तेथे पाहिजे जातीचे.. भाग-५ (अंतिम)
तेथे पाहिजे जातीचे - मागील भाग इथे वाचा.. भाग-१ , भाग-२ , भाग-३ , भाग-४ 'अरे सदा! काय केलं नक्की तुम्ही लोकांनी? स्टुअर्ट इज सिंपली जंपिंग अप-एन-डाऊन!.. थयथयाट करतोय तिकडे!'.. सीईओनं थयथयाट केला. 'राकेश, तो साला चालू आहे एक नंबरचा! नुसती ठेच लागली तरी ट्रकनं उडवल्यासारखा विव्हळेल.' 'मग काय झालंय नक्की? आँ?' 'तसं काही विशेष नाहीये. एका प्रोग्रॅम मधे बग आलाय. आणि बग तर काय सारखे येत जात असतात.' 'काय बग आहे?' 'तो शेअरिट नावाचा प्रोग्रॅम स्क्रीनवर कचरा दाखवतोय म्हणे!' 'बिझनेस इंपॅक्ट काय आहे त्याचा?' 'कुणालाही शेअर ट्रेडिंग करता येत नाहीये.'.. प्रोजेक्ट मॅनेजर व न्यूज रिपोर्टर यांचे परस्पर विरुद्ध गुणधर्म आहेत. जबरदस्त भूकंप होऊन अर्ध पुणं गाडलं गेलं तरी सीईओला प्रोजेक्ट मॅनेजर 'काही विशेष नाही! जमीन थोडी हलली आणि एक दोन घरं पडलीयेत' यापेक्षा जास्त हादरा देणार नाही. न्यूज रिपोर्टर अर्ध पुणं गाडलं गेलं तर जगाचा अंत झाल्याचा आव आणतील आणि वर निर्लज्जपणे जमिनदोस्त घरमालकाला 'आपको कैसा लग रहा है?' व...