अभिनय.. एक खाणे
पूर्वी पुण्यातल्या रूपाली/वैशाली हॉटेलात तुरळक गर्दी असायची. कधीही गेलं तरी बसायला नक्की जागा मिळायची.. शिवाय एका कॉफीवर बराच वेळ शिळोप्याच्या गप्पा ठोकता यायच्या! काही नाही घेतलं तरी वेटर हाकलायला यायचे नाहीत.. त्या मागे बहुतेक हॉटेल अगदीच रिकाम रिकाम वाटू नये हा उद्देश असावा.. 'कामाशिवाय जास्त वेळ बसू नये' छाप पाट्या पण नव्हत्या. वेटरांनाही आमच्याशी गप्पा मारायला वेळ असायचा. हल्ली आत घुसायला पण रांग असते. थोडा वेळ जरी काही न घेता कुणी बसलेलं दिसलं तरी वेटर लगेच येऊन नम्रपणे 'काय आणू?' विचारतात.. चाणाक्ष लोकांना ती 'टळा आता' ची गर्भित सूचना आहे हे लगेच समजतं! त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर नेहमी प्रमाणे शीण घालवायला मी रूपालीत धडकलो. एका टेबलावर राम्या शून्यात नजर लावून नुसताच बसला होता. राम्या म्हणजे आमच्यातला सखाराम गटणे. रोज तो तिथे एकच कॉफी घेऊन तासन तास पुस्तकं वाचत बसायचा. पुस्तक बिन राम्या म्हणजे जल बिन मछली, नांगी बिन विंचू, आयाळा बिन सिंह, सोंडे बिन हत्ती.. नाही.. ओसामा बिन लादेन नाही! 'काय राम्या? आज पुस्तक नाही? असं कसं झालं? मुंग्यानी मेरु पर्वत...