अचानक सापडलेला संगीतकार..
टिव्हीवर लागलेला क्लिंट ईस्टवूड आणि शर्ले मॅक्लेनचा 'टू म्युल्स फॉर सिस्टर सेरा' पहात असताना माझं लक्ष एका गोष्टीनं वेधून घेतलं. शर्लेनं नाही हो.. त्यातल्या टायटल म्युझिकनं! सुरवातीला एक क्लॅरनेट किंवा फ्लूट एक शांत धुन वाजवून थोडंस गूढ वातावरण निर्माण करतं. मग एक तंतुवाद्य साधी सरळ सोप्पी सुरावट चालू करतं.. कापूस पिंजताना जसे आवाज होतात साधारणपणे तसे सूर ऐकू येतात.. हाच त्या पूर्ण संगीताचा पाया! मग इतर चित्रविचित्र आवाज करणारी वाद्य हजेरी लावतात. तंतुवाद्याच्या पार्श्वभूमीवर परत क्लॅरनेट किंवा फ्लूट आणखी सुंदर सुरावटी फेकतं आणि एक अवीट गोडीचं, परत परत ऐकावसं वाटणारं असाधारण संगीत ऐकायला मिळतं! ते इथे ऐका ते ऐकल्यावर माझं पूर्ण पिक्चर मधलं लक्ष उडालं. परत तेच म्युझिक कधी येतंय त्याचीच वाट आतुरतेने माझे कान बघत राहीले. नशीबाने ते म्युझिक पिक्चर भर अधून मधून ऐकायला मिळालं. खर तर मला संगीतातलं खालच्या 'सा' पासून वरच्या 'सा' पर्यंतच काहीही कळत नाही. संगीतातली माझी गती 'सा'धारणच! मला हिमेश रेशमिया पासून कुमार गंधर्वांपर्यंत सगळे सारखेच! संगीतात कुणी ...