Sunday, January 17, 2010

अवकाश वेध

ऑक्सफर्डच्या हिस्टरी ऑफ सायन्स म्युझियम मधे अ‍ॅस्ट्रोलेब (Astrolabe) या एका जुन्या बहुपयोगी उपकरणाबद्दलची माहिती ऐकण्याचा योग नुकताच आला. ते यंत्र पूर्वी त्या म्युझियममधे पाहिलेलं होतं पण त्याचा वापर तेव्हा कसा करायचे ते समजलं नव्हतं. त्यामुळे ते भाषण ऐकायला उत्सुकतेने गेलो.

अ‍ॅस्ट्रोलेब हे वेळ बघण्यासाठी तसेच आकाशातील ग्रह व तारे यांच्या जागा शोधण्यासाठी वापरलं जायचं. ते ८ व्या शतकात मुस्लिम देशामधे वापरायचे. तिथून १२ व्या शतकात ते युरोपात आले. भाषणात ते यंत्र दाखवून ते कसं वापरायचं याचं व्यवस्थित प्रात्यक्षिक दिलं. त्या दिवसापासून यावर एक लेख लिहायला पाहीजे असं डोक्यात घोळत होतं. पण प्रत्यक्ष हातात यंत्र न घेता आणि तुम्ही समोर नसताना तुम्हाला ते कसं सांगावं याचा विचार चालू होता आणि अधिक माहितीसाठी गुगल करणंही चलू होतं. इंटरनेट हे एक मोठं रद्दीच दुकान आहे, त्यात काहीही सापडतं किंवा कधी कधी काहीच नाही. सुदैवाने माझ्या हाती एक खजिनाच हाताला लागला. हा लेख त्या मिळालेल्या खजिन्याबद्दल आहे.

अ‍ॅस्ट्रोलेबचा इतिहास इथे आहे.

या व्हिडिओत अ‍ॅस्ट्रोलेबने वेळ कशी बघायची याचं प्रात्यक्षिक दिसेल.

अ‍ॅस्ट्रोलेब सारखा चालणारा कंप्युटर प्रोग्रॅम एका स्थळावर मिळाला. तो जुन्या काळच्या डॉसवर चालणारा आहे. त्याच्या प्रोग्रॅमरच्या म्हणण्या प्रमाणे तो विंडोजवर पण चालतो. माझ्या पीसीवर तो प्रोग्रॅम चालवल्यावर माझ्याकडच्या विंडोजने मोठ्ठा आ वासला, तो रिसेट केल्यावरच बंद झाला. मग आणखी शोधाशोधी केल्यावर बरेच वेगवेगळे प्रोग्रॅम सापडले. त्यातले काही अ‍ॅस्ट्रोलेब सारखे चालणारे आहेत तर काही नाही. त्यातले काही फुकट आहेत तर काही नाही. मी या लेखात एका फुकट प्रोग्रॅमचा दुवा आणि तो कसा चालवायचा याची थोडी फार माहिती दिलेली आहे. पण सगळेच आकाशाचा वेध घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हे प्रोग्रॅम तुम्ही सागितलेल्या शहरावरचे आकाश दाखवतात.. तुमच्या शहराचे अक्षांश व रेखांश त्यात सुरुवातीला घातल्यावर. नासाने १५ जानेवारीच्या सूर्यग्रहणाचा मार्ग दाखविण्यासाठी गुगलचा नकाशा वापरून एक स्थळ बनवले आहे. हा नकाशा झूम करून आपल्या शहरावर टिचकी मारली तर अक्षांश रेखांश कळतील. या स्थळावरून आपल्याला पाहीजे त्या शहराचे अक्षांश व रेखांश मिळवता येतील.

एक मुद्दाम नमूद करण्यासाठी गोष्ट म्हणजे या प्रोग्रॅममधे आपल्याला पाहिजे ती तारीख आणि वेळ घालता येते. त्या वेळेची आकाशातली ग्रह तार्‍यांची स्थिती कळते. मग आपल्याला हवी तशी वेळ मागे पुढे करून ती स्थिती कशी बदलतेय ते प्रत्यक्ष बघता येते, थोडक्यात अ‍ॅनिमेशन करता येते. अ‍ॅनिमेशन बघण्यासाठी मी नुकतंच झालेलं १५ जानेवारी २०१० चं सूर्यग्रहण त्यावर पाहीलं. आधी मी प्रोग्रॅममधे ऑक्सफर्ड हे शहर घातलं होतं. पण अ‍ॅनिमेशन मधे ग्रहण दिसेना, चंद्र नुसताच सूर्याच्या बाजूने जात होता. मग लक्षात आलं की ते ग्रहण इंग्लंडमधे दिसणारच नव्हतं. नंतर रामेश्वरचे अक्षांश रेखांश घातल्यावर दिसलं. कुठल्याही जागेचे अक्षांश रेखांश घालून तिथलं आकाश घरबसल्या बघता येणं हा या प्रोग्रॅमचा अजून एक मोठा फायदा आहे.

इथे 'हेलो नॉर्दर्न स्काय' हा प्रोग्रॅम मिळेल. याचं नावं जरी 'हेलो नॉर्दर्न स्काय' असलं तरी दक्षिण गोलार्धातील शहरांसाठी सुध्दा हा प्रोग्रॅम चालतो (मी चालवून नाही बघितला अजून). याची दोन व्हर्जन्स आहेत. सुरुवातीला त्यातलं Small basic package HNSKY230.exe हे घेऊन Install करा. प्रोग्रॅम सुरू करून प्रथम File->Settings मधे जाऊन तुम्हाला हव्या त्या शहराचे अक्षांश रेखांश व टाईमझोन घाला.

माझं खगोलशास्त्राचं ज्ञान यथातथाच असल्यामुळे, या प्रोग्रॅममधे वापरलेल्या संज्ञा आणि प्रोग्रॅममधून काय आणि कसं दिसतं ते समजून घेण्यात बराच वेळ गेला. तुमचा कदाचित तेवढा वेळ जाणार नाही. तरीही माहिती नसणार्‍या वाचकांचा वेळ जाऊ नये म्हणून मी काही माहिती खाली दिली आहे ती उपयोगी पडेल असं वाटतं.

हा प्रोग्रॅम सेलेस्टियल स्फिअर (वैश्विक गोल) दाखवतो. वैश्विक गोल म्हणजे पृथ्वी भोवती गृहित धरलेला, प्रचंड आकाराचा एक गोल. याचा आणि पृथ्वीचा मध्यबिंदू एकच असतो. या संबंधीच्या काही संज्ञा खालील आकृतीवरून समजतील. आपलं शहर उत्तरेला जेवढं जास्त तेवढा धृव तारा आकाशात जास्त उंच (लॅटिट्युड) दिसतो. पृथ्वीचा मध्यबिंदू आणि पृथ्वीचा उत्तर धृव यातून काढलेली सरळ रेषा वैश्विक गोलाला जिथे छेदते तो नॉर्थ सेलेस्टियल पोल (वैश्विक उत्तर धृव). अशीच व्याख्या वैश्विक दक्षिण धृवाची करता येते. या गोलाचेही विषुववृत्त असते त्याला सेलेस्टियल इक्वेटर (वैश्विक विषुववृत्त) म्हणतात. पृथ्वीचं विषुववृत्त सर्व बाजूंनी वाढवले तर ते वैश्विक गोलाला जिथे मिळेल ते. पृथ्वीचा मध्यबिंदू आणि आपलं डोकं यातून काढलेली सरळ रेषा वैश्विक गोलाला जिथे छेदते तो बिंदू म्हणजे झेनिथ! आपल्या शहराच्या जमिनीला स्पर्श करून जाणारे वर्तुळ सर्व बाजुंनी वाढवले तर ते वैश्विक गोलाला जिथे मिळेल ते वर्तुळ म्हणजे क्षितीज. क्षितीजाच्या वर असलेले ग्रह तारे आपल्याला दिसू शकतात, खालचे नाही.
आता असं समजा की पृथ्वीचा मध्यबिंदू आणि कुठलाही तारा यातून काढलेली सरळ रेषा वैश्विक गोलाला जिथे छेदते त्या बिंदूला तो तारा चिकटवलेला आहे. अशारीतिने सर्व ग्रह तारे चिकटवल्यावर तो गोल जसा दिसेल तसा गोल आपल्याला प्रोग्रॅममधून दिसतो. आपण गोलाकडे गोलाच्या बाहेरून पहात असतो. पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे जसजशी फिरते तसतसा हा गोल पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतोय असं भासतं. वैश्विक उत्तर धृव, झेनिथ, वैश्विक दक्षिण धृव या मधून जाणारे वर्तुळ म्हणजे मेरिडियन. घराच्या गच्चीत दक्षिणोत्तर दोरी बांधा, ही दोरी मेरिडियनला समांतर असेल. आता दोरीखाली डोकं उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे करून रात्रीच्या वेळी आकाशाकडे बघत पडा. तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतील.

इक्लिप्टिक (Ecliptic) म्हणजे सूर्याचा वैश्विक गोलावरचा मार्ग. प्रोग्रॅममधे हा मार्ग तपकिरी रंगाच्या तुटक रेषेने दाखवला आहे. चंद्र आणि इतर ग्रह या रेषेच्या जवळपासच दिसतील, कारण पृथ्वीसकट सर्व ग्रह जवळपास एकाच पातळीत सूर्याभोवती फिरतात. वैश्विक गोलावर चिकटवलेल्या तार्‍यांच्या अक्षांश रेखांशाला डेक्लिनेशन (Declination) आणि राइट असेन्शन (Right Ascension) म्हणतात. प्रोग्रॅममधे हे आकडे डाव्या बाजूच्या वरच्या कोपर्‍यात दिसतात. या प्रोग्रॅमचा एक स्क्रीनशॉट खाली दिला आहे.स्क्रीनशॉट मधे क्षितीज मातकट रंगाच्या ठळक रेषेने दाखवलं आहे. क्षितिजावर SE, S, SW अशी अक्षरं दिसतील. याचा अर्थ आत्ता स्क्रीनवर दक्षिणेकडचं आकाश दिसत आहे. जर कर्सर स्क्रीनच्या अगदी उजवीकडच्या, डावीकडच्या, वरच्या किंवा खालच्या बाजूकडे नेला तर एक बाण दिसेल. तिथे क्लिक केलं तर त्याबाजूचं आकाश स्क्रीनवर दिसेल. ज्या तुटक रेषेच्या आजुबाजुला चंद्र, गुरू आणि युरेनस दिसत आहेत ती रेषा म्हणजे इक्लिप्टिक.

सुरुवातीला Screen मेन्यूमधील Altitude grid, Constellations, Orthographic Projection हे सेट करा. Objects मेन्यूमधील Name all stars, stars, planets हे सेट करा. यामुळे स्क्रीनवर जरा कमी गर्दी दिसेल. Date मेन्यूमधील Enter date, time वापरून पाहिजे ती तारीख, वेळ निश्चित करता येईल. त्यानंतर F3, F4 दाबून मिनिटं मागे पुढे, F5, F6 दाबून तास मागे पुढे किंवा F7, F8 दाबून दिवस मागे पुढे करता येईल. यातली कुठलेही बटण सतत दाबून धरले तर अ‍ॅनिमेशन दिसेल. नंतर कधीही Date मेन्यूमधील Now वापरून चालू वेळ परत आणता येईल. त्याच मेन्यूमधील Follow System Time वापरलं तर घड्याळ जसजसं पुढे जाईल तसतशा ग्रह, तार्‍यांच्या नवनवीन जागा स्क्रीनवर दिसतील.

स्क्रीनवरच्या कुठल्याही ग्रह तार्‍यावर क्लिक केलं तर त्या वस्तूचं नाव आणि डेक्लिनेशन आणि राइट असेन्शन दिसेल. नंतर Ctrl + Alt + L दाबलं तर ती वस्तू लॉक होते. म्हणजे अ‍ॅनिमेशन मधे ती सतत स्क्रीनवर रहाते नाहीतर दिसेनाशी होण्याची शक्यता असते.

या सूचनांच्यामुळे हा प्रोग्रॅम वापरणे सुलभ होईल अशी आशा आहे. अवकाश वेधाचा आनंद लुटा.

हा प्रोग्रॅम हान क्लाइन या डच माणसानं बरीच वर्ष घालून लिहीला आहे. तो एक हौशी खगोल अभ्यासू आहे. हा प्रोग्रॅम लिहून तो फुकट इतरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे. इतकच नाही तर तुम्ही त्याला काही अडचणी आल्यास मेल टाकून प्रश्न विचारू शकता. त्याचा मेल आयडी आहे - han.k@hnsky.org. प्रोग्रॅम आवडला तर त्याला आभाराचा संदेश जमलं तर पाठवा.

हा प्रोग्रॅम एक उत्कृष्ट शैक्षणिक साधन आहे. याचा वापर करून अवकाशाचा अभ्यास करा. आपल्या ओळखीच्या सर्वांना हा जरूर द्या, दाखवा, शिकवा. मी अजून हा प्रोग्रॅम पूर्णपणे वापरायला शिकलेलो नाही, परंतु जेव्हा काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी कळतील तेव्हा मी याच लेखात त्या टाकेन.

== समाप्त ==

जाता जाता --

आकाशात काही ग्रह कधी कधी उलटे फिरताना दिसतात. वास्तविक सर्वच ग्रह सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुध्द दिशेने फिरतात. पण पृथ्वीवरून पहाताना काही ग्रह मधेच उलटे जाताना दिसतात. असं का होतं याच या अ‍ॅनिमेशन मुळे व्यवस्थित कळेल. वक्री मंगळ