क्लोज एन्काउंटर्स ऑफ द चायनीज काईन्ड
आपल्या ऑफिसात कामाला नसलेल्या, आपल्या शेजारी रहात नसलेल्या, आपल्याला रोजच्या बसमधे न भेटणार्या, आपल्या मुलाच्या मित्राचा बाप नसलेल्या, म्हणजे थोडक्यात आपल्याला कुठेही न भेटणार्या आपल्या सारख्याच सामान्य चिन्याशी आपली रोज भेट होण्याची किती शक्यता आहे? माझ्या मते, प्रियांका चोप्रा माझी हिरॉईन होण्याची जेव्हढी शक्यता आहे तेव्हढीच.. पण तरीही ती शक्यता माझ्या बाबतीत वास्तवात आली.. एका चिन्याच्या भेटीचा योग रोज आला. तेव्हा मी रोज ५० मैल लांब असलेल्या गावातून ऑक्सफर्डला गाडी हाकत यायचो. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे डोळ्यात येणारे पाणी (त्याऐवजी पेट्रोल आलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटायचं) आणि डिव्हायडरने प्रत्यक्ष भेटून दाखवलेलं झोपेचं खोबरं या विघ्नांना शरण जाऊन मी एका कार शेअर साईटला साकडं घातलं.. कंप्युटर पाण्यात ठेवला.. आणि थोड्याच दिवसात.. म्हणजे तब्बल एका वर्षा नंतर एका चिन्याने साद दिली. आम्ही प्राथमिक चर्चा करायला प्रथम भेटलो.. पहिलं हाय हॅलो झाल्यावर मी त्याला त्याचा नेहमीचा रस्ता जाणून घेण्यासाठी विचारलं "हाऊ डू यू गो टू ऑक्सफर्ड?". तो: "हाऊ व्हॉट?"...