Monday, October 29, 2018

आर्किमिडीजचा स्क्रू!

आर्किमिडीजचं नाव घेतलं की बहुतेकांना त्याचा शोध नक्की काय होता ते भले सांगता येणार नाही पण तो नग्नावस्थेत युरेका! युरेका! (खरा उच्चार युरिका आहे म्हणे) ओरडत रस्त्यातून पळाला होता हे डोळ्यासमोर नक्की येईल! पाठ्यपुस्तकं रंजक करण्यासाठी ज्या गोष्टी घालतात नेमक्या त्याच जन्मभर लक्षात रहातात. असो! आर्किमिडीजने बरीच उपयुक्त यंत्रं बनविली त्यातलंच एक आर्किमिडीजचा स्क्रू आहे!

आर्किमिडीजचा स्क्रूचा वापर करून पाणी वर खेचता येतं! आर्किमिडीजचा स्क्रू हा एक मोठ्या आकाराचा स्क्रूच आहे. त्याचं एक टोक पाण्यात बुडवून तो फिरविला की पाणी त्या स्क्रुच्या आट्यातून वर वर येतं. चित्र-१ मधे पाणी वर चढविण्यासाठी एक मुलगा पायाने तो स्क्रू फिरवतो आहे.

आर्किमिडीजचा स्क्रू: एक बागेतलं खेळणं

चित्र-१: आर्किमिडीजचा स्क्रू कसा चालतो ते समजण्यासाठी केलेलं फॉलकर्क या स्कॉटलंड मधील गावातल्या एका बागेतलं खेळणं.

या उलट पाणी स्क्रू मधून सोडलं की स्क्रू फिरायला लागतो. या तत्वाचा वापर केला आहे वीजनिर्मितीसाठी! अशा पद्धतीच्या उलट सुलट क्रिया प्रक्रिया तंत्रज्ञानात इतरत्र पण वापरल्या गेल्या आहेत. उदा. तारेच्या भेंडोळ्याने चुंबकीय क्षेत्र छेदलं की तारेत वीजप्रवाह निर्माण होतो. याचा उपयोग जनित्राने वीजनिर्मिती करण्यासाठी केला जातो. तसंच तारेतून वीजप्रवाह सोडला तर तिच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जवळचा चुंबक खेचला किंवा ढकलला जातो. इलेक्ट्रिक मोटर या तत्वावर चालते.

आर्किमिडीजचा स्क्रू वापरून वीज निर्मिती

चित्र-२: आर्किमिडीजचा स्क्रू नदीतल्या बांधावर बसवून वीज निर्मिती कशी करता येते त्याची आकृती!


आर्किमिडीजचा स्क्रू पद्धतीच्या वीजनिर्मितीचे अ‍ॅनिमेशन

वीजनिर्मिती साठी स्क्रू फिरवायला पाण्याला फक्त पुरेसा दाब हवा! बांधाची उंची सुमारे १ मीटर ते १० मीटर या मधे आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग सेकंदाला सुमारे ०.०१ मीटर क्युब ते सेकंदाला १० मीटर क्युब या मधे असला की झालं. इंग्लंड मधील बर्‍याच नद्यांमधे जागोजागी बांध आधीपासून आहेत. पूर्वी बांधात अडविलेल्या पाण्याच्या जोरावर गिरण्या चालवीत असत. आता त्या बंद पडल्या असल्या तरी बांध तसेच आहेत.

ऑक्सफर्ड मधे गेल्या तीन वर्षात थेम्स नदीवरील दोन बांधांवर या तत्वावर वीजनिर्मिती सुरू झाली आहे. त्यातला पहिला प्रकल्प ऑक्सफर्ड मधील ऑस्नी गावात २०१५ मे मधे सुरू झाला. त्या प्रकल्पाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे बहुतांश भागिदार हे ऑस्नी गावातले रहिवासीच आहेत. दुसरा प्रकल्प ऑक्सफर्ड मधील सॅन्डफर्ड गावात २०१७ मधे सुरू झाला. तो ही रहिवाशांच्या भागिदारीतून उभारलेला आहे. सॅन्डफर्ड येथील बांधाची उंची ७ मीटर इतकी आहे. यातून प्रति वर्षी १.६ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होऊ शकते. सॅन्डफर्ड मधे एका शेजारी एक असे तीन स्क्रू बसविलेले आहेत. चित्र-३ पहा. 

सॅन्डफर्ड येथील तीन स्क्रू

सॅन्डफर्ड येथील तीन स्क्रू

चित्र-३: सॅन्डफर्ड मधे बसविलेले तीन आर्किमिडीजचे स्क्रू
प्रत्येक स्क्रू महाकाय आहे. एकेका स्क्रूचं वजन २२ टन आहे. चित्र-४ पहा.

महाकाय स्क्रू

चित्र-४: सॅन्डफर्ड मधील एका आर्किमिडीजचा स्क्रू चा आकार

आर्किमिडीजचा स्क्रूचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे तो प्रवाहाच्या दिशेने जाणार्‍या माशांना कुठल्याही प्रकारचा अडथळा करीत नाही. वरील व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे मासे स्क्रू मधील पाण्या बरोबर सहजपणे वहात वहात जाऊ शकतात. प्रवाहाच्या उलट दिशेने जाणार्‍या माशांसाठी सर्व धरणांच्या बाजूला एक खास पाण्याचा प्रवाह ठेवलेला असतो त्याला फिश लॅडर म्हणतात. दर वर्षी उन्हाळ्यामधे सालमन मासे समुद्रातून नद्यांमधे प्रजननासाठी येतात. त्यांना काय खुजली असते काय माहिती! पण ते बारक्या सारक्या अडथळ्यांना न जुमानता प्रवाहाच्या विरुद्ध जातात. खालील व्हिडिओत ते छोट्या छोट्या धबधब्यांवरून सरळ उड्या मारत जाताना दिसतील.


तसंच अतिवृष्टी मुळे नदी जवळच्या रस्त्यावरून पाणी वहात असेल तर ते रस्ता ओलांडायलाही कचरत नाहीत.


माशांना धरणाच्या बाजूने वर जायला रस्ता आहे हे कसं समजतं ते देवाला ठाऊक! पण त्यांना तो सापडतो हे मात्र खरं आहे. हे सर्व उपाय एका विशिष्ट आकारापर्यंतच्या माशांसाठी ठीक आहेत म्हणा! अगदी मोठ्या आकाराचे मासे नदीच्या खाडीत फार फार तर येतात पुढे जात नाहीत. सप्टेंबर २०१८च्या शेवटी एक बेलुगा जातीचा देवमासा लंडन मधे थेम्स नदीत ४/५ दिवस घुटमळत होता. अर्थातच तो चुकला होता.

-- समाप्त --

Tuesday, October 23, 2018

ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या....

'दिवाळीचा काय प्लॅन आहे रे बंड्या?'.. अष्टपुत्रेंनी आठव्यांदा विचारल्यावर बंड्या 'पुण्याला जायचा विचार आहे' असं गुळमुळीतपणे पुटपुटला. त्याला कारण तसंच होतं. अष्टपुत्रेंना विषय मिळायचा अवकाश की ते त्यावर तासनतास ब्रेथलेस गाण्यासारखे बोलू शकायचे. पण त्यांना टाळता येणं शक्य नव्हतं. कारण त्याच्या गावात मराठी टाळकी कमी असल्यामुळे कुठल्याही समारंभात तीच तीच पुनःपुन्हा भेटायची. इंग्लंडातली मराठी मंडळी चक्क एकमेकांना धरून असतात हे समजलं तर अखिल महाराष्ट्रातले कट्टर मराठी झीट येऊन पडतील. असो! पण बंड्याच्या चावीमुळे लंडन पुणे प्रवासावरचा त्यांचा हातखंडा एकपात्री प्रयोग सुरू झाला!

'मी सांगतो तुला बंड्या! सकाळच्या विमानाने अजिबात जाऊ नकोस.'
'क क का? तिकीट स्वस्त आहे!'.. बंड्याचा चेहरा पडला.
'अरे असं किती स्वस्त असणारे? फार तर फार १५ पौंड! पण कटकट बघ किती होते. सकाळी ९ च्या आसपास विमान असतं म्हणजे ७ च्या सुमारास हिथ्रोवर पोचायला हवं! इथून हिथ्रोला जायला दीड तास तरी लागतोच लागतो. म्हणजे साडे पाचला निघायला हवं! त्यासाठी ४/४:३० ला उठायचं म्हणजे किती कटकट! इतकं करून मधे कुठे ट्रॅफिक जॅम होत नाही ना याची धाकधुक! विमान पोचतं रात्री ११ च्या सुमारास! मग टॅक्सी घेऊन पुण्याला पोचेपर्यंत पहाटेचे ३ तरी वाजतातच. आपण गेल्यावर सगळे उठतात. मग चहा पाणी आणि प्रत्येक जण आपली उलटतपासणी करेपर्यंत सकाळ होते. म्हणजे झोपेचं भजं!'
'पण माझा आदल्या रात्री तिथे जवळच्या हॉटेलात रहायचा प्लॅन आहे'.. बंड्या आपल्यालाही विचार करता येतो याची चुणुक दाखवायला गेला आणि ये रे बैला करून बसला.
'आयला! तू १५ पौंड वाचवायला १०० पौंडाच्या हॉटेलात रहाणार? देशस्थ शोभतोस अगदी! हा हा हा! अर्थात मी ते पण करून बसलोय म्हणा! त्याची पण गंमत सांगतो तुला!'.. अजून जेवायला वेळ होता तो पर्यंत आख्यानातुन सुटका नव्हती.......

मी एक स्वस्तातलं हॉटेल घेतलं होतं ज्यांची हिथ्रोवर न्यायची आणायची फुकट सेवा होती. स्वस्त म्हणजे तरी ७० पौंड बरं का? मग इथून थेट हिथ्रोची बस घेऊन महाशय आदल्या दिवशी संध्याकाळी हिथ्रोच्या फलाटावर दाखल झाले. तिथून हॉटेलला गाडी पाठविण्यासाठी फोन लावला. अष्टपुत्रेंनी कानापाशी मूठ नेली.
'तू कुठे आहेस?'.. रिसेप्शनिस्ट म्हणाला.
'टर्मिनल ४ वर, अरायव्हल पाशी'
'ठीके. मी गाडी पाठवतो. गाडीचा नंबर आहे.. एक्स एल ५२ व्ही आर वाय. तू असं कर. टेक अ लिफ्ट अँड गो टू डिपार्चर गेट जी अ‍ॅज इन गॅरी'
'ओके.' तो गाडी कुठे पाठवतोय ते ऐकता ऐकता गाडीचा नंबर विसरलो. त्यांना काय सांगायचं ते तोंडपाठ असतं, ते वाघ पाठीमागे लागल्यासारखे एका दमात सगळं सांगतात, आपण त्याच दमात विसरतो.
लिफ्ट घेऊन डिपार्चर मधे आलो. ते शिंचं गेट जी काही सापडेना. इकडे तिकडे केल्यावर शेवटी तिथल्या एका कामगाराला विचारलं..
'अरे भाऊ! इथे गेट जी कुठे आहे?'
'गेट जी? असं काही नसतं. इथल्या गेटांना नंबर आहेत. एक दोन तीन असे'
म्हंटलं हा रिसेप्शनिस्ट पुरूष असूनही असं कसं भलतंच सांगतो? बाई असती तर समजू शकलो असतो मी! बायका तोंडाला येईल ते बोलतात. जिथं उजवीकडे वळायला हवं असतं तिथं खुशाल डावीकडे वळ म्हणतात.

'मी ऐकतेय हांssssss!... आतून सौंचा आवाज आल्यावर अष्टपुत्रेंनी मिष्किल हसत डोळा मारला आणि मानेनेच 'पाहिलंस?' असं विचारलं.
'मग?'.. बंड्याला त्यांचं आख्यान लवकर संपण्यात जास्त रस होता.
'मग काय? परत फोन.'.. परत कानापाशी मूठ!
'अरे बाबा! मी तो मगाच्चाच टर्मिनल ४ वाला. इथे गेट जी असं काही नाहीये रे!'
'अहो! मी गेट जी नाही म्हणालो. तुला गेट ऐवजी चुकून दुसरं काही वाटू नये म्हणून मी पहिलं अक्षर सांगितलं. जी!'.. त्या रिसेप्शनिस्टला मनातल्या मनात मी निवडक शेलक्या शिव्या हासडल्या.
'ओके. मग मी काय करू आता?'
'तू आत्ता कुठे आहेस?'
'डिपार्चर'
'लेट्स डू धिस केअरफुली नाऊ! तू अरायव्हला जा. तिथून लिफ्टने डिपार्चरला ये. मग गेट मधून बाहेर पड. तिथे बरेच बसस्टॉप दिसतील तिथे थांब'
अरे माठ्या! मी डिपार्चरलाच आहे. असं जोरात ओरडून सांगावसं वाटलं मला. म्हंटलं हा रिसेपशनिस्ट आहे की गणितज्ज्ञ?

'गणितज्ज्ञ?'... बंड्याला आपल्या क्रिकेटपटुंसारखी त्याच त्याच चुका करून आउट व्हायची सवय आहे. त्याच्या प्रश्नामुळे एक उप-आख्यान सुरू झालं.
अरे! तुला माहिती आहे का? कुठल्याही नवीन प्रश्नाचं रुपांतर ज्याचं उत्तर माहिती आहे अशा प्रश्नात करण्यामधे गणितज्ज्ञांचा हातखंडा असतो. समजा एका गणितज्ज्ञाला असा प्रश्न टाकला... तुला एक पातेलं, चहा, साखर, गॅस, दूध, पाणी इ. सगळं दिलेलं आहे. तर तू चहा कसा करशील? तर तो सांगेल.. पातेल्यात चहा, साखर पाणी घालून गॅस पेटवून त्यावर ते उकळायला ठेवेन. उकळल्यावर त्यात दूध घालून अजून एक उकळी आणेन. मग कपात चहा गाळून घेईन... मग त्याला जरा वेगळा प्रश्न टाकला.. समजा आता तुला पेटवलेल्या गॅसवर पातेलं ठेवून दिलेलं आहे. पातेल्यात चहा साखर पाणी घातलेलं आहे. तर आता चहा कसा करशील?
तर तो काय म्हणेल? पातेलं गॅसवरून उतरवेन. त्यातलं सगळं पाणी फेकून देईन. म्हणजे मग या प्रश्नाचं रुपांतर पहिल्या प्रश्नात होईल ज्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. आता बोल! हा हा हा हा हा!.. अष्टपुत्रे बेदम हसले व बंड्या कसंनुसं हसला.

'काय सांगत होतो मी?'.. अष्टेकरांनी गेट हरवल्यासारखा चेहरा केला.
'चहा कसा करायचा'
हां!.. मग एकदाचा हॉटेलवर पोचलो. स्वस्तातलं हॉटेल घेतल्यामुळे रुममधे टॉयलेट/बाथरूम नव्हतं. होतं फक्त बेसिन! पहाटे उठून जायचं असल्यामुळे रात्रीच अंघोळ उरकण्याचं ठरवलं. माझ्या मजल्यावर कुठेही बाथरूम नव्हती. शोधाशोध केल्यावर ती वरच्या मजल्यावर सापडली. कुणीतरी गेलेलं होतं. म्हणजे समजलं का? जवळपास १५ खोल्यांमधे एकच बाथरूम होती. परत खोलीत गेलो. दोन-चार वेळा वरखाली केल्यावर एकदाची ती बाथरूम रिकामी सापडली आणि अंघोळ उरकली.
सकाळी उठून तयार होऊन विमानतळावर नेणार्‍या गाडीसाठी रिसेप्शन मधे आलो. मी धरून ७ लोक तिथे होते. गाडीत ड्रायव्हर सोडून ७ च शिटं होती. पण एका  जोडप्याकडे भला मोठा लांबडा सर्फिंग बोर्ड होता. तो दोन रांगेतल्या दोन माणसांच्या मानांमधून पार डिकीपासून ड्रायव्हर पर्यंत पसरला. गाडीच्या प्रत्येक वळणाबरोबर बोर्ड गालाशी नको तितकी सलगी करत होता. मला 'सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना गाल-ए-कातिल में है?' असं ताठ मानेनं म्हणावसं वाटलं. एकदाचं सर्फर लोकांचं टर्मिनल आलं आणि ते बोर्डासकट गुल्ल्याड झाले आणि मी यथावकाश टर्मिनल स्थित झालो.

घुssssssर्रsssssssss! एव्हाना बंड्यानंही झोपेचं टर्मिनल गाठलेलं होतं.

------***-----------***---------

बंड्यानं अष्टपुत्रेंच्या सल्ल्यापेक्षा नंतरच्या आख्यानांना घाबरून रात्रीच्या विमानाचं तिकीट काढलं. ट्रॅफिक जॅममुळे अर्धा तास उशीरा विमानतळावर पोचला. विमानतळ कसला? प्रवासीतळच म्हणायला पाहिजे खरं तर! आता बंड्या पण इथे तळ ठोकून बसणार नव्हता का?.. विमान धक्क्याला लागेपर्यंत? विमानतळ म्हणतात तसं बसतळ किंवा रेल्वेतळ का नाही म्हणत? किंवा उलट विमानस्थानक का नाही?

चेकिन झाल्यावर सुरक्षा तपासणीच्या भल्या मोठ्या रांगेत उभं राहून एकदाचा तो सुरक्षा अधिकार्‍यापाशी पोचला. त्याच्याकडे फक्त एक खांद्यावरची बॅग होती. बंड्याला सुरक्षा तपासणीत कधीच सुरक्षित वाटायचं नाही. बॅग क्ष किरणातून गेल्यावर तिथल्या बाईला काही तरी संशय आला. तिनं त्याची बॅग उघडून काही कपडे, चॉकलेटं आणि काही छोटी खेळणी बाहेर काढली. सुरक्षा तपासणी ही आमच्या खाजगी आयुष्यावरील लज्जास्पद अतिक्रमण आहे असं काही म्हणता येत नाही दुर्दैवाने! तिनं शेव्हिंग फोम उचलून कचर्‍यात टाकला. बंड्यानं प्रश्नार्थक मुद्रा करताच तिनं तडफदारपणे '१०० एमएलच्या वरती न्यायला परवानगी नाही. लिहीलंय सर्व ठिकाणी!' असं 'काय गावठी लोक प्रवास करतात हल्ली' अशा अर्थानं मान वेळावत ठणकावलं. बंड्यानं 'अहो! पण त्यात काही फार शिल्लक नाहीये' असं काकुळतीने सांगितल्यावर तिनं विजयी मुद्रेनं तो डबा कचर्‍यातून बाहेर काढला त्या शेव्हिंग फोमच्या डब्यावर २०० एमएल लिहीलेलं दाखवलं आणि परत शेव्हिंग फोमम् समर्पयामि केला. मग तिनं त्यातल्या एका खेळण्याचं प्लॅस्टिक पॅकिंग फोडून एक चिमुकला स्क्रू-ड्रायव्हर काढून 'शार्प ऑब्जेक्ट्स नॉट अलाउड' म्हणत स्क्रू-ड्रायव्हरम् समर्पयामि केला. बंड्यानं तिलाच उचलून सुरक्षा नारिम् समर्पयामि करायची ऊर्मी कशीबशी दाबली.

शेवटी बंड्यानं एकदाचं विमानातल्या शिटावर बूड टेकवलं. शेजारची दोन शिटं रिकामी होती. बंड्यानं ती तशीच रिकामी ठेवण्याबद्दल देवाचा धावा केला पण आज देवाचा मूड बरोबर नव्हता. थोड्याच वेळात तिथे एक बाई आणि तिची सुमारे ३ वर्षाची मुलगी स्थानापन्न झाल्या. त्याचं पाय पसरून झोपायचं स्वप्न विरलं. बंड्यानं इकडे तिकडे आणखी कुठे रिकामी शिटं आहेत का ते पाहीलं. पण छे! सामान्यांचा विमान प्रवास म्हणजे इकॉनॉमी क्लास नामक खुराड्यात एक कोंबडी होऊन अंग चोरून तासनतास बसणं! इथे फक्त डोळ्यांची उघडझाप व श्वासोश्वास या दोनच गोष्टी शेजारच्याला धक्का न लागता करता येतात. विमान धावपट्टीकडे कूच करेपर्यंत हवाईसुंदरीने कवायत केल्यासारखे हातवारे करत संकट समयीचे उद्योग समजावले. एअरहोस्टेसला हवाईसुंदरी हा शब्द कुणा गाढवानं केला? त्याच न्यायानं नर्सिणीला दवाईसुंदरी का नाही केला? किंवा रिसेप्शनिस्ट बाईला स्वागतसुंदरी? विमान झेपावल्यानंतर बंड्या घाईघाईने व्हिडिओ कडे झेपावला. पण तो काही केल्या चालू होईना. बंड्यानं हवाईसुंदरीकडे तक्रार करताच 'सर, मी सांगते हं त्यांना' असं कृत्रिम स्मितासकट कृत्रिम मार्दवपूर्ण आवाजात ऐकायला मिळालं.

बंड्यानं नाईलाजाने डोळे मिटले.. आणि चक्क त्याला झोप लागली. थोड्या वेळानं आपण गर्दीतून चाललो आहोत आणि खांद्याला धक्के बसताहेत असं वाटलं. एव्हढ्यात आपण डेक्कनला पण पोचलो की काय या विचाराने जाग आली.. तर एक हवाईसुंदर त्याला हलवून 'वुड यु लाईक डिनर, सर?' असं घोगर्‍या आवाजात विचारत होता. हवाईसुंदर कसला हवाईटपोरी वाटत होता तो! च्यायला शांतपणे झोपू पण देत नाहीत लेकाचे! बंड्यानं तिरसटून 'काय आहे खायला?' विचारल्यावर 'फक्त चिकन आणि लँब इतकंच शिल्लक आहे, सर!' असं कृत्रिम स्मितासकट कृत्रिम मार्दवपूर्ण आवाजात ऐकायला मिळालं. शुद्ध शाकाहार्‍याने चुकून बोंबील खाल्ल्यासारखा त्याचा चेहरा झाला. आधी सांगून सुद्धा व्हेज कसं शिल्लक नसतं? बरीच कडकड केल्यावर हवाईसुंदर मागे गुप्त झाला आणि जादु केल्या सारखा एक व्हेज जेवण घेऊन हजर झाला. 'आता कसं काय व्हेज मिळालं रे तुला?' म्हणून बंड्यानं अजून चिडचिड केली. जेवण चालू असताना त्याला शेजारची बाई तिच्या मुलीला लाडानं मराठीत म्हणाली.. 'आता एका मुलीला पुण्याला कोण कोण भेटणारे?' आणि तिनं भोकाड पसरलं. त्या बाईनं कसं बसं करून तिला शांत केलं. बंड्या परत झोपायच्या तयारीत असताना ती बाई काहीही कारण नसताना मुलीला म्हणाली.. 'आता तिकडे गेल्यावर मराठीत बोलायचं बरं का सगळ्यांशी!'.. आणि तिनं परत भोकाड पसरलं. अर्धा तास भँ झाल्यावर ती थकून झोपली तर त्या बाईनं तिला 'चॉकलेट हवं का?' असं विचारून तिला रडवलं. बंड्यानं मोठ्या कष्टानं 'माता न तू वैरिणी' म्हणायचं टाळलं. त्या पोरीला बंड्यात कंसाचा चेहरा दिसायचा की काय कुणास ठाउक! कारण बंड्यानं तिच्याकडे नुसतं पाहिलं तरी ती जीव धोक्यात असल्यासारखी किंचाळायची. अशा परिस्थितीत बंड्याला त्याच्या बॉसची 'ती' बढाई आठवली नसती तरच नवल होतं. बॉसच्या आयुष्यात काहीही बरं घडलं की ती बढाईच असली पाहीजे अशी तमाम पोरांची खात्रीच असते. बॉस पुण्याहून मुंबईला विमानाने निघाला होता तेव्हा त्याच्या शेजारी एक सुंदर स्त्री बसायला आली. बॉसकडे बघून नर्व्हस हसली. मग विमान जसं धावपट्टीवर धावायला लागलं तसं तिनं त्याचा हात घट्ट धरला तो विमान खूप वर गेल्यावर परत नर्व्हस हसून हात सोडला. विमान उतरायच्या वेळेला तीच कथा! शेवटी न राहवून तिला बॉसनं विचारलं 'एकट्या प्रवास करताय म्हणून इतकं टेन्शन आलं का?'
'मी एकटी नाहीये, नवरा बरोबर आहे'
'आँ! जवळ जवळची शिटं नाही मिळाली का मग?'
'नाही नाही! तो विमान चालवतोय'.. यावर बॉस अवाक झाला.

रडण्या किंचाळण्याच्या पार्श्वभूमिवर कधी तरी मुंबईच्या कळकट इमारती दिसायला लागल्या आणि धुरकट हवेत विमान एकदाचं उतरलं. बाहेर पडल्यावर त्यानं एक पुण्याची टॅक्सी पकडली. टॅक्सी म्हणजे एक टेम्पो होता. दुपारी १२ च्या रणरणत्या उन्हात त्या टेम्पोची भट्टी झाली होती. बंड्याला कधी एकदाची गाडी सुरू होतेय असं झालं होतं. पण टॅक्सीवाला गाडी भरल्याशिवाय थोडाच सोडणार होता? ५ मिनिटांनी त्याच्या शेजारची बाई तिची मुलगी आणि एक माणूस गाडीत चढले आणि बंड्यानं मनातल्या मनात कपाळाला हात लावला. ती बंड्याकडे बघून हसल्यावर तो माहिती होतं तरी उगीचच म्हणाला..'तुम्ही पण पुण्याला चाललाय?'
'हो! हा माझा दीर, मला न्यायला आलाय.'
बंड्याचे आणि त्याचे नमस्कार चमत्कार झाले आणि एकदाचा तो टेम्पो सुरू झाला. मुंबईच्या प्रचंड गर्दीतून बाहेर पडेपर्यंत टेम्पो वेग पकडणं शक्य नव्हतं. आणि गर्दीमुळे ड्रायव्हरचा 'अडला हरी बिप बिप करी' झाला होता. गाडीची शिटं ढिल्ली होती. ब्रेक मारला की थोडी पुढे सरकायची आणि अ‍ॅक्सिलरेट केल्यावर मागे! त्यामुळे बंड्याची जड बुडाची बाहुली झाली होती. थोड्या वेळाने गाडीचा एसी चालत नसल्याची घामट जाणीव झाली. ड्रायव्हर म्हणाला थोडा धीर धरा पण धीर घामाच्या प्रत्येक थेंबाने सुटत गेला. कुणी तरी ड्रायव्हरला म्हणालं .. 'अहो हा एसी आहे की फॅन?'..
'साहेब! गाडीला जरा मौसम पकडू द्या मग समदं ठीक व्हईल.'.. गाडी गर्दीत कसला मौसम पकडणार? अर्धा तास झाला तरी गाडी विमानतळापासून फारशी दूर गेलेली नव्हती.

'व्हाय इज द एसी नॉट वर्किंग? डोन्ट ब्लफ मी हांss! खर खर सांग! दोन दोन गाड्या आहेत माझ्याकडे!'.. त्या बाईनं तिच्या फर्ड्या इंग्रजी मराठीत ड्रायव्हरला झापला. त्या बिचार्‍या ड्रायव्हरला काय इंग्लिश कळणार होतं?
मग ती बंड्याला म्हणाली.. 'आपण त्यांना फोन करून सांगू या. ते पाठवतील दुसरी गाडी. आपण एवढे पैसे मोजलेत!'
'बरं बघा प्रयत्न करून!'.. बंड्या नाईलाजाने म्हणाला. तिनं ऑफिसला फोन लावला मग ते ड्रायव्हरशी बोलले. ड्रायव्हरने त्यांना तेच सांगितलं. त्यांनी त्याला गाडीवर पाणी मारायचा सल्ला दिल्याचं त्यानं आम्हाला सांगितलं. पण त्या बाईला वाटलं एसीत पाणी नाहीये आणि ती बंड्याला म्हणाली.. 'बघा हं! आता एक एक बाहेर यायला लागलंय! आता म्हणतोय एसीत पाणी नाही.' बंड्याला हसू आवरेना. एसीच्या पाण्याबद्दल ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

ड्रायव्हरनं चेंबुरला एका गॅरेजपाशी गाडी थांबवून टपावर पाणी मारलं पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. एसीतच प्रॉब्लेम आहे हे तिला एकदाचं समजल्यावर ती ड्रायव्हरला म्हणाली.. 'अरे तो एसीच चालत नाहीये! आमचे काही तुझ्यावर पर्सनल ग्रजेस नाहीयेत. एसी चालत नाही हे मान्य कर.'.. ड्रायव्हरने वाशीपाशी ते मान्य केलं. मग तिनं परत फोन करून तक्रार केली आणि त्यांनी गाडी पाठवायचं मान्य केलं. बंड्यानं सुटकेचा निश्वास टाकला. तो पर्यंत गाडी खोपोलीच्या रेस्टॉरंटाला लागली होती. तब्बल अर्धा तास थांबल्यावर पुढची गाडी आली. दुसरी गाडी येईपर्यंत निघायचं नाही असं ड्रायव्हरला सांगण्यात आलं होतं. तिचा दीर सगळ्यांकडे सहानुभूतिपूर्वक पहात होता. एकदाची ती गाडी आली. पण गाडीत जास्त जागा नसल्यामुळे फक्त ती, तिची मुलगी आणि दीर इतकेच लोक गेले. बाकीचे झक्कत त्या खटार्‍यातून निघाले. बरोबरच आहे म्हणा, रडक्या मुलांचेच लाड जास्त होतात! त्यातल्या त्यात सुखाची गोष्ट म्हणजे घाट चढता चढता हवा थंङ होत गेली आणि बंड्याला थोडी झोप मिळाली.

'काय कसा झाला प्रवास?'.. बंड्या घरी पोचल्यावर बाबांनी विचारलं.
'अहो बाबा! काही विचारू नका! काय वैताग आलाय म्हणून सांगू? बाप रे!'... असं म्हणत बंड्या उत्साहाने सांगायला लागला आणि थोड्याच वेळात....

घुssssssर्रsssssssss! बाबांनी झोपेचं टर्मिनल गाठलं आणि बंड्याला जाणवलं की त्याचा ही अष्टपुत्रे झालेला आहे.
म्हणतात ना... ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला!

-- समाप्त --