Posts

Showing posts from July, 2008

पुण्याची वाट

काही शब्दांचा किंवा वाक्प्रचारांचा अर्थ समजलेला असतो पण अनुभवाची जोड मिळाल्याशिवाय उमजत नाही. पोटात गोळा येणे याचा अर्थ उमगायला जायंट व्हील किंवा रोलरकोस्टर मधे एकदा तरी बसायला लागतं. असंच एकदा २५-३० वर्षांपूर्वीचं जुनं पुणं डोळ्यासमोर तरळलं आणि आमूलाग्र बदल होण्याचा अर्थ तत्काळ उमगला. जुनं पुणं एक शांत, छोटं व सुंदर असं आटपाट नगर होतं. इतकं की लोकं, विशेषतः मुंबईकर, पुण्याला पेन्शनरांचं गाव म्हणून हिणवायचे. पण पुणेकरांना त्याची फिकीर नव्ह्ती. निवांतपणा त्यांच्या नसानसात भिनलेला होता. इथली दुकानं सकाळी ४ तास आणि संध्याकाळी ४ तास उघडी असायची, ती सुध्दा लोकांवर उपकार म्हणून. गिर्‍हाईक आलंच तर दुकानदार पेपरात खुपसलेली मान वर करण्याची सुध्दा तसदी घेत नसत. वरती एखाद्या गिर्‍हाईकानं चुकून अमुक एक वस्तू दाखवता का असं विचारलच तर 'विकत घेणार असाल तर दाखवतो' असं म्हणण्याचा माज फक्त पुणेरी दुकानदारच करू शकत. तेंव्हा पुण्याच्या पोलीसांना 'ट्रॅफिक जॅम' याचा अर्थ उमगलेला नव्हता. स्कूटर ही वस्तू दुर्मिळ होती कारण ती नंबर लावून मिळायला १०-१० वर्ष लागायची. चारचाकी बहुतेकांच्या आवाक्...