Thursday, October 18, 2012

ऑक्सफर्डचा फेरफटका

जगातल्या अग्रेसर विद्यापीठांमधे ऑक्सफर्डची गणना होते हे पुण्यातल्या वाहतुकीला शिस्त नाही इतकं सर्वश्रुत आहे. गाढ्या विचारवंतांचा आणि संशोधकांचा सुळसुळाट असलेलं, ८०० वर्षांपेक्षा जुनं, ऑक्सफर्ड विद्यापीठ आत्तापर्यंत ५० च्या वर नोबेल पारितोषिकांचं धनी आहे. जुनी कॉलेजं व जुन्या वास्तू अजूनही टिकून आहेत. नुसत्या टिकूनच नाहीत तर वापरात पण आहेत. याचं एक कारण शासकीय प्रयत्न व अनुदान आणि दुसरं हिटलर! हे कारण एखादं काम न झाल्याचा दोष वक्री शनीला देण्याइतका हास्यास्पद वाटेल पण दुसर्‍या महायुद्धात ऑक्सफर्डवर बाँब टाकायचे नाहीत असा हिटलरचा हुकूम होता. कारण त्याला इंग्लंड जिंकल्यावर ऑक्सफर्ड आपली राजधानी करायची होती.

ऑक्सफर्डबद्दल बरंच लिहीलं गेलंय व बर्‍याच कॅमेर्‍यात ते पकडलंय! एक प्रतिष्ठित विद्यापीठ असलेलं शहर, कार निर्मितीच्या कारखान्याचं शहर आणि आता बायोटेक्नॉलॉजी मधील आघाडीचं शहर अशी विविध ओळख असली तरी ऑक्सफर्डची लोकसंख्या फार काही प्रचंड नाही, जेमतेम दोन लाख! आपल्याकडचं एखादं वडगाव बुद्रुक सुद्धा सहज त्याच्या तोंडात मारेल. पण प्रतिवर्षी जितके पर्यटक (९० लाख) इथे येऊन जातात तितके आपल्या ताजमहालकडे पण फिरकत नाहीत.

ऑक्सफर्ड नावाची जन्मकथा अशी आहे.. Ox म्हणजे बैल व Ford म्हणजे जिथून नदी पार करणं सोप्पं जातं असा उथळ भाग! फार पूर्वीपासून इंग्लंडमधे उत्तर दक्षीण प्रवास करणारे लोक इथून थेम्स नदी पार करत असत. त्यामुळे बैलगाड्यांना सहजपणे नदी ओलांडता येणारा भाग म्हणजेच ऑक्सफर्ड! अर्थात त्या काळी विद्यापीठ नव्हतं नाहीतर ऑक्सफर्डचा आणि बैलाचा काहीही संबंध लावणं म्हणजे धाडसाचं काम ठरलं असतं!

ऑक्सफर्ड हे अति प्राचीन असल्याचे दावे, ते केंब्रिजहून जुनं आहे हे दाखविण्यासाठी (तळटीप-१ पहा), १२व्या शतकापासून मुद्दाम पसरवले गेले आहेत. पण ते फार काही जुनं नाही. ऑक्सफर्ड गावाचा पहिला उल्लेख ९११ सालच्या एका कागदपत्रात आहे. त्या आधीही इथे मनुष्य वस्ती होती याच्या खुणा आहेत, पण ते अति प्राचीन नक्कीच नाहीये.

नवव्या शतकात आल्फ्रेड द ग्रेट या अँग्लो-सॅक्सन राजानं कायदा, सुव्यवस्था व संरक्षण करण्यासाठी अनेक तटबंदीयुक्त गावांची निर्मिती केली. थेम्स आणि शेरवेल नद्यांच्या संगमावर वसलेलं (चित्र-१) व अर्ध वर्तुळाकार टेकड्यांनी वेढलेलं ऑक्सफर्ड त्या पैकी एक आहे. व्हायकिंग सैन्याचे सर्व हल्ले यशस्वीपणे परतवणारा आल्फ्रेड इंग्लंडचा एक सामर्थ्यशाली राजा मानला जातो आणि 'द ग्रेट' ही उपाधी भूषवणारा एकमेव राजा आहे!

चित्र-१: थेम्स आणि शेरवेल संगम. थेम्स डावीकडून येते आणि समोरून शेरवेल

त्या नंतर १०१३ साली डॅनिश लोकांनी इंग्लंडचं राज्य बळकावल्यावर १०१८ मधे इंग्लंडचा राजा कुणाला करायचं यावर ऑक्सफर्ड मधे राजकीय खलबतं झाली. पण डॅनिशांना फार काळ सत्ता उपभोगता आली नाही. १०६६ मधे नॉर्मन लोकांनी (फ्रान्सच्या नॉर्मंडी भागातले लोक) त्यांचा पराभव करून विल्यम-१ ला सत्तेवर आणलं. त्याने १०७२ मधे ऑक्सफर्ड मधे एक किल्ला (चित्र-२) बांधला.

चित्र-२: ऑक्सफर्डचा किल्ला

पुढे ११४० मधे, इंग्लंडचं राजेपद कुणी घ्यायचं यावर स्टिफन व मटिल्डा या विल्यम-१ च्या नातवंडात भांडण सुरू होऊन प्रचंड अराजकता माजली. मटिल्डाने ऑक्सफर्डच्या किल्ल्यात आश्रय घेतला असताना स्टिफनच्या सैन्याने हल्ला चढवून संपूर्ण ऑक्सफर्ड बेचिराख केलं. मटिल्डा कशीबशी पळून गेली.

ऑक्सफर्ड त्या राखेतून पुन्हा उभं राहीलं आणि ११६७ मधे ऑक्सफर्ड विद्यापिठाची स्थापना झाली. विद्यापिठातल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याचं मुख्य कारण त्या वेळच्या इंग्लंडच्या राजाने विद्यार्थ्यांना पॅरिसमधे जाऊन शिकायला बंदी घातली हे आहे. त्या काळी विद्यार्थी आणि गावकरी यांच्यात प्रचंड तणाव असायचा. १२०९ मधे एका बाईची हत्या झाल्यावर गावकर्‍यांनी २ विद्यार्थ्यांना फाशी दिलं. त्यामुळे अनेक विद्यार्थी घाबरून केंब्रिजला पळून गेले. घटलेल्या विद्यार्थ्यांमुळे एकूणच धंदा कमी झाल्याचं पाहून गावकर्‍यांनी पडतं घेतलं.. १२१४ मधे त्यांना येऊन रहाण्याचं आमंत्रण दिलं. तरीही तंटा कमी झाला नाही! विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी विद्यापिठात चॅन्सेलरचं पद निर्माण झालं तरी दंगेधोपे व चकमकी चालू राहील्याच. मग विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने वसतीगृहं बांधली गेली. त्या वसतीगृहांचीच पुढे कॉलेजं झाली. (ऑक्सफर्ड केंब्रिज मधील कॉलेजची व्याख्या वेगळी आहे.. तळटीप-२ पहा)

त्यातला १० फेब्रुवारी १३५५ रोजी झालेला दंगा सर्वात भीषण होता.. दंगा कसला युद्धच होतं ते! कारफॅक्स मनोर्‍याजवळच्या पबमधे (चित्र-३ मधे डावीकडे लाल रंगाची पाटी दिसते आहे ते, आता तिथे सँटँडेर बँक आहे) दारू ढोसत बसलेल्या दोन विद्यार्थ्यांनी मालकाकडे दारूबद्दल तक्रार करण्याचं निमित्त होऊन जी बाचाबाची झाली तिचं पर्यवसान मालकाच्या थोबाडावर दारू फेकण्यात आणि त्याला बडविण्यात झालं. ऑक्सफर्डच्या महापौराने चॅन्सेलरला त्या विद्यार्थ्यांना अटक करायला सांगितलं, कारण विद्यापीठ त्याच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेरचं होतं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या ऐवजी, विद्यार्थ्यांनी सेंट मेरीज चर्चची (चित्र-४) घंटा वाजवली व २०० विद्यार्थ्यांनी धनुष्यबाण वगैरे घेऊन महापौर व इतर लोकांवर हल्ला केला. महापौराने आजुबाजूच्या गावातून कुमक मागविण्यासाठी कारफॅक्स मनोर्‍यावरची घंटा वाजवली आणि २००० गावकर्‍यांनी हाताला लागेल त्या शस्त्रात्रांच्या सहाय्याने हल्ला मोडून काढला. एकूण ६१ विद्यार्थी आणि ३० गावकरी मेले. शिवाय, खूपसे जखमी झाले आणि मालमत्तेची व पुस्तकांची हानी झाली ते वेगळंच! तब्बल तीन दिवस मारामार्‍या, दंगली व हत्याकांड चालू होतं.

चित्र-३: कारफॅक्स मनोरा


चित्र-४: सेंट मेरीज चर्च, विद्यापिठाचं प्रमुख चर्च

राजाकडे दोन्ही बाजूंकडून तक्रारी गेल्या, रीतसर चौकशी वगैरे होऊन शेवटी नागरिकांचे अधिकार कमी करून विद्यापीठाला बहाल केले. शिवाय गावाला २५० पौंडांचा दंड झाला. दर वर्षी १० फेब्रुवारीला महापौर आणि ६१ मान्यवर नागरिकांना सेंट मेरीज चर्चपर्यंत शोकयात्रा काढून चॅन्सेलराची क्षमायाचना करण्याची व प्रत्येकी एक पेनी दंड गोळा करून विद्यापीठाला देण्याची शिक्षा झाली. ऑक्सफर्डच्या नागरिकांना अपमानास्पद वाटणारी ही प्रथा जरी पुढची ५०० वर्ष चालू होती तरी उभय पक्षातला तणाव, भांडणं हळूहळू कमी झाली व शेवटी पूर्णपणे थांबली.

१६व्या व १७ व्या शतकात ऑक्सफर्डला प्लेगच्या साथीनं पछाडलं.

१५३४ मधे हेन्री-८ या राजाने रोमन कॅथलिक पंथ सोडला. कॅन्टरबरीचा तेव्हाचा आर्चबिशप क्रॅन्मरने हेन्रीचं अ‍ॅरागॉनच्या कॅथरिनशी झालेलं लग्न रद्दबातल ठरवून, अ‍ॅन बोलेयनशी लावलं. याच काळात प्रॉटेस्टंट पंथाचं वर्चस्व वाढलं आणि अनेक धर्मगुरुंनी प्रॉटेस्टंट पंथ स्विकारला. नंतर मेरी ट्युडर, ही कट्टर कॅथलिक राणी, सत्तेवर आली. १५५३ ते १५५८ या तिच्या कालखंडात तिने करवलेल्या हत्याकांडामुळे ती 'ब्लडी मेरी' म्हणून प्रसिद्ध आहे. ही हेन्रीच्या रद्द ठरवलेल्या लग्नातून झालेली मुलगी असल्यामुळे अनौरस पण मानली जायची. त्यामुळेच तिने प्रॉटेस्टंटना धडा शिकविण्यासाठी क्रॅन्मर आणि आणखी दोन धर्मगुरू लॅटिमर व रिडली यांना सजा दिली. लॅटिमर व रिडली यांना ऑक्सफर्ड मधील ब्रॉड रस्त्यावर १६ ऑक्टोबर १५५५ रोजी जिवंत जाळलं. जिथे त्यांना जाळलं (चित्र-५) त्या रस्त्यावरच्या भागावर दगडी क्रॉस केलेला आहे आणि त्याचं कधीही डांबरीकरण होत नाही. २१ मार्च १५५६ रोजी क्रॅन्मरलाही जाळलं. नंतर त्या तिघांचं स्मारक ब्रॉड रस्त्यापासून जवळच (कारण जिथं जाळलं त्या ठिकाणची जागा उपलब्ध झाली नाही) उभारलं (चित्र-६).

चित्र-५: ब्रॉड रस्त्यावरील क्रॉस


चित्र-६: स्मारक

इंग्लंडमधे कुठेही गेलं तरी बहुतेक गोष्टी पुरातन दिसतात.. कमितकमी दोनशे वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या! ऑक्सफर्ड त्याला मुळीच अपवाद नाही. इथे १२४२ सालापासूनचा एक पब अजून आपलं अस्तित्व टिकवून आहे (चित्र-७). १६५१ साली अख्ख्या इंग्लंडमधलं पहिलं कॉफी शॉप ऑक्सफर्ड मधे अवतरलं. तेही अजून आहे (चित्र-८). सेंट मायकेल चर्च हे तर १०४० सालापासून उभं आहे (चित्र-९).

चित्र-७: पुरातन पब


चित्र-८: इंग्लंडमधलं पहिलं कॉफी शॉप


चित्र-९: सेंट मायकेल चर्च

शहरातली बहुतेक जागा विद्यापिठाचे विविध विभाग, ग्रंथालये, दवाखाने, बागा व संग्रहालये यांनी नाहीतर कॉलेजांनी व्यापलेली आहे. जॉन रॅडक्लिफ या राणी अ‍ॅनच्या डॉक्टरच्या नावाने १७७० साली पाच एकरांच्या जागेवर 'रॅडक्लिफ इन्फर्मरी' नामक दवाखाना उभा राहीला (चित्र-१०). इथेच पेनिसिलिनचा मनुष्यावर प्रथम वापर केला गेला. ही जागा विद्यापिठाला नंतर मिळाली. आता हे बंद करून इथले विभाग विद्यापिठाच्या इतर चार मोठ्ठाल्या दवाखान्यात हलवले आहेत.

चित्र-१०: रॅडक्लिफ इन्फर्मरी

विद्यापिठाची अनेक संग्रहालये आहेत. त्यातलं एक वाद्यांचं आहे. इथे देशीविदेशी जुन्यापुराण्या वाद्यांचा प्रचंड मोठा साठा आहे. तो नुसता साठा नाहीये तर ती वाद्यं वाजण्याच्या स्थितित पण आहेत! जेव्हा या संग्रहालयात काही विशेष कार्यक्रम होतात तेव्हा तेथील कर्मचारी ती वाद्यं वाजवून दाखवितात.

दुसरं संग्रहालय आहे हिस्टरी ऑफ सायन्सचं! इथे सुमारे २०,००० जुनी शास्त्रीय उपकरणं ठेवलेली आहेत. अधून मधून त्यातल्या उपकरणांबद्दल माहिती देणारी व्याख्यानं होत असतात. अशाच एका अ‍ॅस्ट्रोलेब नामक उपकरणावरील व्याख्यानाबद्दल मी इथे लिहीलेलं आहे. १६ मे १९३१ रोजी आईन्स्टाईनने ऑक्सफर्ड मधे दिलेल्या भाषणात वापरलेला फळा त्यावर लिहीलेल्या समीकरणांसकट जपलेला आहे. आईन्स्टाईनने त्या भाषणात अवकाश प्रसरणाबद्दलचे आपले विचार मांडले होते.

चित्र-११: आईन्स्टाईनने वापरलेला फळा

अ‍ॅशमोल नावाच्या माणसाने जगातल्या कानाकोपर्‍यातून जमवलेल्या वस्तूंचं अ‍ॅशमोलीन संग्रहालय आहे. आत्ता जिथे हिस्टरी ऑफ सायन्स संग्रहालय आहे तिथे हे पूर्वी होतं. पण हळूहळू संग्रह वाढत गेल्याने एक नवीन इमारत उभी करून त्यात अ‍ॅशमोलीन संग्रहालय हलवलं.

नॅचरल हिस्टरी संग्रहालयामधे विविध प्राण्यांचे व पक्ष्यांचे सांगाडे तसंच मृत किडे व फुलपाखरं असे एकूण अडीच लाखाच्या वर नमुने ठेवलेले आहेत. ऑक्सफर्डपासून फक्त दोन मैलावर सापडलेले डायनासोरांचे सांगाडे इथे पहायला मिळतात.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही संग्रहालयं बघायला एक छदाम पण मोजावा लागत नाही.

विविध क्षेत्रात प्रसिद्धी मिळवलेल्या बर्‍याच लोकांची नाळ ऑक्सफर्डला जोडलेली आहे. ऑक्सफर्डमधून बरेच नेते शिकून बाहेर पडले आहेत. डॉ. मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, बिल क्लिंटन, डेव्हिड कॅमेरॉन (सध्याचा इंग्लंडचा पंतप्रधान) ही त्यातली काही ठळक नावं!

ऑक्सफर्डच्या हाय स्ट्रीट नावाच्या रस्त्यावरून चालताना बॉईल व हूक यांच्या शोधांबद्दलची एक पाटी दिसते (चित्र-१२).

चित्र-१२: बॉईल व हूक यांच्या शोधांबद्दल

अ‍ॅलिस इन वंडरलँड या पुस्तकाचा जनक लुईस कॅरॉल इथलाच! त्याचं खरं नाव चार्लस डॉजसन! ख्राईस्ट चर्च कॉलेजमधे (चित्र-१३) गणित शिकायला तो १८५१ साली आला, नंतर तिथेच शिक्षक झाला आणि मरेपर्यंत तिथेच रमला. त्या कॉलेजमधे असताना त्याने कॉलेज प्रमुखाच्या बागेतून कॅथिड्रलचे फोटो काढायची परवानगी मिळवली. तो कॅमेर्‍याची उभारणी करत असताना प्रमुखाची मुलगी अ‍ॅलिस व तिची भावंडं 'आमचे पण फोटो काढ' म्हणून त्याच्या मागे लागल्या. त्यातून त्यांची ओळख वाढली. तो त्यांना गोष्टीतून जादुई दुनियेत घेऊन जायचा. यातूनच त्या जगप्रसिद्ध पुस्तकांची निर्मिती झाली. ख्राईस्ट चर्च कॉलेज बाहेरच्या दुकानात (चित्र-१४) अ‍ॅलिस बर्‍याच वेळी खाऊ व गोळ्या घ्यायला जायची. थ्रू द लुकिंग ग्लास या गोष्टीची सुरुवात त्याच दुकानात होते.

चित्र-१३: ख्राईस्ट चर्च कॉलेजची मागची बाजू


चित्र-१४: अ‍ॅलिसचं दुकान, उजवीकडे कॉलेजचं फाटक आहे

पेम्ब्रोक कॉलेजमधे शिकवायला असताना जे आर आर टॉलकिनने द हॉबिट व लॉर्ड ऑफ द रिंग्ज ही पुस्तकं लिहीली.

मॉरिस नावाच्या माणसाने ऑक्सफर्डमधे कार बनविण्याचा कारखाना १९१३ साली उघडला. तिथे बनलेल्या पहिल्या वहिल्या कारचं नाव त्याने अर्थातच 'ऑक्सफर्ड' ठेवलं. गंमत म्हणजे तो सायकल वेडा होता. सायकल शर्यतीत भाग घ्यायचा. त्यानं आधी सायकल दुरुस्तीचं दुकान काढलेलं होतं. तिथेच तो सायकली तयार पण करायचा. सायकलचे स्पेअर पार्ट्स बर्मिंगहम वरून मागवावे लागत. घाई असली तर कधी कधी तो स्वतः एका दिवसात सायकलवर बर्मिंगहमला (ऑक्सफर्ड बर्मिंगहम अंतर जाऊन येऊन १२० मैल आहे) जाऊन पार्ट्स घेऊन यायचा. सायकली बनवता बनवता तो मोटर सायकली बनवायला लागला आणि त्यातूनच शेवटी कार्स! त्याचा कारखाना आता बीएमड्ब्ल्यूने घेतलेला आहे. तिथे आता 'मिनी' नावाची कार बनते.

केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापिठांमधे एकच ग्रंथालय असण्याची प्रथा नाहीये. विद्यापिठाचं एक ग्रंथालय असतं, प्रत्येक कॉलेजमधे एक असतं आणि शिवाय प्रत्येक शाखेचं एक असतं. ऑक्सफर्ड मधे अशा एकूण ४० एक ग्रंथालयांच्या समूहाला बॉडलियन ग्रंथालयं म्हणतात.

ऑक्सफर्ड मधील १४व्या शतकात सुरू झालेल्या ग्रंथालयाची स्थिती खालावल्यानंतर १६व्या शतकाच्या शेवटी बॉडले याच्या देणगीमुळे त्याला पुनरुज्जीवन मिळालं. तेव्हापासून त्याचं नाव बॉडलियन ग्रंथालय झालं. नंतर जॉन रॅडक्लिफ या राणी अ‍ॅनच्या डॉक्टरने दिलेल्या देणगीतून बॉडलियन ग्रंथालयाचा विस्तार झाला. त्या विस्तारि भागाला रॅडक्लिफ कॅमेरा (चित्र-१५) म्हणतात. कॅमेरा शब्दाचा अर्थ इटालियन भाषेत खोली (रूम) असा होतो.

चित्र-१५: रॅडक्लिफ कॅमेरा

सध्या विद्यापिठात चाळीसच्या वर कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजला त्याचा त्याचा सुरस इतिहास आहे. १८८४ साली ऑक्सफर्ड मधे स्त्रियांचं पहिलं कॉलेज सुरू झालं. त्यांना लेक्चर्सना आणि परीक्षेला बसायची परवानगी होती पण त्यांना डिग्री मिळायची नाही. ती १९२० पासून मिळायला लागली.

ऑक्सफर्ड मधलं एक ऑल सोल्स नावाचं कॉलेज एकदम वेगळं आहे. तिथे फक्त पदव्युत्तर शिक्षणासाठीच प्रवेश मिळू शकतो. प्रवेश मिळवण्यासाठी एका अत्यंत अवघड परीक्षेतून पार व्हावं लागतं. त्यामुळेच इथे प्रवेश मिळवणं फार मानाचं मानलं जातं. प्रवेश मिळालेल्यांना काहीही शिकवलं जात नाही, त्यांच्यावर कुठलंही संशोधन करायचं बंधन नसतं. विद्यार्थी त्याला वाटेल ते शिकण्यास मोकळा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षाला सुमारे १५,००० पौंड शिष्यवृत्ती मिळते.

तसं अजून बरंच काही लिहीता येण्यासारखं आहे, कारण प्रत्येक गोष्टीला भला मोठा इतिहास आहे. पण कंटाळवाणं होईल म्हणून इथेच थांबतो!

तळटीप - १: केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापिठांमधे एक खुन्नस (चुरस, चढाओढ) आहे. इतकी की ते एकमेकांचा नावाने उल्लेख टाळतात.. ते एकमेकांचा उल्लेख 'द अदर युनिव्हर्सिटी' असा करतात. त्यांच्यात दर वर्षी एक बोटीची शर्यत थेम्स नदीमधे लंडनच्या जवळ होते. खुन्नस असली तरी विविध संशोधनात एकमेकांना ते सहकार्य करतात.

तळटीप - २: ऑक्सफर्ड केंब्रिज मधे प्रत्येक विषयाची व्याख्यानं विद्यापिठाच्या त्या त्या विभागांमधे होतात. उदा. फिजिक्स मधील क्वांटम मेकॅनिक्स या विषयाची सर्व व्याख्यानं फिजिक्स विभागात होतात, त्यांना विद्यापिठाच्या सर्व कॉलेजमधील क्वांटम मेकॅनिक्स विषय घेतलेले विद्यार्थी हजर असतात. त्या विषयावरची ट्युटोरियल्स मात्र विद्यार्थी ज्या कॉलेजमधे आहे तिथले प्राध्यापक घेतात. ऑक्सफर्ड केंब्रिज मधील कॉलेजची व्याख्या अशी वेगळी आहे.. कॉलेज म्हणजे एक वसतीगृहच असतं पण त्यात ट्युटोरियल व्यतिरिक्त काहीही शिकवलं जात नाही. करमणुकीची साधनं, खेळाची साधनं, जेवण, स्वस्त दारूचा गुत्ता व प्रार्थना करायला छोटं चर्च (त्याला चॅपल म्हणतात) अशा बाकी सोयी कॉलेज देतं. शिक्षक व विद्यार्थी एकाच मोठ्या हॉलमधे जेवतात. आठवा, हॅरी पॉटर मधली जेवणाची दृश्यं! त्यांचं चित्रीकरण ख्राईस्ट चर्च कॉलेजच्या जेवणाच्या हॉलमधे झालेलं आहे.

फोटोंचे मूळ स्रोत :-

१. कारफॅक्स मनोरा --- http://www.flickr.com/photos/mpascalj/6288162593/sizes/m/in/photostream/

२. ऑक्सफर्ड किल्ला, आईन्स्टाईनचा फळा, बोडेलियन ग्रंथालय व सेंट मायकेल चर्च -- http://wanderinglawyer.com/2012/02/16/photo-gallery-oxford/

३. सेंट मेरीज चर्च व पुरातन पब ट्रिपअ‍ॅडव्हायझर वरून
http://www.tripadvisor.co.uk/LocationPhotos-g186361-Oxford_Oxfordshire_England.html

४. स्मारक व रस्त्यावरील क्रॉस
http://www.sacred-destinations.com/england/oxford-martyrs-memorial

५. थेम्स शेरवेल संगम -- http://en.wikipedia.org/wiki/River_Cherwell

६. रॅडक्लिफ इन्फर्मरी --- http://www.medsci.ox.ac.uk/oma/histoxfordmedicine/4radcliffeinfirmary.jpg/view

७. अ‍ॅलिसचं दुकान -- http://www.aliceinwonderlandshop.co.uk/

८. बॉईल व हूक यांच्या शोधाची पाटी - http://www.audunn-marie.com/oxford2005/index.html

९. ख्राईस्ट चर्च कॉलेज -- http://www.ralphwilliamson.co.uk/christchurch.html

माहिती विकीपिडियावरून घेतलेली आहे.

--- समाप्त ---

1 comment:

mannab said...

ऑक्सफर्ड हे नाव कसं पडलं हे वाचून गम्मत वाटली. इतर माहिती आणि मुख्य म्हणजे छायाचित्रे उत्तम आहेत. आम्ही कधी येथे येऊ याचा अंदाज नसला तरी इतरांना सांगण्यासाठी हा लेख छान आहे.
मंगेश नाबर