हे बगचि माझे विश्व
मी प्रोग्रॅमर नामक पामराला कोडगा म्हणतो. एकतर तो कुणाच्याही आकलन शक्ती बाहेरचा कोड पाडून स्वतःला आणि दुसर्याला कोड्यात टाकतो म्हणून, आणि ऑफिसात बारक्या सारक्या चुकांवरून बॉसच्या शिव्या खाऊन खाऊन, वेळेवर घरी न गेल्यामुळे घरच्यांची मुक्ताफळं झेलून झेलून, क्लाएंटनं येता जाता केलेला अपमान सहन करून करून तो मनाची एक विशिष्ट अवस्था गाठतो - अर्थात् त्याचा 'कोडगा' होतो. येता जाता चुका काढणे, सदैव किरकिर करणे, चांगल्या कामाचं चुकूनही कौतुक न करणे, आपल्या चुका दुसर्याच्या माथी मारणे, पगारवाढीच्या काळात हटकून तोंडघशी पाडणे अशी कुठल्याही बॉसची काही ठळक स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. माझा बॉस, वैद्य, याला अपवाद नव्हता. त्याचं वागणं बोलणं चालणं पाहून आणि वैद्य नावाशी मस्त यमक जुळतं म्हणून आम्ही त्याला दैत्य म्हणायचो. आमच्या ग्रुपमधे दहा-बारा कोडगे होते. गुलामांवर नजर ठेवणार्या रोमन मुजोरड्याप्रमाणे तो अधून मधून राऊंडवर यायचा. तो येतोय असं दिसलं की सगळीकडे एकदम शांतता पसरायची. काम करतोय हे ठसवण्यासाठी जिवाच्या आकांताने कीबोर्ड बडवला जायचा. काही धाडसी कोडगे शेवटच्या क्षणापर्यंत मायबोलीवर टीपी करत...