Thursday, November 15, 2018

इकडंच ... तिकडंच!

इंग्लंडच्या राजाराणीच्या स्वागताप्रित्यर्थ गेटवे ऑफ इंडिया बांधला तसा सहार विमानतळ तमाम आयटीच्या लोकांच्या परदेशगमनाप्रित्यर्थ गेट आउट ऑफ इंडिया म्हणून बांधलाय की काय अशी शंका येण्याइतपत बाहेर जाणार्‍यांची संख्या वाढायला लागलेली होती. 'तो' काळ म्हणजे बिल गेट्स घरोदारी डेस्कटॉप असण्याची स्वप्न बघत होता तो काळ, भारतातून बाहेर जाताना फक्त ५०० डॉलर नेता यायचे तो काळ, विमानात/ऑफिसात बिनधास्तपणे सिगरेटी पिता यायच्या तो काळ, परदेशी जाणार्‍यांकडे आदराने बघायचा काळ, नंबर लावल्यावर फोन / गॅस मिळायला ४/५ वर्ष लागायची तो काळ!!

त्या काळी भाड्याने प्रोग्रॅमर परदेशी पाठवून पैसे कमविणे हा झटपट श्रीमंत होण्याचा एक मार्ग होता. आमची कंपनी पण त्यात घुसायच्या प्रयत्नात होती. पण प्रोग्रॅमर ट्रॅफिकिंग मधे बर्‍याच कंपन्यांनी आधी पासून जम बसविलेला असल्यामुळे घुसणं अवघड होतं. आमचे सीव्ही पॉलिश करून पाठवले जायचे. कुणाचाही सीव्ही वाचला तरी सारखाच वाटायचा.. आम्ही सगळेच टीम प्लेयर, हार्ड वर्किंग, गुड कम्युनिकेशन स्किल्स असलेले उत्कृष्ट प्रोग्रॅमर होतो. त्यामुळे कुणाला घ्यावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असणार. म्हणुनच एका अमेरिकन कंपनीनं आमचा 'सी' प्रोग्रॅमिंग वर टेलिफोन इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं. ज्याचा इंटरव्ह्यू असेल त्यानंच फक्त खोलीत असणं त्यांना अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात आम्ही सगळेच खोलीत होतो. फोन लावल्यावर बॉस त्यांच्याशी थोडं बोलला मग पहिल्या कँडिडेटला बोलवून आणतो म्हणाला. मग थोडा वेळ फोन नुसताच धरून त्यानं कँडिडेट आत आला असं सागितलं. नंतर मी बाहेर जातो असं खोटं सांगून तो तिथेच बसून राहीला. इंटरव्ह्यूला कंपनीतला एक चांगला 'सी' येणारा पण होता, त्याचं नाव चंदू! प्रश्न विचारला की तो त्याचं उत्तर कागदावर लिहायचा आणि कँडिडेट वाजपेयी स्टाईल पॉज घेत घेत वाचून दाखवायचा. अशी आम्ही सगळ्यांनी एक्सपर्ट सारखी उत्तरं दिली. चंद्याचा इंटरव्ह्यू चालू असताना मला शिंक आली. ती मी खूप दाबली आणि बाकीच्यांनी हसू दाबलं तरी आमच्या बनावाचा बल्ल्या झालाच. त्यांनी कुणालाच घेतलं नाही. चंद्यानं माझ्यावर डूख धरला. नंतर तो दुसर्‍या कंपनीतून अमेरिकेत गेला.

एका जर्मन कंपनीला त्यांचे 'सी' मधे लिहीलेले प्रोग्रॅम एका प्रकारच्या कंप्युटरवरून दुसर्‍या प्रकारच्या कंप्युटरवर हलविण्यासाठी माणसं हवी होती. प्रोग्रॅमिंगचं काम हे नखांसारखं आहे. कायम वाढतच असतं. त्यामुळेच जगातली प्रोग्रॅमिंगची कामं कधी संपणं शक्य नाहीत. बॉसने कोटेशन देण्याअगोदर एक प्राथमिक अभ्यास करायचं पिल्लू सोडलं. दोन माणसांनी तिकडं जायचं त्यांच्या एका छोट्या प्रोग्रॅमचा आणि कंप्युटरांचा अभ्यास करून परत यायचं. गंमत म्हणजे त्यांनाही ते पटलं. चंद्या गेलेला असल्यामुळे जाणार्‍यात माझी वर्णी लागली. फक्त  १० दिवसांसाठीच जायचं होतं तरी काय झालं? पुण्याच्या बाहेर फारसं न पडलेल्या मला ते प्रकरण 'जायंट स्टेप फॉर अ मॅन काईंड' इतकं गंभीर होतं! माझ्यासारख्या गरीब मध्यमवर्गातल्या न्यूनगंड भारित पोरामधे आत्मविश्वास हा पुण्याच्या वाहतुक शिस्ती इतका दुर्मिळ! त्यातल्या त्यात जमेची गोष्ट म्हणजे माझ्या बुडत्या आत्मविश्वासाला बरोबर असणार्‍या सहकार्‍याच्या काडीचा आधार असणार होता.. त्याचं आडनाव दांडगे पण अंगापिडाने अगदीच खिडुक! तसा मीही खिडुकच होतो पण माझं नाव दांडगे नव्हतं इतकंच! आपल्याकडे विसंगत नावं ठेवण्याची पद्धत खूप जुनी असली पाहीजे नाहीतर 'नाव सोनुबाई.....' सारख्या म्हणी आल्या नसत्या.

विमानतळ नवीन, विमान प्रवास नवीन, देश नवीन, भाषा नवीन आणि माणसं नवीन... इतक्या सगळ्या नाविन्य पूर्ण गोष्टींच्या विचारांची गर्दी होऊन डोक्याची चेरापुंजी झाली. त्यातल्या त्यात एप्रिल मधे जायचं असल्यामुळे थंडीची भीति नव्हती इतकंच. तिकडे जायचंय म्हणून परवडत नसतानाही एखादा सूट घ्यावा काय या विचाराला 'हॅ! १० दिवसांसाठी कशाला हवाय?' अशा कोकणस्थी खोडरबरानं पुसलं. नाईलाजाने मग जवळचे त्यातल्या त्यात बरे कपडे आणि बाबांचे दोन जुने कोट कोंबले! बाबा स्थूल असल्यामुळे मी तो कोट घालून आलो की बुजगावणं चालत आल्यासारखं वाटायचं. अशा जाम्यानिम्यात चार्ली चॅप्लीननं मला पाहीलं असतं तर तो अंगाला राख फासून हिमालयात तपश्चर्येला बसला असता! माझं साहेबी पोशाखाचं ज्ञान कोटावर बूटच हवेत या पलिकडे नव्हतं म्हणून बूट मात्र घेतले. कोटावर चप्पल घालणं रेनकोटावर शर्ट घालण्याइतकं विसंगत वाटायचं मला! शाळेत १५ ऑगस्ट/२६ जानेवारी सारख्या सणांना पांढरं पॉलिश फासून घालायच्या कॅनवासच्या बुटां पलिकडे माझं बौटिक ज्ञान नव्हतं. त्यामुळे परत आल्यावर वापरता येतील असे कॅज्युअल बूट घेऊन आलो. एक नवी सुटकेस ही घेतली कारण आमच्या घरात होल्डॉल आणि ट्रंका सोडता सामान भरण्यायोग्य काही नव्हतं. होल्डॉल आणि ट्रंक घेऊन विमानतळावर जाणं म्हणजे सोवळं नेसून पळी पंचपात्र घेऊन चिकन आणायला जाणं हो! होल्डॉल आणि ट्रंक घेऊन बावळटासारखा चेकिनला उभा राहीलो असतो तर मला तिथल्या बाईनं तिकीट बिकीट न बघता सरळ यष्टी ष्ट्यांडवर पाठवलं असतं.

थोडं फार जर्मन समजावं व बोलता यावं म्हणून कंपनीनं जर्मनच्या क्रॅश कोर्सचा घाट घातला. क्रॅश कोर्सने कुणालाही कोणताही विषय शिकविता येतो असा सर्व कंपन्यांचा समज आहे. डिग्रीत जे मिळत नाही ते क्रॅश कोर्स कसं देणार? विमान चालविण्याचा क्रॅश कोर्स विमान क्रॅश करण्याचा कोर्स होणार नाही का? या बाबत क्रॅश कोर्स विकणार्‍यांच्या मार्केटिंगचं कौतुक करायला पाहीजे मात्र! उद्या ते '८ दिवसात घडाघड वेद म्हणायला शिका' अशी जाहिरात करून कोर्स काढतील आणि त्याला अनेक रेडे येतील. असो, माझ्या खिशातली कॅश जाणार नसल्यामुळे मी तक्रार केली नाही. दरम्यान, आमच्या फ्यॅमिलीतला मी पहिलाच परदेशी जाणारा असल्यामुळे नातेवाईकांनी माझं केळवण करायचा चंग बांधला. हो! चक्क केळवण! एका नातेवाईकानं माझं केळवण करून जाहिरात केल्यावर बाकीच्यांना पण ऊत आला. पिअर प्रेशर, दुसरं काय?

मधेच कुणी तरी पासपोर्ट वर 'Emigration check not required' असा शिक्का पाहीजे असं पिल्लू सोडून जोडीला आपल्या अमक्या तमक्याला तो शिक्का नसल्यामुळे कसं विमानतळावरून परत यावं लागलं याचं तिखटमीठ लावून वर्णन केलं. तेव्हा immigration आणि emigration यातला फरक समजण्या इतका अनुभव गाठीशी नव्हता! शिवाय दोन्हींचे उच्चार सारखेच असल्यामुळे एक अमेरिकन स्पेलिंग असणार याची खात्रीच होती मला! आमच्या दोघांच्या पासपोर्टांवर तो शिक्का नव्हता. लोकांनी एजंटाकडे द्यायचा सल्ला दिला. एकंदरित लोकांची एजंटावर मदार फार! नशीब ते स्वत:च्या लग्नाला एजंटाला उभा करत नाहीत. पण आम्ही बाणेदारपणे स्वतःच ते करायचं ठरवलं आणि झक मारत पहाटेच्या गाडीनं मुंबई गाठली, कारण ते ऑफिस १२ वाजेपर्यंतच अर्ज घ्यायचं. रीतसर विविध रांगांमधे उभे राहून एकदाचा तो फॉर्म भरला. ८ दिवसांच्या आत पासपोर्ट घरी आल्यावर मला काही लोकांनी त्यांच्या पासपोर्ट संबंधीची कामं करून देण्याबद्दल विचारणा केली.

वेगवेगळ्या आघाड्यांवर लढता लढता अखेरीस जायचा दिवस आला. रात्री दीडच विमान होतं. एशियाडनं मुंबईला जायला तेव्हा कितीही वेळ लागू शकायचा कारण रस्त्यालाही पदर असू शकतात हे कुणाच्या गावी नव्हतं आणि मोठे रस्ते बांधण्यातसुद्धा पैसे खाता येतात हे ज्ञान मंत्र्यांना झालेलं नव्हतं. त्यामुळे इंद्रायणीने दादरला उतरून टॅक्सीनं विमानतळ गाठला. पुढे नक्की काय करायचं ते माहीत नव्हतं. एस्टी आणि रेल्वेच्या प्रवासाचा अनुभव कुचकामी होता. आत जायला एअरलाईनींच्या नावानुसार गेटं होती. प्रत्येक गेटावर पोलीस तिकीट आणि पासपोर्ट बघून आत सोडत होते. भलत्याच गेटनं आत गेलो तर भलत्याच प्लॅटफॉर्मला लागू ही भीती होती. मग विमानतळा बाहेर थांबलेल्या अनंत लोकांकडे तुच्छतेची नजर टाकून एअर इंडियाच्या गेटातून रुबाबात आत गेलो. आत गेल्यावर समजलं की कुठल्याही गेटानं आत आलो असतो तरी काहीही फरक पडला नसता. आत बर्‍याच जणांकडे सामानांची बोचकी दिसल्यावर माझ्या होल्डॉलकडे बघून कुणी नाकं मुरडली नसती. करोनी देशाटन, चातुर्य येतं ते हेच असावं!

विमानतळावरची प्रत्येक गोष्ट चातुर्यात भर टाकत होती. त्या काळात कॅमेरा, दागिने इ. ड्युटीचुंबक गोष्टी (लॅपटॉप जन्मले नव्हते) भारता बाहेर न्यायच्या असतील व येताना परत घेऊन यायच्या असतील तर कस्टम मधे जाहीर करावं लागायचं. नाही तर येताना ड्युटी किंवा लाच द्यावी लागायची. जाहीर केल्यावर एक पावती मिळायची ती परत येताना कस्टम मधे दाखवायची की झालं! माझ्याकडे नातेवाईकाकडून मोठ्या मिनतवारीने आणलेला एक जुनापाना कामचलाऊ कॅमेरा होता. तो मी मोठ्या हुशारीने जाहीर करायला गेल्यावर तिथल्या कारकुनाने त्यावर ओझरती नजर फेकून 'काही गरज नाही' असं सांगितलं. मला अर्थातच तो त्यांचा लाच उकळायचा डाव वाटला. आता कॅमेरा जाहीर करून घेण्यासाठी लाच द्यावी की काय या संभ्रमात असताना त्यानं कॅमेरा खूप जुना आहे येताना कुणी विचारणार नाही अशी ग्वाही दिल्यावर मी तिथं घुटमळणं सोडून दिलं.

मग मी टॉयलेटच्या तपासणीला गेलो. कारण 'A station is known by the toilet it keeps' असं मला वाटतं. मनाची पूर्ण तयाची करून आत पाऊल ठेवलं आणि थक्क झालो. तो पर्यंत भारताच्या कुठल्याही स्टेशनवर इतकं स्वच्छ टॉयलेट मी पाहीलेलं नव्हतं. घाण वास नाही, काही तुंबलेलं नाही, चालू स्थितीतले नळ, सुस्थितीतले पाईप, कुठे जळमटं धूळ कळकटपणा नाही हे पाहिल्यावर मला विमानतळाबद्दल वाटायला लागलेला आदर नंतर फ्रँकफर्टचं टॉयलेट पाहिल्यावर 'प्रगतीला वाव आहे' मधे बदलला. मी बाहेर आल्या नंतर भारलेल्या नजरेनं माझी निरीक्षणं चालू ठेवली तेव्हा दांडगे टॉयलेटला गेला. परदेशी बायकांचे कपडे तर तोकडेपणाचा कळस होते, अगदी पायातले मोजेसुद्धा तोकडे? नाहीतर आमची हेलन! कॅबेरेतही स्किनकलरचे का होईना पण अंगभर कपडे घालायची हो! बिनधास्तपणे सिगरेटी फुंकणार्‍या व दारू पिणार्‍या बायका फक्त सिनेमातच नसतात हे मौलिक ज्ञान तेव्हाचच!

जागोजागी लावलेल्या फलकांवर कुठलं विमान कधी आणि कुठल्या गेटवरून उडणार ते पाहून मी थक्क झालो. एस्टी स्टँड सारखं 'सव्वा ११ची मुंबई कोल्हापूर मुतारीच्या बाजूला उभी आहे. प्रवाशांनी लाभ घ्यावा!' हे निवेदन ११ वाजून २० मिनिटांनी करून प्रवाशांची दाणादाण करायची भानगड इथे नव्हती. आमची एअर इंडियाची फ्लाईट ४० मिनिटं उशीरा उडणार होती. एअर इंडियानं मात्र त्यांच्या 'या' कामगिरीत अजूनही सातत्य राखलं आहे मात्र! 
'मामानं टॉयलेट मधे २० डॉलर मागितले'.. दांडगे परत येऊन म्हणाला.
'आँ! कशाबद्दल?'.. दांडगेनं खांदे उडवले.
'तू दिलेस?'
'हो!'
'का?'.. परत दांडगेनं खांदे उडवले.
'अरे! नाही द्यायचे!'.. हा माझ्या आत्मविश्वासाचा बुडबुडा! त्याच्या ऐवजी मी असतो तर मीही मुकाटपणे दिले असते. मी मात्र विमान सुटेपर्यंत टॉयलेट मधे न जायचा निर्णय घेतला. उरलेला वेळ दुकानातल्या वस्तूंच्या डॉलर मधल्या अचाट किमती बघून आ वासून डोळे विस्फारण्यात गेला. डॉलर मोजून चहा कॉफी पिणार्‍यांचा आदर करीत गेटावरून विमानाच्या अद्भुत दुनियेत आलो. अगदी काळाची टेप फास्ट फॉरवर्ड करून पाहीलेल्या जगाइतकं अद्भुत! नेहमी बसायची नाहीतर पाठ टेकायची फळी निघालेली शिटं बघायची सवय झालेल्या मला सगळी स्वच्छ, रंग न उडालेली व न डगमगणारी शिटं पाहून कससंच झालं. विमानातलं टॉयलेट तर अफलातून! एव्हढ्याश्या जागेत आवश्यक सर्व गोष्टी इतक्या खुबीने आणि चपखलपणे बसविणार्‍या डिझायनरचं कौतुक वाटलं! विमानाच्या तिकीटात सिनेमे, दारू आणि खाणं समाविष्ट असणं ही तर सुखाची परिसीमा!

फ्रँकफर्टला विमान उतरल्यावर आम्हाला अजून एका विमानातून पुढचा प्रवास करायचा होता. ते विमान सुटायला तीन तास अवकाश होता. इतर लोक त्यांच्या बॅगा बेल्ट वरून उचलत होते. 'आपलं सामान दुसर्‍या विमानात ते हलवतील' असं म्हणत तिकडे जाणार्‍या दांडगेला मी रोखलं. आमच्या विमानाचं गेट लागायचं असल्यामुळे आम्ही एका बेंचवर टाईमपास करत बसलो. अर्ध्या तासा नंतर दांडगेला राहवलं नाही, तो मला हट्टाने बॅगांच्या बेल्टपाशी घेऊन गेला. तिथे एका कोपर्‍यात आमच्या बॅगा दीनवाण्या नजरेनं उभ्या असलेल्या सापडल्या. हेच जर सध्याच्या काळात घडलं असतं तर अख्खा विमानतळ खाली करून आम्हाला दहशतवादी म्हणून आत टाकलं असतं. पुढचं विमान एकदम चिमणं होतं. जेमतेम १४ सिटं. १  X १ अशी सिटांची रचना! बसल्या जागेवरून आम्हाला पायलट आणि त्यांचे स्क्रीन दिसत होते. हवाईसुंदरी वगैरे भानगड नाही. विमान उडाल्यावर एका पायलटनेच सँडविच व पेयं असलेली एक टोपली मागे ढकलली. सेल्फ सर्व्हिस! त्यावर बाकीचे प्रवासी तुटून पडले तरी चारचौघात हावरटासारखं घ्यायचं नाही ही शिकवण असल्यामुळे मी उगीचच थोडंस घेतल्यासारखं केलं. 

ते विमान उतरलं तो विमानतळही छोटाच होता. विमानातून उतरायला एक शिडी लावली. मी खाली उतरायला शिडीवर उभा राहीलो आणि अति गारव्यामुळे पोटरीत गोळा आला. मला उतरणं मुश्कील झालं. एप्रिल मधे किती थंडी असून असून असणारे असा विचार करून कुठलेही गरम कपडे न घेता मी बिनधास्तपणे आलो होतो. कुणाला माहिती होतं यांची एप्रिलची थंडी पुण्याच्या डिसेंबरतल्या पेक्षा जास्त असते ते? पुण्याच्या गारव्याला थंडी म्हणणं म्हणजे शॉवरला मुसळधार पाऊस म्हणण्यासारखं आहे. मनातल्या मनात बापुजींना नमस्कार केला व पाय चोळत चोळत कसाबसा खाली उतरलो. न्यायल्या आलेल्या गाडीतून हॉटेलवर जाताना हिरव्या झाडीनं गच्च भरलेल्या टेकड्या पाहिल्यावर वाटलं आपल्याकडे 'रिकाम'टेकड्यांचं प्रस्थ जास्त आहे. हिरव्या रंगाच्या किती त्या छटा! वा! गाडीचा स्पीडोमीटर अधून मधून मी पहात होतो. विमानतळावरून बाहेर पडताना तिचा वेग ६० किमी होता तो हायवे लागल्यावर  २०० किमीच्या पलिकडे गेलेला पाहून मी त्याहून जास्त वेगाने देवाचा धावा करायला लागलो. डेक्कन क्वीनपेक्षा जोरात जाणारी गाडी असू शकते हे तेव्हा माझ्या गावीही नव्हतं.

रात्री जेवायला जाण्यासाठी खोलीच्या बाहेर पाऊल ठेवलं आणि एकदम लॉबीतले दिवे लागले. कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवली आहे की काय असं वाटून मी दचकलो. नंतर लक्षात आलं की ते लॉबीत हालचाल झाली की आपोआप लागणारे होते. हॉटेलातल्या १/२ लोकांना इंग्रजी येत होतं म्हणून हॉटेलातच खायचं ठरवलं. पण ते दर वेळेला हजर असण्याची गॅरंटी नव्हती. इकडचे वेटर आणि वेटरिणी आपण टेबलावर बसल्यावर हसतमुखानं स्वत:ची ओळख करून देतात व पहिल्यांदा काय पिणार म्हणून विचारतात. आमच्याकडचे वेटर कंटाळलेल्या चेहर्‍यानं आपण टेबलावर बसल्या बसल्या कळकट बोटं बुचकळलेला पाण्याचा ग्लास आणि मेन्यू समोर आपटतात. अमृततुल्यात तर 'फडका मार रे बारक्या!' असा मालकानं आवाज दिल्याशिवाय टेबल पण पुसायची तसदी घेतली जात नाही. इकडे आल्यावर पहिल्यांदा समजलं की दारू किंवा ज्यूस या जेवणाबरोबर प्यायच्या गोष्टी आहेत. दोन तीन दिवस करून बिअर बरोबर जेवलो. पण पाणी ते पाणीच! मग मात्र सरळ पाणी मागितलं. त्यामुळे पाणी ही पण प्यायची गोष्ट असते ते वेटरला पहिल्यांदा समजलं. हॉटेलातला मेन्यू वाचण्याचा घोळ नको म्हणून आम्ही ज्या हॉटेलात रहात होतो तिथल्याच रेस्टॉरंट मधे खायचो.. कारण, तिथे दोन्ही भाषेतले मेन्यू होते.. पण, इंग्रजी मेन्यू मधे फक्त चार पाचच नावं होती. जर्मन मेन्यू मधे ढीगभर होती. काही दिवस इंग्रजी मेन्यू खाऊन कंटाळल्यावर मी जर्मन मेन्यूतलं खाण्याचा धाडशी निर्णय घेतला. उच्चार करण्याची बोंबच असल्यामुळे मी वेट्रेस आल्यावर जर्मन मेन्यूवर एका ठिकाणी बोट ठेवून आत्मविश्वासाने ऑर्डर ठोकली. जे आलं ती स्वीट डिश होती. ते गिळून झाल्यावर मेनूच्या दुसर्‍या भागात बोट ठेवलं. जे आलं तो मेन कोर्स होता. पण स्वीट डिशनंतर मेन कोर्स खाणारा म्हणून आजुबाजूच्या गिर्‍हाईकांची फुकटची करमणूक मात्र केली.

दांडगे पक्का शाकाहारी होता. त्याला कंपनी म्हणून १/२ दिवस सॅलड नामक पालापाचोळा खाल्ला. 'त्या' काळी शाकाहारी जेवण असू शकतं याची त्यांना कल्पना नव्हती आणि बाहेर शाकाहारी मिळायचा वांधा असतो याची आम्हाला! रिसेप्शन मधे एका टोपलीत फळं ठेवलेली असायची. मला आधी तो डेकोरेशनचा प्रकार वाटला. भुकेलेल्या दांडगेनं न राहवून एकदा रिसेप्शनिस्टला विचारल्यावर फळं घेण्यासाठीच ठेवली आहेत हे समजलं. असं काही दांडगेच करू जाणे! माझं काही तिला विचारायचं धाडस झालं नसतं. आणखी काही दिवस सॅलड खाल्लं तर मी बकरीसारखा बँ बँ करायला लागेन अशी भीती वाटल्यामुळे मी सर्रास चिकन वगैरे मागवायला लागलो तो पर्यंत त्याची मशरूम आमलेट पर्यंत प्रगती झाली. आणखी दोन दिवसानंतर त्याची विकेट पडली व तो ही बिनधास्त चिकन मागवायला लागला.

दुसर्‍या दिवशी त्यांच्या ऑफिसात गेलो. कुठं ते भलं मोठ्ठं ऑफिस व प्रचंड कार पार्क आणि कुठं ते आमचं एका तिमजली बिल्डिंग मधल्या बारक्या फ्लॅट मधलं! काही तुलनाच नाही. कार्ड सरकवून ऑफिसची दारं उघडायची आयडिया तर भन्नाट! आमच्या पुण्याच्या ऑफिसच्या किल्ल्या २/३ लोकांकडेच असायच्या. त्यातला एक जण येईपर्यंत झक मारत बाहेर उभं रहायला लागायचं. तिथे आम्हाला एक खोली मिळाली, त्यात आम्हाला लागणारं सगळं होतं. आठवडाभर इथे बसून त्यांच्या कोडवर डोकं आपटायचं होतं! कोड बघून मात्र तोंडाला फेस आला. आधीच दुसर्‍याचा कोड वाचणं ही शिक्षा असते. मला तर मी लिहीलेलाच कोड काही दिवसांनी समजत नाही. आणि त्यात जर्मन मधे कॉमेंट व व्हेरिएबलची नावं असलेला कोड म्हणजे तर काळ्या पाण्याची शिक्षा! अर्थात कोड दुसर्‍या कंप्युटरवर नेण्यासाठी सगळा समजण्याची गरज नव्हती. जो कोड दुसर्‍या कंप्युटरवर जसाच्या तसा चालणार नाही तोच फक्त समजण्याशी मतलब होता. सुदैवाने मला त्यांच्या कोडमधे काही चुका दिसल्या. अशा चुका चंद्या माझ्या कोड मधून नेहमी काढायचा. म्हणतात ना दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं इ. इ.? पण त्या चुकांमुळे मला त्यांच्यात आणि माझ्या कुवती मधे एक प्रचंड दरी आहे असं जे वाटत होतं ते कमी झालं. हे जाणवलं की सगळे कोडगे एका माळेचे मणी!

दरम्यान जर्मन ऑफिस मधल्या एकानं, फ्रेडीनं, नवीन गाडी घेतली म्हणून सगळ्यांना पार्टी द्यायचं ठरवलं. त्याकाळी भारतात घरी गाडी असणं म्हणजे अति श्रीमंतीचं लक्षण! खाजगी गाडीत बसण्याचा अनुभव नाहीच त्यामुळे! तो आम्हाला स्वतःच्या गाडीतून पार्टीला घेऊन जाण्यासाठी आला. आम्ही दोघेही मागे बसायला लागल्यावर त्यानं मला पुढे बसायला सांगितलं. त्या पार्टीत एक बाई तिच्या फॅमिली बद्दल सांगत होती. ती आणि तो कसे शाळेत बरोबर होते पण तेव्हा कसं त्यांना एकमेकांबद्दल प्रेम वाटत नव्हते. मग एका पार्टीत कसे भेटले, आता किती मुलं आहेत इ. इ. मी मधेच नाक खुपसलं.. मग लग्न केव्हा झालं? तर ती एकदम दचकली आणि माझ्याकडे 'लग्न म्हणजे काय असतं?' अशा चेहर्‍यानं बघत मान या कानापासून त्या कानापर्यंत हलवत म्हणाली... 'नोssssss! वुई आरन्ट मॅरीड!' बों ब ला! बाकी परदेशी गेल्यावर सांस्कृतिक धक्के आणि शिष्टाचारौत्पाताला ऊतच येतो! पार्टी नंतर परत हॉटेलवर जाण्यासाठी कंपनीची गाडी आली होती. फ्रेडी पण टाटा करायला आला. मी पुढे बसायला निघालो तर त्यानं मला मागे बसायची खूण केली. मी खलास! त्याला विचारल्यावर तो म्हणाला 'अरे गाडी शोफर चालवणार असेल तर मागे नाहीतर पुढे!

आम्ही संध्याकाळी गावात चक्कर मारीत असू. तिथली दुकानं तिथले भाव असं बघत फिरायचो. न्हाव्याच्या दुकानातले भाव बघून वाटलं इथला न्हावी केस आणि खिसा एकदमच कापतो की काय? क्रॅश कोर्सनं मला एक दोन जर्मन वाक्यं पढवली होती. त्यातलं एक म्हणजे 'मला जर्मन बोलता येत नाही' हे होतं. लहानपणी आपण कसं मुंगूस दिसल्यावर 'मुंगसा! मुंगसा! तोंड दाखव नाही तर तुला रामाची शप्पथ आहे' असलं काहीतरी म्हणायचो तसं मी ते ठेवणीतलं वाक्य कुणी जर्मन मुंगूस अंगावर आलं की फेकायचो. एकदा धीर करून एका दुकानात काय आहे ते बघायला गेलो तर तिथली बाई जर्मन भाषेत फाडफाड काहीतरी बरळली. मी 'मला जर्मन बोलता येत नाही' हे घाईघाईनं तिच्यावर फेकलं. आता ती तोडक्या मोडक्या इंग्रजीत बोलेल अशी माझी अपेक्षा होती.. पण तिने ती मगाचीच जर्मन वाक्यं डेक्कन क्वीनच्या स्पीड ऐवजी बार्शी लाईटच्या स्पीडनं टाकली. मी बधीर! मग उगीचच मान हलवून समजल्यासारखं 'या! या! डान्क! डान्क!' असं म्हणत तिथून सटकलो.

परतीच्या प्रवासासाठी भल्या पहाटे उठून गाडीनं विमानतळाकडे निघालो. येताना दिसलेले हिरवे कंच डोंगर जाताना धुक्याचा मफलर मानेभोवती गुंडाळून एकटक समोर बघत बसलेल्या म्हातार्‍यासारखे दिसत होते. परतीच्या प्रवासात चेकिनसुंदरीनं एका सरदारजीचं जास्तीचं सामान आमच्या नावावर घ्यायची विनंती केली ते सोडता विशेष काही घडलं नाही. मुंबईत उतरल्या उतरल्या तो विशिष्ट दर्प नाकात शिरताच मला अगदी तुरुंगवासातून सुटका झाल्यासारखं मोकळं मोकळं वाटलं. मार्केटिंग मॅनेजरनं आम्हाला सापडलेल्या चुकांचं भांडवल करून प्रोजेक्ट मिळवल्याचं सांगितलं तेव्हा माझ्या अंगावर जे मूठभर मांस चढलं ते अजून उतरलेलं नाहीये!

== समाप्त ==

1 comment:

ganesh said...

Very nice but too lengthy... need some editing..otherwise well written...