी ठेवण्याबद्दल देवाचा धावा केला पण आज देवाचा मूड बरोबर नव्हता. थोड्याच वेळात तिथे एक बाई आणि तिची सुमारे ३ वर्षाची मुलगी स्थानापन्न झाल्या. त्याचं पाय पसरून झोपायचं स्वप्न विरलं. बंड्यानं इकडे तिकडे आणखी कुठे रिकामी शिटं आहेत का ते पाहीलं. पण छे! सामान्यांचा विमान प्रवास म्हणजे इकॉनॉमी क्लास नामक खुराड्यात एक कोंबडी होऊन अंग चोरून तासनतास बसणं! इथे फक्त डोळ्यांची उघडझाप व श्वासोश्वास या दोनच गोष्टी शेजारच्याला धक्का न लागता करता येतात. विमान धावपट्टीकडे कूच करेपर्यंत हवाईसुंदरीने कवायत केल्यासारखे हातवारे करत संकट समयीचे उद्योग समजावले. एअरहोस्टेसला हवाईसुंदरी हा शब्द कुणा गाढवानं केला? त्याच न्यायानं नर्सिणीला दवाईसुंदरी का नाही केला? किंवा रिसेप्शनिस्ट बाईला स्वागतसुंदरी? विमान झेपावल्यानंतर बंड्या घाईघाईने व्हिडिओ कडे झेपावला. पण तो काही केल्या चालू होईना. बंड्यानं हवाईसुंदरीकडे तक्रार करताच 'सर, मी सांगते हं त्यांना' असं कृत्रिम स्मितासकट कृत्रिम मार्दवपूर्ण आवाजात ऐकायला मिळालं.

बंड्यानं नाईलाजाने डोळे मिटले.. आणि चक्क त्याला झोप लागली. थोड्या वेळानं आपण गर्दीतून चाललो आहोत आणि खांद्याला धक्के बसताहेत असं वाटलं. एव्हढ्यात आपण डेक्कनला पण पोचलो की काय या विचाराने जाग आली.. तर एक हवाईसुंदर त्याला हलवून 'वुड यु लाईक डिनर, सर?' असं घोगर्‍या आवाजात विचारत होता. हवाईसुंदर कसला हवाईटपोरी वाटत होता तो! च्यायला शांतपणे झोपू पण देत नाहीत लेकाचे! बंड्यानं तिरसटून 'काय आहे खायला?' विचारल्यावर 'फक्त चिकन आणि लँब इतकंच शिल्लक आहे, सर!' असं कृत्रिम स्मितासकट कृत्रिम मार्दवपूर्ण आवाजात ऐकायला मिळालं. शुद्ध शाकाहार्‍याने चुकून बोंबील खाल्ल्यासारखा त्याचा चेहरा झाला. आधी सांगून सुद्धा व्हेज कसं शिल्लक नसतं? बरीच कडकड केल्यावर हवाईसुंदर मागे गुप्त झाला आणि जादु केल्या सारखा एक व्हेज जेवण घेऊन हजर झाला. 'आता कसं काय व्हेज मिळालं रे तुला?' म्हणून बंड्यानं अजून चिडचिड केली. जेवण चालू असताना त्याला शेजारची बाई तिच्या मुलीला लाडानं मराठीत म्हणाली.. 'आता एका मुलीला पुण्याला कोण कोण भेटणारे?' आणि तिनं भोकाड पसरलं. त्या बाईनं कसं बसं करून तिला शांत केलं. बंड्या परत झोपायच्या तयारीत असताना ती बाई काहीही कारण नसताना मुलीला म्हणाली.. 'आता तिकडे गेल्यावर मराठीत बोलायचं बरं का सगळ्यांशी!'.. आणि तिनं परत भोकाड पसरलं. अर्धा तास भँ झाल्यावर ती थकून झोपली तर त्या बाईनं तिला 'चॉकलेट हवं का?' असं विचारून तिला रडवलं. बंड्यानं मोठ्या कष्टानं 'माता न तू वैरिणी' म्हणायचं टाळलं. त्या पोरीला बंड्यात कंसाचा चेहरा दिसायचा की काय कुणास ठाउक! कारण बंड्यानं तिच्याकडे नुसतं पाहिलं तरी ती जीव धोक्यात असल्यासारखी किंचाळायची. अशा परिस्थितीत बंड्याला त्याच्या बॉसची 'ती' बढाई आठवली नसती तरच नवल होतं. बॉसच्या आयुष्यात काहीही बरं घडलं की ती बढाईच असली पाहीजे अशी तमाम पोरांची खात्रीच असते. बॉस पुण्याहून मुंबईला विमानाने निघाला होता तेव्हा त्याच्या शेजारी एक सुंदर स्त्री बसायला आली. बॉसकडे बघून नर्व्हस हसली. मग विमान जसं धावपट्टीवर धावायला लागलं तसं तिनं त्याचा हात घट्ट धरला तो विमान खूप वर गेल्यावर परत नर्व्हस हसून हात सोडला. विमान उतरायच्या वेळेला तीच कथा! शेवटी न राहवून तिला बॉसनं विचारलं 'एकट्या प्रवास करताय म्हणून इतकं टेन्शन आलं का?'
'मी एकटी नाहीये, नवरा बरोबर आहे'
'आँ! जवळ जवळची शिटं नाही मिळाली का मग?'
'नाही नाही! तो विमान चालवतोय'.. यावर बॉस अवाक झाला.

रडण्या किंचाळण्याच्या पार्श्वभूमिवर कधी तरी मुंबईच्या कळकट इमारती दिसायला लागल्या आणि धुरकट हवेत विमान एकदाचं उतरलं. बाहेर पडल्यावर त्यानं एक पुण्याची टॅक्सी पकडली. टॅक्सी म्हणजे एक टेम्पो होता. दुपारी १२ च्या रणरणत्या उन्हात त्या टेम्पोची भट्टी झाली होती. बंड्याला कधी एकदाची गाडी सुरू होतेय असं झालं होतं. पण टॅक्सीवाला गाडी भरल्याशिवाय थोडाच सोडणार होता? ५ मिनिटांनी त्याच्या शेजारची बाई तिची मुलगी आणि एक माणूस गाडीत चढले आणि बंड्यानं मनातल्या मनात कपाळाला हात लावला. ती बंड्याकडे बघून हसल्यावर तो माहिती होतं तरी उगीचच म्हणाला..'तुम्ही पण पुण्याला चाललाय?'
'हो! हा माझा दीर, मला न्यायला आलाय.'
बंड्याचे आणि त्याचे नमस्कार चमत्कार झाले आणि एकदाचा तो टेम्पो सुरू झाला. मुंबईच्या प्रचंड गर्दीतून बाहेर पडेपर्यंत टेम्पो वेग पकडणं शक्य नव्हतं. आणि गर्दीमुळे ड्रायव्हरचा 'अडला हरी बिप बिप करी' झाला होता. गाडीची शिटं ढिल्ली होती. ब्रेक मारला की थोडी पुढे सरकायची आणि अ‍ॅक्सिलरेट केल्यावर मागे! त्यामुळे बंड्याची जड बुडाची बाहुली झाली होती. थोड्या वेळाने गाडीचा एसी चालत नसल्याची घामट जाणीव झाली. ड्रायव्हर म्हणाला थोडा धीर धरा पण धीर घामाच्या प्रत्येक थेंबाने सुटत गेला. कुणी तरी ड्रायव्हरला म्हणालं .. 'अहो हा एसी आहे की फॅन?'..
'साहेब! गाडीला जरा मौसम पकडू द्या मग समदं ठीक व्हईल.'.. गाडी गर्दीत कसला मौसम पकडणार? अर्धा तास झाला तरी गाडी विमानतळापासून फारशी दूर गेलेली नव्हती.

'व्हाय इज द एसी नॉट वर्किंग? डोन्ट ब्लफ मी हांss! खर खर सांग! दोन दोन गाड्या आहेत माझ्याकडे!'.. त्या बाईनं तिच्या फर्ड्या इंग्रजी मराठीत ड्रायव्हरला झापला. त्या बिचार्‍या ड्रायव्हरला काय इंग्लिश कळणार होतं?
मग ती बंड्याला म्हणाली.. 'आपण त्यांना फोन करून सांगू या. ते पाठवतील दुसरी गाडी. आपण एवढे पैसे मोजलेत!'
'बरं बघा प्रयत्न करून!'.. बंड्या नाईलाजाने म्हणाला. तिनं ऑफिसला फोन लावला मग ते ड्रायव्हरशी बोलले. ड्रायव्हरने त्यांना तेच सांगितलं. त्यांनी त्याला गाडीवर पाणी मारायचा सल्ला दिल्याचं त्यानं आम्हाला सांगितलं. पण त्या बाईला वाटलं एसीत पाणी नाहीये आणि ती बंड्याला म्हणाली.. 'बघा हं! आता एक एक बाहेर यायला लागलंय! आता म्हणतोय एसीत पाणी नाही.' बंड्याला हसू आवरेना. एसीच्या पाण्याबद्दल ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

ड्रायव्हरनं चेंबुरला एका गॅरेजपाशी गाडी थांबवून टपावर पाणी मारलं पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. एसीतच प्रॉब्लेम आहे हे तिला एकदाचं समजल्यावर ती ड्रायव्हरला म्हणाली.. 'अरे तो एसीच चालत नाहीये! आमचे काही तुझ्यावर पर्सनल ग्रजेस नाहीयेत. एसी चालत नाही हे मान्य कर.'.. ड्रायव्हरने वाशीपाशी ते मान्य केलं. मग तिनं परत फोन करून तक्रार केली आणि त्यांनी गाडी पाठवायचं मान्य केलं. बंड्यानं सुटकेचा निश्वास टाकला. तो पर्यंत गाडी खोपोलीच्या रेस्टॉरंटाला लागली होती. तब्बल अर्धा तास थांबल्यावर पुढची गाडी आली. दुसरी गाडी येईपर्यंत निघायचं नाही असं ड्रायव्हरला सांगण्यात आलं होतं. तिचा दीर सगळ्यांकडे सहानुभूतिपूर्वक पहात होता. एकदाची ती गाडी आली. पण गाडीत जास्त जागा नसल्यामुळे फक्त ती, तिची मुलगी आणि दीर इतकेच लोक गेले. बाकीचे झक्कत त्या खटार्‍यातून निघाले. बरोबरच आहे म्हणा, रडक्या मुलांचेच लाड जास्त होतात! त्यातल्या त्यात सुखाची गोष्ट म्हणजे घाट चढता चढता हवा थंङ होत गेली आणि बंड्याला थोडी झोप मिळाली.

'काय कसा झाला प्रवास?'.. बंड्या घरी पोचल्यावर बाबांनी विचारलं.
'अहो बाबा! काही विचारू नका! काय वैताग आलाय म्हणून सांगू? बाप रे!'... असं म्हणत बंड्या उत्साहाने सांगायला लागला आणि थोड्याच वेळात....

घुssssssर्रsssssssss! बाबांनी झोपेचं टर्मिनल गाठलं आणि बंड्याला जाणवलं की त्याचा ही अष्टपुत्रे झालेला आहे.
म्हणतात ना... ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला!

-- समाप्त --

Thursday, August 2, 2018

इये स्वर्गाचिये नगरी!

या लेखाच्या पार्श्वभूमीसाठी वाचा:  'वादळ'

पहाटेच्या अंधुक प्रकाशात रस्त्यावर पडलेला गुंड्या उठला. त्याला त्याची रमोना थोड्या अंतरावर आडवी झालेली दिसली.. तिची चाकं अजून फिरत होती. इकडे तिकडे पाहिल्यावर बैलावर बसलेला व  पांढरे स्वच्छ कपडे परिधान केलेला एक माणूस दिसला.. तो साक्षात यमदूत होता.. पण बिचार्‍या गुंड्याला तो अंधुक प्रकाशात, कंदील न घेता बैल घेऊन जाणारा एक सामान्य माणूस वाटला. याच्या बैलाला धडकून आपण पडलो असं समजून गुंड्या भांडण्याच्या पवित्र्यात त्याच्यापाशी गेला. पण त्याचा तेजःपुंज चेहरा आणि चेहर्‍यावरचे सौम्य भाव पाहून थबकला. गुंड्याच्या मनातला गोंधळ जाणून यमदूत उद्गारला "भो वेंकट! तुझा या भूतलावरील कार्यभाग उरकला आहे. तस्मात् तू माझ्यासह प्रस्थान ठेव.".. संस्कृतप्रचुर भाषेची सवय नसल्यामुळे गुंड्याची बंद खोलीत सापडलेल्या चिमणीसारखी अवस्था झाली. 

"अँ! कौनसी भाषा में बोला तू? तू जो भी बोला ना, सब बंपर गया! मेरेसे मराठीमे नहीं तो हिंदीमे बात कर!"..भंजाळलेला गुंड्या बरळला.

"भो वेंकट! ..."

"अरे यार! तू बार बार भो भो मत कर! कुत्ते जैसा लगता है! और पहिले ये बता तू है कौन!"

यमदूताने 'भो'काड पसरण्यासाठी केलेला ओठांचा चंबू मुश्किलीने बंद केला व म्हणाला "मी यमदूत आहे."

"हा हा हा! सुभे सुभे पीके आया क्या रे? एक तो मेरेको ढुश्शी मारके गिराया, उपरसे खुदको यमदूत बोलता है?".. गुंड्याची जाम चिडचिड झाली. यमदूताला या सगळ्या शिव्याशापांची अर्थातच प्रचंड सवय असणार. स्थितप्रज्ञपणे त्याच्या रमोनाकडे आणि नंतर निश्चेष्ट शरीराकडे बोट दाखवत तो वदला "तू या चमत्कारिक वाहनावरून मार्ग क्रमित असताना एका दुर्घटनेमुळे गतप्राण झालास. हा बघ तुझा निश्चेष्ट देह!".

गुंड्याला एकीकडे आपला मृत्यू झाला आहे हे पटत होतं तर दुसरीकडे आपण जिवंत आहोत असं पण वाटत होतं. त्याच्या डोक्याची पार सापशिडी झाली होती! शेवटी बाजूला जमलेल्यांपैकी कुणालाच ते दोघे दिसत नाहीयेत याची नोंद होऊन गुंड्या वरमला - "यानेके तू सचमुचका यमदूत है क्या? हां! बचपनमें कहानीमें सुना था! माफ करना यमदूतभाय! पहचाननेमे गलती हो गई!".. त्याला यमदूतभाय संबोधून गुंड्यानं त्याचा पार टपोरी गुंड केला.

यमदूत असला म्हणून काय झालं? गाडीवरची टीका गुंड्या खपवून घेणं शक्य नव्हतं. खुद्द यमाला आपल्या रेड्याबद्दल एवढा अभिमान नसेल तेवढा गुंड्याला त्याच्या गाडीबद्दल होता - "अबे ए! इसको चमत्कारिक क्यूं बोला तुम? बैठ मेरे पीछे और मै तेरेको असली चमत्कार दिखाता है!" सामान्य लोकांना विख्यात व्यक्तिंच्या सर्व गोष्टींबद्दल जसं फालतू कुतुहल असतं तसलं कुतुहल यमदूताला त्या चिमुकल्या यंत्राबद्दल निर्माण झालं होतं.. त्याच्या आडदांड बैलापुढे एव्हढस्सं दिसणारं ते यंत्र दोन माणसांना सोडा पण स्वतःचं वजन तरी ओढेल की नाही ही शंका त्याला होती. पण कुतुहलाला मोल नसतं! तो त्याच्या मागे जेमतेम वीतभर जागेवर कसाबसा बसलाच. गुंड्यानं त्याच्या नेहमीच्या ष्टाईलीत एक-दोन जीवघेणे लॅप मारताच मृत्युगोलात मोटरसायकल हाणणार्‍या एखाद्या बेडर माणसाच्या मागे बसलेल्या सामान्य माणसासारखी त्या यमदूताची अवस्था झाली.. त्याला जणू स्वर्गच दिसला! घाईघाईने यमदूताने ते भयंकर लॅप आवरते घेण्याची विनंती केली.."भो वेंकट! तुझे या अजब वाहनावरचे नैपुण्य पाहून मी स्तिमित झालो आहे. कृपया प्रवास खंडित कर." गुंड्याने एक झोकदार वळण घेऊन बैलाशेजारी भसकन गाडी थांबवली.. बैलाने बावचळून त्यांच्यावर शिंगं रोखली. यमदूताने त्याला चुचकारून शांत करताच ते बैलावर आरूढ झाले. नंतर यमदूताने सुपरमॅनच्या थाटात पुढे झुकून एक हात वर केला.. आणि ते सुसाट स्वर्गाकडे निघाले.

स्वर्गातील एका घरासमोर गुंड्याला उतरवून यमदूताने त्याला घरात जायला सांगीतलं आणि तो बैल पार्क करायला गेला. घरावर 'यमसदन' अशी पाटी होती. दार खटखटवल्यावर एक अतिसुंदर स्त्री बाहेर आली.. समोर गुंड्याला बघून ती चित्कारली - "तू रे कोण मेल्या?". गुंड्या उत्तराची जुळवाजुळव करेपर्यंत आतून हातात लेखणी, पुस्तक तसेच कोंबडा व दंड धारण केलेला, काळ्याकुट्ट वर्णाचा चार हात असलेला एक इसम बाहेर आला. तो खुद्द यम होता. गुंड्याकडे एक नजर टाकून त्यानं शून्यात नजर लावली. तो बहुतेक एका वहीतील पाने चाळत असावा. कारण वही अदृश्य होती फक्त यमाचे हात व बोटं वही चाळण्यासारखे फिरत होते. मग त्याने खुलासा केला - "हा वेंकट असणार! हा नुकताच मेला आहे".. मग गुंड्याला म्हणाला - "भो वेंकट! मी यम! आणि ही यमी". यमानेही भो केल्यामुळे स्वर्गातले समस्त लोक 'भो'चक आहेत अशी गुंड्याची खात्री झाली. "तुम लोगोंसे मिलकर बहुत खुशी हुई!".. गुंड्याने असं म्हणताच यम आणि यमी दोघांनाही धक्का बसला कारण त्यांना भेटल्यावर खुशी होणारा पहिलाच मानव त्यांना भेटला होता. मग गुंड्या पुढे झुकून यमाच्या कानात कुजबुजला.. 'तुम्हारी पत्नी बहुतही सुंदर है!"... "भो वेंकट! ही माझी भार्या नाही भगिनी आहे".. यमाने अगतिकपणे सांगितलं. आपलं काहीतरी सॉलिड चुकलंय इतपत गुंड्याला समजलं पण नक्की काय चुकलंय ते नाही कारण त्याला भार्या आणि भगिनी हे दोन्ही शब्द त्याच्या डोक्यावरून गेले.

नंतर स्वर्गाच्या रितीप्रमाणे गुंड्याला प्रथम प्राथमिक आगमन केंद्रात हजर होऊन स्वर्गात आल्याची नोंद करायची होती. तिथे त्याची प्राथमिक चौकशी होऊन एक टोकन मिळणार होतं. त्यावरून त्यानं कधी चित्रगुप्तापुढे पापपुण्याच्या हिशेबासाठी हजर व्हायचं ते ठरणार होतं. तिथे गुंड्यानं स्वर्गात रहायचं की नरकात सडायचं त्याचा निर्णय होणार होता. यमाने सांगीतल्याप्रमाणे गुंड्या त्या केंद्राच्या आवारात दाखल झाला. पण केंद्रात खूप बॅकलॉग असल्यामुळे तिथे हीSS गर्दी होती.. पृथ्वीवरील लोकसंख्या वाढल्यामुळे मरणारेही वाढले होते.. त्याचा परिणाम स्वर्गातल्या प्रत्येक डिपार्टमेंटवरील ताण वाढण्यात झाला होता. पूर्वी व्हिसाच्या कार्यालयात काम केलेल्यांना हाताशी धरून यम कसंबसं भागवत होता. आता सरकारी कामांच्या पद्धती आयुष्यभर कोळून प्यायलेली मंडळी स्वर्गात आल्यामुळे सुधारू शकतात का? छे! त्यांनी त्यांच्या सरावाच्या पद्धती चोखपणे राबविल्या होत्या. त्यामुळे आधी एक अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरणं आवश्यक होतं. त्यात नाव गाव पत्ता, जन्म/मृत्यू तारखा, तुम्ही केलेल्या पापपुण्यांची यादी इ. गोष्टी होत्या! फॉर्म सोबत ३ फोटो मागे सही करून लावायचे, जन्म व मृत्यूची ओरिजिनल सर्टिफिकिटं व एकेक झेरॉक्स कॉपी आणि मागील ३ वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स जोडायचे होते! कळस म्हणजे सगळ्या व्हिसा फॉर्म वर शेवटी असतो तसा एक ष्ट्यांडर्ड प्रश्न पण होता.. या पूर्वी कधी अ‍ॅप्लिकेशन केला होता का? तेव्हा व्हिसा मिळाला होता की नव्हता?

महत्प्रयासाने रांगेचा शेवट शोधून गुंड्या उभा राहीला. रांगेत कित्येक एजंट आत्मे जवळ येऊन 'टोकन लवकर हवंय का? अ‍ॅफेडेविट करायचं आहे का?' अशी चौकशी करून जात होते. बराच वेळ होऊनही रांग फारशी सरकली नव्हती कारण पुढे आत्मे घुसत होते आणि वादावादी चालू होती. उद्विग्न चेहर्‍याने परत जाणार्‍या काही आत्म्यांना विचारल्यावर एकंदर प्रकरण गंभीर आहे असं गुंड्याच्या लक्षात आलं. ते आत्मे रांगेतल्या लोकांना वैतागून सांगत होते.. 'काही उपयोग नाही उभं राहून! ही माझी चौथी खेप आहे. दर वेळेला सांगतात दोन दिवसांनी या म्हणून! हरामखोर साले!'. शेवटी गुंड्याने कंटाळून एका एजंटाला हात केला. त्याचं नाव राजू पण तो स्वतःला राजू गाईड म्हणायचा. तो देवानंदचा फॅन होता. त्याची मान तिरकी ठेऊन बोलण्याची लकब तर हुबेहूब देवानंदसारखी होती!.. मनुष्य जन्मात आर्टीओपाशी एजंटगिरी करायचा आणि फावल्या वेळात गाईडचं काम! स्वर्गात नवीन नवीन आलेल्या आत्म्यांना त्यांच्या निवासाचा ठोस निर्णय होईपर्यंत अमृताचे पेग फुकट असतात. त्यातले दोन पेग हा राजू गाईडचा मोबदला ठरला. राजू गाईड त्याला बाजूच्या एका गल्लीतून घेऊन निघाला असताना रस्त्यात काहीजण रथांची दुरुस्ती करताना दिसले. राजू गाईडच्या माहितीनुसार ते रथ पाताळात हकालपट्टी होणार्‍या लोकांसाठी होते. त्यांची दुरुस्ती करणार्‍यांना पाताळयंत्री म्हणायचे!'. एवढ्यात बाजूने एक लावण्यवती, पायातल्या पैंजणांचा मंजुळ नाद करीत विहरत गेली. त्यावर गुंड्याचा लगेच - 'ये छम्मकछल्लो कौन है?' असा प्रश्न आला. अस्थायी बोलणं हा त्याचा स्थायीभाव होताच म्हणा! राजू गाईडने विव्हळून उद्गारला.."अबे ये छम्मकछल्लो नही है! ये मेनका है, मेनका!". गुंड्याने प्रत्यक्ष मेनकेला एक सामान्य आयटम गर्ल केल्यानं मधुबालेला राखी सावंत म्हंटल्या इतकं दु:ख झालं त्याला!

राजू गाईडनं ज्या कारकुनाच्या ऑफिसापाशी आणलं होतं तिथे इतर एजंटांनी आणलेल्या आत्म्यांमुळे बर्‍यापैकी रांग होती. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याचा नंबर लागला. गुंड्या त्या कारकुनापुढे हाजिर होताच त्याचं पूर्ण नाव विचारण्यात आलं. गुंड्यानं "वेंकट रामन" सांगताच कारकून दचकला.
"आँ! तू कसा काय मेलास?".. कारकून त्याच्या वहीची पानं उलटसुलट करीत पुसता झाला.
"अ‍ॅक्सिडेंट हो गया, साब!"
"तसं नाही. तुझं नाव आमच्या यादीत नाहीये.".. कारकून वहीत शोधता शोधता म्हणाला.
"नाहीये? कोई लिखनेको भूल गया होगा! अभी लिख डालो!" गुंड्याचं अण्णालिसिस सुरू झालं.
"अरे बाबा! तू मरायलाच नको होतं. वेंकट प्रभाकर या नावाचा माणूस येणं अपेक्षित होतं.".. कारकुनाने दिलगिरी दाखविली.
"अच्छा! अच्छा! तो तुम लोग भलतेच आदमीको उठा लाये क्या? ठीक है! कोई वांधा नही! अब मुझे वापिस भेज दो!"
"अरे बाबा! आम्हाला तशी पावर नाय! तुला आता सुप्रीम कोर्टात जावं लागेल, तिथं निर्णय होईल! नेक्स्ट!". . गुंड्याकडे दुर्लक्ष करून कारकून ओरडला.

सुप्रीम कोर्टात म्हणजे खुद्द चित्रगुप्तापुढे उभं रहायचं होतं. त्याच्या कोर्टात भारतातल्या न्यायालयातलीच माणसं भरली होती. साहजिकच कुठलाही निकाल लवकर लागत नव्हता. नुसत्या पुढच्या तारखा मिळायच्या.. 'कोर्टाची पायरी चढू नये' असा इशारा स्वर्गात सुध्दा दिला जायचा तो त्यामुळेच! पण राजू गाईडच्या कॉन्टॅक्ट्समुळे आणखी दोन अमृत पेगांच्या मोबदल्यात गुंड्याची सुनावणी काही महिन्यातच झाली. निकालाच्या वकीली भाषेचा साधा अर्थ असा होता की त्याला परत पाठवणं शक्य नव्हतं कारण गुंड्याच्या वस्त्राचं म्हणजे शरीराचं तोपर्यंत दहन झालेलं होतं. स्वर्गात येऊन थोडाच वेळ झाल्यासारखं जरी वाटलं तरी पृथ्वीवर बरीच वर्षं उलटून गेलेली असतात. जर चूक लगेच लक्षात आली असती तर ताबडतोब शरीरात प्राण फुंकता आले असते. आणि त्या व्यक्तिला नुसता मृत्यू सदृश अनुभव येऊन गेल्यासारखं वाटलं असतं. तरीही ८४ लक्ष योनीतून न फिरविता लगेच मनुष्य जन्मात पाठवण्याचं आश्वासन मिळालं. पण अशाच पद्धतीने असंख्य चुकीची माणसं स्वर्गात आलेली असल्यामुळे परत जायची रांगही मोठ्ठी होती. नंबर लागायला वेळ लागणार होता. तो पर्यंत त्याला ट्रॅन्झिट व्हिसावर स्वर्गामधे निर्वासित छावणीत रहायची परवानगी उदार मनाने दिली गेली.

आता गुंड्याला काय वेळच वेळ होता. त्यानं व राजू गाईडनं जवळच्या अमृत पबकडे मोर्चा वळविला. जाता जाता नारदाची भेट झाली. नारदानं "नारायण! नारायण!" म्हणत तंबोरा वर करीत अभिवादन केलं. गुंड्याला असल्या अभिवादनाची सवय नव्हती, तो गोंधळला. गुंड्यानं प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहीलं. नारदानं परत "नारायण! नारायण!" चा जप केला. मग मात्र न राहवून गुंड्या त्याला म्हणाला "अरे यार! एक बार नाम बोलनेसे समझता है मेरेको! दो दो बार क्यूं बोलता है?". "ही कुठली यवनी भाषा?".. नारद संभ्रमात पडला. शिवाय त्याच्या तंबोर्‍यात बसवलेल्या गुगल ट्रान्सलेटरने 'एकदा माझ्या नावाचा अर्थ समजला की! आपण दोनदा बोलता का?' अशा केलेल्या भयाण भाषांतरामुळे त्याच्या मेंदूचा चाप निघाला. शेवटी राजू गाईडच्या मदतीमुळे त्याला खरा प्रश्न समजल्यावर तो उत्तरला.. 'वत्सा! तुजप्रत कल्याण असो! नारायण माझं नाव नाही. ते तर प्रत्यक्ष भगवंताचं नाव! माझं नाव नारद! तू कोण? नवीन दिसतोस". मग गुंड्याची सविस्तर कहाणी राजू गाईडच्या मदतीने पबमधे ऐकल्यावर नारदाने काही आतल्या गोटातल्या गोष्टी सांगितल्या. त्याचा सारांश असा:

नारदाला गुंड्यासारख्या केसेस खूप होऊन गेल्या आहेत हे माहीती होतं. त्यानं त्या संबंधात पूर्वी एकदा सरळ ब्रह्माला काडी लावली होती. समस्येचं गांभीर्य लक्षात येताच ब्रह्माला ब्रह्मांड आठवलं होतं म्हणे. त्यानं ताबडतोब इंद्राला योग्य ती कार्यवाही करायला सांगीतलं. इतर सिनिअर देवांबरोबर चर्चा करून इंद्राने सभा बोलावून असं भाषण ठोकलं.. "सर्व स्वर्गवासी देवदेवतांनो! नुकत्याच ज्या काही घटना उजेडात आल्या आहेत त्या सर्व देवसमाजाला मान खाली घालायला लावणार्‍या आहेत. कित्येक चुकीची माणसं स्वर्गात आणली गेली आणि भलभलते आत्मे पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी पाठवण्यात आले. हे असंच चालू राहिलं तर आपल्यात आणि माणसात काय फरक राहिला? देवांचं देवपण शिल्लक रहाणार नाही. आपली विश्वासार्हता कमी होईल! देव आणि आत्मे बरोबरीने काम करतात. कारण कामाचा ताण वाढायला लागल्यामुळे आपण आत्म्यांची मदत घेऊ लागलो. पण त्याचबरोबर कामातली सुसूत्रता कमी झाली आहे. टीमवर्कचा अभाव दिसायला लागला आहे. टु अर इज स्पिरिट हे जरी असलं तरी या चुका कमी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पृथ्वीवर देखील अशा प्रकारच्या समस्या झाल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल केला. एच आर व क्वालिटी प्रणाली असलेली सर्वसमावेशक नवीन कार्यपद्धती अवलंबिली. आपणही तोच मार्ग चोखाळणार आहोत. लवकरच आपण हे सगळं मूळ पदाला आणू असा मला दृढ विश्वास आहे. त्याचबरोबर इतकी युगं मानवांना ज्ञान देणार्‍या आपल्यासारख्यांना हे मानवांकडून शिकावं लागतं आहे याची खंत पण वाटते आहे."

या भाषणानंतर अनेक कन्सल्टटांच्या मदतीने काम सुरू झालं. प्रथम जन्ममरणाच्या फेर्‍यांची प्रोसेस लिहीली ती अशी :- एखाद्याचा काळ आणि वेळ दोन्ही आले की त्याच्या मृत्यूचं चित्रगुप्ताच्या सहीचं फर्मान सुटतं. ते फर्मान यमाकडे जातं. यम त्याच्या टीमपैकी एकाला त्याचं पालन करायला सांगतो. तो त्या माणसाचा आत्मा घेऊन स्वर्गात येतो व यमाकडे आत्मा आणि फर्मान सुपूर्त करतो. नंतर चित्रगुप्ताच्या दरबारी त्या आत्म्याच्या पापपुण्याचा हिशेब होऊन तो स्वर्गात रहाणार की नरकात याचा निर्णय होतो. तो आत्मा जिकडे जाणार असेल तिथे त्याचं इंडक्शन होतं. पुनर्जन्माची वेळ येईपर्यंत ते आत्मे दिलेल्या जागी रहातात. ज्यांना मोक्ष मिळतो त्यांना स्वर्गाचं ग्रीनकार्ड मिळतं. या चक्रामधे आत्मा अमर असल्यामुळे प्रत्येक आत्म्याला एक युनिक नंबर देण्याची कल्पना आली. आणि आत्म्यांच्या ट्रॅकिंगसाठी डेडझिला नामक प्रणाली उभी करायचं ठरलं. त्यात आत्म्याचं लाईफ सायकल असं असणार होतं.. आत्मा एका शरीरात फुंकला की 'जन्म' होतो. लाईफ सायकल मधील जन्म ही एक स्थिती आहे. मृत्यू ही स्थिती नाही तर आत्म्याला शरीर विरहीत करायची प्रक्रिया आहे. आत्म्याचा युनिक नंबर आत्म्यावर बारकोडमधे गोंदवला तर नुसत्या बारकोड स्कॅनरने नक्की कोणता आत्मा स्वर्गात यायला हवा ते समजणं सहज शक्य होतं. अर्थात हा प्रकल्प एका झटक्यात पूर्ण होण्यासारखा नव्हता. जसजसे आत्मे स्वर्गात येतील तसतसं गोंदवण्याचं काम करायला लागणार होतं. पण आत्म्यावर गोंदवायचं कसं यावर मतभेद झाल्यामुळे तो बोंबलला.

दुसरीकडे चुकीचे आत्मे येण्याची काय कारणं असतील ती शोधण्यासाठी आत्म्याला स्वर्गात आणल्यावरती लगेच एक फॉर्म भरायचं ठरलं. त्यात माणूस मारताना आलेल्या अडचणी नोंदवायचं ठरवलं. त्याचं अ‍ॅनॅलिसिस केल्यावर जी कारणं समजली ती सगळ्यांना आधीपासूनच माहिती होती.
1. भारतातले पत्ते सापडत नाहीत.
2. काहींची खरी नावं वेगळी असतात. उदा. किशोरकुमार किंवा मधुबाला. पण चित्रगुप्ताच्या चोपडीत पाळण्यातल्या नावानं एंट्र्या असतात.
3. जुनी घरं/वाडे पाडून तिथे टोलेजंग इमारती झालेल्या असतात. पण चित्रगुप्ताच्या चोपडीत जुनेच पत्ते असतात.
४. यमदूत नीट नावं वाचत नाहीत.

सर्व कारणांवर सखोल चर्चा होऊन काही मार्ग सुचविण्यात आले. पहिल्या कारणासाठी पोस्टमनांच्या आत्म्यांची मदत घेण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांना देखील त्यांच्या नेहमीच्या भागातले पत्ते सोडता इतर पत्ते सापडत नाहीत असं निष्पन्न झालं. बाकी कारणांसाठी सगळ्यांना काही ट्रेनिंग कोर्सेस करायचं ठरलं पण अखिल स्वर्गीय देवदेवता कामगार संघटनेनं 'कामाचा ताण वाढतो' अशा सबबी खाली संप करून ते हाणून पाडलं. या सगळ्या प्रकारातून नेहमी पृथ्वीवर होतं तेच स्वर्गात झालं. धेडगुजरी प्रणाल्या वापरणं सुरू झालं.

असे अनेक दिवस सरले. दरम्यान स्वर्गविहार ट्रॅव्हल कंपनीच्या तर्फे गुंड्याचा सर्व स्वर्ग फिरून झाला आणि त्याचा परतीचा नंबर लागला. ते ऐकताच गुंड्या ओरडला..'चिमण! मै आ रहा हूं!' ती आरोळी ऐकताच मी खाडकन उठून बसलो. मग लक्षात आलं की तो आल्याच्या अनंत स्वप्नांपैकी ते एक होतं. पहाटेचं नसल्यामुळे खरं पण होणार नव्हतं.

-- समाप्त --

Monday, June 25, 2018

स्वप्नांवरती बोलू काही!

स्वप्नांच्या बाबतीत मी तर्‍हेवाईक आहे. म्हणजे मला रोज तर्‍हेतर्‍हेची स्वप्न पडतात अशा अर्थाने हो! आणखी कुठल्या कुठल्या बाबतीत मी तर्‍हेवाईक आहे ते माझे हितचिंतक सांगतीलच. खरं म्हंटलं तर स्वप्न पडणं यात काही विशेष नाही कारण स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. प्रत्येकाला रोज साधारणपणे ५ स्वप्नं पडतात आणि प्रत्येक स्वप्न सुमारे १५ ते ४० मिनिटं चालतं असं म्हणतात. काही लोकांना आपल्या बायकोने नक्की काय आणायला सांगितलं होतं हे जसं आठवत नाही तशी स्वप्नं पण नंतर आठवत नाहीत इतकंच! मग मी का स्वप्नांबद्दल बोलतोय? कारण माझी बौद्धिक क्षमता बघता मला फक्त स्वप्नांसारख्या हलक्याफुलक्या विषयांवरच त्यातल्या त्यात बोलायला जमतं. मी आयुष्यासारख्या जड गंभीर आणि किचकट विषयावर बोलू शकत नाही. शिवाय, मला असं जाणवलं की हल्ली मी स्वप्नांबद्दल बोलतच नाही. पूर्वी मला स्वप्न पडलं की मी सकाळी सकाळी बायकोला मार्टिन ल्युथर किंगच्या आवेषात 'I had a dream!' असं सांगायचो आणि ती तितक्याच थंडपणे 'हां, ती कालची भांडी घे धुवून!' असं सांगून माझ्या स्वप्नसृष्टीला सत्यतेची कल्हई लावायची. शिवाय मला असं वाटतं की बरेच लोकही त्याबद्दल बोलायच्या फंदात पडत नाहीत किंवा बोलायचं टाळतात. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या इकडचा मेसेज तिकडे फॉरवर्ड करण्याच्या जमान्यात आपली स्वप्नं खरडून दुसर्‍याला कळवायला कुणाला वेळ आहे? विचार करा, इतके मेसेजेस फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वरून आपल्यावर आदळतात त्यातले किती स्वप्नांबद्दल असतात? आपल्या स्वप्नांबद्दल प्रत्येकाने बोलायला हवं कारण स्वप्नं आपल्याला बनवतात.. दोन्ही अर्थांनी!

माझ्या दृष्टीने स्वप्नं म्हणजे सुप्त मनाने जागरुक मनाशी केलेली भंकस असली तरी स्वप्नांची गंमत वेगळीच आहे. आपलं स्वप्न हे एक डिझायनर स्वप्न असतं, आपण आपल्यासाठी बनवलेलं आणि फक्त आपणच अनुभवलेलं! आपलं अंतर्मन आपल्याच मनाच्या वळचणीत दडलेल्या कुठल्याशा सुप्त भावनांवर आधारित एक कथा, पटकथा संवाद झटपट तयार करून व त्यातल्या भूमिका वठवून आपल्या मनःपटलावर साकारतं हे मला फार थक्क करतं. स्वप्न निर्मिती पासून अनुभूति पर्यंतच्या सर्व भूमिका आपलं मन बजावतं. ज्या कुणाला आपण सर्जनशील नसल्याची खंत आहे त्यांनी याची जरूर नोंद घ्यावी!

कधी तरी कुठे तरी काही तरी पाहिलेलं, वाचलेलं किंवा ऐकलेलं तसंच आपल्या व लोकांच्या वर्तणुकीतलं काही तरी भावलेलं खुपलेलं आदि गोष्टींचं प्रतिबिंब स्वप्नात असतं. पण ही प्रतिबिंबं रूपकात्मक व अमूर्त स्वरुपाची असतात. बर्‍याच वेळेला तर ती दुर्बोध असतात, मोर्स कोडमधे हवामानाचा अंदाज ऐकावा इतकी! त्यामुळे त्यांचा सहजपणे अर्थ लागेलच असं काही सांगता येत नाही. स्वप्नांचा अर्थ नीट उलगडून सांगायला आपलं अंतर्मन काही हिंदी पिक्चरच्या ष्टोरी लेखकाची टोपी घालून बसलेलं नसतं. आपली स्वप्नं डिझायनर स्वप्नं असली तरी काही ठराविक स्वप्नं बहुतेकांना पडतात. उदा. आपल्याला एकंदरितच कमी आत्मविश्वास असेल किंवा आपल्या भवितव्याबद्दल शंका असतील तर परीक्षेत नापास झाल्याचं स्वप्न किंवा उद्या परीक्षा आहे आणि आपली काहीच तयारी नाही झालेली अशी स्वप्नं हमखास पडतात. आपण खोल खोल पडत चाललो आहोत हे अजून एक ष्ट्यांडर्ड स्वप्न! त्यातून असुरक्षितता किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सतत वाटणारी चिंता प्रतीत होते म्हणतात.

असुरक्षितते वरून आठवलं. लहानपणी मला नेहमी काही सिंह रात्रीचे आमच्या घराभोवती फिरताहेत आणि घरात घुसायचा प्रयत्न करताहेत असं स्वप्न पडायचं. माझी जाम तंतरायची आणि मी घरभर फिरत सगळ्या दारं खिडक्या बंद आहेत ना ते पुनःपुन्हा बघायचो आणि घामेघूम होऊन थरथरत जागा व्हायचो. अर्थात हे स्वप्न पडायला एक कारण होतं. माझ्या लहानपणी आम्ही पेशवेपार्क जवळ रहायला आलो. त्या आधी चिमण्या कावळे कबुतरं कुत्री आदि सर्वत्र दिसणार्‍या सर्वसामान्य प्राण्यांच्या आवाजी दुनियेचं एकदम सिंहांच्या गर्जना त्यावर माकडांचं जिवाच्या आकांताने ओरडणं, मोरांचं म्यावणं, कोल्हेकुई अशा आफ्रिकेतल्या जंगलातल्या तंबूसदृश दुनियेत परिवर्तन झालं. त्या भीतिचा सुप्त परिणाम स्वप्न पडण्यात झाला असणार. 'मी ड्रग्ज घेत नाही कारण माझी स्वप्नं माझा पुरेसा थरकाप करतात' असं मॉरिट्स एस्कर हा मुद्रणकार म्हणायचा त्यात खूपच तथ्य आहे. मला रोज जंगली श्वापदांचे आवाज ऐकायला येतात हे मी गिरगावात आयुष्य घालवलेल्या एखाद्याला सांगितलं असतं तर त्यानं ताबडतोब वेड्याच्या इस्पितळाला कळवलं असतं. लोकलचा खडखडाट आणि बसचा धडधडाट या पलिकडे आवाज-विश्व न पसरलेल्या मुंबईकरांकडुन अजून काय अपेक्षा करणार? पण लहानपणीच त्या डरकाळ्या ऐकण्याचा सराव झाल्यामुळे माझी एक मानसिक तयारी झाली आहे असं आता मला वाटतं. आता एखाद्या सिंहाने खरंच माझ्या समोर येऊन गर्जना केली तर मला विशेष वाटणार नाही कदाचित!

मनी वसे ते स्वप्नी दिसत असलं तरी स्वप्नी दिसे ते सत्यात उतरे असं पण कधी कधी होतं! डॉ. शेन मॅक्कॉरिस्टिन हा बर्‍याच विषयांवर संशोधन करतो त्यातला एक विषय स्वप्न आहे. त्याला असं सापडलं की पूर्वी इंग्लंड मधील लोक पोलिसांना किंवा वार्ताहरांना त्यांना पडलेल्या विचित्र/चमत्कारिक स्वप्नांबद्दल सांगत असत. इतकंच नाही तर पोलीसही ती माहिती गंभीरपणे घेऊन त्याचा तपास करत असत. हार्ट्लपूल मधे १८६६ साली मिसेस क्लिंटनला (बिल क्लिंटनची कोणी नसावी) एका स्थानिक कामगाराने १५ पौंड किमतीची दोन घड्याळं चोरली असल्याचं स्वप्न पडलं. पोलिसांनी त्याचा तपास करून त्याला मँचेस्टर मधे पकडलं. १८९६ साली विल्यम वॉल्टर्स हा खाण कामगार तो जिथे काम करायचा तिथे अपघात झाल्याचं स्वप्न पडल्यामुळे दिवसभर पबमधे बसून राहीला.

असली भविष्यदर्शी स्वप्नं पडायला मी काही द्रष्टा नाही. पण माझ्या एका मित्राला पडत असत त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्याचं नाव अरुण! आम्ही तेव्हा बीएस्सीला होतो. कुठल्यातरी सेमिस्टरच्या परीक्षेत अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आलजिब्रा विषयात मला ४० पैकी १६ पडल्याचं कॉलेजमधे समजलं. १६ मार्क म्हणजे काठावर पास! मला धक्का बसला. काठावर पास झाल्यामुळे नाही कारण त्याची मला सवय होती! पण तो पेपर चांगला जाऊनही कमी मार्क पडल्याचा होता. माझं आणि अरुणचं त्यावर बोलणं झालं. दुसर्‍या दिवशी अरुण मला म्हणाला की मला ३६ मार्क मिळाल्याचं स्वप्न त्याला पडलं. मी अर्थातच ते थट्टेवारी नेलं. पण त्याची काही स्वप्नं खरी झाली असल्याचा त्यानं दावा केला. काही दिवसांनी मार्कलिस्ट आल्यावर त्यावर खरंच ३६ चा आकडा पाहून मला दुसरा धक्का बसला. झालं असं होतं की काही कारणाने विद्यापीठातून मार्कलिस्ट पाठवायला वेळ लागणार होता म्हणून कॉलेजने कर्मचारी पाठवून निकाल हाताने कॉपी करून आणवला होता. कॉपी करताना अर्थातच चूक झाली होती.

मी विद्यापिठात चकाट्या पिटत असतानाची गोष्ट आहे. आमच्या विभागातली काही मुलंमुली आणि २ प्रोफेसर खंडाळ्याला एक दिवसाच्या ट्रिपला सकाळी सकाळी ६ च्या सुमारास गेले होते. एक प्रोफेसर एका डोंगरावर नेहमीचा रस्ता सोडून दुसर्‍या जवळच्या पण अवघड रस्त्याने जायला निघाले. त्यांनी वर जाऊन पुढे नीट रस्ता आहे का हे बघून इतरांना सांगायचं ठरलं होतं. काही वेळ झाला तरी त्यांचा आवाज न आल्याने खालून मुलांनी आवाज दिला. उत्तराऐवजी त्या दुर्देवी प्रोफेसरांचा देह घसरत खाली आला आणि मुलांच्या डोक्यावरून आणखी खाली दरीत पडला. मदतीला खाली जाईपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. ही बातमी दुपारी १२ वाजेपर्यंत आम्हाला समजली आणि सर्व विद्यापिठात शोककळा पसरली. एक मुलगी मात्र ओक्साबोक्षी रडत होती. कारण तिला आदल्या रात्री त्या प्रोफेसरांना ट्रिपवर अपघात होईल असं स्वप्न पङलं होतं. त्यामुळे ती सकाळी लवकर विद्यापीठात त्या प्रोफेसरांना जाऊ नका हे सांगायला आली होती. पण तो पर्यंत उशीर झाला होता.

भविष्यदर्शी स्वप्नं हे भलतंच अगम्या व गूढ प्रकरण आहे. असली स्वप्नं पडण्या मागची कारणमीमांसा आत्ता तरी सर्व शास्त्रांच्या पलिकडची आहे. पण सर्जनशील स्वप्नं ही तितकी अचंबित करीत नाहीत. कारण आपल्याच अंतर्मनाच्या चोरकप्प्यात त्या विषयाशी निगडित काहीतरी घोळत असतं आणि त्याचा शेवट स्वप्नात होतो. माझ्या कामाशी निगडित काही कठीण समस्या मला भेडसावत असली तर ती सोडविण्यासाठी मला स्वप्नांमधे क्लू मिळाले आहेत! आचार्य अत्रेंनी 'घराबाहेर' नाटक त्यांच्या स्वप्नात घडलं व दुसर्‍या दिवशी त्यांनी ते फक्त लिहीण्याचं काम केलं असा उल्लेख 'मी कसा झालो' मधे केल्याचा मला आठवतंय. त्यांनी तिथे असंही म्हटलं आहे की वर्तमानपत्रात त्या संदर्भात वाचलेली एक बातमी त्यांच्या डोक्यात दिवसभर घोळत होती. बीटल्सच्या पॉल मॅकार्टनीला Yesterday हे गाणं स्वप्नात झालं असं त्याचंच म्हणणं आहे पण त्याच्या डोक्यात काय घोळत होतं त्या बद्दल मला काही सापडलं नाही अजून.

काही लोकं स्वप्नांच्या मागे पळतात, काही स्वप्नांपासून तर माझ्यासारखे काही स्वप्नांमधे पळतात. मला सांगली मिरज या ट्रेनची बर्‍याच वेळेला स्वप्नं पडायची कारण माझ्या लहानपणी मी सांगलीत काही वर्षं काढली आहेत आणि मला त्या रेल्वेचं अप्रूप होतं. तर माझ्या एका स्वप्नात मी सांगलीच्या दिशेची ट्रेन पकडायला चाललो होतो आणि ट्रेन सुटली. मी ती पकडायला धावतोय धावतोय पण जमत नव्हतं. मग अचानक एका डब्याच्या दारातून खुद्द अमिताभ बच्चनने मला 'अरे पळ पळ लवकर पळ!' असं चिअरिंग केलं. इथेच मला जाग आली आणि त्यामुळे ट्रेन मिळून अमिताभशी गप्पागोष्टी झाल्या की नाहीत ते माहीत नाही. मी तेव्हा या स्वप्नाबद्दल कुणाला सांगितलं नाही कारण परवीनबाबी (सुलताना नाही) व रेखा असल्या सुपरहॉट नट्या स्वप्नात येण्याऐवजी अमिताभ स्वप्नात येतो म्हंटल्यावर माझी इतकी टिंगल झाली असती की त्याची वेगळी स्वप्नं पडली असती.

मला एकदा बंगलोरला जायचं असतं. माझ्या बरोबर एक मुलगा आणि एक मुलगी असतात. ते दोघेही माझ्या ओळखीचे नसावेत. त्यांची नावं लक्षात येत नसतात पण चेहरे उगीचच खूप ओळखीचे वाटत असतात. कधी कधी रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर काही अनोळखी माणसं उगीचच आपल्याला चिकटतात ना, त्यातले ते असावेत. हे अर्थातच माझं पोस्ट स्वप्न अ‍ॅनॅलिसिस! तर आम्ही तिघे पुण्याच्या विमानतळावर असतो. विमानतळावर खूप गर्दी असते. आम्हाला नक्की कुठल्या गेटकडे जायचं आहे ते कळत नसतं. आता पुण्याच्या विमानतळावर इतकी गेटं आली कुठुन? पण स्वप्नाच्या दुनियेत तर्कशास्त्राला फारसा वाव नसतो. कुठेही आमच्या विमानाच्या गेटबद्दल माहिती सापडत नाही.

मग त्या गर्दीत भटकता भटकता माझी आणि त्यांची चुकामुक होते. विमानतळाचा सीन अधुनमधुन रेल्वे स्टेशन सारखा वाटत असतो. स्टेशनवर जसे जिने वर खाली करून प्लॅटफॉर्मवर जावं लागतं तसं इथेही करावं लागत होतं. असाच मी एका जिन्यावरून खाली उतरत असताना मला टीसीसारखा कुणी तरी, ज्याला स्टेशनवर काय चाल्लंय याची बित्तंबातमी असते असा, पळताना दिसतो. त्याला मी पळत पळत जाऊन गेटाबद्दल विचारतो. तो पळता पळता अक्षरशः एका बोळाकडे बोट दाखवितो. मी त्या बोळात घुसतो आणि थेट एका रनवे वर येतो. मला माझं विमान टेकॉफ साठी पळायला लागलेलं दिसतं. आता ते माझंच विमान आहे हे मला कशावरून समजलं ते विचारू नका. मी विमानाच्या मागे पळायला लागतो. तेव्हढ्यात तो मघाचा टीसी वायरलेस वरून काही तरी बोलताना दिसतो. मग थोड्या वेळाने ते विमान पळायचं थांबतं आणि रनवेवर चक्क यू-टर्न घ्यायला लागतं. मी हाशहुश करत तिथे पोचतो. विमान यू-टर्न घेतंय म्हणून आतले लोक खाली उतरलेले असतात. गंमत म्हणजे कुणाच्याही चेहर्‍यावर कसलाही वैताग त्रास दिसत नसतो. सगळे हसत खेळत उभे असतात. त्यात मी माझे सोबती शोधून काढतो. त्यातली ती मुलगी आता एका मोटरसायकलला किका मारत असते आणि ती काही सुरू होत नसते. इथे स्वप्न संपतं आणि माझी पळापळही!

मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात पण माझ्या बाबतीत मनी नसे ते स्वप्नी दिसे असं पण थोडंसं आहे. मी एके काळी ऑक्सफर्डला रोज कामासाठी ५० मैलांवरून जात येत असे. पण हे स्वप्न मी ऑक्सफर्डला रहायला लागल्यावर पडलेलं आहे. माझी बायको गाडी घेऊन जाणार असते म्हणून मी रेल्वेनं ऑफिसला जायचं ठरवतो. मी एक तर गाडीने जायचो किंवा बसने त्यामुळे ट्रेनने जायचं कसं काय ठरवलं ते एक कोडंच आहे. मी स्टेशनवर जातो तिथे प्रचंड गर्दी असते. तिथे २ काउंटर असतात. रांगेत उभा राहून एका काउंटरला पोचल्यावर तिकीटाचे पैसे हवाली करतो. गंमत म्हणजे माझ्याकडे ३ बॅगा असतात त्यामुळे स्वप्नात ३ कशा आल्या ते मला माहीत नाही. नेहमी मी एक छोटी बॅग घेऊन ऑफिसला जातो. स्टेशनावर सर्व भारतीय लोकच दिसतात. मी काउंटरपासून दूर गेल्यावर माझ्या लक्षात येतं की मी तिकीट घ्यायचं विसरलोय. मग मी परत काउंटरला जातो. मला आता हे आठवत नाही की मगाशी मी कुठल्या काउंटरवर गेलो होतो.

एक ट्रेन गेल्यामुळे गर्दी ओसरलेली असते. मी त्या काउंटरच्या आत डोकावतो. एक क्लार्क झोपायची तयारी करत असतो. मी त्याला माझ्याकडून पैसे घेतल्याचं आठवतंय का ते विचारतो. तो नाही म्हणतो. मग मी दुसर्‍याला विचारतो, त्याला आठवत असतं. तो मला कुठे जायचं आहे ते विचारतो. मी ऑक्सफर्डचं नाव घेतल्यावर तो मला कुठे गाडी बदलायची आहे ते माहिती आहे का विचारतो. मला त्या स्टेशनचं नाव काही आठवत नाही. त्याला ही ते आठवत नसतं. तो कुणाला तरी फोन करून माहिती काढायला जातो तर फोन चालू नसतो. मी माझ्या बायकोला फोन करून माहिती काढायचं ठरवतो. मी फोन बूथ वर जाऊन फोनसाठी एका बॅगेतून चिल्लर काढायला लागतो.

मी चिल्लर काढत असताना एक माणूस माझ्या बॅगेतले पैसे चोरायचा प्रयत्न करतो. माझ्या ते लक्षात येताच माझी त्याच्याशी मारामारी होऊन मी माझे पैसे परत मिळवतो. पण हे करता करता माझी दुसरी बॅग चोरीला गेल्याचं लक्षात येतं. सुदैवाने त्यात काही मौल्यवान नसतं. मग प्रथम मी बायकोला घरी फोन करायचं ठरवतो. पण ती घरात नसेल हे लक्षात आल्यावर तिच्या ऑफिसात करायचा ठरवतो. पण मला तिच्या ऑफिसचा नंबरच आठवत नाही. पहिले ४ आणि शेवटचे ३ आकडे आठवतात पण मधले ३ जाम आठवत नाहीत. शेवटी मी तिला मोबाईल वरून फोन करायचं ठरवतो पण मला मोबाईल वरचं नीट वाचता येत नसतं. मी वाचायचा प्रयत्न करता करता भलतीच कुठली तरी बटणं दाबली जातात आणि काही तरी स्क्रीन रेसोल्युशन इ. सेटिंगचा मेन्यु दिसायला लागतो. मला काही त्या सेटिंगमधून बाहेर पडता येत नाही आणि तिकडे बॅटरी संपत आलेली असते. मी घाईघाईने काही तरी दाबत फोन नंबरांच्या यादीकडे येतो पण विविध प्रकारचे मेन्यु येत जात रहातात. असं करता करता ती बॅटरी आणि स्वप्न एकदमच संपतं. मला वाटतं कधी तरी मला साध्या साध्या गोष्टी न जमल्याची खंत किंवा त्याची बोच या स्वप्नामागचं कारण असावं. पुढे काय होणार ते प्रत्यक्ष पडद्यावर पहा अशी पाटी स्वप्नात कधी येत नसल्यामुळे गुमान आपली उत्सुकता दाबायची आणि पुढल्या स्वप्नाची वाट बघायची इतकंच आपल्याला करता येतं!

 स्वप्नात आपण कुणाच्या नकळत, काही काळ का होईना, वेड्यासारखं मनसोक्त वागू शकतो असं कुणी तरी म्हंटलेलं असलं तरी स्वप्नं आपल्याशी हितगुज करत असतात. ते हितगुज वरकरणी तर्कसुसंगत वाटलं नाही तरी मला फार चित्तवेधक आणि मनोरंजक वाटतं.

-- समाप्त --

Sunday, February 4, 2018

एका मुलीचं रहस्य!

दुपारी ३ वाजता दारावर टकटक झाली आणि नियतीने दार उघडून एका मध्यमवयीन माणसाला आत घेतलं.
'नमस्कार! मी ठोकताळे साहेबांना भेटायला आलोय.' आपल्या समोर एका अत्यंत सुंदर ६ फुटी उंच सोनेरी केसाच्या स्त्रीला पाहून त्या गृहस्थाचे डोळे चमकले. नियती होतीच तितकी सुंदर.. रेखीव शेलाटा बांधा, गोरीपान अंगकांती, गोड चेहरा, मानेवर रुळणारे सोनेरी केस, कोलगेटच्या जाहिरातीतल्या बाईसारखी शुभ्र व मोत्यासारखी दंतपंक्ती, खुलून दिसणारं नकटं नाक आणि मादक भुरे डोळे. तिनं जीनची निळी पँट आणि वर गुलाबी टीशर्ट घातला होता.
'आपलं नाव?' नियतीने तिच्या गंगुबाई हनगळी आवाजात विचारणा करताच त्याच्या डोळ्यातली चमक मावळली. ते न लक्षात येण्याइतकी नियती आंधळी नव्हती पण त्याची तिला आता सवय झाली होती. तिला स्वतःलाही तिचा आवाज आवडत नसे, पण  तिचा नाईलाज होता.
'दीपक इंगवले'
'या! या! मी नियती डोईफोडे, ठोकताळेंची असिस्टंट, बसा ना!' नियतीने उत्तम ठोकताळे समोरच्या एका खुर्चीकडे निर्देश केला. ते ऑफिस एका 1 BHK फ्लॅट मधे थाटलेलं होतं. हॉलमधे पुस्तकांनी भरलेली ४/५ कपाटं होती. टीपॉय आणि स्टडी टेबलवर अनेक पुस्तकं, कागद, वर्तमानपत्रं इतस्ततः पडलेली होती. दीपक कोचावर बसत असताना नियतीने पटापट 'किती पसारा करून ठेवतोस रे?' असं पुटपुटत जमेल तेव्हढा पसारा आवरला.

दीपक इंगवले हा सुमारे ४४/४५ वर्षांचा साधारण साडेपाच फुटांचा माणूस! काळसर वर्ण, गरीब चेहरा, गुळगुळीत दाढी, मिशा सफाचट, काळेभोर केस वार्‍यामुळे विखुरलेले! केसांना कलप केलेला असावा कारण काही पांढरे केस अर्धवट वाळलेल्या गवताच्या टोकांसारखे डोकावत होते! त्याने सुंदर नक्षीकाम केलेला सिल्कचा सलवार कुडता घातलेला होता व भारीतलं मंद वासाचं पर्फ्युम फवारलेलं होतं. सुटलेलं पोट, गळ्यातली सोन्याची जाड चेन, हातावरचं रोलेक्स घड्याळ त्याची चांगली परिस्थिती सुचवत होत्या. कपाळावर गंध होतं व डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या होत्या!
'नमस्कार! मी उत्तम ठोकताळे' उत्तमने स्वतःची ओळख करून दिली. उत्तमचा सावळा रंग, पांढरे होऊ घातलेले केस, चौकोनी फ्रेमचा चष्मा, साधारण साडे पाच फूट उंची, थोडेसे पुढे आलेले दात, काळे डोळे इ. गोष्टींची दीपकने नोंद केली. उत्तमने एकेकाळी चांगलं शरीर कमावलेलं होतं हे त्याच्या स्थूल अंगकाठीतून पण त्याच्या लक्षात आलं.
'नमस्कार! मी दीपक इंगवले! तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. पेपरात पण आलं होतं की तुम्ही लंडनच्या शेरलॉक होम्स इन्स्टिट्युट मधून खास शिक्षण घेऊन आला आहात म्हणून!' बसता बसता दीपक म्हणाला.
'हां ती जाहिरात होती, आम्हीच दिली होती.' नियतीने भाबडेपणाने खरं काय ते सांगितलं आणि उत्तमने एक नाराजीचा कटाक्ष टाकला.
'चहा घेणार?'.. नियतीने मधेच विचारलं.
'नको आत्ता नको.'.. दीपक
'म्हणजे फक्त उत्तमच घेईल मग!'.. नियतीने खिडकीतून डोकावलं, तोंडात बोटं घालून एक जोरदार शिट्टी मारली आणि तर्जनी उंचावत एका चहाची ऑर्डर खालच्या टपरीवाल्याला दिली.
'आम्ही आता शेरलॉक होम्स इन्स्टिट्युटचे सर्टिफाईड प्रॅक्टिशनर आहोत! प्रॅक्टिशनर होण्यासाठी २ वर्षांचं ट्रेनिंग घ्यावं लागतं इंग्लंडमधे. ते शिक्षण ज्याला शेरलॉक बनायचंय आणि ज्याला वॉटसन व्हायचंय त्यांनी एकत्रित पणे घ्यायचं असतं. मी आणि नियतीने ते घेतलंय.'.. उत्तम अभिमानाने म्हणाला.
'वा! वा! फार छान! मी आणि माझी बायको.. आम्ही दोघेही शेरलॉक होम्सचे जबरदस्त फॅन!'... हा हा हा हा हा! नियती मधेच गडगडाटी हास्य केलं आणि दीपकने चमकून तिच्याकडे पाहीलं.
'ती हास्यक्लबला जाते त्याचा परिणाम आहे हा! तुम्हाला नाही हसली ती! शेरलॉक म्हणजे मला गुरुच्या जागी हो!'.. असं म्हणत उत्तमने आपले कान पकडले.
'माफ करा हं! पण तुमचं आडनाव तसं फारसं ऐकण्यातलं नाही!!'.. दीपक हसू दाबत म्हणाला.
'हं! तुम्ही एकटेच नाही त्यातले. आमच्या पूर्वजांच्याकडे पेशव्यांच्या कारकीर्दीत घरांवर जप्त्या आणून वसुली करायचं काम होतं. म्हणजे घरांवर ताळं ठोकायचं काम! म्हणून ठोकताळे! माझे वडील उत्तमोत्तम गोष्टींचे चाहते! त्यांनी माझ्या बहिणीचं नाव ठेवलं तिलोत्तमा, माझं उत्तम! त्यांचं नाव आहे सर्वोत्तम. त्यांनी आईचं नाव बदलून केलं सर्वोत्तमा! बरं, इंगवले साहेब! तुम्ही तुमच्या कामाचं बोला नाही तर तुम्हाला कोहीनूर मंगल कार्यालयातल्या शिंदेंच्या मुलीच्या रिसेप्शनला जायला उशीर होईल. तुम्ही आत्ताच एका जवळच्या नात्यातल्या मुलीच्या लग्नाचं जेवून आला आहात, बरोबर?.'.. उत्तमने शेरलॉकी चुणुक दाखवली.
'आँ! तुम्हाला कसं कळलं?'.. स्वतःवर खूष होऊन उत्तमने नियतीकडे नजर फेकली. ती त्याच्याचकडे कौतुकाने पहात होती.
'सोप्पं आहे! तुमच्या हाताला येणार्‍या अत्तराच्या वासावरून तुम्ही नक्कीच एका लग्नाला जाऊन आला असणार. विड्यानं रंगलेले ओठ तुमचं जेवण झाल्याचं दर्शवतात.'
'बरोबर! पण जवळच्या नात्यातल्या मुलीच्याच लग्नाला कशावरुन?'.. दीपक
'तुमच्या भारीतल्या कपड्यांवरून व हातावरच्या रोलेक्स घड्याळवरून! सहसा जवळच्या लग्नातच लोकं जास्त नटतात, विशेषतः पुरुष! आणि तुमच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या आहेत. म्हणजे मुलीचंच लग्न असणार. मुलाच्या लग्नात वरपक्षाकडची मंडळी नक्कीच रडणार नाहीत. म्हणजे मानपान नीट झालं नाही म्हणून तशी रडतील पण अशी नाही रडणार! काय?'.. उत्तमचे उत्तम स्पष्टिकरण.
'आणि मला रिसेप्शनला जायचं आहे ते कशावरून काढलंत?'.. दीपकच्या डोळ्यात आता कौतुक दिसत होतं. ही ही ही ही ही ही! नियतीचा हास्यालाप नंबर २.
'हां! तुमच्या सिल्कच्या झुळझुळीत कुडत्याच्या खिशातल्या पत्रिकेतलं थोड फार वाचता येतंय. त्यातलं शिंदे, रिसेप्शन आणि कोहीनूर मंगल कार्यालय इतकंच दिसलं मला.'
'वा! वा! तुमची अनुमानं अगदी बरोबर आहेत! काही म्हणा, अगदी २२१ ब, बेकर स्ट्रीट मधे प्रत्यक्ष शेरलॉक समोर बसल्याचा अनुभव दिलात तुम्ही! बरं, मी माझं काम सांगतो, मला वाटतंय ते तुम्हाला नक्की आवडेल.'.. दीपकचं काम ऐकण्यासाठी उत्तम कान टवकारून सरसावून बसला. टेबलावरचा रिकामा पाईप तोंडात घेऊन त्याने नुसत्या हवेचे झुरके मारले. त्याला विडीकाडीचं व्यसन नव्हतं तरीही! पाईप तोंडात ठेवल्यावर लक्ष चांगलं केंद्रित होतं अशी त्याची धारणा होती पण खरं तर ते त्याच्या दैवताचं अंधानुकरण होतं!

'मध्यंतरी चॅटिंग करताना माझी एका मुलीची ओळख झाली. तिचं नाव तिनं अनुजा देशमाने सांगितलं. वय २६. तिनं मला जे काही सांगितलंय आत्तापर्यंत त्यामुळे मला तिच्याबद्दल फारच सहानुभूति वाटायला लागली आहे बघा! बिचारीचा काळ फार वाईट आहे. मला तिला मदत करायची इच्छा आहे.'
'काय आहे तिची कहाणी?'.. नियतीने न रहावून विचारलं.
'तिचे वडील अकाली अचानक गेले, घराचं प्रचंड कर्ज ठेवून. आई घर संभाळायची, नोकरी करीत नव्हती. आणि या वयात अनुभव नसताना कोण नोकरी देणार?  अनुजाचा तुटपुंजा पगार हप्ता फेडायला पुरेसा नव्हता. तेव्हा बापाच्या मित्राने कर्जाच्या हप्त्याचे पैसे देऊ केले पण हरामखोराने अट अशी घातली की तिनं त्याच्या बरोबर रहायचं. तो लग्न झालेला ४८ वर्षांचा माणूस आहे बरं का! नाशिकला बायका-पोरांबरोबर रहातो. त्याची पुण्यामधे स्वतःची कंपनी आहे. तिथे त्याने तिला नोकरी देऊ केलेली. ती मूळची मुंबईची आहे. हे डील त्या दोघांशिवाय कुणालाच माहीत नाही. पुण्यामधे त्याचा फ्लॅट आहे. तिथे ती रहाते. त्याची बायको जेव्हा येणार असते त्या आधी ती आपल्या गोष्टी बेडरूम मधून हलवते. त्याची बायको तिला मुलीसारखी वागवते. तिलाही काही कल्पना नाही. त्याची एक मुलगी साधारण तिच्याच वयाची आहे. ऑफिसात ते दोघे वेगवेगळ्या वेळेला जातात, लोकांना संशय येऊ नये म्हणून. तिला भावंडं नाहीत.' दीप़क थांबला, त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. हाताच्या मुठी वळलेल्या होत्या.

'त्या xxxचं बिंग फोडून जगणं मुश्कील करायला पाहीजे'.. इतक्या सुंदर मुलीच्या तोंडातून असली गलिच्छ शिवी ऐकून दीपकला कससंच झालं.
'ठोकताळे साहेब तुम्हीच तिला शोधू शकाल!' दीपक अजिजीने म्हणाला.
'आँ! म्हणजे ती हरवली आहे का?'.. उत्तम.
'नाही! पण तिचा काही ठावठिकाणा नाही माझ्याकडे! मी विचारलं तिला, पण तिनं काही सांगितलं नाही! फार मानी आहे हो ती!'
'म्हणजे? तुमच्याकडे तिची काहीच माहिती नाही? तुम्हाला माहिती आहे ना की पुण्यात पत्ता माहिती असला तरी घर सापडत नाहीत ते?'.. उत्तमने शेरलॉकी खडूसपणा दाखवला.
'ठोकताळे साहेब म्हणून तर मी तुमच्याकडे आलो. तुमच्यासारखा हुशार माणूसच तिला शोधू शकेल. पोलिसांच काम नाही हो ते. हां, नाही म्हणायला तिच्या फेसबुकची लिंक आहे माझ्याकडे!'
'पण तुम्हाला का तिला इतकी मदत कराविशी वाटतेय?'.. उत्तम.
'हम्म ती एक लांबडी गोष्ट आहे.'.. दीपक गंभीर झाला.. 'माझ्या मूर्खपणाची फळं भोगतोय. माझ्या मुलीनं आत्महत्या केली माझ्यामुळे. तिला मेडिकलला जायचं होतं पण मार्क कमी पडले. मग प्रचंड डोनेशन शिवाय अ‍ॅडमिशन मिळेना. तितके पैसे द्यायला मी काचकुच केली. आता अशा अडिअडचणीतल्या मुलींना मदत करून मनःशांती मिळवायचं बघतो.'.. खोलीतलं वातावरण गंभीर झालं.

'इंगवले साहेब माफ करा, पण ही केस मी नाही घेऊ शकत! इतक्या तुटपुंज्या माहितीवर तर नाहीच नाही.'.. उत्तमने खोडा घातला.
'का? मी खूप आशेने आलो होतो हो.'.. दीपक हताशपणे म्हणाला.
'सागितलं ना? त्रोटक माहिती आहे आणि आणखी मिळण्याची शक्यता दिसत नाही. तुमचा पैसा नुसता खर्च होईल पण हाती काही लागणार नाही.'
'ठोकताळे साहेब तुमचा प्रामाणिकपणा आवडला मला! तुम्ही हवं तर विचार करा १/२ दिवस मग मला सांगा. हा माझा नंबर. ठीक आहे?'
'हो हो जरूर!'.. नियतीने उत्तमला कसलीही संधी न देता परस्पर उत्तर दिलं आणि दीपक इंगवले गेला.

------***-----------***---------

'मग काय करायचं आता?'.. उत्तमने ओट्यावरचा चहा हातात घेऊन कोचावर जाऊन बसेपर्यंत नियतीचा प्रश्न हजर झाला आणि नेहमीचाच प्रतिप्रश्न पण आला.
'कशाचं?'
'अरे कशाचं काय आता? त्या इंगवलेच्या केसचं?'
'सांगितलं ना मी त्याला, जमणार नाही म्हणून!'
'काय रड्या आहेस रे तू? हॅट!'.. नियतीचं वर्मावर बोट.
'आयला, मी काय रड्या? इथं बोंबलायला काय केस आहे? सांग ना सांग!'.. उत्तमचा आवाज चढला.
'का? आहे ना त्या मुलीचं रहस्य!'
'हे बघ नियती! आपल्याला काय शिकवलंय? कशी निरीक्षणं करायची आणि कशी योग्य अनुमानं काढायची! इथे निरीक्षणं करायला काय आहे? एक मृगजळासारखं भ्रामक इंटरनेट, एक बनावट फेसबुक पेज आणि इंगवलेला कुणीतरी मारलेल्या थापा!'
'तू ना परीक्षेत सिलॅबसच्या बाहेरचं विचारलं म्हणून रडणार्‍यातला आहेस. अरे जरा चाकोरी बाहेरची नवी आव्हानं घे की! आयुष्यात जवळपास सगळंच सिलॅबसच्या बाहेरचं असतं!'.. हु हु हु हु हु हु! नियतीचा हास्यालाप.
'अगं पण मला तर त्यामधे आपल्या डोक्याचे केस जाण्यापलीकडे काही केस दिसत नाही! कुण्या पोरीने किंवा पोरानेच असेल, त्याला उल्लू बनवलाय असं नाही तुला वाटत? '
'अरे होऊ शकते एखाद्याची परिस्थिती वाईट!'
'हे बघ! घराचं कर्ज फेडता येत नसेल, समजा, तर घर विकता पण येतं ना? कुठली शहाणी मुलगी असलं डील घेईल, सांग? तू घेतलं असतंस?'
'मी? शक्यच नाही. मी थोबाड फोडलं असतं त्याचं असलं काही सुचवल्या सुचवल्या! पण मी काय म्हणतेय ते ऐक! आता ८ महिने होतील आपल्याला ऑफिस उघडून पण एकही केस आत आलेली नाही. मालकानं तंबी दिली आहे. महिन्याच्या आत भाडं दिलं नाही तर इथून गच्छंती! येईल ती केस घ्यावीच लागणार आहे आता. माज करून नाही चालणार, समजलं?'.. त्याच्या डोक्यावर टप्पल मारत नियती म्हणाली. नियतीने रिअ‍ॅलिटी चेक दिल्यावर उत्तरादाखल थोडा वेळ उत्तमने शून्यात नजर लावली.

'पण मला तो माणूस आवडला नाहीये. जरा जादाच शहाणा वाटला. आपल्यावर गेम टाकायचा प्लॅन असावा त्याचा!'
'हॅ! तो काय गेम टाकणारे? अगदी गरीब वाटला मला तर! आणि हो! तू त्याला स्वच्छ सांगितलं आहेसच की ती सापडण्याची शक्यता नाही म्हणून. तरीही तो केस घ्या म्हणतोय म्हणजे आपण काही फसवत नाही आहोत त्याला. आपण माहिती काढू ना त्याची व्यवस्थित आधी, मग केस घेऊ. काय?'
'हम्म! म्हणजे आयुर्विम्याला पर्याय नाही तर! तू माहिती काढच त्याची. आपण ती केस एनीवे घेऊच. मी त्याला त्याचा कंप्युटर पाठवायला सांगतो. नंतर एखाद्या कंप्युटरच्या गड्ड्याला घेऊन त्याच्या कंप्युटरची उलटतपासणी करता येईल.'
'चल, तो पर्यंत आपण तिचं फेसबुक पेज बघू. अरे वा! नाक काय छान सरळ धारदार आहे हिचं!'.. नियती अनुजाच्या फेसबुकाचे फोटो निरखत म्हणाली. फेसबुकावर मोजून ३ फोटो होते, म्हणजे वेडीवाकडी तोंडं करून काढलेल्या सेल्फ्या होत्या.

'हॅ! हे फोटो काही नीट दिसत नाहीयेत.'.. शेरलॉक होम्स इन्स्टिट्युट कडून भेट मिळालेल्या टूलबॉक्स मधले भिंग डोळ्याशी लावून फोटो निरखत उत्तम म्हणाला.
'अरे हे डिजिटल फोटो झूम करता येतात त्याला भिंगाची गरज नाही येड्या.'.. नियतीने खिंकाळत फोटो झूम केला.
'च्यायला! उगीच आपलं थोडं फार काहीतरी माहिती आहे म्हणून लगेच शेखी मिरवू नकोस हां!'.. उत्तमने चिडचिड करत फोटोंमधे डोकं घातलं आणि थोड्यावेळाने जाहीर केलं.. 'ही तर ड्रग अ‍ॅडिक्ट आहे.'
'आँ! तुला कसं समजलं?'
'Elementary my dear नियती! अगं तिच्या तोंडावर मुरमं किती आहेत बघ. कातडी तजेलदार नाहीये, डोळे निर्जीव दिसताहेत. केस गळताहेत, तिच्या खांद्यावर बघ किती पडले आहेत ते. हे सगळे ड्रगचे परिणाम. या कागदावर इथे रातराणी खरडलंय, तिकडे मॅव लिहीलंय. ही ड्रगची नाव आहेत.'
'पण नाक किती छान सरळ आहे ना?'
'तुला सगळ्यांचीच नाकं आवडतात. मला तुझं आवडतं पण! छान मुमताज सारखं बटण नोज!'
'एss खरंच? फक्त नोजच? बाकी काही नाही?'
'अंssss! उगा लाडात येऊ नकोस!'.. उत्तम गोरामोरा झाला. त्याला नियती मनापासून आवडायची पण ते कबूल केलं तर आपण शेरलॉक होम्स सारखं वागण्यात कमी पडू असं त्याला वाटायचं.
'आणि तू तिची आणि तुझी तुलना करत बसू नकोस, त्या फोटोतून अजून काही माहिती मिळू शकतेय का ते बघ. तिच्या फेसबुकवर तशी काही उपयुक्त माहिती नाहीच्चे. इतके कमी फोटो फेसबुकावर ठेवणं हे तिच्या सारख्या तरुण मुलीला शोभत नाही!'
'हो ना! फेसबुकवर यायच्या पिअर प्रेशरखाली घाईघाईत काहीतरी टाकलंय आणि नंतर दुर्लक्ष केलंय. या फोटोंमधे काहीतरी खटकतंय मला! काय ते लक्षात येत नाहीये पण!'
'हां! बाकी तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर एक तीळ आहे. या फोटोत मागे काहीतरी दिसतंय. असं वाटतंय की हा फोटो एका कंपनीच्या ऑफिसात काढलाय. हे बघ! इथं रिसेप्शन आणि त्यामागे कंपनीचं नाव दिसतंय का तुला?'
'हो हो दिसतंय की! काहीतरी अँड सन्स आहे ना?  ले वा र किंवा ल वा र.. तलवार वाटतंय ना?'
'मला वाटतंय ते तालेवार असावं. पुढे अँड नक्की आहे पण सन्स असेल की नाही कळत नाही. नुसता स दिसतोय मला. तलवार अँड सलवार? नुसतं लवार अँड असं गुगल कर, बघू काय मिळतंय ते!'

गुगलवर काहीही शोधलं तरी ढीगभर रिझल्ट येतातच. तसे आत्ताही आले. फेसबुक सारख्या इंटरनेटच्या भंगारात अनेक तलवार होते. एका तलवारीचा खून झाल्याची बातमी होती. पण एक तालेवार अँड सन्स आणि एक तलवार अँड सलवार अशा दोन कंपन्या पहिल्या दोन पानात दिसल्या.
'नियती तू तालेवार अँड सन्सकडे चाचपणी कर, मी  तलवार अँड सलवारकडे मोर्चा नेतो.'
'अरे तलवार अँड सलवार नाव तुला गोंडस वाटलं तरी मला धोकादायक वाटतंय. मारामारी झालीच तर ते तुला उत्तम ठोकतील. त्यापेक्षा मी जाते तिथे आणि तू जा तालेवारकडे.'.. नियतीला काळजी वाटणं स्वाभाविक होतं.
'तू ब्लॅकबेल्ट होल्डर असल्याची टिमकी माझ्यासमोर वाजवू नकोस बरं का? मी माझी काळजी घ्यायला अगदी समर्थ आहे!'.. उत्तम वैतागून म्हणाला.
'मग निदान माझं पिस्तुल तरी घेऊन जा'
'काय करायचंय पिस्तुल? काही नको'.. उत्तम हट्टीपणे म्हणाला.

------***-----------***---------

'गुड आफ्टरनून! काय पाहिजे आपल्याला?'.. एका जाड भिंगाच्या चष्मेवाल्या काळ्या रिसेप्शनिस्ट बाईने पांढरे शुभ्र दात दाखवत नियतीला विचारलं.
'मला अनुजा देशमानेंना भेटायचंय.'.. नियतीने बेधडकपणे सांगितलं.
'थांबा हं एक मिनिट! मी त्यांना बोलावते.'.. रिसेप्शनिस्ट इंटरकॉमवर कुजबुजत असताना नियतीनं  तोंडावर आश्चर्य न दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न केला... 'आपण बसा, त्या येताहेत इकडे'.
सुमारे ५ मिनिटांनी एक पन्नाशीतली बाई आली आणि नियतीकडे पाहून म्हणाली.. 'आपण समोरच्या कॅफेत जाऊ म्हणजे शांतपणे बोलता येईल.' २६ वर्षाच्या मुली ऐवजी एक पोक्त बाई समोर आली तरी नियती ती विसंगती गिळून मुकाटपणे तिच्या मागे गेली.
'नमस्कार! मी अनुराधा देशमाने. अनुजाची बहीण! मी वाटच पहात होते. तिला जमलं नाही थांबायला! तुला इंगवले साहेबांनी पाठवलं ना?'
'आँ!'... आयला भारी आहे हा दीपक! आम्ही इथे पोचणार हे त्यानं आधीच हेरलं होतं म्हणजे!.. नियतीने स्वतःच्या मनाशी विचार केला.
'तू अगदी नक्षत्रासारखी सुंदर आहेस हं! तुझे केस सोनेरी कसे गं?'
'रंगवलेत!'.. नियतीचं रोखठोक उत्तर.
'तू काय करतेस?'
'मी बिझनेस करते आहे सध्या'.. नियतीने सांगितलं.
'आधी काय करत होतीस?'
'मी मिलिटरी मधे नर्स होते, जवळ जवळ ६ वर्ष. आता सोडून ३ वर्ष होतील.'
'हो का? वा! लग्न कधी झालं?'
'लग्न ५ वर्षांपूर्वी झालं, दोन वर्षांनी घटस्फोट.'
'का?'
'त्यानं माझ्यावर हात टाकायला सुरुवात केली. मी एक दोन वेळा सहन केलं. मग चांगला बदडून पोलिसात दिला त्या xxxxला!. आता तुरुंगाची हवा खातोय.'.. नियतीच्या तोंडून असली जळजळीत शिवी ऐकून अनुराधा देशमानेंना थेट झोपडपट्टीच्या नळावर उभं राहिल्याचा भास झाला.
'तू त्याला मारलंस?'.. देशमाने बाईंच्या चेहर्‍यावर कौतुक, आदर आणि आश्चर्य होतं.
'अहो, मला उत्तम कराटे येतात. ब्लॅकबेल्ट होल्डर आहे मी.'
'वा! चांगली धीराची आणि तडफदार आहेस की तू! आता सांग तुझ्या मुलाकडून काय अपेक्षा आहेत?'
'आँ! मुलाकडून अपेक्षा? म्हणजे?'
'तू माझ्या मुलाच्या स्थळासाठी आली आहेस ना?'
'कोण म्हणालं असं?'... हे हे हे हे हे हे! नियतीचा हास्यालाप.
'इंगवले साहेब!'
'च्यामारी, त्याना कुणी या नस्त्या भानगडी करायला सांगितलं होतं?'.... नियतीचा पारा चढला. पण 'राग आला की आधी हसा' या हास्यक्लबाच्या शिकवणीनुसार तिनं चढत्या भांजणीचं हास्य खदखदवलं..
'तुम्ही इंगवले बिल्डरांबद्दल बोलताय का?'
'नाही म्युनिसिपाल्टीमधे कामाला आहेत ते.'
'थांब हं, नक्कीच काही तरी घोटाळा झालाय. नाव काय तुझं?'
'नियती डोईफोडे'
'आता आलं लक्षात! अलका सरपोतदार नावाच्या मुलीला ते पाठवणार होते. सॉरी हं! माझा घोटाळा झाला.'
'असो, तुम्हाला या मुलीबद्दल काही माहिती आहे का?'.. हातातला फोटो पुढे करत नियती सरसावली.
'ही पण लग्नाची आहे का?'
'नाही हो, हिला शोधायची आहे. या फोटोतली मुलगी ओळखीची आहे का?'
'अंsssss! नाही!'
'बरं या फोटोत तुम्हाला काही ओळखीचं दिसतंय का?'
'अंsssss! नाही!'
'अहो हे तुमच्या ऑफिसचं रिसेप्शन आहे. आणि ही मुलगी तिचं नाव अनुजा देशमाने सांगते.'
'शक्यच नाही! माझी बहीण अशी दिसत नाही आणि ती इतकी तरुण पण नाही.'

------***-----------***---------

उत्तमने बुधवार पेठेतले गल्लीबोळ कोळपून तलवार अँड सलवार नामक दुकानाचा शोध लावला. एका जुन्या वाड्यात ते दुकान थाटलेलं होतं. दुकानाच्या रंग उडालेल्या दरवाजातून उत्तमने आत डोकावलं, आत अंधाराशिवाय फारसं काही दिसत नव्हतं. दरवाजावरील 'तलवार अँड सलवार' या बारक्या पाटीपलिकडे ते दुकान आहे हे समजायला काही मार्ग नव्हता. उत्तमने इकडं तिकडं पाहीलं, त्याला दोन माणसं त्याच्याचकडे निरखून पहात असलेली दिसली. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून उत्तम आत घुसला. आत मधे बरेच पेटारे आणि मोठमोठाल्या कापडाच्या गुंडाळ्या दिसत होत्या.

'नमस्कार! काय प्रकारचं नाटक आहे?'.. एका साठीच्या माणसाने चष्मा आणि भुवयांच्या फटीतून पहात विचारलं. त्यानं तपकिरी रंगाचा झब्बा घातला होता.
'नाटक?'.. उत्तम गडबडला.
'आमच्याकडे सर्व प्रकारच्या नाटकांना लागणारं साहित्य आहे.. अगदी पौराणिक, ऐतिहासिक नाटकांपासून ते साय-फाय पर्यंत! तलवारीपासून सलवारीपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे!'
'मग रातराणी नक्की असेल.'.. उत्तमने एक फीलर टाकला.
'साहेब! इथे बसचं रिझर्व्हेशन होत नाही. दुसरीकडे पहा'.. दुकानदाराने उत्तमच्या नकळत टेबलाखालचं एक बटन दाबलं.
'बरं मॅवमॅव तरी?'
'ओके ओके! आता मला समजलं तुम्हाला काय पाहिजे आहे ते! प्रताप, बघ यांना काय पाहिजे आहे ते!'.. खोलीत आलेल्या एका काटकुळ्या माणसाकडे बघत दुकानदार म्हणाला.
'या साहेब! आत मधे या!.. प्रतापने उत्तमला आत बोलावलं. उत्तम मुकाट्याने त्याच्या मागे गेला. दारातून आत जाताच दोन माणसांनी उत्तमच्या मुसक्या बांधल्या, त्याला ढकलून पाडलं आणि लाथाबुक्क्यांनी चांगलं  तुडवलं.
'बोल भोसडिच्या! कुणी पाठवलं तुला?'.. एकाने उत्तमचा गळा दाबत दरडावणीच्या सुरात विचारलं.

'आssss! नियतीssss! कुणी नाही! कुणी नाही! आईशप्पत कुणी नाही!'.. उत्तम काकुळतीने सुरात म्हणाला.
'नियतीच्या मनात असल्यामुळे आपोआप इथे आलास काय मग?'.. एक जोरदार लाथ पोटात बसली आणि उत्तम केकाटला.
'ओय! आssss! एका मुलीच्या शोधात आलो इथे'
'मुलगी पाहीजे काय रे तुला XXX? तुला हा कुंटणखाना वाटला काय रे XXXXX?'.. अजून दोन लाथा पेकाटात बसल्या.
'ओय! आssss! नियतीssss!' उत्तम विव्हळला, तेव्हढ्यात बाहेर गडबड झाली. पोलीस! पोलीस! असे आवाज ऐकू आले आणि त्या माणसांना काही सुचायच्या आत पोलिसांनी गराडा घालून उत्तमसहित सगळ्यांना पकडून ठाण्यावर नेलं.

दुसर्‍या दिवशी पेपरमधे पोलिसांनी नोकरी लावण्याच्या आमिषाखाली किंवा विवाहाच्या नावाखाली तरुणींची विक्री करणारी टोळी पकडल्याची बातमी आली. त्यांनी तब्बल २२ असहाय तरुणींची सुटका केली. उत्तमला पोलिसांनी टोळीतलाच ठरवल्यामुळे त्याला पण खास खाकी पाहुणचार मिळाला. नियतीने तिची मैत्रीण आणि पोलीस महानिरीक्षक रंजना जाधव हिला फोन केल्यामुळे उत्तम सुटला. पोलिसांना, अर्थात, आधीपासूनच त्या टोळीचा संशय होताच, आणि त्यांनी नेमकी त्याच दिवशी तिथे धाड घालायचं ठरवल्यामुळे उत्तम वाचला. नाहीतर उत्तम कुठे आणि कुठल्या अवस्थेत सापडला असता ते सांगणं कठीण होतं. पण मुक्या मारामुळे कळवळत असला तरी उत्तमला त्या २२ जणींची सुटका त्याच्याच मुळे झाल्याचा आनंद होता.

'ते मला मारत होते तेव्हा मी तुझंच नाव घेत होतो'.. क्षणभर शेरलॉकी बुरखा गमावलेल्या उत्तमच्या बोलण्यात नियतीबद्दलच्या त्याच्या खर्‍या भावना डोकावल्या.
'तू एक मूर्ख आहेस! माझं नाव घेऊन काय उपयोग होता? त्यापेक्षा माझं पिस्तुक घ्यायचं होतंस'.. नियतीनं सात्विक संतापाने त्याला झटकला.
'नेऊन काय उपयोग होता? मला काही समजायच्या आत त्यांनी मला धरला, हातपाय बांधले आणि धुतला. हातपाय बांधल्यावर फक्त पिक्वरचे हिरोच पिस्तुल चालवू शकतात. म्या पामराला काही ते जमलं नसतं. आsssssss'.. उत्तम बरगड्या चाचपत कळवळला.
'श्या! मीच जायला पाहीजे होतं.' नियती मुंडी हलवत हळहळली.

------***-----------***---------

उत्तम तलवार अँड सलवारीचा पाहुणचार स्वीकारत असताना तनुजा इंगवले उत्तमला भेटायला त्याच्या ऑफिसात आल्या.
'नमस्कार! या ना! मी नियती डोईफोडे. काय काम होतं आपलं?' .. नियतीनं गोड हसून स्वागत केलं. तिच्यासमोर पांढर्‍या रंगाची सलवार खमीस घातलेली सुमारे चाळिशीतली बाई उभी होती. गव्हाळी रंग, डोळ्यावर चष्मा, पांढरे होऊ घातलेले केस, अरुंद कपाळ, नकटं नाक, पातळ ओठ, हातात काळ्या रंगाची पर्स अशा काही गोष्टी नियतीने टिपल्या.
'नमस्कार! तुम्ही हेरगिरीची कामं घेता ना म्हणून तुमच्याकडे आलेय. '
'अं... आमची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. त्याला हेरगिरी नाही म्हणता येणार. तरी तुमचं काम सांगा.'
'मला माझ्या नवर्‍यावर पाळत ठेवायची आहे. मला त्याचा संशय येतोय.'
'ओ ओके! आपलं नाव?'
'मी तनुजा इंगवले!'
'आणि तुमच्या नवर्‍याचं नाव?'.. ते इंगवले आडनाव ऐकताच नियती चमकली पण खात्री करण्यासाठी तिनं नवर्‍याचं नाव पण विचारून घेतलं.
'दीपक इंगवले.'
'काय करतात ते?'.. नियतीचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता.. तीन दिवसांपूर्वी येऊन गेलेल्या माणसाची बायको त्याच्यावर पाळत ठेवायला सांगते आहे यावर! पण फारसं न करता थोडे पैसे मिळवायची संधी आयती चालून आली होती.
'म्युनिसिपाल्टी मधे आहेत. मी मधे सहा महीने अमेरिकेला गेले होते बहिणीच्या मुलीच्या डिलिव्हरीसाठी.. तेव्हा स्वारी भरकटली असा मला संशय आहे. आणि अजूनही भरकटलेलीच आहे असं मला वाटतंय.'
'का आला संशय?'
'अहो, त्यानं मला थापा मारल्या. पार्टी आहे एका मित्राची म्हणून गेला. काही दिवसांनी तो मित्रच मला भेटला. मी विचारलं काय कशी झाली पार्टी? तर म्हणाला कुठली पार्टी? असं १/२ वेळा झालं. त्याच्या कपड्यांना कसल्या कसल्या पर्फ्युमचे वास येतात जे आम्ही कधी वापरत नाही. फोनवर कुजबुजत असतो सतत. मी जवळ आले की बरं नंतर बोलू म्हणून ठेवून देतो. शिवाय, आपल्याला एक सिक्स्थ सेन्स असतो ना?'
'ओके! मला त्यांचा फोटो, तुमचा पत्ता, त्यांच्या ऑफिसचा पत्ता अशा काही गोष्टी लागतील. एकूण साधारणपणे १५,००० रू पर्यंत खर्च येईल. आणि हो, एक ५,००० रू अ‍ॅडव्हान्स पण लागेल.'
'बरं! आत्ता नाहीयेत तेव्हढे! मी परत येईन घेऊन. पण हे फक्त आपल्या दोघीत रहायला पाहीजे बरं!'
''मी फक्त माझ्या पार्टनरला सांगेन.'.. तनुजा निघून गेली तरी तिची पाठमोरी आकृती बराच वेळ नियतीच्या डोळ्यासमोर भिरभिरत राहिली.

------***-----------***---------

दीपक कंप्युटर घेऊन उत्तमच्या ऑफिसात आला आणि उत्तमला देता देता म्हणाला..
'मला एक कुतुहल होतं. मला सांगा उत्तमराव! तुम्हाला हे शेरलॉक होम्समधे कसा काय इंटरेस्ट निर्माण झाला?'
'त्याचं असं झालं दीपकसाहेब! मी ८वीत असतानाची गोष्ट आहे. तेव्हा मी 'क' तुकडीत होतो. मला अभ्यासात फार काही गती नव्हती. पण मी माझ्या तुकडीत पहीला आलो वार्षिक परीक्षेत! घरी आल्यावर वडिलांना माझा निकाल सांगितला आणि पुढे माझं अनुमान सांगितलं की मी ८वी मधे शाळेत तिसरा आलो आहे. वडिलांनी विचारलं .. ते कसं काय? तेव्हा मी म्हंटलं.. 'अ' तुकडीतला पहीला, 'ब' तला दुसरा आणि 'क' तला म्हणजे मी तिसरा. वडीलांनी तेव्हाच माझ्यातला तो गुण ओळखला. ते म्हणाले.. शाब्बास! अगदी शेरलॉक होम्स शोभतोस तू! तेव्हा मला शेरलॉक होम्सबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग मी हळूहळू त्याचा अभ्यास करायला लागलो आणि मग Rest is history!'.. उत्तम भाव खात म्हणाला.

'वा! वा! इतक्या लहान वयात म्हणजे फारच कौतुकास्पद हो!'.. दीपकने मनातल्या मनात कपाळाला हात लावला पण आता तो केस त्याला देऊन चुकला होता.
'धन्यवाद दीपक! पासवर्ड देणार का मला तुमचा?'.. उत्तमला हे विचारायचं आठवल्याबद्दल स्वतःचाच अभिमान वाटला.
दीपक एका कागदावर पासवर्ड लिहीत असतानाच बेल वाजली. नियतीने दार उघडलं आणि तिला धडकी भरली. दारात तनुजा उभी होती.
'मी तो अ‍ॅडव्हान्स.....' म्हणत म्हणत तनुजा आत आली आणि तिला खुद्द दीपक तिथे दिसला. 'आँ! तुम्ही कसे काय इथे?' तिचा चेहरा चोरी पकडली गेल्यासारखा झाला.
'आँ! तू कशी काय इथे?'.. दीपकचाही चेहरा चिंताक्रांत झाला.
'आम्ही दोघी हास्यक्लबात भेटलो. हा हा हा हा हा हा!'.. नियतीची सारवासारव!
'अंss! हास्यक्लबात ना? हो हो! हा हा हा हा हा हा!'.. तनुजाला हायसं वाटलं.
'असं होय! मला माहिती नव्हतं तू पण जातेस ते. पण मग इथे काय करते आहेस?'.. दीपक
अंss! इथे? अंss! काय माहित! काय करते आहे मी इथे?'.. तनुजाने नियतीकडे केविलवाणेपणे बघितलं.
'त्या वर्गणी द्यायला आल्या आहेत. हो ना?'.. नियतीनं तनुजाकडे तोंड करून विचारलं.
'हो हो हो! वर्गणी द्यायला! आणि तुम्ही?'.. तनुजाला आता खूपच मोकळं वाटायला लागलं होतं.
'मी? अंssss! हां आम्ही दोघे रडारड क्लबचे मेंबर आहोत. हाँ हाँ हाँ हाँ हाँ हाँ'.. दीपकने उत्तमकडे बोट करून एक पहाडी आक्रोश लावला.
'अंssss! मी? कधी? कुठल्या? अंssss! हो हो हो! हाँ हाँ हाँ हाँ हाँ हाँ'.. उत्तम भंजाळला पण नियतीचे इशारे पाहून त्यानं दीपकचा आक्रोश ओढला.
'हॅ! असा कधी क्लब असतो काय? काहीतरी बंडला मारू नका.'.. तनुजा खवळली.
'अगं खरंच असतो. साने गुरुजींची गादी पुढे चालविण्यासाठी रडके गुरुजींनी तो चालू केलाय नुकताच.'
'हो का? मलाही येऊन बघायचाय तो मग!'.. तनुजाने गेम टाकली.
'अंssssss! अगं तो फक्त पुरुषांसाठीच आहे. पुरुष मंडळी सहसा रडत नाहीत, सगळं दु:ख आतल्या आत दाबतात म्हणून खास त्यांच्यासाठीच आहे तो!'.. दीपकची एक पुडी.
असं? कुठे आहे तुमचा क्लब?'.. तनुजाला चांगलाच संशय आला होता.
'मॉडेल कॉलनीत'..
'एसपी कॉलेजवर'.. दीपकने आणि उत्तमने एकाचवेळी तोंड उघडलं.
'सोमवार बुधवार शुक्रवार मॉडेल कॉलनीत आणि मंगळवार गुरुवार शनीवार एसपी कॉलेज'.. दीपकने सारवासारव केली आणि नियतीने तनुजाला आतल्या खोलीत नेल्यामुळे पुढची उलटतपासणी टळली.

त्या दोघी आत गेल्या गेल्या दीपक 'आपण नंतर बोलू' असं उत्तमला सांगून घाईघाईने निघून गेला. थोड्यावेळाने तनुजा हसत हसत बाय करून निघून गेली.
'नियती, हा काय चावटपणा आहे, हां?'.. उत्तम चांगलाच चिडलेला होता.
'काय चावटपणा? मी कधी चावटपणा करत नाही, आणि तुझ्याबरोबर तर नाहीच नाही.'.. नियती त्याला खिजवायची संधी कधी सोडायची नाही.
'आयला, तू नेहमी भलभलते अर्थ काढ, काय? तू त्या बाई बरोबर काय डील केलं आहेस, मला न विचारता? आँ?'
'मला काय गरज आहे तुला विचारायची? या धंद्यातली ८०% पार्टनर मी आहे म्हंटलं.'
'बरं! बरं! जरा ४ पैसे जास्त टाकलेत म्हणून टेंभा नकोय मिरवायला. ती दीपकची बायको आहे इतकं मला समजलंय. तिला काय पाहिजे होतं ते सांग'
'अरे तिला दीपकवर नजर ठेवून हवी आहे. १५,००० रू खर्च सांगितला तिला, तिने ५,००० रू. अ‍ॅडव्हान्स पण दिलाय. म्हंटलं, काही न करता पैसे मिळत असतील तर का सोडा?'
'नजर ठेवून? म्हणजे त्याचं काही लफडं आहे?'
'ती अमेरिकेला गेली होती तेव्हा दीपकचे कुणा बाईबरोबर संबंध होते, अजूनही आहेत असं तिला वाटतंय.'
'पण तिची केस घेणं मला नैतिकतेला धरून आहे असं वाटत नाही.'
'त्यात कसली आली आहे नैतिकता?'
'अगं म्हणजे काय? नवराबायकोच्या केसेस त्यांच्या नकळत घ्यायच्या आणि दोघांकडून पैसे उकळायचे हे काही बरोबर नाही. आपल्याला काही व्यावसायिक सचोटी, प्रामाणिकपणा काही आहे की नाही?'
'अरे कसली व्यावसायिक सचोटी? दीपकने कुठे दाखवली आहे काही? त्यानं मारल्याच ना बंडला आपल्याला?'
'दीपकच्या लफड्याचा आणि त्यानं आपल्याला दिलेल्या केसचा काही संबंध आहे की नाही ते आपल्याला माहीत नाही. समजा, असला! तरीही तो स्वतःहून त्याचं लफडं आपल्याला सांगेल असं मला वाटत नाही. आपल्यालाच ते काढून घेतलं पाहीजे त्याच्याकडून. पण कसं काढणार?'
'माझ्याकडे त्याला एक खास झाँसा द्यायचा प्लॅन आहे.'

------***-----------***---------

'माफ करा इंगवले साहेब पण फोनवर मी मुद्दामच फारसं काही सांगितलं नाही.'.. नियतीने दीपकला डेक्कनवरच्या एका हॉटेलात महत्वाची माहिती देण्याच्या निमित्ताने बोलवून घेतलं होतं.
'असं होय! मग काय महत्वाची माहिती मिळवली आहे तुम्ही?'.. दीपक दोघांकडे बघत म्हणाला.
'आम्हाला अनुजा देशमाने सापडली आहे.'.. नियतीने थंडपणे सांगितलं आणि ती दीपककडे निरखून पाहू लागली.
'आँ! कशी? कुठे?'.. दीपकला धक्का बसल्याचं अगदी स्पष्टपणे कळत होतं.
'तुम्ही दिलेल्या फेसबुकच्या लिंकवरून! तिथल्या एका फोटोत एका गाडीच्या नंबर प्लेटचं रिफ्लेक्शन दिसलं एका खिडकीच्या काचेत. मग त्यावरून तो भाग कुठला आहे ते शोधलं आणि तिथल्या सर्व रहिवाश्यांच्या माहितीची छाननी केल्यावर तुम्ही दिलेल्या बाबी फक्त एकाशीच जुळल्या. आम्ही तिला भेटलो देखील. अजून सुमारे ५० लाखांचं कर्ज शिल्लक आहे म्हणत होती. तितके तुम्ही देऊ शकलात तर तिची लगेच सुटका होईल.'

दीपक अचानक खोखो हसायला लागलेला बघून ते दोघं भंजाळले.
'हा हा हा हा हा तुम्ही तिला भेटलात पण?'.. दीपकला जाम हसू आवरत नव्हतं.
'हे हे हे हे हे हो मग! त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे?'.. नियतीने हास्यक्लबी री ओढली.
'ही ही ही अहो कारण अशी मुलगी अस्तित्वातच नाही! हु हु हु हु!'

'ते आमच्या लक्षात आलंच होतं! म्हणूनच आम्ही तुम्हाला थाप मारली. Truth by Deception असा एक चॅप्टर होता आम्हाला! असो. तुम्ही अशी बनावट केस घेऊन आमच्याकडे का आलात आणि निष्कारण आमचा वेळ का घालवलात ते सांगा आता!'.. उत्तम काहीसा वैतागून म्हणाला.
'प्रथम मी तुम्हा दोघांची माफी मागतो! मी जी केस तुम्हाला दिली होती ती तुमची परीक्षा होती असं समजा! मला बघायचं होतं की घेतलेली केस तुम्ही किती गंभीरपणे घेता आणि ती सोडविण्यासाठी तुम्ही किती परिश्रम घेता ते! त्यात तुम्ही यशस्वीरित्या पास झाला आहात, अभिनंदन! शिवाय तुम्ही जिवाची पर्वा न करता बुधवार पेठेत गेलात आणि त्या २२ मुलींची सुटका करवलीत हे खरंच कौतुकास्पद आहे.'.. दीपकने मनापासून कौतुक केल्यामुळे दोघांची मान ताठ झाली.

'बरं पण मग खरी केस देणार ना?'.. नियतीने खुंटा हलवला.
'हो हो देणार तर! मी तुमचा फोन यायच्या आधी तुमच्याचकडे यायला निघालो होतो. माझी बायको मधे सहा महीने अमेरिकेला गेली होती तिच्या बहिणीच्या मुलीच्या डिलिव्हरीसाठी. तेव्हा अनुजा देशमाने माझ्याकडे आली. ती पूर्वी केतन बिल्डर्सकडे कामाला होती. तेव्हा ती माझ्या ऑफिसात कामानिमित्त येत असे. केतन बिल्डर्सचं दिवाळं निघाल्यानंतर तिचा जॉब गेला. तिला नवीन जॉब मिळवण्यासाठी माझी मदत हवी होती. माझ्या बर्‍याच बिल्डर्सशी ओळखी असतात म्हणून मी तिला सांगितलं मी शब्द टाकेन म्हणून. त्या निमित्ताने ती येत राहिली. मीही एकटेपणाला कंटाळलो होतो. त्यामुळे आमची जवळीक वाढली. मला काही त्याचा अभिमान नाही. पण जे झालं ते झालं.'.. दीपक गंभीरपणे म्हणाला. त्या आधी नियती आणि उत्तमची 'त्याच्या बायकोचा संशय बरोबर होता' या अर्थाची झालेली नजरानजर त्याला दिसली नव्हती.

'तर ती तुमचे पैसे घेऊन पळून गेली आहे, बरोबर?'.. उत्तमने रिकाम्या पाईपचा झुरका घेत विचारलं.
'तुम्हाला पोलिसांकडे जाता येत नाहीये कारण तुमच्या बायकोला समजेल.'... इति नियती.
'ऑं! तुम्हाला कसं समजलं?'.. दीपकला हे सगळं अजिबात अपेक्षित नव्हतं.
'ती एक तर तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते किंवा तुमचे पैसे घेऊन पळून जाऊ शकते! पण तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाल्यावर तुम्ही ब्लॅकमेलला भीक घालाल असं वाटत नाही. मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही म्हणतात ना!'.. उत्तमचा एक ठोकताळा.. 'तर आता सांगा किती पैसे गेलेत आणि कसे?'

'त्याचं काय झालं, तिला कुठुन तरी भारी टिप्स मिळायच्या. २२ जुलै २०१७ तारखेला अविनाश भोसले आणि त्यांचे जावई विश्वजीत कदम यांच्या घरांवर धाडी पडणार असल्याचं मला आधीच तिच्याकडून समजलं होतं. आमच्या ३ रजिस्ट्रेशन ऑफिस वर धाडी पडणार असल्याचं मला २ दिवस आधी तिच्याकडून समजलं. यामुळे माझा तिच्यावर विश्वास बसत गेला. एके दिवशी तिने मला माझ्यावरच धाड पडणार असल्याचं सांगितलं.'
'हम्म्म स्टँडर्ड ट्रॅप! पण तुमच्या घरात होते का इतके पैसे? ओ येस राईट! मधे मी पेपर मधे वाचलं होतं की मेगा बिल्डर्सच्या २५० कोटींचं प्रोजेक्टला मान्यता देण्यासाठी बरीच लाच दिली गेली. त्यातली किती तुमच्याकडे होती?'.. नियतीच्या रोखठोक प्रश्नामुळे दीपक चमकला.
'रक्कम बरीच आहे! पण त्यात भागीदारही आहेत. सगळी रक्कम माझ्याकडे होती एका ब्रीफकेसमधे. ती ब्रीफकेस मी तिला दिली'
'पण होते किती पैसे?'
'जवळ जवळ एक कोटी!'
'एक कोटी? बापरे! हा हा हा हा हा'.. नियतीचे बटाट्या एवढे डोळे करीत खिंकाळली.. 'इतके मावतील तरी का ब्रीफकेसमधे?'
'नियती! टिपीकल ब्रीफकेसची लांबी १६.५ इंच, रुंदी १३ इंच आणि उंची ४ इंच असते साधारण! २००० रू नोटेची लांबी ६.५ इंच, रुंदी २.५७ इंच आणि जाडी ०.००५८ इंच असते. समजा एकावर एक १००० नोटा ठेवल्या तर जाडी ५.८ इंच होते. २००० च्या ५००० नोटा घेतल्या तर एक कोटी रुपये होतात. ब्रीफकेसच्या रुंदीमधे १३/२.५७ म्हणजे ५ नोटा शेजारी शेजारी सहज बसतात. आणि लांबी मधे १६.५/ ६.५ म्हणजे २ नोटा आरामात. म्हणजे १० नोटांचा एक थर होतो आणि ५००० नोटांचे ५०० थर होतात आणि ते सगळे ४ इंचात सहजपणे बसतात.'.. उत्तमने परीक्षेसाठी पाठ केलेलं ओकलं.

'वा! अगदी बरोबर! अगदी थक्क केलंत तुम्ही उत्तमराव! हे पैसे ज्या दिवशी माझ्याकडे आले त्याच दिवशी संध्याकाळी धाड पडणार असल्याची टिप तिने दिली. मग नाईलाजाने मी ब्रीफकेस तिच्याकडे तात्पुरती ठेवायला दिली. संध्याकाळी धाड पडली पण त्यांना काही मिळालं नाही अर्थात. दुसर्‍या दिवशी मी तिच्या फ्लॅटवर ब्रीफकेस घ्यायला गेलो तर ती लंपास! फोन ती फ्लॅटवरच टाकून गेल्यामुळे काँटॅक्ट करता येत नाहीये. आता सगळे भागिदार आता माझ्या मागे लागले आहेत. आता तुम्ही तिला शोधून पैसे मिळवले नाहीत तर माझं काही खरं नाही.'.. दीपक हताशपणे म्हणाला.
'म्हणजे फेसबुकचं पेज खरं होतं पण ष्टोरी बनावट होती. बरोबर?'.. उत्तम
'हो!'
'बरं किती तारखेला झालं हे सगळं?'
'७ नोव्हेंबरला दुपारी ४/४:३० च्या सुमारास मी तिला ब्रीफकेस दिली. त्या नंतर माझं तिची भेट किंवा बोलणं झालेलं नाही!'
'चला आपण तिच्या फ्लॅटवर जाऊन बघू'.. उत्तम असं म्हणाल्यावर सगळी वरात तिच्या फ्लॅटवर गेली. दीपककडे एक किल्ली होतीच. एक बेडचा छोटाच फ्लॅट होता. बर्‍याच वस्तू इतस्ततः पडल्या होत्या, त्यात काही कागदाचे बोळे होते. टेबलावर बराच कचरा होता,  त्यात एक बॅटरी संपलेला मोबाईल पण होता. एक अर्धवट भरलेली सुटकेस बेडवर पडलेली होती. काही कपडे कपाटात होते. एकंदरीत घाईघाईने गाशा गुंडाळलेला दिसत होता. उत्तमने बारकाईने सगळ्याचं निरीक्षण केलं, पडलेले बोळेही उघडून वाचले. मोबाईलला चार्जर लावून त्याचा अभ्यास केला.

'मेगा बिल्डर्सची कतारमधे प्रोजेक्टं असतात का?'.. उत्तमने अचानक विचारलं.
'हो, सगळ्या आखातात आहेत त्यांची!'.. दीपक म्हणाला.
'तिनं दोह्याला जाण्याबद्दल काही सांगितलं होतं?'
'नाही'
'ही बाई नक्कीच त्या मेगा बिल्डर्ससाठी काम करते आणि ती दोह्याला गेलेली आहे.'
'आँ! कशावरून?'
'तुम्हाला टिप्स देणं, दोह्याचं तिकीट आधीच घेऊन ठेवणं, आणि नेमकं धाड पडायच्या दिवशीच लाच देणं हे काही योगायोग वाटत नाहीयेत. या सगळ्यावरून हे नक्की की ही बाई नक्कीच त्या मेगा बिल्डर्ससाठी काम करते आणि ती दोह्याला गेलेली आहे. तिने मिलेनियम ट्रॅव्हल्स कडून घेतलेल्या दोह्याचं तिकीट घेतलंय १२ ऑगस्टला, एका बोळ्यात ती रिसीट मिळाली. जेट एअरवेजची फ्लाईट आहे, पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते दोहा. तिचा मोबाईल दीपकचेच ७ मिस्डकॉल्स दाखवतोय. त्यातला सगळ्यात पहिला ८ नोव्हेंबरचा ११:३५ वाजताचा होता. त्यावरच्या ऊबर अ‍ॅपवरून त्याच दिवशी सकाळी ९ वाजता एअरपोर्टसाठी टॅक्सी मागविलेली होती दुपारी १च्या विमानासाठी. शिवाय घेतलेली लाच चोरीला गेली म्हणून कुणी पोलिसात जाणार नाही हे शेंबड्या पोरालाही समजतं त्यामुळे ती तशी बिनधास्त असणार. '

'आयला असं होय? मग मी दोह्याला जाते आणि बघते ती सापडतीये का ते. माझे काही कॉन्टॅक्ट्स आहेत तिथे.'.. नियतीनं दीपककडे बघत जाहीर केलं.
'नियतीचे कुठेही कॉन्टॅक्ट्स असतात. नसतील तर ती निर्माण करू शकते कधीही'.. उत्तम मिष्किलपणे म्हणाला.

------***-----------***---------

'तू मला उगीचच पाठवलंस कतारला! मला माहिती होतं तिकडे ती सापडणार नाही म्हणून!'.. नियतीने दोह्याहून आल्या आल्या आपल्या खड्या आवाजात युद्धाचं शिंग फुंकलं.
'मी पाठवलं? तूच गेलीस तुझी तुझी! नेहमीच आहे तुझं हे म्हणा! काही लक्षात नसतं तुझ्या!'.. उत्तम वैतागून म्हणाला.
'आरे तूच निष्कर्ष काढलास ना? की ती तिकडे गेली आहे म्हणून!'
'हो! मग?'
'मग तूच सांगितलंस की जाऊन बघून ये, तुझे कॉन्टॅक्ट्स असतीलच तिकडे म्हणून!'.. नियती तावातावाने म्हणाली.
'आयला काय त्रास आहे!'.. उत्तमने सत्रांदा कपाळावर हात मारला.. 'तू दीपकला विचार हवं तर!'
'तो काय तुझीच बाजू घेणार!'
'पुढच्या वेळेला मी रेकॉर्ड करून ठेवणार आहे आपलं बोलणं, मग तुला समजेल! मग तिकडे काय झालं ते सांगणारेस की भांडत बसणारेस?'.. उत्तम तणतणला.

'अरे तिकडे एक गंमत झाली. माझं फोनचं बिल चुकलंय असं वाटलं म्हणून मी एअरटेलला फोन केला तिकडून. तर त्यांनी काय सांगावं?.. आप कतारमें हैं! कृपया प्रतीक्षा कीजीये!.. त्यांना कसं कळलं मी तिकडे आहे ते?'.. नियतीने डोळे विस्फारत विचारलं.
'अगं फोन कंपनीला सगळं कळतं! मला तुझ्या शोधाचं काय झालं ते सांग!'
'काय नाही! ती तिकडे कुठे गेली त्याचा काही पत्ता नाही. हां! मी जेट एअरवेज मधे जाऊन आले, पुण्यात आल्यावर! पण अनुजा देशमाने त्या फ्लाईटमधे नव्हती. ती दुसर्‍या कुठल्या नावाने गेली असेल म्हणून मी एअरपोर्टवर जाऊन CCTV ची त्या दिवशीची रेकॉर्डिंग पाहिली. ती टॅक्सीतून एअरपोर्टला येताना दिसते, नंतर एअरपोर्टच्या आत पण जाताना दिसते. नंतर आतल्या कुठल्याच CCTV मधे दिसत नाही. ही ही ही ही ही ही!'
'आयला! हा तर फार महत्वाचा शोध लावलास तू नियती! वेल डन! पण हे आधी सांगायचं सोडून तू भलतंच सांगत बसलीस!'
'हो मग? गंमत वाटली मला, टेक्नॉलॉजी किती पुढे गेलीये त्याची, म्हणून सांगितलं!'
'बरं! आपण आता परत जाऊन ती रेकॉर्डिंग नीट बघू. मला काही गोष्टींची खातरजमा करायची आहे.'

------***-----------***---------

'आपल्याला शेरलॉकने आयरीन अ‍ॅडलरच्या घरी जाऊन काय केलं ते दीपकच्या घरी जाऊन करायचंय. लक्षात आलं ना?'.. रेकॉर्डिंग बघून आल्यावर उत्तमने नियतीला विचारलं.
'हो हो, त्या स्कँडल इन बोहेमिया मधे ना?'
'कर्रेक्ट! एक स्मोक बॉम्ब पण लागेल.'
'बरं! मला एक दुकान माहिती आहे. तिथे पोलिसांच्या आणि सैन्याच्या भांडारातून चोरलेल्या गोष्टी मिळतात.'
'च्यायला तुला बरं हे असलं सगळं माहिती असतं.'
'मग? मी काय साधीसुधी वाटले काय तुला?'
'बरं, आपण रात्री ८ च्या सुमारास जाऊ म्हणजे तो घरी सापडेल. दुसरं म्हणजे आपण दोघेही त्याच्या घरात जाऊ. कारण त्याचा फ्लॅट दुसर्‍या मजल्यावर आहे, तुला तो बॉम्ब बाहेरून आत टाकणं जमणार नाही. मी माझ्या पँटीच्या उजव्या खिशात हात घातला की तू तो बाँब टाकायचा. समजलं?'
'अगदी!'

बरोब्बर रात्री ८ वाजता उत्तमने दीपकच्या घराची बेल मारली. दिपकने दार उघडलं आणि समोर दोघांना बघून चकित झाला तरी नाईलाजाने त्याने त्यांचे स्वागत केलं..

'आँ? तुम्ही कसे इथे? या! या!'
'कोण आलंय?'.. उत्तम काहीतरी उत्तर देणार तितक्यात तनुजा ओढणीला हात पुसत बाहेर आली आणि तीही त्या दोघांना बघून उडाली. मग थोड्यावेळाने एकदम तिला हास्यक्लब आठवला व नियतीकडे बघून एक हास्यविलाप केला.. 'हे हे हे हे हे हे!'
'हॉ हॉ हॉ हॉ हॉ हॉ'.. नियतीने तिच्याकडे बघत लगेच प्रतिसाद दिला पण त्याच वेळेला उत्तमने त्याच्या उजव्या खिशात हात घातल्याचं तिला दिसलं नाही. उत्तमची चिडचिड झाली, त्याने मनातल्या मनात तिला शिव्या हासडल्या. त्यांचं हसणं चालूच होतं. दीपक व तो त्यांच्याकडे हतबुद्ध होऊन बघत होते तितक्यात नियतीने उत्तमकडे कटाक्ष टाकला. ते बघून उत्तमने परत खिशात हात घातला पण तेव्हढ्यात तिने परत मान फिरवली. मग न राहवून उत्तम ओरडला... 'नियतीss!' तिने चमकून त्याच्याकडे बघितलं तशी त्याने परत खिशात हात घातला.

'माझं लक्ष आहे तुझ्याकडे, पण मी ते स्कूटरच्या डिकीत विसरलेय'
'काय विसरलंय?'.. दीपकला संशय आला.
'काही नाही! एक गोष्ट आणली होती खास तुमच्यासाठी! लगेच घेऊन येते!'.. नियतीनं निर्विकारपणे सांगितलं.
'जा पळ मग!'.. उत्तम भिंतीवर डोकं आपटायचा बाकी राहिला होता. नियती पळत पळत खाली गेली आणि एक पिशवी घेऊन पळत पळत वर आली.
'आणला'.. हाशहुश करत करत नियती म्हणाली.
'मग टाक ना!'
'तू खूण केल्यावर ना?'.. ती भाबडेपणाने म्हणाली. त्यावर उत्तमने चडफडत परत खिशात हात घातला आणि तिने तो पिशवीतून काढून टाकला. तो पडल्या पडल्या सगळेच दोन पावलं मागे सरकले. पण तो निरुपद्रवी निघाला.
'च्यायला! फुसका आहे. XXXXX च्यानं गंडवला वाटतं आपल्याला!'.. नियतीने एक खणखणीत शिवी हासडली.
'तू पेटवलास का तो?'
'अरे माठ्या! तो पेटवायचा नसतो! फटाका आहे काय तो?'.. नियती भणकली तोपर्यंत इंगवले दांपत्य सावध झालं होतं. तनुजाने तिथल्या ड्रॉवरमधून एक पिस्तुल काढून त्या दोघांवर रोखलं आणि दरडावलं..

'खबरदार काही हालचाल केलीत तर! अगदी सावकाशपणे दोन्ही हात वर करा!'.. दोघांनी एकमेकांना भुवया उडवत 'आता काय होणार?' अशी  नजर फेकत हात वर केले.
'शाब्बास! मला सांगा उत्तमराव, तुमचं इथं येण्यामागं नक्की काय प्रयोजन होतं?'.. दीपकने उलटतपासणी चालू केली.
'Elementary my dear Deepak! मला माहिती आहे की ते पैसे तुमच्याच घरात आहेत. बाकीच्या भागिदारांना टांगून सगळे पैसे स्वतःच्या घशात घालायचा डाव आहे तुमचा!'.. उत्तमने त्याचं भांडं फोडलं.
'ओ हो! म्हणून तुम्ही आमच्यावर आयरीन अ‍ॅडलर सारखा डाव टाकायचा प्रयत्न केलात तर. शेरलॉकने स्मोक बाँब फोडून आग लागल्याचं भासवलं आणि त्या गोंधळात तिची नजर कुठे जाते आहे ते पाहून किमती गोष्ट कुठे लपवली असेल ते ताडलं! पण तुमचा बाँब फुटलाच नाही. हा हा हा हा हा हा!.. दीपक खराखुरा गडगडाटी हसला.
'ही ही ही ही ही ही!'.. नियतीला खो बसला.
'हे हे हे हे हे हे!'.. उत्तम हसला आणि हॉलच्या आतल्या दरवाजाकडे बोट दाखवत म्हणाला.. 'बाँब फुटला नसला तरी तुमच्या बायकोने पटकन त्या दरवाज्यातून दिसणार्‍या माळ्याकडे नजर टाकली ती मी टिपली. त्यामुळे पैशांनी भरलेली ती ब्राऊन ब्रीफकेस तिथेच असणार.'
'अरे वा! मानलं तुम्हाला उत्तमराव! पण तुम्हाला हे कसं समजलं?'
'सांगतो! सांगतो! जरा हात खाली ठेवू का टेबलावर? दुखायला लागलेत!'
'शटाप! चुपचाप हात वर करा'.. तनुजा पिस्तुल नाचवत ओरडली.
'अनुजा देशमाने एक कपोलकल्पित पात्र तुम्ही निर्माण केलंत आम्हाला गंडवायला! बरोबर? आम्हाला ते समजायचं कारण तनुजा बाईंच्या उजव्या हाताच्या मनगटावर एक तीळ आहे आणि फेसबुकवरच्या फोटोत देखील तो बरोबर तिथेच आहे. फेसबुकचे फोटो तनुजा बाईंचेच आहेत पण मेकप व फोटोशॉप करून वय लपवलेलं आहे. म्हणून पटकन ते त्यांचेच आहेत हे कळत नाही.'
'बाई नका म्हणू हो प्लीज'!.. तनुजा कळवळली.
'हो तनुजा एका प्रायोगिक रंगभूमीत वेशभूषेचं काम बघते. पण ती तर अमेरिकेत होती ६ महिने!'
'त्या फक्त साडेपाच महीने तिकडे होत्या! त्यानंतर इथेच त्या अनुजाचं पात्र रंगवीत होत्या. त्या ८ नोव्हेंबरला ९ वाजता टॅक्सीने एअरपोर्टला अनुजा देशमाने या नावाने ब्राउन ब्रीफकेस घेऊन गेल्या आणि दुपारी ४ वाजता तनुजा इंगवले या नावाने तीच ब्रीफकेस घेऊन तुम्हाला भेटल्या. CCTV मधे हे स्वच्छ दिसतं. अनुजा कुठल्याच फ्लाईटवर गेली नाही. त्या ऐवजी तिने टॉयलेटमधे जाऊन पूर्ण मेकप बदलला आणि तनुजा म्हणून बाहेर आली. '.. नियतीने खुलासा केला.

'तुम्हाला हे समजेल असं वाटलंच नव्हतं आम्हाला, अगदी थक्क केलंत बघा!'.. दीपक हताशपणे म्हणाला.
'आँ? म्हणजे?'
'आपल्या पहिल्या भेटीत तुम्ही काढलेली अनुमानं आठवतात?'
'हो! तुम्ही भारीतले कपडे आणि रोलेक्स घड्याळ घालून जवळच्या मुलीच्या लग्नाला जाऊन आला होतात. जवळच्या कारण तुमचे डोळे ओलावलेले होते.'.. उत्तम अभिमानाने म्हणाला.
'हा हा हा! ते कपडे भाड्याने घेतलेले होते आणि रोलेक्स बनावट होतं. मी महापालिकेच्या बांधकाम विभागामधला एक साधा अधिकारी! मला कुठलं रोलेक्स परवडतंय? पण तेव्हा मुद्दाम काही लोकांवर इंप्रेशन मारायला घातलं होतं. माझ्या डोळ्यातलं पाणी स्कूटरवरून येताना धूळ गेल्यामुळं आलं होतं. असो. मला पैसे घेऊन परदेशी पळून जायला काही दिवसांची मुदत हवी होती. त्यामुळे माझ्या इतर भागिदारांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी मी अनुजाने पैसे पळविल्याचं सांगितलं. तिचा शोध घेण्यासाठी एक बिनडोक डिटेक्टिव्ह हवा होता. तुमच्या त्या तद्दन चुकीच्या अनुमानांमुळे मला हवा तसा माणूस मिळाल्याचा आनंद झाला.'.. दीपक गर्वाने म्हणाला.

'पण अजून तुम्ही पसार कुठे झाला आहात?'
'आता काय बाकी राहीलंय? आम्ही तुम्हाला इथे बांधून ठेवणार आणि पळून जाणार. जाताना पैसे हवाला तर्फे तिकडे पाठवणार.'.. दीपक निर्वाणीच्या सुरात म्हणाला.
'म्हणजे आता सगळं नियतीच्या हातात आहे तर!'.. उत्तम जोरजोरात कंबर हलवत म्हणाला. त्यामुळे त्याच्या पँटच्या आत मांडीला चिकटलेली रबरी पाल सटकून पायावर घसरली. ती त्याने तनुजाच्या अंगावर उडवली. कुठलीही बाई पालीला घाबरतेच तशी तनुजाही घाबरली आणि किंचाळली. नियतीने त्याच वेळेस तिच्यावर झडप घेऊन पिस्तुल हस्तगत केलं आणि कराटेचे तडाखे मारत दोघांना जायबंदी केलं. मग त्या दोघांना यथावकाश पैशासकट लाचलुचपत अधिकार्‍यांच्या हवाली केलं.

------***-----------***---------

एक मोठा मासा पकडून दिल्याबद्दल लाचलुचपत खात्याकडून त्या दोघांना एक घवघवीत बक्षीस मिळालं.
'चला थोडे फार पैसे तरी सुटले, नाही का?'.. उत्तम खुशीत नियतीला म्हणाला.
'तसे मी थोडे फार त्या ब्रीफकेस मधून ढापले होते. म्हणजे आपली फी ठरली होती तितकेच हं!'.. नियती निर्विकारपणे पेपर वाचीत म्हणाली.. 'आयला! हे बघ काय!'
'काय?'
'अनुजा देशमाने नावाच्या मुलीची सुटका केल्याची बातमी आहे. अगदी दीपकने सांगितलेली सेम ष्टोरी!'

आणि दोघांनी एकमेकांकडे पहात आ वासला.

-- समाप्त --