Monday, August 7, 2017

सायकलगाथा

इंग्लंड आणि युरोपात फिरताना इतक्या विविध प्रकारच्या सायकली पहायला मिळतात की मति गुंग होते! इतक्या कल्पक आणि वैविध्यपूर्ण रचना पाहून नेहमीच असा विचार येतो की या लोकांना हे असलं काही सुचतच कसं? इतकी सर्जनशीलता आली कुठुन? त्याचं कारण म्हणजे भारतात मी फक्त तीनच प्रकारच्या सायकली पाहिल्या. एक आपली नेहमीची लेडिज/जेन्ट्स सायकल व त्यांचं लहान मुलांसाठीचं छोटं रूप. दुसरी लहान मुलांची तिचाकी आणि तिसरी खूप वर्षांनंतर आलेली गिअरची. खलास! माझं चहुकडून झापडं लावलेलं बंदिस्त डोकं! कधी वेगळा विचार करायची सवयच नाही लावली तर काय होणार दुसरं? केला असता तर किर्लोस्करांनंतर मराठी उद्योजकांमधे माझं नाव नसतं का घेतलं? असो. पण गुगल करण्याइतकी अक्कल असल्यामुळे सायकलीची उत्क्रांती कशी झाली हे बघायला मांडी ठोकली.

हे संशोधन करताना पहिला धक्का बसला तो जगातल्या सगळ्यात पहिल्या सायकलीचं चित्र बघून! (पहा चित्र १ मधील १८१८ तली सायकल. १८१८ साल पेशवाईच्या अस्तामुळे माझ्या मनात फिट्टं बसलंय. एखाद्या कालखंडात भारतात आणि परदेशात काय चाललं होतं हे बघायला गंमत वाटते. उदा. ज्या काळात शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याचा पाया रचायला सुरुवात केली साधारण त्याच काळात न्युटन भौतिक शास्त्राचा पाया रचत होता. ) तर जगातली पहिली सायकल बिनापेडलची होती. पायांनी जमीनीला रेटा देऊन पुढे जायचं! गंमत म्हणजे अशा प्रकारची लहान मुलांची सायकल अजूनही मिळते. बॅलन्स बाईक म्हणतात तिला (चित्र २). त्या नंतर सरळ चाकाला जोडलेल्या पेडलची सायकल आली. चेनने चाकाला जोडलेल्या पेडलची सायकल यायला १८८५ साल उजाडावं लागलं.
चित्र १: सायकल इतिहास
चित्र १: सायकल इतिहास

चित्र २: मुलांची बॅलन्स बाईक
चित्र २: मुलांची बॅलन्स बाईक

सायकलीं मधे इतकी विविधता येण्याचं महत्वाच कारण म्हणजे इथली चारचाकींच्या जमान्यातही टिकून असलेली सायकल संस्कृती! अशी संस्कृती होण्यामागे अनेक कारण आहेत.

इथलं सरकार हे पहिलं. इथलं सरकार लोकांना सायकल वापरायला प्रचंड प्रोत्साहन देतं. सरकारने बहुतेक गावातल्या सर्व प्रमुख रस्त्यांवर नीट सायकल ट्रॅक्स आखलेले आहेत. सायकलस्वारांना चौकात रस्ते ओलांडताना जास्त त्रास होतो. तो कमी व्हावा म्हणून सिग्नलच्या अलिकडे फक्त सायकलस्वारांना उभं रहाण्यासाठी खास जागा असते. त्यात इतर गाड्यांना उभं रहायला परवानगी नसते. सायकल ट्रॅकवरून आलं की उभ्या असलेल्या गाड्यांच्या सरळ पुढे जाऊन या खास भागात उभं रहाता येतं. सिग्नल लागला की साहजिकच सायकलवाल्यांना आधी जाता येतं. इथलं नॅशनल सायकल नेटवर्क १९९५ च्या थोडं आधी अगदी कमी लांबीचे सायकल रस्ते दत्तक घेऊन सुरू झालं. आता यूकेतल्या बहुतेक सर्व गावांना जोडणारे एकूण १४,००० मैल लांबीचे सायकल रस्ते त्यांनी बांधले आहेत. त्या रस्त्यांचा नकाशा इथे बघता येईल. तसंच काही नगरपालिका इथे सायकल हायर स्कीम राबवतात. गावात विविध ठिकाणी सायकली ठेवलेल्या असतात. कुणीही त्यातली सायकल घेऊन जाऊ शकतो आणि इच्छित स्थळाच्या जवळपासच्या स्टँडला ती ठेवू शकतो.

दुसरं कारण म्हणजे इथल्या शहरातले रस्ते छोटे आहेत म्हणून सकाळी व संध्याकाळी गाड्यांची प्रचंड रीघ लागलेली असते. तसंच गावात गाड्या लावायला फारशी जागा उपलब्ध नसते. सार्वजनिक वहातुकीची उत्तम सोय असली तरी खर्च जरा जास्तच होतो. तसंच ग्लोबल वॉर्मिंगच्या भीतिचाही खूप परिणाम आहे. या सगळ्यावर मात म्हणून सायकलने किंवा चालत ऑफिसला जाण्यायेण्याचं प्रमाण वाढलं आहे.

इथले लोक आता स्वतःच्या आरोग्याबद्दल जास्त जागरुक झाले आहेत हे तिसरं कारण! त्यामुळे गावागावात सायकलिंगचे आणि चालण्याचे क्लब झाले आहेत. दर आठवड्याला क्लबचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी सायकलने ( चालण्याचा क्लब असेल तर अर्थातच चालत ) जातात. सायकलिंग हा एक इथला एक अत्यंत आवडीचा टाईमपास आहे. टुर दे फ्रान्स सारख्या लोकप्रिय सायकल शर्यती त्याची साक्ष देतात. पण सप्ताहान्ताला गंमत म्हणून कुठेतरी ३०/४० मैल सायकल मारायला जाणारे खूप लोक आहेत. तसंच उंच डोंगरावरून सायकलने वेगाने खाली येण्याचा चित्तथरारक खेळणारे ही आहेत. त्याचा एक युट्युब व्हिडीओ इथे पहा.

सायकल मारत नेहमीची काम करण्यात किंवा ऑफिसला जाण्यायेण्यात कुणालाच कमीपणा वाटत नाही. लोक कितीही मोठ्या पदावर असले तरी सायकल मारत ऑफिसला जातात. लंडनचा माजी महापौर सायकलवर ऑफिसला जात असे. ऐन थंडीत देखील, बर्फ पडला नसेल तर, रोज ऑफिसला ८/१० मैलांवरून (१२/१५ किमी) सायकल मारत येणारे बरेच स्त्री/पुरुष आहेत. बरेच पालक आपल्या पोरांना सायकलवरून शाळेत घेऊन जातात किंवा त्यांच्या बरोबरीने सायकल चालवत शाळेपर्यंत जा ये करतात. सर्व वयाच्या मुलांना सायकलने शाळेत नेणं शक्य व्हावं म्हणून विविध प्रकारच्या सायकली बनवल्या गेल्या आहेत. काही सायकलींच्या मागे आपल्याकडच्या सायकल रिक्षासारखी गाडी जोडलेली असते. पण ती लहान मुलाला बसता येईल इतकी छोटी आणि बुटकी असते(चित्रे ३,४,५ व ६). लहान वयातच सायकल संस्कार झाल्यामुळे मोठेपणी सायकलने फिरण्यात त्यांनाही काही वावगं वाटत नाही. दोन माणसांना एकाच ठिकाणी जायचं असेल तर एक टँडेम सायकल मिळते. ती एकाला एक जोडलेली सायकल असते. तिला दोनच चाकं असतात पण दोन सीटं आणि दोन पेडल असतात. ती दोन जण एकामागे एक असे बसून चालवतात(चित्र ७). काही सायकलला मागे लहान मुलाला चालवता येण्यासारख्या छोट्या सायकलचं चाक जोडलेलं असतं. अशा सायकली घेऊन आई/बाप आपल्या लहानग्यांना सायकल चालवायचं शिक्षण देत देत शाळेत ने-आण करतात (चित्र ४). समजा ऑफिस फारच लांब आहे, सायकल मारत जाणं शक्य नाही. बस किंवा रेल्वेने जाण्याशिवाय पर्याय नाही. यात बर्‍याचदा घरापासून स्टेशनपर्यंत आणि स्टेशनपासून ऑफिसपर्यंत जाण्यायेण्यात सुद्धा बराच वेळ/पैसा खर्च होऊ शकतो. तो कमी करायचा असेल तर घडीची सायकल घेऊन जाता येतं (चित्र ९). सायकलींची चक्क घडी घालून ती सहजपणे काखोटीला मारून बस किंवा ट्रेनमधून घेऊन जाता येऊ शकते.

चित्र ३: दोन पोरांना घेऊन जाणारा बाप
चित्र ३: दोन पोरांना घेऊन जाणारा बाप

चित्र ४: बाप व दोन पोरं टँडेम सायकलवर
चित्र ४: बाप व दोन पोरं टँडेम सायकलवर

चित्र ५: आई बाप व दोन पोरं आणि कॅरियर
चित्र ५: आई बाप व दोन पोरं आणि कॅरियर

चित्र ६: आई बाप व एक मूल आणि कॅरियर
चित्र ६: आई बाप व एक मूल आणि कॅरियर

चित्र ७: प्रौढांची टँडेम सायकल
चित्र ७: प्रौढांची टँडेम सायकल

चित्र ८: घडीची सायकल

चित्र ८: घडीची सायकल
चित्र ८: घडीची सायकल

सायकल चालविताना सर्व वजन कुल्ले, पाय आणि हात या आकाराने छोट्या अवयवांवर येतं. त्यासाठी आरामखुर्ची सारखी दिसणारी सायकल बनवली आहे. त्यामधे त्यात चालक मागे रेलून बसतो आणि समोर पाय लांब करून पेडल मारतो. यात शरीराचे सर्व वजन पाठ आणि कुल्ले या तुलनेने विस्तृत भागावर विखुरल्यामुळे आराम जास्त मिळतो(चित्र ९). अशा प्रकारच्या सायकलिंची अधिक माहिती इथे वाचता येईल.

चित्र ९: आरामखुर्ची सारखी सायकल
चित्र ९: आरामखुर्ची सारखी सायकल

एखाद्या घोळक्याला एकत्रितपणे सायकल मारण्याची मजा लुटता यावी म्हणून एक घोळका सायकल सुद्धा आहे (चित्र १०).
चित्र १०: ७ लोकांची सायकल
चित्र १०: ७ लोकांची सायकल

ट्रेडमिल आणि सायकलीचा संगम करून बनवलेल्या एका भन्नाट सायकलचा व्हिडीओ इथे बघता येईल.

इलिप्टिक ट्रेनर हे ट्रेडमिल सारखंच एक व्यायाम करायचं यंत्र आहे. हे वापरून जिना चढणे, चालणे किंवा पळणे या प्रकारचे व्यायाम सांध्यांवर अति ताण न येता करता येतात. इलिप्टिगो कंपनीने इलिप्टिक ट्रेनर सारखी एक अभिनव सायकल बनवली आहे (चित्र ११). त्याचा एक व्हिडीओ इथे बघता येईल.

चित्र ११: इलिप्टिक सायकल
चित्र ११: इलिप्टिक सायकल

फोर्क विरहित सायकल ही अशीच एक तोंडात बोट घालायला लावणारी सायकल आहे (चित्र १२). त्याचा एक व्हिडीओ इथे आहे.
चित्र १२: फोर्क विरहित सायकल
चित्र १२: फोर्क विरहित सायकल

अशा अजूनही अनेक तर्‍हेतर्‍हेच्या सायकली आहेत. मी सगळ्या इथे दाखविलेल्या नाहीत.

इथल्या नगरपालिका सायकल वापरास प्रोत्साहन देण्यासाठी चौकाचौकात 'थिंक बाईक' अशा पाट्या लावतात. यदाकदाचित पुढे मागे पुण्याच्या महापौरांना सायकलींना प्रोत्साहन देण्याचा झटका आलाच तर त्यांनी चौकाचौकात अशी पाटी लावायला हरकत नाही...
देशबंधूंनो विचार करा
गाड्यांपेक्षा सायकल मारा

---- समाप्त -----

Sunday, December 11, 2016

तीन पैशाचा तमाशा!

१९७८ मधे पुलंचा तीन पैशाचा तमाशा मी प्रथम पाहिला आणि त्यानं मला झपाटलं. फक्त माझीच नाही तर तेव्हाच्या सर्व तरुण वर्गाची हीच अवस्था होती! सुमारे १०/१२ वेळा तो तमाशा मी पाहिला असेन. तो ब्रेख्टच्या थ्री पेनी ऑपेराचं स्वैर रुपांतर आहे असं कळल्यावर मूळ ऑपेरा बघणं अपरिहार्यच होतं. तमाशा बघताना असं कुठेही जाणवत नाही की आपण हे रुपांतर बघत आहोत इतकं पुलंनी ते रुपांतर चपखल आहे, आपलंसं करून टाकलं आहे. त्यामुळेच मूळ नाटकात नक्की काय होतं आणि पुलंनी रुपांतर करताना कुठे आणि कसे बदल केले हे समजून घेण्यात मला स्वारस्य होतं. पण ते नाटक बघण्याचा योग बरीच वर्ष काही आला नाही. शेवटी २०१६ सप्टेंबरमधे लंडन मधील रॉयल नॅशनल थिएटर ते सादर करणार असल्याचं समजल्यावर ती संधी दवडणं शक्यच नव्हतं. शिवाय ते नाटक बघायला लंडनला जाण्याची पण गरज नव्हती कारण त्याचं थेट प्रक्षेपण जगभरच्या २००० चित्रपटगृहांमधे होणार होतं. त्यामुळे मला ते तब्बल ३८/३९ वर्षांनी का होईना इथे ऑक्सफर्डच्या एका चित्रपटगृहामधे विनासायास बघायला मिळालं.

सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे हा तमाशा १९७८ मधे प्रथम आला आणि मला वाटतं ४/५ वर्षानंतर बंद देखील पडला. त्यामुळे बर्‍याच जणांनी त्याचं नावही ऐकलं नसण्याची शक्यता आहे म्हणून आधी त्याबद्दल थोडी माहिती दिलेली बरी पडेल! जॉन गे याने इंग्रजीतून लिहीलेल्या १८ व्या शतकातल्या 'द बेगर्स ऑपेरा'चं १९२८ मधे जर्मन भाषेत भाषांतर झालं 'Die Dreigroschenoper' म्हणजेच  'द थ्री पेनी ऑपेरा' या नावाने! १९३३ मधे नाझी सत्तेवर आल्यानंतर दिग्दर्शक ब्रेख्ट आणि संगीतकार कर्ट वेल यांना जर्मनी सोडावं लागलं पण तोपर्यंत या नाटकाची १८ भाषांमधे भाषांतरं होऊन युरोपभर १०,००० च्या वर प्रयोग पण झाले होते, इतकं ते गाजलं! 'द थ्री पेनी ऑपेरा' हे नाव देखील तसं वैशिष्ट्यपूर्णच आहे. ऑपेरा बघणे ही त्या काळी फक्त उच्चभ्रू लोकांनांच परवडणारी आणि प्रतिष्ठेचा मापदंड समजली जाणारी गोष्ट होती. आपल्याकडे गाण्यातलं काहीही न समजणारा पण 'आम्ही कधी सवाई चुकवतच नाही' असं नाक उडवून सांगणारा एक वर्ग आहे, तसंच काहीसं! म्हणूनच हा थ्री पेनी इतक्या तुच्छ किमतीचा ऑपेरा सर्वसामांन्यांचा आहे असं सुचवलं आहे. हे नाटक म्हणजे 'नाही रे' वर्गाचं 'आहे रे' वर्गावरचं एक भाष्य आहे असं म्हणता येईल.

या नाटकाबद्दल अधिक बोलण्याआधी त्याची रूपरेषा सांगतो.

याची सुरुवातही उल्लेखनीय म्हणावी लागेल. कारण सुरुवातीला नाटकाचा सूत्रधार बजावतो की इतर नाटकांमधून जशी नैतिकतेची शिकवण दिली जाते किंवा काही बोधामृत वगैरे पाजायचा प्रयत्न होतो तशी अपेक्षा या नाटकाकडून करू नका! या नाटकातून कसलीही शिकवण द्यायचा प्रयत्न केलेला नाही! नंतर 'द बेगर्स ऑपेरा' मधे होते तशी हांडेल नावाच्या एका प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाच्या ऑपेरातल्या गाण्याच्या विडंबनाने एक नांदी होते. मग एक फाटक्या कपड्यातल्या माणूस मॅकहीथ ऊर्फ मॅक नामक एका कुप्रसिद्ध गुंडाच्या कर्मकहाण्या गाण्यातून सांगतो. हा काळ व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या जरासा आधीचा आहे.

जोनाथन पीचम याचा भिकार्‍यांना शिक्षण द्यायचा धंदा आहे. तो त्यांना शिक्षण दिल्यानंतर त्यांना भीक मागण्याचा परवाना विकतो शिवाय त्यांच्या भीकेतलं ५०% कमिशन घेतो. पहिल्या अंकाची सुरुवात एका विनापरवाना होतकरू भिकार्‍याला संस्थेत प्रवेश देण्यावरून होते. याला इतर परवानाधारक भिकार्‍यांनी बडवून संस्थेच्या कार्यालयात पाठविलेले असते. त्याला भिक्षेकरी प्रशिक्षण संस्थेची माहिती दिल्यानंतर आपली मुलगी पॉली काल रात्रीपासून घरी आलेली नाही हे पीचम पतिपत्नीच्या लक्षात येतं. पॉलीने मॅकशी, अगदी त्रोटक ओळख असताना देखील, लग्न करायचं ठरवलेलं असतं. इथे पॉली आणि मॅक यांच्या लग्नाचा प्रवेश चालू होतो. लग्नासाठी आणि संसारासाठी लागणार्‍या वस्तू व खाद्यपदार्थ मॅकच्याच गॅंगने इकडून तिकडून ढापून आणलेल्या असतात. लग्नाला खुद्द पोलीस कमिशनर टायगर ब्राऊन जातीने हजर असतो. तो मॅकचा जिवलग मित्र असतो. ते दोघे पूर्वी सैन्यात बरोबर असताना त्यांची मैत्री झालेली असते. पॉली नंतर घरी येऊन तिच्या लग्नाची बातमी देते. आई वडिलांच्या रागाला भीक न घालता ती त्याच्याकडे जायचं ठरवते आणि वर पोलीस कमिशनर कसा त्याचा जानी दोस्त आहे ते पण सांगते. पीचमला अर्थातच ते पसंत पडत नाही आणि तो मॅकला फाशीवर लटकविल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचं जाहीर करतो.

दुसर्‍या अंकात पॉली मॅकला बजावते की तिचा बाप त्याला तुरुंगात पाठविल्याशिवाय रहाणार नाही. मॅकला शेवटी ते पटते आणि तो लंडन सोडून जायची तयारी करतो. जाण्यापूर्वी पॉलीला त्याचा धंदा संभाळता यावा म्हणून त्याच्या काळ्या धंद्याची आणि त्याच्या सहकार्‍यांची माहिती आणि त्यांना कसं हाताळायचं हे तो तिला सांगतो. पण लंडन सोडायच्या आधी तो त्याच्या आवडत्या कुंटणखान्यात त्याच्या आधीच्या प्रेयसीला, जेनीला, भेटायला जातो. तिथे ते त्यांच्या जुन्या प्रेमाचे गोडवे गातात. पण मॅकला हे माहिती नसते की पीचमच्या बायकोने जेनीला मॅक आला की पोलिसांना खबर देण्यासाठी पैसे चारलेले आहेत. ती पोलिसांना खबर करते. मग टायगर ब्राऊनच्या हातात काही रहात नाही, तो मॅकहीथची माफी मागतो पण त्याला तुरुंगाच्या कोठडीपासून वाचवू शकत नाही. तुरुंगात त्याची अजून एक प्रेयसी ल्युसी (टायगर ब्राऊनची मुलगी) आणि पॉली एकाच वेळी येतात. तिथे त्या दोघींचं मॅक नक्की कुणावर प्रेम करतो यावर जोरदार भांडण होतं. पॉली निघून गेल्यावर ल्युसी भोवळ आल्याचं नाटक करून जेलर कडून किल्ली मिळवते आणि त्याची सुटका करते. ते पीचमला समजल्यावर तो टायगर ब्राऊनला भेटतो आणि भिकार्‍यांच्या झुंडी पाठवून राणीच्या राज्याभिषेकाच्या मिरवणुकीचा विचका करण्याची धमकी देतो.

तिसर्‍या अंकात जेनी पीचमकडे तिचे पैसे मागायला येते, ते सौ. पीचम द्यायचे नाकारते. श्री. पंचम जेनीला बांधून आणि तिचे हाल करून मॅकचा ठावठिकाणा काढून घेतो. नंतर टायगर ब्राऊन पीचम आणि त्याच्या भिकार्‍यांना मिरवणुकीच्या आधीच अटक करण्यासाठी येतो. तेव्हा त्याला भिकारी अगोदरच मिरवणुकीच्या रस्त्यावर उभे आहेत आणि फक्त पीचमच त्यांना थांबवू शकतो हे समजतं आणि तो हवालदील होतो. मॅकला पकडून त्याला फाशी देणे हा एकमेव पर्याय त्याच्यापुढे शिल्लक रहातो. पुढच्या प्रवेशात मॅक परत तुरुंगात आलेला दिसतो पण जेलरला पैसे चारून सुटका करून घेण्याचा मेटाकुटीचा प्रयत्न करत असतो. लवकरच त्याला समजतं की पॉली किंवा त्याचे सहकारी यापैकी कुणीही तितकी रक्कम उभी करू शकत नाही किंवा त्यांना ती करण्याची इच्छा नाही आणि तो नाईलाजाने मरायला तयार होतो. मॅक सगळ्यांकडे गाण्यातून क्षमा याचना करतो. आता तो फाशी जाणार इतक्यात पुन्हा एकदा सूत्रधार उगवतो आणि म्हणतो की आम्हाला असा दु:खी शेवट करायला आवडत नाही. आम्हाला लोकांना रडवून पैसे कमवायचे नाहीत. मग रहस्यमयरित्या एक दूत राणीचा निरोप घेऊन येतो आणि सांगतो की मॅकला खुद्द राणीने माफी दिलेली आहे, इतकंच नाही तर त्याच्या भविष्याची तजवीज देखील केली गेलेली आहे. इथे नाटक संपते.

ऑपेराचं मराठीत आणण्यासाठी कोणता नाट्यप्रकार सोयीचा ठरेल? मला तरी ऑपेराच्या जवळचे मराठीत दोनच नाट्यप्रकार आहेत असं वाटतं. एक संगीतनाटक आणि दुसरा तमाशा! तमाशाच्या लवचिकतेमुळे पुलंनी तमाशा स्विकारला असावा. त्यामुळे मूळ संकल्पने पासून ते थोडे दूर गेले. ऑपेरा प्रतिष्ठित लोकांसाठीच असायचा, पण तमाशा मुख्यतः सर्वसामान्य लोकच बघत असत, ती प्रतिष्ठित लोकांनी बघायची गोष्ट नव्हती. शिवाय तमाशा म्हंटल्यामुळे प्रथेनुसार त्यात त्यांना गण गवळण हेही घालावं लागलं. अर्थात त्या दोन्ही गोष्टी लवकर आवरल्या आहेत म्हणा!

इथे मूळ नाटकातली इंग्रजीत भाषांतरित केलेली गाणी ऐकलित तर समजेल की पात्रांचा वेगळेपणा गाण्यातून तितकासा जाणवत नाही. सर्व पात्रं साधारणपणे एकाच शैलीची गाणी म्हणतात. मूळ नाटकातील गाणी ही जॅझ आणि जर्मन नृत्यसंगीताच्या शैलीवरची आहेत. पुलंनी मात्र गाणार्‍या पात्रांचा वेगळेपणा त्यांच्या गाण्यातून सुद्धा कसा दिसेल हे पाहिलं आहे. भिक्षेकरी प्रशिक्षण संस्था चालविणारे पंचपात्रे दांपत्य (पीचम) हे आधी संगितनाटकात अभिनय करणारं दाखवलं आहे त्यामुळे त्यांची गाणी तशा प्रकारची आहेत. मालन (पॉली) व लालन (ल्युसी) यांची गाणी भावगीत/सुगम संगित यात मोडणारी आहेत. तसेच रंगू तळेगावकर (जेनी) या वेश्येला लावणीशैली तर अंकुश नागावकर (मॅक) व त्याच्या गुंडांकरिता कोळीगीत वगैरे लोकसंगीताचीही तरतूद होती.

पण जब्बार पटेलांनी ही सांगितिक बैठक अधिक विस्तृत केली आणि आणखी रंगत, लज्जत, व विविधता आणली. रंगू तळेगावकरचं त्यांनी पुलंच्या संमतीने झीनत तळेगावकर असं धर्मांतर केलं. त्यामुळे गझल, ठुमरी, कव्वाली सारखे गायनप्रकार उपलब्ध झाले. पुलंनी तमाशातल्या सूत्रधाराला मूळ नाटकापेक्षा जास्त वाव दिला गेला आहे. पण हा नुसता बोलणारा सूत्रधार आहे, अर्थात मूळ नाटकातही तो गात नाहीच! पण जब्बार पटेलांनी दोन परिपाश्र्वक, पुलंच्या संहितेत नसलेले, घातले. (याच संकल्पनेचा वापर पुढे जब्बार पटेलांनी 'जैत रे जैत' मधे पण केला) तमाशातल्या पुढच्या प्रसंगाची गाण्यातून वातावरण निर्मिती करायची हे यांचं काम! रवींद्र साठे आणि मेलडी मेकर्स फेम अन्वर कुरेशी हे ते काम चोख पार पाडायचे! त्यांना गझल, पॉप, कोकणी तसंच हिंदी गाण्यांसारखी गाणी अशी विविध प्रकारची सुंदर गाणी मिळाली. पण हे बदल काहीच नव्हेत असा अफलातून बदल त्यांनी अंकुश नागावकरच्या (मॅक) गायनशैलीत केला. तो म्हणजे कोळीगीतांऐवजी पाश्चिमात्य संगीतातील अत्यंत लोकप्रिय पॉप/जॅझ संगीताचा वापर! त्यामुळे नाट्यमंचावर तबला पेटी व फार फार तर सारंगी यापेक्षा इतर कुठलीही वाद्यं न पाहिलेल्या प्रेक्षकांना प्रथमच गिटार, ड्रमसेट, अ‍ॅकॉर्डियन, व्हायोलिन, आणि सॅक्सोफोन सारख्या वाद्यांनी भरलेला वाद्यवृंद बघायला मिळाला. पण नुसती वाद्यं आणून ही नाविन्यपूर्ण कल्पना साकार झाली नसती. त्यासाठी थेट तशा शैलीच्या चाली बांधणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते भारतीय शास्त्रीय संगीतात आयुष्य घालविलेल्या संगीतकारांचं काम नव्हतं. पण हा बदल करण्याआधी जब्बार पटेलांच्या डोळ्यासमोर नंदू भेंडे असणार त्याशिवाय त्यांनी तसा विचार केला नसता! नंदू भेंडे याने तमाशात येण्याआधी मुंबईतलं इंग्रजी रंगभूमीवरील ‘जिझस ख्राईस्ट सुपरस्टार’ हे अलेक पदमसींच संगीत नाटक गाजवलं होतं. त्याने पुलंनी अंकुशसाठी लिहीलेल्या गाण्यांना जबरदस्त चाली तर लावल्याच पण त्याही पुढे जाऊन जिथे नुसते संवाद होते त्याचीही गाणी केली आणि अंकुशच्या भूमिकेतून म्हंटली.

तीन पैशाचा तमाशा लंडन ऐवजी मुंबईत होतो आणि आपल्याकडे राणीबिणी भानगड नसल्यामुळे राज्याभिषेकाच्या मिरवणुकीऐवजी राष्ट्रपतीच्या स्वागतासाठी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीचा उल्लेख होतो. शेवटी येणार्‍या राणीचा दूताला फाटा देऊन मिष्किल पुलंनी तिथे साक्षात विष्णू म्हणजेच नारायण (जेलरचं पण नाव नारायणच असतं) अवतरवला आहे. अंकुशच्या गळ्यातून फाशीचा दोर काढल्यावर अंकुश त्याला विचारतो.. 'देवा! मी कसे तुझे उपकार फेडू'. त्यावर नारायण त्याला 'सावकाश! हप्त्याहप्त्याने दे!' असं सूचक उत्तर देतो. जायच्या आधी नारायण खड्या आवाजात म्हणतो..'आता अंधार करा रे! मला अंतर्धान पाऊ द्या!'.

कथानकात आणखीही काही बदल आहेत. लालन (ल्युसी) ही टायगर भंडारेची (टायगर ब्राऊन) मुलगी दाखवलेली नाही. तसंच पंचपात्रे झीनतचा छळ करून अंकुशच्या ठावठिकाण्याची माहिती काढताना दाखविलेला नाही.

ऑपेरातले संवाद मला इतके विनोदी वाटले नाहीत. जर्मन लोकांची विनोदबुद्धी सुमार असते अशा सर्वसाधारण समजाला धक्का न देण्याचं काम त्यांनी चोख पार पाडलंय. पुलंचे संवाद प्रचंड विनोदी आहेत, पुलंनी रुपांतर केलंय म्हंटल्यावर वेगळं काही होणं अपेक्षित नव्हतंच म्हणा! 

पुलंचा सूत्रधार नैतिक शिकवण वगैरे बोलत नाही पण हे तीन पैसे कशाबद्दल लागणार आहेत ते तो सांगतो. तमाशाचं शीर्षक गीत चालू असतानाच तो म्हणतो एक पैशाचं गाणं होईल, एका पैशाचा नाच होईल आणि तिसरा पैसा लाच म्हणून घेतला जाईल. या शीर्षक गीताची चाल थोडी हिंदी गाण्यांसारखी आहे. शीर्षक गीताचे शब्द असे आहेत..
तीन पैशाचा तमाशा, आणलाय आपल्या भेटिला
इकडून तिकडून करून गोळा, नट अन नटी धरून भेटिला
आणलाssssss
आपल्या आपल्या आपल्या भेटीला!

यातलं 'तीन पैशाचा तमाशा' हे जवळ जवळ 'ओ माय लव्ह' या गाण्याच्या चालीसारखंच आहे आणि 'आपल्या आपल्या आपल्या' हे 'देखो देखो देखो देखो अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस' मधल्या देखो देखो सारख आहे.

खाली तमाशातली काही गाणी मला आठवतील तेव्हढी लिहीली आहेत.

अंकुश त्याच्या झीनत बरोबर घालवलेल्या त्याच्या आयुष्याचं वर्णन या पॉप धर्तीवरच्या गीताने करतो.
एक चिमुकली होती खोली, इवली केविलवाणी
त्या खोलीतील मी होतो राजा आणि ती होती माझी राणी
ओठावरती होती गाणी, होता इष्कबहार
नव्हती चिंता, होती एकच कशी टळेल दुपार
झीनतची अन माझी आमची प्रीत पुराणी
त्याची ऐका आता कहाणी, आमची प्रीत पुराणी

लढवुनी डोके सांगितले मी तिजला काय विकावे
निसर्गनिर्मित भांडवलावर चार घास कमवावे
त्या घासातील दोन तिचे अन दोन तिने मज द्यावे
बदल्यापोटी दुष्टापासून मी तिजला रक्षावे
झीनतची अन माझी आमची प्रीत पुराणी
त्याची ऐका आता कहाणी, आमची प्रीत पुराणी
(पुढची कडवी आता आठवत नाहीत. हे गाणं अगदी त्रोटक प्रमाणात इथे ऐकू शकाल. पण हे प्रत्यक्ष तमाशातल्या गाण्याचं रेकॉर्डिंग वाटत नाही. नंतर केलं आहे असं वाटतंय.)

गाणारे सूत्रधार पसायदानाचं हे विडंबन म्हणतात.
आता पैशात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । कसाईदान हें ॥

ते सुर्‍यांचे गंजणे सांडो, नित्य चाकुंची धार वाढो |
भोती परस्पर जडो | वैर जीवांचे ||

कसाई राहोत संतुष्ट | त्यांना लाभोत गाई पुष्ट |
अधिकातला अधिक भ्रष्ट | त्याते सत्ता मिळो सदा ||

अंकुश मुंबई सोडून निघून जायच्या आधी मालनला त्याच्या सहकार्‍यांची आणि त्यांच्याशी कसं वागायचं हे या जॅझ प्रकारातल्या गाण्यातून सांगतो. या गाण्याच्या सुरुवातीच्या कॉर्डस डेव्ह ब्रबेकच्या 'टेक फाईव्ह' या गाण्याच्या सुरुवातीच्या कॉर्डस सारख्या आहेत.
हरामखोर! सगळे हरामखोर!
हरामखोर! सगळे साले हरामखोर!
हा छक्क्या चारसोबीस याचा भरोसाच नाय
परभारी माल विकतो रोख पैसा द्यायचा नाय
तीन आठवड्याचा टायम दे, नाय सुधरला तर लटकू दे
भंडारे सायबाला निरोप दे
सायबाला सांगून काढून टाक त्याचा जोर
हरामखोर! सगळे हरामखोर!
हरामखोर! सगळे साले हरामखोर!

फासावर जायच्या आधी अंकुश या गाण्याने सगळ्यांची क्षमा याचना करतो.
माफ करा! माफ करा!
माफ करा! माफ करा!
हे जेलर वॉर्डर यांनी छळलं मला भारी
माझ्या वाटची ढापली त्यांनी अर्धी भाकरी
कायद्याच्या गप्पा मारून त्यावर जगणारी
हलकट साली सापाची अवलाद आहे खरी
सत्यानाश होऊ दे त्यांचा, सत्यानाशssss!
पण जाऊ दे साला, मारो गोली
त्यांना माफ करा!
माफ करा! माफ करा!
माफ करा! माफ करा!

पीचमच्या 'मॉर्निंग साँग' सारखं पंचपात्रे त्याच्या भिकार्‍यांना ही भूपाळी गाऊन उठवतो. पण पुलंची भूपाळी ऐकताना केव्हाही जास्त हसू येतं.
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!
नेमुन दिधल्या नाक्यावरती भिक्षा मागत सुटा!
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!

आssss! देवद्वारी असेल जमली भक्तांची दाटी
अडवा त्यांना वाटेवरती पुढे करुन वाटी
अहो आंधळे दिवस उगवला
दिसते, डोळे मिटा
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!

नयनीssss आणा
केविलवाणा श्वानासम भाव, भावssss
नयनीssss आणा!
ध्येय आपुले फोडित जाणे पाझर हृदयाला
अदय जनाना सदय करावे हा आपुला बाणा
नयनीssss आणा

दिसला जर का कुणी दयाळु
दिसला जर का कुणी दयाळु
पुरता त्याला लुटा
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!

ऑपेरातल्या 'व्हॉट कीप्स अ मॅन अलाईव्ह' या गाण्याचे हे सुंदर रुपांतर...
माणूस जगतो कशावरी? माणूस जगतो कशावरी?
दीड वितीच्या खळगीला या देवाने नच बूड दिले
जाळ भुकेचा पेटतसे निज देहाचे हे धूड दिले
या जाळाल विझणे ठाउक फक्त एकदा चितेवरी
माणूस जगतो कशावरी?

विनोदी संवाद आणि गाण्यातली वैविध्य यामुळे मला तरी पुलंचं रुपांतर ऑपेरापेक्षा सरस वाटलं.

तळटीपः दुर्देवाने मला आता गाण्यांचे सर्व शब्द आठवत नाहीयेत. आणि त्याहून मोठं दुर्देव म्हणजे तीन पैशाच्या तमाशाबद्दल फार काही माहिती नेटवरही उपलब्ध नाही. कुठेही तमाशाच्या गाण्यांचं रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. थ्री पेनी ऑपेराचे प्रयोग अजूनही होतात, त्यातली गाणी अजूनही ऐकली जातात, जगभरातले ऑर्केस्ट्रा त्यातल्या गाण्यांचे प्रोग्रॅम करतात. या पार्श्वभूमिवर आपल्या इथे झालेली उपेक्षा फारच खटकते!

-- समाप्त --

Monday, February 22, 2016

संगीत चिवडामणी!

ही तशी जुन्या काळातली गोष्ट आहे. कुणास ठाऊक कसा पण मला संगीताशी झटापट करायचा झटका आला. माझ्या आयुष्यात स्वर कमी आणि व्यंजनं जास्त असल्यामुळे असेल कदाचित! तर मी गिटार शिकायचा घनघोर निर्णय घेतला. छे! छे! पोरगी पटवायला म्हणून नाही हो! तेंव्हा माझं लग्न झालेलं होतं आणि एक ८ महिन्याचा मुलगा पण होता. आता तुम्ही जाणुनबुजून व्यंजनांचा आणि लग्नाचा संबंध लावायला गेलात तर माझी व्यंजनं आणखी वाढवाल! असं म्हणा की माझं सर्जनशील मन कुठेतरी व्यक्त होण्याची धडपड करत होतं आणि  ते मला स्वस्थ बसू देत नव्हतं!

आता गिटारच का शिकायचं ठरवलं? श्या! इतक्या चांगल्या वाद्याचं नाव त्या सतत तुंबलेल्या, घाण वास मारणार्‍या, डासांचं नंदनवन असलेल्या थिजलेल्या काळ्याशार पाण्यातून बुडबुडे फुटणार्‍या नाला सदृश वस्तूशी जुळणारं का बरं आहे? नावात काय आहे म्हंटलं तरी मधुबालाला अक्काबाई म्हंटल्यावर ते लोभस रूप डोळ्यासमोर येणार आहे का? त्रिवार नाही. पण ते असो. कारण मोठ्या लोकांनी म्हणून ठेवलेल्या गोष्टी, कुठलाही वाद न घालता, जशाच्या तशा स्विकारायच्या असतात अशी आपली संस्कृती सांगते. तर गिटार शिकायचं खरं कारण म्हणजे पिक्चर मधले हिरो! ते एकतर पियानो तरी वाजवताना दाखवितात नाहीतर गिटार तरी! आठवा ते पियानोच्या त्रिकोणातून घेतलेले हिरो आणि हिरॉईनचे शॉट्स! पण पियानो मला परवडला नसता आणि परवडला तरी एक बेडरूमच्या तुटपुंज्या घरात तो 'पियानो कम, डायनिंग टेबल जादा' झाला असता. शिवाय, तो काखोटीला मारून कुठे पिकनिकला वगैरे नेऊन भाव खाणं कसं शक्य होतं? मग राहिलं फक्त गिटार! आणि गिटार वाजवता वाजवता काय काय मस्त मस्त स्टायली मारता येतात राव! तरीही परत एकदा पोरी पटवणे हा गिटार शिकण्या मागचा उद्देश नव्हता हे नम्रपणे नमूद करू इच्छितो!

एकदा ते शिकायचं जाहीर केल्यावर मित्रांनी किती टिंगल केली ते सांगायला नकोच. 'तू लहानपणी रडलास की गंजलेल्या टमरेलावर दगड घासल्यासारखा आवाज यायचा म्हणे' इथून सुरुवात झाली इतकंच सांगतो. मनात म्हणायचो, एकदा मी स्टेजवर दिसायला लागलो की हेच टोळभैरव चिमण माझाच कसा जिवलग मित्र आहे याचं रसभरीत वर्णन करतील. 

झालं, मग एक क्लास लावला! आठवड्यातून ३ दिवस, सकाळी ऑफिसला जायच्या आधी तासभर तारा खाजवायच्या. क्लासमधे खूप गिटारं ठेवलेली होती त्यामुळे अपफ्रंट इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न नव्हता. मास्तरनी कसं, कुठे आणि काय खाजवायचं ते दाखवलं आणि म्हणाला आता या नोट्स वाजव. नोट्स वाजव? हायला! नोट्स वाजवायच्या पण असतात? तेव्हा मला फक्त नोट्स घ्यायच्या असतात नाहीतर कॉपी करायच्या असतात इतकंच माहिती! मराठीतलं शिक्षण अचानक मान खाली घालायला लावतं, ते असं.

दुसरी एक अस्वस्थ जाणीव अशी झाली की संगीत शिक्षण हे नेहमीच्या शाळा/कॉलेजातल्या शिक्षणापेक्षा फार वेगळं आहे. तिथे घोकंपट्टी आणि कॉप्या मारून तरून जाता येतं. इथं तसं नाही, इथं आपणच मरायचं तेव्हा स्वर्ग दिसणार! 

पहिले काही दिवस नुसते उजव्या व डाव्या हातांनी, एकाच वेळी, दोन वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नात  गेले. हा प्रकार आपल्या चुकांचं खापर दुसर्‍यांवर फोडण्याइतकं सोप्पं असतं तर काय हो? एकाच वेळी, डाव्या हाताने वर्तुळ व उजव्या हाताने चौकोन काढता येतो का पहा बरं जरा! डाव्या हाताच्या एकेका बोटाने एका तारेच्या एकेका फ्रेटवर दाबायचं आणि उजव्या हाताने नेमकी तीच तार छेडायची. दाबलेल्या तारेवरचा दाब कमी झाला तर ती तार गळा घोटल्यासारखी कोकलते. कर्मकठीण काम हो! तसंच करंगळीने, ते सुद्धा डाव्या हाताच्या, काही दाबता येतं का? कान खाजविण्याव्यतिरिक्त करंगळीचा काही उपयोग नाही हे माझं स्पष्ट मत आहे. आणि सगळ्यात शेवटी, एक तार दाबताना, मनावर कुठलाही दबाव न ठेवता, इतर कुठल्याही तारेला कशाचाही स्पर्श देखील होऊ द्यायचा नाही. कुणालाही स्पर्श न करता लोकलच्या आत बाहेर जाता येतं का? एकंदरित गिटार छेडणं हे पोरींना छेडण्याइतकं सोप्पं नाही!

मात्र, काही शब्दांच्या उगमाबद्दलचा साक्षात्कार असा या शिक्षणाचा वेगळाच एक फायदा झाला! 'ब्लिडिंग एज' म्हणजे बोटांना भूकंपात जमिनीला पडतात तसे चर पडून रक्तबंबाळ होणं. 'गायनी कळा' म्हणजे भेग पडलेल्या बोटाने तार दाबल्यावर ज्या जीवघेण्या कळा येतात त्या! 'तारांबळ' म्हणजे अशी तारवाद्य शिकताना जे काही होतं ते.

तार छेडण्यासाठी उजव्या हातात एक छोटा त्रिकोणी प्लेक्ट्रम धरून पाहिजे त्या तारेला झापड मारायची असते. तो प्लेक्ट्रम बोटातून कधी संधी निसटल्यासारखा निसटायचा, तर कधी इतका वर सरकायचा की प्लेक्ट्रम ऐवजी बोटंच तारेवर घासायची. नाहीतर कधी तो गोल फिरून बोटांमधे गुडुप व्हायचा. पहिल्या आणि शेवटच्या तारेला झापडणं त्यातल्या त्यात सोप्पं, पण मधल्याच एखाद्या तारेला झापडणं ते सुद्धा शेजारच्या तारेला न दुखावता म्हणजे खरी तारेवरची कसरत आहे. पाण्यात पडलं की पोहता येत तसं गिटारच्या तारांवर बोटं दाबली की गिटार येत नाही.. बोटं तरी कापतात नाही तर तारा तरी तुटतात.

२/३ महिन्यानंतर माझी फारशी प्रगती दिसेना म्हंटल्यावर मास्तरने घरी पण प्रॅक्टिस करायला हवी म्हणत एक गिटार अक्षरशः गळ्यात मारलं. गिटार सुरात कसं लावायचं ते पण सांगितलं. त्यासाठी सूर ओळखता यायला लागतो महाराजा! सूर फार लांब राहीले, मला तर पटकन माणसं पण ओळखता येत नाहीत. मागे एकदा एक संगीत शिक्षक माझ्याकडे आले होते. मुलांना वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे सूर कसे ऐकू येतात हे शिकविण्यासाठी त्यांना ऑसिलोस्कोपवर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे सूर तयार करून ते कॅसेटवर रेकॉर्ड करून हवे होते. ते मी रेकॉर्ड केले आणि मग कॅसेट वाजवली. मला तर सगळे सूर सारखेच वाटले. पण ते म्हणाले सूर वेगवेगळे आहेत, आम्ही संगीतातले आहोत, आमचे कान तयार असतात. तेव्हापासून कानाला जो खडा लागला आहे तो कायमचाच!

तरी चिवटपणे मी ट्युनिंग करीत राहीलो, पण तार पिळून सूर वर न्यायचा की ढिली करून खाली आणायचा ते कळायचंच नाही. परिणामी तारा जास्त पिळल्या जाऊन तुटायच्या! माझ्या मित्रांनी खडूसपणे 'काय, कसं चाललंय गिटार?' असं विचारलंच तर त्यावर माझ्या बायकोचं, सरिताचं, उत्तर ठरलेलं होतं.. 'नुसता तोडतोय तो!'. माझ्या ट्युनिंगच्या अत्याचारामुळे गिटार मधून जे काही चित्रविचित्र आवाज यायचे ते फक्त माझ्या मुलाला, गोट्यालाच आवडायचे. त्याला गिटार म्हणजे त्याच्यासाठी आणून ठेवलेलं एक खेळणं वाटायचं. त्याला सतत काहीतरी आपटायला आवडायचं म्हणून सरिताने त्याला एक वाटी दिली होती. ती तो डाव्या हाताने जमिनीवर जोरजोरात आपटायचा. बहुतेक लहान पोरं सुरवातीला डावखुरी का असतात कोण जाणे! वाटी जमिनीवर आपटण्यापेक्षा गिटारवर आपटली तर जास्त मजेशीर आवाज येतात हे एकदा त्याच्या तल्लख डोक्यात घुसल्यावर तो गिटारला मोक्ष देऊनच थांबला. इतरांना मात्र ते त्याच्या उज्वल सांगितिक भरारीचे पाळण्यातले पाय वाटले.

पण मी हट्ट सोडला नाही. नवीन गिटार आणलं, हे गिटार मात्र मी गोट्याच्या हाती लागू नये म्हणून लॉफ्टवर ठेवत असे. शिवाय कुणीतरी सांगितलं म्हणून ट्युनिंगची एक शिट्टी पण आणली. पण माझ्या शिट्ट्या ऐकून सरिताच्या कुकरची शिट्टी उडाली.. 'अरे, तुला काही लाज? सरळ रस्त्यावरच्या मुलींना बघून शिट्ट्या मारतोयस ते?'. शेवट पर्यंत मी ट्युनिंगच्या नावाखाली पोरींना शिट्ट्या मारतोय हा तिचा समज मी काही दूर करू शकलो नाही.

माझ्या गिटार शिक्षणाचा प्रवास असा कोकाकोला सारखा झाला.. सुरुवातीला रेग्युलर कोक, मग डाएट आणि शेवटी झीरो होत होत अशी त्याची प्रगती (की अधोगती?) होत होत ते लयास गेलं.

एक दिवस अत्याचार सहन न होऊन माझ्या गिटारने लॉफ्टवरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्या दिवशी गिटारी अमावास्या होती म्हणतात!

-- समाप्त --

Monday, July 13, 2015

जलपायरी ते जलचक्र!

इंग्लंडच्या समृद्धीचं एक प्रमुख कारण इथे १२ महीने पडणारा पाऊस! त्यामुळे इथल्या नद्या नेहमी भरभरून वाहत असतात आणि सगळी झाडं, हिवाळ्याचे दिवस सोडता, मस्त हिरवीगार असतात. या सतत वाहणार्‍या पाण्याचा कुणी कल्पकतेनं वापर केला नसता तरच नवल होतं!

पाण्याच्या प्रवाहाच्या जोरावर पिठाची गिरणी चालवणं तसंच नद्यांचा व्यापारादी वाहतुकीसाठी वापर करणं हे काही सर्वसामान्य वापर आहेत. नद्यांमधे इथे थोड्या थोड्या अंतरांवर बंधारे घातले आहेत. त्यांना धरणं नाही म्हणता येत कारण त्यांची उंची खूपच कमी असते. नदीचं पाणी त्यामागे अडतं आणि बंधारा भरला की त्यावरून वाहू लागतं. बंधार्‍याच्या तळाशी पन्हळ करून ते पाणी चक्की फिरवायला पूर्वी वापरलं जायचं. बंधार्‍याच्या तळाशी पाण्याच्या प्रवाहाचा जोर अर्थातच जास्त असतो. आता या सगळ्या गिरण्या बंद झाल्या आहेत म्हणा!

पण हे बंधारे बोटींच्या प्रवासाला मात्र अडथळा निर्माण करतात. त्यासाठीच जलपायरीची निर्मिती झाली. जलपायरी (वॉटर लॉक) म्हणजे एक मोठा हौदच असतो ज्यात एका वेळेला २/४ बोटी राहू शकतात. या हौदाला दोन दरवाजे असतात. एक बंधार्‍याच्या खालच्या बाजूला उघडतो तर दुसरा वरच्या.

समजा, एखाद्या बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बंधारा चढून वर जायचं आहे आणि हौदाच्या पाण्याची पातळी बंधार्‍याच्या खालच्या बाजूच्या पाण्याच्या पातळी इतकी आहे. तर ती बोट हौदामधे बंधार्‍याच्या खालच्या दरवाज्याने सहजपणे प्रवेश करू शकते कारण पाण्याची पातळी एकच आहे.  (चित्र-१).

बोटीचा जलपायरीत प्रवेश
चित्र-१: बोटीचा जलपायरीत प्रवेश

मग खालचा दरवाजा बंद करून बंधार्‍याच्या वरच्या दरवाज्याच्या खालच्या बाजूच्या खिडक्या उघडून पाणी हौदामधे आणले जाते. (चित्र-२)

दरवाजाच्या खालच्या बाजूच्या खिडक्यातून येणारं पाणी
चित्र-२: दरवाजाच्या खालच्या बाजूच्या खिडक्यातून येणारं पाणी

पाण्याची पातळी वाढते तशी ती बोटही वर वर पायरी चढल्यासारखी जाते. (चित्र-३)

पाण्याची वाढती पातळी
चित्र-३: पाण्याची वाढती पातळी

थोड्या वेळाने हौदाच्या पाण्याची पातळी आणि बंधार्‍याच्या वरच्या बाजूच्या पाण्याची पातळी एकच होते. (चित्र-४)

जलपायरी भरली
चित्र-४: जलपायरी भरली

मग वरचा दरवाजा उघडणं पण सहज शक्य होतं आणि बोट बाहेर पडते. (चित्र-५ व ६)

जलपायरीचा दुसरा दरवाजा उघडताना
चित्र-५: जलपायरीचा वरचा दरवाजा उघडताना

बोट जलपायरीतून बाहेर
चित्र-६: बोट जलपायरीतून बाहेर

बंधार्‍याच्या वरच्या बाजूकडून खाली जायच्या वेळेस बोट, हौदाची पातळी आणि बंधार्‍याच्या वरची पातळी एकच असेल (नसेल तर हौदाच्या खालच्या बाजूचा दरवाजा बंद करून कधीही पाणी भरता येतंच) तर, सरळ हौदाचा दरवाजा उघडून बोट आत घेतली जाते आणि दरवाजा बंद करून हौदातलं पाणी दुसर्‍या दरवाजाच्या खालच्या खिडक्या उघडून सोडलं जातं. पाण्याची पातळी खाली जाता जाता बोटही खाली खाली जाते, म्हणजेच पायरी उतरते. मग खालच्या बाजूचा दरवाजा उघडून बोटीला बाहेर काढलं जातं.

अशा जलपायर्‍या यूकेभर जागोजाग आहेत आणि अजूनही चालू आहेत. पण एका जलपायरीने फार फार तर ७-८ फूट उंच चढता येतं. त्यापेक्षा जास्त उंच एका पायरीत जाणं फारच धोक्याचं आहे. अशा वेळेला एका पुढे एक अशा अनेक पायर्‍या, म्हणजे जलजिना, करून ते साधता येतं. असा एक जलजिना स्कॉटलंड मधे फोर्ट विल्यम गावाजवळील बानाव्ही या खेडेगावात आहे (चित्र-७). त्या जिन्याला नेपच्युनचा जिना म्हणतात.

नेपच्युनचा जिना
चित्र-७: नेपच्युनचा जिना

या जिन्याला एका पुढे एक अशा ८ पायर्‍या आहेत. एकूण चढण ६४ फुटांची आहे. सगळा जिना चढून जायला दीड तास लागतो. चित्र-७ मधे एक उंच शिडाची बोट वर चढताना दिसते आहे. अशी उंच शिडाची बोट अलिकडे असलेल्या रस्त्यावरच्या पुलाखालून आणि त्याच्याही अलिकडील रेल्वेच्या पुलाखालून (चित्रात हा पूल अर्धवट दिसतोय) कशी जाईल असा रास्त प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं उत्तर असं आहे की हे दोन्ही पूल तात्पुरते फिरवून बाजूला करायची यंत्रणा आहे. बोट गेली की ते पूल पूर्ववत केले जातात.

असाच अजून एक जिना स्कॉटलंड मधेच फॉलकर्क या गावामधे होता. त्याच्या एकूण ११ पायर्‍यातून ११५ फुटांची उंची गाठली जायची. हा जिना फोर्थ व क्लाईड कालवा ( फोर्थ व क्लाईड ही नद्यांची नावं आहेत) व युनियन कालवा यांना जोडायचा आणि तो दीड किलोमीटर लांब पसरलेला होता. १९३३ मधे तो बंद करण्यात आला आणि त्यामुळे कालव्यांमधील दळणवळण बंद झालं.

ते दळणवळण पूर्ववत करण्याचा विचार १९९४ मधे सुरू झाला आणि एका अभिनव जलचक्राची निर्मिती झाली. हे चक्र दोन हात असलेल्या पंख्यासारखं दिसतं (चित्र-८).

फॉलकर्क चक्र
चित्र-८: जलचक्र

प्रत्येक हातात एक बोट मावण्याइतका हौद असतो. या दोन्ही हौदात, जेव्हा बोट नसते तेव्हा, पूर्ण पाणी भरलेलं असतं. प्रत्येक हौदात ५ लाख लिटर पाणी असतं. दोन्ही हातांचं वजन (दोन्ही हौद भरलेले असताना आणि एकही बोट नसताना) एकच असल्यामुळे हे चक्र फिरवायला १.५ युनिट इतकी कमी विद्युतशक्ती लागते. वरच्या कालव्यापासून एक पन्हळ जोडून ती या जलचक्रापर्यंत आणली आहे (चित्र-९). बोट या पन्हळीतून चक्राच्या हौदात प्रवेश करते.

वरच्या कालव्याकडून येणारी पन्हळ
चित्र-८: वरच्या कालव्याकडून येणारी पन्हळ

हे चक्र आर्किमिडीजच्या तत्वावर चालते. ते म्हणजे, जेव्हा एखादी बोट हौदात प्रवेश करते तेव्हा तिचं जितकं वजन कमी होतं ते नेमकं बाजूला सरलेल्या पाण्याच्या वजनाइतकं असतं. म्हणजेच, बोट हौदात असली काय किंवा नसली काय हौदाचं एकूण वजन तितकंच रहातं. हे चक्र फिरून वरचा हौद खाली व खालचा वर व्हायला फक्त ४ मिनिटं लागतात (चित्र-१०). जसजसा हात फिरायला लागतो तसतशी हौदाच्या खालची चाकं फिरतात व हौद कायम जमिनीला समांतर ठेवला जातो.

चक्र फिरताना
चित्र-१०: जलचक्र फिरताना

टीपः नेपच्युनच्या जिन्याचं चित्र आंतरजालावरून साभार, बाकीची चित्रं मी काढलेली आहेत.

अधिक माहिती:

नेपच्युनच्या जिन्याबद्दलची अधिक माहिती: https://en.wikipedia.org/wiki/Neptune%27s_Staircase

फॉलकर्क चक्राची अधिक माहिती: http://www.thefalkirkwheel.co.uk/about-the-wheel---- समाप्त ---

Tuesday, August 20, 2013

तेथे पाहिजे जातीचे.. भाग-५ (अंतिम)

तेथे पाहिजे जातीचे - मागील भाग इथे वाचा..  भाग-१, भाग-२, भाग-३ , भाग-४

'अरे सदा! काय केलं नक्की तुम्ही लोकांनी? स्टुअर्ट इज सिंपली जंपिंग अप-एन-डाऊन!.. थयथयाट करतोय तिकडे!'.. सीईओनं थयथयाट केला.

'राकेश, तो साला चालू आहे एक नंबरचा! नुसती ठेच लागली तरी ट्रकनं उडवल्यासारखा विव्हळेल.'

'मग काय झालंय नक्की? आँ?'

'तसं काही विशेष नाहीये. एका प्रोग्रॅम मधे बग आलाय. आणि बग तर काय सारखे येत जात असतात.'

'काय बग आहे?'

'तो शेअरिट नावाचा प्रोग्रॅम स्क्रीनवर कचरा दाखवतोय म्हणे!'

'बिझनेस इंपॅक्ट काय आहे त्याचा?'

'कुणालाही शेअर ट्रेडिंग करता येत नाहीये.'.. प्रोजेक्ट मॅनेजर व न्यूज रिपोर्टर यांचे परस्पर विरुद्ध गुणधर्म आहेत. जबरदस्त भूकंप होऊन अर्ध पुणं गाडलं गेलं तरी सीईओला प्रोजेक्ट मॅनेजर 'काही विशेष नाही! जमीन थोडी हलली आणि एक दोन घरं पडलीयेत' यापेक्षा जास्त हादरा देणार नाही. न्यूज रिपोर्टर अर्ध पुणं गाडलं गेलं तर जगाचा अंत झाल्याचा आव आणतील आणि वर निर्लज्जपणे जमिनदोस्त घरमालकाला 'आपको कैसा लग रहा है?' विचारतील.

'हां! नाऊ द होल स्टोरी इज कमिंग आउट! अरे बिझनेस झोपला ना म्हणजे त्यांचा! शो स्टॉपर आहे हा बग! विशेष नाहीये काय म्हणतोस? तुला काही लाज?'

'उलट मला ही आपली बॉटमलाईन वाढवायची संधी वाटतेय. तसंही कॉन्ट्रॅक्ट तर जवळपास गेलेलंच आहे!''आपल्या नाचक्कीची बॉटमलाईन वाढतेय इथे!'

'ती स्टुअर्ट करतोच आहे. पण हे बघ! त्याला दोन माणसं ताबडतोब पाठवून हवी आहेत, बग सोडवायला. म्हणजे दोन माणसांचं बिलिंग चालू होईल लगेच!'

'आणि प्रोजेक्ट वेळेवर करायचं काय?'

'त्याची मी स्टुअर्टला कल्पना दिली आहे. तो म्हणाला... वि कॅन्ट मेक अ‍ॅन ऑम्लेट विदाउट ब्रेकिंग फ्यु एग्ज! आधी बगाचं बघा!'

'ठीक आहे. दो लल्लू भेज दो!'

'राकेश, ते लल्लूंचं काम नाहीये. तेथे पाहिजे जातीचे!'

=========================================================

संगिताने आणलेला केक 'हॅपी बड्डे'च्या गजरात कापता कापता निखिल म्हणाला.. 'नाऊ आय हॅव द कटिंग केक टेक्नॉलॉजी!'

'सॉरी निखिल! आज मी तुला फक्त अनहॅपी बड्डे म्हणू शकतो'.. सदाने प्रवेश घेऊन तोंडात केकचा तोबरा भरत रसभंग केला.

'का सर? क्वालिटी प्रोसिजर लिहायच्या आहेत?'.. अभयने चोंबडेपणा केला.

'गपे अभय! माझ्यासमोर बोलतो आहेस तोपर्यंत ठीक आहे. क्वालिटी पोलिसांसमोर बोललास तर मिटिंग मधे मला शिव्या बसतात! त्या शेअरिट मधे बग आलाय. स्क्रीनवर नुस्ता कचरा दिसतोय!'

'सर! मॉनिटर खराब झाला असेल.'.. संगितानं अक्कल पाजळली, पण सदाच्या डोळ्यातले भाव बघताच लगेच 'सॉरी' म्हणाली.

'सर पण तो सगळ्यात चांगला टेस्ट केलेला प्रोग्रॅम आहे. असं कसं होईल त्यात?'.. अभय.

'अरे बाबा! टेस्टिंग मधे बग आले नाहीत हे पावसाळ्याच्या दिवसात काही दिवस पाऊस पडला नाही तर लगेच पावसाळ्यात पाऊस पडत नाही असा निष्कर्ष काढण्यासारखं आहे. तेव्हा काय काय चुकू शकेल, काय काय घडू शकेल याचा विचार.. चर्चा करा. विशिष्ट डेटामुळे असं होतंय का? तिथल्या एन्व्हायरेंटची माहिती घ्या.. जितकी मिळेल तितकी माहिती मिळवा. लॉग बघा.'.. सदानं सटासट फर्मानं सोडली.

'सर! तो प्रोग्रॅम लॉग लिहीत नाही.'.. अभयनं काडी घातली.

'का? मी सांगितलं होतं ना? सगळ्या प्रोग्रॅम मधे लॉग लिहीलाच पाहीजे म्हणून?'

'डास पकडायला कोळ्याची जाळी घरभर लावतं का कुणी?.. असं काहींचं म्हणण आहे!'.. अभयने निखिलकडे कटाक्ष टाकत कुठला तरी सूड उगवला.

'आत्ता मला सांगतो आहेस हे? गाडीचं चाक निखळल्यावर सांगणार का चाकाचे नट पिळायचे राहिले होते म्हणून? हा निखिलचा फाजिल आत्मविश्वास काय सांगतो? आँ?.. काय सांगतो? इतकंच की अजून त्याला पुरेसा अनुभव नाही. बाकी कुठल्याही क्षेत्रात अनुभवाने आत्मविश्वास वाढत असेल पण प्रोग्रॅमिंगच्या बाबतीत एकदम उलट!'.. निखिलचा चेहरा एका ओव्हरीत सहा छकड्या बसल्यासारखा झाला.

'लॉग मुळे प्रोग्रॅम स्लो होतो सर! ट्रेड झाल्यापासून ९० सेकंदात तो आपल्याला नाझ्डेकला पाठवायला लागतो.'.. निखिलचा समर्थन करायचा एक दुबळा प्रयत्न!

'बरं झालं तू डॉक्टर नाही झालास. नाही तर सर्दी झाली म्हणून नाक कापायचा सल्ला दिला असतास. मूर्खासारखा लॉग लिहीला तर होईलच प्रोग्रॅम स्लो! लॉग लिहायची टेक्निक्स असतात. श्या! सगळं सोडून मला आधी एक लेक्चर घ्यावं लागणार म्हणजे!'.. सदा कुरकुरला.

'मग आता?'.. संगिता

'आता? आता विश्वात्मके देवे! आधी लेक्चरला चला. मग त्यात लॉग घाला. लॉग नसलेल्या प्रोग्रॅमची यादी द्या मला. आणि स्टुअर्टला दोन माणसं हवी आहेत तिकडे बग सोडवायला. अभय आणि संगिता.. तुम्ही दोघं जाणार आहात. लगेच व्हिसाच्या तयारीला लागा.'

=========================================================

'ए! व्हिसाची काय तयारी करायची असते?'.. अभयनं डबा खाता खाता एक निरुपद्रवी प्रश्न केला.

'किती सूट आणि टाय आहेत तुझ्याकडे?'

'एक सूट आणि दोन टाय! खूप झाले ना?'.. अभयनं चाचरत विचारलं.

'हॅ! एकानं काय होणार? चांगले चार सूट आणि दहा टाय हवेत. नाही तर 'नॉट इनफ टाईज' म्हणून रिजेक्ट करतात.'

'आयला सूट घालून इंटर्व्ह्यूला? मुंबईत तर काय शॉवरला पण घाम येतो!'.. अभयला कल्पनेनेच घाम आला.

'अबे ए! कायतरी फेकू नकोस. ऑफिसरला कुठून कळणारे तुझ्याकडे किती टाय आहेत ते?'

'अरे बाबा! खरंच! ते सगळं बघतात! तुमच्या नावावर पुरेसे पैसे आहेत का? जमीन-जुमला किती?'

'पुरेसे म्हणजे नक्की किती?'.. अभय.

'ते तो ऑफिसर ठरवतो'

'माझ्या नावावर एक अख्खी २५००० रू किमतीची स्कूटर आहे फक्त!'.. अभय चिंताक्रांत झाला.

'पैशाचं इतकं नाही रे! पण टॅक्स भरता की नाही? मागच्या ३ वर्षांची टॅक्स रिटर्न्स जोडायला लागतात.'

'आयला आपल्या टॅक्समधे त्यांचा पण कट असतो का?'

'तुझं लग्न झालंय का? तुझ्या बायकोचं नाव काय? वय काय? पत्ता काय? ती काय करते? असले प्रश्न पण विचारतात.'

'आँ! काय पर्सनल प्रश्न विचारतात लेकाचे! उद्या 'तुम्ही तुमच्या पत्नीशी कधी प्रतारणा केली होती का?' असं विचारलं तर काय सांगणार?'

'तेव्हा सांगायचं माईंड युवर ओन पत्नी म्हणून?'

'हॅ! असले प्रश्न पोलीस स्टेशनात बायको हरवल्याची तक्रार करायला गेलास तरच विचारतील.'

'अरे पण ह्याचं लग्न पण झालेलं नाही... नाही ते कशाला सांगताय उगाच. त्यापेक्षा तुम्ही कधी अतिरेकी होतात काय? तुमचा कुठल्या अतिरेकी संघटनांशी संबंध आला होता काय? त्याबद्दल बोला.'

'याला कुठला अतिरेकी 'हो' म्हणणार आहे? आणि, त्याचं उत्तर तू काहीही दिलंस तरी ते त्यांच्या अतिरेक्याच्या रजिस्टरमधे बघणारच ना तुझं नाव आहे की नाही ते?'

'काय त्रास देतात ना? फक्त तुमचं तिकडे काय काम आहे? कधी जाणार? कधी येणार? असले प्रश्न विचारले तर ठीक आहे.'.. अभय कुरकुरला.

'त्याचं कारण असं आहे की व्हिसा प्रक्रिया भारतीयांनी शक्यतो भारतातच रहावं या साठीच बनवलेली आहे.'

'बरोबर आहे. काही चिल्लर देश आणि स्वर्ग सोडला तर भारतीयांना व्हिसा घेतल्याशिवाय कुणीही दारातसुद्धा उभं करीत नाही.'

'व्हिसा ऑफिसरला तुमच्याबद्दल काय वाटतं माहितीये? तुम्ही कवडीमोलाचे आहात.. तुम्ही एक नंबर चोर, चालू, देशद्रोही, गुन्हेगार, दरिद्री, अस्पृश्य, करबुडवे व थापेबाज आहात.. न्यूयॉर्कच्या गल्लीत झाडू मारायची देखील तुमची लायकी नाही!'

'हा हा! म्हणूनच माझ्या परदेश वार्‍यांपेक्षा व्हिसा ऑफिसच्या वार्‍याच जास्त झाल्यात.'

'व्हिसासाठी काय तयारी करावी?' या सरळसोट प्रश्नाची 'पुण्यातली कुठली शाळा चांगली?' सारखी अनेक उलटसुलट, लांबलचक व असंबद्ध उत्तरं मिळाल्यामुळे अभयला नैराश्य आलं.

=========================================================

'काय सदा? फार काळजीक्रांत दिसतोयंस?'.. एच आर मॅनेजर, प्रिया आगलावे.

'हो ना! ती भावना आठवडाभर न सांगता गायब आहे.'

'कोण भावना?'

'भावना भडकमकर, हैद्राबादची! सुट्टीला म्हणून गेली.. १५ दिवसांपूर्वी. आठवड्यापूर्वी येणार होती. तिच्या मोबाईलवर फोन करतोय.. कुणी उचलतच नाहीये.'

'यू नो व्हॉट? ती येणार पण नाही.'

'आँ? म्हणजे ती परस्पर दुसर्‍या कंपनीत पळालीये असं म्हणायचंय तुम्हाला?'

'एक्झॅक्टली! सहा सहा महिन्यानंतर उड्या मारणार्‍यातली वाटते. जॉईन होऊन सहा महिने झाले असतील ना?'

'अं... हो, नुकतेच झाले मला वाटतं.. पण तशी वाटत नाही हो ती.'

'तुम्हा पुरुषांना नाही कळायचं ते. आम्ही बायका.. एका नजरेत ओळखतो.'

'असेल. असेल. मला तिची फाईल द्या. घरच्या फोनवर फोन करून बघतो आता. काय करणार?'

'बरं.. शोधते.. एम्प्लॉयी नंबर काय तिचा?'

'मॅडम, काय प्रश्न विचारता पण? तुमचा नंबर तरी आठवतो का तुम्हाला?'

'नाही! अरे देवा! इथे तर सगळं एम्प्लॉयी नंबर प्रमाणे ठेवलेलं आहे! मला सगळ्या एक एक करून बघाव्या लागणार म्हणजे.... हं.. ही घे'

'यात तिच्या घरचा नंबर, पत्ता काहीच नाहीये. असं कसं झालं? आपण घेत नाही का ही माहिती?'

'घेतो तर! तिनं फॉर्म भरला नसणार तो. हम्म! तेव्हाच मला शंका यायला पाहीजे होती.'

'मग आता?'

'आता काय? हरी हरी गोविंद गोविंद! नवीन माणूस शोधायला लागा! सिव्ही देऊ?'

'प्रोजेक्ट बंद व्हायची वेळ आली मॅडम.. आता फुटक्या पायपात पाणी सोडून काय करू?'

=========================================================

'मला पूर्वी असं बर्‍याच वेळेला वाटायचं की अमुक अमुक माणूस लायकी नसताना, काडीची अक्कल नसताना कसा काय इतका वर गेला? साध्या साध्या गोष्टी सुधरायच्या नाहीत त्याला.. माझ्याकडूनच शिकला सगळ्या! आता बघा! माझ्याही वर गेला! साल्यानं सॉलिड वशिला लावला असणार वरती!'... पेंगुळलेला सदा 'सिव्ही: मंत्र व तंत्र' यावरचं एका रोजनदारीवरच्या सल्लागाराचं आख्यान ऐकत होता. वेळोवेळी आयोजित केलेल्या असल्या बुद्धी-वादळातून फक्त वादळी झोप यायची. या वेळच्या 'धंदा कसा वाढवता येईल' या वादळात प्रिया मॅडमनी लोकांना सिव्ही चांगला लिहीण्याचं शिक्षण द्यायला पाहीजे अशी फुंकर मारली आणि सीईओला ती मोठी वावटळ भासली. अशा वादळातून सीईओला काही तरी ठोस उपाय योजना केल्याचं समाधान मिळायचं, सल्लागाराला भरपूर पैसे मिळायचे, नेहमीच्या कामातून सुट्टी मिळाल्यामुळे लोकांचाही वेळ सुखात जायचा. विन विन सिच्युएशन म्हणतात ती हीच!

'ही जी वृत्ती आहे ना.. ज्या मधे आपण दुसर्‍याचं यश 'वशिला' नावाखाली टाकून देतो आणि वर 'आपल्याला नाही बुवा वशिलेबाजी करायला आवडत' असं आपल्या वैगुण्यांचं समर्थन करतो.. तिला 'कोल्ह्याला द्राक्षं आंबट' अशी समर्पक म्हण आहे! दुसर्‍याला नावं ठेवण्यापेक्षा स्वतःचं योग्य मार्केटिंग करायला शिका. जो पर्यंत तुम्ही भर चौकात उभं राहून तुम्ही काय काय केलंय ते जगाला मोठमोठ्यांदा ओरडून सांगत नाही तो पर्यंत तुम्हाला कुणी विचारणार नाही.. लक्षात ठेवा.. ओरडणार्‍याचे फुटाणे पण विकले जातात न ओरडणार्‍याचे बेदाणे पण नाही. तर तुमचा सिव्ही हा तुमच्या मार्केटिंगचा पहिला चौक आहे. नुसत्या उत्तम सिव्हीमुळे तुम्ही हजारांमधे उठून दिसू शकता. उदा. एकाच्या सिव्हीचा हा सारांश ऐका....'

'मी अर्थशास्त्र आणि उद्योग व्यवस्थापन क्षेत्रातला पदवीधर आहे. मला त्यातला सुमारे २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. माझं संघटना बांधण्याचं आणि त्या चालविण्याचं कौशल्य असामान्य आहे. माझ्याकडे उत्तम नेतृत्व गुण आहेत. संघटना बांधणे, तिचं लक्ष्य व उद्देश ठरवणे, प्रचार करणे, त्यासाठी योग्य माणसं व पैसे जमविणे, तिचा सर्व कारभार पहाणे, संघटनेतर्फे विविध उपक्रम हाती घेणे, त्या पार पाडण्याच्या योजना आखणे, योजनेच्या गरजेप्रमाणे योग्य त्या माणसांची दल उभारणे, त्यातला प्रत्येक जण कुठलं काम कधी करेल ते आखणे आणि त्याप्रमाणे सर्व कामं अबाधितपणे चालू आहेत ना ते बघणे, उपक्रमांना लागणारी सामग्री मिळविणे, वेगवेगळी सामग्री विकणार्‍या व्यापार्‍यांचं व्यवस्थापन करणे, गरजेप्रमाणे प्रत्येकाला मार्गदर्शन करणे, त्यांना चांगलं काम करण्याबद्दल प्रवृत्त करणे, त्यांना वेळोवेळी आवश्यक ते शिक्षण देण्याची तजवीज करणे. काही उपक्रम विविध देशात विविध दलांकडून करून घ्यावे लागतात, त्यामुळे त्या दलांमधे सुसंवाद साधण्यापासून ते भाषांमुळे व संस्कृतीमुळे येणार्‍या अडचणी सोडविण्यापर्यंत सर्व काही केलेले आहे.'

'कसा वाटला?'

'फारच भारी आहे. मला असा माणूस हवाच आहे कधीपासून.. चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून!'.. कंपनीतल्या अनेक नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स बद्दलचा सीईओचा सल असा उफाळून आला.

'हा माणूस खूप सिनियर वाटतोय.. प्रोजेक्ट लेव्हलला येणारच नाही तो. पण सिव्ही जबरी आहे.'.. सदाला दु:ख झालं. बाकीच्या मॅनेजरांचं पण असंच काहीसं मत पडलं.

'हा एका प्रसिद्ध व्यक्तीचा सिव्ही आहे. कुणाचा असेल? काही अंदाज?'.. सल्लागाराने खरोखरीचं बुद्धी-वादळ चालू केलं.

अण्णा हजारे पासून स्टिव्ह जॉब्ज पर्यंत सर्व नावं घेऊन झाली. सल्लागाराच्या आविर्भावावरून तो सिव्ही अशा कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तीचा नव्हता.

'ओसामा बिन लादेन'.. सल्लागाराने सर्वांना गार केलं आणि प्रियाने 'दॅट प्रुव्हज माय पॉईंट' अशी नजर फेकली.

=========================================================

'सर! इथे तो प्रोग्रॅम व्यवस्थित चालतोय. आम्ही परत सगळ्या टेस्ट्स केल्या.'.. हताश स्वरात अभय म्हणाला.

'हम्म! अरे ते हा प्रोग्रॅम कुठल्या ओएस खाली चालवतात? त्याचं व्हर्जन काय? आपला प्रोग्रॅम कुठल्या डिएलेल वापरतो? त्यांची व्हर्जनं काय? ही माहिती काढा.'.. सदाने व्हर्जनबत्ती लावली.

'ही खूप मोठी यादी झाली, खूप वेळ लागेल ही माहिती जमवायला.. आपल्याला आणि त्यांना पण!'

'मग प्रश्न सुटत नाही म्हणून देव पाण्यात घालून बसणार आहात का? आँ? हां! आणि आयईचं व्हर्जन पण बघा!'

'सर, आपल्याला आयई लागत नाही.'

'ते मला सांगू नकोस रे! विंडोजचं सगळं शेकी असतं. तुला व्हर्जन काढायला पैसे पडणार आहेत का?'

'नाही सर!'

सदानं दोन मिनिटं हवेत बघितलं नि विचारलं.. 'या प्रोग्रॅमला स्क्रीनवर दाखवायचा डेटा कुठून मिळतो रे? डेटाबेस मधून?'

'नाही सर! त्याला दुसरा प्रोग्रॅम पाठवतो.. नेटवर्क वरून'

'हां! मग तो कचरा पाठवत असेल. त्याचं व्हर्जन काय? त्याचा लॉग बघा! तो तरी लॉग लिहीतो का?'

'सर! तो मी लिहीलेला प्रोग्रॅम आहे. मी त्याचा लॉग पाठवायला सांगतो.'.. अभयनं अभिमानानं सांगितलं.

=========================================================

'काय नालायक लोक आहेत साले!'.. सदा रेवती समोर फणफणला.

'श्या! आपण जेवायला बाहेर आलो तरी तू तुझ्या कामातून बाहेर काही येत नाहीस'.. रेवती फणफणली.

'सॉरी रेवती!.. अम्म्म... नवीन ड्रेस छान दिसतोय तुला'

'६ महिने जुना आहे. आत्तापर्यंत मी तो तीन वेळा घातलाय आणि तिन्ही वेळेला तू हेच म्हणाला आहेस'

'बोंबला!'.. सदाची सारवासारव बोंबलली.

'त्यापेक्षा तू तुझ्या मनातली मळमळ बाहेर काढ.. कामाचं काय झालं ते सांग.'

'अगं असं बघ! तुला एखादी गोष्ट करायला सांगितली.. तिचं महत्व सांगून.. तर तू ती करशील की नाही?'

'अर्थातच करेन!'

'साधं.. प्रत्येक प्रोग्रॅम मधे लॉग घालायला सांगितला होता, त्याचं महत्व पटवून देऊन.. तर तो घालायचा कंटाळा केला! बोटं झिजणार होती का? कॉलेजातनं नुस्त्या डिग्र्या घेऊन बाहेर पडलेली शेंबडी पोरं ही! त्यांना काय माहिती खरे प्रॉब्लेम काय असतात नि ते कसे सोडवायचे? नुसतं पाठ करून पास झालेत साले! इथे १० १० वर्ष घासून, रात्रीचा दिवस करून आलेल्या अनुभवांचं सार त्यांना आयतं मिळतं.. त्याचं महत्व पण समजत नाही.'

'देशबंधूंनो विचार करा.. त्राग्यापेक्षा क्वालिटी करा.'

'काही सांगू नकोस.. क्वालिटी केल्यामुळे माठाड लोकांना अक्कल येते हे ऑरगॅनिक फूड प्रकृतीला उत्तम असतं म्हणण्याइतकंच धूळफेकी वक्तव्य आहे.'

'अरे प्रोग्रॅम कसा लिहावा? त्यात काय असणं आवश्यक आहे असं डॉक्युमेंट करून त्या प्रमाणेच सगळ्यांना प्रोग्रॅम लिहायला सांगायचं.'

'अगं इथं मी घसा खरवडून सांगतो.. तरी ते ऐकत नाहीत. ते कुठं तरी लिहून ठेवल्यामुळे लोकांना साक्षात्कार होणारे?'

'नाही. पण त्या डॉक्युमेंट प्रमाणे प्रोग्रॅम लिहीला आहे की नाही हे दुसरा तपासू शकतो.'

'वा! वा! तपासणार कोण? त्यांच्यातलाच एक ना? ते एकमेकांचे प्रोग्रॅम सर्टिफाय करतील न बघता! तुला गंमत सांगतो.. अधू दृष्टी असलेल्यांना लायसन्स मिळत नाही हा आरटीओचा नियम माहिती आहे ना तुला? फार महत्वाचा आणि चांगला नियम आहे. आता दृष्टी चांगली आहे की नाही यासाठी डॉक्टरचं सर्टिफिकेट लावायला लागतं. आणि ते आरटीओच्या बाहेरच बसलेले डॉक्टर काहीही न बघता पैसे घेऊन अर्ध्या मिन्टात सर्टिफिकेट देतात. त्यामुळे ते क्वालिटी वगैरे क्लायंटला गंडवायला ठीके पण खरी क्वालिटी माणसाला त्याच्या कामाचा अभिमान वाटल्याशिवाय येणार नाही.'

=========================================================

'सर, तुमच्याशी बोलायचं होतं'.. संगिता दारातून आली.

'हं बोल! सुट्टी पाहीजे आहे? कुणाच्या कुणाचं तरी लग्न आहे, रत्नागिरीला जायचंय! अं?'.. सदाची टिंगल.

'नाही सर! मी त्या प्रोग्रॅम बद्दल बोलायला आले होते.'.. संगिताच्या आवाजात दु:ख भरलं.

'असं होय! सॉरी, बोल!'

'सर, तो प्रोग्रॅम ज्या पीसीवर चालतो तो कुठल्या दिशेला ठेवलाय?'

'संगिता! प्लीज! ज्युनियर कोडग्याच्या बगामुळे फक्त त्याचंच डोकं फिरतं पण सीनियर कोडग्याच्या एका बगात अख्ख्या टीमचं डोकं फिरवायची ताकद असते हे पटायला लागलंय ना आता?'

'हो सर, पण वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे दक्षिणेला तोंड केलेले पीसी त्रास देणार!'

'संगिता, कंप्युटर मधे वास्तुशास्त्राचा व्हायरस जाऊ शकतो असं वाटतं का तुला?'

'अंss नाही... हो.. सर! कर्णिके वर तो प्रोग्रॅम कचरा दाखवतो असं वाटतंय मला.'

'मग त्याचा आणि वास्तुशास्त्राचा काय संबंध?'

'सर, आपल्या ऑफिसातली फक्त कर्णिकाच दक्षिणमुखी आहे. बाकी सगळ्यांची तोंड दुसरीकडे आहेत.'

'आँ? तुला खात्री आहे?'

'हो सर! आत्ता आम्ही परत बघितलं.'

'अरे वा! वास्तुशास्त्र मरू दे. निदान तो बग रिप्रोड्यूस तरी होतोय कुठे तरी'.. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग.. तेव्हढ्यात सदाच्या फोनने गळा काढला.

'हॅलो, सदा सप्रे बोलतोय'

'हॅ..... खर्रखर्रघूंघूं मी.... खर्रखर्रघूंघूं ....तोय'

'आं? कोण बोलतंय?'.. सदाचा आवाज चढला. सदा उठून खिडकीपाशी गेला. वेगवेगळ्या दिशेला तोंड करून कुठे नीट ऐकू येतंय ते बघत होता.

'सर दक्षिणेला नका तोंड करू'.. मधेच संगितानं दक्षिणजप लावला.

बर्‍याच वेळा आं आं करून सदाला इतकंच समजलं की सतीश भडकमकर, भावनाचा भाऊ हैद्राबादहून बोलत होता आणि भावनाला अ‍ॅक्सिडेंट झाल्यामुळे ती अजून महिनाभर येणार नव्हती.

'सर! मला वाटतंय मला समजला त्या प्रोग्रॅमचा प्रॉब्लेम!'

'आता कुठल्या नियमाचा भंग झाला?'

'सर! लाँग डिस्टन्स! लाँग डिस्टन्स!'

'आँ?'

'सर तिकडे तो प्रोग्रॅम शिकागो मधे चालवतात. बाकी सगळे प्रोग्रॅम न्यूयॉर्कमधे आहेत.'

'मग?'

'शिकागो न्यूयॉर्क नेटवर्क हे ऑफिसमधल्या नेटवर्कपेक्षा स्लो आहे ना.'.. एक टिशू उपसल्यावर जसा दुसरा हजर होतो तसे तिच्या डोक्यात एका नंतर एक विचार हजर होत होते.

'हो आहे.'

'हां! म्हणजे स्लो नेटवर्कवर डेटा पाठवणारा प्रोग्रॅम बदाबदा डेटा पाठवू शकत नाही त्यामुळे वेगवेगळ्या पॅकेटचा डेटा ओव्हरराईट होतोय. थोडक्यात प्रोग्रॅममधे डेटा करप्ट होतोय.'

'आत्ता पहिल्यांदाच तू काहीतरी सेन्सिबल बोललीस!'

'हां आणि आपली कर्णिका पण आपल्या मेन नेटवर्कवर नाहीये. ती मुद्दाम मोडेमने ऑफिसला जोडली आहे. म्हणून तो प्रोग्रॅम कर्णिकावर पण कचरा दाखवतो.'

'यू आर सिंपली ब्रिलियंट, संगिता! तू एक मोठ्ठं कोडं सोडवलंयस'.

शो स्टॉपर बग लवकर सुटल्यामुळे तिकडे क्लायंट प्रचंड खूश झाला. त्याचं पर्यवसान गोंधळे सॉफ्टवेअरच्या लोकांच्या कुवती विषयी सतत शंका घेणार्‍या स्टुअर्टच्या हकालपट्टी आणि त्यांच्या बरोबरचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यात झालं.

-- समाप्त --

Tuesday, June 4, 2013

तेथे पाहिजे जातीचे.. भाग-४

तेथे पाहिजे जातीचे - मागील भाग इथे वाचा..  भाग-१, भाग-२, भाग-३


'आपला क्लायंट, बिग गेट कॉर्पोरेशनबद्दलच्या एका बातमीसंबंधी ही मिटींग आहे. तसं तुम्हाला एचार व अ‍ॅडमिनच्या कृपेने नको ती माहिती नको तेव्हा समजत असतेच, तरी पण मी ही मिटिंग बोलावली आहे कारण त्याचा आपल्या पुढील कामावर मुसळधार परिणाम होणार आहे. तर ती बातमी अशी.. बिग गेट कॉर्पोरेशनला TDH Inc, म्हणजेच Tom Dick and Harry Incorporated टेकओव्हर करतेय.'..  सदाने टीम मिटिंगमधे गौप्यस्फोट केला.

'कुठे?'.. संगिता व्हॉट्सपमधून उठली आणि मिटिंगमधे खसखस पिकली.

'काय कुठे?'.. रागदारी आळवणार्‍याला आर्डी बर्मनचं 'मेरी जाँ मैने कहां' हे भसाड्या आवाजातलं गाणं म्हणायची विनंती केल्यासारखं सदाला वाटलं.

'ओव्हरटेक कुठे?'

'संगिताच्या मूलभूत गरजेत मोबाईल फार वरती आहे. ही बया तर मोबाईल घेऊन अंघोळीला पण जाईल! लग्न झाल्यावर काय होईल हिच्या नवर्‍याचं कुणास ठाऊक!'.. निखिल वैतागून म्हणाला.

'त्याची तुला काळजी नकोय! मी मोबाईल-फ्रेन्डली नवरा करेन!'.. संगिता फणकारली.

'तुकारामांच्या वेळेला पण मोबाईल होते. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' हा अभंग त्याचा पुरावा आहे.'.. अभयने एक फिरत्या मेलमधला विनोद खपवला.

'संगिता, To Let व Too Late मधे जितका फरक आहे तितका ओव्हरटेक व टेकओव्हर मधे आहे!'.. सदा कसाबसा संयम ठेवीत म्हणाला.

'त्यापेक्षा कटलेट आणि लेटकट हे जास्त चांगलं उदाहरण आहे!'.. निखिल पर्फेक्शनिस्ट होण्याची पराकाष्ठा करतो पण त्याला हे माहीत नाही की पर्फेक्शन मिळालं तरी ते न समजण्याइतका पर्फेक्शनिस्ट इम्पर्फेक्ट असतो.

'अय्या, पण मला खरंच ओव्हरटेक ऐकू आलं! तुला येत नाही का कधी चुकीचं ऐकू?'

'संगिता! निखिल! यू बोथ शटप! तुमचं भांडण ऐकायला नंतर मी जमवेन लोक.. तिकीट लावून!'.. सदा ओरडला.

'सॉरी सर!'.. दोघे एकदम म्हणाले.

'सर टेकओव्हर Tom Dick and Harry Incorporated नं केलं काय किंवा तिलोत्तमा दुर्योधन अँड हिरण्यकश्यपू इनकॉर्पोरेटेडनं केलं काय.. त्यामुळे आपल्याला काय फरक पडणारे? स्टुअर्ट तर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचा दम देऊन गेलाय ना? ऑलरेडी?'.. अभयनं गाडी रुळावर आणायला एक लेटकट मारला.

'सगळं सांगणारे! मधे मधे स्ट्रॅटेजिक ब्रेक घेतले नाहीत तर सगळं सांगणारे! तर TDH ला स्टुअर्टने GSCचं काम काढून घेऊन ते मद्रासच्या एका कंपनीला द्यायला सांगितलंय! GSC म्हणजे कोण बरं संगिता?'.. संगिताचा पुन्हा मोबाईलशी चाललेला चाळा पाहून सदाचा संयम उंच कड्यावर एका हाताने कसंबसं लोंबकळणार्‍या हीरो इतपत झाला.

'आँ! BSC म्हणजे? बॅचलर ऑफ सायन्स ना सर?'.. संगिता गोंधळलेल्या चेहर्‍यानं विचारलं.

'संगिता! तू तो मोबाईल माझ्याकडे दे बरं! काही जगबुडी येणार नाही लगेच! '.. सदानं संगिताचा मोबाईल घेतला आणि म्हणाला.. 'हं, आता सांग.. GSC म्हणजे कोण बरं?'

'सर GSC म्हणजे मला माहिती आहे.. आपलीच कंपनी.. गोंधळे सॉफ्टवेअर कन्सलटन्ट! मघाशी मला चुकून BSC ऐकू आलं.'

'कर्रेक्ट! आता नीट लक्ष दे मी काय सांगतोय त्याच्याकडे! तर TDH ला स्टुअर्टने GSCचं काम काढून घेऊन ते मद्रासच्या एका कंपनीला द्यायला सांगितलंय!'

'का?'.. संगिता.

'का काय? त्याचं असेल काहीतरी साटलोटं त्यांच्याशी!'

'हम्म्म! म्हणूनच तो आमच्या कामाला मुद्दाम शिव्या देत होता तर!'.. संगिताला खुनाच्या खटल्यातून निर्दोष सुटल्याचा आनंद झाला.

'त्याचा काहीही संबंध नाही! तू एका हाताने मोबाईलशी खेळत दुसर्‍या हाताने प्रोग्रॅमिंग करत राहिलीस तर या पुढेही शिव्या खाव्याच लागतील!'.. सदानं तिला जमिनीवर आणला.. इतरांनी पोटभर हसून संमती दर्शवली.

'पण मग आपल्या हातात आता काय आहे?'.. अभय.

'अरे आत्ताच तर वनडे मॅचचा खरा शेवट आलाय. शेवटच्या ५ ओव्हरीत ४७ धावा करायचं आव्हान आहे. शेवटचं प्रोजेक्ट असं करायचं की त्यांना बोटच काय नख ठेवायला पण जागा राहता कामा नये. समजलं? मग मी बघतो TDH कॉन्ट्रॅक्ट कसं कॅन्सल करतो ते!'.. सदानं फुशारकी मारली. अशावेळी सगळ्या मॅनेजरांना वनडे क्रिकेटचच उदाहरण का सुचतं देव जाणे!

'उलट मला असं वाटतंय की शेवटच्या प्रोजेक्टला आपण दुप्पट वेळ लावावा.. म्हणजे नवीन लोकांना घोळात घ्यायला जरा वेळ मिळेल आपल्याला'.. निखिलचा एक चौकटी बाहेरचा विचार.

'अरे त्यांचे कान फुंकायला स्टुअर्ट तिथंच बसलाय. आपलं कोण आहे तिकडे? काम चांगलं आणि वेळेत झालं नाही तर वर्ष घालवलंस तरी त्यांच्या साध्या झाडुवालीला पण घोळात घेता येणार नाही. ते काही नाही. हे प्रोजेक्ट आपण एक महीना आधी संपवायचंच! चार महिन्याचं तीन महिन्यात! ते सुद्धा एकदम पर्फेक्ट!'.. सदाने विझलेल्या टीमला जोशपूर्ण हवा सोडून चेतवायचा प्रयत्न केला.

'कितीही वेळ दिला तरी निखिलला कुणालाही घोळात घेता येणार नाही'.. संगितानं कुठला तरी वचपा काढला.

'काय बुरसटलेली विचारसरणी आहे यांची?'.. मनातल्या मनात निखिल पुटपुटला.. आपल्या विचारांशी इतरांचे विचार जुळले नाही तर खुशाल बुरसटलेली विचारसरणी असा शिक्का मारायला तो कमी नाही करायचा.

'सर, पण आत्ताच आम्ही रोज दहा दहा तास घालतो. अजून किती घालणार?'.. एक अतृप्त आत्मा.

'सर घरी जायला फार रात्र होईल मग!'.. एक 'सातच्या आत घरात' चा आदेश असलेली कन्यका!

'अरे तुम्ही आत्ताच धीर सोडला तर कसं होईल? आपण शनिवार रविवार काम करू. आपल्याला हा एक चान्स मिळालाय तो घ्यायचा. वुई हॅव अ रेप्युटेशन टू प्रोटेक्ट!'

'सर पण आम्हाला घरच्यांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. घरचे चिडचिड करतात. मग आमची पण होते. एचारने वर्क-लाईफ बॅलन्स ठेवू वगैरे सांगितलं.. त्याचं काय?.. त्याला काहीच कशी किंमत देत नाही तुम्ही?'

'जास्ती वेळ हवा असेल तर घड्याळं घ्या दोन तीन'.. अभयनं षटकार ठोकला.

'आयॅम जस्ट डुईंग माय जॉब!'.. कचाट्यात सापडलेल्या हॉलिवुड हीरोसारखा दात विचकत सदा म्हणाला.. 'तुम्हाला काय वाटतं? मी काय फक्त तुम्हाला कामाला लावतो? मला का घर नाही? मला का संसार नाही? मला का पोरंबाळं नाहीत?'.. सदाला अचानक साने गुरुजींनी झपाटलं.

'सर आपल्याला अजून माणसं नाही का घेता येणार?'.. संगितानं प्रथमच सेन्सिबल प्रश्न विचारला.

'हो. तो प्रयत्न चाललाय माझा! आपल्या प्रोजेक्ट मधे एक मॉड्युल आहे.. तीन महिन्याचं काम असलेलं. माझा विचार आहे.. तीन माणसं लावून ते एका महिन्यात संपवायचं!'

'जन्म देण्याचं काम ९ बायका एका महिन्यात करू शकत नाहीत.'.. निखिल मधला पर्फेक्शनिस्ट परत एकदा सरसावला.

'बाय द वे, संगिता! उद्या ३ वाजता TDH मधून डॉन ब्रॅडमन येणार आहे. तू विमानतळावर जा त्यांना आणायला. मी तुला मेल पाठवली आहे त्याबद्दल.'.. सदा निखिलला काही तरी खरमरीत बोलणार होता पण त्यानं स्वतःला आवरलं. आत्ता निखिलला दुखवणं त्याला परवडलं नसतं.
=========================================================

'कसला विचार करतोयस इतका? मला सांग. आपण दोघे मार्ग काढू!'.. जेवायच्या ऐवजी शून्यात बघणार्‍या सदाला रेवतीनं दिलासा दिला.

'अगं! तीन महिन्याचं काम तीन माणसं लावून एका महिन्यात संपवायचंय!'

'एका पोराला जन्माला घालायचं काम ९ बायका एका महिन्यात करू शकत नाहीत ते माहिती आहे नं तुला?'

'तू मार्ग काढते आहेस की डोस पाजते आहेस?'.. सदा पिसाळला.

'ओ सॉरी सॉरी! मग ते काम संपवायला प्रॉब्लेम काय आहे?'

'३ माणसं घ्यायची आहेत!'

'मग घ्यायला प्रॉब्लेम काय आहे?'

'बजेट नाहीये!'

'ओह! मग?'

'ते जाऊ दे! मी पटवेन बॉसला कसतरी! आपण दुसर्‍या विषयावर बोलू... माझ्या एका मित्राशी बोलत होतो मगाशी. त्यांच्या कंपनीला क्वालिटी सर्टिफिकेशन मिळालं ६ महिन्यांपूर्वी! तो म्हणत होता.. बुडत्या कंपनीला क्वालिटीच्या काडीचा काडीचाही आधार मिळत नाही म्हणून!'.. सदानं क्वालिटीवरचा आपला गंभीर संशय व्यक्त केला.

'लगेच कसा परिणाम दिसायला लागेल? घर एकदा स्वच्छ करून भागतं का? परत परत करत रहावं लागतं! यू गॉट टू कीप रनिंग टू स्टे इन द सेम प्लेस!'.. रेवतीनं एक क्लिशे फेकला.

'म्हणजे परत परत सर्टिफिकेशन?'.. सदाला आता 'घी देखा मगर बडगा नहीं देखा' या म्हणीची यथार्थता पटली.

'नाही रे! परत परत सुधारणा! आणि क्वालिटी सर्टिफिकेशन मिळालं म्हणजे कामाची क्वालिटी चांगली असा अर्थ होत नाही!'.. रेवती

'आँ?'

'असं बघ! शाळेला दादोजी कोंडदेवांचं नाव दिल्याने शिवाजी निर्माण होतात का? होतील का?'

'नाही.'

'तसंच आहे हे! क्वालिटी सर्टिफिकेशन म्हणजे काय? तर तुमचं काम तुम्हीच लिहीलेल्या पद्धती प्रमाणे तुम्ही करता.. प्रत्येक काम करायची तुमची पद्धत ठरलेली आहे.. तुमच्याकडे अंदाधुंदी कारभार नाही. वगैरे! वगैरे!'

'आयला! मग मधमाशा आणि मुंग्यांना ताबडतोब मिळेल की! सर्टिफिकेशन!'

'हो, त्यांनी त्यांच्या प्रोसिजर लिहील्या आणि आयएसओकडे अर्ज केला तर...!'

'घरात झाडू मारणे किंवा गाडी धुणे असल्या घोडाछाप, यांत्रिक कामाची प्रोसिजर लिहीता येतील. पण जिथं अक्कल चालवावी लागते, म्हणजे प्रोग्रॅमिंग वगैरे, अशा कामाची काय डोंबल प्रोसिजर लिहीणार?'

'कुठल्याही कामाची प्रोसिजर लिहीता येते'

'कायच्या काय सांगतेस? समजा, मला एक कविता करायची आहे.. सांग प्रोसिजर!'

'त्यात काय विशेष आहे? एक पेन घ्या, एक कागद घ्या आणि लिहा कविता... झाली प्रोसिजर!'

'हॅ! असल्या प्रोसिजर लिहून पाळल्यामुळे कामाचा दर्जा सुधारतो म्हणणं म्हणजे माळ घातल्यामुळे दारू सुटते म्हणण्यासारखं आहे. मला एक गोष्ट आठवली यावरून.. एक गणितज्ज्ञ असतो. त्याला विचारतात की तुला एक किटली दिली आहे. चहाची पावडर, दूध, साखर इ. इ. सगळं साहित्य दिलेलं आहे, तर तू चहा कसा करशील?'

'सर, रंभा हँग झाली.'.. फोनवर आलेल्या त्या अभद्र बातमीमुळे सदाच्या लांबलचक कथेचं बोन्साय झालं. नाईलाजाने तो ऑफिसात आला आणि थोड्याच वेळात रघू एका परदेशी बाईला घेऊन आला.

'हॅलो! यू मस्ट बी सडॅ! आयॅम डॉन ब्रॅडमन!'.. परदेशी बाईंनी ओळख करून दिली. सदाच्या चेहर्‍यावर हसू पसरलं. 'अरे वा! संगितानं यावेळेला जमवलेलं तर..' त्यानं विचार केला.

'ओ हॅलो! नाईस टू मीट यू डॉन! काय? प्रवास कसा झाला?'

'प्रवास चांगला झाला. पण तुझा माणूस काही मला भेटला नाही विमानतळावर, मग मी माझी माझीच आले.'

'आँ? भेटला नाही? म्हणजे नक्कीच काही तरी घोटाळा झालाय!'.. सदाचा घसा सहारा वाळवंटातला एक दुष्काळग्रस्त प्रदेश झाला. त्यानं मनातल्या मनात संगिताला शिव्या हासडायला आणि ती ऑफिसात घुसायला एकच गाठ पडली.

'सर! तो माणूस काही सापडला नाही मला!'.. संगिता सदाच्या केबिनमधे घुसत म्हणाली आणि त्या बाईने मागे वळून पाहीलं. तिच्याकडे बघून संगिता ओरडली.. 'ही सटवी इथे कशी घुसली? एकदम फ्रॉड आहे सर ही! विमानतळावर माझ्याजवळ येऊन म्हणते कशी.. 'मी डॉन ब्रॅडमन'. डॉन माणसाचं नाव असतं ना हो? मी काय इतकी माठ वाटले काय हिला? मी सरळ कटवलं मग! मागच्या वेळेसारखा घोटाळा नव्हता करायचा मला!'.. आणि सदा हँग झाला.

'संगिता! D o n, डॉन! हे माणसाचं नाव असतं. D a w n, डॉन! हे 'बाई'माणसाचं नाव असतं! ते स्पेलिंग Dawn आहे गं बाई! मेल नीट वाचली असतीस तर तुला समजलं असतं.'
=========================================================

'मॅडम, मला अर्जंट ३ माणसं घ्यायचीयेत.. सी प्लस प्लस येणारे, ग्रॅज्युएट, हुशार, २ वर्षांचा अनुभव असणारे हवेत. माझ्याकडे सिव्ही पाठवा लगेच.'.. सदाने एचार मॅनेजर प्रिया आगलावेंना साकडं घातलं. 

'ओह! ३ माणसं कशासाठी?'.. मॅडमच्या प्रश्नावर सदाच्या डोक्यात एक तिरसट उत्तर चमकलं.. 'मला खांदा द्यायला'

'एक ३ महिन्याचं काम आहे ते मला एका महिन्यात संपवायचंय!'

'आय सी! ते.. अं.. ९ बायकांना एका महिन्यात जन्म देता येत नाही ते माहिती असेलच ना तुला!'

'पण ९ बायका एका महिन्यात ९ बाळं जन्माला घालू शकतात ते तुम्हाला माहिती आहे ना? हा हा हा!'.. सदाच्या डोक्याच्या कुकरची शिट्टी उडाली.

'बरं, बजेट आहे का तुझ्याकडे?'.. त्यावर सदानं अशा काही नजरेनं पाहीलं की मॅडमना लगेचच आपण चुकीचा प्रश्न विचारल्याचं लक्षात आलं... 'रिलॅक्स! रिलॅक्स! मी गंमत करत होते. खरं सांगायचं तर माझ्याकडे माणूसच नाहीये मोकळा! तू असं कर! माझ्याकडे जवळपास पाचेकशे सिव्ही आहेत, पडलेले. त्यातून निवड ना!'

'मीच चाळू होय? ठीक आहे! गरज मला आहे शेवटी!'

'बाय द वे सदा! मला तुझी मदत हवी होती. आम्हाला एक स्किल मेट्रिक्स करायचाय, त्यासाठी तुझं इनपुट महत्वाचं आहे.'

'स्किल मेट्रिक्स?'

'म्हणजे आपल्याला लागणार्‍या स्किल्सची यादी करायची.. जसं सी प्लस प्लस, जावा, डेटाबेस इ. इ. आणि प्रत्येक माणसासाठी एक तक्ता करायचा. त्यात तो प्रत्येक स्किल मधे किती पारंगत आहे ती लेव्हल लिहायची. तसा एकदा बनवला आणि त्यात सगळे बसवले की लोकांनाही कळेल कोण कुणाच्या वर किंवा खाली आहे ते. मग दरवर्षीची काँपेन्सेशनच्या वेळची नाराजी कमी होईल. आणि मार्केटिंगलाही त्याचा उपयोग होईल.'

'ओ मॅडम ते तितकं सोप्पं नाहीये. नुसतं सी प्लस प्लस उत्तम येतं, की चांगलं येतं, की बरं येतं, की येतच नाही, अशी विभागणी करून भागत नाही. उदा. असं बघा. स्वयंपाक चांगला येतो म्हणून भागतं का? व्हेज येतं की नॉन-व्हेज पण येतं? कुठल्या प्रकारचा? पंजाबी की कोल्हापूरी की इटालियन? मासे करता येतात की नाही? असे हजार प्रश्न क्लायंट विचारतात.. कारण त्यांना कोकणी मसाला वापरून हैद्राबादी चिकन घातलेला इटालियन पास्ता करणारा माणूस हवा असतो.'

'हो अगदी १००% मॅच नाही मिळणार! थोडं ट्रेनिंग देऊन.. थोडे सिव्ही टेलर करून.. जमवता येईल की नाही?'
=========================================================

'काय सदा? प्रोजेक्ट कसं चाल्लंय?'.. सीईओ, राकेश पांडे मासिक उलटतपासणी करत होता.

'जोरात चाल्लंय! काल तर एक काम फटकन उडवलं. चार महिन्याचं प्रोजेक्ट तीन महिन्यात गुंडाळायचं आहे ना?'.. सदाने एक आशावादी चित्रं निर्माण केलं. कुठलाही प्रोजेक्ट मॅनेजर कधीही प्रोजेक्ट चांगलंच चाल्लंय असं म्हणतो. नाहीतर आपल्या कुवतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं त्यांना वाटतं.

'गुड! गुड! किती लवकर?'

'१० दिवसांचं काम ९ दिवसात!'

'हम्म! मागच्या मिटिंगला तू म्हणत होतास त्या प्रॉब्लेमचं काय झालं?'

'ओ ते! क्लायंटला काही बदल हवे होते. 'दिलेल्या वेळात ते होणार नाही' म्हणून ठणकावलं त्यांना!'

'का? असा किती वेळ जास्त लागणार होता?'

'एक महीना जास्त लागणार होता!'

'पण तू घेतली आहेस ना ३ माणसं जास्त?'

'हो घेऊन एक महीना झाला!'

'मग त्यांनी संपवलं असेल ना ते ३ महिन्यांच काम आत्तापर्यंत?'

'नाही अजून! प्रोजेक्ट मधे थोडी चॅलेंजेस निर्माण झाली आहेत. कुठल्या प्रोजेक्टमधे नसतात?'.. प्रोजेक्ट मधील सर्व भानगडींना चॅलेंजेस म्हणायची पद्धत आहे.

'नाही? मग कधी संपवणार ते?'

'ते तीनही जण फार स्लो आहेत.. सगळ्याच बाबतीत!'

'म्हणजे?'

'त्यांना काही येत नाही! तीन तीन दिवस दिले तरी साधा ४ ओळींचा कोड पाडता येत नाही त्यांना!'

'आँ! इंटरव्ह्यू मधे लक्षात नाही आलं? कुणी घेतले?'

'आम्हीच घेतले. फोनवर! तिघांना इंटरव्ह्यूतले सगळे प्रश्न व्यवस्थित आले.'

'मग?'

'मला आता वाटतंय तिघांचे इंटरव्ह्यू एकाच माणसानं दिले असावेत. कारण तिघांचा आवाज फोनवर सेम येत होता. पण त्यावेळेला घाई होती म्हणून दुर्लक्ष केलं. आणि एचार म्हणालं की आपण आधी त्यांना अपॉइंटमेंट लेटर देऊ. जॉईन झाले की मग हळूहळू बॅकग्राउंड चेक करू.'

'मग?'

'आता बॅकग्राउंड चेक केल्यावर बर्‍याच गोष्टी लक्षात येताहेत.. कुणाचेही मागच्या एम्प्लॉयरचे दिलेले फोन नंबर बरोबर नाहीत. एक लखनौ मधल्या वाण्याच्या दुकानाचा आहे, एक अस्तित्वात नाही, एक लखनौच्या फायर ब्रिगेडला जातो. असे बरेच घोळ आहेत.'

'याला तू थोडे चॅलेंजेस म्हणतोस? ९ बायकांना एका महिन्यात जन्म देता येत नाही हे मी तुला सुरुवातीलाच सांगितलं होतं ना तरी?'

-- भाग -४ समाप्त --

Monday, March 25, 2013

तेथे पाहिजे जातीचे.. भाग-3

तेथे पाहिजे जातीचे.. भाग-१ इथे वाचा!
तेथे पाहिजे जातीचे.. भाग-२ इथे वाचा!

'अय्या! तुझाssच फोन! दोन सेकंदांपूर्वीच मला वाटलं तुझा फोन येणार आणि आलाच!'.. सदाची बायको चित्कारली.

'का? तुला का असं वाटलं?'

'अरे मला नं हल्ली असे अनुभव येताहेत! अचानक मनात काहीतरी उमटतं आणि ते खरं होतं! स्वामी आकुंचन महाराजांची कृपा, दुसरं काय?'

'आँ! मगाशी काय उमटलं होतं?'

'हेच की तू फोन करून सांगणार की आज आपण जेवायला बाहेर जाऊ या म्हणून!'

'जेवायला बाहेर जाऊ या हे सांगायला मी नाही फोन केला काय! आकुंचन महाराजांना प्रसरण पावायला लावून कृपेचा अजून एक इन्स्टॉलमेंट घे! मी फोन एक प्रश्न विचारण्यासाठी केलाय'

'असं काय करतोस रे? आज अगदी कंटाळा आलाय मला स्वैपाकाचा! जाऊ या नं आपण!'

'बरंss! जाऊ या! इतकं काये त्यात अगदी? एका प्रॉब्लेमनं माझ्या ग्रे-मॅटरचं बाष्पीभवन झालंय! तो ऐक आधी! तो स्टुअर्ट आहे ना? त्याची ताजमहाल ट्रिप आम्ही स्पॉन्सर केली होती. आता तो आमचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणारे लवकरच! तर लगेच राकेशनं त्याची ट्रिप कॅन्सल केली आणि मला म्हणतोय स्टुअर्टला तसं सांग म्हणून! आता त्याला ते कसं सांगू मी?'

'का? मला लग्नाचं विचारताना कचरला होतास का?'

'नाही. तेव्हा तू नकार देणार याची खात्री होती मला! आता आधी देतो म्हंटलंय मग नाही देत कसं म्हणायचं?'

'असं का? परवा नीताच्या नाटकाला कसा नाही येत म्हणालास, ऐनवेळेला?'.. नवर्‍याला भूतकाळातल्या अंधार्‍या खिंडीत पकडण्याची कला बायकांच्या डिएनेत गुंफलेली असते. पण १० वर्ष संसाराग्नीत तावून सुलाखून निघाल्यामुळे असल्या प्रश्नांवर 'मौनं सर्वार्थ साधनम' हा सर्वोत्तम उपाय आहे हे सदाला उमजलेलं होतं.

'तुमच्याकडे एखादा आज रिन्युड लायसन्स मिळणार म्हणून आला आणि ते अजून दोन महीने तयार होणार नसल्याचं समजल्यावर प्रचंड कटकट करायला लागला, तर तुम्ही काय करता?'

'साहेबांना भेटा म्हणतो'

'आयला, इथे साहेबाने मलाच सांगितलंय गाय मारायला! ब्लडी बक स्टॉप्स हियर!'.. फोन ठेवून कॉरिडॉर मधून जात असताना अचानक स्टुअर्ट समोर उभा पाहून सदा बराच काळ बाबागाडीत बसल्यासारखा अवघडला. स्टुअर्ट पण अवघडलेला होता. दोघं एकमेकांसमोर थांबले, बघून कसनुसं हसले मग नजर चुकवत उभे राहिले. त्याला पाहून जायंटव्हीलमधे खाली कोसळताना पोटात गोळा येतो तसा सदाला आला. प्रोजेक्ट मॅनेजरच्या कारकिर्दीत त्याच्या पोटात इतक्या वेळेला गोळे येऊन जातात की त्यांची गोळाबेरीज करता करता हातात गोळे येतील!

स्टुअर्ट: 'सॉरी! मला..... फार खेद होतोय.. कॅन्सल केल्याबद्दल!'

सदा: 'हां! हां! म म मला पण... होतोय...त... त... ता...... कॅन्सल केल्याबद्दल.... फार!'.. ताजमहाल हा शब्द तोंडाला फेविकोलसारखा चिकटल्यामुळे बाहेर पडला नाही आणि स्टुअर्टला त वरून ताजमहाल ओळखायला शिकवलेलं नव्हतं.

'पण, गोईंग फॉरवर्ड, मला वाटतं योग्यच निर्णय होता तो! कॅन्सलेशन वॉज इनेव्हिटेबल!'

'अ‍ॅब्सोल्युटली! अ‍ॅब्सोल्युटली! त्याशिवाय पर्याय नव्हताच'.. सदा १००% सहमत झाल्यामुळे स्टुअर्टला आपण १००% चुकीचं बोललो असं वाटलं.

'सडॅ, तुझा पॉझिटिव्ह अ‍ॅप्रोच मला खरंच आवडला. यू रिअली गेव्ह ११०%. या धंद्यातल्या निटी-ग्रिटीज... नट-एन-बोल्ट्स तुला चांगल्या माहीत आहेत. यू गेव्ह युवर बेस्ट शॉट! बट, अ‍ॅट द एंड ऑफ द डे, यू कॅन्ट कंट्रोल एव्हरिथिंग, कॅन यू?'

'नो, यू कॅन्ट!.. तुला एक गंमत सांगतो.. मी एकदा मुंबईला गेलो होतो.. कंपनीच्या कामाला. त्या वेळेला मी दुसर्‍या कंपनीत होतो. त्या कंपनीचं एक ऑफिस होतं अंधेरीला! दर महिन्याला तिकडे जायला लागायचं मिटिंगसाठी. मिटिंग संपली की लोकल पकडून दादरला यायचं.. मग एशियाड पकडून पुण्याला जायचं असं रूटिन ठरलेलं होतं..'.. सदाची असंबद्ध ष्टोरी सुरू झाल्या झाल्या आपल्या मेंदुत कुणी तरी मटकी भिजत घातलीये आणि त्यांना एकदमच कोंब फुटलेत अशी चमत्कारिक संवेदना स्टुअर्टला झाली.

स्टुअर्ट: 'तू पोरांना सांगितलं आहेस की नाही अजून?'.. ष्टोरी कट केल्यामुळे सदानं खेळणं काढून घेतलेल्या मुलासारखा चेहरा केला.

सदा: 'नाही. अजून नाही. आधी तुला सांगावं असा विचार केला'. दरम्यान, तिकडून येणार्‍या रेवतीला बघून सदाच्या आयडियाच्या गुलाबाला फूल आलं.

स्टुअर्ट: 'मला? मी सांगितलेलं मलाच सांगणार? आणि तेही आधी?'.. स्टुअर्टचा मेंदू कोंबांच्या मेझात गुरफटला.

सदा रेवतीकडे बघत म्हणाला... 'सॉरी रेवती! आपली लंच अपॉईंटमेंट ना? आलोच २ मिन्टात'.. आता रेवतीचा मेंदू गुरफटला.. 'कुठली अपॉईंटमेंट?'

सदा स्टुअर्टला घाईघाईत म्हणाला.. 'बायदवे, तुझं ताजमहाल कॅन्सल केलंय.. मी पळतो.. बाय!'. मग पळत पळत रेवती जवळ गेला आणि कुजबुजला.. 'आत्ता काही बोलू नकोस. माझ्या बरोबर चल नुसती'.. सदानं तिचा हात धरला व जवळपास ओढतच तिला ऑफिसच्या बाहेर घेऊन गेला. ऑफिस बाहेर आल्यावर सदाने तापलेल्या तव्यावर पाणी टाकल्यासारखा आवाज करत सुस्कारा सोडला. तिचा हात सोडून म्हणाला.. 'सॉरी! त्या स्टुअर्ट पासून पळण्यासाठी मी हे नाटक केलं. बोल! कुठे जायचं जेवायला?'

'आँ! जेवायला? आत्ता चार वाजलेत महाराजा! दुपारच्या खाण्याची वेळ झाली माझी!'

'बरं तू दुपारचं खा! मी सकाळचं जेवतो'.. ते जवळच्या उडपीत गेले.

रेवती: 'कशाबद्दल झापत होता क्लायंट तुझा?'

'तो कुठला झापतोय? मीच सुनावले दोन शब्द.. त्याला जरा. पण त्याचं आपलं तेच तेच तेच तेच चाललं होतं, मग म्हंटलं आता पळा!'

'तू क्लायंटला सुनावलंस?'.. रेवतीच्या चेहर्‍यावरून धरणाच्या दरवाज्यातून उचंबळणार्‍या पाण्यासारखा आदर ओतप्रोत ओसंडू लागला.

'हो! मग काय तर! आपण नाय ऐकून घेत.. भलतं सलतं.. उगाच!'.. 'अमेरिकेची फॉरेन पॉलिसी आवडली नाही तर ओबामाला सुद्धा सुनवायला कमी नाय करणार' असा एकंदर आविर्भाव!

'बरं झालं. पण त्यामुळे मला तुझ्याकडून एक पार्टी मिळाली'

'हां, पार्टीसाठी क्लायंटची गरज नाही. कधीही माग! बायदवे, आपण एकमेकांना अरे तुरे करायला लागलोय हे तुझ्या लक्षात आलंय का?'

'हो! केव्हाच! आणि खरं सांगायचं तर... तर.. मला..... आवडलं ते.'.. पायाच्या अंगठ्याने फरशीवर रेघोट्या मारायची उबळ, पायातल्या बुटांमुळे, रेवतीने मारली.

'म.. म.. मला पण.'.. दोघांना तरुणाईतल्या नाजुक क्षणांची आठवण होऊन एकमेकांबद्दल अचानक आपुलकी वाटायला लागली.. परंतु दुसर्‍याच्या मनात नक्की काय आहे ते वय वाढलं तरी न कळल्याने घोड्यानं पेंड खाल्ली!

'तुझी बायकोशी खूप वेळा होते का रे बाचाबाची?'.. रेवतीने सफाईदारपणे रेड सिग्नल जंप केला.

'बायकोशी होते त्याला बाचाबाची कसं म्हणणार? त्याला बाची म्हणता येईल फार फार तर! हा हा हा! तुला माहिती आहे का? बायकांसाठी नवरा हा ७ जन्मांचं गिर्‍हाईक असतो.'

'साप हा सापच असतो म्हणतात तसं बायको ही शेवटी बायकोच असते, बरं का!'

'हां! पण एक फरक आहे.. सापाला तीच तीच पुंगी वाजवून परत परत झुलवता येतं.'

'कजरारे कजरारे'.. सदाच्या फोनने गळा काढला.. 'बोल बायको'

'मला सांग, तू आत्ता हॉटेलात हादडतोयस का? डबा खायचा सोडून? माझ्या मनात आत्ता तसं उमटलं'

'आँ! छ..छ..छे छे! आकुंचन महाराजांमुळे तुझं मन जास्तच आकुंचन पावतंय.'

'मग ट्रॅफिकचे आवाज कसे येताहेत?'

'हां... ते... अं अं अगं माझी खिडकी उघडी आहे'.

'बरोबर कोण आहे?'

'क क कुणी नाही!'..फोन बंद करून सदाने रेवतीकडे पाहीलं. त्याची नजर चुकवून तिनं हळुवारपणे विचारलं... 'तू.. तू.. बंडल का मारलीस?'

'बंडल? अं? ओss! बंsडल! त्याचं काये! मला ना डब्यातलं गार खाणं म्हणजे लिबलिबित थंडगार गोगलगाय खाल्ल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा ऑफिसातल्या एखाद्या घरच्या जेवणाला मुकणार्‍या बुभुक्षिताला डबा दिला की बाहेरचं चमचमित कदन्न खाता येतं! तेही तुझ्याबरोबर!'

'ती बंडल नाही रे! बरोबर कुणी नाही म्हणालास ती!'

'नाऊ! यू डोन्ट गेट एनी आयडियाज! ओके?'.. सदा अभ्यासाच्या पुस्तकात नको ते पुस्तक सापडल्यासारखा लाजला.

'ऑफकोर्स नॉट! व्हाय वुड आय गेट एनी आयडियाज?'

'बरं ते जाऊ दे! मला तुझी मदत हवीये. इथल्या सर्व प्रोजेक्टांच्या कोडमधे पेरलेल्या बगांची रोपं तरारून आता त्यांचा एक छान बगीचा झालाय. त्यांचे वेलू गगनावरी गेलेत. म्हणून तर राकेशने आपण क्वालिटीचा वसा घेणार असल्याची दवंडी पिटली आणि तुला घेतलं. तर मला आधी सांग की क्वालिटीने बग जातात का? म्हणजे मला क्वालिटीबद्दल काही माहीत नाही म्हणून विचारतोय.'

'ऑफकोर्स जातात.'

'म्हणजे क्वालिटी गृपकडे घोस्टबस्टरसारखे बगबस्टर लोक असतात का? की त्यांनी क्वालिटीचं डीडीटी मारलं की सगळे बग गायब होतील.. मग धंदा आपोआप वाढेल.. गिर्‍हाईकं प्रेमाने बोलतील.. राकेश गहिवरून सुट्टी घे म्हणेल.. बायकोचे भांडायचे विषय कमी होतील.. मला पोरीशी चार शब्द बोलायला मिळतील.. एकूण, सर्व पृथ्वीवर शांतता नांदेल.....!'

'हा हा हा! यू आर सो नाईव्ह! ते इतकं सोप्पं नाहीये. आधी सगळ्या बगांचं विश्लेषण करायचं. मग त्यातल्या टॉप २०% कारणांसाठी उपाय योजना केलीस तर ८०% वेळा परत बग येणार नाहीत. यू नो ना?.. द एटी ट्वेंटी रूल?'

'त्यासाठी इतका उपद्व्याप कशाला करायचा? मी आत्ताच सांगतो ८०% बग कशामुळे येतात ते... प्रोग्रॅमरच्या हलगर्जीपणामुळे!'

'तू विश्लेषण केल्यावर आपण जेवायला जाऊ आणि बोलू त्यावर! यू वुड बी सरप्राईज्ड! आत्ता मला अलका बरोबर मिटिंग आहे.. मी निघते.'

लंच करून परत आल्यावर केबिनमधे स्टुअर्टला बसलेला पाहून सदाच्या पोटात शहाण्णव कुळी गोळा आला. त्याला पाहून स्टुअर्ट शांतपणे म्हणाला.. 'कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून वरती तुमच्याकडून ताजमहालची ट्रिप उकळणं मला काही प्रशस्त वाटत नव्हतं. म्हणून मी स्वतःच ते कॅन्सल करा हे सांगायला आलो होतो. बरं झालं तुम्हीच केलं ते! अर्थात, तुम्ही नसतं केलं तर मला खरच प्रोजेक्ट कॅन्सलेशनचा पुनर्विचार करायला लागला असता. असो. मी जातो आता. गुड बाय!'

=========================================================
अभयः 'सर, ते कस्टमरकडून स्पेक्सचं डॉक्युमेंट आलंय त्यात व्हायरस आहे.'

सदा: 'अर्रर्रर्र! कुठं ठेवलंय ते?'

'रंभेवर'.. रंगेल अ‍ॅडमिनने ऑफिसातल्या सर्व्हर्सना अप्सरांची नावं दिली होती.

'अरे मग लगेच तिला घटस्फोट नाही का द्यायचा?'

'सर मी केलं तिला नेटवर्क वरून डिसकनेक्ट, लग्गेच!'.. अभयने 'मला थोडी अक्कल आहे' असा चेहरा केला.

'बरं, मग काय प्रॉब्लेम आहे?

'रंभेवरचा अँटिव्हायरस चालत नाहीये. सीडीवर जुनं व्हर्जन आहे.'

'मग नेटवरून लेटेस्ट घे ना.!

'सssssssर! रंभे वरच आपला इंटरनेट सर्व्हर आहे.'

'हम्म! मेनकावर लेटेस्ट कॉपी असेल बघ.'

'मेनकाचा पासवर्ड काय?'

''आल्या नाचत नाचत मेनका रंभा' हाच दोघींचा पासवर्ड आहे.'

=========================================================
सदा: 'संगिता, तुला माहितीच आहे मी या वनॉन-वन मिटिंगा कशासाठी घेतोय ते!'

संगिता: 'नाही सर! का?'

'अगं काय हे? दोन आठवड्यांपूर्वी मी मोठी मेल पाठवली होती त्याबद्दल!'

'हो का?.. असेल. सर... मला ना.. मोठ्ठ्या मेल वाचायला बोअर होतं. सर, पण माहितीये का? आजच्या माझ्या भविष्यात होतं.. महत्वाच्या विषयावर चर्चा कराल म्हणून.. ते खरं झालं'

'असं होय. कुणाचं वाचतेस तू? मी मटा मधलं वाचतो. काल माझा खर्च होईल असं होतं पण घरी जाई पर्यंत काहीच झाला नाही. म्हणून मी मुद्दाम घरात पाऊल ठेवायच्या आधी पोरीसाठी चॉकलेट घेऊन गेलो.'

'मी सकाळ मधलं वाचते!'

'हॅ! त्यातलं रद्दी असतं! काय पण लिहीतात एकेक.. स्त्री-पुरुष यांच्यातल्या अहंकाराच्या ज्वाळा भडकतील.. मनाच्या प्रदूषणाला कोणतंही तथाकथित अँटिबायोटिक लागू पडत नाही.. प्रेमिकांनो, गाठीभेटी घ्याच.. गुरुभ्रमणाचं अंडरकरंट मोठ्या सुखस्वप्नांचं पॅकेज घेऊन येणारे, मात्र, समोर बघून चाला.'

'सर, प्रोजेक्ट कॅन्सल होणारे?'

'आँ! तुला कुणी सांगितलं?'

'अ‍ॅडमिनचा समीर म्हणाला.. म्हणून स्टुअर्टची ताजमहाल ट्रिप कॅन्सल केलीये असं पण! सर, प्रोजेक्ट गेल्यावर आमचं काय होणार?'

'हे बघ! अजून नक्की काही नाहीये तसं! त्यानं आत्ता धमकी दिलीय नुसती! बाय द वे, तुला एकंदरीत कंपनीबद्दल काय वाटतं? तुझ्या काही तक्रारी आहेत का? पगाराबद्दल काय मत आहे? तुला काम करायला काय अडचणी येतात? माझ्याबद्दल काय वाटतं? अशा सगळ्या गोष्टींची चर्चा करायलाच ही मिटिंग घेतली आहे. तेव्हा मोकळ्या मनाने सांग!'

'सर! तसं सगळं ठीके!.. पण.. सर.. ती.. ती अकाउंट्सची लोकं भारी त्रास देतात.'

'या, टेल मी अबौटिट! काय त्रास दिला? पगार वेळेवर केला नाही का?'

'नाही सर! डेक्कन पर्यंतचे रिक्षाचे ६०रू दिले नाहीत. म्हणाले ५२ रू च्या वर होत नाहीत. सर, आता मी कशाला जास्त लावू?'

'बरंsss! मी बोलतो अकाउंटशी! अजून काही?'.. संगिता गेल्यावर सदानं अकाउंट्सच्या सायली कुरतडकरला फोन लावला.. 'हॅलो सायली! संगिताचं रिक्षाचे ६०रू बिल का नाकारलं?'

'अहो सर! ही पोरं ना वाट्टेल ती बिलं लावतात! डेक्कनपर्यंत ५२रू च्या वर होत नाहीत हो!'

'असं होय? तुला कसं कळलं?'

'माझ्याकडे दुसर्‍या एकाचं बिल आहे ना ५२रू चं!'॑.. यापुढे कितीही वाद घातला असता तरी अकाउंट्सकडून ८रू सुटले नसते हे जाणून सदा तडक एचार मॅनेजर प्रिया आगलावेंच्या केबिनात गेला.

'मॅडम! एक प्रॉब्लेम आलाय.'

'बोला!'

'संगिताचं रिक्षाचे ६०रू बिल अकाउंट्सनं नाकारलं कारण डेक्कनपर्यंत ५२रू च्या वर होत नाहीत म्हणे!'

'मग काय चुकलं त्यांचं?'

'काही रिक्षांचे मीटर फास्ट असतात. कधी ट्रॅफिक खूप असतं.. सिग्नल लागतात.. मग काय करणार? केवळ दुसर्‍या माणसाचं ५२रू झालं म्हणून कसं चालेल? आणि संगिताला ७/८ रू नं काय फरक पडणारे? ती घरची चांगली श्रीमंत आहे. ती एका शॉपिंगला जितके उडवते ना तितका त्या सायलीचा पगार पण नसेल.'

'हम्म्म! बरोबर आहे पण त्यांच्याशी वाद काय घालणार? एस्पेशियली त्यांच्याकडे ५२रू चं बिल आहे म्हंटल्यावर? आपलं.. अकाउंट्स.. तसं.. जरा पेनी वाईज पाउंड फूलिश कॅटेगरीतलं आहे!'.. बाई एकदम कुजबुजत्या आवाजात बोलायला लागल्या.. 'मागे एकदा कॉर्पोरेशन टॅक्स भरायच्या शेवटच्या दिवशी एकाला पाठवला.. ब्रीफकेस मधे कॅश घालून दीड लाख रुपयांच्या वर!.. कारण शेवटच्या दिवशी चेक घेत नाहीत.. तो तिथल्या कँटिनमधे चहा पीत असताना ती ब्रीफकेस कुणीतरी मारली. आता बोल!'

'आधी का नाही भरला चेक?'

'अरे आधी पैसे दिले तर तितक्या दिवसाचं व्याज पडतं ना करंट अकाउंटवर?'

'हं! बरोबर! ठीके... मी सांगतो तिला तसं!'

'मी फार फार तर बोलेन त्यांच्याशी! पण मला वेगळं उत्तर मिळेल असं वाटत नाही.'.. सदा जायला निघणार तितक्यात बाईंनी कुजबुजत्या आवाजात परत सुरुवात केली.. 'हे बघ! संगिता एकंदरीत खूपच पॉप्युलर आहे ना? बरीच मुलं तिच्या मागेपुढे करत असतात.'

'हो अर्थातच! ती सुंदर आहे ना!'

'परवा तू लोकं सोडून जातील असं म्हणत होतास! इफ यू पुट टू एन टू टुगेदर.. यू नो व्हॉट आय मीन?'.. बाईंनी सूचकपणे विचारलं.

'नो! आय डोन्ट!'

'अरे! संगिता एक मॅग्नेट आहे. ती राहिली तर बाकीचे आपोआप चिकटून रहातील.. गॉटिट?'

=========================================================
अभयः 'त्या पासवर्डच्या तालावर मेनका नाचत नाहीये.'

सदा: 'मेनका चालू नसेल'

'सरsssssssss! काय तरीच काय? ती चालूच आहे.'.. गाडी सुरू होत नाही म्हंटल्यावर किल्ली फिरवून पाहिलीस का? असं विचारण्याने अकलेचा जसा पंचनामा होईल तसा अभयचा झाला!

'तू चुकीचा मारत असशील. थांब, मी ट्राय करतो.'.. थोड्या लढाई नंतर पासवर्ड चालत नाही हा साक्षात्कार झाला.. 'आयला, पासवर्ड कुणी बदलला? .. आणि बदलल्यावर मला का नाही सांगितला?'

'मला काय माहित?'

'बरं आता असं कर! अ‍ॅडमिनला सांग पासवर्ड रिसेट करायला. आणि मेनकेवरून अ‍ॅंटिव्हायरसचं इंजेक्शन घेऊन रंभेला टोच. काय?'

अभय थोड्याच वेळात तोंड वेंगाडत परत आला.. 'सर! अजून प्रॉब्लेम झालाय'

सदा: 'आयला! आता काय झालं?'

'मी तो अँटिव्हायरस टोचल्यावर त्यानं विचारलं.. रिपेअर करू का? त्याला 'हो' म्हंटल्यावर त्यानं ते डॉक्युमेंटच उडवलं.'

'बोंबला! आता मी 'हा हन्त हन्त' म्हणू की 'हा जन्त जन्त'?'

=========================================================
संगिता: 'सर मी येऊ?'

सदा: 'हो हो ये की! काय चाल्लंय? तो प्रोग्रॅम झाला का? काल संपवणार होतीस ना?'

'नाही सर! माझं लॉजिक चालत नाहीये.. ते निखिलला दिलंय बघायला! आणि स्क्रीन डिझाईनमधे जरा इश्यू आहेत.. ते अभय बघतोय!'

'हम्म! बरं मग आता ते कधी होणार?'

'त्यांना विचारून सांगते. सर, तुमच्याइतकं कोणीच मला समजुन घेत नाही.'.. अशी वाक्यं समोरच्याला घोळात घेण्याआधीचं प्रास्ताविक असतं हे सदाला माहीत नव्हतं!

'अगं! ए मॅनेजर गॉट टु डू व्हॉट ए मॅनेजर गॉट टु डू!'.. आपलं कौतुक ऐकणं सदाला काँक्रिटमधे उगवलेल्या गुलाबाइतकं दुर्मिळ होतं.

'सर मला रजा हवी होती.. २ दिवसांची!'

'कशासाठी? तुला माहिती आहे ना?... सध्या जरा टाईट परिस्थिती आहे'

'आत्याच्या दिराच्या मावसभावाच्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे.. जळगावात! जवळचं आहे सर'

'रजेबद्दल माझं काय म्हणणं आहे तुला माहिती आहे का संगिता?
खुदी को कर बुलंद इतना, के
हर तहरीर से पहेले,
बॉस बंदे से खुद पुछे,
बता, तुम्हे कितनी रजा चाहीये?
हा हा हा! बरं घे दोन दिवस! पण दोन म्हणजे दोनच दिवस हं! मागच्या वेळेसारखं करू नकोस.'

'नाही सर! तेव्हा माझी ट्रेन चुकलेली!'

'बरं, मग या वेळेला ट्रेन चुकवू नकोस! आणि हे तुझ्या रिक्षाच्या बिलाचे ८रू... उरलेले! अकाउंटशी लढून लढून मिळवले शेवटी! उपनिषदात म्हंटलेलं अगदी सत्य आहे बघ.. सत्यमेव जयते!'

'थँक्यू सर! तुम्ही माझ्यासाठी भांडलात? कित्ती गोsssड!'

'हॅ हॅ! थँक्यू काय त्यात? होणारच नाही म्हणून आपण डोकं धरून बसलं की कधीच होत नाही! म्हणून लढायचं! माझा बाणा असा आहे. तिकीट न घेता लॉटरी लागत नाही!'

काही दिवसांनी सायलीचा सदाला फोन आला....'सर! एक काँप्लिकेशन झालंय!'

'काय?'

'म्हणजे तसं काही विशेष नाही... पण हल्ली संगितासकट सगळेच जण रिक्षाचे ६०रू. लावतात!'

'बघ! तरी मी तेव्हा तुला म्हणत होतो.'.. सदा मनातल्या मनात फुगा फुटल्यासारखा हसला.

'सर पण नाही होत हो ५२रू च्या वर! ठीके! मी ५२च पास करते.'

त्यानंतर दोन दिवसांनी सदानं संगिताला बोलावलं.. 'संगिता! मी काल रिक्षानं डेक्कन पर्यंत गेलो होतो.'

'का? गाडी बंद पडली?'

'नाही! मला बघायचं होतं... किती होतात ते!'

'हो? मग किती झाले?'

'अवघे ४२रू! आता मला सांग तू ६० रू का लावतेस?'

'सर! त्याचं काय आहे! आम्ही सगळे ५२रू लावायचो. कारण कुणी कमी लावले की सायली मॅडम त्या नंतर सगळ्यांना कमीच देतात. त्या दिवशी मी चुकून ६० रू लावले. आणि तुम्ही ते पास करून घेतले. मग मी सगळ्यांना तसं सांगितलं!'

-- भाग -३ समाप्त --