Friday, October 16, 2020

महाराजाची विहीर

इंग्लंड मधील काही भू-प्रदेशांना उत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्यानं नटलेले भू-प्रदेश ( Area of Oustanding Natural Beauty) असा दर्जा इथल्या सरकारने दिलेला आहे. ऑक्सफर्डच्या जवळ असे दोन भू-प्रदेश आहेत.. कॉट्सवोल्ड आणि चिल्टर्न! छोटे छोटे हिरवेगार डोंगर, हिरव्या रंगाच्या विविध छटांची झाडं, मधेच वहाणारी एखादी नदी आणि रमणीय शेतं या नेहमीच्याच गोष्टी विविध बाजुंनी वेगवेगळ्या कोनांमधून इतक्या विलोभनीय दिसतात की तिथून हलावसं वाटत नाही. दोन्ही प्रदेशात बरीच छोटी छोटी सुंदर गावं वसलेली आहेत. मी त्यातल्याच चिल्टर्न भागातील हेंली-ऑन-थेम्स या थेम्स नदीवर वसलेल्या गावाला भेट द्यायला जायचं ठरवलं. ऑक्सफर्ड पासून हे केवळ 25 मैलांवर ( 40 किमी) असल्यामुळे जायला फार वेळ लागणार नव्हता. मार्गी लागल्यावर हेंली गावाच्या अलिकडे रस्त्यातील एका पाटीने लक्ष वेधलं (चित्र-1 पहा). रस्त्यावरची पाटी
चित्र-1: रस्त्यावरची पाटी

तपकिरी रंगाच्या पाटीवर 'Maharajah's Well' असं वाचल्यावर मी नक्की चुकीचं वाचलं याची मला खात्रीच होती. इकडे प्रेक्षणीय स्थळांच्या पाट्या तपकिरी रंगाच्या करण्याची पद्धत असल्यामुळे बघू या तरी हे एक काय आहे ते असा विचार करून मी पटकन गाडी तिकडे वळवली व स्टोक रो या गावात ठेपलो. तिथे जे काही पाहीलं आणि वाचलं ते सगळंच कल्पनेच्या पलिकडलं आणि आत्तापर्यंतच्या माझ्या समजुतीला तडा देणारं निघालं. नंतर मी त्या बद्दल नेट वरतीही वाचलं त्याचा सारांश पुढे देतो आहे. बनारसचे महाराज श्री ईश्वरी प्रसाद नारायण सिंग (1822-1889) व त्या वेळचा अ‍ॅक्टिंग गव्हर्नर जनरल एडवर्ड रीड यांची चांगली मैत्री होती (चित्र-2 पहा). हा काळ साधारणपणे 1857 च्या नंतरचा आहे. दोघांच्या बर्‍याच वेळा गप्पाटप्पा चालायच्या. रीडने तेव्हा राजाच्या नागरिकांसाठी एक विहीर बांधली होती. तो चिल्टर्न भागातल्या इप्सडेन गावात 1806 साली जन्माला आला. नंतर 1828 साली भारतात आल्यावर वेगवेगळ्या हुद्यांवर काम करत करत 1860 मधे, तब्बल 32 वर्षं भारतात घालवल्यावर, निवृत्त होऊन परत इप्सडेन मधे येऊन रहायला लागला. भारतात तो स्थानिक लोकांशी मिळून मिसळून रहायचा व त्याने भारतीय भाषातील प्राविण्याबद्दल सुवर्णपदक पण मिळवलं होतं. भारतीय लोकांना त्याच्याबद्दल आपुलकी वाटण्याचं हे सुद्धा कारण असू शकेल. तो लहानपणी स्टोक रो गावाजवळ चेरी गोळा करायला यायचा. इप्सडेन पासून स्टोक रो फार लांब नाही.. सुमारे 4 मैल (6 किमी) अंतर आहे. चिल्टर्नच्या या भागात उन्हाळ्यात नेहमी पाण्याची टंचाई असे त्या काळी! थेम्स नदी जरी या भागातून वहात असली तरी ती दररोज पुरेसं पाणी सहजपणे आणण्याइतकी जवळ नव्हती. एकदा तो चेरी आणायला आलेला असताना त्याला एक बाई तिच्या लहान मुलाला त्यानं घरातलं शेवटचं पाणी पिऊन संपवलं म्हणून मारताना दिसली. त्यानं मधे पडायचा प्रयत्न केल्यावर त्या बाईने त्याला पण बदडायची धमकी दिली. ही गोष्ट त्याने एकदा राजाला सांगितल्यावर राजानं त्यांच्या मैत्रीखातर व रीडने राजाला केलेल्या मदतीची परतफेड म्हणून स्वखर्चानं त्या भागात विहीर बांधायचं ठरवलं. महाराज श्री ईश्वरी प्रसाद नारायण सिंग
चित्र-2: महाराज श्री ईश्वरी प्रसाद नारायण सिंग

स्टोक रो गावातली ही विहीर बांधायला 14 महिने लागले व ती मे 1864 मधे खुली झाली. 368 फूट खोल व 4 फुट व्यासाची ही विहीर बांधायला तेव्हा 353 पौंड 13 शिलिंग व 7 डाईम खर्च आला. विहिरीवरचा रहाट व त्या वरील सुंदर घुमट बांधायला आणखी 39 पौंड व 10 शिलिंग लागले. चित्र 3, 4 व 5 मधे विहीर, रहाट व बाजूचा परिसर दिसेल. रहाटावरचा हत्ती 1870 मधे बसवला. नुसती विहीर बांधून राजा थांबला नाही तर त्यानं विहीरीची देखभाल करणार्‍या माणसाला रहाण्यासाठी एक घर पण बांधलं (चित्र 6). विहिरीजवळील चार एकर चेरीची बागही राजाने घेऊन विहिरीच्या परिसरात समाविष्ट केली. महाराजाची विहीर व परिसर
चित्र-3: महाराजाची विहीर व परिसर

महाराजाची विहीर
चित्र-4: महाराजाची विहीर

रहाट व त्यावरील सोनेरी हत्ती
चित्र-5: रहाट व त्यावरील सोनेरी हत्ती

विहीर रक्षकाचं घर
चित्र-6: विहीर रक्षकाचं घर

विहीरीची माहिती
चित्र-7: विहीरीची माहिती

विहीरीचा विश्वस्त म्हणून रीडने त्याच्या उतारवयापर्यंत काम पाहीलं. या विहीरीचा वापर नागरिकांनी अगदी दुसर्‍या महायुद्धापर्यंत केला. 1961 मधे राजाच्या वंशजांने एलिझाबेथ राणीला विहीरीची प्रतिकृती भेट दिली. त्या नंतर तिची डागडुजी करून 1964 साली विहीरीची शताब्दी देखील साजरी केली. त्या साठी राणीचा नवरा प्रिंस फिलिप व राजाचे प्रतिनिधित्व करणारे काही जण हजर होते. त्या वेळी एका कलशातून आणलेलं गंगेचं पाणी विहीरीच्या पाण्यात मिसळलं गेलं. चार्लस व डायानाच्या1981 सालच्या विवाहाची स्मृतीचिन्हं विहीरीच्या पायात त्याच साली बसवली गेली. या विहीरीची अधुन मधून डागडुजी करून ती आणि परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवला जातो. 2014 साली या विहीरीला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक समारंभ पण झाला. या विहीरीला आता ग्रेड-2 लिस्टेड बिल्डिंगचा दर्जा प्राप्त झाला आहे. 

या विहीरीने श्रीमंत भारतीय आणि राजे यांच्यात एक नवीनच पायंडा पाडला. त्यातून इंग्लंडमधे अजून काही विहिरी ( त्यातली एक इप्सडेन मधे पण झाली) तसंच लंडन मधे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. एक पिण्याच्या पाण्याची टाकी सर कोवास्जी जहांगीर(त्याचं रेडी मनी हे टोपणनाव होतं) या एका श्रीमंत पारशाने लंडनच्या रिजंट नामक प्रसिद्ध बागेत बांधली. इथे त्याची माहिती व चित्र पाहू शकता. अशी या विहिरीची कहाणी दोन कारणांमुळे अनोखी वाटते! एक म्हणजे, आपल्याला नेहमी परदेशी लोकांनी भारतात दानधर्म केल्याच्या कहाण्या ऐकायला मिळतात. मग भारतीयांनी परदेशात इतक्या जुन्या काळी ते सुद्धा देश पारतंत्र्यात असताना केलेले दानधर्म परिकथाच म्हणायला पाहीजे! दुसरं कारण म्हणजे इंग्रजी महासत्तेला चिल्टर्न या लंडन जवळच्या भागातल्या पाण्याच्या दुर्भिक्षाबद्दल नक्कीच माहिती असली पाहीजे आणि त्यांनी त्या बद्दल काहीही केलं नाही. विहीर बांधायचा खर्च सरकारला सहज परवडण्यासारखा होता. इंग्रजांचं राज्य भारतावर होतं तरीही त्यांना एका राजाकडून दान स्विकारताना काही अपमान किंवा मानहानी वगैरे वाटली नाही. तसंच नंतर हा इतिहास दडपण्याचा प्रयत्न पण झाले नाहीत. उलट, ही विहीर पर्यटकांचं आकर्षण होण्यासाठी सर्व काही केलं गेलं. 

तळटीप: या लेखातील सर्व चित्रे नेटवरून साभार! 

-- समाप्त --

Monday, March 30, 2020

आधुनिक कुटुंब!

बीबीसी वर आलेला हा एक सत्य घटनांवर आधारित लेख आहे. भविष्यात काय प्रकारची कुटुंब व्यवस्था असू शकेल याची थोडी कल्पना या लेखामुळे येते. युके बाहेर कदाचित तो न दिसण्याची शक्यता आहे म्हणून त्याचा सारांश इथे देतोय.

ही कहाणी जेसिका शेअर नामक अमेरिकेतील मिडवेस्ट भागात रहाणार्‍या एका स्त्रीची आहे. तिचे दुसर्‍या एका स्त्री बरोबर लेस्बियन संबंध असताना त्या दोघिंनी मुलं होऊ देण्याचा निर्णय घेतला. त्याही पुढे जाऊन दोघींनी 4 मुलं होऊ देण्याचं ठरवलं व त्यांची नावं काय असतील तेही ठरवलं. लेखात दुसर्‍या स्त्रीचं नाव दिलेलं नसल्यामुळे आपण तिला रिटा म्हणू. कृत्रिम गर्भधारणेसाठी कुणाचं तरी वीर्य मिळवणं गरजेचं होतं. रिटानं तिच्या बहिणीच्या नवर्‍याचं नाव सुचवलं. जेसिका तेव्हा विद्यापीठात शिकत होती. शिकता शिकता तिने 'गे व लेस्बियन यांचे कायदेशीर हक्क' अशा एका विषयाचाही अभ्यास केला. त्यातून तिला असं समजलं की वीर्य कुणाचं आहे हे माहिती असेल तर त्याचा पुढे त्रास होऊ शकतो. जर पुढे मागे जन्मदात्या स्त्रीचं निधन झालं तर मुलांचा ताबा त्या माणसाकडे जाऊ शकतो. असे निर्णय पूर्वी न्यायालयात झालेले आहेत. तसं झालं तर मुलांना एका अनोळखी माणसाबरोबर रहावं लागतं आणि ते जेसिकाला पटलं नाही. कर्मधर्म संयोगाने तिला एका स्पर्म बॅंकेची माहिती मिळाली जिथे वीर्य देण्यापूर्वी पुरुषांना एक करार करावा लागतो ज्यामुळे त्यांना आयुष्यात कधीही त्यांच्यामुळे झालेल्या मुलांचा ताबा मागता येत नाही.

जेसिका तेव्हा घरी बसून डॉक्टरेटसाठी प्रबंध लिहीण्याचं काम करीत असल्यामुळे पहिलं मूल तिनं जन्माला घालायचं ठरलं. त्या आधी त्या दोघींचं लग्न होऊन रिटा जेसिकाची कायदेशीर पत्नी झाली होती. (दोन पुरुषांचं किंवा दोन स्त्रियांचं लग्न झालं तर त्यातला (त्यातली) एक नवरा आणि दुसरा (दुसरी) बायको असते हे काय गौडबंगाल आहे हे ते मला अजून समजलेलं नाही.) वीर्यदान करणार्‍या पुरुषांचे फोटो किंवा नावगाव पत्ता इ. माहिती ग्राहकांना न देण्याचं धोरण त्या स्पर्म बॅंकेचं होतं. पण वजन, उंची, केसांचा रंग, शिक्षण, इतर आवडीनिवडी तसंच त्यांचं आत्तापर्यंतच आरोग्य अशी बाकी माहिती उपलब्ध होती. शेवटी रिटाच्या गुणविशेषाशी मिळत्या जुळत्या माणसाचं वीर्य मागवायचं ठरलं. तो माणूस साहित्यातला पदवीधर होता आणि लेखन, संगीत व टॅक्सी चालक असे त्याचे व्यवसाय असल्याचं लिहीलेलं होतं. कालांतराने, काही असफल प्रयत्नानंतर जेसिकेला गर्भ राहीला आणि यथावकाश 2005 साली अ‍ॅलिसचा जन्म झाला. ह हा प्रयोग त्या दोघींना इतका आवडला की त्यांनी तेच वीर्य परत मागवलं आणि आणखी दीड वर्षांनी रिटानं एका मुलीला जन्म दिला. तिला आपण जेनी म्हणू.

दोन्ही मुलींमधे काही गोष्टींच्या बाबतीत साम्य होतं. दोघी जास्त उंच होत्या, दोघींकडे भरपूर शब्दसंपत्ती होती आणि दोघिंची नाकं छोटी होती. अ‍ॅलिस 3 वर्षांची असताना रिटानं काहीही कारण न देता नातं तोडलं. जेसिकानं पुढील काही वर्ष दोघिंचा संभाळ केला पण अ‍ॅलिस 10 वर्षांची असताना रिटानं संपूर्ण संबंध तोडले आणि जेनीला जेसिकाकडे पाठवणंही बंद केलं. रिटा कडच्या नातेवाईकांनी म्हणजे आजी आजोबा, काका मामा आदी लोकांनी तर दोन वर्ष आधीपासूनच अ‍ॅलिसशी संबंध तोडले होते. अ‍ॅलिस दु:खी झाली. वयाच्या 11व्या वर्षी तिला तिच्या जेनेटिक हेरिटेज बद्दल कुतुहल निर्माण झालं आणि तिनं स्वत:ची डीएनए परीक्षा केली. त्याच्या निकालात तिचा डीएनए 50% अ‍ॅरन लॉंग या माणसाच्या डीएनएशी मिळत होता आणि 25% डीएनए ब्राईस गॅलो नावाच्या मुलाशी मिळत होता असं समजलं. म्हणजे अ‍ॅरन बाप असणार आणि ब्राईस सावत्र भाऊ असणार.

जेसिकाने अ‍ॅरन लॉंगचा नेटवर शोध घेतला. तिथे ढिगाने अ‍ॅरन लॉंग सापडले. मग हा अ‍ॅरन लॉंग त्यातला कुठला यावर तिनं संशोधन करायला सुरुवात केली. वीर्य मिळवायच्या वेळी मिळालेल्या माणसाच्या माहितीवरून तिला एक अ‍ॅरन लॉंग सापडला. तो सिअ‍ॅटल मधे रहात होता आणि लेखन व संगीत यातला व्यावसायिक होता. जेसिकानं अ‍ॅरनशी सोशल मिडियावर संपर्क केला आणि त्यानंही तातडीनं उत्तर दिलं. अ‍ॅरन पूर्वी जेसिकाच्याच गावात काही वर्ष रहात होता असं तिला समजलं. अगणित वेळा मॉलमधे हा माणूस आपल्या जवळून गेला असेल असं जेसिकाला वाटून गेलं.

दरम्यान जेसिकाला ब्राईसशी संपर्क करण्यात पण यश आलं. तो तेव्हा नुकताच पदवीधर झाला होता. त्याच्या सांगण्याप्रमाणे अ‍ॅरनपासून झालेल्या 6 मुलांच्या पालकांशी त्याचा संपर्क झालेला होता. जेसिका व रिटाच्या दोन मुली धरून ती संख्या आता 8 वर गेली होती. त्यातल्या एका 19 वर्षाच्या मॅडी नावाच्या सावत्र बहिणीशी त्याचं बोलणं पण झालं होतं. त्या दोघांनी सिअ‍ॅटलला जाऊन अ‍ॅरनला भेटायचं ठरवलेलं होतं.

अ‍ॅरनने एक जंगी पार्टी आयोजित केली. पार्टीला त्याचे जुने मित्रमैत्रिणी, जुन्या गर्लफ्रेंड, त्यांचे नवीन पार्टनर व मुलं इ. सर्व होते. तिथे ब्राईस, मॅडी व अ‍ॅलिस यांची मैत्री झाली. हळूहळू जेसिका व अ‍ॅरन यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि जेसिका सिअ‍ॅटलला त्याच्या घरी रहायला गेली. काही दिवसांनी मॅडी पण रहायला आली.

असे किती सावत्र बहीणभाऊ अ‍ॅलिसला असतील? अ‍ॅरनच्या अंदाजाप्रमाणे 67 तरी असावेत. कितीही असले तरी डोकं चक्रावून टाकणारं आधुनिक कुटुंब आहे हे नक्की!

(तळटीप: अ‍ॅरनच्या या प्रचंड मोठ्या कुटुंबावर 'Forty dollars a pop' नामक एक डॉक्युमेंटरी आहे. मी अजून ती पाहिलेली नाही. )

-- समाप्त --

Wednesday, March 11, 2020

त्यांची माती, त्यांची माणसं!

'कुठल्याही देशात जा स्थानिक लोकं बाहेरून आलेल्या लोकांबद्दल चीड व तिरस्कार व्यक्त करताना दिसून येतील. एका दृष्टीने ते बरोबर आहे म्हणा! स्वतःचा प्रदेश ही बर्‍याच प्राण्यांच्या डोक्यात गोंदवलेली गोष्ट आहे. कुत्री, लांडग्यांपासून आदिमानवानापर्यंत आपल्या प्रदेशाचं रक्षण करणं, त्याच्या जवळपास कुणी येत नाही ना ते बघणं हे डिनए मधेच आहे. शिवाय, उपरे लोक त्यांच्या त्यांच्या विश्वात मग्न असतात, स्थानिक लोकात मिसळत नाहीत. म्हणून त्यांनी त्यांच्या कोषातून बाहेर पडायला हवं, इथल्या मातीत मिसळायला हवं!'... कुणाचं तरी भाषण मी जांभया देत ऐकत होतो. पण भाषणा नंतर जेवण असणार होतं त्यामुळे उठून पण जाता येईना. मनाशी म्हंटलं मी ह्यांच्या गर्दीत मिसळलो तरी मला एकाकी वाटतं तर मातीत काय मिसळणार? त्यातल्या त्यात  पबात मिसळण्याची कल्पना भुरळ घालणारी आहे म्हणा! इकडचे पब हे आपल्या गावाकडच्या पारासारखे चकाट्या पिटायची प्रमुख ठिकाणं असतात. 'स्टिफ अपर लिप' वाले असले तरी या गोर्‍यांची पण जीभ तरल द्रव्यानं सैल होतेच व मग अदृश्य सांस्कृतिक भिंती कोलमडून पडतात. पण पबाचा उपयोग मातीत मिसळण्यासाठी करायचा असेल तर नित्यनेमाने एकाच पबमधे जायला पाहीजे तर ओळखी होणार! ते मी चालू केलं तर माझी बायको, सरिता, मी पक्का बेवडा झालोय म्हणून वडाभोवती उलट्या प्रदक्षिणा घालायला लागेल आणि समस्त शत्रुपक्ष माझं बौद्धिक घेईल ही मोठी भीति होती. मातीत मिसळणं हे चहात दूध मिसळण्याइतकं सोप्पं नव्हतं तरी मी जेवणानंतरचा विडा उचलता उचलता मिसळायचं ठरवलं.

योगायोगाने, मातीत मिसळायची एक संधी मला लवकरच चालून आली. ऑफिसच्या नोटिस बोर्डावर ज्युली कुठल्यातरी कार्यक्रमाचं जाहीर आमंत्रण लावत असताना मी तिला हटकलं....'कोणता प्रोग्रॅम आहे, ज्युली?' 
'हा ना? हा ख्रिसमस कॅरॉल सिंगिंगचा!'.. ज्युली आमंत्रणाला पिना टोचता टोचता म्हणाली. माझ्यासाठी कॅरॉल, कॉयर, ऑपेरा, रॉक पॉप जॅझ इ. सर्व प्रकार एकाच वर्गात मोडतात, तो म्हणजे इंग्रजी गाणी!
'ओ ओके! म्हणजे तू असशीलच त्यात!'.. ज्युली आमच्या ऑफिसातली एक चांगली गाणारी बाई! इथल्या पबांमधे ती अधून मधून गळा साफ करतेच, शिवाय, दर वर्षी ऑफिसातल्या काही लोकांना बरोबर घेऊन ऑफिसच्या ख्रिसमस पार्टीत गिटार वाजवत कॅरॉल म्हणायचं कामही ती नित्यनेमाने करते.
'हो, मी आहे ना! तू पण ये की म्हणायला, चिमण!'.. ज्युलीनं मला सहजपणे अगदी तिच्या घरचं कार्य असल्याच्या थाटात आमंत्रण दिलं. वास्तविकपणे, ऑक्सफर्ड मधल्या एका हौशी लोकांच्या गटाने ख्रिसमस कॅरॉल म्हणण्याचा घाट घातला होता. नाताळ येऊ घातला की गणपती उत्सव जवळ आल्यासारखा लोकांच्या उत्साहाला उधाण येतं. दोन दोन महिने आधीपासून अशा काही बंपर सेलच्या पाट्या लागतात की चिरनिद्रिस्तांना देखील खरेदीचा मोह होईल. सगळीकडे दिव्यांचा झगमगाट व सजवलेली ख्रिसमसची झाडं उभारलेली दिसतात. शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा मॉल.. जिकडे तिकडे नुसते लाल झगे आणि सॅंटाच्या टोप्या घातलेली माणसं कॅरॉल गाताना दिसतात. नाताळ म्हणजे ना ताळ, ना तंत्र असा अर्थ ध्वनित झाला तरी इथे धांगडधिंगा किंवा लाऊडस्पीकर वर  लावलेली कर्णकर्कश बटबटीत गाणी याचा मागमूस पण नसतो!
'ऑं? मी? मी फक्त बाथरुम मधे गाणी म्हणतो, बॉलिवुडमधली, ती सुद्धा घाबरत घाबरत! कारण माझं गाणं ऐकून शेजार्‍यांचं कुत्रं रडायला लागतं. कॅरॉल तर मी बापजन्मी म्हंटलेल्या नाहीत. मला नाही जमणार ते!'.. कायच्या काय बोलते ही! कॅरॉल काय म्हण? ते काय बडबडगीतं गाण्याइतकं सोप्पय?
'तू काही वेळा येऊन तर बघ. इतकं काही अवघड नाहीये ते. नाही जमलं तर नको येऊस परत!'.. तिचं बरं आहे, डासाला गुणगुणनं जितक्या सहजपणे जमतं तितक्या सहजपणे ती गाते. 
'पण आता सगळा कार्यक्रम ठरला आहे ना?'
'हो! ठरला आहे पण बसला नाहीये. गाणारे कमी पडताहेत. आणि नेमके पुरुषच कमी आहेत.'.. अरेच्चा! म्हणजे आवाज वाढवायला माणूस हवाय की स्टेजवरची गर्दी?
'बरं, बघतो!'.. मी तिथून काढता पाय घेतला. तालमी दर सोमवारी रात्री, अंधार संध्याकाळी 5 लाच पडत असल्यामुळे 7:30 म्हणजे रात्रच, असणार होत्या. माझ्या पहिल्या तालमीला अख्खे 5 दिवस होते. पण ते सर्व दिवस माझं डोकं  'आपलं संगीताचं ज्ञान चारोळीला महाकाव्य म्हणण्याइतकं अगाध त्यात इंग्रजीतल्या आरत्या म्हणायला कसं काय जमणार?'.. या विचारुंदराने कुरतडलं! शेवटी वैतागून मी जायचा निर्णय घेतला. आयटीत राहून कंप्युटरशी वैर करून चालत नाही ना तसंच!

'मी कॅरॉलच्या तालमीला जाणारेय दर सोमवारी'.. मी सरिताला शेवटी सांगितलं. तालीम हा फार जालीम शब्द आहे. गाण्याच्या प्रॅक्टिसला तालीम म्हंटलं की आखाडाच डोळ्यासमोर येतो. अर्थात, माझ्यासाठी तो आखाडाच होता!
'ऑं! हे खूळ कुठून आलं तुझ्या डोक्यात?'
'हे खूळ नाहीये! याला सोशल इंटिग्रेशन ऐसे नाव!'.. मी तिला गप्प करायला सोशल कॅलक्युलसचं जार्गन फेकलं.
'अरे पण तुला गाता तरी येतं का?'.. सरिताचा प्रामाणिक प्रश्न!
'नाही! पण आता इथल्या मातीत मिसळायला हवं ना!'
'तुला शेजारच्या कुत्र्याच्या डोक्यावर परिणाम झालाय ते माहिती आहे ना?'.. कुठे नुसतं रडणं नि कुठे डोक्यावर परिणाम होणं! पण सरिताला अतिशयोक्ती आवडते, वर ती माझ्याकडूनच शिकली आहे म्हणते.
'अगं तिकडे कार्यक्रमाला कुणी कुत्री आणणार नाहीयेत.'.. माझा खुलासा तिला पटला नाही.
'अरे तू कधी गणपतीच्या आरत्या म्हणायची तरी तसदी घेतलीयेस का? काही तरी वेगळं कारण आहे नक्कीच! हां बरोब्बर! गाणार्‍या मैना खूप असतील नाही का!'.. तिला माझ्या गाण्याबद्दल जितकी खात्री आहे तितकी माझ्या वेड्याविद्र्या चेहर्‍याबद्दल असती तर तिने हा शेरा मारला नसता. सरिताला एखाद्या पुरातत्वशास्त्रज्ञाच्या उत्साहाने माझ्या डोक्याचं उत्खनन करून माझ्या नसलेल्या लफड्यांबद्दल तर्कवितर्क करण्याची फार हौस आहे.
'मला काय माहिती तिथे मैना आहेत की कावळे? मी गेलोय कुठे अजून? तू पण ये तालमीला मग, मैना किती आहेत ते बघायला!'
'नको! तुझं गाणं ऐकून कान किटवण्यापेक्षा मी जुने पिक्चर बघेन युट्युबावर!'.. मला माझी गोळी लागल्याचा आनंद झाला.

सोमवारी ठरल्या वेळेला मी गेलो. ऑक्सफर्डातलं चीनी ख्रिश्चन लोकांचं चर्च हे तालमीचं ठिकाण! चिन्यांमधे पण ख्रिश्चन पोटचिनी असतात हे मला नव्यानंच समजलं. त्या चर्चच्या एका भागात छोट्या समुदायासाठी योग्य असं एक नाट्यगृह होतं, चक्क! सर्व मंडळी जमलेली होती. मी धरून चार पुरुष सोडता बाकी सगळ्या मैना होत्या. त्यातला जॉन पियानोवर बसला होता! बहुतेक जण माझ्यापेक्षा म्हातारे होते. सर्वांची ओळख ज्युलीनं करून दिली. जवळपास प्रत्येकांनं 'तुझं नाव लक्षात रहाणार नाही, पण प्रयत्न करेन' असं भरघोस आश्वासन दिलं. मी पण कुणाचं नाव लक्षात ठेवण्याची खात्री दिली नाही.
'ही मेरी! आपली कंडक्टर आणि हा चिमण!'.. सगळ्यात शेवटी ज्युलीनं मेरीची ओळख करून दिली. मेरी कंडक्टर तर जॉन ड्रायव्हर की काय असा प्रश्न मला चाटून गेला.
'गिव्ह मी अ‍ॅन ए!'.. नमस्कार चमत्कार झाल्यावर मेरीनं मला फर्मावलं. मी बुचकळ्यात पडून इकडं तिकडं पाहील्यावर ज्युलीनं मला ए चा सूर लावायला सांगितला. तरिही मला काही समजलं नाहीच. मग मी जोरात इंग्रजी अक्षर 'ए' म्हंटलं. त्या बरोबर तिथे टिपुर शांतता पसरली. सभ्यतेच्या दडपणामुळे दोघींनी चेहरा निर्वीकार ठेवायचा आटोकाट प्रयत्न केला. मग मेरीनं पियानोवर ए वाजवला आणि मी त्या सुरात रेकायचा प्रयत्न केला. त्यांचे सूर ए बी सी डी ई एफ जी असे असतात हे कुणा लेकाला माहिती? अर्थात, तिनं 'सा' लावायला सांगितला असता तरी ते मला जमलं नसतंच, ती गोष्ट वेगळी! पण निदान ती सूर लावायला सांगतेय हे तरी कळालं असतं. ए बी सी डी ही काय सुरांची नावं झाली? आपल्या सुरांना सा रे ग म ऐवजी ट ठ ड ढ म्हंटलं तर खिळा ठोकण्याइतकं असुरी वाटेल की नाही?

मेरी मला नापास करणार आणि घरी जायला सांगणार हा आनंद फार काळ टिकला नाही. तिनं निर्विकारपणे कॅरॉलचं, त्यांच्या नोटेशन मधे लिहीलेलं, एक पुस्तक हातात खुपसलं. त्यात एका खाली एक असे बर्‍याच आडव्या रेघांचे पट्टे आणि त्यात लवंगांसारख्या दिसणार्‍या भरपूर उभ्या दांड्या होत्या. त्या आडव्या रेघांच्या ओळी बघून मला शाळेतल्या इंग्रजीच्या वहीची क्लेशकारक आठवण आली. काही लवंगांच्या खाली गाण्याचे शब्दं लिहीलेले होते. हायला! या लवंगा बघून खायचं सुचेल फार फार तर, गायचं कसं सुचणार? पण त्या सर्वांना ती लवंगी भाषा सगळ्यांना समजत असली पाहिजे हे जाणवून मला त्यांच्याबद्दल अतिआदर वाटायला लागला. तसंच मी ही लवंगी भाषा कधी शिकणार आणि कॅरॉल कधी म्हणणार याची चिंता लागली.

'आता आपण 'शो मी द वे' ही कॅरॉल म्हणू. मागच्या वेळेला नीट जमलेलं नव्हतं म्हणायला.'.. मेरीनं हातात छडी घेऊन सुरवात केल्यावर मला धडकीच भरली. शाळेतल्या छडी-सख्याच्या आठवणीनं माझ्या हाताला झिणझिण्या आल्या. ..'सोप्रॅनोज, आल्टोज आणि टेनर्स ... तुम्ही 'शो मी द वे' हे शब्द बार 25 व 26 पान 8 प्रमाणे म्हणायचे. सोप्रॅनोज, बारची सगळ्यात वरची लाईन तुमची, आल्टोज त्याच्या खालची आणि टेनर्स त्याच्या खालची.'.. मेरीनं ती ओळ तिन्ही प्रकारे म्हणून दाखवली आणि सगळ्यांकडून घासून घेतली. वेगवेगळ्या लोकांनी तीच ओळ एकाच वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणायची याचं मला फारच अप्रूप वाटलं. सोप्रॅनो, आल्टो, टेनर, बेस इ. नावं वेगवेगळ्या पट्टीत गाणं म्हणणार्‍यांना असतात हे मी घाईघाईनं गुगल करून शोधलं! पण त्यातला मी कोण हे सांगायची तसदी मेरीनं न घेतल्यामुळे मी गुमान गुगलची माहिती वाचत राहीलो. सोप्रॅनो व आल्टो म्हणजे मुख्यत्वेकरून नैसर्गिकपणे उंच व खालच्या सुरात गाणार्‍या बायका! तर उंच व खालच्या सुरात गाऊ शकणारे पुरुष हे टेनर व बेस! हे ढोबळ वर्गीकरण आहे अर्थात! लवंगी भाषेत सोप्रॅनो, आल्टो, टेनर व बेस यांच्या ओळीच्या अलिकडे 'S', 'A', 'T' व 'B' असं लिहीलेलं असतं. मला ते पुस्तकात दिसल्यावर थोडं समजल्याचा आनंद झाला.

मेरीचं गायन मात्र मला आवडलं. तिचा आवाज सुरेल आणि ठणठणीत होता. बर्‍याच मैनांचा आवाज पियानोच्या वर ऐकू येत नव्हता पण मेरीचा मात्र अगदी स्पष्टपणे येत होता. उरलेला सगळा वेळ हा बार मग तो बार असं बार बार लगातार झाल्यावर माझ्या डोळ्यासमोर वेगळाच बार तरळायला लागला. कारण, मला जाणवलं की मला कुठल्याच कॅरॉलची चाल माहिती नाहीये, मग गाणार काय? चालीशिवाय गाणं हे पाण्याशिवाय अंघोळ करण्याइतकं कोरडं! ज्ञानेश्वरांनी जरी रेड्याकडून कुठलंही नोटेशन नसलेले वेद वदवून घेतले असले तरी माझ्याकडून नोटेशन असलेल्या कॅरॉल वदवायला मेरी काही ज्ञानेश्वर नव्हती.
'मेरी! मला ती लवंगी भाषा समजत नाही आणि कुठल्याच कॅरॉलच्या चाली मला येत नाहीत. त्यामुळे, सॉरी! हे मला काही जमणार नाही!'.. तालमी नंतर सगळे नष्ट झाल्यावर मी मेरी मातेला साकडं घातलं.
'ओह! डोंट वरी, वरचे वरी! इथे एक दोघे सोडता कुणालाच ती भाषा येत नाही! आणि चालींसाठी मी या गाण्यांची सीडी बघते घरी आहे का ते! तेव्हा तू येत रहा!'.. नाईलाजाने पुढच्या तालमीला गेलो. तेव्हा मेरीनं तिच्याकडे सीडी नसल्याचं जाहीर केलं. घरी गेल्यावर युट्युब वर नाही तर दुकानात ती गाणी शोधायचं ठरवून त्याही तालमीत मुक्याची भूमिका घेतली. पुढच्या काही दिवसात कुठेही गाणी न मिळाल्यामुळे मी अस्वस्थ झालो. इतर लोकांना त्या कॅरॉल माहिती होत्या कारण लहानपणापासून ते त्या ऐकत आलेले होते! मेरी मला मुळीच सोडायला तयार नव्हती. तिनं मला 'घाबरू नकोस! इतक्या लोकांमधे तू सहज लपशील!' म्हणून उलट धीर देला. मग मी त्या गाण्याच्या तालमीच मोबाईलवर रेकॉर्ड करून घरी ऐकायला लागलो. त्यामुळे काही गाण्यांच्या चाली समजल्या आणि मी कुजबुजत्या आवाजात थोडं फार म्हणायला पण लागलो. पण मेरी कधी कधी एखादं गाणं रद्द करून दुसरं घ्यायची त्यामुळे माझे परिश्रम वाया जायचे.

'मग काय चाल्लंय हल्ली?'.. एका मित्राचा फोन आला.
'काही नाही, मजेत! तुझं कसं काय?'.. मी स्टॅंडर्ड उत्तर फेकलं.
'चिमण हल्ली भजनं म्हणायला जातो.'.. सरितानं पुस्ती जोडली.
'करून करून भागला नि देवपूजेला लागला?'.. 'करून' वर जोर देत नि गडगडाटी हसत तो म्हणाला.
'अरे बाबा! इथल्या मातीत मिसळायचा प्रयत्न चाललाय. त्यासाठी कॅरॉल सिंगिंग करायला जातो.'.. त्यानं आणखी काही तारे तोडू नये म्हणून मी घाईघाईनं म्हंटलं.
'तुला पोपटाचं माहिती आहे ना?'.. त्यानं गुगली टाकला.
'काय?'
'पोपट म्हणे अनोळखी ठिकाणी आले की आजुबाजूचे वेगळे आवाज ऐकून आपणही त्यांच्यातलेच एक आहोत हे दाखवायला तसेच आवाज काढायचा प्रयत्न करतात. थोडक्यात तुझा पोपट झालाय.'.. परत एक गडगडाटी हास्य आलं. त्यानं माझा आणखी पोपट करू नये म्हणून मी फोन आवरता घेतला.

नेटाने मी तालमीला जात राहीलो. गाण्याची चाल समजली तरी इंग्रजीत गाणं म्हणायचं जिभेला वळण नव्हतं. त्यात एक दोन गाण्यात इंग्रजीचा खून पाडलेला.
De Virgin Mary had a baby boy and they say that his name was Jesus
He come from de glory, he come from the glorious kingdom
आता the च्या ठिकाणी De किंवा 'He come' हे कुठल्या व्याकरणात बसतं? हो! मी छड्या खात खात हे खूप वेळा ऐकलंय.. 'चिमणराव म्हणा... आय कम, यू कम, ही शी इट कम्स, दे ऑल कम!'.
'हे पहा  'हीss' नाही म्हणायचं,  इथे ती नोट क्वेव्हर आहे. तेव्हा नुसतं हि असं पटकन म्हणा.. हि कम फ्रॉम द ग्लोरी'.. मेरी मधेच तिचं लवंगी ज्ञान पाजळायची. होता होता कोरस मधे आवाज न चोरता गाण्यापर्यंत माझी मजल गेली. आयुष्यभर हिंदुस्थानी संगीत कानावर पडल्यामुळे यांच्या चाली जरा वेगळ्याच वाटतात, निदान मला तरी! त्यामुळे त्यांना आपली गाणी म्हणायला सांगितली तर त्यांचीही माझ्यासारखीच गत होईल असं मला वाटतं. जर त्यांना मालकंस रागातल्या दोन ओळी म्हणायला सांगितल्या तर ते त्याचा धमालकंस करतील.

एके दिवशी मेरीनं पॉल नावाचा एक चांगलं गाऊ शकणारा माणूस यायला लागणार असल्याचं जाहीर केल्यावर मैनांचा पहिला प्रश्न आला..'त्याचं लग्न झालंय का?'.. मला त्यांच्या डायरेक्ट अ‍ॅप्रोचची गंमत वाटली. आमच्या कार्यक्रमात काही सोलो गाणी पण असणार होती. मेरी फार धाडशी बाई! तिनं मला सहजपणे 'एखादं सोलो म्हणशील का?' असं विचारलं आणि मी तडकाफडकी नकार दिला. काही गाण्यांच्या नंतर ख्रिस्ताच्या जन्मकथेशी संबंधित गोष्टी सांगायची पण प्रथा असते. त्यालाही मी नकार दिला. पण त्या गोष्टी ऐकता ऐकता कृष्ण व ख्रिस्ताच्या जन्मकथेत खूप साम्य आहे हे जाणवलं... बायबल व महाभारत लिहीणारे एकाच मातीत खेळले होते की काय असं वाटावं इतकं!

एका सोमवारी मी आजारी असल्यामुळे गेलो नाही, एकदम पुढच्या सोमवारी गेलो. तेव्हा लक्षात आलं की मागच्या सोमवार नंतर अजून एक तालीम होऊन गेली आहे कारण मुख्य प्रयोग शुक्रवारी असल्यामुळे वेळ उरला नव्हता. त्यात मेरीनं मला त्यातल्या त्यात बरी येणारी दोन गाणी उडवली होती आणि त्याजागी दोन नवीन गाणी घातली होती. रेकॉर्डिंगवर जमेल तितकी प्रॅक्टिस करून शुक्रवारी हजर झालो. कार्यक्रमाला चक्क 40/50 लोकं हजर होती त्यात शाळेत जाणारी मुलं पण! कार्यक्रम सुरू झाल्यावर जमेल तिथे तोंड घालण्या पलिकडे मला काम नव्हतं म्हणून मी प्रेक्षकांचं निरीक्षण करत बसलो. ते सगळे आमच्या बरोबर गात होते, मुलं पण! हे मला फारच नवीन होतं. सर्व प्रेक्षकांनी नंतर सगळ्यांचं कौतुक केलं.. हो! माझं पण! काय सभ्य लोकं आहेत ना हे?

शेवटी मनासारखं मातीत मिसळणं झालं नाही त्याचं थोडं वाईट वाटलं! पण जिथं मेघन मार्कलला पण शाही मातीत मिसळणं जमलं नाही तिथं माझी काय कथा? शिवाय, मातीत माझ्यासारखे खडे कसे काय मिसळणार?

तळटीप:
सोप्रॅनो, आल्टो, टेनर व बेस हे एकत्र गाताना ऐकणं हा एक वेगळाच पण सुखद अनुभव आहे. त्यासाठी हांडेल(1685-1759) याने रचलेली  'फॉर अन्टु अस अ चाईल्ड' ही कॅरॉल जरूर ऐका.

साधारणपणे 15 व्या सेकंदाला गाणं चालू होतं.

पहिल्या 29 सेकंदानंतर बार 12 पाशी सगळ्यात डावीकडे S व T लिहिलेलं दिसेल. त्या सोप्रॅनो आणि टेनरच्या ओळी आहेत. सोप्रॅनोनी 'गिव्हन' म्हंटल्यावर एका बीट नंतर टेनर सुरू होतात आणि पुढच्या बार मधे 2 बीट झाल्यावर सोप्रॅनो म्हणतात.

33 सेकंदापाशी बार 15: इथे टेनर E सुरापासून सुरुवात करतात तर सोप्रॅनो G पासून आ आ आ म्हणू लागतात.

47 सेकंदापाशी, बार 21: इथे आल्टो आणि बेस आहेत. इथे बेस आ आ आ म्हणतात. दोघांच्या पट्टीतला फरक लगेच कळेल.

1:09 पाशी, बार 30: इथे सगळे ऐकू येतील. प्रत्येक ग्रुप वेगवेगळ्या बीट वर गाणं उचलतो.

-- समाप्त --