Monday, October 19, 2009

एका परंपरेचा अस्त

ज्यानी कुणी आपल्या वाढत्या वयातली महत्वाची वर्षं पुणे विद्यापीठात काढली (घालवली आहेत असं मी म्हणणार नाही) आहेत त्यानं विद्यापीठातल्या 'अनिकेत' कँटिनबद्दल ऐकलं नसेल तर तो एकतर ठार बहिरा असला पाहीजे किंवा त्याला स्मृतिभ्रंश तरी झाला असला पाहीजे. कारण ते नुसतं कँटिन नव्हतं.. ती एक मास्तर विरहित शिक्षण संस्था होती.. हल्ली HR ची लोकं, त्यांच्या नोकर्‍या जस्टिफाय करायला, कसले कसले सॉफ्ट स्किलचे ट्रेनिंग प्रोग्रॅम घेऊन बिचार्‍या कर्मचार्‍यांचा जीव नकोसा करतात ते सगळं ट्रेनिंग इथे नकळत होऊन जायचं.

तिथले पदार्थ फार चविष्ट होते अशातला काही भाग नव्हता, पण स्वस्त मात्र होते. खरं आकर्षण तिथल्या वातावरणाचं होतं. भारत क्रिकेटची मॅच जिंकत असेल तर मैदानावर जसं वातावरण असतं तसं वातावरण कायम! पीढीजात सुतकी चेहर्‍यावर देखील स्मित झळकवण्याची क्षमता त्या वातावरणात होती. परीक्षेत नापास झाल्याचा वैताग, मास्तरनं झापल्यानं आलेली कटुता, बापाशी झालेल्या भांडणाचं वैषम्य, प्रेमभंगाचं दु:ख, आपल्याला आयुष्यात काही करायला जमणार नाही ही भीति.. असल्या मन पोखरणार्‍या विचारांचा निचरा करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे अनिकेत!

विद्यापीठातल्या सगळ्या वाटा अनिकेतमधून जातात असं लोक गमतीनं म्हणायचे. लेक्चरला जायच्या आधी व नंतर, ग्रंथालयात जाण्याआधी मानसिक तयारी करण्यासाठी आणि जाऊन आल्यावर मेंदुवरचा ताण हलका करण्यासाठी, फी भरायला जाण्याआधी आणि नंतर असं कुठेही जायचं असलं तरीही व्हाया कँटिन जायची पध्दत होती. कँटिन हा एक भोज्या होता.. त्याला हात लावल्याशिवाय कुठल्याही कामाला मुहूर्त लागत नसे. हे ठसवायला त्या वेळी केलेलं 'पाऊले चालती पंढरीची वाट' याचं केलेलं विडंबन थोडं फार आठवतंय -

पाऊले चालती कँटिनची वाट
सर्व अभ्यासाला मारुनिया चाट
पाऊले चालती कँटिनची वाट

माझ्यासारख्या बर्‍याच रिकामटेकड्यांचा प्रवास अर्थात् कँटिनमधेच संपायचा. सकाळी विद्यापीठात दमून भागून आल्यावर आम्ही कँटिनला जे ठिय्या मारायचो ते संध्याकाळी कँटिन बंद होईपर्यंत! हां, कधी मधी परीक्षा देणे किंवा फी भरणे अशा फुटकळ कामाला नाईलाजास्तव बाहेर पडायचो, नाही असं नाही! ज्यानी कुणी कँटिनचं 'अनिकेत' नाव ठेवलं तो फार मोठा द्रष्टा असला पाहीजे कारण ती उपाधी आम्हाला १००% लागू होती. तिथल्या हॉलमधे असलेल्या कॅरम आणि टीटी या खेळात आम्हाला विशेष रस होता. तसे तिथे बुध्दिबळ खेळणारेही होते पण माझ्यासारखी जड बुध्दिची माणसं त्याच्या वाटेला अजिबात जायची नाहीत. आणि टीटी पेक्षाही आमची कॅरमला जास्त पसंती होती कारण कॅरम चहा-बिडी मारत निवांतपणे, शरीर न झिजवता, खेळता यायचा.

सुरवातीचे काही महीने इतर रथि-महारथिंचा खेळ बघून तोंडात बोटं घालण्यात गेला. हळूहळू आमचाही गेम सुधारला आणि विद्यापीठातली कॅरमची विवक्षित भाषा व नियम अवगत झाले. नियम थोडे वेगळे होते. सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे सोंगटी (विद्यापीठाच्या भाषेत गोटी) जर आपल्या स्ट्रायकर ठेवायच्या रेषांना चिकटली असेल किंवा त्यापेक्षा खाली असेल (म्हणजे बेसमधे असेल) तर तिला सरळ मारता यायचं नाही.. रिबाउंड मारूनच घ्यायची. या नियमामुळे प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कौशल्य कमी असलं तरी थोडी फार झुंज देता यायची.. त्यांच्या बेसमधे गोट्या घालून. दुसर्‍यांच्या गोट्यांना सरळ मारून त्यांच्या बेसमधे घालता नाही यायचं.. एकतर रिबाउंड मारून घालायच्या किंवा कुठेतरी आपल्याही गोटीला धक्का लागेल असं बघायचं.

काही शॉट्सना अभिनव नावं होती. पार्टनरच्या बेसमधल्या गोटीला बोर्डाच्या डाव्या किंवा उजव्या कडेवर स्ट्रायकर आपटून मारलं तर तो 'झाडू' शॉट! 'पंच मारणे' म्हणजे कडेला चिकटलेल्या गोटीला एक झापड मारून तशीच चिकटलेल्या अवस्थेत भोकात घालवणे. 'डबलशॉट' मधे आपली गोटी घेता घेता स्ट्रायकरने दुसर्‍याची गोटी त्याच्या बेसमधे घालायची किंवा आपली एखादी गोटी सोप्पी करायची.. हा एक बहुपयोगी शॉट होता पण फार लोकांना तो जमायचा नाही.. ज्यांना जमायचा त्यांची पत कॅरमच्या बाजारात वरची असायची. 'स्लाईड' शॉटमधे एखाद्या गोटीचा घसरगुंडीसारखा उपयोग करून स्ट्रायकर तिच्यावरून घसरवायचा आणि दुसरी गोटी घ्यायची.

काही जण आपली गोटी भोकापाशी गस्तीला बसवून दुसर्‍याला बूच लावण्यात वाकबगार होते.. त्यांना बुचर म्हंटलं जायचं. तसेच काही जण ती बूचं बाजुला करून आपली गोटी घेण्यात पटाईत होते.. त्यांना डिबुचर म्हणायचो. बूच बाजुला करणे शक्य नसेल तेव्हा ती गोटी 'तोडली' जायची.. म्हणजे तिला जोरात ताड्या मारून बोर्डावरून उडवली जायची किंवा आयुष्यातून उठवली जायची.. गोटीच्या त्या प्रवासाचं गोईंग बाय बोईंग असं मार्मिक वर्णन केलं जायचं. प्रत्येक गेम मधे पावडर टाकायची जबाबदारी एक खेळाडू घ्यायचा.. तो पावडरमॅन. खेळाडूच्या डाव्या आणि उजव्या बाजुला बसलेल्यांचा बेस म्हणजे 'समास' हा भाग. समासातली गोटी घ्यायची वेळ आली की तो सामासिक प्रॉब्लेम व्हायचा. जर कुणाला गोटी घ्यायला जमत नसेल आणि तो नुसता भोकाच्या अवतीभवती फिरवत असेल तर त्याला 'घुमायून' अशी पदवी मिळायची.

झुंज द्यायचं दुसरं महत्वाचं शस्त्र म्हणजे हल्लीच्या भाषेतलं स्लेजिंग.. आम्ही त्याला मानसिक खच्चीकरण म्हणायचो. हा प्रकार हरभजन - सायमंडस् यांच्यामुळे आत्ता आत्ता लोकांना कळाला.. आम्ही तो फार पूर्वीच आत्मसात केला होता.. आमचं त्यातलं प्राविण्य स्टीव वॉला समजलं असतं तर त्यानं अख्खी ऑस्ट्रेलियाची टीम आमच्याकडे ट्रेनिंगला पाठवली असती. अर्थात् आमच्या स्लेजिंगमधे शिव्यागाळी किंवा हीन दर्जाचं बोलणं नसायचं.. ते पूर्णपणे विनोदी असायचं आणि अगदी मोक्याच्या वेळेस म्हंटलं जायचं.. जेणेकरून प्रतिस्पर्धी हसता हसता गोटी फुकायचा.

खच्चीकरणासाठी प्रत्येकाच्या खेळायच्या शैलीचा अभ्यास कामाला येतो. उदा. रंग्या गोट्या जोरात मारतो. नेम चांगला असेल तर गोट्या जातात नाही तर तितक्याच वेगाने परत येतात. त्याचा नेम सहसा चुकत नाही पण त्याच्या मनात शंका निर्माण केली की संधी असते. तो क्वीन किंवा कव्हर अशी महत्वाची गोटी घेत असेल तेव्हा 'हळू मार रे रंगा' ही ओळ 'एक हंसका जोडा' या चालीत सुरू व्हायची. त्यापुढची ओळ 'हळु मार रंगाs आs आs' ही 'सख्या चला बागामधी रंग खेळू चला' यातल्या 'रंग खेळू चलाs आs आs' या कोरसासारखी तारस्वरात ओरडली जायची.. की लगेच ती शंका त्याला भेडसवायची.

बंड्या नेहमी अस्वस्थ असतो.. शांतपणे आपली खेळी यायची वाट बघत नाही.. कधी भकाभका बिडी ओढेल तर कधी गटागटा चहा ढोसेल नाहीतर कधी जरूर नसताना पावडर टाकेल. त्याचे डोळे एका जागी स्थिर नसतात.. सतत इकडे तिकडे हलत असतात. खेळी आली की तो पटपट खेळून मोकळा होतो.. जास्त टीपी करत नाही आणि इतरांनी केलेला त्याला आवडतही नाही. अर्थातच तो जेव्हा खेळायला बसतो तेव्हा तोच पावडरमॅन असतो. विवक्षित वेळेला बंड्याच्या अलिकडला उगीचच जास्त टीपी करेल.. कुठली गोटी घ्यायची यावर पार्टनरबरोबर खूप विचारविनिमय करेल. मग 'अरे, काय बुध्दिबळं खेळताय की कॅरम?' असा सवाल बंड्याकडून आला की समजायचं - लोहा गरम है, हाथोडा मार दो.

हातातून स्ट्रायकर सुटताना दिल्या कमरेपासून मागे झुकतो.. हे रिकॉईल मुळे होतं असा विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. त्यांच्या मते स्ट्रायकर सोडायला त्याला फार जोर लावायला लागतो. स्ट्रायकर सोडणे आणि मागे झुकणे या हालचाली सहज एकसंध झाल्या तर गोटी जाते नाहीतर हुकते. वजन उचलायच्या वेळेस कामगार मंडळी जसा 'हुप्पा हुंय्या' असा आवाज करतात तसाच स्ट्रायकर सोडायच्या वेळेस केला की इप्सित साध्य व्हायचं.

मोक्याच्या वेळेला गोटी फुकायला लावण्यासाठी विनोदाचा सढळ तोंडाने वापर व्हायचा. कुणी क्वीनला नेम लावायला लागला की 'कशाला राणीच्या मागे जवानी बरबाद करतोस?' असा फंडू सवाल यायचा. तरीही क्वीन घेतली आणि कव्हर थोडं जरी अवघड असलं तर लगेच 'बारावी झालास. आता पुढे काय?'. कुणी पटपट गोट्या घ्यायला लागलाच तर 'अरे, पार्टनरला थोड्या ठेव!' असा अनाहूत सल्ला मिळायचा किंवा 'सोप्या गोट्या घेऊन भाव खातोय रे' असा विलंबित आक्रोश व्हायचा... जर कधी त्याला बूच लावायचा आग्रह झाला तर 'त्याला बूच लावणं म्हंजे रिकाम्या बाटलीला बूच लावण्यासारखं आहे' असं म्हणून झिडकारला जायचा. एखाद्याला चुकून गोटी गेली तर 'मटका लागला रे' म्हणून बाकीचे विव्हळायचे, पण तो मटकेवाला 'अरे हा शॉट अ‍ॅडव्हान्स कॅरम व्हॉल्यूम ४ मधे आहे' असं समर्थन करायचा.

सगळ्यात बाका प्रसंग म्हणजे प्रतिस्पर्धी जिंकायला आले आहेत.. शेवटची गोटी घ्यायची राहिली आहे.. ती घ्यायला नेम लावलेला आहे.. एव्हढ्यात हरणारे दोघे एकदम उठून 'जन गण मन अधिनायक जय हे' हे समारोपाचं गाणं चालू करतात.. मग कसली गोटी जातेय?

असो. असे अनेक किस्से, घटना डोळ्यासमोरून गेल्या त्यावेळेला मी अनिकेत मधे खूप वर्षांनंतर उभा होतो आणि अजूनही तसंच आहे का ते शोधत होतो. दुर्दैवाने अनिकेत मधलं 'ते' वातावरण आता नामशेष झालं आहे. आता कॅरम आणि टीटी खेळायच्या जागी एक दुकान थाटले आहे आणि खेळायला पर्यायी जागा पण दिलेली नाही असं ऐकून आहे. थोडक्यात, एका महान परंपरेचा अंत झालाय.

-- समाप्त --