Sunday, July 13, 2008

पुण्याची वाट

काही शब्दांचा किंवा वाक्प्रचारांचा अर्थ समजलेला असतो पण अनुभवाची जोड मिळाल्याशिवाय उमजत नाही. पोटात गोळा येणे याचा अर्थ उमगायला जायंट व्हील किंवा रोलरकोस्टर मधे एकदा तरी बसायला लागतं. असंच एकदा २५-३० वर्षांपूर्वीचं जुनं पुणं डोळ्यासमोर तरळलं आणि आमूलाग्र बदल होण्याचा अर्थ तत्काळ उमगला.

जुनं पुणं एक शांत, छोटं व सुंदर असं आटपाट नगर होतं. इतकं की लोकं, विशेषतः मुंबईकर, पुण्याला पेन्शनरांचं गाव म्हणून हिणवायचे. पण पुणेकरांना त्याची फिकीर नव्ह्ती. निवांतपणा त्यांच्या नसानसात भिनलेला होता. इथली दुकानं सकाळी ४ तास आणि संध्याकाळी ४ तास उघडी असायची, ती सुध्दा लोकांवर उपकार म्हणून. गिर्‍हाईक आलंच तर दुकानदार पेपरात खुपसलेली मान वर करण्याची सुध्दा तसदी घेत नसत. वरती एखाद्या गिर्‍हाईकानं चुकून अमुक एक वस्तू दाखवता का असं विचारलच तर 'विकत घेणार असाल तर दाखवतो' असं म्हणण्याचा माज फक्त पुणेरी दुकानदारच करू शकत.

तेंव्हा पुण्याच्या पोलीसांना 'ट्रॅफिक जॅम' याचा अर्थ उमगलेला नव्हता. स्कूटर ही वस्तू दुर्मिळ होती कारण ती नंबर लावून मिळायला १०-१० वर्ष लागायची. चारचाकी बहुतेकांच्या आवाक्याबाहेरच होती. तमाम पुणं सायकलवर चालायचं. अर्ध्या तासात सायकलवर अख्खं पुणं पालथं घालता यायचं. पोलीस (म्हणजे मामा) चिरीमिरीसाठी बिचार्‍या सायकलस्वारांना कधी दिवा नाही म्हणून तर कधी डबलसीट घेतलं म्हणून पकडायचे. ओव्हरब्रीज लांब राहीले, पुण्यात सिग्नलसुध्दा फार नव्हते.

शांतता तर इतकी होती की पेशवेपार्क मधल्या सिंहांना आपण जंगलातच आहोत असे वाटायचे. त्यांच्या गर्जना आणि त्या पाठोपाठ कोल्हे, माकडं मोर अशा प्राण्यांचा भेदरलेल्या स्वरातील आरडाओरडा रोज रात्री पार टिळक रोड पर्यंत ऐकू यायचा.

आता या आटपाट नगराचं झटपट नगर झालं आहे. पुणेकरांनी त्यांचा प्राणप्रिय निवांतपणा हरवला आहे. हल्ली दुकानं सकाळी ६ पासून रात्री ११ पर्यंत उघडी असतात. दुकानदार पेपर वाचत बसायाच्या ऐवजी रस्त्यात उभं राहून गिर्‍हाईकांना दुकानात यायची गळ घालतात. ट्रॅफिक जॅम कुठे होत नाही हे शोधण्यासाठी पोलीसांनी खुद्द CID ला पाचारण केलं आहे असं ऐकून आहे. पुण्यात काम शोधायला आलेले अती गरीब लोकच फक्त आता सायकल चालवतात. पण तेही वर्षा दोन वर्षात स्कूटर घेतात. मामा तर सायकलवाल्यांकडे ढुंकून देखील बघत नाहीत कारण त्यांच्या गळाला हल्ली बडी बडी धेंड लागतात.

बिचार्‍या सिंहांची तर वाचाच गेली आहे. त्यांच्या गर्जना त्यांनाच ऐकू येत नाहीत म्हणून ते हवालदील झाले आहेत व त्यांनी मौनव्रत धारण केलं आहे. पिंजर्‍याच्या एका कोपर्‍यात शेपूट पायात घालून ते निपचीत पडलेले असतात. मूकबधीर शाळेसारखं या प्राण्यांसाठी काय करता येईल यावर नगरपालीकेत चर्चा सुरू आहेत.

लहानपणी मी पुणं विद्येचे माहेरघर आहे असं ऐकलं होतं. मी शाळेत जायला लागेपर्यंत विद्येचे कुणीतरी अपहरण केलं आणि ती पुण्यातून नाहीशी झाली होती. आतातर ती मानहानीला कंटाळून तुकारामासारखी सदेह वैकुंठाला गेल्याची वदंता आहे.

पुणं महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी होती. सगळ्यात शुध्द मराठी पुण्यात बोलली जाते अशी ख्याती होती. इथले दैनंदिन व्यवहार मराठीतूनच चालायचे. अगदी परप्रांतीयसुध्दा मराठी बोलायचे. आता मराठी बोलणारा माणूस पुण्यातून नामशेष झाला आहे. सर्व व्यवहार हिंदीतून चालतात. रिक्षावाले, बस कंडक्टर यांच्याशीसुध्दा हिंदीतून बोलायला लागतं म्हणजे फारच झालं. आता खुद्द लो. टिळकांना पुनर्जन्म घेऊन 'निवांतपणा माझा जन्मसिध्द हक्क आहे' असं पुणेकरांना बजावायला लागणार आहे.

थोडक्यात, आमूलाग्र बदल आणि पुण्याची वाट हे निगडीत (पुण्याजवळच्या निगडी गावांत नव्हे) आहेत. आणि मला 'आमूलाग्र बदला'चा उमजला तो अर्थ असा - आमूलाग्र बदल करणे म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीची पूर्ण वाट लावणे!