Sunday, December 11, 2016

तीन पैशाचा तमाशा!

१९७८ मधे पुलंचा तीन पैशाचा तमाशा मी प्रथम पाहिला आणि त्यानं मला झपाटलं. फक्त माझीच नाही तर तेव्हाच्या सर्व तरुण वर्गाची हीच अवस्था होती! सुमारे १०/१२ वेळा तो तमाशा मी पाहिला असेन. तो ब्रेख्टच्या थ्री पेनी ऑपेराचं स्वैर रुपांतर आहे असं कळल्यावर मूळ ऑपेरा बघणं अपरिहार्यच होतं. तमाशा बघताना असं कुठेही जाणवत नाही की आपण हे रुपांतर बघत आहोत इतकं पुलंनी ते रुपांतर चपखल आहे, आपलंसं करून टाकलं आहे. त्यामुळेच मूळ नाटकात नक्की काय होतं आणि पुलंनी रुपांतर करताना कुठे आणि कसे बदल केले हे समजून घेण्यात मला स्वारस्य होतं. पण ते नाटक बघण्याचा योग बरीच वर्ष काही आला नाही. शेवटी २०१६ सप्टेंबरमधे लंडन मधील रॉयल नॅशनल थिएटर ते सादर करणार असल्याचं समजल्यावर ती संधी दवडणं शक्यच नव्हतं. शिवाय ते नाटक बघायला लंडनला जाण्याची पण गरज नव्हती कारण त्याचं थेट प्रक्षेपण जगभरच्या २००० चित्रपटगृहांमधे होणार होतं. त्यामुळे मला ते तब्बल ३८/३९ वर्षांनी का होईना इथे ऑक्सफर्डच्या एका चित्रपटगृहामधे विनासायास बघायला मिळालं.

सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे हा तमाशा १९७८ मधे प्रथम आला आणि मला वाटतं ४/५ वर्षानंतर बंद देखील पडला. त्यामुळे बर्‍याच जणांनी त्याचं नावही ऐकलं नसण्याची शक्यता आहे म्हणून आधी त्याबद्दल थोडी माहिती दिलेली बरी पडेल! जॉन गे याने इंग्रजीतून लिहीलेल्या १८ व्या शतकातल्या 'द बेगर्स ऑपेरा'चं १९२८ मधे जर्मन भाषेत भाषांतर झालं 'Die Dreigroschenoper' म्हणजेच  'द थ्री पेनी ऑपेरा' या नावाने! १९३३ मधे नाझी सत्तेवर आल्यानंतर दिग्दर्शक ब्रेख्ट आणि संगीतकार कर्ट वेल यांना जर्मनी सोडावं लागलं पण तोपर्यंत या नाटकाची १८ भाषांमधे भाषांतरं होऊन युरोपभर १०,००० च्या वर प्रयोग पण झाले होते, इतकं ते गाजलं! 'द थ्री पेनी ऑपेरा' हे नाव देखील तसं वैशिष्ट्यपूर्णच आहे. ऑपेरा बघणे ही त्या काळी फक्त उच्चभ्रू लोकांनांच परवडणारी आणि प्रतिष्ठेचा मापदंड समजली जाणारी गोष्ट होती. आपल्याकडे गाण्यातलं काहीही न समजणारा पण 'आम्ही कधी सवाई चुकवतच नाही' असं नाक उडवून सांगणारा एक वर्ग आहे, तसंच काहीसं! म्हणूनच हा थ्री पेनी इतक्या तुच्छ किमतीचा ऑपेरा सर्वसामांन्यांचा आहे असं सुचवलं आहे. हे नाटक म्हणजे 'नाही रे' वर्गाचं 'आहे रे' वर्गावरचं एक भाष्य आहे असं म्हणता येईल.

या नाटकाबद्दल अधिक बोलण्याआधी त्याची रूपरेषा सांगतो.

याची सुरुवातही उल्लेखनीय म्हणावी लागेल. कारण सुरुवातीला नाटकाचा सूत्रधार बजावतो की इतर नाटकांमधून जशी नैतिकतेची शिकवण दिली जाते किंवा काही बोधामृत वगैरे पाजायचा प्रयत्न होतो तशी अपेक्षा या नाटकाकडून करू नका! या नाटकातून कसलीही शिकवण द्यायचा प्रयत्न केलेला नाही! नंतर 'द बेगर्स ऑपेरा' मधे होते तशी हांडेल नावाच्या एका प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाच्या ऑपेरातल्या गाण्याच्या विडंबनाने एक नांदी होते. मग एक फाटक्या कपड्यातल्या माणूस मॅकहीथ ऊर्फ मॅक नामक एका कुप्रसिद्ध गुंडाच्या कर्मकहाण्या गाण्यातून सांगतो. हा काळ व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या जरासा आधीचा आहे.

जोनाथन पीचम याचा भिकार्‍यांना शिक्षण द्यायचा धंदा आहे. तो त्यांना शिक्षण दिल्यानंतर त्यांना भीक मागण्याचा परवाना विकतो शिवाय त्यांच्या भीकेतलं ५०% कमिशन घेतो. पहिल्या अंकाची सुरुवात एका विनापरवाना होतकरू भिकार्‍याला संस्थेत प्रवेश देण्यावरून होते. याला इतर परवानाधारक भिकार्‍यांनी बडवून संस्थेच्या कार्यालयात पाठविलेले असते. त्याला भिक्षेकरी प्रशिक्षण संस्थेची माहिती दिल्यानंतर आपली मुलगी पॉली काल रात्रीपासून घरी आलेली नाही हे पीचम पतिपत्नीच्या लक्षात येतं. पॉलीने मॅकशी, अगदी त्रोटक ओळख असताना देखील, लग्न करायचं ठरवलेलं असतं. इथे पॉली आणि मॅक यांच्या लग्नाचा प्रवेश चालू होतो. लग्नासाठी आणि संसारासाठी लागणार्‍या वस्तू व खाद्यपदार्थ मॅकच्याच गॅंगने इकडून तिकडून ढापून आणलेल्या असतात. लग्नाला खुद्द पोलीस कमिशनर टायगर ब्राऊन जातीने हजर असतो. तो मॅकचा जिवलग मित्र असतो. ते दोघे पूर्वी सैन्यात बरोबर असताना त्यांची मैत्री झालेली असते. पॉली नंतर घरी येऊन तिच्या लग्नाची बातमी देते. आई वडिलांच्या रागाला भीक न घालता ती त्याच्याकडे जायचं ठरवते आणि वर पोलीस कमिशनर कसा त्याचा जानी दोस्त आहे ते पण सांगते. पीचमला अर्थातच ते पसंत पडत नाही आणि तो मॅकला फाशीवर लटकविल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचं जाहीर करतो.

दुसर्‍या अंकात पॉली मॅकला बजावते की तिचा बाप त्याला तुरुंगात पाठविल्याशिवाय रहाणार नाही. मॅकला शेवटी ते पटते आणि तो लंडन सोडून जायची तयारी करतो. जाण्यापूर्वी पॉलीला त्याचा धंदा संभाळता यावा म्हणून त्याच्या काळ्या धंद्याची आणि त्याच्या सहकार्‍यांची माहिती आणि त्यांना कसं हाताळायचं हे तो तिला सांगतो. पण लंडन सोडायच्या आधी तो त्याच्या आवडत्या कुंटणखान्यात त्याच्या आधीच्या प्रेयसीला, जेनीला, भेटायला जातो. तिथे ते त्यांच्या जुन्या प्रेमाचे गोडवे गातात. पण मॅकला हे माहिती नसते की पीचमच्या बायकोने जेनीला मॅक आला की पोलिसांना खबर देण्यासाठी पैसे चारलेले आहेत. ती पोलिसांना खबर करते. मग टायगर ब्राऊनच्या हातात काही रहात नाही, तो मॅकहीथची माफी मागतो पण त्याला तुरुंगाच्या कोठडीपासून वाचवू शकत नाही. तुरुंगात त्याची अजून एक प्रेयसी ल्युसी (टायगर ब्राऊनची मुलगी) आणि पॉली एकाच वेळी येतात. तिथे त्या दोघींचं मॅक नक्की कुणावर प्रेम करतो यावर जोरदार भांडण होतं. पॉली निघून गेल्यावर ल्युसी भोवळ आल्याचं नाटक करून जेलर कडून किल्ली मिळवते आणि त्याची सुटका करते. ते पीचमला समजल्यावर तो टायगर ब्राऊनला भेटतो आणि भिकार्‍यांच्या झुंडी पाठवून राणीच्या राज्याभिषेकाच्या मिरवणुकीचा विचका करण्याची धमकी देतो.

तिसर्‍या अंकात जेनी पीचमकडे तिचे पैसे मागायला येते, ते सौ. पीचम द्यायचे नाकारते. श्री. पीचम जेनीला बांधून आणि तिचे हाल करून मॅकचा ठावठिकाणा काढून घेतो. नंतर टायगर ब्राऊन पीचम आणि त्याच्या भिकार्‍यांना मिरवणुकीच्या आधीच अटक करण्यासाठी येतो. तेव्हा त्याला भिकारी अगोदरच मिरवणुकीच्या रस्त्यावर उभे आहेत आणि फक्त पीचमच त्यांना थांबवू शकतो हे समजतं आणि तो हवालदील होतो. मॅकला पकडून त्याला फाशी देणे हा एकमेव पर्याय त्याच्यापुढे शिल्लक रहातो. पुढच्या प्रवेशात मॅक परत तुरुंगात आलेला दिसतो पण जेलरला पैसे चारून सुटका करून घेण्याचा मेटाकुटीचा प्रयत्न करत असतो. लवकरच त्याला समजतं की पॉली किंवा त्याचे सहकारी यापैकी कुणीही तितकी रक्कम उभी करू शकत नाही किंवा त्यांना ती करण्याची इच्छा नाही आणि तो नाईलाजाने मरायला तयार होतो. मॅक सगळ्यांकडे गाण्यातून क्षमा याचना करतो. आता तो फाशी जाणार इतक्यात पुन्हा एकदा सूत्रधार उगवतो आणि म्हणतो की आम्हाला असा दु:खी शेवट करायला आवडत नाही. आम्हाला लोकांना रडवून पैसे कमवायचे नाहीत. मग रहस्यमयरित्या एक दूत राणीचा निरोप घेऊन येतो आणि सांगतो की मॅकला खुद्द राणीने माफी दिलेली आहे, इतकंच नाही तर त्याच्या भविष्याची तजवीज देखील केली गेलेली आहे. इथे नाटक संपते.

ऑपेराचं मराठीत आणण्यासाठी कोणता नाट्यप्रकार सोयीचा ठरेल? मला तरी ऑपेराच्या जवळचे मराठीत दोनच नाट्यप्रकार आहेत असं वाटतं. एक संगीतनाटक आणि दुसरा तमाशा! तमाशाच्या लवचिकतेमुळे पुलंनी तमाशा स्विकारला असावा. त्यामुळे मूळ संकल्पने पासून ते थोडे दूर गेले. ऑपेरा प्रतिष्ठित लोकांसाठीच असायचा, पण तमाशा मुख्यतः सर्वसामान्य लोकच बघत असत, ती प्रतिष्ठित लोकांनी बघायची गोष्ट नव्हती. शिवाय तमाशा म्हंटल्यामुळे प्रथेनुसार त्यात त्यांना गण गवळण हेही घालावं लागलं. अर्थात त्या दोन्ही गोष्टी लवकर आवरल्या आहेत म्हणा!

इथे मूळ नाटकातली इंग्रजीत भाषांतरित केलेली गाणी ऐकलित तर समजेल की पात्रांचा वेगळेपणा गाण्यातून तितकासा जाणवत नाही. सर्व पात्रं साधारणपणे एकाच शैलीची गाणी म्हणतात. मूळ नाटकातील गाणी ही जॅझ आणि जर्मन नृत्यसंगीताच्या शैलीवरची आहेत. पुलंनी मात्र गाणार्‍या पात्रांचा वेगळेपणा त्यांच्या गाण्यातून सुद्धा कसा दिसेल हे पाहिलं आहे. भिक्षेकरी प्रशिक्षण संस्था चालविणारे पंचपात्रे दांपत्य (पीचम) हे आधी संगितनाटकात अभिनय करणारं दाखवलं आहे त्यामुळे त्यांची गाणी तशा प्रकारची आहेत. मालन (पॉली) व लालन (ल्युसी) यांची गाणी भावगीत/सुगम संगित यात मोडणारी आहेत. तसेच रंगू तळेगावकर (जेनी) या वेश्येला लावणीशैली तर अंकुश नागावकर (मॅक) व त्याच्या गुंडांकरिता कोळीगीत वगैरे लोकसंगीताचीही तरतूद होती.

पण जब्बार पटेलांनी ही सांगितिक बैठक अधिक विस्तृत केली आणि आणखी रंगत, लज्जत, व विविधता आणली. रंगू तळेगावकरचं त्यांनी पुलंच्या संमतीने झीनत तळेगावकर असं धर्मांतर केलं. त्यामुळे गझल, ठुमरी, कव्वाली सारखे गायनप्रकार उपलब्ध झाले. पुलंनी तमाशातल्या सूत्रधाराला मूळ नाटकापेक्षा जास्त वाव दिला गेला आहे. पण हा नुसता बोलणारा सूत्रधार आहे, अर्थात मूळ नाटकातही तो गात नाहीच! पण जब्बार पटेलांनी दोन परिपाश्र्वक, पुलंच्या संहितेत नसलेले, घातले. (याच संकल्पनेचा वापर पुढे जब्बार पटेलांनी 'जैत रे जैत' मधे पण केला) तमाशातल्या पुढच्या प्रसंगाची गाण्यातून वातावरण निर्मिती करायची हे यांचं काम! रवींद्र साठे आणि मेलडी मेकर्स फेम अन्वर कुरेशी हे ते काम चोख पार पाडायचे! त्यांना गझल, पॉप, कोकणी तसंच हिंदी गाण्यांसारखी गाणी अशी विविध प्रकारची सुंदर गाणी मिळाली. पण हे बदल काहीच नव्हेत असा अफलातून बदल त्यांनी अंकुश नागावकरच्या (मॅक) गायनशैलीत केला. तो म्हणजे कोळीगीतांऐवजी पाश्चिमात्य संगीतातील अत्यंत लोकप्रिय पॉप/जॅझ संगीताचा वापर! त्यामुळे नाट्यमंचावर तबला पेटी व फार फार तर सारंगी यापेक्षा इतर कुठलीही वाद्यं न पाहिलेल्या प्रेक्षकांना प्रथमच गिटार, ड्रमसेट, अ‍ॅकॉर्डियन, व्हायोलिन, आणि सॅक्सोफोन सारख्या वाद्यांनी भरलेला वाद्यवृंद बघायला मिळाला. पण नुसती वाद्यं आणून ही नाविन्यपूर्ण कल्पना साकार झाली नसती. त्यासाठी थेट तशा शैलीच्या चाली बांधणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते भारतीय शास्त्रीय संगीतात आयुष्य घालविलेल्या संगीतकारांचं काम नव्हतं. पण हा बदल करण्याआधी जब्बार पटेलांच्या डोळ्यासमोर नंदू भेंडे असणार त्याशिवाय त्यांनी तसा विचार केला नसता! नंदू भेंडे याने तमाशात येण्याआधी मुंबईतलं इंग्रजी रंगभूमीवरील ‘जिझस ख्राईस्ट सुपरस्टार’ हे अलेक पदमसींच संगीत नाटक गाजवलं होतं. त्याने पुलंनी अंकुशसाठी लिहीलेल्या गाण्यांना जबरदस्त चाली तर लावल्याच पण त्याही पुढे जाऊन जिथे नुसते संवाद होते त्याचीही गाणी केली आणि अंकुशच्या भूमिकेतून म्हंटली.

तीन पैशाचा तमाशा लंडन ऐवजी मुंबईत होतो आणि आपल्याकडे राणीबिणी भानगड नसल्यामुळे राज्याभिषेकाच्या मिरवणुकीऐवजी राष्ट्रपतीच्या स्वागतासाठी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीचा उल्लेख होतो. शेवटी येणार्‍या राणीचा दूताला फाटा देऊन मिष्किल पुलंनी तिथे साक्षात विष्णू म्हणजेच नारायण (जेलरचं पण नाव नारायणच असतं) अवतरवला आहे. अंकुशच्या गळ्यातून फाशीचा दोर काढल्यावर अंकुश त्याला विचारतो.. 'देवा! मी कसे तुझे उपकार फेडू'. त्यावर नारायण त्याला 'सावकाश! हप्त्याहप्त्याने दे!' असं सूचक उत्तर देतो. जायच्या आधी नारायण खड्या आवाजात म्हणतो..'आता अंधार करा रे! मला अंतर्धान पाऊ द्या!'.

कथानकात आणखीही काही बदल आहेत. लालन (ल्युसी) ही टायगर भंडारेची (टायगर ब्राऊन) मुलगी दाखवलेली नाही. तसंच पंचपात्रे झीनतचा छळ करून अंकुशच्या ठावठिकाण्याची माहिती काढताना दाखविलेला नाही.

ऑपेरातले संवाद मला इतके विनोदी वाटले नाहीत. जर्मन लोकांची विनोदबुद्धी सुमार असते अशा सर्वसाधारण समजाला धक्का न देण्याचं काम त्यांनी चोख पार पाडलंय. पुलंचे संवाद प्रचंड विनोदी आहेत, पुलंनी रुपांतर केलंय म्हंटल्यावर वेगळं काही होणं अपेक्षित नव्हतंच म्हणा! 

पुलंचा सूत्रधार नैतिक शिकवण वगैरे बोलत नाही पण हे तीन पैसे कशाबद्दल लागणार आहेत ते तो सांगतो. तमाशाचं शीर्षक गीत चालू असतानाच तो म्हणतो एक पैशाचं गाणं होईल, एका पैशाचा नाच होईल आणि तिसरा पैसा लाच म्हणून घेतला जाईल. या शीर्षक गीताची चाल थोडी हिंदी गाण्यांसारखी आहे. शीर्षक गीताचे शब्द असे आहेत..
तीन पैशाचा तमाशा, आणलाय आपल्या भेटिला
इकडून तिकडून करून गोळा, नट अन नटी धरून भेटिला
आणलाssssss
आपल्या आपल्या आपल्या भेटीला!

यातलं 'तीन पैशाचा तमाशा' हे जवळ जवळ 'ओ माय लव्ह' या गाण्याच्या चालीसारखंच आहे आणि 'आपल्या आपल्या आपल्या' हे 'देखो देखो देखो देखो अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस' मधल्या देखो देखो सारख आहे.

खाली तमाशातली काही गाणी मला आठवतील तेव्हढी लिहीली आहेत.

अंकुश त्याच्या झीनत बरोबर घालवलेल्या त्याच्या आयुष्याचं वर्णन या पॉप धर्तीवरच्या गीताने करतो.
एक चिमुकली होती खोली, इवली केविलवाणी
त्या खोलीतील मी होतो राजा आणि ती होती माझी राणी
ओठावरती होती गाणी, होता इष्कबहार
नव्हती चिंता, होती एकच कशी टळेल दुपार
झीनतची अन माझी आमची प्रीत पुराणी
त्याची ऐका आता कहाणी, आमची प्रीत पुराणी

लढवुनी डोके सांगितले मी तिजला काय विकावे
निसर्गनिर्मित भांडवलावर चार घास कमवावे
त्या घासातील दोन तिचे अन दोन तिने मज द्यावे
बदल्यापोटी दुष्टापासून मी तिजला रक्षावे
झीनतची अन माझी आमची प्रीत पुराणी
त्याची ऐका आता कहाणी, आमची प्रीत पुराणी
(पुढची कडवी आता आठवत नाहीत. हे गाणं अगदी त्रोटक प्रमाणात इथे ऐकू शकाल. पण हे प्रत्यक्ष तमाशातल्या गाण्याचं रेकॉर्डिंग वाटत नाही. नंतर केलं आहे असं वाटतंय.)

गाणारे सूत्रधार पसायदानाचं हे विडंबन म्हणतात.
आता पैशात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । कसाईदान हें ॥

ते सुर्‍यांचे गंजणे सांडो, नित्य चाकुंची धार वाढो |
भोती परस्पर जडो | वैर जीवांचे ||

कसाई राहोत संतुष्ट | त्यांना लाभोत गाई पुष्ट |
अधिकातला अधिक भ्रष्ट | त्याते सत्ता मिळो सदा ||

अंकुश मुंबई सोडून निघून जायच्या आधी मालनला त्याच्या सहकार्‍यांची आणि त्यांच्याशी कसं वागायचं हे या जॅझ प्रकारातल्या गाण्यातून सांगतो. या गाण्याच्या सुरुवातीच्या कॉर्डस डेव्ह ब्रबेकच्या 'टेक फाईव्ह' या गाण्याच्या सुरुवातीच्या कॉर्डस सारख्या आहेत.
हरामखोर! सगळे हरामखोर!
हरामखोर! सगळे साले हरामखोर!
हा छक्क्या चारसोबीस याचा भरोसाच नाय
परभारी माल विकतो रोख पैसा द्यायचा नाय
तीन आठवड्याचा टायम दे, नाय सुधरला तर लटकू दे
भंडारे सायबाला निरोप दे
सायबाला सांगून काढून टाक त्याचा जोर
हरामखोर! सगळे हरामखोर!
हरामखोर! सगळे साले हरामखोर!

फासावर जायच्या आधी अंकुश या गाण्याने सगळ्यांची क्षमा याचना करतो.
माफ करा! माफ करा!
माफ करा! माफ करा!
हे जेलर वॉर्डर यांनी छळलं मला भारी
माझ्या वाटची ढापली त्यांनी अर्धी भाकरी
कायद्याच्या गप्पा मारून त्यावर जगणारी
हलकट साली सापाची अवलाद आहे खरी
सत्यानाश होऊ दे त्यांचा, सत्यानाशssss!
पण जाऊ दे साला, मारो गोली
त्यांना माफ करा!
माफ करा! माफ करा!
माफ करा! माफ करा!

पीचमच्या 'मॉर्निंग साँग' सारखं पंचपात्रे त्याच्या भिकार्‍यांना ही भूपाळी गाऊन उठवतो. पण पुलंची भूपाळी ऐकताना केव्हाही जास्त हसू येतं.
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!
नेमुन दिधल्या नाक्यावरती भिक्षा मागत सुटा!
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!

आssss! देवद्वारी असेल जमली भक्तांची दाटी
अडवा त्यांना वाटेवरती पुढे करुन वाटी
अहो आंधळे दिवस उगवला
दिसते, डोळे मिटा
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!

नयनीssss आणा
केविलवाणा श्वानासम भाव, भावssss
नयनीssss आणा!
ध्येय आपुले फोडित जाणे पाझर हृदयाला
अदय जनाना सदय करावे हा आपुला बाणा
नयनीssss आणा

दिसला जर का कुणी दयाळु
दिसला जर का कुणी दयाळु
पुरता त्याला लुटा
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!

ऑपेरातल्या 'व्हॉट कीप्स अ मॅन अलाईव्ह' या गाण्याचे हे सुंदर रुपांतर...
माणूस जगतो कशावरी? माणूस जगतो कशावरी?
दीड वितीच्या खळगीला या देवाने नच बूड दिले
जाळ भुकेचा पेटतसे निज देहाचे हे धूड दिले
या जाळाल विझणे ठाउक फक्त एकदा चितेवरी
माणूस जगतो कशावरी?

विनोदी संवाद आणि गाण्यातली वैविध्य यामुळे मला तरी पुलंचं रुपांतर ऑपेरापेक्षा सरस वाटलं.

तळटीपः दुर्देवाने मला आता गाण्यांचे सर्व शब्द आठवत नाहीयेत. आणि त्याहून मोठं दुर्देव म्हणजे तीन पैशाच्या तमाशाबद्दल फार काही माहिती नेटवरही उपलब्ध नाही. कुठेही तमाशाच्या गाण्यांचं रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. थ्री पेनी ऑपेराचे प्रयोग अजूनही होतात, त्यातली गाणी अजूनही ऐकली जातात, जगभरातले ऑर्केस्ट्रा त्यातल्या गाण्यांचे प्रोग्रॅम करतात. या पार्श्वभूमिवर आपल्या इथे झालेली उपेक्षा फारच खटकते!

-- समाप्त --

Monday, February 22, 2016

संगीत चिवडामणी!

ही तशी जुन्या काळातली गोष्ट आहे. कुणास ठाऊक कसा पण मला संगीताशी झटापट करायचा झटका आला. माझ्या आयुष्यात स्वर कमी आणि व्यंजनं जास्त असल्यामुळे असेल कदाचित! तर मी गिटार शिकायचा घनघोर निर्णय घेतला. छे! छे! पोरगी पटवायला म्हणून नाही हो! तेंव्हा माझं लग्न झालेलं होतं आणि एक ८ महिन्याचा मुलगा पण होता. आता तुम्ही जाणुनबुजून व्यंजनांचा आणि लग्नाचा संबंध लावायला गेलात तर माझी व्यंजनं आणखी वाढवाल! असं म्हणा की माझं सर्जनशील मन कुठेतरी व्यक्त होण्याची धडपड करत होतं आणि  ते मला स्वस्थ बसू देत नव्हतं!

आता गिटारच का शिकायचं ठरवलं? श्या! इतक्या चांगल्या वाद्याचं नाव त्या सतत तुंबलेल्या, घाण वास मारणार्‍या, डासांचं नंदनवन असलेल्या थिजलेल्या काळ्याशार पाण्यातून बुडबुडे फुटणार्‍या नाला सदृश वस्तूशी जुळणारं का बरं आहे? नावात काय आहे म्हंटलं तरी मधुबालाला अक्काबाई म्हंटल्यावर ते लोभस रूप डोळ्यासमोर येणार आहे का? त्रिवार नाही. पण ते असो. कारण मोठ्या लोकांनी म्हणून ठेवलेल्या गोष्टी, कुठलाही वाद न घालता, जशाच्या तशा स्विकारायच्या असतात अशी आपली संस्कृती सांगते. तर गिटार शिकायचं खरं कारण म्हणजे पिक्चर मधले हिरो! ते एकतर पियानो तरी वाजवताना दाखवितात नाहीतर गिटार तरी! आठवा ते पियानोच्या त्रिकोणातून घेतलेले हिरो आणि हिरॉईनचे शॉट्स! पण पियानो मला परवडला नसता आणि परवडला तरी एक बेडरूमच्या तुटपुंज्या घरात तो 'पियानो कम, डायनिंग टेबल जादा' झाला असता. शिवाय, तो काखोटीला मारून कुठे पिकनिकला वगैरे नेऊन भाव खाणं कसं शक्य होतं? मग राहिलं फक्त गिटार! आणि गिटार वाजवता वाजवता काय काय मस्त मस्त स्टायली मारता येतात राव! तरीही परत एकदा पोरी पटवणे हा गिटार शिकण्या मागचा उद्देश नव्हता हे नम्रपणे नमूद करू इच्छितो!

एकदा ते शिकायचं जाहीर केल्यावर मित्रांनी किती टिंगल केली ते सांगायला नकोच. 'तू लहानपणी रडलास की गंजलेल्या टमरेलावर दगड घासल्यासारखा आवाज यायचा म्हणे' इथून सुरुवात झाली इतकंच सांगतो. मनात म्हणायचो, एकदा मी स्टेजवर दिसायला लागलो की हेच टोळभैरव चिमण माझाच कसा जिवलग मित्र आहे याचं रसभरीत वर्णन करतील. 

झालं, मग एक क्लास लावला! आठवड्यातून ३ दिवस, सकाळी ऑफिसला जायच्या आधी तासभर तारा खाजवायच्या. क्लासमधे खूप गिटारं ठेवलेली होती त्यामुळे अपफ्रंट इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न नव्हता. मास्तरनी कसं, कुठे आणि काय खाजवायचं ते दाखवलं आणि म्हणाला आता या नोट्स वाजव. नोट्स वाजव? हायला! नोट्स वाजवायच्या पण असतात? तेव्हा मला फक्त नोट्स घ्यायच्या असतात नाहीतर कॉपी करायच्या असतात इतकंच माहिती! मराठीतलं शिक्षण अचानक मान खाली घालायला लावतं, ते असं.

दुसरी एक अस्वस्थ जाणीव अशी झाली की संगीत शिक्षण हे नेहमीच्या शाळा/कॉलेजातल्या शिक्षणापेक्षा फार वेगळं आहे. तिथे घोकंपट्टी आणि कॉप्या मारून तरून जाता येतं. इथं तसं नाही, इथं आपणच मरायचं तेव्हा स्वर्ग दिसणार! 

पहिले काही दिवस नुसते उजव्या व डाव्या हातांनी, एकाच वेळी, दोन वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नात  गेले. हा प्रकार आपल्या चुकांचं खापर दुसर्‍यांवर फोडण्याइतकं सोप्पं असतं तर काय हो? एकाच वेळी, डाव्या हाताने वर्तुळ व उजव्या हाताने चौकोन काढता येतो का पहा बरं जरा! डाव्या हाताच्या एकेका बोटाने एका तारेच्या एकेका फ्रेटवर दाबायचं आणि उजव्या हाताने नेमकी तीच तार छेडायची. दाबलेल्या तारेवरचा दाब कमी झाला तर ती तार गळा घोटल्यासारखी कोकलते. कर्मकठीण काम हो! तसंच करंगळीने, ते सुद्धा डाव्या हाताच्या, काही दाबता येतं का? कान खाजविण्याव्यतिरिक्त करंगळीचा काही उपयोग नाही हे माझं स्पष्ट मत आहे. आणि सगळ्यात शेवटी, एक तार दाबताना, मनावर कुठलाही दबाव न ठेवता, इतर कुठल्याही तारेला कशाचाही स्पर्श देखील होऊ द्यायचा नाही. कुणालाही स्पर्श न करता लोकलच्या आत बाहेर जाता येतं का? एकंदरित गिटार छेडणं हे पोरींना छेडण्याइतकं सोप्पं नाही!

मात्र, काही शब्दांच्या उगमाबद्दलचा साक्षात्कार असा या शिक्षणाचा वेगळाच एक फायदा झाला! 'ब्लिडिंग एज' म्हणजे बोटांना भूकंपात जमिनीला पडतात तसे चर पडून रक्तबंबाळ होणं. 'गायनी कळा' म्हणजे भेग पडलेल्या बोटाने तार दाबल्यावर ज्या जीवघेण्या कळा येतात त्या! 'तारांबळ' म्हणजे अशी तारवाद्य शिकताना जे काही होतं ते.

तार छेडण्यासाठी उजव्या हातात एक छोटा त्रिकोणी प्लेक्ट्रम धरून पाहिजे त्या तारेला झापड मारायची असते. तो प्लेक्ट्रम बोटातून कधी संधी निसटल्यासारखा निसटायचा, तर कधी इतका वर सरकायचा की प्लेक्ट्रम ऐवजी बोटंच तारेवर घासायची. नाहीतर कधी तो गोल फिरून बोटांमधे गुडुप व्हायचा. पहिल्या आणि शेवटच्या तारेला झापडणं त्यातल्या त्यात सोप्पं, पण मधल्याच एखाद्या तारेला झापडणं ते सुद्धा शेजारच्या तारेला न दुखावता म्हणजे खरी तारेवरची कसरत आहे. पाण्यात पडलं की पोहता येत तसं गिटारच्या तारांवर बोटं दाबली की गिटार येत नाही.. बोटं तरी कापतात नाही तर तारा तरी तुटतात.

२/३ महिन्यानंतर माझी फारशी प्रगती दिसेना म्हंटल्यावर मास्तरने घरी पण प्रॅक्टिस करायला हवी म्हणत एक गिटार अक्षरशः गळ्यात मारलं. गिटार सुरात कसं लावायचं ते पण सांगितलं. त्यासाठी सूर ओळखता यायला लागतो महाराजा! सूर फार लांब राहीले, मला तर पटकन माणसं पण ओळखता येत नाहीत. मागे एकदा एक संगीत शिक्षक माझ्याकडे आले होते. मुलांना वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे सूर कसे ऐकू येतात हे शिकविण्यासाठी त्यांना ऑसिलोस्कोपवर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे सूर तयार करून ते कॅसेटवर रेकॉर्ड करून हवे होते. ते मी रेकॉर्ड केले आणि मग कॅसेट वाजवली. मला तर सगळे सूर सारखेच वाटले. पण ते म्हणाले सूर वेगवेगळे आहेत, आम्ही संगीतातले आहोत, आमचे कान तयार असतात. तेव्हापासून कानाला जो खडा लागला आहे तो कायमचाच!

तरी चिवटपणे मी ट्युनिंग करीत राहीलो, पण तार पिळून सूर वर न्यायचा की ढिली करून खाली आणायचा ते कळायचंच नाही. परिणामी तारा जास्त पिळल्या जाऊन तुटायच्या! माझ्या मित्रांनी खडूसपणे 'काय, कसं चाललंय गिटार?' असं विचारलंच तर त्यावर माझ्या बायकोचं, सरिताचं, उत्तर ठरलेलं होतं.. 'नुसता तोडतोय तो!'. माझ्या ट्युनिंगच्या अत्याचारामुळे गिटार मधून जे काही चित्रविचित्र आवाज यायचे ते फक्त माझ्या मुलाला, गोट्यालाच आवडायचे. त्याला गिटार म्हणजे त्याच्यासाठी आणून ठेवलेलं एक खेळणं वाटायचं. त्याला सतत काहीतरी आपटायला आवडायचं म्हणून सरिताने त्याला एक वाटी दिली होती. ती तो डाव्या हाताने जमिनीवर जोरजोरात आपटायचा. बहुतेक लहान पोरं सुरवातीला डावखुरी का असतात कोण जाणे! वाटी जमिनीवर आपटण्यापेक्षा गिटारवर आपटली तर जास्त मजेशीर आवाज येतात हे एकदा त्याच्या तल्लख डोक्यात घुसल्यावर तो गिटारला मोक्ष देऊनच थांबला. इतरांना मात्र ते त्याच्या उज्वल सांगितिक भरारीचे पाळण्यातले पाय वाटले.

पण मी हट्ट सोडला नाही. नवीन गिटार आणलं, हे गिटार मात्र मी गोट्याच्या हाती लागू नये म्हणून लॉफ्टवर ठेवत असे. शिवाय कुणीतरी सांगितलं म्हणून ट्युनिंगची एक शिट्टी पण आणली. पण माझ्या शिट्ट्या ऐकून सरिताच्या कुकरची शिट्टी उडाली.. 'अरे, तुला काही लाज? सरळ रस्त्यावरच्या मुलींना बघून शिट्ट्या मारतोयस ते?'. शेवट पर्यंत मी ट्युनिंगच्या नावाखाली पोरींना शिट्ट्या मारतोय हा तिचा समज मी काही दूर करू शकलो नाही.

माझ्या गिटार शिक्षणाचा प्रवास असा कोकाकोला सारखा झाला.. सुरुवातीला रेग्युलर कोक, मग डाएट आणि शेवटी झीरो होत होत अशी त्याची प्रगती (की अधोगती?) होत होत ते लयास गेलं.

एक दिवस अत्याचार सहन न होऊन माझ्या गिटारने लॉफ्टवरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्या दिवशी गिटारी अमावास्या होती म्हणतात!

-- समाप्त --