Monday, March 30, 2020

आधुनिक कुटुंब!

बीबीसी वर आलेला हा एक सत्य घटनांवर आधारित लेख आहे. भविष्यात काय प्रकारची कुटुंब व्यवस्था असू शकेल याची थोडी कल्पना या लेखामुळे येते. युके बाहेर कदाचित तो न दिसण्याची शक्यता आहे म्हणून त्याचा सारांश इथे देतोय.

ही कहाणी जेसिका शेअर नामक अमेरिकेतील मिडवेस्ट भागात रहाणार्‍या एका स्त्रीची आहे. तिचे दुसर्‍या एका स्त्री बरोबर लेस्बियन संबंध असताना त्या दोघिंनी मुलं होऊ देण्याचा निर्णय घेतला. त्याही पुढे जाऊन दोघींनी 4 मुलं होऊ देण्याचं ठरवलं व त्यांची नावं काय असतील तेही ठरवलं. लेखात दुसर्‍या स्त्रीचं नाव दिलेलं नसल्यामुळे आपण तिला रिटा म्हणू. कृत्रिम गर्भधारणेसाठी कुणाचं तरी वीर्य मिळवणं गरजेचं होतं. रिटानं तिच्या बहिणीच्या नवर्‍याचं नाव सुचवलं. जेसिका तेव्हा विद्यापीठात शिकत होती. शिकता शिकता तिने 'गे व लेस्बियन यांचे कायदेशीर हक्क' अशा एका विषयाचाही अभ्यास केला. त्यातून तिला असं समजलं की वीर्य कुणाचं आहे हे माहिती असेल तर त्याचा पुढे त्रास होऊ शकतो. जर पुढे मागे जन्मदात्या स्त्रीचं निधन झालं तर मुलांचा ताबा त्या माणसाकडे जाऊ शकतो. असे निर्णय पूर्वी न्यायालयात झालेले आहेत. तसं झालं तर मुलांना एका अनोळखी माणसाबरोबर रहावं लागतं आणि ते जेसिकाला पटलं नाही. कर्मधर्म संयोगाने तिला एका स्पर्म बॅंकेची माहिती मिळाली जिथे वीर्य देण्यापूर्वी पुरुषांना एक करार करावा लागतो ज्यामुळे त्यांना आयुष्यात कधीही त्यांच्यामुळे झालेल्या मुलांचा ताबा मागता येत नाही.

जेसिका तेव्हा घरी बसून डॉक्टरेटसाठी प्रबंध लिहीण्याचं काम करीत असल्यामुळे पहिलं मूल तिनं जन्माला घालायचं ठरलं. त्या आधी त्या दोघींचं लग्न होऊन रिटा जेसिकाची कायदेशीर पत्नी झाली होती. (दोन पुरुषांचं किंवा दोन स्त्रियांचं लग्न झालं तर त्यातला (त्यातली) एक नवरा आणि दुसरा (दुसरी) बायको असते हे काय गौडबंगाल आहे हे ते मला अजून समजलेलं नाही.) वीर्यदान करणार्‍या पुरुषांचे फोटो किंवा नावगाव पत्ता इ. माहिती ग्राहकांना न देण्याचं धोरण त्या स्पर्म बॅंकेचं होतं. पण वजन, उंची, केसांचा रंग, शिक्षण, इतर आवडीनिवडी तसंच त्यांचं आत्तापर्यंतच आरोग्य अशी बाकी माहिती उपलब्ध होती. शेवटी रिटाच्या गुणविशेषाशी मिळत्या जुळत्या माणसाचं वीर्य मागवायचं ठरलं. तो माणूस साहित्यातला पदवीधर होता आणि लेखन, संगीत व टॅक्सी चालक असे त्याचे व्यवसाय असल्याचं लिहीलेलं होतं. कालांतराने, काही असफल प्रयत्नानंतर जेसिकेला गर्भ राहीला आणि यथावकाश 2005 साली अ‍ॅलिसचा जन्म झाला. ह हा प्रयोग त्या दोघींना इतका आवडला की त्यांनी तेच वीर्य परत मागवलं आणि आणखी दीड वर्षांनी रिटानं एका मुलीला जन्म दिला. तिला आपण जेनी म्हणू.

दोन्ही मुलींमधे काही गोष्टींच्या बाबतीत साम्य होतं. दोघी जास्त उंच होत्या, दोघींकडे भरपूर शब्दसंपत्ती होती आणि दोघिंची नाकं छोटी होती. अ‍ॅलिस 3 वर्षांची असताना रिटानं काहीही कारण न देता नातं तोडलं. जेसिकानं पुढील काही वर्ष दोघिंचा संभाळ केला पण अ‍ॅलिस 10 वर्षांची असताना रिटानं संपूर्ण संबंध तोडले आणि जेनीला जेसिकाकडे पाठवणंही बंद केलं. रिटा कडच्या नातेवाईकांनी म्हणजे आजी आजोबा, काका मामा आदी लोकांनी तर दोन वर्ष आधीपासूनच अ‍ॅलिसशी संबंध तोडले होते. अ‍ॅलिस दु:खी झाली. वयाच्या 11व्या वर्षी तिला तिच्या जेनेटिक हेरिटेज बद्दल कुतुहल निर्माण झालं आणि तिनं स्वत:ची डीएनए परीक्षा केली. त्याच्या निकालात तिचा डीएनए 50% अ‍ॅरन लॉंग या माणसाच्या डीएनएशी मिळत होता आणि 25% डीएनए ब्राईस गॅलो नावाच्या मुलाशी मिळत होता असं समजलं. म्हणजे अ‍ॅरन बाप असणार आणि ब्राईस सावत्र भाऊ असणार.

जेसिकाने अ‍ॅरन लॉंगचा नेटवर शोध घेतला. तिथे ढिगाने अ‍ॅरन लॉंग सापडले. मग हा अ‍ॅरन लॉंग त्यातला कुठला यावर तिनं संशोधन करायला सुरुवात केली. वीर्य मिळवायच्या वेळी मिळालेल्या माणसाच्या माहितीवरून तिला एक अ‍ॅरन लॉंग सापडला. तो सिअ‍ॅटल मधे रहात होता आणि लेखन व संगीत यातला व्यावसायिक होता. जेसिकानं अ‍ॅरनशी सोशल मिडियावर संपर्क केला आणि त्यानंही तातडीनं उत्तर दिलं. अ‍ॅरन पूर्वी जेसिकाच्याच गावात काही वर्ष रहात होता असं तिला समजलं. अगणित वेळा मॉलमधे हा माणूस आपल्या जवळून गेला असेल असं जेसिकाला वाटून गेलं.

दरम्यान जेसिकाला ब्राईसशी संपर्क करण्यात पण यश आलं. तो तेव्हा नुकताच पदवीधर झाला होता. त्याच्या सांगण्याप्रमाणे अ‍ॅरनपासून झालेल्या 6 मुलांच्या पालकांशी त्याचा संपर्क झालेला होता. जेसिका व रिटाच्या दोन मुली धरून ती संख्या आता 8 वर गेली होती. त्यातल्या एका 19 वर्षाच्या मॅडी नावाच्या सावत्र बहिणीशी त्याचं बोलणं पण झालं होतं. त्या दोघांनी सिअ‍ॅटलला जाऊन अ‍ॅरनला भेटायचं ठरवलेलं होतं.

अ‍ॅरनने एक जंगी पार्टी आयोजित केली. पार्टीला त्याचे जुने मित्रमैत्रिणी, जुन्या गर्लफ्रेंड, त्यांचे नवीन पार्टनर व मुलं इ. सर्व होते. तिथे ब्राईस, मॅडी व अ‍ॅलिस यांची मैत्री झाली. हळूहळू जेसिका व अ‍ॅरन यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि जेसिका सिअ‍ॅटलला त्याच्या घरी रहायला गेली. काही दिवसांनी मॅडी पण रहायला आली.

असे किती सावत्र बहीणभाऊ अ‍ॅलिसला असतील? अ‍ॅरनच्या अंदाजाप्रमाणे 67 तरी असावेत. कितीही असले तरी डोकं चक्रावून टाकणारं आधुनिक कुटुंब आहे हे नक्की!

(तळटीप: अ‍ॅरनच्या या प्रचंड मोठ्या कुटुंबावर 'Forty dollars a pop' नामक एक डॉक्युमेंटरी आहे. मी अजून ती पाहिलेली नाही. )

-- समाप्त --

No comments: