Monday, May 25, 2009

हे बगचि माझे विश्व

मी प्रोग्रॅमर नामक पामराला कोडगा म्हणतो. एकतर तो कुणाच्याही आकलन शक्ती बाहेरचा कोड पाडून स्वतःला आणि दुसर्‍याला कोड्यात टाकतो म्हणून, आणि ऑफिसात बारक्या सारक्या चुकांवरून बॉसच्या शिव्या खाऊन खाऊन, वेळेवर घरी न गेल्यामुळे घरच्यांची मुक्ताफळं झेलून झेलून, क्लाएंटनं येता जाता केलेला अपमान सहन करून करून तो मनाची एक विशिष्ट अवस्था गाठतो - अर्थात् त्याचा 'कोडगा' होतो.

येता जाता चुका काढणे, सदैव किरकिर करणे, चांगल्या कामाचं चुकूनही कौतुक न करणे, आपल्या चुका दुसर्‍याच्या माथी मारणे, पगारवाढीच्या काळात हटकून तोंडघशी पाडणे अशी कुठल्याही बॉसची काही ठळक स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. माझा बॉस, वैद्य, याला अपवाद नव्हता. त्याचं वागणं बोलणं चालणं पाहून आणि वैद्य नावाशी मस्त यमक जुळतं म्हणून आम्ही त्याला दैत्य म्हणायचो. आमच्या ग्रुपमधे दहा-बारा कोडगे होते. गुलामांवर नजर ठेवणार्‍या रोमन मुजोरड्याप्रमाणे तो अधून मधून राऊंडवर यायचा. तो येतोय असं दिसलं की सगळीकडे एकदम शांतता पसरायची. काम करतोय हे ठसवण्यासाठी जिवाच्या आकांताने कीबोर्ड बडवला जायचा. काही धाडसी कोडगे शेवटच्या क्षणापर्यंत मायबोलीवर टीपी करत असत... अगदी शेवटी ऑल्ट-टॅब ने स्क्रीन बदलत असत. पण त्याची घारी सारखी नजर तो सूक्ष्म बदलही पकडायची. कधी कधी एखादा इरसाल कोडगा साळसूद चेहर्‍याने एखादी निरर्थक शंका विचारून मधेच त्याचा एन्कॉउन्टर करत असे. मग त्याचं उत्तर खोट्या खोट्या गांभिर्यानं ऐकणं, आजुबाजुच्या खसखशी मुळे, त्याला अवघड जात असे.

आमचा ग्रुप बँकांसाठी एक पॅकेज तयार करण्यात गुंतला होता. म्हणजे आम्हीच बराचसा गुंता केला होता आणि आम्हीच त्यात अडकलो होतो. आमचं पॅकेज नीटसं तयार नव्हतं तरीही एका सहकारी बँकेनं त्यांच्या काही ब्रँचमधे वापरायचा, वेड्या महंमदाला शोभेल असा, निर्णय घेतला. पॅकेज नीट चालतंय ना हे पहाण्यासाठी पहिले काही महीने मॅन्युअल सिस्टम आणि आमचं पॅकेज बरोबरीनं (पॅरलल रन) चालवायचं ठरवलं. पॅकेज कधीच त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चाललं नाही. आमची कंपनी छोटी होती त्यामुळे टेस्टिंग सारखी ऐश आम्हाला परवडायची नाही. घोळ झाला की आम्ही दणादण कोड बदलून बँकेत टाकायचो आणि नवीन घोळ करायचो. हे करता करता माझ्यासकट सर्व कोडग्यांचा स्वतःवरचा विश्वास उडाला. आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करु शकतो हे स्वतःबद्दलचे कटु सत्य त्यामागे होते. कधी कधी वाटतं की बहिणाबाई आमच्या ग्रुपमध्ये असत्या तर त्यांनी या आधुनिक जगात प्रोग्रॅम दळता दळता अशा काही ओव्या रचल्या असत्या -

अरे प्रोग्रॅम प्रोग्रॅम, झाला कधी म्हणू नये
कागदांच्या ढिगार्‍याला स्पेक्स कधी म्हणू नये

अरे प्रोग्रॅम प्रोग्रॅम, नुस्ता बगांचा बाजार
बग एक मारताना, नवे जन्मति हजार

ती बँक सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या वेळात सुरु असायची. त्यावेळात हमखास बँकेतून फोन यायचा. तेव्हा काही कोडगे आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करायचे. पण पोचलेले कोडगे आज काय नवीन घोळ झाला अशी पृच्छा स्थितप्रज्ञ चेहर्‍याने करायचे. एकदा असाच फोन वाजला आणि दैत्यानं तो घेतला. फोन झाल्यावर धाप धाप पावलं टाकत माझ्याकडे आला. स्वरयंत्राच्या सर्व तारा गंजल्यावरच येऊ शकेल अशा त्याच्या विशिष्ट आवाजात गरजला -

दैत्यः 'चिमण! कोडमधे काय बदल केलास तू?'
मी: 'मी खूप बदल केलेत, त्यातला कुठला?'
दैत्यः 'अकाउंटचं स्टेटमेंट चुकतंय. कुठल्याही अकाउंटचं मागितलं तरी एकाच अकाउंटचं येतंय.'
मी: 'हां! हां! तो! मी नवीन क्वेरी घातलीय'
दैत्यः 'अरे काय हे! तुला कुणी सांगीतलं ती बदलायला?'
मी: 'तुम्हीच म्हणता ना चेंज इज इन्-एव्हिटेबल म्हणून! माझी क्वेरी स्लो आहे म्हणून तुम्हीच बदलायला सांगीतली.' मी विनाकारण त्याला उचकवला.
दैत्यः 'हां! हां! माहीतीये! माहीतीये! मला कोड दाखव तुझा. तू नक्की काहीतरी शेण खाल्लयंस'

माझा कोड पाहिल्यावर हिरोला आपल्या जाळ्यात पकडणार्‍या व्हिलनसारखा त्याला आनंद झाला. मी त्याची क्वेरी जशीच्या तशी वापरली होती.. त्यानं ती कशी चालते ते दाखविण्यासाठी त्यात एक अकाउंट नंबर घातला होता तो तसाच ठेऊन!

दैत्यः 'बघिटलास! अजिबात डोकं वापरत नाहीस. आहे तस्सं घालून मोकळा'. 'बघिटलास' हा त्याचा आवडता शब्द होता. स्वतःवर खूष असला की वापरायचा तो नेहमी.
मी: 'हम्म! तो कॉपी पेस्ट केल्यावर बदलायचा राहीला.' कॉपी पेस्ट केल्यावर आवश्यक ते बदल न करणं हा माझा ष्ट्यँडर्ड घोळ! त्याचं मूळ परीक्षेत केलेल्या कॉप्यांमधे असावं.
दैत्यः 'आता लगेच बँकेत जाऊन कोड बदल'
मी: 'हो! चहा पिऊन लगेच जातो'
दैत्यः 'आत्ताच्या आत्ता जा! तिथं आग लागलीये अन् तुला चहा सुचतोय. एक दिवस चहा नाही प्यायलास तर मरणार नाहीस तू'.

दैत्याचा फ्यूज उडाला आणि मी आजुबाजुच्या फिसफिशीकडे दुर्लक्ष करत सटकलो. आम्ही जन्माचे हाडवैरी असल्यासारखे हा दैत्य आमच्या अंगावर येतो. पोरींच्या चुका मात्र त्यांच्याशी गोड बोलून सांगतो. पोरी मात्र 'सर! तुमच्यामुळे खूप शिकायला मिळतं मला!' असा गूळ लावून त्याला घोळात घ्यायच्या.

तिकडे जाऊन आवश्यक तो बदल केला. एका ठिकाणच्या अनावश्यक कोडमुळे प्रोग्रॅम विनाकारण स्लो चालेल असं लक्षात आल्यावर जाता जाता अजून एक बदल केला. आपल्याला हे कळलं म्हणून मनातल्या मनात स्वतःची पाठ थोपटली. मग लोकांची स्टेटमेंट नीट यायला लागली आहेत हे पाहून परत गेलो.

दोन दिवसांनी बँकेतून आमच्याच एका कोडग्याचा फोन आला. दबक्या आवाजात त्यानं सांगीतलं की एका तारखेनंतरची कुणाचीच ट्रॅन्झॅक्शन्स दिसत नाहीयेत. ती तारीख मी बदल केलेल्या दिवसाचीच होती. प्रोग्रॅम जोरात पळवायचा उपद्व्याप माझ्याच अंगाशी आला काय? कुणालाही काहीही न सांगता मी बँकेत दाखल झालो.. सगळं नीट बघितलं.. माझ्या बदलाचाच तो प्रताप होता.. जुना कोडच बरोबर होता.. एका टेबलात सगळी ट्रॅन्झॅक्शन्स जायला पाहीजे होती ती गेलीच नव्हती. घाई घाईनं परत जुना कोड टाकला. त्या दिवशी रात्री उशीरा पर्यंत बँकेत बसून सगळं सरळ केलं आणि घरी गेलो.

दैत्याला हे लफडं कुठून तरी कळालंच. दुसर्‍या दिवशी दैत्यानं कडक शब्दात सगळ्यांसमोर माझी हजेरी घेतली. वरती अजून एक चूक झाली तर नोकरीवरून काढायची धमकी दिली. मी बग गिळून गप्प बसलो. एवढा पाणउतारा झाल्यावर त्यावर दारु हाच एकमेव उतारा होता. संध्याकाळी त्याचा अवलंब केला.

असेच काही महीने गेले. दरम्यान त्याच बँकेच्या सातार्‍याच्या शाखेचं काम सुरु झालं. एका कोडग्याला तिथलं काम संपेपर्यंत बसविण्यात आलं. तेव्हा एकदा दैत्य दोन कागद नाचवत माझ्याकडे आला नि ओरडला -
दैत्यः 'हे, हे काय आहे?'
मी: 'अकाउंटचं व्याज काढलेलं दिसतंय' मी कागदांकडे पाहीलं मग त्याच्याकडे निर्व्याज चेहर्‍याने पहात म्हंटलं.
दैत्य: 'बघिटलास! यालाच मी म्हणतो डोकं न वापरणं. ह्या कागदावर एका अकाउंटचं हाताने काढलेलं व्याज आहे. ह्या दुसर्‍या कागदावर त्याच अकाउंटचं आपल्या प्रोग्रॅममधून काढलेलं व्याज आहे. नीट बघ.' त्यानं दोन्ही कागद आवेशाने माझ्या टेबलावर आपटले.
मी: 'दोन्हीत फरक आहे. कसा काय?'
दैत्यः 'शाब्बास! ते तू मलाच विचार. तू काय काय गोंधळ घातलेत ते मला काय माहीत?'
मी: 'पण मी तर तुम्ही दिलेलंच लॉजिक घातलंय.' बँकेच्या व्यवहाराची माहिती घेण्याचं काम दैत्यानं स्वतःच्या अंगावर घेतलं होतं. अर्थात् त्याला तेवढंच जालीम कारण होतं. पूर्वी एकदा माहिती घ्यायला गेलो असताना 'अकाउंटला क्रेडिट करायचं म्हणजे प्लस करायचं की मायनस?' असा मूलभूत प्रश्न विचारून मी सगळ्यांची दाणादाण उडवली होती. त्यानंतर बँकेनं 'जरा अकाउंटिंग समजणारी माणसं पाठवा' अशी दैत्याची कान उघाडणी केल्यावर त्यानं ते काम कुणालाच द्यायचं धाडस केलं नाही.
दैत्यः 'अरे मी तुला ढीग लॉजिक देईन. बहिर्‍याला मोबाईल देऊन काही उपयोग आहे का? तसं आहे ते. शेवटी तू त्याची तुझ्या पध्दतीने वाट लावणारच ना? ते काही नाही. आज याचा छडा लावल्या शिवाय घरी जायचं नाही.'

आता थुका लावून सगळं बघण्या शिवाय पर्याय नव्हता. काय करणार? दिवस वाईट होते. नोकरी गेली तर दुसरी मिळण्याची शक्यताच नव्हती. आधीच रिसेशन, तशातही दैत्य कोपला अशी अवस्था! प्रथम मला मी जादुने गायब केलेल्या ट्रॅन्झॅक्शन्सची शंका आली. पण सगळी जागच्या जागी होती. मग मी हाताने व्याज काढलं.. ते प्रोग्रॅमनी काढलेल्या व्याजाशी जुळलं. माझा विश्वासच बसला नाही.. दैत्यानं बोलून बोलून माझं मानसिक खच्चीकरण केल्याचा दुष्परिणाम!.. मी परत एकदा काढलं.. तरी ते जुळलं. चला! तुका म्हणे त्यातल्या त्यात! निदान माझं कोडिंग तरी चुकलं नव्हतं! आता असलाच घोळ तर दैत्याच्या लॉजिकमधेच असणार.

दुसर्‍या दिवशी मी एक बग कसा सोडवायचा ते एकाला दाखवीत होतो तेवढ्यात दैत्य तिथे आला. त्यानं थोडा वेळ आमचं बोलणं ऐकलं आणि तडक आपल्या खोलीत गेला. थोड्या वेळानं त्यानं मला बोलावलं आणि व्याजाच्या गोंधळाबद्दल विचारलं. मी त्याला माझा कोड कसा बरोबर आहे ते पटवलं. मग आम्ही बॅंकेच्या माणसांशी चर्चा करायला गेलो. सगळं ऐकून घेतल्यावर तिथला एक कारकून म्हणाला 'व्याज काढायची पध्दत बरोबर आहे. आम्ही असंच व्याज काढतो. पण काही काही ग्राहक आम्हाला फार त्रास देतात. त्यांना आम्ही थोडे जास्त व्याज लावतो. तेही कधी चेक करत नाहीत. केलंच तर आम्ही फक्त तेवढंच दुरुस्त करतो'.

परत जाताना दैत्य मला खुशीत येऊन म्हणाला 'बघिटलास! माझं लॉजिक बरोबर होतं'. मला मात्र तो तावडीतून सुटल्याचं दु:ख झालं.

दुसर्‍या दिवशी ऑफिसात गेल्या गेल्या दैत्यानं मला बोलावून सांगीतलं.
दैत्यः 'आत्ताच्या आत्ता घरी परत जा'. मी हादरलो. कायतरी नवीन घोळ झाला असणार आणि त्यानं मला डच्चू दिला असणार.
मी: 'का? काय झालं?'
दैत्यः 'घरी जा! बॅग भर आणि पहील्या गाडीनं सातार्‍याला जा.'
मी: 'एवढा मोठा काय प्रॉब्लेम आला?'
दैत्यः 'अरे काल रात्री ३ वाजता सातार्‍याहून फोन आला. तिथं नवीन अकाउंट ओपन होत नाहीये'
मी: 'असं कसं झालं एकदम? त्यानं काही तरी बदल केला का?'
दैत्यः 'हो. मी त्याला एक बदल करायला सांगीतला.'
मी: 'कुठला?'
दैत्यः 'तो तू काल सांगत होतास ना.. एका बग बद्दल.. तो.'
मी: 'काय काय बदल सांगीतला?'. त्यावर दैत्यानं मला सविस्तर सगळं सांगीतलं. ते ऐकल्यावर त्यानं अर्धवटच बदल करायला सांगीतल्याचं मला समजलं. मग मी त्याला उरलेला बदल सांगीतला. त्यानं सातार्‍याला फोन करून लगेच तसा बदल करायला सांगीतला. त्यानंतर खाती व्यवस्थित उघडायला लागली. मला कृतकृत्य झालं. मी त्याला 'बघिटलास!' असं म्हणणारच होतो पण बॉस इज ऑलवेज राईट म्हणून सोडून दिलं.


-- समाप्त --