तेथे पाहिजे जातीचे.. भाग-४
तेथे पाहिजे जातीचे - मागील भाग इथे वाचा.. भाग-१ , भाग-२ , भाग-३ 'आपला क्लायंट, बिग गेट कॉर्पोरेशनबद्दलच्या एका बातमीसंबंधी ही मिटींग आहे. तसं तुम्हाला एचार व अॅडमिनच्या कृपेने नको ती माहिती नको तेव्हा समजत असतेच, तरी पण मी ही मिटिंग बोलावली आहे कारण त्याचा आपल्या पुढील कामावर मुसळधार परिणाम होणार आहे. तर ती बातमी अशी.. बिग गेट कॉर्पोरेशनला TDH Inc, म्हणजेच Tom Dick and Harry Incorporated टेकओव्हर करतेय.'.. सदाने टीम मिटिंगमधे गौप्यस्फोट केला. 'कुठे?'.. संगिता व्हॉट्सपमधून उठली आणि मिटिंगमधे खसखस पिकली. 'काय कुठे?'.. रागदारी आळवणार्याला आर्डी बर्मनचं 'मेरी जाँ मैने कहां' हे भसाड्या आवाजातलं गाणं म्हणायची विनंती केल्यासारखं सदाला वाटलं. 'ओव्हरटेक कुठे?' 'संगिताच्या मूलभूत गरजेत मोबाईल फार वरती आहे. ही बया तर मोबाईल घेऊन अंघोळीला पण जाईल! लग्न झाल्यावर काय होईल हिच्या नवर्याचं कुणास ठाऊक!'.. निखिल वैतागून म्हणाला. 'त्याची तुला काळजी नकोय! मी मोबाईल-फ्रेन्डली नवरा करेन!'.. संगिता फणकारली. 'तुकारामांच्या वेळेला...