Saturday, July 20, 2024

वय की आकडा - एक प्रौढ चिंतन

 काही लोक 'वय काय? नुसता एक आकडा तर आहे' असं एखाद्या तत्वज्ञान्याचा आव आणून म्हणतात.. किंबहुना, असं म्हणायची एक फॅशनच झाली आहे. याच लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या की त्यांचा आकडा वाढल्याची जाणीव अस्वस्थ करून जाते. लग्न जमवायच्या वेळेला या तर आकड्याला अअसामान्य महत्व येतं. वयाला एक आकडा म्हणणं म्हणजे सजीवाला एक हाडाचा सापळा किंवा अणुंचा ढिगारा म्हणण्याइतकं अरसिकपणाचं आहे. वय एक आकडा असला तरी तो आपल्याला लावता येत नाही. खरं म्हटलं तर वयाला एका आकड्यापेक्षा इतरही काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहेत.

वय एक प्रवाही आकडा आहे. एकदा जन्म घेण्याचा नळ सुटला की वयाचा प्रवाह सुरू होतो. हा प्रवाह डायोड मधून जाणार्‍या विद्युतप्रवाहा प्रमाणे फक्त एकाच दिशेने जाऊ शकतो.. त्याला मागे जाणं माहिती नाही आणि निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने पुढे पण जाता येत नाही. प्रवाहाला अनेक अडथळे येतात पण त्याचा वेग कधीही कमी होत नाही. कुठेही विचार करीत थांबायला त्याला वेळ नसतो. कुठल्याही भोवर्‍यात सापडून गोल गोल फिरणं त्याच्या नशिबात नसतं. इतर प्रवाह याला येऊन मिळत नाहीत किंवा हा दुसर्‍या प्रवाहाला मिळत नाही. एखाद्या उंच कड्यावरून कधीही धबधब्यासारखा कोसळत नाही. साठीशांत किंवा सहस्रचंद्रदर्शन शांत असल्या कुठल्याही शांतिवनात न रमणारा हा प्रवाह फक्त भगवंतरावांनी मृत्युचा कंट्रोल ऑल्टर डिलीट मारला की खंडतो. असा प्रवाह जो हातमागाच्या धोट्यासारखा काळाच्या कपड्यातून मार्ग काढत काढत त्यावर अनुभव आणि आठवणी याचं सुंदर भरतकाम करून जातो, तो नुसता आकडा कसा असेल? 

वय ही काहीही न करता वाढणार्‍या काही मोजक्या गोष्टीतील एक गोष्ट आहे.. काँग्रेस गवत, केस व नखं या आणखी काही! वयाचे चेंडुसारखे टप्पे देखील असतात. प्रत्येक टप्प्याचं किंवा वयोगटाचं वागणं व बोलणं ढोबळमानाने सारखं असतं. लहान मुलं निरागस असतात, त्यांना संभाळणं हा जितका आनंददायी व मजेशीर अनुभव असतो तितकाच तो सहनशीलतेचा अंत बघणारा  व कष्टप्रद असतो. त्यांना सदोदित आपलं लक्ष वेधून घ्यायचं असतं. मुलं स्वकेंद्री, अहंकारी, हट्टी, उत्साही, चंचल, अस्वस्थ व सतत प्रश्नांची सरबत्ती करणारी असतात. आहेत ते नियम मोडून मर्यादा ओलांडायचा बंडखोरपणा करणे, चिडचिड करणे, मित्रमैत्रिणींशी तासनतास बोलणे पण घरी तुटक वागणे असं तरुण वर्गाचं सर्वसाधारण वागणं असतं. लवकर काहीही न आठवणे, वेगवेगळे अवयव दुखणे, सतत कुठली न कुठली औषधं घेणे, विसरभोळेपणा, ऐकायला कमी येणे व चिडचिड करणे ही म्हातार्‍यांची वैशिष्ट्ये! त्यामुळेच बहुतेक आयुष्यात 'वय होण्याला' फार महत्व दिलं जातं! प्रत्येक गोष्ट करण्यासाठी 'वय व्हावं' लागतं, जरी क्षणोक्षणी 'वय होत'च असलं तरीही! 

बहुतेक वेळा इतर लोक आपल्याला वयाची जाणीव करून देतात.  "शेंबुड पुसायची अक्कल नाही आणि म्हणे माझं लग्न करा!, "एव्हढा मोठ्ठा घोडा झालाय तरी काही मदत करेल तर शप्पथ!", "अर्धी लाकडं गेली मसणात तरी हे असं वागणं?" किंवा "म्हातारचळ लागलाय मेल्याला" असल्या शेलक्या टोमण्यांनी वेळोवेळी वयाची जाणीव जाणीवपूर्वक करून दिली जाते. आपली चालू आहे ती नोकरी वा काम नको असतं तसं वयाचं पण आहे.. सध्या चालू आहे ते वय बहुतेकांना नकोच असतं. त्यासाठी काही लोकं वय लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.. या लोकांमुळे एज डिफाइंग क्रिम, कलपं व बोटॉक्स सारख्या वय झाकण्याच्या गोष्टी विकणारे मोठे उद्योग अस्तित्वात आले आहेत. पण कधी कधी पांढरे केस कलपातून डोकं बाहेर काढून एखाद्याचं उखळ पांढरं करू शकतात.

"Age is an issue of mind over matter. If you don't mind, it doesn't matter" असं मार्क ट्वेन म्हणून गेला आहे. पण हे शहाणपण वय वाढल्याशिवाय येत नाही. 

आणि एकदा ते आलं की हे समजतं की आपलं आयुष्य चालतं एखाद्या ड्रायव्हरलेस कारसारखं ! कुठे जायचं ते माहिती असतंच, कसं जायचं ते निघायच्या वेळेला भगवंतरावांनी प्रोग्रॅम केलेलं असतं. आपल्या हातात काहीच नसतं.

तेव्हा सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द राईड!!!

== समाप्त == 

No comments: