यू कान्ट बी सीरियस!

"अरे वा चिमण! काय योगायोग आहे! बरं झालं तू दिसलास, मी तुझ्याकडेच यायला निघाले होते. " .. मी टीरुम मधे चहा करीत असताना आमच्या एचार बाईनं, रेचेलनं, माझी तंद्री भंग केली! ती नक्कीच जवळपास मी येण्याची वाट पहात दबा धरून बसली असणार. कारण, तिच्या ऑफिसकडून माझ्या ऑफिसकडे येण्याच्या कुठल्याही सोयिस्कर वाटेवर टीरुम नाही हे ओळखायला शेरलॉक होम्स असण्याची गरज नव्हती. मी या एचारी धूर्त कोल्ह्यांना चांगला ओळखून आहे. योगायोग कसला डोंबलाचा? ती तिथेच दबा धरून बसली असणार सावज पकडायला! सहज भेटल्यासारखं दाखवून कामाचं बोलायचं हे इतक्या वर्षांच्या माझ्या कारकीर्दीत अनेक एचारांशी पंगा घेतलेल्याला लगेच समजतं. 

"तू या कंपनीचा आधारस्तंभ आहेस. तू इथला एक सर्वोत्तम टीम मेंबर आहेस." असं हरभर्‍याच्या झाडावर चढवून नंतर "पण....." म्हणून काही तरी कामातली खोडी दाखवून जमिनीवर आणायचं तंत्र मला नवीन नाही. बाकी, इतकी वर्षं केलेल्या खर्डेघाशीला कारकीर्द म्हणणं हातभट्टीला स्कॉच म्हणण्यासारखं आहे थोडं! 

"तुझ्या कामाचं खूप कौतुक ऐकलं परवा मिटिंगमधे".. तिनं अपेक्षित सूतोवाच केलं.

"हो का! धन्यवाद मला सांगितल्याबद्दल!".. मी "पण..." ऐकण्यासाठी जास्त उत्सुक होतो. 

"तू आपल्या ग्राहकांचे प्रश्न स्वत:च काम बाजूला ठेवून सोडवतोस हे फार चांगलं आहे. तुझ्या सगळ्या मॅनेजरांचं तुझ्याबद्दल चांगलं मत आहे". 

"पण.. माझं काम वेळेवर संपत नाही. मी कामाच्या वेळेत कॉमेंटरी ऐकतो किंवा मॅच बघतो.. असं ही पुढे म्हणाले असतील".. मी तिची पुढची वाक्य काय असू शकतील त्याची एक झलक दिली आणि तिनं माझ्याकडे आ वासून पाहीलं. 

"ऑं! नाही बुवा! मला असा कुणी अभिप्राय दिला नाही! पण बरं झालं तूच मला सांगितलंस ते!".. धूर्त कोल्ह्याला माझ्या वार्षिक आढाव्यासाठी मूर्खासारखी मी आपणहून मदत केली होती. चहा पिता पिता गाळ तोंडात आल्यासारखा माझा चेहरा झाला. 

"मग? तुला काय म्हणायचं होतं?".. "काही तरी बोलून आपल्या मूर्खपणाच्या सर्व शंका दूर करण्यापेक्षा गप्प राहून मूर्ख समजलं जाणं कधीही चांगलं" अब्राहम लिंकन हे मलाच डोळ्यासमोर ठेवून म्हणाला असणार. 

"एका मोठ्या प्रोजेक्ट मधे खूप काम आहे आणि तिथे माणसं कमी आहेत. तर तू तिथे सुमारे एक महिनाभर काम केलंस तर ते जरा आवाक्यात येईल असं जॅकचं, त्या मॅनेजरचं, म्हणणं आहे. तर तू हातातलं काम संपव आणि त्याला भेट. ओके?".. 

मी उगीचच जरा विचारात पडल्याचं दाखवलं. अजूनही माझ्या चेहर्‍यावर गोंधळ घातलेल्या चार्ली चॅप्लीनचे भाव असणार याची जाणीव होती. मला जॅक ऐकून माहिती होता. तो 6 महिन्यांपूर्वी एक मोठं प्रोजेक्ट व काही माणसं घेऊन मॅंचेस्टरच्या ऑफिसमधून इथे आला आहे इ. इ. समजलं होतं. 

"ठीक आहे! महिन्याभराचंच काम असेल तर काही प्रश्न नाही फारसा!".. मी संमती देऊन जॅककडे महिन्यासाठी कामाला गेलो ते दोन वर्षं झाली त्याच्याकडेच आहे. नाही म्हणायला मी रेचेलला एकदा माझा महीना कधी संपणार म्हणून डिवचलं. तर ती म्हणाली की "आम्ही सुरुवातीला नेहमीच एक महिन्याचं काम आहे असं सांगतो. म्हणजे, मग काही तक्रारी आल्या की त्या माणसाला प्रोजेक्ट मधून काढायला सोपं जातं". हा एचारी डावपेच मला तरी नवीन होता. 

तसं जॅककडचं काम वेगळंच होतं. त्याची थोडक्यात माहिती अशी: उतारवयात होऊ शकणार्‍या प्राणघातक आजारांवर (हृदयविकार डायबिटीस इ.) संशोधन करणारी एक सेवाभावी संस्था 40 ते 60 वयोगटातल्या लोकांची इत्थंभूत माहिती मिळविण्यात 2004 पासून गुंतलेली आहे. या संस्थेला ऑक्सफर्ड केंब्रिज सारख्या नामांकित विद्यापीठांची फारच मदत होते. या माहितीत जीवनशैली, रहाणीमान विषयक माहिती व वैद्यकीय चाचण्यांचे निकाल आहेत. या चाचण्यांसाठी लोकांना फार प्रवास करायला लागू नये व कमितकमी खर्चात जास्तितजास्त लोकांची माहिती घेता यावी यासाठी ते युकेमधे वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती केंद्रं उघडतात. त्या त्या केंद्रांच्या जवळ रहाणार्‍या लोकांना आमंत्रित करतात. त्यांना जाण्यायेण्याचा सर्व खर्च देतात. केंद्रामधे आल्यावर त्यांच्या कडून एक प्रश्नावली भरून घेतात. ज्यात आहार, दारू, पूर्वी झालेल्या व्याधी व रोग, व्यायाम, घरातली कामं, टिव्ही बघण्याचा काल असे अनंत जीवनशैली विषयक प्रश्न असतात. उत्तरादाखल प्रत्येक प्रश्नाला उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायातून योग्य पर्याय लोक निवडतात. त्या नंतर रक्त दाब, उंची, वजन, हाताच्या पकडीची ताकद, इसीजी, रक्त तपासणी, डोळ्यांची तपासणी अशा अनेक तपासण्या होतात. तपासण्या करणारी यंत्रं कंप्युटरला जोडलेली असल्यामुळे या निकाल आपोआप त्या संस्थेच्या डेटाबेसमधे येतात. या माहितीत रक्ताचे नमुने व हृदय तसेच मेंदुचे स्कॅन देखील आहेत. अशी त्यांच्याकडे एकूण 5 लाख लोकांची माहिती आहे. या सगळ्या माहितीची सांगड घालून जीवनशैलीच्या कुठल्या सवयींचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधक बघत असतात. ज्यांच्या डाव्या व उजव्या करंगळींच्या उंचीत फरक आहे व ज्यांच उत्पन्न वर्षाला 20,000 पौंडापेक्षा कमी आहे व ज्यांचे डोळे करड्या रंगाचे व केस काळे आहेत अशा स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता 10% जास्त आहे... असले धक्कादायक निष्कर्ष या माहितीची सांगड घालून निघू शकतात. 

या संस्थेला कंप्युटर संबंधी लागणारी सर्व मदत जॅकची टीम पहिल्यापासून करत आली आहे व अजूनही करते आहे. सेवाभावी संस्थेचं काम असल्यामुळे आमच्या कंपनीला त्यातून फारसे पैसे मिळत नाहीत. पण त्यातून मार्केटिंगच्या लोकांना बॅंड लावायची संधी अमूल्य मिळते. इथे कामाच्या मानाने माणसं कमी आहेत. कुठलही काम अगदी वेळेवरच झालं पाहीजे असं घट्ट बंधन नाही. माझ्या दृष्टीने हा एक दुर्मीळ फायदा आहे. माणसं जास्त असलेली प्रोजेक्ट देखील वेळेवर संपत नाहीत पण 12/12 तास काम करून लोकांवर नाहक ताण मात्र पडतो. जॅककडची दुनिया वेगळीच होती. अनेक अडीअडचणींवर मात करून कितीही अपयश आलं तरी न कंटाळता काम करण्याची सवय असलेल्या संशोधकांची आमच्या दिरंगाईबद्दल काहीच तक्रार नसायची. मी एकाच वेळेला 3/4 तातडीच्या (जॅकच्या मते) कामात गुंतलेला असे. त्याची एक झलक देणं अपरिहार्य आहे. एकदा जॅक घाईघाईने माझ्याकडे आला व बरळला.. 

"Alreet Chim! Stop what ye deein'! I've got some proper urgent graft for ye".. यातलं तुम्हाला किती समजलं? तरी मी ते इंग्रजीत लिहीलेलं असल्यामुळे थोडं तरी समजलं असेल. प्रत्यक्षात ऐकलं असतं तर नुसतं तोंड उघडं टाकून त्याच्याकडे बघत राहीला असता. माझं प्रथम तसंच व्हायचं. फक्त माझंच नाही तर इथल्या मुरलेल्या इंग्रजांचं पण तसंच व्हायचं. आता जरा परिस्थिती बरी आहे. तो जरा सावकाश बोलतो. तरी अजूनही काही वेळेला होतं. तो न्युकासल-अपॉन-टाईन या ईशान्येकडील गावातून आलेला आहे. त्या भागातले लोक जॉर्डी नामक बोली भाषेत बोलतात. जॉर्डीला इंग्रजी भाषेची स्थानिक आवृत्ती म्हणता येईल. डेटाबेसचा उच्चार डियेटाब्येस! टेबलचा उच्चार टीयेबल! असा नेहमीच्या इंग्रजी शब्दांचा भन्नाट जॉर्डी उच्चारकल्लोळ तर असतोच, शिवाय बोलताना खास स्थानिक शब्दही घुसडतात. कारण, या भागात फार पूर्वी डेन्मार्क मधून आलेले लोक आणि नॉर्वेतून आलेल्या लोकांचं (त्यांना डेन्स म्हणतात) राज्य होतं. त्यांच्या भाषेतले काही शब्द जॉर्डीत आलेले आहेत. उदा. येम किंवा हियेम म्हणजे इंग्रजीतला होम हा शब्द किंवा ऊट म्हणजे आउट, कॅनी म्हणजे इझी! वरती! त्याच्याशी बोलताना मला मी ET शी बोलतोय की काय असं वाटायचं. 

तर त्याच्या म्हणण्याचा मतितार्थ असा होता.. "बरं तर चिम्स! जे काय करतो आहेस ते बाजूला ठेव! मी तुला एक महत्वाचं आणि तातडीचं काम देणार आहे.".. तो मला चिमण ऐवजी चिम्स म्हणतो. तसं नेहमीप्रमाणं सांगून त्यानं मी करीत असलेल्या अजून एका महत्वाच्या आणि तातडीच्या कामातून बाहेर काढला. यात काही नवीन नव्हतं तरी पण मनातल्या मनात जॉन मॅकेंरोच्या ष्टाईल मधे "यू कान्ट बी सीरियस!" असं कुरकुरत मी त्याच्या मागे त्याच्या ऑफिसात गेलो. त्याला सगळीच काम महत्वाची व तातडीची वाटायची. मला हातातलं काम सोडून दुसरं घ्यायचं नेहमीच जिवावर येतं. या बद्द्ल मला बहुकर्मी (multi-tasker) असल्याचा दावा करणारे लोक, विशेषत: स्त्रिया, कुत्सितपणे हसतील. पण, मी परत जुन्या कामावर जाईपर्यंत त्यात मी काय केलं होतं, काय करायचं होतं, काय करत होतो, कुठे अडलो होतो इ. इ. सगळं माझ्या डोक्यातून अल्कोहोल सारखं उडून गेलेलं असतं. मग मी अपघातानंतर दवाखान्यात जागा झालेल्या हिंदी हीरोसारखं 'मै कौन हूं? कहॉं हूं?' असं भ्रमिष्टासारखं करतो. त्यामुळेच मला "तू 40% या प्रोजेक्टवर आणि 60% त्या प्रोजेक्टवर" असं बजावणार्‍या प्रोजेक्ट मॅनेजरांचा राग येतो. माझं डोकं म्हणजे कंप्युटरचा सीपीयू आहे काय? ठराविक वेळाने दुसर्‍या कामाकडे उडी घ्यायला? सुदैवाने, जॅक कधीच तक्रार करायचा नाही. कारण, तो स्वत: देखील प्रोग्रॅमिंग करत असल्यामुळे त्याला सगळ्याची पूर्ण कल्पना होती. 

त्याच्याशी प्रत्यक्ष बोलून काम समजावून घेणं दुरापास्त होतं. पण काम तर समजावून घ्यायलाच पाहीजे. याचा इलाज काय? सुरुवातीला 'तुला नवीन काम आहे' असं जॅक मला म्हणाला की माझं धाबं दणाणायचं. टीम मधल्या बाकीच्यांना अर्थातच समजत असणार नाहीतर मला काहीतरी कुरबुर ऐकू आली असती. तरी देखील मी टीम मधल्या एका इंग्रजाला त्याबद्दल विचारलं..."तुला समजतं का रे जॅक काय बोलतो ते?" 

"नाही रे! मला सुमारे 25% समजतं".. त्याच्या प्रांजळ उत्तरामुळे ET शी बोलल्यासारखं वाटणार्‍यात मी एकटाच नसल्यामुळे दिलासा मिळाला! 

"ओह! मला वाटलं तुला नक्की समजत असेल. मग तू काम कसं समजावून घेतोस रे?" 

"आता मी जॅकला सरळ कामाची इमेल पाठवायला सांगतो".. आयला! सही! मी पहिले काही महीने धाबं दणाणवण्यात फुकट घालवले म्हणजे! प्रत्यक्षात, मी त्याच्याही पुढचा विचार करून त्याला इमेल ऐवजी एक बग रिपोर्टच करायला सांगायला लागलो. प्रत्येक नवीन कामासाठी नवीन बग करायचा. त्या कामात आलेले प्रश्न मी बगातच घालणार. त्याची उत्तरं तो तिथेच देणार. ते काम पूर्ण झाल्यावर त्यात काही बग आले तर या बगाचा निर्देश करून नवीन बग करायचा. त्यामुळे, कुठल्याही कामाची सर्व माहिती आपोआप तयार व्हायला लागली. जुन्या कामांची फारशी काही माहिती उपलब्ध नव्हती. पण बग रिपोर्ट मधे काम काय होतं, काम कधी सुरू झालं, त्यात काय काय अडचणी आल्या व ते कधी संपलं हे सगळं एकाच ठिकाणी मिळायला लागलं! इतकंच नाही तर हा लेख पाडायलाही एका बगाची मदत झाली. बगाचा हा उपयोग वॉशिंग मशीनच्या लस्सी निर्मितीतल्या उपयोगा इतकाच अद्भुत आहे की नाही? 

यथावकाश, नवीन कामाचा बग आला. त्या नुसार, ही माहिती आता जगभरातल्या संशोधकांना उपल्ब्ध करून द्यायची योजना होती. त्याच्यासाठी एक संकेतस्थळ तयार करण्याचं काम काही लोक करत होते. पण ही माहिती आहे तशी उपलब्ध करण्यात मोठी गोची होती. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सर्वेक्षणात भाग घेतलेल्यांना जे प्रश्न विचारले जायचे ते बहुपर्यायी होते. प्रत्येक प्रश्नाला उपलब्ध असलेल्या पर्यायांना वेगवेगळे आकडे दिलेले होते व उत्तर म्हणून फक्त ते आकडेच माहिती म्हणून साठवले जायचे. कुठला आकडा म्हणजे काय उत्तर याची माहिती डेटाबेसमधे नव्हती. त्यामुळे संशोधकांना माहितीची सांगड घालणं शक्य नव्हतं. कुणाला काही माहिती हवी असल्यास आमचेच लोक ती देत होते त्यामुळे हा प्रश्न कधी आला नव्हता. आता जगभरातले लोक येता जाता माहीती मागायला लागले तर आमचं सगळं आयुष्य फक्त त्यातच गेलं असतं. पूर्वी हे आकडे डेटाबेसमधे नव्हते कारण केंद्रात, ती सर्व केंद्रं तात्पुरती असल्यामुळे, त्या काळी नेटवर्क नसायचं. त्यामुळे नेटवर्कवरील डेटाबेस वापरला नव्हता. म्ह्णून, ते आकडे एका फाईल मधून उचलले जायचे. ते काही न काही कारणामुळे नंतर कधीच डेटाबेस मधे गेले नाहीत. मला त्याने सांगितलं की प्रत्येक प्रश्नाला तो कुठल्या प्रकारचा प्रश्न आहे ते दर्शविण्यासाठी आकडे आहेत. उदा. वैयक्तिक माहितीचा प्रश्न असेल तर त्याचा आकडा 1. फक्त २ आणि ५ आकडे असलेले प्रश्न हे जीवनशैली, रहाणीमान व आहार यासंबंधी होते. तर ती फाईल वाचायची आणि तेवढेच प्रश्न व त्यांचे पर्याय घ्यायचे व ते डेटाबेसमधल्या एका टेबलात कोंबायचे. 

फक्त, साताठ फाईलीच वाचायच्या असल्यामुळे जॅकने (“It’s nee bother, like — ye can dee it in three days.”) मला "ते काम सोप्प आहे. तू 3 दिवसात करशील" अशी ग्वाही दिली. मी पण तत्परतेने ते काम संपवून माझ्या आधीच्या तातडीच्या कामात मग्न झालो. सुमारे, 3 महिन्यांनी आणखी काही फाईली मला द्यायच्या राहिल्याचं जॅकच्या लक्षात आलं. मग बग मधून मला एक नवीन महत्वाचं आणि तातडीचं काम आलं! त्याचं कारण माहिती मिळवायचं काम बरीच वर्षं चालू होतं. त्या काळात जॅकच्या प्रोग्रॅमच्या अनेक आवृत्त्या झाल्या होत्या. प्रत्येक आवृत्तीतील प्रश्नांच्या फाईलींच्या पण आवृत्त्या! मग मागील आवृत्तीतील फाईलीत नसलेलेच प्र्श्न घेण्याचा उद्योग करणं आलं. परत "यू कान्ट बी सीरियस!" असं कुरकुरत मी ते जमवलं. 

आणखी सुमारे एक महिन्यानंतर जॅकने मला तिसर्‍या एका आवृत्तीतून आणखी वेगळी माहिती उचलून त्याच डेटाबेसात टाकायला सांगितली. परत मॅकेंरो नामक ज्वालामुखी "यू कान्ट बी सीरियस!" म्हणून फुटला. 

आणखी सुमारे एक महिन्यानंतर जॅकच्या असं लक्षात आलं की प्रश्नांच्या आणखी काही फाईली आहेत. त्याला तो प्रायोगिक फाईली म्हणायचा कारण त्या फाईल प्रायोगिक अभ्यासाला वापरल्या होत्या. आता प्रायोगिक आणि अंतिम अशा आवृत्त्या का झाल्या? त्यावर जॅकचं निरूपण... पहिल्या टप्प्यात एकूण ५० हजार लोकांचं सर्वेक्षण करायचं होतं. त्यात काय प्रश्न असावेत त्यासाठी प्रायोगिक प्रोग्रॅम लिहीला. तो ३ हजार लोकांवर वापरला. त्यात सुधारणा करून अंतिम प्रोग्रॅम पाडला. पण तो ४८ हजार लोकांनी वापरल्यावर पैसे संपले. म्हणून मग प्रायोगिक मधल्या ३ हजार लोकांची उत्तरं त्यात जमा केली व ५० हजारचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं दाखवलं. प्रकल्प सक्सेसफुल झाल्याची दवंडी पिटवून वरच्यांना 'फुल'वलं. आता दोन्ही मिळून संपूर्ण सर्वेक्षण झालं म्हणून दोन्हींची प्रश्नोत्तरे घ्यायला पाहिजेत. परत ये रे माझ्या मागल्या व "यू कान्ट बी सीरियस!" ला उधाण! प्रायोगिक फाईल मधे अंतिम फाईल पेक्षा थोडे जास्त प्रश्न असतील असं तो म्हणाला. त्यामुळे फक्त अंतिम फाईल घेऊन चालणार होतं. पण तसं करण्याआधी एकदा ते तसंच आहे ना ते बघायचं फर्मान सुटलं. (“The pilot file might’ve got mair questions than the final one, so ye only need tae tek the final file. but check that first, mind.”) मग मी फाईलींची तुलना करून शोध लावला की दोन्ही मधे काही प्रश्न वेगळे आहेत. त्याने मला जे वेगळे आहेत ते फक्त घ्यायला सांगितले. 

काही दिवसांनी असं समजलं की त्या दोन फाईलीतले काही प्रश्न सारखे असले तरी त्यांना दिलेले पर्याय वेगवेगळे होते. मग प्रायोगिक प्रोग्रॅमच्या आणखी एका आवृत्तीचा देखील शोध लागला. मला तर आता मी पुरातत्व विभागात काम करतोय की काय अशी शंका यायला लागली. एक रस्ता बांधायला घ्यावा आणि खाली एक अख्खं शहर गाडलेलं सापडावं त्यातली ही परिस्थिती! मॅकेंरो नुसतं "यू कान्ट बी सीरियस!" म्हणून थांबत नव्हता तर तो आता रॅकेट आपटून भुई धोपटायला लागलेला होता. 

आणखी काही दिवसांनी असं समजलं की प्रायोगिक आणि अंतिम मधल्या काही सारख्या प्रश्नांना दिलेले आकडे वेगवेगळे आहेत. म्हणजे प्रायोगिक मधे एखाद्या प्रश्नाचा आकडा २ असेल तर त्याच प्रश्नाचा अंतिम मधे ३ आकडा असल्यामुळे डेटाबेसात गेलेला नव्हता. साहजिकच ते पण निस्तरणं आलं. मॅकेंरोच्या "यू कान्ट बी सीरियस!" मधे आता पूर्वीचा त्वेष व जोश राहीला नव्हता. तो जास्त बियॉन बोर्ग व्हायला लागला होता. 

आणखी काही दिवसांनी त्याला 'अंतिम' अंतिम फाईल सापडली. मग खर्‍या अंतिम मधले आणि आधीच्या अंतिम मधले फरक शोधणं अपरिहार्य होतं. पण त्या अंतिम फायली एकत्र करणे शक्य नव्हतं कारण दोन्हीत काही प्रश्न सारखे होते पण पर्याय वेगळे होते. मग काही दिवसांनी आणखी दोन वेगळे आकडे असलेले प्रश्न पण डेटाबेस मधे आणायचं ठरलं. मुकाटपणे ती कामं संपवून "अजून काही करायचं असल्यास जरूर सांग" असं सुखदु:खाच्या पलीकडे पोचलेल्या योग्यासारखं मॅकेंरो जॅकला म्हणाला तेव्हा त्याचा स्वत:च्या कानावर विश्वास बसला नाही. आणि जॅकने “कमॉन चिम्स! ये कान्ट बी सीरियस, मान!” म्हणून परतफेड केली. 

अशा अनेक आवर्तनानंतर एकदाचं ते 3 दिवसाचं काम तब्बल 10 महिन्यानंतर संपलं. खूप वर्षांपूर्वी आमच्या फॅमिली डॉक्टरांनी त्यांच्या मुलीने कंप्युटर शिकावं की नाही यावर माझा सल्ला विचारला होता. मी सांगितलं बेलाशक शिकायला सांगा कारण खूप संगणकीकरणाचं काम आहे. त्यावर त्यांनी विचारलं होतं की हे सगळं काम चालू आहे तोपर्यंत त्या क्षेत्राला भाव राहील. पण ते काम संपल्यावर मग काय? सगळे रोगी बरे झाल्यावर तुमचं जे होईल तेच होईल असं हजरजबाबी उत्तर मला आत्ता सुचतंय.. पण हा लेख माझ्याकडे त्यावेळेला असता तर किती बरं झालं असतं असं नक्की वाटून गेलं! 

--- समाप्त ---

Comments

हा हा, भन्नाट आहे हे, आणि खूप relate पण झालं, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये एवढंसच काम आहे म्हणून घेतात आणि ते मारुतीचे शेपूट कधी संपतच नाही अशा अनेक प्रसंगांच्या आठवणी जाग्या झाल्या! तुमचं तरी बरं, आम्हाला काही दिवसांतच जुन्या प्रोजेक्टात घातलेले घोळपण हे शेपूट आवरता आवरता निस्तरावे लागतात :D
काम सतत वाढत रहाणे सगळ्या प्रोजेक्टचा स्थायिभाव आहे. धन्यवाद इंद्रधनु!