वादळ
अखेर मी विद्यापीठात पदार्थविज्ञान शिकायला दाखल झालो. खरं तर बरीच वर्ष मला पदार्थविज्ञान कशाशी खातात हेच माहीत नव्हतं. पदार्थविज्ञान म्हणजे निरनिराळ्या खाद्यपदार्थांच्या कृतींचे शास्त्र असणार अशी माझी 'जिव्हा'ळ्याची समजूत होती. अर्थात इतर अनेक समजूतींप्रमाणे ही पण यथावकाश निकालात निघाली. पाळण्यात असताना पाय सतत तोंडात घालण्याच्या माझ्या सवयीमुळे जाणकारांनी मी पुढे लहान तोंडी मोठा घास घेणार असं भाकीत केलं होते म्हणे, जे फारच बरोबर निघालं. पण बाबांचे माझ्याबद्दलचे भाकीत साफ चुकलं. ठीकठाक असलेल्या सर्व गोष्टी मोडण्याच्या माझ्या विध्वंसक उद्योगांमुळे खवचटपणे ते आईला म्हणायचे "चिमाजीअप्पा पुढे डिमॉलीशन इंजीनिअर होणार". बाबा मला प्रेमाने चिमाजीअप्पा म्हणायचे. जेमतेम पाचवी पास असलेल्या आईला मी कुणीतरी मोठा माणूस होणार म्हणून कृतकृत्य व्हायचं. पण त्यामुळं मला मात्र मी इंजीनिअरींगकडे जावसं वाटू लागलं. नंतर हार्डवेअर लिमिटेशनमुळे मला तिकडे प्रवेश नाही मिळाला. शेवटी प्रवाहपतित माणसं जे करतात तेच मी पण केलं - म्हणजे आधी B.Sc. व मग M.Sc. आमच्या कंपूतले काही जण B.Sc. नंतर सूज्ञपणे...