Wednesday, April 13, 2011

स्मोकिंग किल्स

जेम्स बाँडला जसं 'लायसन्स टू किल' असतं तसं आम्हाला गणपती उत्सवात 'लायसन्स टू चिल' मिळायचं. मिळायचं म्हणणं तितकसं बरोबर नाही.. आम्ही तो आमचा जन्मसिद्ध हक्क समजायचो.. पाली जशा कुणाच्याही घरातल्या भिंतीं आपल्याच बापाच्या समजतात तसा! रात्री ११ पर्यंत घरी येण्याची घातलेली मर्यादा पहिल्या दिवशी १२, दुसर्‍या दिवशी १ अशी विसर्जनापर्यंत हळूहळू दुसर्‍या दिवशीच्या सकाळ पर्यंत रबरबँड सारखी कशी ताणायची हे पोरं आपोआप शिकतात. तेव्हा आम्ही पौगंडावस्थेतले, म्हणजेच पर्मनंट गंडलेले होतो! गणपतीच्या नावाखाली आम्ही काय काय बघायचो आणि कुठे कुठे फिरायचो हे जर आई वडिलांना कळलं असतं तर आम्हाला आमचं घर पण गणपतीसारखं लांबूनच बघायला लागलं असतं!

अशाच एका उत्सवात माझी सिगरेटशी तोंडओळख झाली आणि त्याचं पर्यवसान तिची ओढ लागण्यात झालं! तेव्हा आम्ही उच्चभ्रू लोकांसारखं धूम्रपान करायचो नाही तर बिड्या फुकायचो किंवा मद्यपान करायच्या ऐवजी बेवडा मारायचो. आमचे मध्यमवर्गीय शब्द अगदी क्रूड असले तरी नेमके होते! त्या काळी फुकणार्‍यांकडे न फुकणारे आदराने बघायचे, हल्ली मी इथल्या शाळेत जाणार्‍या पोरापोरींकडे बघतो तसंच! त्यामुळे त्यांच्या समोर बिड्या पिताना उगीचच सैन्याची मानवंदना घेणार्‍या पंतप्रधानासारखं ग्रेट वाटायचं. बिड्या फुकण्यातून बेफिकीर वृत्ती, धाडसीपणा, आत्मविश्वास, बंडखोर प्रवृत्ती इ. इ. अधोरेखित होते असा आमचा एक गंड होता. तसं काही नसतं हे आत्ता कळतंय!

'पीनेवालोंको पीनेका बहाना चाहीए' हे बिडी पिणार्‍याला देखील १००% लागू पडतं.. कधी नुसता वेळ घालवायला, कधी एखादं काम संपवलं म्हणून उदार मनाने स्वतःलाच बक्षीस म्हणून, कधी वाट पहाता पहाता, कधी एकटेपणा मिटवायला, कधी गर्दीत एकटेपणा मिळवायला, कधी विचाराला चालना देण्यासाठी, कधी विचार मिटवण्यासाठी, कधी नुसती गंमत म्हणून, कधी केवळ दुसर्‍याला कंपनी म्हणून, कधी केवळ आराम करायचा म्हणून तर कधी काहीही कारण नाही म्हणून.. एक बिडी माराविशीच वाटते!

बिडी ही अनेक न्यूनगंडांची भुतं भस्मसात करणारी आमची एक ज्वलंत आणि प्रभावी मशाल होती. चार्ली चॅप्लिन कसा प्रत्येक गोची नंतर आपल्या मळक्या टायची गाठ ठीक करून, गबाळे कपडे झटकत, जणू काही झालंच नाही अशा आविर्भावाने पुढे जातो? तसं केल्यानं त्याची नाचक्की टळणार असते का? नाही! पण त्याला नुसता टाय ठीक केल्याने एक मानसिक आधार मिळतो.. आणि वाटतं की स्वतःची ढासळलेली प्रतिष्ठा सावरली आहे म्हणून! तसंच आम्ही पदोपदी ढासळणार्‍या प्रतिष्ठेला बिडीचा आधार द्यायचो. त्यामुळे, ती अशी एकमेव गोष्ट जी माझ्या आनंदात, दु:खात, मानहानीत, भांडणात, प्रेमभंगात, उपेक्षेत.. मनाच्या सर्व अवस्थेत.. सदैव तोंडात राहिली.

त्या काळी फुंकणार्‍यांचा छळ होत नसे. हल्ली सारखे ते अस्पृश्य नव्हते. उलट, त्यांना आपुलकीने वागविले जाई! विमानात मागे फुकायची खास सोय असायची, रेल्वेत, बस मधे किंवा हॉटेलात कुठेही ओढता यायची. इतकंच काय पण ऑफिसात काम करताना कामाच्या बरोबरीने बिडीची पण ओढाताण चालायची.

धूर तोचि सोडिता, वलय उमटले नवे
आज लागले सखि, व्यसन हे मला नवे

असं मैत्रिणीला बिनदिक्कतपणे सांगू शकणारे काही निधड्या छातीचे बाजीराव, होणार्‍या बायको पुढे मात्र पळपुटे बाजीराव व्हायचे! त्यामुळे, जर भावी बायको बरोबर असताना मित्रांची गाठ पडली तर त्यांची प्रचंड कुचंबणा व्हायची. त्यात ती 'शी! काय तुझे मित्र सिगरेटी फुंकतात!' असं म्हणाली तर तोंड दाबून बुक्क्यांची शिक्षा! ओबामाला प्रेसिडेंट व्हायची मुळीच खात्री वाटत नसणार. नाहीतर त्याने त्याच्या बायकोला प्रेसिडेंट झाल्यावर सिगरेट सोडेन असं वचनच दिलं नसतं!

बिडीने मानसिक बाजू संभाळली असली तरी आर्थिक बाजू मात्र कमकुवत केली होती. बरं, नुसत्या बिडीचा खर्च नव्हता, इतर अ‍ॅक्सेसरीजचा पण खर्च असायचा.. बिडी बरोबर चहा लागायचाच.. शिवाय नंतर वास मारायला पेपरमिंट सारखं काहीतरी! मग घरी खोटं बोलून पैसे लाटणे, तसे नाही मिळाले तर चक्क चोरणे किंवा बापाच्या बिड्या ढापणे हे नोकरी लागे पर्यंत तरी अपरिहार्यच होतं.

परंतु, जगाच्या पाठीवर निर्विघ्नपणे आणि उन्मुक्तपणे बिड्या ओढणार्‍यांच्या आनंदाने काही लोकांच्या पोटात मळमळायला लागलं.. 'सिगरेटमुळे कॅन्सर होतो' अशी हूल उठवून ती मळमळ बाहेर आली. त्या नंतर सर्वांनी हळूहळू फुंकणार्‍यांची गळचेपी सुरू केली. त्यांना वाळीत टाकण्यात येऊ लागलं. इथे ओढू नका, तिथे ओढू नका.. शक्यतो कुठेच ओढू नका म्हणून आमच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी चालू केली! तो पर्यंत स्त्री-मुक्तीचं वारं प्यायलेल्या काही बायका बिड्या प्यायला लागल्या होत्या. पण फुकणार्‍यांनी कधीच संघटित होऊन 'फुकण्यावर बंधनं आल्यामुळे आमच्या भावना दुखावतात' असं ओरडून जाळपोळ वगैरे केली नाही त्यामुळे गळचेपी काही टळली नाही! ऑफिसात, हॉटेलात, विमानात इ. सगळीकडे ओढायला बंदी आली.. कडाक्याच्या थंडीत सत्रांदा ऑफिस बाहेर येऊन फुकायला गेंड्याची कातडी लागते हो!

हॉटेलातल्या स्मोकिंग झोनमुळे फुंकणार्‍या बरोबर न फुंकणारा हॉटेलात गेला तर दोघांची कुचंबणा व्हायला लागली! विमानात फुकायची बंदी पचवायला मला तरी फार अवघड गेली. आपल्याकडे बघून ती एअर होस्टेस चुकून जीवघेणी हसलीच, तर आपल्याला उलट हसता पण येत नाही.. कारण, बाबागाडीसुद्धा प्रशस्त वाटेल अशा इकॉनॉमी सीटवर बारा बारा तास कोंबून बसल्यामुळे थोबाड पण वाकडं झालेलं असतं हो!

कुठल्याही हूलीचं काय असतं, की ती खूप वेळा ऐकल्यावर आपल्याला खरीच वाटायला लागते.. वानगी दाखल पूर्वीची वाय२केची हूल घ्या नाहीतर सध्याची जोरात चाललेली ग्लोबल वॉर्मींगची हूल घ्या! परिणामी, बिडी ओढताना माझं मन मला ओढू लागलं, अपराधी वाटायला लागलं. त्यात एका इकॉनॉमिस्ट मित्राने, वेडीवाकडी गणितं मांडून, मी जर कधी सिगरेट ओढलीच नसती तर पुण्यात माझे किमान दोन फ्लॅट तरी झाले असते हे दाखवून दिलं. शिवाय, कॅन्सरमुळे पुढे होणार्‍या हॉस्पिटलच्या आणि उपचाराच्या आकड्यांनी त्याने माझे डोळे पांढरे केले. डॉक्टर मित्र 'सिगरेट तुझा जीव घेणार' असं बजावू लागले. मग मात्र सिगरेट सोडायला पाहीजे असं तीव्रतेने वाटायला लागलं.

प्रत्यक्षात तसं करणं किती कठीण आहे हे फुकणार्‍यालाच माहीती! बिडीच्या तलफेचा बीमोड करणं हे काडीमोड घेण्यापेक्षा अवघड आहे. काही जणांनी बिड्यांची तल्लफ मारण्यासाठी मावा किंवा खूप काय काय नंबरं असलेली पानं खाऊन पाहिली. काही दिवस जमलं ते! पण नंतर बिडी आणि पान या दोन्ही शिवाय त्यांचं पान हलेना! निकोटिनचा पॅच किंवा निकोटिन विरहित बिड्या असली उत्पादनं विकून काही कंपन्यांना चांगले पैसे सुटतात पण लोकांची बिडी काही सुटत नाही.. कंपन्यांनाही ती सुटायला नकोच असते म्हणा! काही दिवस सोडणं जमल्यावर आपल्या मनावर आता ताबा ठेवता येतो अशा भ्रामक समजूतीमुळे परत ओढणं चालू होतं. मला तरी, 'सिगरेट सोडणं सोप्प असतं. मी खूप वेळा सोडली आहे' या मार्क ट्वेनच्या उक्तीची भरपूर प्रचिती आली. पण धरसोड वृत्ती दाखवत शेवटी मी बिडीमुक्त झालो.

एके दिवशी, आनंदाने एका इकॉनॉमिस्ट मित्राला ही बातमी दिल्यावर त्यानं मला वेड्यात काढला. त्याच्या मते मी बिड्या फुकून देशाच्या इकॉनॉमीला हातभार लावत होतो. सगळ्यांनी फुकणं सोडलं तर सिगरेट कंपन्या बंद पडतील, तिथले कामगार बेकार होतील, तंबाखूचे शेतकरी आत्महत्या करतील, सिगरेट पॅकेजिंग करणार्‍या कंपन्या गाळात जातील, सिगरेट मार्केटिंग बंद झाल्याचा परिणाम जाहिराती बनविणार्‍या कंपन्यांचा धंदा कमी होण्यात होईल, तंबाखू आणि सिगरेटींच्या वाहतूकदारांचा धंदा बसेल, कोपर्‍या कोपर्‍या वरच्या पानपट्ट्या आणि त्यांना सिगरेटी पुरविणारे वितरक देशोधडीला लागतील, कॅन्सरचं प्रमाण कमी झाल्यामुळे हॉस्पिटलांचा धंदा कमी होईल, त्यामुळे त्यांची डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर माणसांची गरज कमी होईल, त्याचा परिणाम शिक्षण संस्थांवर होईल. बिड्या फुकणार्‍यांमुळे सामान्य जनतेला टॅक्स कमी पडतो. कारण, 'धूम्रपान आरोग्याला हानीकारक आहे' या नावाखाली सरकार भरपूर टॅक्स लावून फुकणार्‍यांची पद्धतशीर वाटमारी करतं. सगळ्यांनी फुकणं सोडलं तर कोट्यवधी रुपयांचं हे उत्पन्न बंद होईल आणि ते पैसे सरकारला सामान्य जनते वरचा टॅक्स वाढवून वसूल करण्या शिवाय काय पर्याय राहील बरं?.. माझ्या डोक्यात एक भुंगा सोडून तो नष्ट झाला.

आयला, बिडी जाळल्यामुळे इतक्या लोकांच्या पोटाची आग विझत असेल? गंभीर समस्या आहे ही! यावर नीटच विचार करायला पाहीजे.. आपोआप पावलं जवळच्या पानपट्टी पाशी थांबली.. एक मोठ्ठा झुरका घेऊन खोsल सुस्कारा सोडल्यावर पहिलं काय रजिस्टर झालं असेल तर..

स्मोकिंग किल्स! अँड येस, नॉट स्मोकिंग किल्स टू!

====== समाप्त ======