Tuesday, August 20, 2013

तेथे पाहिजे जातीचे.. भाग-५ (अंतिम)

तेथे पाहिजे जातीचे - मागील भाग इथे वाचा..  भाग-१, भाग-२, भाग-३ , भाग-४

'अरे सदा! काय केलं नक्की तुम्ही लोकांनी? स्टुअर्ट इज सिंपली जंपिंग अप-एन-डाऊन!.. थयथयाट करतोय तिकडे!'.. सीईओनं थयथयाट केला.

'राकेश, तो साला चालू आहे एक नंबरचा! नुसती ठेच लागली तरी ट्रकनं उडवल्यासारखा विव्हळेल.'

'मग काय झालंय नक्की? आँ?'

'तसं काही विशेष नाहीये. एका प्रोग्रॅम मधे बग आलाय. आणि बग तर काय सारखे येत जात असतात.'

'काय बग आहे?'

'तो शेअरिट नावाचा प्रोग्रॅम स्क्रीनवर कचरा दाखवतोय म्हणे!'

'बिझनेस इंपॅक्ट काय आहे त्याचा?'

'कुणालाही शेअर ट्रेडिंग करता येत नाहीये.'.. प्रोजेक्ट मॅनेजर व न्यूज रिपोर्टर यांचे परस्पर विरुद्ध गुणधर्म आहेत. जबरदस्त भूकंप होऊन अर्ध पुणं गाडलं गेलं तरी सीईओला प्रोजेक्ट मॅनेजर 'काही विशेष नाही! जमीन थोडी हलली आणि एक दोन घरं पडलीयेत' यापेक्षा जास्त हादरा देणार नाही. न्यूज रिपोर्टर अर्ध पुणं गाडलं गेलं तर जगाचा अंत झाल्याचा आव आणतील आणि वर निर्लज्जपणे जमिनदोस्त घरमालकाला 'आपको कैसा लग रहा है?' विचारतील.

'हां! नाऊ द होल स्टोरी इज कमिंग आउट! अरे बिझनेस झोपला ना म्हणजे त्यांचा! शो स्टॉपर आहे हा बग! विशेष नाहीये काय म्हणतोस? तुला काही लाज?'

'उलट मला ही आपली बॉटमलाईन वाढवायची संधी वाटतेय. तसंही कॉन्ट्रॅक्ट तर जवळपास गेलेलंच आहे!''आपल्या नाचक्कीची बॉटमलाईन वाढतेय इथे!'

'ती स्टुअर्ट करतोच आहे. पण हे बघ! त्याला दोन माणसं ताबडतोब पाठवून हवी आहेत, बग सोडवायला. म्हणजे दोन माणसांचं बिलिंग चालू होईल लगेच!'

'आणि प्रोजेक्ट वेळेवर करायचं काय?'

'त्याची मी स्टुअर्टला कल्पना दिली आहे. तो म्हणाला... वि कॅन्ट मेक अ‍ॅन ऑम्लेट विदाउट ब्रेकिंग फ्यु एग्ज! आधी बगाचं बघा!'

'ठीक आहे. दो लल्लू भेज दो!'

'राकेश, ते लल्लूंचं काम नाहीये. तेथे पाहिजे जातीचे!'

=========================================================

संगिताने आणलेला केक 'हॅपी बड्डे'च्या गजरात कापता कापता निखिल म्हणाला.. 'नाऊ आय हॅव द कटिंग केक टेक्नॉलॉजी!'

'सॉरी निखिल! आज मी तुला फक्त अनहॅपी बड्डे म्हणू शकतो'.. सदाने प्रवेश घेऊन तोंडात केकचा तोबरा भरत रसभंग केला.

'का सर? क्वालिटी प्रोसिजर लिहायच्या आहेत?'.. अभयने चोंबडेपणा केला.

'गपे अभय! माझ्यासमोर बोलतो आहेस तोपर्यंत ठीक आहे. क्वालिटी पोलिसांसमोर बोललास तर मिटिंग मधे मला शिव्या बसतात! त्या शेअरिट मधे बग आलाय. स्क्रीनवर नुस्ता कचरा दिसतोय!'

'सर! मॉनिटर खराब झाला असेल.'.. संगितानं अक्कल पाजळली, पण सदाच्या डोळ्यातले भाव बघताच लगेच 'सॉरी' म्हणाली.

'सर पण तो सगळ्यात चांगला टेस्ट केलेला प्रोग्रॅम आहे. असं कसं होईल त्यात?'.. अभय.

'अरे बाबा! टेस्टिंग मधे बग आले नाहीत हे पावसाळ्याच्या दिवसात काही दिवस पाऊस पडला नाही तर लगेच पावसाळ्यात पाऊस पडत नाही असा निष्कर्ष काढण्यासारखं आहे. तेव्हा काय काय चुकू शकेल, काय काय घडू शकेल याचा विचार.. चर्चा करा. विशिष्ट डेटामुळे असं होतंय का? तिथल्या एन्व्हायरेंटची माहिती घ्या.. जितकी मिळेल तितकी माहिती मिळवा. लॉग बघा.'.. सदानं सटासट फर्मानं सोडली.

'सर! तो प्रोग्रॅम लॉग लिहीत नाही.'.. अभयनं काडी घातली.

'का? मी सांगितलं होतं ना? सगळ्या प्रोग्रॅम मधे लॉग लिहीलाच पाहीजे म्हणून?'

'डास पकडायला कोळ्याची जाळी घरभर लावतं का कुणी?.. असं काहींचं म्हणण आहे!'.. अभयने निखिलकडे कटाक्ष टाकत कुठला तरी सूड उगवला.

'आत्ता मला सांगतो आहेस हे? गाडीचं चाक निखळल्यावर सांगणार का चाकाचे नट पिळायचे राहिले होते म्हणून? हा निखिलचा फाजिल आत्मविश्वास काय सांगतो? आँ?.. काय सांगतो? इतकंच की अजून त्याला पुरेसा अनुभव नाही. बाकी कुठल्याही क्षेत्रात अनुभवाने आत्मविश्वास वाढत असेल पण प्रोग्रॅमिंगच्या बाबतीत एकदम उलट!'.. निखिलचा चेहरा एका ओव्हरीत सहा छकड्या बसल्यासारखा झाला.

'लॉग मुळे प्रोग्रॅम स्लो होतो सर! ट्रेड झाल्यापासून ९० सेकंदात तो आपल्याला नाझ्डेकला पाठवायला लागतो.'.. निखिलचा समर्थन करायचा एक दुबळा प्रयत्न!

'बरं झालं तू डॉक्टर नाही झालास. नाही तर सर्दी झाली म्हणून नाक कापायचा सल्ला दिला असतास. मूर्खासारखा लॉग लिहीला तर होईलच प्रोग्रॅम स्लो! लॉग लिहायची टेक्निक्स असतात. श्या! सगळं सोडून मला आधी एक लेक्चर घ्यावं लागणार म्हणजे!'.. सदा कुरकुरला.

'मग आता?'.. संगिता

'आता? आता विश्वात्मके देवे! आधी लेक्चरला चला. मग त्यात लॉग घाला. लॉग नसलेल्या प्रोग्रॅमची यादी द्या मला. आणि स्टुअर्टला दोन माणसं हवी आहेत तिकडे बग सोडवायला. अभय आणि संगिता.. तुम्ही दोघं जाणार आहात. लगेच व्हिसाच्या तयारीला लागा.'

=========================================================

'ए! व्हिसाची काय तयारी करायची असते?'.. अभयनं डबा खाता खाता एक निरुपद्रवी प्रश्न केला.

'किती सूट आणि टाय आहेत तुझ्याकडे?'

'एक सूट आणि दोन टाय! खूप झाले ना?'.. अभयनं चाचरत विचारलं.

'हॅ! एकानं काय होणार? चांगले चार सूट आणि दहा टाय हवेत. नाही तर 'नॉट इनफ टाईज' म्हणून रिजेक्ट करतात.'

'आयला सूट घालून इंटर्व्ह्यूला? मुंबईत तर काय शॉवरला पण घाम येतो!'.. अभयला कल्पनेनेच घाम आला.

'अबे ए! कायतरी फेकू नकोस. ऑफिसरला कुठून कळणारे तुझ्याकडे किती टाय आहेत ते?'

'अरे बाबा! खरंच! ते सगळं बघतात! तुमच्या नावावर पुरेसे पैसे आहेत का? जमीन-जुमला किती?'

'पुरेसे म्हणजे नक्की किती?'.. अभय.

'ते तो ऑफिसर ठरवतो'

'माझ्या नावावर एक अख्खी २५००० रू किमतीची स्कूटर आहे फक्त!'.. अभय चिंताक्रांत झाला.

'पैशाचं इतकं नाही रे! पण टॅक्स भरता की नाही? मागच्या ३ वर्षांची टॅक्स रिटर्न्स जोडायला लागतात.'

'आयला आपल्या टॅक्समधे त्यांचा पण कट असतो का?'

'तुझं लग्न झालंय का? तुझ्या बायकोचं नाव काय? वय काय? पत्ता काय? ती काय करते? असले प्रश्न पण विचारतात.'

'आँ! काय पर्सनल प्रश्न विचारतात लेकाचे! उद्या 'तुम्ही तुमच्या पत्नीशी कधी प्रतारणा केली होती का?' असं विचारलं तर काय सांगणार?'

'तेव्हा सांगायचं माईंड युवर ओन पत्नी म्हणून?'

'हॅ! असले प्रश्न पोलीस स्टेशनात बायको हरवल्याची तक्रार करायला गेलास तरच विचारतील.'

'अरे पण ह्याचं लग्न पण झालेलं नाही... नाही ते कशाला सांगताय उगाच. त्यापेक्षा तुम्ही कधी अतिरेकी होतात काय? तुमचा कुठल्या अतिरेकी संघटनांशी संबंध आला होता काय? त्याबद्दल बोला.'

'याला कुठला अतिरेकी 'हो' म्हणणार आहे? आणि, त्याचं उत्तर तू काहीही दिलंस तरी ते त्यांच्या अतिरेक्याच्या रजिस्टरमधे बघणारच ना तुझं नाव आहे की नाही ते?'

'काय त्रास देतात ना? फक्त तुमचं तिकडे काय काम आहे? कधी जाणार? कधी येणार? असले प्रश्न विचारले तर ठीक आहे.'.. अभय कुरकुरला.

'त्याचं कारण असं आहे की व्हिसा प्रक्रिया भारतीयांनी शक्यतो भारतातच रहावं या साठीच बनवलेली आहे.'

'बरोबर आहे. काही चिल्लर देश आणि स्वर्ग सोडला तर भारतीयांना व्हिसा घेतल्याशिवाय कुणीही दारातसुद्धा उभं करीत नाही.'

'व्हिसा ऑफिसरला तुमच्याबद्दल काय वाटतं माहितीये? तुम्ही कवडीमोलाचे आहात.. तुम्ही एक नंबर चोर, चालू, देशद्रोही, गुन्हेगार, दरिद्री, अस्पृश्य, करबुडवे व थापेबाज आहात.. न्यूयॉर्कच्या गल्लीत झाडू मारायची देखील तुमची लायकी नाही!'

'हा हा! म्हणूनच माझ्या परदेश वार्‍यांपेक्षा व्हिसा ऑफिसच्या वार्‍याच जास्त झाल्यात.'

'व्हिसासाठी काय तयारी करावी?' या सरळसोट प्रश्नाची 'पुण्यातली कुठली शाळा चांगली?' सारखी अनेक उलटसुलट, लांबलचक व असंबद्ध उत्तरं मिळाल्यामुळे अभयला नैराश्य आलं.

=========================================================

'काय सदा? फार काळजीक्रांत दिसतोयंस?'.. एच आर मॅनेजर, प्रिया आगलावे.

'हो ना! ती भावना आठवडाभर न सांगता गायब आहे.'

'कोण भावना?'

'भावना भडकमकर, हैद्राबादची! सुट्टीला म्हणून गेली.. १५ दिवसांपूर्वी. आठवड्यापूर्वी येणार होती. तिच्या मोबाईलवर फोन करतोय.. कुणी उचलतच नाहीये.'

'यू नो व्हॉट? ती येणार पण नाही.'

'आँ? म्हणजे ती परस्पर दुसर्‍या कंपनीत पळालीये असं म्हणायचंय तुम्हाला?'

'एक्झॅक्टली! सहा सहा महिन्यानंतर उड्या मारणार्‍यातली वाटते. जॉईन होऊन सहा महिने झाले असतील ना?'

'अं... हो, नुकतेच झाले मला वाटतं.. पण तशी वाटत नाही हो ती.'

'तुम्हा पुरुषांना नाही कळायचं ते. आम्ही बायका.. एका नजरेत ओळखतो.'

'असेल. असेल. मला तिची फाईल द्या. घरच्या फोनवर फोन करून बघतो आता. काय करणार?'

'बरं.. शोधते.. एम्प्लॉयी नंबर काय तिचा?'

'मॅडम, काय प्रश्न विचारता पण? तुमचा नंबर तरी आठवतो का तुम्हाला?'

'नाही! अरे देवा! इथे तर सगळं एम्प्लॉयी नंबर प्रमाणे ठेवलेलं आहे! मला सगळ्या एक एक करून बघाव्या लागणार म्हणजे.... हं.. ही घे'

'यात तिच्या घरचा नंबर, पत्ता काहीच नाहीये. असं कसं झालं? आपण घेत नाही का ही माहिती?'

'घेतो तर! तिनं फॉर्म भरला नसणार तो. हम्म! तेव्हाच मला शंका यायला पाहीजे होती.'

'मग आता?'

'आता काय? हरी हरी गोविंद गोविंद! नवीन माणूस शोधायला लागा! सिव्ही देऊ?'

'प्रोजेक्ट बंद व्हायची वेळ आली मॅडम.. आता फुटक्या पायपात पाणी सोडून काय करू?'

=========================================================

'मला पूर्वी असं बर्‍याच वेळेला वाटायचं की अमुक अमुक माणूस लायकी नसताना, काडीची अक्कल नसताना कसा काय इतका वर गेला? साध्या साध्या गोष्टी सुधरायच्या नाहीत त्याला.. माझ्याकडूनच शिकला सगळ्या! आता बघा! माझ्याही वर गेला! साल्यानं सॉलिड वशिला लावला असणार वरती!'... पेंगुळलेला सदा 'सिव्ही: मंत्र व तंत्र' यावरचं एका रोजनदारीवरच्या सल्लागाराचं आख्यान ऐकत होता. वेळोवेळी आयोजित केलेल्या असल्या बुद्धी-वादळातून फक्त वादळी झोप यायची. या वेळच्या 'धंदा कसा वाढवता येईल' या वादळात प्रिया मॅडमनी लोकांना सिव्ही चांगला लिहीण्याचं शिक्षण द्यायला पाहीजे अशी फुंकर मारली आणि सीईओला ती मोठी वावटळ भासली. अशा वादळातून सीईओला काही तरी ठोस उपाय योजना केल्याचं समाधान मिळायचं, सल्लागाराला भरपूर पैसे मिळायचे, नेहमीच्या कामातून सुट्टी मिळाल्यामुळे लोकांचाही वेळ सुखात जायचा. विन विन सिच्युएशन म्हणतात ती हीच!

'ही जी वृत्ती आहे ना.. ज्या मधे आपण दुसर्‍याचं यश 'वशिला' नावाखाली टाकून देतो आणि वर 'आपल्याला नाही बुवा वशिलेबाजी करायला आवडत' असं आपल्या वैगुण्यांचं समर्थन करतो.. तिला 'कोल्ह्याला द्राक्षं आंबट' अशी समर्पक म्हण आहे! दुसर्‍याला नावं ठेवण्यापेक्षा स्वतःचं योग्य मार्केटिंग करायला शिका. जो पर्यंत तुम्ही भर चौकात उभं राहून तुम्ही काय काय केलंय ते जगाला मोठमोठ्यांदा ओरडून सांगत नाही तो पर्यंत तुम्हाला कुणी विचारणार नाही.. लक्षात ठेवा.. ओरडणार्‍याचे फुटाणे पण विकले जातात न ओरडणार्‍याचे बेदाणे पण नाही. तर तुमचा सिव्ही हा तुमच्या मार्केटिंगचा पहिला चौक आहे. नुसत्या उत्तम सिव्हीमुळे तुम्ही हजारांमधे उठून दिसू शकता. उदा. एकाच्या सिव्हीचा हा सारांश ऐका....'

'मी अर्थशास्त्र आणि उद्योग व्यवस्थापन क्षेत्रातला पदवीधर आहे. मला त्यातला सुमारे २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. माझं संघटना बांधण्याचं आणि त्या चालविण्याचं कौशल्य असामान्य आहे. माझ्याकडे उत्तम नेतृत्व गुण आहेत. संघटना बांधणे, तिचं लक्ष्य व उद्देश ठरवणे, प्रचार करणे, त्यासाठी योग्य माणसं व पैसे जमविणे, तिचा सर्व कारभार पहाणे, संघटनेतर्फे विविध उपक्रम हाती घेणे, त्या पार पाडण्याच्या योजना आखणे, योजनेच्या गरजेप्रमाणे योग्य त्या माणसांची दल उभारणे, त्यातला प्रत्येक जण कुठलं काम कधी करेल ते आखणे आणि त्याप्रमाणे सर्व कामं अबाधितपणे चालू आहेत ना ते बघणे, उपक्रमांना लागणारी सामग्री मिळविणे, वेगवेगळी सामग्री विकणार्‍या व्यापार्‍यांचं व्यवस्थापन करणे, गरजेप्रमाणे प्रत्येकाला मार्गदर्शन करणे, त्यांना चांगलं काम करण्याबद्दल प्रवृत्त करणे, त्यांना वेळोवेळी आवश्यक ते शिक्षण देण्याची तजवीज करणे. काही उपक्रम विविध देशात विविध दलांकडून करून घ्यावे लागतात, त्यामुळे त्या दलांमधे सुसंवाद साधण्यापासून ते भाषांमुळे व संस्कृतीमुळे येणार्‍या अडचणी सोडविण्यापर्यंत सर्व काही केलेले आहे.'

'कसा वाटला?'

'फारच भारी आहे. मला असा माणूस हवाच आहे कधीपासून.. चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून!'.. कंपनीतल्या अनेक नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स बद्दलचा सीईओचा सल असा उफाळून आला.

'हा माणूस खूप सिनियर वाटतोय.. प्रोजेक्ट लेव्हलला येणारच नाही तो. पण सिव्ही जबरी आहे.'.. सदाला दु:ख झालं. बाकीच्या मॅनेजरांचं पण असंच काहीसं मत पडलं.

'हा एका प्रसिद्ध व्यक्तीचा सिव्ही आहे. कुणाचा असेल? काही अंदाज?'.. सल्लागाराने खरोखरीचं बुद्धी-वादळ चालू केलं.

अण्णा हजारे पासून स्टिव्ह जॉब्ज पर्यंत सर्व नावं घेऊन झाली. सल्लागाराच्या आविर्भावावरून तो सिव्ही अशा कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तीचा नव्हता.

'ओसामा बिन लादेन'.. सल्लागाराने सर्वांना गार केलं आणि प्रियाने 'दॅट प्रुव्हज माय पॉईंट' अशी नजर फेकली.

=========================================================

'सर! इथे तो प्रोग्रॅम व्यवस्थित चालतोय. आम्ही परत सगळ्या टेस्ट्स केल्या.'.. हताश स्वरात अभय म्हणाला.

'हम्म! अरे ते हा प्रोग्रॅम कुठल्या ओएस खाली चालवतात? त्याचं व्हर्जन काय? आपला प्रोग्रॅम कुठल्या डिएलेल वापरतो? त्यांची व्हर्जनं काय? ही माहिती काढा.'.. सदाने व्हर्जनबत्ती लावली.

'ही खूप मोठी यादी झाली, खूप वेळ लागेल ही माहिती जमवायला.. आपल्याला आणि त्यांना पण!'

'मग प्रश्न सुटत नाही म्हणून देव पाण्यात घालून बसणार आहात का? आँ? हां! आणि आयईचं व्हर्जन पण बघा!'

'सर, आपल्याला आयई लागत नाही.'

'ते मला सांगू नकोस रे! विंडोजचं सगळं शेकी असतं. तुला व्हर्जन काढायला पैसे पडणार आहेत का?'

'नाही सर!'

सदानं दोन मिनिटं हवेत बघितलं नि विचारलं.. 'या प्रोग्रॅमला स्क्रीनवर दाखवायचा डेटा कुठून मिळतो रे? डेटाबेस मधून?'

'नाही सर! त्याला दुसरा प्रोग्रॅम पाठवतो.. नेटवर्क वरून'

'हां! मग तो कचरा पाठवत असेल. त्याचं व्हर्जन काय? त्याचा लॉग बघा! तो तरी लॉग लिहीतो का?'

'सर! तो मी लिहीलेला प्रोग्रॅम आहे. मी त्याचा लॉग पाठवायला सांगतो.'.. अभयनं अभिमानानं सांगितलं.

=========================================================

'काय नालायक लोक आहेत साले!'.. सदा रेवती समोर फणफणला.

'श्या! आपण जेवायला बाहेर आलो तरी तू तुझ्या कामातून बाहेर काही येत नाहीस'.. रेवती फणफणली.

'सॉरी रेवती!.. अम्म्म... नवीन ड्रेस छान दिसतोय तुला'

'६ महिने जुना आहे. आत्तापर्यंत मी तो तीन वेळा घातलाय आणि तिन्ही वेळेला तू हेच म्हणाला आहेस'

'बोंबला!'.. सदाची सारवासारव बोंबलली.

'त्यापेक्षा तू तुझ्या मनातली मळमळ बाहेर काढ.. कामाचं काय झालं ते सांग.'

'अगं असं बघ! तुला एखादी गोष्ट करायला सांगितली.. तिचं महत्व सांगून.. तर तू ती करशील की नाही?'

'अर्थातच करेन!'

'साधं.. प्रत्येक प्रोग्रॅम मधे लॉग घालायला सांगितला होता, त्याचं महत्व पटवून देऊन.. तर तो घालायचा कंटाळा केला! बोटं झिजणार होती का? कॉलेजातनं नुस्त्या डिग्र्या घेऊन बाहेर पडलेली शेंबडी पोरं ही! त्यांना काय माहिती खरे प्रॉब्लेम काय असतात नि ते कसे सोडवायचे? नुसतं पाठ करून पास झालेत साले! इथे १० १० वर्ष घासून, रात्रीचा दिवस करून आलेल्या अनुभवांचं सार त्यांना आयतं मिळतं.. त्याचं महत्व पण समजत नाही.'

'देशबंधूंनो विचार करा.. त्राग्यापेक्षा क्वालिटी करा.'

'काही सांगू नकोस.. क्वालिटी केल्यामुळे माठाड लोकांना अक्कल येते हे ऑरगॅनिक फूड प्रकृतीला उत्तम असतं म्हणण्याइतकंच धूळफेकी वक्तव्य आहे.'

'अरे प्रोग्रॅम कसा लिहावा? त्यात काय असणं आवश्यक आहे असं डॉक्युमेंट करून त्या प्रमाणेच सगळ्यांना प्रोग्रॅम लिहायला सांगायचं.'

'अगं इथं मी घसा खरवडून सांगतो.. तरी ते ऐकत नाहीत. ते कुठं तरी लिहून ठेवल्यामुळे लोकांना साक्षात्कार होणारे?'

'नाही. पण त्या डॉक्युमेंट प्रमाणे प्रोग्रॅम लिहीला आहे की नाही हे दुसरा तपासू शकतो.'

'वा! वा! तपासणार कोण? त्यांच्यातलाच एक ना? ते एकमेकांचे प्रोग्रॅम सर्टिफाय करतील न बघता! तुला गंमत सांगतो.. अधू दृष्टी असलेल्यांना लायसन्स मिळत नाही हा आरटीओचा नियम माहिती आहे ना तुला? फार महत्वाचा आणि चांगला नियम आहे. आता दृष्टी चांगली आहे की नाही यासाठी डॉक्टरचं सर्टिफिकेट लावायला लागतं. आणि ते आरटीओच्या बाहेरच बसलेले डॉक्टर काहीही न बघता पैसे घेऊन अर्ध्या मिन्टात सर्टिफिकेट देतात. त्यामुळे ते क्वालिटी वगैरे क्लायंटला गंडवायला ठीके पण खरी क्वालिटी माणसाला त्याच्या कामाचा अभिमान वाटल्याशिवाय येणार नाही.'

=========================================================

'सर, तुमच्याशी बोलायचं होतं'.. संगिता दारातून आली.

'हं बोल! सुट्टी पाहीजे आहे? कुणाच्या कुणाचं तरी लग्न आहे, रत्नागिरीला जायचंय! अं?'.. सदाची टिंगल.

'नाही सर! मी त्या प्रोग्रॅम बद्दल बोलायला आले होते.'.. संगिताच्या आवाजात दु:ख भरलं.

'असं होय! सॉरी, बोल!'

'सर, तो प्रोग्रॅम ज्या पीसीवर चालतो तो कुठल्या दिशेला ठेवलाय?'

'संगिता! प्लीज! ज्युनियर कोडग्याच्या बगामुळे फक्त त्याचंच डोकं फिरतं पण सीनियर कोडग्याच्या एका बगात अख्ख्या टीमचं डोकं फिरवायची ताकद असते हे पटायला लागलंय ना आता?'

'हो सर, पण वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे दक्षिणेला तोंड केलेले पीसी त्रास देणार!'

'संगिता, कंप्युटर मधे वास्तुशास्त्राचा व्हायरस जाऊ शकतो असं वाटतं का तुला?'

'अंss नाही... हो.. सर! कर्णिके वर तो प्रोग्रॅम कचरा दाखवतो असं वाटतंय मला.'

'मग त्याचा आणि वास्तुशास्त्राचा काय संबंध?'

'सर, आपल्या ऑफिसातली फक्त कर्णिकाच दक्षिणमुखी आहे. बाकी सगळ्यांची तोंड दुसरीकडे आहेत.'

'आँ? तुला खात्री आहे?'

'हो सर! आत्ता आम्ही परत बघितलं.'

'अरे वा! वास्तुशास्त्र मरू दे. निदान तो बग रिप्रोड्यूस तरी होतोय कुठे तरी'.. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग.. तेव्हढ्यात सदाच्या फोनने गळा काढला.

'हॅलो, सदा सप्रे बोलतोय'

'हॅ..... खर्रखर्रघूंघूं मी.... खर्रखर्रघूंघूं ....तोय'

'आं? कोण बोलतंय?'.. सदाचा आवाज चढला. सदा उठून खिडकीपाशी गेला. वेगवेगळ्या दिशेला तोंड करून कुठे नीट ऐकू येतंय ते बघत होता.

'सर दक्षिणेला नका तोंड करू'.. मधेच संगितानं दक्षिणजप लावला.

बर्‍याच वेळा आं आं करून सदाला इतकंच समजलं की सतीश भडकमकर, भावनाचा भाऊ हैद्राबादहून बोलत होता आणि भावनाला अ‍ॅक्सिडेंट झाल्यामुळे ती अजून महिनाभर येणार नव्हती.

'सर! मला वाटतंय मला समजला त्या प्रोग्रॅमचा प्रॉब्लेम!'

'आता कुठल्या नियमाचा भंग झाला?'

'सर! लाँग डिस्टन्स! लाँग डिस्टन्स!'

'आँ?'

'सर तिकडे तो प्रोग्रॅम शिकागो मधे चालवतात. बाकी सगळे प्रोग्रॅम न्यूयॉर्कमधे आहेत.'

'मग?'

'शिकागो न्यूयॉर्क नेटवर्क हे ऑफिसमधल्या नेटवर्कपेक्षा स्लो आहे ना.'.. एक टिशू उपसल्यावर जसा दुसरा हजर होतो तसे तिच्या डोक्यात एका नंतर एक विचार हजर होत होते.

'हो आहे.'

'हां! म्हणजे स्लो नेटवर्कवर डेटा पाठवणारा प्रोग्रॅम बदाबदा डेटा पाठवू शकत नाही त्यामुळे वेगवेगळ्या पॅकेटचा डेटा ओव्हरराईट होतोय. थोडक्यात प्रोग्रॅममधे डेटा करप्ट होतोय.'

'आत्ता पहिल्यांदाच तू काहीतरी सेन्सिबल बोललीस!'

'हां आणि आपली कर्णिका पण आपल्या मेन नेटवर्कवर नाहीये. ती मुद्दाम मोडेमने ऑफिसला जोडली आहे. म्हणून तो प्रोग्रॅम कर्णिकावर पण कचरा दाखवतो.'

'यू आर सिंपली ब्रिलियंट, संगिता! तू एक मोठ्ठं कोडं सोडवलंयस'.

शो स्टॉपर बग लवकर सुटल्यामुळे तिकडे क्लायंट प्रचंड खूश झाला. त्याचं पर्यवसान गोंधळे सॉफ्टवेअरच्या लोकांच्या कुवती विषयी सतत शंका घेणार्‍या स्टुअर्टच्या हकालपट्टी आणि त्यांच्या बरोबरचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यात झालं.

-- समाप्त --

Tuesday, June 4, 2013

तेथे पाहिजे जातीचे.. भाग-४

तेथे पाहिजे जातीचे - मागील भाग इथे वाचा..  भाग-१, भाग-२, भाग-३


'आपला क्लायंट, बिग गेट कॉर्पोरेशनबद्दलच्या एका बातमीसंबंधी ही मिटींग आहे. तसं तुम्हाला एचार व अ‍ॅडमिनच्या कृपेने नको ती माहिती नको तेव्हा समजत असतेच, तरी पण मी ही मिटिंग बोलावली आहे कारण त्याचा आपल्या पुढील कामावर मुसळधार परिणाम होणार आहे. तर ती बातमी अशी.. बिग गेट कॉर्पोरेशनला TDH Inc, म्हणजेच Tom Dick and Harry Incorporated टेकओव्हर करतेय.'..  सदाने टीम मिटिंगमधे गौप्यस्फोट केला.

'कुठे?'.. संगिता व्हॉट्सपमधून उठली आणि मिटिंगमधे खसखस पिकली.

'काय कुठे?'.. रागदारी आळवणार्‍याला आर्डी बर्मनचं 'मेरी जाँ मैने कहां' हे भसाड्या आवाजातलं गाणं म्हणायची विनंती केल्यासारखं सदाला वाटलं.

'ओव्हरटेक कुठे?'

'संगिताच्या मूलभूत गरजेत मोबाईल फार वरती आहे. ही बया तर मोबाईल घेऊन अंघोळीला पण जाईल! लग्न झाल्यावर काय होईल हिच्या नवर्‍याचं कुणास ठाऊक!'.. निखिल वैतागून म्हणाला.

'त्याची तुला काळजी नकोय! मी मोबाईल-फ्रेन्डली नवरा करेन!'.. संगिता फणकारली.

'तुकारामांच्या वेळेला पण मोबाईल होते. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' हा अभंग त्याचा पुरावा आहे.'.. अभयने एक फिरत्या मेलमधला विनोद खपवला.

'संगिता, To Let व Too Late मधे जितका फरक आहे तितका ओव्हरटेक व टेकओव्हर मधे आहे!'.. सदा कसाबसा संयम ठेवीत म्हणाला.

'त्यापेक्षा कटलेट आणि लेटकट हे जास्त चांगलं उदाहरण आहे!'.. निखिल पर्फेक्शनिस्ट होण्याची पराकाष्ठा करतो पण त्याला हे माहीत नाही की पर्फेक्शन मिळालं तरी ते न समजण्याइतका पर्फेक्शनिस्ट इम्पर्फेक्ट असतो.

'अय्या, पण मला खरंच ओव्हरटेक ऐकू आलं! तुला येत नाही का कधी चुकीचं ऐकू?'

'संगिता! निखिल! यू बोथ शटप! तुमचं भांडण ऐकायला नंतर मी जमवेन लोक.. तिकीट लावून!'.. सदा ओरडला.

'सॉरी सर!'.. दोघे एकदम म्हणाले.

'सर टेकओव्हर Tom Dick and Harry Incorporated नं केलं काय किंवा तिलोत्तमा दुर्योधन अँड हिरण्यकश्यपू इनकॉर्पोरेटेडनं केलं काय.. त्यामुळे आपल्याला काय फरक पडणारे? स्टुअर्ट तर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचा दम देऊन गेलाय ना? ऑलरेडी?'.. अभयनं गाडी रुळावर आणायला एक लेटकट मारला.

'सगळं सांगणारे! मधे मधे स्ट्रॅटेजिक ब्रेक घेतले नाहीत तर सगळं सांगणारे! तर TDH ला स्टुअर्टने GSCचं काम काढून घेऊन ते मद्रासच्या एका कंपनीला द्यायला सांगितलंय! GSC म्हणजे कोण बरं संगिता?'.. संगिताचा पुन्हा मोबाईलशी चाललेला चाळा पाहून सदाचा संयम उंच कड्यावर एका हाताने कसंबसं लोंबकळणार्‍या हीरो इतपत झाला.

'आँ! BSC म्हणजे? बॅचलर ऑफ सायन्स ना सर?'.. संगिता गोंधळलेल्या चेहर्‍यानं विचारलं.

'संगिता! तू तो मोबाईल माझ्याकडे दे बरं! काही जगबुडी येणार नाही लगेच! '.. सदानं संगिताचा मोबाईल घेतला आणि म्हणाला.. 'हं, आता सांग.. GSC म्हणजे कोण बरं?'

'सर GSC म्हणजे मला माहिती आहे.. आपलीच कंपनी.. गोंधळे सॉफ्टवेअर कन्सलटन्ट! मघाशी मला चुकून BSC ऐकू आलं.'

'कर्रेक्ट! आता नीट लक्ष दे मी काय सांगतोय त्याच्याकडे! तर TDH ला स्टुअर्टने GSCचं काम काढून घेऊन ते मद्रासच्या एका कंपनीला द्यायला सांगितलंय!'

'का?'.. संगिता.

'का काय? त्याचं असेल काहीतरी साटलोटं त्यांच्याशी!'

'हम्म्म! म्हणूनच तो आमच्या कामाला मुद्दाम शिव्या देत होता तर!'.. संगिताला खुनाच्या खटल्यातून निर्दोष सुटल्याचा आनंद झाला.

'त्याचा काहीही संबंध नाही! तू एका हाताने मोबाईलशी खेळत दुसर्‍या हाताने प्रोग्रॅमिंग करत राहिलीस तर या पुढेही शिव्या खाव्याच लागतील!'.. सदानं तिला जमिनीवर आणला.. इतरांनी पोटभर हसून संमती दर्शवली.

'पण मग आपल्या हातात आता काय आहे?'.. अभय.

'अरे आत्ताच तर वनडे मॅचचा खरा शेवट आलाय. शेवटच्या ५ ओव्हरीत ४७ धावा करायचं आव्हान आहे. शेवटचं प्रोजेक्ट असं करायचं की त्यांना बोटच काय नख ठेवायला पण जागा राहता कामा नये. समजलं? मग मी बघतो TDH कॉन्ट्रॅक्ट कसं कॅन्सल करतो ते!'.. सदानं फुशारकी मारली. अशावेळी सगळ्या मॅनेजरांना वनडे क्रिकेटचच उदाहरण का सुचतं देव जाणे!

'उलट मला असं वाटतंय की शेवटच्या प्रोजेक्टला आपण दुप्पट वेळ लावावा.. म्हणजे नवीन लोकांना घोळात घ्यायला जरा वेळ मिळेल आपल्याला'.. निखिलचा एक चौकटी बाहेरचा विचार.

'अरे त्यांचे कान फुंकायला स्टुअर्ट तिथंच बसलाय. आपलं कोण आहे तिकडे? काम चांगलं आणि वेळेत झालं नाही तर वर्ष घालवलंस तरी त्यांच्या साध्या झाडुवालीला पण घोळात घेता येणार नाही. ते काही नाही. हे प्रोजेक्ट आपण एक महीना आधी संपवायचंच! चार महिन्याचं तीन महिन्यात! ते सुद्धा एकदम पर्फेक्ट!'.. सदाने विझलेल्या टीमला जोशपूर्ण हवा सोडून चेतवायचा प्रयत्न केला.

'कितीही वेळ दिला तरी निखिलला कुणालाही घोळात घेता येणार नाही'.. संगितानं कुठला तरी वचपा काढला.

'काय बुरसटलेली विचारसरणी आहे यांची?'.. मनातल्या मनात निखिल पुटपुटला.. आपल्या विचारांशी इतरांचे विचार जुळले नाही तर खुशाल बुरसटलेली विचारसरणी असा शिक्का मारायला तो कमी नाही करायचा.

'सर, पण आत्ताच आम्ही रोज दहा दहा तास घालतो. अजून किती घालणार?'.. एक अतृप्त आत्मा.

'सर घरी जायला फार रात्र होईल मग!'.. एक 'सातच्या आत घरात' चा आदेश असलेली कन्यका!

'अरे तुम्ही आत्ताच धीर सोडला तर कसं होईल? आपण शनिवार रविवार काम करू. आपल्याला हा एक चान्स मिळालाय तो घ्यायचा. वुई हॅव अ रेप्युटेशन टू प्रोटेक्ट!'

'सर पण आम्हाला घरच्यांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. घरचे चिडचिड करतात. मग आमची पण होते. एचारने वर्क-लाईफ बॅलन्स ठेवू वगैरे सांगितलं.. त्याचं काय?.. त्याला काहीच कशी किंमत देत नाही तुम्ही?'

'जास्ती वेळ हवा असेल तर घड्याळं घ्या दोन तीन'.. अभयनं षटकार ठोकला.

'आयॅम जस्ट डुईंग माय जॉब!'.. कचाट्यात सापडलेल्या हॉलिवुड हीरोसारखा दात विचकत सदा म्हणाला.. 'तुम्हाला काय वाटतं? मी काय फक्त तुम्हाला कामाला लावतो? मला का घर नाही? मला का संसार नाही? मला का पोरंबाळं नाहीत?'.. सदाला अचानक साने गुरुजींनी झपाटलं.

'सर आपल्याला अजून माणसं नाही का घेता येणार?'.. संगितानं प्रथमच सेन्सिबल प्रश्न विचारला.

'हो. तो प्रयत्न चाललाय माझा! आपल्या प्रोजेक्ट मधे एक मॉड्युल आहे.. तीन महिन्याचं काम असलेलं. माझा विचार आहे.. तीन माणसं लावून ते एका महिन्यात संपवायचं!'

'जन्म देण्याचं काम ९ बायका एका महिन्यात करू शकत नाहीत.'.. निखिल मधला पर्फेक्शनिस्ट परत एकदा सरसावला.

'बाय द वे, संगिता! उद्या ३ वाजता TDH मधून डॉन ब्रॅडमन येणार आहे. तू विमानतळावर जा त्यांना आणायला. मी तुला मेल पाठवली आहे त्याबद्दल.'.. सदा निखिलला काही तरी खरमरीत बोलणार होता पण त्यानं स्वतःला आवरलं. आत्ता निखिलला दुखवणं त्याला परवडलं नसतं.
=========================================================

'कसला विचार करतोयस इतका? मला सांग. आपण दोघे मार्ग काढू!'.. जेवायच्या ऐवजी शून्यात बघणार्‍या सदाला रेवतीनं दिलासा दिला.

'अगं! तीन महिन्याचं काम तीन माणसं लावून एका महिन्यात संपवायचंय!'

'एका पोराला जन्माला घालायचं काम ९ बायका एका महिन्यात करू शकत नाहीत ते माहिती आहे नं तुला?'

'तू मार्ग काढते आहेस की डोस पाजते आहेस?'.. सदा पिसाळला.

'ओ सॉरी सॉरी! मग ते काम संपवायला प्रॉब्लेम काय आहे?'

'३ माणसं घ्यायची आहेत!'

'मग घ्यायला प्रॉब्लेम काय आहे?'

'बजेट नाहीये!'

'ओह! मग?'

'ते जाऊ दे! मी पटवेन बॉसला कसतरी! आपण दुसर्‍या विषयावर बोलू... माझ्या एका मित्राशी बोलत होतो मगाशी. त्यांच्या कंपनीला क्वालिटी सर्टिफिकेशन मिळालं ६ महिन्यांपूर्वी! तो म्हणत होता.. बुडत्या कंपनीला क्वालिटीच्या काडीचा काडीचाही आधार मिळत नाही म्हणून!'.. सदानं क्वालिटीवरचा आपला गंभीर संशय व्यक्त केला.

'लगेच कसा परिणाम दिसायला लागेल? घर एकदा स्वच्छ करून भागतं का? परत परत करत रहावं लागतं! यू गॉट टू कीप रनिंग टू स्टे इन द सेम प्लेस!'.. रेवतीनं एक क्लिशे फेकला.

'म्हणजे परत परत सर्टिफिकेशन?'.. सदाला आता 'घी देखा मगर बडगा नहीं देखा' या म्हणीची यथार्थता पटली.

'नाही रे! परत परत सुधारणा! आणि क्वालिटी सर्टिफिकेशन मिळालं म्हणजे कामाची क्वालिटी चांगली असा अर्थ होत नाही!'.. रेवती

'आँ?'

'असं बघ! शाळेला दादोजी कोंडदेवांचं नाव दिल्याने शिवाजी निर्माण होतात का? होतील का?'

'नाही.'

'तसंच आहे हे! क्वालिटी सर्टिफिकेशन म्हणजे काय? तर तुमचं काम तुम्हीच लिहीलेल्या पद्धती प्रमाणे तुम्ही करता.. प्रत्येक काम करायची तुमची पद्धत ठरलेली आहे.. तुमच्याकडे अंदाधुंदी कारभार नाही. वगैरे! वगैरे!'

'आयला! मग मधमाशा आणि मुंग्यांना ताबडतोब मिळेल की! सर्टिफिकेशन!'

'हो, त्यांनी त्यांच्या प्रोसिजर लिहील्या आणि आयएसओकडे अर्ज केला तर...!'

'घरात झाडू मारणे किंवा गाडी धुणे असल्या घोडाछाप, यांत्रिक कामाची प्रोसिजर लिहीता येतील. पण जिथं अक्कल चालवावी लागते, म्हणजे प्रोग्रॅमिंग वगैरे, अशा कामाची काय डोंबल प्रोसिजर लिहीणार?'

'कुठल्याही कामाची प्रोसिजर लिहीता येते'

'कायच्या काय सांगतेस? समजा, मला एक कविता करायची आहे.. सांग प्रोसिजर!'

'त्यात काय विशेष आहे? एक पेन घ्या, एक कागद घ्या आणि लिहा कविता... झाली प्रोसिजर!'

'हॅ! असल्या प्रोसिजर लिहून पाळल्यामुळे कामाचा दर्जा सुधारतो म्हणणं म्हणजे माळ घातल्यामुळे दारू सुटते म्हणण्यासारखं आहे. मला एक गोष्ट आठवली यावरून.. एक गणितज्ज्ञ असतो. त्याला विचारतात की तुला एक किटली दिली आहे. चहाची पावडर, दूध, साखर इ. इ. सगळं साहित्य दिलेलं आहे, तर तू चहा कसा करशील?'

'सर, रंभा हँग झाली.'.. फोनवर आलेल्या त्या अभद्र बातमीमुळे सदाच्या लांबलचक कथेचं बोन्साय झालं. नाईलाजाने तो ऑफिसात आला आणि थोड्याच वेळात रघू एका परदेशी बाईला घेऊन आला.

'हॅलो! यू मस्ट बी सडॅ! आयॅम डॉन ब्रॅडमन!'.. परदेशी बाईंनी ओळख करून दिली. सदाच्या चेहर्‍यावर हसू पसरलं. 'अरे वा! संगितानं यावेळेला जमवलेलं तर..' त्यानं विचार केला.

'ओ हॅलो! नाईस टू मीट यू डॉन! काय? प्रवास कसा झाला?'

'प्रवास चांगला झाला. पण तुझा माणूस काही मला भेटला नाही विमानतळावर, मग मी माझी माझीच आले.'

'आँ? भेटला नाही? म्हणजे नक्कीच काही तरी घोटाळा झालाय!'.. सदाचा घसा सहारा वाळवंटातला एक दुष्काळग्रस्त प्रदेश झाला. त्यानं मनातल्या मनात संगिताला शिव्या हासडायला आणि ती ऑफिसात घुसायला एकच गाठ पडली.

'सर! तो माणूस काही सापडला नाही मला!'.. संगिता सदाच्या केबिनमधे घुसत म्हणाली आणि त्या बाईने मागे वळून पाहीलं. तिच्याकडे बघून संगिता ओरडली.. 'ही सटवी इथे कशी घुसली? एकदम फ्रॉड आहे सर ही! विमानतळावर माझ्याजवळ येऊन म्हणते कशी.. 'मी डॉन ब्रॅडमन'. डॉन माणसाचं नाव असतं ना हो? मी काय इतकी माठ वाटले काय हिला? मी सरळ कटवलं मग! मागच्या वेळेसारखा घोटाळा नव्हता करायचा मला!'.. आणि सदा हँग झाला.

'संगिता! D o n, डॉन! हे माणसाचं नाव असतं. D a w n, डॉन! हे 'बाई'माणसाचं नाव असतं! ते स्पेलिंग Dawn आहे गं बाई! मेल नीट वाचली असतीस तर तुला समजलं असतं.'
=========================================================

'मॅडम, मला अर्जंट ३ माणसं घ्यायचीयेत.. सी प्लस प्लस येणारे, ग्रॅज्युएट, हुशार, २ वर्षांचा अनुभव असणारे हवेत. माझ्याकडे सिव्ही पाठवा लगेच.'.. सदाने एचार मॅनेजर प्रिया आगलावेंना साकडं घातलं. 

'ओह! ३ माणसं कशासाठी?'.. मॅडमच्या प्रश्नावर सदाच्या डोक्यात एक तिरसट उत्तर चमकलं.. 'मला खांदा द्यायला'

'एक ३ महिन्याचं काम आहे ते मला एका महिन्यात संपवायचंय!'

'आय सी! ते.. अं.. ९ बायकांना एका महिन्यात जन्म देता येत नाही ते माहिती असेलच ना तुला!'

'पण ९ बायका एका महिन्यात ९ बाळं जन्माला घालू शकतात ते तुम्हाला माहिती आहे ना? हा हा हा!'.. सदाच्या डोक्याच्या कुकरची शिट्टी उडाली.

'बरं, बजेट आहे का तुझ्याकडे?'.. त्यावर सदानं अशा काही नजरेनं पाहीलं की मॅडमना लगेचच आपण चुकीचा प्रश्न विचारल्याचं लक्षात आलं... 'रिलॅक्स! रिलॅक्स! मी गंमत करत होते. खरं सांगायचं तर माझ्याकडे माणूसच नाहीये मोकळा! तू असं कर! माझ्याकडे जवळपास पाचेकशे सिव्ही आहेत, पडलेले. त्यातून निवड ना!'

'मीच चाळू होय? ठीक आहे! गरज मला आहे शेवटी!'

'बाय द वे सदा! मला तुझी मदत हवी होती. आम्हाला एक स्किल मेट्रिक्स करायचाय, त्यासाठी तुझं इनपुट महत्वाचं आहे.'

'स्किल मेट्रिक्स?'

'म्हणजे आपल्याला लागणार्‍या स्किल्सची यादी करायची.. जसं सी प्लस प्लस, जावा, डेटाबेस इ. इ. आणि प्रत्येक माणसासाठी एक तक्ता करायचा. त्यात तो प्रत्येक स्किल मधे किती पारंगत आहे ती लेव्हल लिहायची. तसा एकदा बनवला आणि त्यात सगळे बसवले की लोकांनाही कळेल कोण कुणाच्या वर किंवा खाली आहे ते. मग दरवर्षीची काँपेन्सेशनच्या वेळची नाराजी कमी होईल. आणि मार्केटिंगलाही त्याचा उपयोग होईल.'

'ओ मॅडम ते तितकं सोप्पं नाहीये. नुसतं सी प्लस प्लस उत्तम येतं, की चांगलं येतं, की बरं येतं, की येतच नाही, अशी विभागणी करून भागत नाही. उदा. असं बघा. स्वयंपाक चांगला येतो म्हणून भागतं का? व्हेज येतं की नॉन-व्हेज पण येतं? कुठल्या प्रकारचा? पंजाबी की कोल्हापूरी की इटालियन? मासे करता येतात की नाही? असे हजार प्रश्न क्लायंट विचारतात.. कारण त्यांना कोकणी मसाला वापरून हैद्राबादी चिकन घातलेला इटालियन पास्ता करणारा माणूस हवा असतो.'

'हो अगदी १००% मॅच नाही मिळणार! थोडं ट्रेनिंग देऊन.. थोडे सिव्ही टेलर करून.. जमवता येईल की नाही?'
=========================================================

'काय सदा? प्रोजेक्ट कसं चाल्लंय?'.. सीईओ, राकेश पांडे मासिक उलटतपासणी करत होता.

'जोरात चाल्लंय! काल तर एक काम फटकन उडवलं. चार महिन्याचं प्रोजेक्ट तीन महिन्यात गुंडाळायचं आहे ना?'.. सदाने एक आशावादी चित्रं निर्माण केलं. कुठलाही प्रोजेक्ट मॅनेजर कधीही प्रोजेक्ट चांगलंच चाल्लंय असं म्हणतो. नाहीतर आपल्या कुवतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं त्यांना वाटतं.

'गुड! गुड! किती लवकर?'

'१० दिवसांचं काम ९ दिवसात!'

'हम्म! मागच्या मिटिंगला तू म्हणत होतास त्या प्रॉब्लेमचं काय झालं?'

'ओ ते! क्लायंटला काही बदल हवे होते. 'दिलेल्या वेळात ते होणार नाही' म्हणून ठणकावलं त्यांना!'

'का? असा किती वेळ जास्त लागणार होता?'

'एक महीना जास्त लागणार होता!'

'पण तू घेतली आहेस ना ३ माणसं जास्त?'

'हो घेऊन एक महीना झाला!'

'मग त्यांनी संपवलं असेल ना ते ३ महिन्यांच काम आत्तापर्यंत?'

'नाही अजून! प्रोजेक्ट मधे थोडी चॅलेंजेस निर्माण झाली आहेत. कुठल्या प्रोजेक्टमधे नसतात?'.. प्रोजेक्ट मधील सर्व भानगडींना चॅलेंजेस म्हणायची पद्धत आहे.

'नाही? मग कधी संपवणार ते?'

'ते तीनही जण फार स्लो आहेत.. सगळ्याच बाबतीत!'

'म्हणजे?'

'त्यांना काही येत नाही! तीन तीन दिवस दिले तरी साधा ४ ओळींचा कोड पाडता येत नाही त्यांना!'

'आँ! इंटरव्ह्यू मधे लक्षात नाही आलं? कुणी घेतले?'

'आम्हीच घेतले. फोनवर! तिघांना इंटरव्ह्यूतले सगळे प्रश्न व्यवस्थित आले.'

'मग?'

'मला आता वाटतंय तिघांचे इंटरव्ह्यू एकाच माणसानं दिले असावेत. कारण तिघांचा आवाज फोनवर सेम येत होता. पण त्यावेळेला घाई होती म्हणून दुर्लक्ष केलं. आणि एचार म्हणालं की आपण आधी त्यांना अपॉइंटमेंट लेटर देऊ. जॉईन झाले की मग हळूहळू बॅकग्राउंड चेक करू.'

'मग?'

'आता बॅकग्राउंड चेक केल्यावर बर्‍याच गोष्टी लक्षात येताहेत.. कुणाचेही मागच्या एम्प्लॉयरचे दिलेले फोन नंबर बरोबर नाहीत. एक लखनौ मधल्या वाण्याच्या दुकानाचा आहे, एक अस्तित्वात नाही, एक लखनौच्या फायर ब्रिगेडला जातो. असे बरेच घोळ आहेत.'

'याला तू थोडे चॅलेंजेस म्हणतोस? ९ बायकांना एका महिन्यात जन्म देता येत नाही हे मी तुला सुरुवातीलाच सांगितलं होतं ना तरी?'

-- भाग -४ समाप्त --

Monday, March 25, 2013

तेथे पाहिजे जातीचे.. भाग-3

तेथे पाहिजे जातीचे.. भाग-१ इथे वाचा!
तेथे पाहिजे जातीचे.. भाग-२ इथे वाचा!

'अय्या! तुझाssच फोन! दोन सेकंदांपूर्वीच मला वाटलं तुझा फोन येणार आणि आलाच!'.. सदाची बायको चित्कारली.

'का? तुला का असं वाटलं?'

'अरे मला नं हल्ली असे अनुभव येताहेत! अचानक मनात काहीतरी उमटतं आणि ते खरं होतं! स्वामी आकुंचन महाराजांची कृपा, दुसरं काय?'

'आँ! मगाशी काय उमटलं होतं?'

'हेच की तू फोन करून सांगणार की आज आपण जेवायला बाहेर जाऊ या म्हणून!'

'जेवायला बाहेर जाऊ या हे सांगायला मी नाही फोन केला काय! आकुंचन महाराजांना प्रसरण पावायला लावून कृपेचा अजून एक इन्स्टॉलमेंट घे! मी फोन एक प्रश्न विचारण्यासाठी केलाय'

'असं काय करतोस रे? आज अगदी कंटाळा आलाय मला स्वैपाकाचा! जाऊ या नं आपण!'

'बरंss! जाऊ या! इतकं काये त्यात अगदी? एका प्रॉब्लेमनं माझ्या ग्रे-मॅटरचं बाष्पीभवन झालंय! तो ऐक आधी! तो स्टुअर्ट आहे ना? त्याची ताजमहाल ट्रिप आम्ही स्पॉन्सर केली होती. आता तो आमचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणारे लवकरच! तर लगेच राकेशनं त्याची ट्रिप कॅन्सल केली आणि मला म्हणतोय स्टुअर्टला तसं सांग म्हणून! आता त्याला ते कसं सांगू मी?'

'का? मला लग्नाचं विचारताना कचरला होतास का?'

'नाही. तेव्हा तू नकार देणार याची खात्री होती मला! आता आधी देतो म्हंटलंय मग नाही देत कसं म्हणायचं?'

'असं का? परवा नीताच्या नाटकाला कसा नाही येत म्हणालास, ऐनवेळेला?'.. नवर्‍याला भूतकाळातल्या अंधार्‍या खिंडीत पकडण्याची कला बायकांच्या डिएनेत गुंफलेली असते. पण १० वर्ष संसाराग्नीत तावून सुलाखून निघाल्यामुळे असल्या प्रश्नांवर 'मौनं सर्वार्थ साधनम' हा सर्वोत्तम उपाय आहे हे सदाला उमजलेलं होतं.

'तुमच्याकडे एखादा आज रिन्युड लायसन्स मिळणार म्हणून आला आणि ते अजून दोन महीने तयार होणार नसल्याचं समजल्यावर प्रचंड कटकट करायला लागला, तर तुम्ही काय करता?'

'साहेबांना भेटा म्हणतो'

'आयला, इथे साहेबाने मलाच सांगितलंय गाय मारायला! ब्लडी बक स्टॉप्स हियर!'.. फोन ठेवून कॉरिडॉर मधून जात असताना अचानक स्टुअर्ट समोर उभा पाहून सदा बराच काळ बाबागाडीत बसल्यासारखा अवघडला. स्टुअर्ट पण अवघडलेला होता. दोघं एकमेकांसमोर थांबले, बघून कसनुसं हसले मग नजर चुकवत उभे राहिले. त्याला पाहून जायंटव्हीलमधे खाली कोसळताना पोटात गोळा येतो तसा सदाला आला. प्रोजेक्ट मॅनेजरच्या कारकिर्दीत त्याच्या पोटात इतक्या वेळेला गोळे येऊन जातात की त्यांची गोळाबेरीज करता करता हातात गोळे येतील!

स्टुअर्ट: 'सॉरी! मला..... फार खेद होतोय.. कॅन्सल केल्याबद्दल!'

सदा: 'हां! हां! म म मला पण... होतोय...त... त... ता...... कॅन्सल केल्याबद्दल.... फार!'.. ताजमहाल हा शब्द तोंडाला फेविकोलसारखा चिकटल्यामुळे बाहेर पडला नाही आणि स्टुअर्टला त वरून ताजमहाल ओळखायला शिकवलेलं नव्हतं.

'पण, गोईंग फॉरवर्ड, मला वाटतं योग्यच निर्णय होता तो! कॅन्सलेशन वॉज इनेव्हिटेबल!'

'अ‍ॅब्सोल्युटली! अ‍ॅब्सोल्युटली! त्याशिवाय पर्याय नव्हताच'.. सदा १००% सहमत झाल्यामुळे स्टुअर्टला आपण १००% चुकीचं बोललो असं वाटलं.

'सडॅ, तुझा पॉझिटिव्ह अ‍ॅप्रोच मला खरंच आवडला. यू रिअली गेव्ह ११०%. या धंद्यातल्या निटी-ग्रिटीज... नट-एन-बोल्ट्स तुला चांगल्या माहीत आहेत. यू गेव्ह युवर बेस्ट शॉट! बट, अ‍ॅट द एंड ऑफ द डे, यू कॅन्ट कंट्रोल एव्हरिथिंग, कॅन यू?'

'नो, यू कॅन्ट!.. तुला एक गंमत सांगतो.. मी एकदा मुंबईला गेलो होतो.. कंपनीच्या कामाला. त्या वेळेला मी दुसर्‍या कंपनीत होतो. त्या कंपनीचं एक ऑफिस होतं अंधेरीला! दर महिन्याला तिकडे जायला लागायचं मिटिंगसाठी. मिटिंग संपली की लोकल पकडून दादरला यायचं.. मग एशियाड पकडून पुण्याला जायचं असं रूटिन ठरलेलं होतं..'.. सदाची असंबद्ध ष्टोरी सुरू झाल्या झाल्या आपल्या मेंदुत कुणी तरी मटकी भिजत घातलीये आणि त्यांना एकदमच कोंब फुटलेत अशी चमत्कारिक संवेदना स्टुअर्टला झाली.

स्टुअर्ट: 'तू पोरांना सांगितलं आहेस की नाही अजून?'.. ष्टोरी कट केल्यामुळे सदानं खेळणं काढून घेतलेल्या मुलासारखा चेहरा केला.

सदा: 'नाही. अजून नाही. आधी तुला सांगावं असा विचार केला'. दरम्यान, तिकडून येणार्‍या रेवतीला बघून सदाच्या आयडियाच्या गुलाबाला फूल आलं.

स्टुअर्ट: 'मला? मी सांगितलेलं मलाच सांगणार? आणि तेही आधी?'.. स्टुअर्टचा मेंदू कोंबांच्या मेझात गुरफटला.

सदा रेवतीकडे बघत म्हणाला... 'सॉरी रेवती! आपली लंच अपॉईंटमेंट ना? आलोच २ मिन्टात'.. आता रेवतीचा मेंदू गुरफटला.. 'कुठली अपॉईंटमेंट?'

सदा स्टुअर्टला घाईघाईत म्हणाला.. 'बायदवे, तुझं ताजमहाल कॅन्सल केलंय.. मी पळतो.. बाय!'. मग पळत पळत रेवती जवळ गेला आणि कुजबुजला.. 'आत्ता काही बोलू नकोस. माझ्या बरोबर चल नुसती'.. सदानं तिचा हात धरला व जवळपास ओढतच तिला ऑफिसच्या बाहेर घेऊन गेला. ऑफिस बाहेर आल्यावर सदाने तापलेल्या तव्यावर पाणी टाकल्यासारखा आवाज करत सुस्कारा सोडला. तिचा हात सोडून म्हणाला.. 'सॉरी! त्या स्टुअर्ट पासून पळण्यासाठी मी हे नाटक केलं. बोल! कुठे जायचं जेवायला?'

'आँ! जेवायला? आत्ता चार वाजलेत महाराजा! दुपारच्या खाण्याची वेळ झाली माझी!'

'बरं तू दुपारचं खा! मी सकाळचं जेवतो'.. ते जवळच्या उडपीत गेले.

रेवती: 'कशाबद्दल झापत होता क्लायंट तुझा?'

'तो कुठला झापतोय? मीच सुनावले दोन शब्द.. त्याला जरा. पण त्याचं आपलं तेच तेच तेच तेच चाललं होतं, मग म्हंटलं आता पळा!'

'तू क्लायंटला सुनावलंस?'.. रेवतीच्या चेहर्‍यावरून धरणाच्या दरवाज्यातून उचंबळणार्‍या पाण्यासारखा आदर ओतप्रोत ओसंडू लागला.

'हो! मग काय तर! आपण नाय ऐकून घेत.. भलतं सलतं.. उगाच!'.. 'अमेरिकेची फॉरेन पॉलिसी आवडली नाही तर ओबामाला सुद्धा सुनवायला कमी नाय करणार' असा एकंदर आविर्भाव!

'बरं झालं. पण त्यामुळे मला तुझ्याकडून एक पार्टी मिळाली'

'हां, पार्टीसाठी क्लायंटची गरज नाही. कधीही माग! बायदवे, आपण एकमेकांना अरे तुरे करायला लागलोय हे तुझ्या लक्षात आलंय का?'

'हो! केव्हाच! आणि खरं सांगायचं तर... तर.. मला..... आवडलं ते.'.. पायाच्या अंगठ्याने फरशीवर रेघोट्या मारायची उबळ, पायातल्या बुटांमुळे, रेवतीने मारली.

'म.. म.. मला पण.'.. दोघांना तरुणाईतल्या नाजुक क्षणांची आठवण होऊन एकमेकांबद्दल अचानक आपुलकी वाटायला लागली.. परंतु दुसर्‍याच्या मनात नक्की काय आहे ते वय वाढलं तरी न कळल्याने घोड्यानं पेंड खाल्ली!

'तुझी बायकोशी खूप वेळा होते का रे बाचाबाची?'.. रेवतीने सफाईदारपणे रेड सिग्नल जंप केला.

'बायकोशी होते त्याला बाचाबाची कसं म्हणणार? त्याला बाची म्हणता येईल फार फार तर! हा हा हा! तुला माहिती आहे का? बायकांसाठी नवरा हा ७ जन्मांचं गिर्‍हाईक असतो.'

'साप हा सापच असतो म्हणतात तसं बायको ही शेवटी बायकोच असते, बरं का!'

'हां! पण एक फरक आहे.. सापाला तीच तीच पुंगी वाजवून परत परत झुलवता येतं.'

'कजरारे कजरारे'.. सदाच्या फोनने गळा काढला.. 'बोल बायको'

'मला सांग, तू आत्ता हॉटेलात हादडतोयस का? डबा खायचा सोडून? माझ्या मनात आत्ता तसं उमटलं'

'आँ! छ..छ..छे छे! आकुंचन महाराजांमुळे तुझं मन जास्तच आकुंचन पावतंय.'

'मग ट्रॅफिकचे आवाज कसे येताहेत?'

'हां... ते... अं अं अगं माझी खिडकी उघडी आहे'.

'बरोबर कोण आहे?'

'क क कुणी नाही!'..फोन बंद करून सदाने रेवतीकडे पाहीलं. त्याची नजर चुकवून तिनं हळुवारपणे विचारलं... 'तू.. तू.. बंडल का मारलीस?'

'बंडल? अं? ओss! बंsडल! त्याचं काये! मला ना डब्यातलं गार खाणं म्हणजे लिबलिबित थंडगार गोगलगाय खाल्ल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा ऑफिसातल्या एखाद्या घरच्या जेवणाला मुकणार्‍या बुभुक्षिताला डबा दिला की बाहेरचं चमचमित कदन्न खाता येतं! तेही तुझ्याबरोबर!'

'ती बंडल नाही रे! बरोबर कुणी नाही म्हणालास ती!'

'नाऊ! यू डोन्ट गेट एनी आयडियाज! ओके?'.. सदा अभ्यासाच्या पुस्तकात नको ते पुस्तक सापडल्यासारखा लाजला.

'ऑफकोर्स नॉट! व्हाय वुड आय गेट एनी आयडियाज?'

'बरं ते जाऊ दे! मला तुझी मदत हवीये. इथल्या सर्व प्रोजेक्टांच्या कोडमधे पेरलेल्या बगांची रोपं तरारून आता त्यांचा एक छान बगीचा झालाय. त्यांचे वेलू गगनावरी गेलेत. म्हणून तर राकेशने आपण क्वालिटीचा वसा घेणार असल्याची दवंडी पिटली आणि तुला घेतलं. तर मला आधी सांग की क्वालिटीने बग जातात का? म्हणजे मला क्वालिटीबद्दल काही माहीत नाही म्हणून विचारतोय.'

'ऑफकोर्स जातात.'

'म्हणजे क्वालिटी गृपकडे घोस्टबस्टरसारखे बगबस्टर लोक असतात का? की त्यांनी क्वालिटीचं डीडीटी मारलं की सगळे बग गायब होतील.. मग धंदा आपोआप वाढेल.. गिर्‍हाईकं प्रेमाने बोलतील.. राकेश गहिवरून सुट्टी घे म्हणेल.. बायकोचे भांडायचे विषय कमी होतील.. मला पोरीशी चार शब्द बोलायला मिळतील.. एकूण, सर्व पृथ्वीवर शांतता नांदेल.....!'

'हा हा हा! यू आर सो नाईव्ह! ते इतकं सोप्पं नाहीये. आधी सगळ्या बगांचं विश्लेषण करायचं. मग त्यातल्या टॉप २०% कारणांसाठी उपाय योजना केलीस तर ८०% वेळा परत बग येणार नाहीत. यू नो ना?.. द एटी ट्वेंटी रूल?'

'त्यासाठी इतका उपद्व्याप कशाला करायचा? मी आत्ताच सांगतो ८०% बग कशामुळे येतात ते... प्रोग्रॅमरच्या हलगर्जीपणामुळे!'

'तू विश्लेषण केल्यावर आपण जेवायला जाऊ आणि बोलू त्यावर! यू वुड बी सरप्राईज्ड! आत्ता मला अलका बरोबर मिटिंग आहे.. मी निघते.'

लंच करून परत आल्यावर केबिनमधे स्टुअर्टला बसलेला पाहून सदाच्या पोटात शहाण्णव कुळी गोळा आला. त्याला पाहून स्टुअर्ट शांतपणे म्हणाला.. 'कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून वरती तुमच्याकडून ताजमहालची ट्रिप उकळणं मला काही प्रशस्त वाटत नव्हतं. म्हणून मी स्वतःच ते कॅन्सल करा हे सांगायला आलो होतो. बरं झालं तुम्हीच केलं ते! अर्थात, तुम्ही नसतं केलं तर मला खरच प्रोजेक्ट कॅन्सलेशनचा पुनर्विचार करायला लागला असता. असो. मी जातो आता. गुड बाय!'

=========================================================
अभयः 'सर, ते कस्टमरकडून स्पेक्सचं डॉक्युमेंट आलंय त्यात व्हायरस आहे.'

सदा: 'अर्रर्रर्र! कुठं ठेवलंय ते?'

'रंभेवर'.. रंगेल अ‍ॅडमिनने ऑफिसातल्या सर्व्हर्सना अप्सरांची नावं दिली होती.

'अरे मग लगेच तिला घटस्फोट नाही का द्यायचा?'

'सर मी केलं तिला नेटवर्क वरून डिसकनेक्ट, लग्गेच!'.. अभयने 'मला थोडी अक्कल आहे' असा चेहरा केला.

'बरं, मग काय प्रॉब्लेम आहे?

'रंभेवरचा अँटिव्हायरस चालत नाहीये. सीडीवर जुनं व्हर्जन आहे.'

'मग नेटवरून लेटेस्ट घे ना.!

'सssssssर! रंभे वरच आपला इंटरनेट सर्व्हर आहे.'

'हम्म! मेनकावर लेटेस्ट कॉपी असेल बघ.'

'मेनकाचा पासवर्ड काय?'

''आल्या नाचत नाचत मेनका रंभा' हाच दोघींचा पासवर्ड आहे.'

=========================================================
सदा: 'संगिता, तुला माहितीच आहे मी या वनॉन-वन मिटिंगा कशासाठी घेतोय ते!'

संगिता: 'नाही सर! का?'

'अगं काय हे? दोन आठवड्यांपूर्वी मी मोठी मेल पाठवली होती त्याबद्दल!'

'हो का?.. असेल. सर... मला ना.. मोठ्ठ्या मेल वाचायला बोअर होतं. सर, पण माहितीये का? आजच्या माझ्या भविष्यात होतं.. महत्वाच्या विषयावर चर्चा कराल म्हणून.. ते खरं झालं'

'असं होय. कुणाचं वाचतेस तू? मी मटा मधलं वाचतो. काल माझा खर्च होईल असं होतं पण घरी जाई पर्यंत काहीच झाला नाही. म्हणून मी मुद्दाम घरात पाऊल ठेवायच्या आधी पोरीसाठी चॉकलेट घेऊन गेलो.'

'मी सकाळ मधलं वाचते!'

'हॅ! त्यातलं रद्दी असतं! काय पण लिहीतात एकेक.. स्त्री-पुरुष यांच्यातल्या अहंकाराच्या ज्वाळा भडकतील.. मनाच्या प्रदूषणाला कोणतंही तथाकथित अँटिबायोटिक लागू पडत नाही.. प्रेमिकांनो, गाठीभेटी घ्याच.. गुरुभ्रमणाचं अंडरकरंट मोठ्या सुखस्वप्नांचं पॅकेज घेऊन येणारे, मात्र, समोर बघून चाला.'

'सर, प्रोजेक्ट कॅन्सल होणारे?'

'आँ! तुला कुणी सांगितलं?'

'अ‍ॅडमिनचा समीर म्हणाला.. म्हणून स्टुअर्टची ताजमहाल ट्रिप कॅन्सल केलीये असं पण! सर, प्रोजेक्ट गेल्यावर आमचं काय होणार?'

'हे बघ! अजून नक्की काही नाहीये तसं! त्यानं आत्ता धमकी दिलीय नुसती! बाय द वे, तुला एकंदरीत कंपनीबद्दल काय वाटतं? तुझ्या काही तक्रारी आहेत का? पगाराबद्दल काय मत आहे? तुला काम करायला काय अडचणी येतात? माझ्याबद्दल काय वाटतं? अशा सगळ्या गोष्टींची चर्चा करायलाच ही मिटिंग घेतली आहे. तेव्हा मोकळ्या मनाने सांग!'

'सर! तसं सगळं ठीके!.. पण.. सर.. ती.. ती अकाउंट्सची लोकं भारी त्रास देतात.'

'या, टेल मी अबौटिट! काय त्रास दिला? पगार वेळेवर केला नाही का?'

'नाही सर! डेक्कन पर्यंतचे रिक्षाचे ६०रू दिले नाहीत. म्हणाले ५२ रू च्या वर होत नाहीत. सर, आता मी कशाला जास्त लावू?'

'बरंsss! मी बोलतो अकाउंटशी! अजून काही?'.. संगिता गेल्यावर सदानं अकाउंट्सच्या सायली कुरतडकरला फोन लावला.. 'हॅलो सायली! संगिताचं रिक्षाचे ६०रू बिल का नाकारलं?'

'अहो सर! ही पोरं ना वाट्टेल ती बिलं लावतात! डेक्कनपर्यंत ५२रू च्या वर होत नाहीत हो!'

'असं होय? तुला कसं कळलं?'

'माझ्याकडे दुसर्‍या एकाचं बिल आहे ना ५२रू चं!'॑.. यापुढे कितीही वाद घातला असता तरी अकाउंट्सकडून ८रू सुटले नसते हे जाणून सदा तडक एचार मॅनेजर प्रिया आगलावेंच्या केबिनात गेला.

'मॅडम! एक प्रॉब्लेम आलाय.'

'बोला!'

'संगिताचं रिक्षाचे ६०रू बिल अकाउंट्सनं नाकारलं कारण डेक्कनपर्यंत ५२रू च्या वर होत नाहीत म्हणे!'

'मग काय चुकलं त्यांचं?'

'काही रिक्षांचे मीटर फास्ट असतात. कधी ट्रॅफिक खूप असतं.. सिग्नल लागतात.. मग काय करणार? केवळ दुसर्‍या माणसाचं ५२रू झालं म्हणून कसं चालेल? आणि संगिताला ७/८ रू नं काय फरक पडणारे? ती घरची चांगली श्रीमंत आहे. ती एका शॉपिंगला जितके उडवते ना तितका त्या सायलीचा पगार पण नसेल.'

'हम्म्म! बरोबर आहे पण त्यांच्याशी वाद काय घालणार? एस्पेशियली त्यांच्याकडे ५२रू चं बिल आहे म्हंटल्यावर? आपलं.. अकाउंट्स.. तसं.. जरा पेनी वाईज पाउंड फूलिश कॅटेगरीतलं आहे!'.. बाई एकदम कुजबुजत्या आवाजात बोलायला लागल्या.. 'मागे एकदा कॉर्पोरेशन टॅक्स भरायच्या शेवटच्या दिवशी एकाला पाठवला.. ब्रीफकेस मधे कॅश घालून दीड लाख रुपयांच्या वर!.. कारण शेवटच्या दिवशी चेक घेत नाहीत.. तो तिथल्या कँटिनमधे चहा पीत असताना ती ब्रीफकेस कुणीतरी मारली. आता बोल!'

'आधी का नाही भरला चेक?'

'अरे आधी पैसे दिले तर तितक्या दिवसाचं व्याज पडतं ना करंट अकाउंटवर?'

'हं! बरोबर! ठीके... मी सांगतो तिला तसं!'

'मी फार फार तर बोलेन त्यांच्याशी! पण मला वेगळं उत्तर मिळेल असं वाटत नाही.'.. सदा जायला निघणार तितक्यात बाईंनी कुजबुजत्या आवाजात परत सुरुवात केली.. 'हे बघ! संगिता एकंदरीत खूपच पॉप्युलर आहे ना? बरीच मुलं तिच्या मागेपुढे करत असतात.'

'हो अर्थातच! ती सुंदर आहे ना!'

'परवा तू लोकं सोडून जातील असं म्हणत होतास! इफ यू पुट टू एन टू टुगेदर.. यू नो व्हॉट आय मीन?'.. बाईंनी सूचकपणे विचारलं.

'नो! आय डोन्ट!'

'अरे! संगिता एक मॅग्नेट आहे. ती राहिली तर बाकीचे आपोआप चिकटून रहातील.. गॉटिट?'

=========================================================
अभयः 'त्या पासवर्डच्या तालावर मेनका नाचत नाहीये.'

सदा: 'मेनका चालू नसेल'

'सरsssssssss! काय तरीच काय? ती चालूच आहे.'.. गाडी सुरू होत नाही म्हंटल्यावर किल्ली फिरवून पाहिलीस का? असं विचारण्याने अकलेचा जसा पंचनामा होईल तसा अभयचा झाला!

'तू चुकीचा मारत असशील. थांब, मी ट्राय करतो.'.. थोड्या लढाई नंतर पासवर्ड चालत नाही हा साक्षात्कार झाला.. 'आयला, पासवर्ड कुणी बदलला? .. आणि बदलल्यावर मला का नाही सांगितला?'

'मला काय माहित?'

'बरं आता असं कर! अ‍ॅडमिनला सांग पासवर्ड रिसेट करायला. आणि मेनकेवरून अ‍ॅंटिव्हायरसचं इंजेक्शन घेऊन रंभेला टोच. काय?'

अभय थोड्याच वेळात तोंड वेंगाडत परत आला.. 'सर! अजून प्रॉब्लेम झालाय'

सदा: 'आयला! आता काय झालं?'

'मी तो अँटिव्हायरस टोचल्यावर त्यानं विचारलं.. रिपेअर करू का? त्याला 'हो' म्हंटल्यावर त्यानं ते डॉक्युमेंटच उडवलं.'

'बोंबला! आता मी 'हा हन्त हन्त' म्हणू की 'हा जन्त जन्त'?'

=========================================================
संगिता: 'सर मी येऊ?'

सदा: 'हो हो ये की! काय चाल्लंय? तो प्रोग्रॅम झाला का? काल संपवणार होतीस ना?'

'नाही सर! माझं लॉजिक चालत नाहीये.. ते निखिलला दिलंय बघायला! आणि स्क्रीन डिझाईनमधे जरा इश्यू आहेत.. ते अभय बघतोय!'

'हम्म! बरं मग आता ते कधी होणार?'

'त्यांना विचारून सांगते. सर, तुमच्याइतकं कोणीच मला समजुन घेत नाही.'.. अशी वाक्यं समोरच्याला घोळात घेण्याआधीचं प्रास्ताविक असतं हे सदाला माहीत नव्हतं!

'अगं! ए मॅनेजर गॉट टु डू व्हॉट ए मॅनेजर गॉट टु डू!'.. आपलं कौतुक ऐकणं सदाला काँक्रिटमधे उगवलेल्या गुलाबाइतकं दुर्मिळ होतं.

'सर मला रजा हवी होती.. २ दिवसांची!'

'कशासाठी? तुला माहिती आहे ना?... सध्या जरा टाईट परिस्थिती आहे'

'आत्याच्या दिराच्या मावसभावाच्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे.. जळगावात! जवळचं आहे सर'

'रजेबद्दल माझं काय म्हणणं आहे तुला माहिती आहे का संगिता?
खुदी को कर बुलंद इतना, के
हर तहरीर से पहेले,
बॉस बंदे से खुद पुछे,
बता, तुम्हे कितनी रजा चाहीये?
हा हा हा! बरं घे दोन दिवस! पण दोन म्हणजे दोनच दिवस हं! मागच्या वेळेसारखं करू नकोस.'

'नाही सर! तेव्हा माझी ट्रेन चुकलेली!'

'बरं, मग या वेळेला ट्रेन चुकवू नकोस! आणि हे तुझ्या रिक्षाच्या बिलाचे ८रू... उरलेले! अकाउंटशी लढून लढून मिळवले शेवटी! उपनिषदात म्हंटलेलं अगदी सत्य आहे बघ.. सत्यमेव जयते!'

'थँक्यू सर! तुम्ही माझ्यासाठी भांडलात? कित्ती गोsssड!'

'हॅ हॅ! थँक्यू काय त्यात? होणारच नाही म्हणून आपण डोकं धरून बसलं की कधीच होत नाही! म्हणून लढायचं! माझा बाणा असा आहे. तिकीट न घेता लॉटरी लागत नाही!'

काही दिवसांनी सायलीचा सदाला फोन आला....'सर! एक काँप्लिकेशन झालंय!'

'काय?'

'म्हणजे तसं काही विशेष नाही... पण हल्ली संगितासकट सगळेच जण रिक्षाचे ६०रू. लावतात!'

'बघ! तरी मी तेव्हा तुला म्हणत होतो.'.. सदा मनातल्या मनात फुगा फुटल्यासारखा हसला.

'सर पण नाही होत हो ५२रू च्या वर! ठीके! मी ५२च पास करते.'

त्यानंतर दोन दिवसांनी सदानं संगिताला बोलावलं.. 'संगिता! मी काल रिक्षानं डेक्कन पर्यंत गेलो होतो.'

'का? गाडी बंद पडली?'

'नाही! मला बघायचं होतं... किती होतात ते!'

'हो? मग किती झाले?'

'अवघे ४२रू! आता मला सांग तू ६० रू का लावतेस?'

'सर! त्याचं काय आहे! आम्ही सगळे ५२रू लावायचो. कारण कुणी कमी लावले की सायली मॅडम त्या नंतर सगळ्यांना कमीच देतात. त्या दिवशी मी चुकून ६० रू लावले. आणि तुम्ही ते पास करून घेतले. मग मी सगळ्यांना तसं सांगितलं!'

-- भाग -३ समाप्त --

Monday, February 11, 2013

तेथे पाहिजे जातीचे.. भाग-२

तेथे पाहिजे जातीचे.. भाग-१ इथे वाचा!

'हाय सडॅ! डू यू हॅव अ मोमेंट?'.. वेगवेगळे आकडे व आलेखांच्या डबक्यातून सदानं डोकं वर केलं. स्टुअर्ट केबिनच्या दारातून विचारत होता.

सदा: 'हो! हो! ये की. बोल काय म्हणतोस? कसं वाटलं तुला इथे?'

'हं! मी तेच बोलायला आलो होतो. तसं तुमचं ऑफिस अ‍ॅज सच, इज अ‍ॅज गुड अ‍ॅज एनी! पण खरं सांगायचं तर मला थोड्या गोष्टी खटकल्या. म्हणजे मला इथे येऊन तसे चार पाचच दिवस झालेत. काही फार नाहीत. ठाम मत बनवण्याइतके तर नाहीच नाही. पण म्हंटलं तुला आजच सांगावं.. कारण आता उद्या मी जाणार दिल्लीला आणि तिकडून परत घरी!'

'दिल्लीला? ताजमहाल बघायला का? अरे वा! ते कधी ठरलं तुझं?'

'ते मी आलो त्याच दिवशी संध्याकाळी मला राकेशने सांगितलं.'.. स्टुअर्टला ताजमहाल पहायची इच्छा आहे हे सदानंच राकेश पांडेला म्हणजे सीईओला सांगितलं होतं. खुद्द राकेशनंच अंधारात ठेवल्याचा दणका सदाला अवघड जागचं दुखणं होतं.

'असं होय! फारच छान! तुला नक्कीच आवडेल ताजमहाल! एनीवेज, तू खटकल्याचं बोलत होतास.. '

'हां! तर मला असं जाणवलं की ओव्हरॉल टेक्निकल स्किल्स कमी आहेत.. एक्सपर्टीझ कमी आहे. कम्युनिकेशनची बोंब आहे. डिसिप्लिन नाही. म्हणजे लोक अशिक्षित आहेत म्हणून होतंय असं नाही. चांगले ग्रॅजुएट आहेत. पण सारासार विचार करू शकत नाहीत. योग्य प्रश्न विचारत नाहीत. पण अ‍ॅट द एंड क्वालिटी मार खाते. अर्थात, कॉन्ट्रॅक्ट रिन्यूवलच्या वेळी याचा विचार होईलच परत!'.. सदाच्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणली. कॉन्ट्रॅक्ट रिन्यूवल दोन महिन्यांवर आलं होतं.

'तसं तुझं म्हणणं बरोबर आहे. माणसांचा टर्नओव्हर खूप आहे. एखाद्याला ट्रेन करून तो प्रॉडक्टिव्ह होईपर्यंत त्याची जायची वेळ होते. म्हणून आम्हाला सगळ्यांनाच क्वालिटीची काळजी आहे. त्यासाठी नवीन क्वालिटी डिपार्टमेंटच आता उभं केलंय. मला वाटतं पुढच्या काही महिन्यात तुला निश्चित फरक जाणवेल.'

'ओके. बघू या.'

'आणि मी असं करतो. तू मी राकेश अशी एक मिटिंग ठेवतो उद्या.. या सगळ्या इश्युंबद्दल. चालेल?'

'चालेल. म्हणजे, इट कुड बी अ कल्चरल थिंग! मला नक्की नाही सांगता येत असं का ते! सर्वसाधारणपणे इथले लोक अप्रामाणिक आहेत. रिक्षावाले तर फारच! काय गोंधळ असतो रस्त्यांवर! गाई, म्हशी, कुत्री, गाढवं, माणसं..! कुण्णालाही सिव्हिक सेन्स नाही!'

'आरे माणसं सगळीकडची सारखीच असतात! तुला सांगतो.. मला जे एफ के एअरपोर्टवर जायचं होतं. बुधवार होता मला वाटतं! नाही! नाही! गुरुवार होता! हो! गुरुवारच होता! माझा ऊपवास असतो त्या दिवशी! एका क्लायंटला भेटायला गेलो होतो न्यू जर्सीत! आधी त्याला सॅन फ्रॅन्सिस्कोत भेटायचं ठरलं होतं. त्याचं तिकडे पण ऑफिस आहे. पण तो न्यू जर्सीत येणारच होता म्हणून मग सॅन फ्रॅन्सिस्को कॅन्सल झालं. आधी मी न्यू जर्सीहून सॅन फ्रॅन्सिस्कोला जाऊन परत न्यूयॉर्कला येऊन भारतात जाणार होतो. मग सॅन फ्रॅन्सिस्को कॅन्सल झाल्यामुळे मी ते तिकीट कॅन्सल करायला फोन लावला. बराच वेळ धरून ठेवला होता. मग ती बाई आली. मग मी सांगितलं असं असं झालंय.. मला ते तिकीट कॅन्सल करायचंय. तर ती म्हणाली ते तसं नाही करता येणार. आयटिनरी अ‍ॅड नाही करता येणार. मी म्हंटलं आयटिनरी अ‍ॅड नाही करतेय, ड्रॉप करतोय. तरी ती नाहीच म्हणाली. मग मी तिला म्हंटलं तुम्हाला मला उगीचच्या उगीच तिकडे नेऊन परत आणायचं असेल तर माझी तयारी आहे. मी राहीन बसून! मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिनं कॅन्सल केलं. तर गंमत सांगायची म्हणजे.. रात्री ८ ची फ्लाईट होती. मी ४ वाजता निघालो. असलं तुफान ट्रॅफिक लागलंय. अगागा! फक्त अर्धा तास कमी असताना तिथं पोचलो. तर काउंटरवरचा मॅन म्हणाला ट्रेन पकडायला आलात की फ्लाईट? त्याला म्हंटलं.. सॉरी! फार ट्रॅफिक लागलं. तर म्हणाला.. ते नेहमीच असतं. तू आधी निघायला पाहिजे होतंस. पुढच्या वेळेस लक्षात ठेव. मी म्हंटलं.. ओके ओके. मग कुठं त्यानं गेटपास फाडला.'

संभाषणाशी विसंगत ष्टोर्‍या सांगण्यात सदाचा हातखंडा होता. पण त्यामुळे स्टुअर्टची अवस्था डोक्याला जबरी मार लागलेल्या हिंदी हीरोसारखी झाली. त्याला हलवला असता तर त्यानं 'मै कहाँ हूं? मै कौन हूं?' छाप सुरुवात केली असती.

=========================================================
सदा: 'अरे निखिल! डिझाईन करायचं सोडून ही कसली केव्हमॅन सारखी चित्रं काढलीयेस तू?'

'ओ सर! ती चित्रं नाहीयेत. यूएमएल डायग्रॅम्स आहेत.'.. निखिल एकेक चित्रं दाखवत म्हणाला.. 'ही यूजकेस डायग्रॅम.. ही.. '

'यूजकेस? मला तर ती यूसलेसकेस वाटतेय. या तुझ्या चित्रांच्या आल्बममधे आणि आम्ही करायचो त्या डिझाईनात काय इतका फरक आहे रे?'

'सुलेमान आणि पोकेमान यांच्यात जितका फरक आहे ना, तितकाच.'

'हम्म्म! पण चिल्लर प्रॉजेक्टला काय करायचाय इतका टाईमपास? वाळूतल्या किल्ल्यासाठी कुणी ब्लुप्रिंट वगैरे करतं का?'

'का करू नये?'.. मारामारीच्या आधी कुंगफूवाले करतात तसे हातवारे निखिलने केल्याचा भास सदाला झाला.

'का करू नये? त्यात नको इतका वेळ जातो! ब्लुप्रिंट होईपर्यंत भरती येऊन किल्ल्याची जागा पाण्याखाली जाते'

'हेच! हेच! आपण नेहमी चौकटीत राहून विचार करतो! ते बरोबर नाही! त्यामुळेच आपल्याला आयफोन वगैरे डिझाईन करता येत नाहीत. कारण फोन म्हंटलं की त्यात काय पाहिजे? फक्त फोन घेता व करता आला की झालं! असा लिमिटेड विचार करणार आपण! वी हॅव टु थिंक बिग! ओव्हरडिझाईन करायचं! दाढीच्या ब्लेडमधे वाय-फाय कनेक्टिव्हिटी घालायची! बिनधास्त!'

'आरे! तू ढीग ओव्हरडिझाईन करशील रे! पण क्लायंट पास करणारे का ते? देणारे का पैसे जास्तीचे? तर नाही! उगीचच्या उगीच फुगवलेलं डिझाईन केलंस तर प्रत्येक परिच्छेद वेगळ्या पानावर छापल्यावर ४०० पानांची कादंबरी जशी दिसेल तसं दिसेल ते! फु ग व ले ली!'

'ओssह तसं! पण त्याचा फायदा बघा ना! एखादी चूक सापडली तर फक्त तेव्हढाच परिच्छेद छापला की भागतंय! मेन्टेनन्सला किती सोप्पं!'

'तुझं पुस्तकी ज्ञान पाजळू नकोस रे! व्यवहारात त्याचा काही उपयोग नाही! एखाद्या पात्राचं नाव बदललं तर ते नाव असलेले सगळे परिच्छेद छापणारेस? केव्हढ्याला जाईल ते?'

'कादंबरी छापून झाल्यावर पात्राचं नाव कोणी बदलतं का? काहीतरी खुसपट काढायचं म्हणून काढल्यासारखं आहे हे!'.. इन्फ्रारेड कॅमेर्‍यातून पाहिलं असतं तर निखिलच्या नाकातोंडातून वेल्डिंग गनसारखी आग उसळताना दिसली असती!

'का नाही बदलू शकत? एक तप या धंद्यात आहे मी! सर्व प्रकारचे घोळ पाहिलेले आहेत मी! तेव्हा जरा सेन्सिबल डिझाईन कर! प्लीज! आणि हे बघ! तो स्टुअर्ट फार कटकट करत होता.. सर्वच बाबतीत.. टेक्निकल स्किल्स कमी आहेत.. एक्सपर्टीझ कमी आहे.. यंव त्यंव! तर त्याच्यावर जरा चांगलं इम्प्रेशन मारा. जरा सेन्सिबल प्रश्न विचारा. मूर्खासारखे नकोत. कॉन्ट्रॅक्ट रिन्यू नाही करणार नाहीतर तो. दोन महिन्यात येतंय ते रिन्युवलला. बाकीच्यांना पण सांग.'.. निखिलला 'इम्प्रेशन मारा' याचा फार त्रास झाला.. इम्प्रेशन काय मारा? ते काय कुठला फवारा मारण्याइतकं सोप्पं असतं?

'ओके'.. सदाच्या केबिनमधून तो पंक्चरलेल्या चाकातल्या हवेच्या वेगाने सटकला.

=========================================================
'अ‍ॅssssssss'.. एक कर्णकर्कश्य किंकाळी ऑफिसची शांतता चरचरत गेली. सगळे खाडकन उठून बघायला लागले. संगिता तिच्या जागेपाशी थरथरत उभी होती. अभय धावत धावत तिच्यापाशी गेला.. 'काय झालं गं?'

संगिता: 'अ रे! म म माझ्या मॉ मॉ मॉनिटर मागे उं उं उंदीर'

अभय: 'हॅ! हे तर अगदीच पिल्लू आहे! तिकडे सर्व्हर रूममधे बघ! चांगले गलेलठ्ठ आहेत. परवाच मी पाहिला. वायरी कुरतडत होता'

संगिता: 'अरे त्याला दात येत असतील. माझ्या एका मैत्रिणीच्या बाळाला येताहेत ना सध्या! ती सांगत होती. तो ना, हाताला लागेल ते चावत असतो. हा हा.'

'तरीच परवा मी सर्व्हरला पिंग केलं तर चूं चूं असा आवाज आला'.. सोडावॉटर चष्मा वर ढकलत कोरड्या आवाजात निखिल म्हणाला.

संगिता: 'ए खरंssच? चल. तू गंमत करतोयस.'.. निखिलने 'काय येडी आहे' छाप हावभाव केले.

'अरे हे तर मेलेलं आहे.'.. अभयने ते शेपटी धरून उचललं आणि मुद्दाम संगिताच्या नाकासमोरून नेलं. तिचा किंकाळीचा रिटेक झाल्यावर तो म्हणाला.. 'आणि आज नेमकी साडीत आलीयेस. हा उंदीर मागे लागला असता तर काय केलं असतंस?'

संगिता: 'ही मैत्रिणीच्या मुलाच्या बारशाची साडी आहे. आज घडी मोडली. मस्त फील आहे ना? बघ.'

निखिलः 'तुम्हा बायकांना साडीची घडी मोडण्याचं काय इतकं कौतुक असतं? साड्यांच्या दुकानातले लोक हजारो घड्या रोज मोडतात पण कधी आपल्या बायकांपुढे फुशारक्या मारतात का?'

संगिता: 'तुला नाही कळायचं रे ते!'

अभयः 'ए तुझ्याकडे शेकड्यांनी साड्या असतील! तुझ्या लक्षात राहतं का की कोणती साडी कुणी कधी का दिली वगैरे?'

संगिता: 'हो राहतं की! त्यात काय विशेष? तुझ्या पण राहतं की! कुठल्या हॉलिवूडच्या पिक्चरमधे कोणकोणत्या नटनट्या आहेत? ते कुठे रहातात. कुणाचं कुणाशी लफडं आहे.. सगळं कसं तोंडपाठ असतं ना तुला?'

'पण कुठला प्रोग्रॅम काय करतो ते नाही रहात लक्षात'.. निखिलचा एक कडवट डायलॉग.

'पण तुझ्या असतं ना! तेव्हढंच मला कारण मिळतं.. गप्पा मारायला.. तुझ्याशी!'.. संगितानं निखिलकडे एक अर्थपूर्ण नजर टाकली.. तो अस्वस्थ झाला.

'गोंद्या आला रे! आज शेवटचा दिवस ना रे याचा?'.. स्टुअर्टला येताना पाहून अभयनं सायरन वाजवला.

'पेमट्या मला डिझाईन बदल म्हणतोय. माझं चांगलं फ्युचर प्रुफ डिझाईन आहे खरं. पण त्याला समजलंच नाही अजिबात! मी ते तसंच गोंद्याला दिलंय. बघू, त्याला तरी समजतंय का ते?'.. निखिलचं शायनिंग सुरू झालं. पेमट्या हे त्यांनी सदाचं ठेवलेलं खाजगी नाव होतं.

अभय: 'फ्युचर प्रुफ होतं की फ्युचर शॉक?'.. अभयचा शेरा निखिलला सुईसारखा टोचला.

संगिता: 'ए सरांना तुझ्यापेक्षा जास्त समजतं हं!'

निखिलः 'ए! त्याच्या समोर मुद्दाम तुम्ही मराठीतून काहीतरी बरळू नका रे! त्याला हल्ली संशय यायला लागलाय की आपण त्याला शिव्या घालतो म्हणून!'

संगिता: 'संशय काय त्यात? आपण घालतोच! आणि त्याला काय मराठी समजणारे? निदान तोंडावर शिव्या घातल्याचं आपल्याला तरी समाधान!'

'नायखिल! तुझं डिझाईन पाहिलं मी! आयॅम नॉट हॅपी विथ इट!'.. स्टुअर्टने जवळ येऊन तोफ डागली.

'का?'.. निखिल कपाळाला हात लावत म्हणाला.

'एकतर तू नको इतका वेळ घालवलास in getting upto speed! and at the end of the day तू एक उगीचच्या उगीच फुगवलेलं डिझाईन केलंयस'

निखिलः 'व्हॉट डू यू मीन?'

'किती कीस काढतो ना हा प्राणी'.. अभय संगिताकडे वळून मराठीतून म्हणाला. स्टुअर्टने त्यातला एक ओळखीचा शब्द उचलून लगेच विचारलं..

'व्हॉट हॅज किस गॉट टु डू विथ डिझाईन?'

'ओssह! किस म्हणजे... अम्मssss ते हे'.. अभयनं भांबावून संगिताकडे पाहिलं.. 'किस म्हणजे...'

'डोन्च्यू लुक अ‍ॅट हर! शी इजंट गॉना हेल्प्यू.. एस्पेशियली इन किस! हा हा हा'... स्टुअर्ट खिंकाळला.

'व्हॉट ही मीन्स इज Keep It Simple and Stupid... KISS... फेमस प्रिन्सिपल!'.. संगितानं बाजू सावरली. निखिलनं तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं.

'आय सी! दॅट किस! नायखिल, तुझ्या सहकार्‍यांकडून शीक जरा! Its a no-brainer! फुगवलेलं म्हणजे फुगवलेलं! प्रत्येक परिच्छेद वेगळ्या पानावर छापल्यावर ४०० पानांची कादंबरी जशी दिसेल तशी! फु ग व ले ली!'

'ओssह तसं!'.. निखिल स्वतःशी पुटपुटला.. 'मला वाटलंच होतं. ही जुनी खोडं सगळी ब्रेन डेड आहेत म्हणून!'

'मेन्टेनन्सला आणखी सोप्पं कर! बिल्ड अ‍ॅज मच इंटेलिजन्स अ‍ॅज यू कॅन! रेझ द बार! But! But try not boil the ocean'

'आँ! म्हणजे काय म्हणायचंय रे त्याला?'.. संगिताने अभयला विचारलं. तिला भेटलेल्यातला हा पहिलाच जार्गनमहर्षी होता.

'म्हणजे, खेळण्यातल्या गाडीला उगीच जेट इंजिन लावू नकोस म्हणतोय तो'.. अभय.

'एक तप या धंद्यात आहे मी! सर्व प्रकारचे घोळ पाहिलेत! तेव्हा ते बदल प्लीज! Get your ducks in a line! See the bigger picture.'

'ए! हा काहीही बोलतो!'.. गाणं समजत नसताना सवाई गंधर्वला जाऊन वा वा करणार्‍यातली संगिता नव्हती.

'म्हणजे सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर असं म्हणतोय तो!'.. अभय कुजबुजला.

'ओके'.. चडफडत निखिल म्हणाला. त्याच्या नाकातून कुकरच्या शिट्टीसारखी गरम वाफ फिस्कारली.

'त्यातले गोंद्याचे किती घोळ असतील रे?'.. अभय निखिलकडे बघत परत मराठीतून बरळला.

'व्हॉटार्यू सेयिन?'.. स्टुअर्ट.

'तो मला काही मदत करू का म्हणून विचारत होता.'.. निखिलनं निर्विकारपणे संभाळलं.

'आणि हे बघ! तुझी फायलिंची आणि क्लासेसची नावं मला आवडलेली नाहीत! नवीन नावांची मेल मी तुला पाठवली आहे, तशी तू बदल!'.. स्टुअर्टने निखिलच्या आश्चर्यचकित चेहर्‍याकडे रोखून पाहिलं, मग म्हणाला.. 'थँक्स!'

'च्यामायला! या बारकावेबाजाची लेव्हल करू का रे? पार राडाच करतो.. स्वतःचं नाव पण विसरेल तो. बापानं ठेवलेलं नाव बदलायची टाप होती का याची?'.. अभय मराठीतून चिडचिडला. निखिलनं त्याला डोळ्यांनीच दटावलं.

'बरंsss!'.. निखिल म्हणाला.

'गुssड! वि आर ऑन द सेम पेज नाऊ!'.. स्टुअर्टने जायला सुरुवात केली. मग त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. परत मागे आला आणि गंभीर चेहर्‍यानं अभयकडे रोखून बघत चक्क मोडक्या तोडक्या मराठीतून म्हणाला.. 'माझा नाव ख्रिस होटे.. टु बोलटे.. मी समजटे'.. तिघेही नायगार्‍यासारखे कोसळले!

=========================================================
'हॅलो! कामात आहेस का?'.. सदाच्या बायकोचा फोन आला.

'नाही. वैतागात आहे. तुझं काय चाल्लंय?'.. सदा धुसमुसला.

'अरे, सायबानं ८० ते ८४ सालात दिलेल्या लायसन्सच्या फायली शोधायला लावलंय!'

'इतक्या जुन्या फायली तर केव्हाच शेकोटीला वापरून संपल्या असतील ना?'

'गप रे! आणि तू का वैतागलायंस? कुणाशी चकमक झालीये आज?'

'चकमक नाही पगारवाढ झालीये. फक्त ४.५%! आयला, इतकं मरमर मरून फक्त फुटाणे मिळाले. तेही साले सगळे चोर.'

'दर वर्षीचं रडगाणं आहे तुझं!'

'दर वर्षी कुठे? या वर्षी फारच कमी आहे. त्या.. त्या अलका देसाई पेक्षा कमीच आहे मला. ती तर नवीन मॅनेजर आहे. चार महिने पण नाही झाले जॉइन होऊन'

'अरे, तुझं काम चांगलं नसणार! तुझ्या घरातल्या कामांवरून मला तरी तसंच वाटतंय.'.. बायकोशी बोलताना नेहमीच आपण 'ये रे बैला..' का करतो हे न समजल्यामुळे सदानं फोन आदळला.

=========================================================
'नमस्कार सदा! कसं चाल्लंय?'.. एचार मॅनेजर प्रिया आगलावे सदा बरोबर त्याच्या केबिनमधे घुसल्या.

'काही नाही. नेहमीसारखंच!'

'काय म्हणतेय तुझी टीम? टीम बाँडिंग साठी काय केलंस?'

'बाँडच्या पिक्चरला गेलो होतो सगळ्यांना घेऊन'.. ४.५%च्या मिरच्या चांगल्याच झोंबल्या होत्या त्याला.

'हो का! अरे वा! टीम स्पिरिट कसं आहे एकंदरीत?'

'स्पिरिट? उडून गेलंय एकदम!'

'का?'

'अहो का काय? नेहमीचीच रड! सॅलरी फार वाढली नाही.'

'सॅलरी नको म्हणूस, काँपेन्सेशन म्हण! पण यावेळेला तर आपण अगदी थरो एक्सरसाईझ केला होता. सगळ्यांच्या एक्सपेक्टेशन्स मॅनेज केल्या होत्या. व्यवस्थित!'

'अहो एक्सपेक्टेशन्स मॅनेज करतो म्हणजे काय करतो आपण? थातुर मातुर काहीतरी सांगतो. आम्ही इतर कंपन्यांनी किती वाढ दिलीये ते बघणारोत, त्यांचा प्रत्येक लेव्हलचा सरासरी पगार बघणारोत. एकंदरीत रॅशनलायझेशनवर भर देणारोत. या वर्षी एकूणच रिसेशन मुळे धंदा मंदावलाय. आपले काही क्लायंट बुडालेत. तरी ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, जे या कंपनीचे आधारस्तंभ आहेत ते आमचे अ‍ॅसेट्स आहेत. आपण सर्व एकाच परिवारातले आहोत. ब्ला ब्ला ब्ला! यातून फक्त चार पाच टक्के पगारवाढ मिळणारे हे कुठं कळतं? म्हणजे फटाक्यांची आतषबाजी नाही पण निदान थोड्या माळा तरी बघायला मिळतील अशी अर्धवट कल्पना करून द्यायची आणि एका लवंगी फटाक्यावर बोळवण करायची! तेही फुसक्या!'

'कितीही वाढ दिली तरी लोकं रडणारच.'

'पण इन्फ्लेशन १०% च्या वर आहे म्हंटल्यावर ती 'वाढ' होत नाही हो.'

'तुला माहिती आहे का? खरं कारण?.. तुलना! मला अमक्यापेक्षा कमी वाढ दिली हा राग मनात असतो. पण तसं उघडपणे सांगता येत नाही. म्हणून मग वाढ कमी मिळाली म्हणून शंख करायचा.'

'लोकं वाटेल त्याच्याशी नाही तुलना करायला जात! आता चार वर्ष जुन्याला चार महिन्यापूर्वी आलेल्यांपेक्षा कमी मिळाले तर....'

'तू अलका देसाईबद्दल बोलतोयस का?'

'आँ! क क कोण अलका देसाई? हां हां ती नवीन! नाही. नाही. मी एक जनरल उदाहरण घेतलं'

'तरी मी एकमेकांशी वाढ डिस्कस करू नका म्हणून सांगितलं होतं.'

'असं सांगून लोक थांबणारेत का? गॉसिपिंग करू नका असं सांगून बायका करायच्या थांबतात का?'.. एकदम जीभ चावून सदा म्हणाला.. 'सॉरी मॅडम!... सॅलरी.. सॉरी.. काँपेन्सेशन कमी मिळालं की काय होतं ते तुम्हाला माहितीच आहे. लोकं सोडून जातात. मग पीपल मॅनेजमेंट चांगलं नाही म्हणून क्लायंट ठणाणतो.'

'हम्म! किती लोकं जातील असं वाटतंय?'

'अजून काही सांगता येत नाही. वाढ नुकतीच झालीये. लवकरच चित्र स्पष्ट होईल. सध्या मोबाईल घेऊन गॅलरीत पळत जायचं प्रमाण वाढलंय असं मला वाटतंय!'.. मोबाईल घेऊन गॅलरीत जाणार्‍यांची संख्या हा सदाचा 'राजिनामा इंडेक्स' होता.

'यू सी, काँपेन्सेशन इजन्ट एव्हरिथिंग! यु हॅव टु सेल द होल पॅकेज टु देम! हायलाईट अदर आस्पेक्ट्स लाइक फ्लेक्सिबल वर्किंग अवर्स, वर्क लाईफ बॅलन्स, कंपनी जिम, मेडिकल इन्श्युरन्स, LTA इ. इ. तू दर महिन्याला प्रत्येकाची एक वनॉन-वन मिटिंग घेऊन हे सांगत रहा. तू तुझ्या टीमचा लोकल एचार रिप्रेझेन्टिटिव्ह आहेस. तुलाच सगळं बघायला पाहिजे. कीप टॉकिंग टु देम. कीप लिसनिंग टु देम. आम्ही फक्त गायडन्स देऊ शकतो.'

'म्हणजे? हे पण मीच बघायचं?'

=========================================================
'सर येऊ का?'

'अरे ये की निखिल!'

'सर एक सांगायचं होतं'.. सदाच्या मनात त्याच्या राजिनाम्याची पाल चुकचुकली.. 'आला वाटतं पहिला!'

'थांब! मी ओळखतो. तुला एक कंपनी अमेरिकेला पाठवतेय.'

'न.. नाही!'

'बरं मग, तुला एक चांगल्या पगाराची नोकरी मिळालीये.'

'न.. नाही! नाही!'.. निखिल आता चांगलाच गोंधळला.

'बरं, मग तू सांग'

'सर, त्या स्टुअर्टने फार काव आणलाय.'

'ओssह! म्हणजे तू नोकरी सोडत नाहीयेस तर!'

'नाही! नाही! म्हणजे मी सोडायला हवी आहे का?'

'छे! छे! तू तर आमचा आधारस्तंभ! तू सोडलीस तर कंपनी कशी चालेल? हॅ हॅ हॅ! सो? आर्यू हॅपी हिअर? पगारवाढ वगैरे?'

'ठीक आहे सर! का?'

'नाही! नाही! मी ऐकलं की लोकं नाराज आहेत म्हणून'

'लोकं निष्कारण तुलना करतात आणि रडतात. आता बघा. संगिताला तसे काही फार जास्त नाही मिळाले. तरी बाकीचे म्हणतात ती सुंदर असल्यामुळे तिच्या लायकीपेक्षा तिला नेहमी जास्त मिळतात'

'पण ते खरंच आहे'

'आँ?'

'आय मीन! ती सुंदर आहे ते खरंच आहे.'

'हां! हां!'

'चला! तू इथे आनंदात आहेस हे ऐकून बरं वाटलं! अजून दोनेक वर्ष राहिलास तर मस्त तयार करेन बघ तुला डिझाईनिंग मधे!'

'सर! ते डिझाईन स्टुअर्टनं फेकून दिलं'

'तरी मी तुला सांगत होतो ते बदल म्हणून!'

'गॅलिलिओला लोकांना पटवताना जसं नैराश्य आलं असेल तसं मला आलंय आत्ता'.. निखिलनं एक दीर्घ सुस्कारा सोडला.

'या! टेल्मी अबौटिट! नैराश्य वरून आठवलं.. आम्ही रोमला गेलो होतो. सुट्टीसाठी. सगळी फॅमिली बरोबर होती. मे महिना होता. मुलीला उन्हाळ्याची सुट्टी होती. मी आणि बायकोनं रजा घेतली ३ आठवड्यांची. मस्त युरोप टूर करायची म्हणून! केसरी टुर्स बरोबर गेलो होतो. टुर्स बरोबर गेलं की कसं असतं.. आपल्याला कसली कटकट, चिंता करावी लागत नाही. त्याचं सगळं पर्फेक्ट प्लॅन्ड असतं. व्हिसा बिसा सगळं ते बघतात. आधी लंडन मग पॅरिस मग स्विट्झर्लंड करत करत शेवटी रोमला पोचलो. आम्हाला सीझरचा पुतळा बघायचा होता. पण जायचा रस्ता माहिती नव्हता. आम्ही बर्‍याच जणांना विचारलं.. सीझरचा पुतळा कुठाय? तर ते सरळ माहीत नाही म्हणायचे. आयला! म्हंटलं करायचं काय? इतका मोठा माणूस तिथला आणि त्याचा पुतळा कुठे आहे ते माहिती नाही? आपल्या इथे कुणालाही कर्वे पुतळा कुठे आहे विचारलं तर तो लगेच सांगेल.'

'सर! कर्वे पुतळा कुठे आहे?'

'हॅ! हॅ! गंमत करतोस काय लेका! तर मी काय सांगत होतो की कुणालाही त्याचा पुतळा कुठे आहे ते माहिती नव्हतं. शेवटी कागदावर ज्युलियस सीझर असं नाव लिहून एकाला दाखवलं. तेव्हा तो लगेच म्हणाला.. ओsह! सेझारे! असे या रस्त्याने जा. आहे की नाही गंमत?'

'हम्म! पण सर! खरंच कर्वे पुतळा कुठे आहे?'

=========================================================
राकेशः 'तू आम्हाला तुला काय वाटतं ते सविस्तर मोकळेपणाने सांगितलंस ते बरं केलंस. असा क्लायंट फिडबॅक मिळाल्याशिवाय सुधारणा होत नाही. नवीन क्वालिटी डिपार्टमेंट आता उभं केलंय हे सदानं तुला सांगितलंच असेल. मला वाटतं कॉन्ट्रॅक्ट रिन्यूवल पर्यंत तुला निश्चितपणे फरक जाणवेल.'

स्टुअर्टः 'मला वाटत नाही मी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचा सल्ला देईन म्हणून. आयॅम गॉना पुल द प्लग!'.. त्याचं बोलणं 'चितळेंचं दुकान बंद पडलंय' या बातमी इतकं अनपेक्षित होतं.

सदा: 'तू सर्व क्वालिटी इश्यू आमच्यामुळेच आहेत असं जे म्हणतोयस ते बरोबर नाही तुलाही माहितीये. मीच तुला कित्येक वेळेला सांगितलंय तसं. प्रॉब्लेम तुमच्याकडे पण आहेत.'.. सदानं त्याला पापात सहभागी करायचा डाव टाकला.

स्टुअर्टः 'असतील ना! पण आता तिकडचे सगळेच वैतागले आहेत. यू आर वे बिहाईंड द कर्व्ह! त्यामुळे हे आत्ता चालू आहे ते प्रॉजेक्ट संपलं की हे रिलेशन मी बंद करणार आहे. हे प्रॉजेक्ट कॉन्ट्रॅक्ट रिन्यूवल पर्यंत संपेलच. आयॅम सॉरी. ही मिटिंग चालू ठेवण्यात मला तरी काही अर्थ दिसत नाही.'

स्टुअर्ट निघून गेला. धक्का बसलेले दोघं एकमेकांकडे बघत राहिले. मग राकेशला वाचा फुटली..
'हे बघ सदा! चालू आहे ते प्रॉजेक्ट नुसतं चांगलं नाही तर ते उत्कृष्टच करायला हवंय आता. तरच थोडा फार चान्स आहे. समजलं ना?'

सदा: 'येस सर!'

'पुढचे दोन चार दिवस नीट प्लॅनिंग कर. प्रॉजेक्ट वेळेच्या आधी संपलं पाहिजे. त्यात एक देखील बग असता कामा नये. त्यांना कुठेही बोट ठेवायला जागा मिळायला नकोय मला.'

'हो. पण त्यांच्याकडून सपोर्ट मिळत नाही. विचारलेल्या प्रश्नांची वेळेवर उत्तरं मिळत नाहीत. मिळाली तर त्रोटक असतात. असे खूप इश्यू आहेत.'

'तू प्रोजेक्ट मॅनेजर आहेस. हे तुझे प्रॉब्लेम आहेत. उत्तरं दिली नाहीत तर सरळ फोन करा रात्री थांबून.'

'बरं!'.. जाता जाता सदाला वाटलं प्रोजेक्ट मॅनेजरला जादू येत असती तर किती बरं झालं असतं.

'आणि हे बघ! त्या स्टुअर्टचं ताजमहाल दर्शन मी कॅन्सल करतोय आता. तू सांग त्याला तसं!'

'आँ?....... मी?............... '

-- भाग-२ समाप्त --

Monday, January 14, 2013

तेथे पाहिजे जातीचे..

ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! सदानं घड्याळात पाहिलं.. सकाळचे १० वाजले होते. 'बायकोचा फोन असणार! श्या! आज काय विसरलं बरं? पण लँडलाईनवर कसा आला?'.. मेंदुला ताण देत सदा पुटपुटला. छातीची धडधड कारच्या २५ किमी वेगाइतकी झाली. त्यानं फोन घेतला. सदा प्रोजेक्ट मॅनेजर असला तरी घरची प्रोजेक्टं मॅनेज करणं म्हणजे मेदुवड्याच्या रेसिपीने बटाटेवडे करण्यातला प्रकार!

'हॅलो! सडॅ स्पेअर आहे का?'.. इंग्रजीतून विचारणा झाली. अमेरिकन उच्चार कळत होते.. स्वर थोडा वैतागलेला वाटत होता. बायकोचा फोन नाहीये म्हंटल्यावर सदाची धडधड कारच्या आयडलिंग इतकी कमी झाली.

'सदा सप्रे बोलतोय!'.. सदाला त्याच्या नावाचा उच्चारकल्लोळ फोन रोजचेच होते. 'अमेरिकेतून इतक्या आडवेळेला कसा फोन आला? कुठे आग लागलीये आता?' या विचारांनी त्याचं इंजिन ४० किमी वेगाने धडधडायला लागलं.

'मी स्टुअर्ट गुडइनफ बोलतोय!'

'आँ! तू कसा काय? विमान चुकलं काय तुझं?'.. सदाला आवाजातला आनंद लपवता नाही आला. धडधड परत आयडलिंग लेव्हलला आली. कुठल्याही प्रोजेक्ट मॅनेजरला खडूस क्लायंट न भेटण्यानं जितका आनंद होतो तितका घसघशीत बोनस मिळाल्यावर पण होत नाही.

'नाही. मी विमानतळावरूनच बोलतोय. मला न्यायला कुणी तरी येणार होतं ना?'.. परत इंजिनाने ४० किमी वेग पकडला!

'हो. मी पाठवलंय एकाला. ट्रॅफिक मधे अडकला असेल. पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे.. आय टेल यू.. ऊ हू हू हू हू! चारी दिशांना चौखूर उधळलेल्या गुरांमधून वाट काढावी लागते. कळेलंच तुला आता! पण काळजी करू नकोस. येईलच तो. थांब थोडा वेळ.'.. फोन खाली ठेवल्यावरही सदाला त्याच्या मनातले विचार स्वस्थ बसू देत नव्हते.. 'आयला! हा मूर्ख अभय कुठे उलथलाय? काही कामाचा नाही लेकाचा! क्लायंटला आणायचंय, बायकोला नाही म्हंटल्यावर जरा आधी नको का निघायला? स्वतःला राष्ट्रपती समजतो की काय केव्हाही निघायला? तेही पुण्याच्या ट्रॅफिकमधे?'

सदा धावत केबिनच्या बाहेर आला. अभय जागेवर नव्हता. त्याला संगिता मुळे तिच्या डेस्कवर कानात बोळे घालून, नेल पॉलिश लावत बसलेली दिसली. चॉकलेटी रंगाचा पंजाबी ड्रेस तिच्या सौंदर्यात भर टाकत होता. स्क्रीन वरती मुद्दामच उघडून ठेवलेला कोड पिएमटीच्या वेळापत्रका इतकाच दिखाऊ होता.

'संगिता! संगिता!'.. कानात ठणाणणार्‍या संगितामुळे संगिता मुळेला काहीही ऐकू आलं नाही. फक्त हात हलवणारा सदा दिसला.

'आँ? काय?'.. सावकाश बोळे काढत संगिता!

'गाडी आणली आहेस ना तू?'

'हो सर! मी नवीन गाडी घेतलीये आता. का?'

'अरे वा! कुठली?'

'काळी!'.. सदानं मनातल्या मनात कपाळावर हात मारला.

'छान! छान! बरं, आत्ता ताबडतोब विमानतळावर जा आणि स्टुअर्टला घेऊन ये. तो तिथे शंख फुंकत बसलाय!'

'सेम पिंच!'.. सदाच्या चॉकलेटी पँटीकडे बोट दाखवून संगिता चित्कारली. सदाच्या आठ्या दिसल्यावर तिला परिस्थितीचं गांभीर्य जाणवलं असावं.. 'पण सर अभय जाणार होता ना?'

'हो! तो कुठे तडमडलाय कुणास ठाऊक! मी ते शोधून काढतो. तू आधी सूट. च्यामारी! आल्या आल्या तो गुडइनफ गुरगुरणार.. यू आर नॉट गुडइनफ! साधं वेळेवर आणायला येता येत नाही, प्रोजेक्ट कसला वेळेवर करताय?'

'पण मी त्याला ओळखत नाही'

'अगं एका कागदावर नाव लिहून गेटपाशी जा! थांब मीच लिहून देतो'.. सदानं तिथल्याच एका कागदावर मोठ्या अक्षरात Mr. Goodenough असं खरडलं.

'कुठल्या गेटपाशी?'

'म्हसोबा गेटपाशी! हरे राम! अगं पुण्याच्या विमानतळाला तुझ्या घरापेक्षा कमी दारं आहेत. आणि हे बघ! तो कागद हातात धरून उभी रहा. नाहीतर पर्स मधे ठेऊन इकडे तिकडे बघत बसशील वेंधळ्यासारखी!'.. संगितानं सदाकडे एक रागीट नजर फेकली.

'सर, नेल पॉलिश अर्धवटच लागलंय!'.. संगिताला नेल पॉलिशच्या प्रोजेक्टची जास्त काळजी होती.

'असू दे! चालेल! निदान त्यामुळे त्याचा मूड चांगला झाला तर बरंच आहे.'

'हे कपडे चालतील? थोडे चुरगाळलेत'

'अगं तू काय लग्नाला चालली आहेस का? आणि तुला कुठलेही कपडे चांगले दिसतात. अगदी कपडे.......'.. एकदम काही तरी भलतंच बोलणार होतो याची जाणीव होऊन सदानं जीभ चावली.. तो थोडा गोरामोरा झाला. मग लगेच सावरून म्हणाला.. 'तुझ्या प्रश्नांसाठी तू आल्यावर एक मिटिंग करू. काय? पळ आता तू!'

तिला हाकलल्यावर त्याचं इंजिन आयडल झालं. तीही आनंदाने ऑफिसातून बाहेर पळाली. कामाच्या नावाखाली बाहेर उंडारायला तिला जास्त आवडायचं!

======================================================================
'हां! बोला सर!'.. संगिताला हाकलल्यावर सदानं घाईघाईनं अभयला फोन लावला.

'अरे कुठे आहेस तू? तिकडे स्टुअर्ट पिंजर्‍यातल्या माकडासारखा वर खाली उधळतोय.'

'आँ? तो पोचला इतक्यात?'

'इतक्यात काय? अजून थोडा वेळ गेला तर परत जायची वेळ होईल त्याची!'

'सर गाडी पंक्चर झालीये.'

'आरेsss! मग मला आधीच नाही का सांगायचं? की मी पंक्चर व्हायची तू वाट बघत होतास?'.. सदाच्या मनातला सर्व वैताग त्याच्या आवाजात उतरला होता.

'नाही सर! पंक्चरवाला म्हणाला लगेच काढतो म्हणून थांबलो! पण तो ट्यूब काढून कुठे गुल्ल झालाय कुणास ठाऊक! उशीर होतोय म्हंटल्यावर लगेच अ‍ॅडमिनच्या समीरला फोन करून जायला सांगितलं मी मगाशी!'.. सदाच्या वैतागात त्याला अंधारात ठेवल्याची भर पडली.

'नशीब माझं! आता दोन दोन माणसं एकाच माणसाला आणायला गेलीयेत. पण ठीक आहे. पंक्चर निघालं की सरळ इथे ये!'

======================================================================
'सप्रेसर! सायली म्याडमनी कागदं पाठवलीयेत!'.. रघू टेबलावर गठ्ठा ठेवत म्हणाला.

'बरं! मी बघतो'.. सदा कंप्युटर मधून डोकं न काढता म्हणाला. रघू गेल्यावर त्यानं अकाउंट्सला फोन लावला.

'हॅलो, सायली! मी सदा बोलतोय.'

'एक मिनीट हं सर!'.. सायलीने फोनवर हात ठेवला होता तरी तिची बडबड सदाला ऐकू येत होती. 'इथे ही एंट्री चुकीची आहे. एटी सीसी खाली हे डिडक्शन चालणारंच नाही. रिव्हर्स करा ती'... 'हं बोला सर'.. अनेक अकौंटिंग हेडांना क्रेडिट डेबिटचे नैवेद्य दाखवल्यावर सदाची एंट्री पास झाली.

'कशासाठी फोन केला होता बरं मी?....... हां! तुम्ही माझी मेडिकलची बिलं परत का पाठवलीयेत?'

'सर ती घेता नाही येणार!'

'का? जेन्युइन आहेत ती.'

'हो हो. पण ती चष्म्याची बिलं आहेत'

'हो. चष्म्याचीच आहेत. माझ्याच!'.. सदानं 'माझ्याच' वर जोर दिला.

'ऑफकोर्स सर! पण चष्म्याची बिलं मेडिकल मधे घेत नाही आपण!'

'व्हॉट? पण का?'

'चष्मा कसा मेडिकलमधे येईल?'

'मग किराणाभुसारात येणारे का? चष्मा आहे तो सायली! गॉगल नाहीये'.. सदाची चिडचिड ओसंडायला लागली.

'गॉगल तर नाहीच नाही चालणार'

'हे बघ. मेडिकल म्हणजे काये शेवटी? उपचारासाठी केलेला खर्च. चष्मा म्हणजे डोळ्यांचा उपचार नाही का?'

'सर ते पटतंय मला. पण आपल्या रूल्समधे ते बसत नाही.'.. आत्तापर्यंत सदाच्या डोक्याचं ऊर्ध्वपतन झालं होतं. अकौंट्सच्या लोकांकडून बिलं पास करून घेण्यापेक्षा शेळ्यांवरून उंट हाकणं सोप्पं असतं हे त्याला अनुभवाने माहिती झालं होतं.

'ठीके, मी बोबड्यांशी बोलतो.'.. बोबडे म्हणजे सायलीचा बॉस!

'Accountants know the cost of everything and the value of nothing'.. सदा फोन आपटून पुटपुटला.

======================================================================
केबिनच्या बाहेरच्या ठाक ठाक आवाजाने सदाला येणार्‍या संकटाची चाहूल लागली. ठकी येत होती. ठकी म्हणजे क्वालिटी डिपार्टमेंटची नवीन कन्सल्टन्ट, रेवती अय्यर! ती उंच टाचांचे बूट घालून ठाकठाक वाजवत चालते म्हणून इरसाल लोकांनी तिची ठकी केली होती!

'थोडा वेळ आहे का?' ठकीने दारातून स्मितहास्य करत विचारलं. ते बनावट आहे हे समजायला कुणाच्याही रिव्ह्यूची गरज नव्हती. सदाने डोकं वर केलं. काळ्या रंगाच्या स्कर्टावर तांबड्या रंगाचा टॉप घातलेली हरिणाक्षी रेवती दारात पाहिल्यावर सदाने २० किमी वेग पकडला.

'आज जरा मी बिझी आहे, आमचा क्लायंट येऊ घातलाय'.. सदाला आज बंडला मारायची गरज नव्हती.

'क्वालिटीचं काम म्हंटलं ना की कुणाला कध्धीच वेळ नसतो बघा!'

'नाही नाही! असं कसं म्हणता तुम्ही? मला खरच वेळ नसतो हो! तुम्हाला माहिती आहे ना? प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे जो सगळ्यांच्या आधी येतो आणि सगळ्यात शेवटी जातो तो!'.. तिला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट वगैरे गोष्टी फारशा माहीत नाहीत हे सदाला समजलेलं असल्यामुळे सगळेच तिला त्या खिंडीत पकडायला बघायचे.

'तुम्ही म्हणाला होतात आज बसू या म्हणून आले! तुमच्या ग्रुपचं प्रोसिजर्स लिहायचं काम कुठपर्यंत आलं आहे ते बघायचं होतं आणि आता आठच दिवस उरलेत!'

'अजून सुरुवात पण नाही झाली हो! बाकीच्यांच्या झाल्या?'

'हो! संपतच आलंय काम जवळ जवळ'.. आता सदाचा वेग ४० किमी झाला.

'असं? कमाल आहे. मधे मी बाकीच्या मॅनेजरांशी बोललो तेव्हा ते म्हणाले अजून कशाचाच पत्ता नाही म्हणून'

'छे हो! उलट त्यांनी मला सांगितलं ९०% काम होत आलंय म्हणून.'.. ९०% झालंय म्हंटल्यावर सदा आयडल मोडमधे आला. कारण त्यांच्या भाषेत ९०% काम झालंय म्हणजे काहीच झालेलं नाही असा अर्थ व्हायचा.

'कजरारे, कजरारे तेरे कारे कारे नैना!' सदाच्या मोबाईलला कंठ फुटला आणि सदा दचकला व रेवती थक्क झाली. 'आयला! हा रिंगटोन कुणी सेट केला? माझी कार्टी असणार, दुसरं कोण? माझ्यापेक्षा तीच जास्त मोबाईलशी खेळते'.. गोंधळलेल्या सदानं एक कारण पुढे केलं. या वेळेला मात्र फोनवर बायकोच होती.

'काय नाव तुमच्या मुलीचं?'.. रेवतीला मनापासून हसू आलं.

'नीता! एक्स्यूज मी!'.. मग फोनमधे तोंड घालून बनावट उत्साहाने म्हणाला.. 'बोल बायको'

'कामात आहेस का?'.. सदा एकदम वैतागला. हा काय प्रश्न झाला? ऑफिसात कामातच असणार, नाहीतर काय मंडईतले भाव विचारत फिरणारे का? चूक त्याच्या बायकोची नव्हती. ती आरटीओत असल्यामुळे तिथे कुणी कामात असणं हे पुण्यात बर्फ पडण्याइतकं दुर्मीळ होतं.

'नाही. रेवतीशी शिळोप्याच्या गप्पा मारतोय.'

'अरे तू वॉशिंग मशीन चालू केलंस का ते विचारायला फोन केला मी!'... सदाच्या डोळ्या समोर सुमारे सत्तावीस तारे चमकले.

'आईssssशप्पत!'

'विसरलास ना? तरी मी सांगत होते. मी करून जाईन म्हणून! तुला काही सांगायचं म्हणजे! श्या! काय हे? नीताचा ड्रेस आज धुवायलाच हवा होता. उद्या तिला तो हवाय नाटकासाठी हे माहिती होतं तुला. हॅ! सगळा गोंधळ केलास!'

'बोंबला! आता काय करायचं?'

'आता बघते मी काय करायचं ते! उद्या तरी घरी लवकर येणारेस का? नीताचं नाटक आहे संध्याकाळी ७ वाजता'

'अरे बापरे! उद्या नाही जमायचं गं! क्लायंटला घेऊन जेवायला जायचंय'.. धाडकन फोन आदळला गेला.

ओशाळवाणं हसत रेवतीला म्हणाला.. 'हॅ! हॅ! नेहमीचा गोंधळ आहे! तुझा नवरा विसरतो की नाही असल्या गोष्टी?'

'माझा डायव्होर्स झालाय २ वर्षांपूर्वी!'.. ती निर्विकारपणे म्हणाली.

'ओह! आयॅम सो सॉरी!'.. सदाला तिच्या भावना दुखावल्याची टोचणी लागली.. 'इतरांचं ९०% काम झालंय का? ठीके! क्लायंट गेला ना, पुढल्या आठवड्यात, की आम्ही पण जोर लावतो'

'बघा! सोमवार पर्यंत काय ते नक्की सांगा! राकेश बरोबर मिटिंग आहे सोमवारी'.. राकेश पांडे हा कंपनीचा सीईओ असल्यामुळे ते वर वर साधं वाटणारं वाक्य एक गर्भित धमकी आहे हे समजायची अक्कल सदाला नक्कीच होती.

======================================================================
ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग!

'हॅलो, सदा सप्रे बोलतोय!'

'सप्रेसर! ते गुडनाईट सापडत नाहीयेत. बराच वेळ झाला, शोधतोय त्यांना'.. समीरचा काकुळतीला आलेल्या आवाजातला फोन आला.

'आरे तू भलत्याच माणसाला शोधत बसलास तर कसा सापडेल तो? त्याचं नाव गुडनाईट नाही. गुडइनफ आहे रे बाबा! गुड इनफ! कागदावर काय लिहीलंयस?'

'गुडइनफचं लिहीलंय सर! सॉरी!'

'बघ तो तिथे कॉफी वगैरे पीत बसला असेल, शोध जरा त्याला. तो तिथेच आहे. फोन आला होता त्याचा मला मगाशी'

'बरं परत एकदा बघतो'

'एक मिनीट, एक मिनीट थांब जरा!'.. सदानं कॉरिडॉरमधून येणार्‍या व्यक्तीकडे नीट निरखून पाहीलं. तो स्टुअर्ट गुडइनफच होता.. 'हॅलो समीर! तू ये निघून! तो ऑफिसातच आलेला दिसतोय मला, बाय'.. फोन ठेवून सदा त्याच्या स्वागताला धावला.

'हॅल्लो स्टुअर्ट! हौयू डुइन?'

'मी बराय! थँक्स! तू कसा आहेस?'

'गुड! गुड! गुड टू सी यू अगेन! पण तू कसा आलास इथे? आणि माझ्या माणसाला कसा चुकवलास तू? हा हा हा!'

'तू खरच पाठवला होतास का? हा हा हा!'.. त्याचं वाक्य सदाला एक कळ देऊन गेलं.

'अरे म्हणजे काय? आत्ताच त्याचा फोन आला होता. तू सापडत नाही म्हणाला.'

'अरे! तू सिरीयस नको होऊस रे! आय वॉज किडिंग! खरं म्हणजे मला कंटाळा आला तिथं. नेट पण चालत नव्हतं. मग मी सरळ टॅक्सी घेऊन आलो इथे.'

'असो. तू पोचलास ते महत्वाचं आहे. चल! तुला तुझी बसायची जागा दाखवतो. सेटल हो! मग दुपारी आपण चर्चा करू. काय?'

'ओके'

केबिनमधे येऊन सदाने कंप्युटर अ‍ॅडमिन बघणार्‍या विकासला फोन लावला.. 'हॅलो विकास! आमचा क्लायंट आलाय इथे. तुला सांगितलं होतं ना मागच्या आठवड्यात, तो! तर त्याच्या लॅपटॉपचा नेटवर्क सेटप करून दे. काय? प्लीज!'

'येस सर! पण त्यांचे अ‍ॅडॉप्टर वेगळेच असतात सर! मागच्या वेळेला आठवतंय का? तो कोण आला होता त्याचं कार्ड कंपॅटिबल नव्हतं!'

'अ‍ॅडॉप्टर वेगळे असू शकतात. पण त्या वेळेला तर तुझं सेटिंग चुकलं होतं ना?'

'नाही! तो नाही! तो वेगळा! त्याच्या नंतर एक आला होता बघा!'

'बरं ते असू दे! तू ह्याचं बघ तर आधी!'

'ओके सर!'.. त्यानं फोन ठेवला आणि संगिता एका परदेशी माणसाला घेऊन केबिन मधे घुसली. माणूस तर अजिबातच ओळखीचा नव्हता. तो कोण आहे हे विचारायला सदाने तोंड उघडायच्या आधीच संगिताने विजयी मुद्रेनं ओळख करून दिली.. 'सर! मीट मिस्टर गुडइनफ!'

'संगिता! कुणाला उचलून आणलंयस तू? आणि हे काय? साडी कधी घातलीस तू?'.. काही झालं तरी सदा दोन दोन गुडइनफ, मग ते कितीही गुडइनफ असले तरी, सहन करणं शक्य नव्हतं.

'साडी घालत नाहीत सर! नेसतात!'..

'तेच ते!'

'सर! घर रस्त्यावरच आहे ना विमानतळाच्या! म्हणून मी पटकन कपडे बदलून जावं म्हंटलं. आधीचे चुरगाळले होते सर!'

'ते मरू दे! ह्याचं सांग!'

'तेच तर सांगतेय! मी गेटवर उभी होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक माणूस माझ्याकडे सारखा बघतोय. मग मी त्याला जाऊन विचारलं.. आर्यू गुडइनफ? तर तो म्हणाला येस! मग मी त्याला गाडीत घातला आणि आणला इथे. काही प्रॉब्लेम झाला का? हा नाहीये का तो?'

'खरं तर मी तिला गमतीत म्हणालो की आयॅम गुडइनफ फॉ यू! तर ती म्हणाली चल माझ्याबरोबर! गाडीत तिला मी सांगत होतो की काहीतरी घोटाळा झालाय तुझा, पण तिनं ऐकलंच नाही'

'सर, त्याचा अ‍ॅक्सेंट मला काही कळत नाही. मी फक्त आय सी, व्हेरी गुड असलं काही तरी बरळत होते. कधी एकदाचं ऑफिस गाठतेय असं मला झालं होतं.'

'आयॅम सॉरी सर! देअर अपिअर्स टुबी सम कन्फ्युजन सर! तुला कुठे जायचं आहे तिथे सोडायची व्यवस्था करतो मी'.. सदाने शरमलेल्या आवाजात त्याची बोळवण केली.

--- समाप्त ---