वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन
जॉर्ज बुश त्याच्या टेक्सास मधल्या रँच वरच्या तळ्यात पाय बुडवून निवांतपणे विचारशून्य अवस्थेत मासे पकडत बसला होता. तसं 'विचारशून्य बुश' हे गाईचं गोमूत्र किंवा पिवळा पीतांबर म्हंटल्या सारखचं! आजुबाजूला ४-५ बॉडीगार्डस आपण त्या गावचेच नाही असं भासवायचा प्रयत्न करत उभे होते. वॉर ऑन टेररची घोषणा करून वर्ष दीड वर्ष होऊन गेलेलं होतं. जिकडे तिकडे विविध देशांचे सैनिक बिन-लादेन साठी गळ टाकून बसले होते, पण तो बिन-धास्त होता. दोन्हीही गळ टाकूंना यश नव्हतं.. आता गळ म्हंटल्यावर कसं कोण सापडणार? खरं तर बुशला 'ओसामा बिन लादेन' हे नाव मनातून फार आवडायचं, भारदस्त वाटायचं. डोक्यात खोल कुठेतरी स्वत:च नाव 'ओसामा बिन बुशेन' असं काहीतरी करावं असा पण विचार चालायचा. काही झालं तरी बुशच्या लोकप्रियतेला बिन लादेन मुळे उधाण आलं होतं.. अल्ला मेहरबान तो गधा पेहलवान म्हणतात तसं.. त्याबद्दल बुशला कृतज्ञता होती.. पण हे तो उघडपणे बोलू शकत नव्हता. 'मि. प्रेसिडेन्ट, आपल्याला डोनल्ड रम्सफेल्ड साहेबांचा फोन आहे'.. अचानक त्याची खाजगी सचिव, मार्गारेट ऊर्फ मॅगी, चिवचिवली आणि बुश एका विचारशून्य ...