Monday, July 29, 2024

एक 'नोट'वर्दी अनुभव

 "त्या नोटा बाद झाल्यात आता!".. अद्वैतनं, माझ्या भाचीच्या नवर्‍यानं, मी माझ्या पाकीटातले पैसे मोजताना पाहून सुनावलं. कोव्हिडमुळे यावेळी तब्बल 4 वर्षानंतर भारत भेटीला आलो होतो. खूप पूर्वीपासून, जेव्हा एटीम नव्हते तेव्हापासून, भारतातून परत जाताना थोडे फार भारतीय चलन घेऊन जायची सवय लागली होती. कारण, परत भारतात आल्यावर विमानतळावरून घरी जाण्यासाठी ते कामाला यायचं. त्या सवयीचा दणका असा अचानक बसला.

"कुठल्या नोटा बाद झाल्या?".. नोटा पण आता फलंदाजांसारख्या बाद व्हायला लागल्या की काय या शंकेला प्रयत्नपूर्वक बाद करून मी संभ्रमित चेहर्‍यानं पृच्छा केली. 

"अहो त्या 2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या आहेत मागच्या वर्षी.".. त्यानं खुलासा केल्यावर वेगाने चाललेल्या बसने अचानक ब्रेक मारल्यासारखा धक्का मला बसला. आयला, दर वेळेला काय हे नोटा बाद करण्याचं झंझट? मागच्या वेळेला  भारतातून परत जायच्या वेळेला 500 रुपयाच्या नोटा बाद केल्याच्या बातमीनं मला विमानतळावर सरकारी  हिसका दाखवला होता. सरकार आयटी कंपन्यांसारखं नोटांच्या नवीन आवृत्त्या काढून मागच्या बाद करायला शिकलं की काय? 

"मग आता काय करायचं?".. मी हताश पणे त्याला विचारलं. 

"किती नोटा आहेत?"   

"एक!".. मी काळजीच्या सुरात म्हणालो कारण माझ्या डोक्यात आता काय करावं हेच विचार जास्त घोळत होते.

"एक काय? पेटी?".. माझ्याकडे भरपूर काळा पैसा असल्यासारखं त्यानं एकदम गंभीरपणे कुजबुजत्या स्वरात विचारलं.

"आयला, तू मला गॅंगस्टर वगैरे समजतोस की काय? पेटी नाही, एक नोट आहे रे बाबा".. काकुळतीच्या स्वरात त्याला सांगितल्यावर तो अमरीश पुरीसारखा खदाखदा हसला.

"तुम्हाला 2000 रुपडे म्हणजे किस झाडकी पत्ती.. दान केले समजा".. आयटीतली लोकं ऐटीत रहातात असा सर्वसाधारण समज आहे. त्यातून परदेशी रहाणारा असेल तर बघायलाच नको. शिवाय आजच्या पिढीला पैशाची काही किंमत वाटत नाही. आमच्या वेळेला एका रुपयात सुद्धा बरच काही मिळायचं. एकदा 500 रुपयाच्या नोटा घालवल्यावर माझ्यातला कोकणस्थ आता 2000 रुपये कसे घालवू देईल? 

"अरे प्रश्न पैशाचा नाही तत्वाचा आहे".. मनातले विचार कुणाला कळू द्यायचे नसतील तर खुशाल तत्वावर बोट ठेवावे हे मी जुन्या काळी शिकलो होतो. 

झालं, आता माहिती काढायला पाहीजे. लोकांना विचारलं तर 'एखादा एजंट शोध' पासून 'आता कुठेही नोटा बदलून मिळणार नाहीत' पर्यंत काहीही सल्ले मिळाले असते. शिवाय, आणखी अमरीश पुरी निर्माण झाले असते ते वेगळच! मग काय, फोन उघडला व गुगल  केलं! Without mobile I am immobile! तर 2000 रू. च्या नोटा बॅंकेत काही काळापर्यंत बदलून देत होते पण आता फक्त रिझर्व बॅंकेतूनच बदलून मिळतात. रिझर्व बॅंकेतल्या 19 शाखांपैकी कुठल्याही शाखेकडे पोस्टाने नोटा पाठवता येतात. त्यासाठी एक फॉर्म भरायचा. त्यात तुमचं नाव, गाव, पत्ता आणि तुमच्या बॅंकेतल्या खात्याची माहिती द्यायची. त्यात खाते धारकाचं नाव, खाते क्रमांक, कुठल्या प्रकारचं खातं आहे ते, बॅंकचं नाव, ज्या शाखेत खातं आहे त्या शाखेचं नाव व पत्ता आणि IFSC कोड इत्यादी माहिती भरायची. तसंच, 2000 रुपयाच्या ज्या नोटा पाठवणार आहात त्यांची माहिती भरायची. ती अशी -  किती नोटा पाठवताय, प्रत्येक नोटेचा सिरीयल नंबर आणि एकूण रक्कम किती ते. अर्थातच, या फॉर्मला तुम्ही भारतीय नागरिक आहात हे सिद्ध करण्यासाठी यापैकी एक जोडायचं: आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेंस, पॅन कार्ड, पासपोर्ट, सरकारी विभागाने दिलेले आयडी कार्ड. शिवाय, तुमच्या खात्याची माहिती सिद्ध करायला खात्याच्या पासबुकातलं खात्याची माहिती असलेलं पान किंवा खात्याची माहिती असलेलं स्टेटमेंट जोडायचं. या सगळ्याच्या दोन प्रती करायच्या. एका पाकीटात 2000 च्या नोटा व जोडलेल्या पुराव्या सकट फॉर्म घालायचा आणि पाकीटावर RBI च्या ज्या शाखेला तुम्हाला पाठवायचं आहे त्याचा पत्ता लिहायचा. हुश्श! इतक्या सगळ्या माहितीत ती दुसरी प्रत कशाला आहे याचा उल्लेखच नव्हता. 

इतक्या सगळ्या माहितीनं दडपून न जाता मी नेटानं व नेटची मदत घेत घेत माझ्याकडच्या पुराव्यांच्या प्रती जमवल्या. तसंच मला हेही बघायचं होतं की आपल्या पोस्ट खात्यात किती सुधारणा झाली आहे ते. अद्वैतकडून एक पाकीट घेऊन त्यावर मुंबईच्या रिझर्व बॅंकेचा पत्ता खरडला. फॉर्म पोस्टात घेऊन तिथेच भरायचा असं ठरवून पोस्टात गेलो. फक्त, तिथे फॉर्म नसतो तो रिझर्व बॅंकेच्या साईटवर मिळेल हे ऐकून एक हात हलवीत परत आलो, दुसर्‍या हातात कागदपत्रं होती. रिझर्व बॅंकेची  साईट हा असा काही चक्रव्यूह आहे की साक्षात अभिमनन्यू खुद्द अर्जुनासोबत गेला तरी दोघांना भेदता येणार नाही. तिथे माझ्यासारख्या 15 पेक्षा जास्त वर्ष वेगवेगळ्या वेबसाईटी करण्यात घालवलेल्या माणसाची काय कथा? तासभर घालवून पण तो फॉर्म नाहीच मिळाला. शेवटी परत गुगलला शरण गेल्यावर अवघ्या 5 सेकंदात मी फॉर्म भरायला बसलो होतो. 

दोन फॉर्म भरून नवीन उत्साहाने मी पोस्टात गेलो. तिथल्या बाईनं मला भारतातला पत्ता लिहायला सांगितला. त्यासाठी मला नवीन फॉर्म भरायला नाही लावले याला सुधारणा म्हणायला हरकत नाही. मी माझा इंग्लंडचा लिहीला होता. का ते सांगितलं नाही पण उदार मनाने त्याच पत्त्याच्या बाजुच्या समासात लिहिण्याची परवानगी दिली. दोन्ही फॉर्म वर ते केल्यावर तिनं माझ्या पाकीटावर नजर टाकली. मी फक्त 2000 रुपयाच्या एका नोटेसाठी इतका उपदव्याप करतोय ते पाहून तिनं माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहीलं. आणि हे कसलं पाकीट आणलं हो? जरा चांगलं आतून कापडाचं अस्तर लावलेलं घेऊन या असं ठणकावलं. बाहेर पडून एका स्टेशनरीच्या दुकानात 20 रुपडे देऊन ते मिळवलं, त्यावर पत्ता खरडून नव्या जोमाने परत पोस्टात आलो. माझं पाकीट रजिस्टर्ड पोस्टाने जाणार होतं त्याची पोचपावती ते माझ्या भारतातल्या पत्त्यावर पाठवणार होते. त्यासाठी भारतातला पत्ता हवा होता तर! त्या बाईनं फॉर्म व त्याची प्रत यावर तिची सही ठोकली व शिक्के मारले. एक प्रत जोडलेल्या पुराव्यासकट मला दिली आणि दुसर्‍या प्रतीचं रहस्य मला उलगडलं! पाकीट 2000 रुपयासाठी इंश्युअर केलं. सगळे मिळून   सुमारे 170 रुपयाच्या आसपास पैसे भरून मी एव्हरेस्ट सर केल्याच्या आनंदात ताठ मानेने बाहेर  पडलो. एकूण दोन दिवस व इतर खर्च धरून सुमारे 200 रू घालवल्यावर तब्बल तीन आठवड्याने मला माझ्या खात्यात पैसे आलेले दिसले. 

त्यानंतर मी जवळपास 10 दिवस भारतात होतो पण पोचपावती अद्वैत कडे आली नाही. जायच्या दोन दिवस आधी माझा एक जुना मित्र भेटला. तो 90 च्या सुमारास इंग्लंडमधे रहात होता. बोलता बोलता त्यानं मला त्याच्याकडच्या जुन्या 50 आणि 10 पौंडाच्या नोटा बदलायला दिल्या. एकूण 360 पौंड! ते ऐकल्यावर माझ्या मनात आकाशवाणीवर दुखवट्याच्या वेळेला ज्या प्रकारचं संगीत लावतात ते सुरू झालं. तरी मी ते काम स्विकारलं. त्याच्या 50 पौंडाच्या नोटा 96 च्या आसपास बाद झाल्या आहेत हे समजल्यावर दुखवटा संगीतानं जोरदार टॅहॅं केलं. पण नोटा बॅंकेत बदलता येतात हे वाचून मोठ्या धीराने माझ्या शाखेत गेलो. इतक्या जुन्या नोटा तुमच्याकडे कशा आल्या? असले काही बाही प्रश्न मला विचारतील अशा विचारांनी माझ्या डोक्यात उच्छाद मांडला होता. पण काय आश्चर्य! बॅंकेतल्या बाईने छान हसून किती पैसे आहेत ते विचारलं. मी तो आकडा सांगून तिच्याकडे नोटा सुपूर्द केल्या. तिनं ते मोजले व माझं डेबिट कार्ड वापरून माझ्या खात्यात जमा केले. मी लगेच बॅंकेचं अ‍ॅप वापरून पैसे जमा झाल्याची खात्री केली. सर्व कामाला एकूण दोन मिनिटं लागली. हे फारच अविश्वसनीय वाटलं म्हणून घरी आल्यावर परत एकदा पैसे जमा झाल्याची खात्री केली. इथे हे नमूद करायला पाहीजे की इकडे ही पैसे पोस्टातर्फे बॅंक ऑफ इंग्लंडकडे पाठवता येतात. त्यासाठी पण एक फॉर्म व पुरावे लागतात. पण इतक्या जुन्या काळी बाद झालेल्या नोटा देखील बॅंकेत घेतल्या जातात म्हंटल्यावर कुणीही त्यांच्या जवळच्या शाखेतच जाईल असं मला वाटतं. 

=== समाप्त === 

No comments: