गिरमिट
काल परत एकदा ते घडलं. परीक्षा द्यायला बसलो होतो. पेपर बघून तोंडाला फेस आला होता. प्रश्न ओळखीचे होते पण पाठ केलेलं काहीच आठवत नव्हतं. शेजारच्या बाकावर बसलेल्या मक्याकडे पाहीलं. तो ठणाठण लिहीत सुटला होता. ह्याला कशी काय आज माझी मदत लागत नाहीये? नेहमी आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो. आम्हा दोघांना बर्याच वेळा पूर्ण उत्तर, पहिले एक दोन शब्द सांगीतल्याशिवाय, आठवतच नाही. एकदा शब्द कळाले की पुढचं धडाधड बाहेर पडतं. ते एक दोन शब्द आम्ही एकमेकांना हळूच सुचवत असतो. पण आज हा गडी बघायलाच तयार नाही. आता पेपर कोरा जाणार. म्हणजे एक वर्ष गेलं ना कामातून! भयाण टेंशन आलं. अंगाचा थरकाप झाला. प्रचंड घाम फुटला आणि मला जाग आली. शेजारी बायको निवांत झोपली होती. हळूहळू स्वप्न पडल्याचं लक्षात आलं आणि सुटकेचा निश्वास टाकला. हुश्श! ही अशी परीक्षेची स्वप्नं मला अजून पडतात. तेच तेच पेपर मी परत परत देत असतो.. अगदी स्वप्नात सुध्दा पूर्वी हा पेपर दिला आहे याची मला जाणीव असते. लोकांना कशी गोड गोड स्वप्नं पडतात? असल्या स्वप्नांच्या मागे कोवळ्या वयातले, मनावर खोलवर परिणाम करणारे, धकाधकीचे प्रसंग लपलेले असतात असं मी कुठेत...