Monday, January 14, 2013

तेथे पाहिजे जातीचे..

ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! सदानं घड्याळात पाहिलं.. सकाळचे १० वाजले होते. 'बायकोचा फोन असणार! श्या! आज काय विसरलं बरं? पण लँडलाईनवर कसा आला?'.. मेंदुला ताण देत सदा पुटपुटला. छातीची धडधड कारच्या २५ किमी वेगाइतकी झाली. त्यानं फोन घेतला. सदा प्रोजेक्ट मॅनेजर असला तरी घरची प्रोजेक्टं मॅनेज करणं म्हणजे मेदुवड्याच्या रेसिपीने बटाटेवडे करण्यातला प्रकार!

'हॅलो! सडॅ स्पेअर आहे का?'.. इंग्रजीतून विचारणा झाली. अमेरिकन उच्चार कळत होते.. स्वर थोडा वैतागलेला वाटत होता. बायकोचा फोन नाहीये म्हंटल्यावर सदाची धडधड कारच्या आयडलिंग इतकी कमी झाली.

'सदा सप्रे बोलतोय!'.. सदाला त्याच्या नावाचा उच्चारकल्लोळ फोन रोजचेच होते. 'अमेरिकेतून इतक्या आडवेळेला कसा फोन आला? कुठे आग लागलीये आता?' या विचारांनी त्याचं इंजिन ४० किमी वेगाने धडधडायला लागलं.

'मी स्टुअर्ट गुडइनफ बोलतोय!'

'आँ! तू कसा काय? विमान चुकलं काय तुझं?'.. सदाला आवाजातला आनंद लपवता नाही आला. धडधड परत आयडलिंग लेव्हलला आली. कुठल्याही प्रोजेक्ट मॅनेजरला खडूस क्लायंट न भेटण्यानं जितका आनंद होतो तितका घसघशीत बोनस मिळाल्यावर पण होत नाही.

'नाही. मी विमानतळावरूनच बोलतोय. मला न्यायला कुणी तरी येणार होतं ना?'.. परत इंजिनाने ४० किमी वेग पकडला!

'हो. मी पाठवलंय एकाला. ट्रॅफिक मधे अडकला असेल. पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे.. आय टेल यू.. ऊ हू हू हू हू! चारी दिशांना चौखूर उधळलेल्या गुरांमधून वाट काढावी लागते. कळेलंच तुला आता! पण काळजी करू नकोस. येईलच तो. थांब थोडा वेळ.'.. फोन खाली ठेवल्यावरही सदाला त्याच्या मनातले विचार स्वस्थ बसू देत नव्हते.. 'आयला! हा मूर्ख अभय कुठे उलथलाय? काही कामाचा नाही लेकाचा! क्लायंटला आणायचंय, बायकोला नाही म्हंटल्यावर जरा आधी नको का निघायला? स्वतःला राष्ट्रपती समजतो की काय केव्हाही निघायला? तेही पुण्याच्या ट्रॅफिकमधे?'

सदा धावत केबिनच्या बाहेर आला. अभय जागेवर नव्हता. त्याला संगिता मुळे तिच्या डेस्कवर कानात बोळे घालून, नेल पॉलिश लावत बसलेली दिसली. चॉकलेटी रंगाचा पंजाबी ड्रेस तिच्या सौंदर्यात भर टाकत होता. स्क्रीन वरती मुद्दामच उघडून ठेवलेला कोड पिएमटीच्या वेळापत्रका इतकाच दिखाऊ होता.

'संगिता! संगिता!'.. कानात ठणाणणार्‍या संगितामुळे संगिता मुळेला काहीही ऐकू आलं नाही. फक्त हात हलवणारा सदा दिसला.

'आँ? काय?'.. सावकाश बोळे काढत संगिता!

'गाडी आणली आहेस ना तू?'

'हो सर! मी नवीन गाडी घेतलीये आता. का?'

'अरे वा! कुठली?'

'काळी!'.. सदानं मनातल्या मनात कपाळावर हात मारला.

'छान! छान! बरं, आत्ता ताबडतोब विमानतळावर जा आणि स्टुअर्टला घेऊन ये. तो तिथे शंख फुंकत बसलाय!'

'सेम पिंच!'.. सदाच्या चॉकलेटी पँटीकडे बोट दाखवून संगिता चित्कारली. सदाच्या आठ्या दिसल्यावर तिला परिस्थितीचं गांभीर्य जाणवलं असावं.. 'पण सर अभय जाणार होता ना?'

'हो! तो कुठे तडमडलाय कुणास ठाऊक! मी ते शोधून काढतो. तू आधी सूट. च्यामारी! आल्या आल्या तो गुडइनफ गुरगुरणार.. यू आर नॉट गुडइनफ! साधं वेळेवर आणायला येता येत नाही, प्रोजेक्ट कसला वेळेवर करताय?'

'पण मी त्याला ओळखत नाही'

'अगं एका कागदावर नाव लिहून गेटपाशी जा! थांब मीच लिहून देतो'.. सदानं तिथल्याच एका कागदावर मोठ्या अक्षरात Mr. Goodenough असं खरडलं.

'कुठल्या गेटपाशी?'

'म्हसोबा गेटपाशी! हरे राम! अगं पुण्याच्या विमानतळाला तुझ्या घरापेक्षा कमी दारं आहेत. आणि हे बघ! तो कागद हातात धरून उभी रहा. नाहीतर पर्स मधे ठेऊन इकडे तिकडे बघत बसशील वेंधळ्यासारखी!'.. संगितानं सदाकडे एक रागीट नजर फेकली.

'सर, नेल पॉलिश अर्धवटच लागलंय!'.. संगिताला नेल पॉलिशच्या प्रोजेक्टची जास्त काळजी होती.

'असू दे! चालेल! निदान त्यामुळे त्याचा मूड चांगला झाला तर बरंच आहे.'

'हे कपडे चालतील? थोडे चुरगाळलेत'

'अगं तू काय लग्नाला चालली आहेस का? आणि तुला कुठलेही कपडे चांगले दिसतात. अगदी कपडे.......'.. एकदम काही तरी भलतंच बोलणार होतो याची जाणीव होऊन सदानं जीभ चावली.. तो थोडा गोरामोरा झाला. मग लगेच सावरून म्हणाला.. 'तुझ्या प्रश्नांसाठी तू आल्यावर एक मिटिंग करू. काय? पळ आता तू!'

तिला हाकलल्यावर त्याचं इंजिन आयडल झालं. तीही आनंदाने ऑफिसातून बाहेर पळाली. कामाच्या नावाखाली बाहेर उंडारायला तिला जास्त आवडायचं!

======================================================================
'हां! बोला सर!'.. संगिताला हाकलल्यावर सदानं घाईघाईनं अभयला फोन लावला.

'अरे कुठे आहेस तू? तिकडे स्टुअर्ट पिंजर्‍यातल्या माकडासारखा वर खाली उधळतोय.'

'आँ? तो पोचला इतक्यात?'

'इतक्यात काय? अजून थोडा वेळ गेला तर परत जायची वेळ होईल त्याची!'

'सर गाडी पंक्चर झालीये.'

'आरेsss! मग मला आधीच नाही का सांगायचं? की मी पंक्चर व्हायची तू वाट बघत होतास?'.. सदाच्या मनातला सर्व वैताग त्याच्या आवाजात उतरला होता.

'नाही सर! पंक्चरवाला म्हणाला लगेच काढतो म्हणून थांबलो! पण तो ट्यूब काढून कुठे गुल्ल झालाय कुणास ठाऊक! उशीर होतोय म्हंटल्यावर लगेच अ‍ॅडमिनच्या समीरला फोन करून जायला सांगितलं मी मगाशी!'.. सदाच्या वैतागात त्याला अंधारात ठेवल्याची भर पडली.

'नशीब माझं! आता दोन दोन माणसं एकाच माणसाला आणायला गेलीयेत. पण ठीक आहे. पंक्चर निघालं की सरळ इथे ये!'

======================================================================
'सप्रेसर! सायली म्याडमनी कागदं पाठवलीयेत!'.. रघू टेबलावर गठ्ठा ठेवत म्हणाला.

'बरं! मी बघतो'.. सदा कंप्युटर मधून डोकं न काढता म्हणाला. रघू गेल्यावर त्यानं अकाउंट्सला फोन लावला.

'हॅलो, सायली! मी सदा बोलतोय.'

'एक मिनीट हं सर!'.. सायलीने फोनवर हात ठेवला होता तरी तिची बडबड सदाला ऐकू येत होती. 'इथे ही एंट्री चुकीची आहे. एटी सीसी खाली हे डिडक्शन चालणारंच नाही. रिव्हर्स करा ती'... 'हं बोला सर'.. अनेक अकौंटिंग हेडांना क्रेडिट डेबिटचे नैवेद्य दाखवल्यावर सदाची एंट्री पास झाली.

'कशासाठी फोन केला होता बरं मी?....... हां! तुम्ही माझी मेडिकलची बिलं परत का पाठवलीयेत?'

'सर ती घेता नाही येणार!'

'का? जेन्युइन आहेत ती.'

'हो हो. पण ती चष्म्याची बिलं आहेत'

'हो. चष्म्याचीच आहेत. माझ्याच!'.. सदानं 'माझ्याच' वर जोर दिला.

'ऑफकोर्स सर! पण चष्म्याची बिलं मेडिकल मधे घेत नाही आपण!'

'व्हॉट? पण का?'

'चष्मा कसा मेडिकलमधे येईल?'

'मग किराणाभुसारात येणारे का? चष्मा आहे तो सायली! गॉगल नाहीये'.. सदाची चिडचिड ओसंडायला लागली.

'गॉगल तर नाहीच नाही चालणार'

'हे बघ. मेडिकल म्हणजे काये शेवटी? उपचारासाठी केलेला खर्च. चष्मा म्हणजे डोळ्यांचा उपचार नाही का?'

'सर ते पटतंय मला. पण आपल्या रूल्समधे ते बसत नाही.'.. आत्तापर्यंत सदाच्या डोक्याचं ऊर्ध्वपतन झालं होतं. अकौंट्सच्या लोकांकडून बिलं पास करून घेण्यापेक्षा शेळ्यांवरून उंट हाकणं सोप्पं असतं हे त्याला अनुभवाने माहिती झालं होतं.

'ठीके, मी बोबड्यांशी बोलतो.'.. बोबडे म्हणजे सायलीचा बॉस!

'Accountants know the cost of everything and the value of nothing'.. सदा फोन आपटून पुटपुटला.

======================================================================
केबिनच्या बाहेरच्या ठाक ठाक आवाजाने सदाला येणार्‍या संकटाची चाहूल लागली. ठकी येत होती. ठकी म्हणजे क्वालिटी डिपार्टमेंटची नवीन कन्सल्टन्ट, रेवती अय्यर! ती उंच टाचांचे बूट घालून ठाकठाक वाजवत चालते म्हणून इरसाल लोकांनी तिची ठकी केली होती!

'थोडा वेळ आहे का?' ठकीने दारातून स्मितहास्य करत विचारलं. ते बनावट आहे हे समजायला कुणाच्याही रिव्ह्यूची गरज नव्हती. सदाने डोकं वर केलं. काळ्या रंगाच्या स्कर्टावर तांबड्या रंगाचा टॉप घातलेली हरिणाक्षी रेवती दारात पाहिल्यावर सदाने २० किमी वेग पकडला.

'आज जरा मी बिझी आहे, आमचा क्लायंट येऊ घातलाय'.. सदाला आज बंडला मारायची गरज नव्हती.

'क्वालिटीचं काम म्हंटलं ना की कुणाला कध्धीच वेळ नसतो बघा!'

'नाही नाही! असं कसं म्हणता तुम्ही? मला खरच वेळ नसतो हो! तुम्हाला माहिती आहे ना? प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे जो सगळ्यांच्या आधी येतो आणि सगळ्यात शेवटी जातो तो!'.. तिला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट वगैरे गोष्टी फारशा माहीत नाहीत हे सदाला समजलेलं असल्यामुळे सगळेच तिला त्या खिंडीत पकडायला बघायचे.

'तुम्ही म्हणाला होतात आज बसू या म्हणून आले! तुमच्या ग्रुपचं प्रोसिजर्स लिहायचं काम कुठपर्यंत आलं आहे ते बघायचं होतं आणि आता आठच दिवस उरलेत!'

'अजून सुरुवात पण नाही झाली हो! बाकीच्यांच्या झाल्या?'

'हो! संपतच आलंय काम जवळ जवळ'.. आता सदाचा वेग ४० किमी झाला.

'असं? कमाल आहे. मधे मी बाकीच्या मॅनेजरांशी बोललो तेव्हा ते म्हणाले अजून कशाचाच पत्ता नाही म्हणून'

'छे हो! उलट त्यांनी मला सांगितलं ९०% काम होत आलंय म्हणून.'.. ९०% झालंय म्हंटल्यावर सदा आयडल मोडमधे आला. कारण त्यांच्या भाषेत ९०% काम झालंय म्हणजे काहीच झालेलं नाही असा अर्थ व्हायचा.

'कजरारे, कजरारे तेरे कारे कारे नैना!' सदाच्या मोबाईलला कंठ फुटला आणि सदा दचकला व रेवती थक्क झाली. 'आयला! हा रिंगटोन कुणी सेट केला? माझी कार्टी असणार, दुसरं कोण? माझ्यापेक्षा तीच जास्त मोबाईलशी खेळते'.. गोंधळलेल्या सदानं एक कारण पुढे केलं. या वेळेला मात्र फोनवर बायकोच होती.

'काय नाव तुमच्या मुलीचं?'.. रेवतीला मनापासून हसू आलं.

'नीता! एक्स्यूज मी!'.. मग फोनमधे तोंड घालून बनावट उत्साहाने म्हणाला.. 'बोल बायको'

'कामात आहेस का?'.. सदा एकदम वैतागला. हा काय प्रश्न झाला? ऑफिसात कामातच असणार, नाहीतर काय मंडईतले भाव विचारत फिरणारे का? चूक त्याच्या बायकोची नव्हती. ती आरटीओत असल्यामुळे तिथे कुणी कामात असणं हे पुण्यात बर्फ पडण्याइतकं दुर्मीळ होतं.

'नाही. रेवतीशी शिळोप्याच्या गप्पा मारतोय.'

'अरे तू वॉशिंग मशीन चालू केलंस का ते विचारायला फोन केला मी!'... सदाच्या डोळ्या समोर सुमारे सत्तावीस तारे चमकले.

'आईssssशप्पत!'

'विसरलास ना? तरी मी सांगत होते. मी करून जाईन म्हणून! तुला काही सांगायचं म्हणजे! श्या! काय हे? नीताचा ड्रेस आज धुवायलाच हवा होता. उद्या तिला तो हवाय नाटकासाठी हे माहिती होतं तुला. हॅ! सगळा गोंधळ केलास!'

'बोंबला! आता काय करायचं?'

'आता बघते मी काय करायचं ते! उद्या तरी घरी लवकर येणारेस का? नीताचं नाटक आहे संध्याकाळी ७ वाजता'

'अरे बापरे! उद्या नाही जमायचं गं! क्लायंटला घेऊन जेवायला जायचंय'.. धाडकन फोन आदळला गेला.

ओशाळवाणं हसत रेवतीला म्हणाला.. 'हॅ! हॅ! नेहमीचा गोंधळ आहे! तुझा नवरा विसरतो की नाही असल्या गोष्टी?'

'माझा डायव्होर्स झालाय २ वर्षांपूर्वी!'.. ती निर्विकारपणे म्हणाली.

'ओह! आयॅम सो सॉरी!'.. सदाला तिच्या भावना दुखावल्याची टोचणी लागली.. 'इतरांचं ९०% काम झालंय का? ठीके! क्लायंट गेला ना, पुढल्या आठवड्यात, की आम्ही पण जोर लावतो'

'बघा! सोमवार पर्यंत काय ते नक्की सांगा! राकेश बरोबर मिटिंग आहे सोमवारी'.. राकेश पांडे हा कंपनीचा सीईओ असल्यामुळे ते वर वर साधं वाटणारं वाक्य एक गर्भित धमकी आहे हे समजायची अक्कल सदाला नक्कीच होती.

======================================================================
ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग!

'हॅलो, सदा सप्रे बोलतोय!'

'सप्रेसर! ते गुडनाईट सापडत नाहीयेत. बराच वेळ झाला, शोधतोय त्यांना'.. समीरचा काकुळतीला आलेल्या आवाजातला फोन आला.

'आरे तू भलत्याच माणसाला शोधत बसलास तर कसा सापडेल तो? त्याचं नाव गुडनाईट नाही. गुडइनफ आहे रे बाबा! गुड इनफ! कागदावर काय लिहीलंयस?'

'गुडइनफचं लिहीलंय सर! सॉरी!'

'बघ तो तिथे कॉफी वगैरे पीत बसला असेल, शोध जरा त्याला. तो तिथेच आहे. फोन आला होता त्याचा मला मगाशी'

'बरं परत एकदा बघतो'

'एक मिनीट, एक मिनीट थांब जरा!'.. सदानं कॉरिडॉरमधून येणार्‍या व्यक्तीकडे नीट निरखून पाहीलं. तो स्टुअर्ट गुडइनफच होता.. 'हॅलो समीर! तू ये निघून! तो ऑफिसातच आलेला दिसतोय मला, बाय'.. फोन ठेवून सदा त्याच्या स्वागताला धावला.

'हॅल्लो स्टुअर्ट! हौयू डुइन?'

'मी बराय! थँक्स! तू कसा आहेस?'

'गुड! गुड! गुड टू सी यू अगेन! पण तू कसा आलास इथे? आणि माझ्या माणसाला कसा चुकवलास तू? हा हा हा!'

'तू खरच पाठवला होतास का? हा हा हा!'.. त्याचं वाक्य सदाला एक कळ देऊन गेलं.

'अरे म्हणजे काय? आत्ताच त्याचा फोन आला होता. तू सापडत नाही म्हणाला.'

'अरे! तू सिरीयस नको होऊस रे! आय वॉज किडिंग! खरं म्हणजे मला कंटाळा आला तिथं. नेट पण चालत नव्हतं. मग मी सरळ टॅक्सी घेऊन आलो इथे.'

'असो. तू पोचलास ते महत्वाचं आहे. चल! तुला तुझी बसायची जागा दाखवतो. सेटल हो! मग दुपारी आपण चर्चा करू. काय?'

'ओके'

केबिनमधे येऊन सदाने कंप्युटर अ‍ॅडमिन बघणार्‍या विकासला फोन लावला.. 'हॅलो विकास! आमचा क्लायंट आलाय इथे. तुला सांगितलं होतं ना मागच्या आठवड्यात, तो! तर त्याच्या लॅपटॉपचा नेटवर्क सेटप करून दे. काय? प्लीज!'

'येस सर! पण त्यांचे अ‍ॅडॉप्टर वेगळेच असतात सर! मागच्या वेळेला आठवतंय का? तो कोण आला होता त्याचं कार्ड कंपॅटिबल नव्हतं!'

'अ‍ॅडॉप्टर वेगळे असू शकतात. पण त्या वेळेला तर तुझं सेटिंग चुकलं होतं ना?'

'नाही! तो नाही! तो वेगळा! त्याच्या नंतर एक आला होता बघा!'

'बरं ते असू दे! तू ह्याचं बघ तर आधी!'

'ओके सर!'.. त्यानं फोन ठेवला आणि संगिता एका परदेशी माणसाला घेऊन केबिन मधे घुसली. माणूस तर अजिबातच ओळखीचा नव्हता. तो कोण आहे हे विचारायला सदाने तोंड उघडायच्या आधीच संगिताने विजयी मुद्रेनं ओळख करून दिली.. 'सर! मीट मिस्टर गुडइनफ!'

'संगिता! कुणाला उचलून आणलंयस तू? आणि हे काय? साडी कधी घातलीस तू?'.. काही झालं तरी सदा दोन दोन गुडइनफ, मग ते कितीही गुडइनफ असले तरी, सहन करणं शक्य नव्हतं.

'साडी घालत नाहीत सर! नेसतात!'..

'तेच ते!'

'सर! घर रस्त्यावरच आहे ना विमानतळाच्या! म्हणून मी पटकन कपडे बदलून जावं म्हंटलं. आधीचे चुरगाळले होते सर!'

'ते मरू दे! ह्याचं सांग!'

'तेच तर सांगतेय! मी गेटवर उभी होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक माणूस माझ्याकडे सारखा बघतोय. मग मी त्याला जाऊन विचारलं.. आर्यू गुडइनफ? तर तो म्हणाला येस! मग मी त्याला गाडीत घातला आणि आणला इथे. काही प्रॉब्लेम झाला का? हा नाहीये का तो?'

'खरं तर मी तिला गमतीत म्हणालो की आयॅम गुडइनफ फॉ यू! तर ती म्हणाली चल माझ्याबरोबर! गाडीत तिला मी सांगत होतो की काहीतरी घोटाळा झालाय तुझा, पण तिनं ऐकलंच नाही'

'सर, त्याचा अ‍ॅक्सेंट मला काही कळत नाही. मी फक्त आय सी, व्हेरी गुड असलं काही तरी बरळत होते. कधी एकदाचं ऑफिस गाठतेय असं मला झालं होतं.'

'आयॅम सॉरी सर! देअर अपिअर्स टुबी सम कन्फ्युजन सर! तुला कुठे जायचं आहे तिथे सोडायची व्यवस्था करतो मी'.. सदाने शरमलेल्या आवाजात त्याची बोळवण केली.

--- समाप्त ---