Posts

Showing posts from November, 2008

ठरविले अनंते

"चिमण्या? तू बघता बघता शंभरी गाठलीस?" मित्रांबरोबर आमचा साप्ताहीक बाहेरख्यालीपणा (म्हणजे बाहेरचं हादडणं) चालू होता तेंव्हा मक्या एवढ्या जोरात ओरडला की आजुबाजूच्या टेबलांवरचं वातावरण एकदम तंग झालं.. लहान पोरं घाबरून रडायला लागली... पण नंतर सगळं आलबेल आहे हे कळताच लोकांच्या प्रश्नांकित नजरा 'सोसत नाही तर ढोसायची कशाला इतकी' अशा बदलल्या. आम्हाला हे नेहमीचच होतं म्हणून त्याचं काही सुखदु:ख नव्हतं. मक्याच्या डोळ्यात मात्र 'काय होतास तू, काय झालास तू' असे भाव विस्फारले होते. हे आश्चर्य मी वयाची शंभरी गाठण्याबद्दल नसून वजनाची शंभरी गाठण्याबद्दल होतं कारण माझ्या बायकोनं.. म्हणजे सरीतानं.. नुकताच तसा गौप्यस्फोट केला होता. मी, सरीता, मकरंद (मक्या) प्रभू व त्याची बायको माया आणि दिलीप(दिल्या) अत्रे दर आठवड्याला भेटतो. सामान्य लोकांसाठी असलेल्या एका सामान्य बँकेत मी एक सामान्य मॅनेजर आहे व सरीता घर सांभाळते. मक्या आय टी कंपनीत मॅनेजर आहे आणि माया आयुर्वेदीक डॉक्टर आहे. दिल्या CA आहे आणि त्याची स्वतःची इन्व्हेस्ट्मेंट कंपनी आहे. 'ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हा मृत्यु...