Tuesday, August 7, 2012

इंग्लंड मधील भत्ताचारी लोक!

न्यूटन, स्टिफन हॉकिंग, बेअर्ड, ग्रॅहॅम बेल, मॅक्सवेल, डार्विन या सारख्या शास्त्रज्ञांचा, शॅकल्टन, कॅप्टन कुक सारख्या धाडशी माणसांचा व चॅप्लिन, ज्युली अँड्र्यूज सारख्या अभिनेत्यांचा इंग्लंड हा देश असल्यामुळे मला इंग्लंड मधे यायच्या आधी आणि आल्यानंतर काही दिवस इथल्या प्रत्येक माणसाबद्दल प्रचंड आदर वगैरे वाटायचा. इथले सर्व लोक प्रचंड हुशार, कामसू व प्रामाणिक असतील हा गैरसमज त्यातूनच झालेला!

नंतर ऑफिसातल्या लोकांचं वर्तन, पेपरातल्या बातम्या, टाटांनी मारलेली चपराक पहाता इतकं समजलं की मोजके लोक सोडता बाकीचे कामाच्या नावाखाली टाईमपासच करीत असतात. तसं हे विशेष नाही कारण जगात सगळीकडे साधारण अशीच परिस्थिती आहे.

मग विशेष काय आहे? विशेष आहे तो एक ऐतखाऊ कामचुकार समाज! या समाजातले लोक पिढ्यान पिढ्या काम न करता, आयुष्यभर शिट्ट्या मारत आरामात फिरतात. ते सगळे लोक म्युन्सिपाल्टीने दिलेल्या घरात रहातात. अशी घरं पुरविण्याचा म्युन्सिपाल्टींचा खर्च वर्षाला सुमारे २१ बिल्यन पौंड (१६८ हजार कोटी रुपये (१)) आहे. एक सहा मुलांची अविवाहीत आई महिन्याला सुमारे साडेपाच लाख रुपये भाड्याच्या व सुमारे १६ कोटी रुपयांच्या अलिशान घरात रहाते. हे सगळे पैसे अर्थातच करदात्यांच्या खिशातून येतात. नोकरदार सामान्य माणूस असली घरं फक्त स्वप्नातच बघू शकतो. त्यामुळेच आपण भरलेल्या करांवर आपल्याला न परवडणार्‍या घरात हे ऐतखाऊ आनंदाने रहाताना बघून त्याचा किती संताप होईल त्याची कल्पनाच केलेली बरी!

हे लोक तर्‍हेतर्‍हेच्या सरकारी भत्त्यांवर जगतात, म्हणूनच मी त्यांना भत्ताचारी म्हणतो. वरती दिला आहे तो घरभत्ता! असाच बेकारभत्ता पण असतो. बेकारभत्ता बहुतेक सगळ्या पाश्चात्य देशात मिळतो, पण इथले लोक बेकारभत्ता चालू ठेवण्यासाठी काहीना काही कारणाखाली देऊ केलेलं काम करायचं टाळतात. सध्या २५ वर्षाच्या खालच्या लोकांना आठवड्याला सुमारे साडेचार हजार रुपये तर २५च्या वरती सुमारे साडेपाच हजार रुपये इतका बेकारभत्ता आहे.

शिवाय 'मूल भत्ता' म्हणून एक भत्ता पण असतो. पैशाविना मुलांच्या काळजीत कमी पडू नये या उदात्त हेतुने तो देण्यात येतो. मूल १६ वर्षांचं होईपर्यंत तो मिळतो. पहिल्या मुलासाठी आठवड्याला सुमारे १६०० रुपये तर पुढच्या प्रत्येक मुलासाठी आठवड्याला सुमारे ११०० रुपये इतका तो आहे. साहजिकच या लोकांचा कल जास्त मुलं पैदा करण्याकडे असतो. या शिवाय गर्भारपणात स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी वेगळे पैसे मिळतात. इथल्या सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार १० पोरं असलेलं कुटुंब वर्षाला सुमारे ४८ लाखांपेक्षा जास्त रुपये विविध भत्त्यांपोटी कमवू शकतात.

नंतर येतो तो 'अक्षमता भत्ता' म्हणजे जे लोक काही कारणामुळे काम करण्यास असमर्थ आहेत अशा लोकांना दिलेला भत्ता! थापा मारून याचाही लोक फायदा घेतात. एक बाई आपल्याला क्रचेस घेतल्याशिवाय चालताच येत नाही आणि १० मीटर चालल्यावर प्रचंड वेदना होतात अशा बंडला मारून तो भत्ता घेत होती. रोलरकोस्टरची राईड घेतानाचे तिचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर तिला मिळालेले पैसे परत करायला लागले.

बाकी रहातो तो वेळी अवेळी लागणारा डॉक्टरांचा व औषधपाण्याचा खर्च! इंग्लंड मधे रहाणार्‍या सर्वांना डॉक्टरांचा काहीही खर्च नाही. औषधपाण्याचा खर्च (डॉक्टरांनी काही प्रिस्क्रिप्शन दिलं तर) एका विशिष्ट आकड्याच्या (सुमारे ६०० रुपये) पुढे कधीच जात नाही.. मग ते औषध कितीही महाग असो. गर्भार बायका, साठीच्या पुढचे म्हातारे, १८ वर्षाच्या आतील मुलं अशांना ते फुकट मिळतं. पण बेकारभत्ता मिळणार्‍यांना देखील ते फुकटच आहे.

असे ऐषोआरामी लोक दिवसभर काय करणार? चकाट्या पिटणे, ड्रग्ज व दारु झोकून दंगामस्ती करणे या शिवाय दुसरं काय? फावल्या वेळात चुकार पोरंपोरीं पोरं पैदा करण्याचं उदात्त कार्य करतात! अनुज बिडवेचा खुनी, कियारन स्टेपलटन हाही अशाच कुटुंबातला एक बेकार तरुण! तो धरून एकूण सहा भावंडं आहेत. आई वडील आणि पोरं म्युन्सिपाल्टिने दिलेल्या घरात रहातात. जवळपास त्यांचे इतर नातेवाईक रहातात. त्या सगळ्यांपैकी कुणीच फारसं कामबिम कधी केलेलं नाही.

तो स्वतःला सायको किलर म्हणवतो. पोलिसांना व कोर्टाला खून करण्यामागे काही विवक्षित प्रेरणा, उद्देश, द्वेष, जातीय द्वेष, गरीबी असं काहीही आढळून आलेलं नाही. केवळ चीप थ्रिल मिळविण्यासाठी केलेला एक निरर्थक खून! त्यानं अनुजला का मारलं याचं उत्तर त्यानं कोर्टात 'आय ऑनेस्टली डोन्ट नो' असं दिलं आहे.

या वरून काही चांगल्या उद्देशाने केलेल्या कायद्याचं पर्यवसान समाजकंटक निर्माण करण्यात होऊ शकतं हे मात्र दिसून येतं.

त्यातली जमेची बाजू इतकीच की स्टेपलटनला पकडणे, खटला उभा करून, सुनावणी होऊन जन्मठेपेची शिक्षा फर्मावणे हे सगळं अवघ्या ७ महिन्यात उरकलं. त्याबद्दल मला तरी ब्रिटिश पोलिसांचं आणि न्यायसंस्थेचं कौतुक वाटतं.

(१) एक पौंड = सुमारे ८० रुपये असा सध्याचा भाव आहे.

=== समाप्त ===