Thursday, September 4, 2008

वादळ

अखेर मी विद्यापीठात पदार्थविज्ञान शिकायला दाखल झालो. खरं तर बरीच वर्ष मला पदार्थविज्ञान कशाशी खातात हेच माहीत नव्हतं. पदार्थविज्ञान म्हणजे निरनिराळ्या खाद्यपदार्थांच्या कृतींचे शास्त्र असणार अशी माझी 'जिव्हा'ळ्याची समजूत होती. अर्थात इतर अनेक समजूतींप्रमाणे ही पण यथावकाश निकालात निघाली.

पाळण्यात असताना पाय सतत तोंडात घालण्याच्या माझ्या सवयीमुळे जाणकारांनी मी पुढे लहान तोंडी मोठा घास घेणार असं भाकीत केलं होते म्हणे, जे फारच बरोबर निघालं. पण बाबांचे माझ्याबद्दलचे भाकीत साफ चुकलं. ठीकठाक असलेल्या सर्व गोष्टी मोडण्याच्या माझ्या विध्वंसक उद्योगांमुळे खवचटपणे ते आईला म्हणायचे "चिमाजीअप्पा पुढे डिमॉलीशन इंजीनिअर होणार". बाबा मला प्रेमाने चिमाजीअप्पा म्हणायचे. जेमतेम पाचवी पास असलेल्या आईला मी कुणीतरी मोठा माणूस होणार म्हणून कृतकृत्य व्हायचं. पण त्यामुळं मला मात्र मी इंजीनिअरींगकडे जावसं वाटू लागलं. नंतर हार्डवेअर लिमिटेशनमुळे मला तिकडे प्रवेश नाही मिळाला. शेवटी प्रवाहपतित माणसं जे करतात तेच मी पण केलं - म्हणजे आधी B.Sc. व मग M.Sc. आमच्या कंपूतले काही जण B.Sc. नंतर सूज्ञपणे बँकांच्या परीक्षादेऊन कारकुनी करू लागले. पण इतर मंडळीना कारकुनी करणं below dignity वाटायचं. "बँकेतली नोकरी म्हणजे इतरांनी पैसे कमवायचे आणि आपण त्याचे हिशेब ठेवायचे" असेही टोमणे नवोदित कारकुंड्याना मारले जायचे. असो.

होता होता पहिला दिवस उजाडला. पहिलं लेक्चर सकाळी ८ वाजता होतं. दोन बशी ('बस'च मराठी अनेकवचन) बदलून आणि कँटीनला चहा बिडी मारून डिपार्टमेंटला जायला लागेपर्यंत ८ वाजून गेले होते. जाता जाता डिपार्टमेंटकडून कँटीनला जाणार्‍या काही घोळक्यांची वाक्यं कानावर पडली...."कॅलशियमसाठी हार्ट्री फॉक equations सोडवली तर ...." एक घोळका."If you look at the dipole radiation......." दुसरा घोळका....बापरे! म्हणजे ही मंडळी सकाळी सकाळी चहाबरोबर फिजिक्स खातात काय? मला ते ऐन दिवाळीत फराळाबरोबर चिकन खाण्यासारखं वाटलं. आमच्या कॉलेजमधल्या फिजिक्सच्या स्टाफरूम मधे सुध्दा कधी असलं बोलणं ऐकलं नव्हतं. तिथं प्रॉव्हीडंट फंड किंवा इंफ्रास्ट्रक्चर बाँड असल्या अर्थपूर्ण विषयांवर चर्चा चालायची. त्या अभ्यासू वातावरणामुळे माझा inferiority complex बळावला आणि इथं काशी घालायचं काही नडलं होतं का असे खचवणारे विचार पिंगा घालायला लागले. पण निदान ते कुठल्या विषयांबद्दल चर्चा करत होते ते तर कळलं ना असा काडीचा आधार माझ्या बुडत्या आत्मविश्वासाला देत मी डिपार्टमेंटमधे ठेपलो.

डिपार्टमेंटच्या दारात फक्त एक मुलगा दिसला. सावळा वर्ण, हसरा चेहरा, उंची साधारण ५ फूट ८ इंच, सडपातळ बांधा, नीट कापलेले केस, अर्धवट वाढलेली दाढी, तपकीरी डोळे, जीनची पँट त्यात खोचलेला शर्ट आणि खांद्याला शबनम असा त्याचा अवतार! आता नक्की कुठं जायचं या विचारात असतानाच त्यानंच एकदम इंग्रजीत विचारलं - "Excuse me, do you know where the main lecture hall is?"."या.. नो.. आय मीन..." - इंग्रजी बोलायचं म्हंटल की माझी (अजून) फॅ फॅ होते."मेन लेक्चर हॉल कहाँ है?" - माझी अडचण ध्यानात घेऊन त्यानं हिंदीचा आश्रय घेतला."मुझे नहीं पता, मुझे भी वही जाना हैं!" - मला एकदम ओळखीची गल्ली सापडल्याचा आनंद झाला."चलो आपुन किसीको पूछते हैं" - इतका वेळ शुध्द बोलणार्‍या त्या मॅननं एकदम मुंबई हिंदीच्या गटारात तोंड घातलं... अगदी एखाद्या खडकी हिरोनं युरोपीयन ललनेच्या कमरेवर हात ठेउन 'चल आती क्या खंडाला?' विचारावं तसं. तरी पण त्याला इंग्रजी न अडखळता बोलता येतंय म्हणून एक सूक्ष्म आदर पण होता. इतक्यात एका खोलीतून एक पोरगेलासा तरूण (बहुधा विद्यार्थी संशोधक असावा) आणि एक फाटका माणूस बाहेर पडताना दिसले. अगदीच गबाळे कपडे, हातात एक स्क्रू ड्रायव्हर, कपड्यांना काही ठिकाणी ऑईल लागलेलं, खोचलेला शर्ट एका ठिकाणातून बाहेर पडलेला असा माणूस फार तर फार वर्कशॉपमधला वर्कर असणार असा तर्क करत आम्ही त्यांच बोलणं थांबायची वाट पहात बाजूला उभे राहीलो. बोलता बोलता अचानक त्या फाटक्यानं "अरे, तू ते कालचं श्रॉडिंगर इक्वेशन बघितलस का?" असा त्या तरुणाला सवाल केला आणि आमची दांडी गुल झाली.
"यहाँ वर्कर लोगोंकोभी क्वांटम मेकॅनिक्स आता है क्या?" माझ्या नव्या मित्रानं दबक्या सुरात पृच्छा केली. मी त्याला डोळ्यांनीच गप्प रहायला सांगितलं आणि हळूच इकडे तिकडे कुठे ज्ञानेश्वर दिसतायतं का ते पाहून घेतलं. नंतर कळलं की तो फाटका माणूस कॅलीफोर्नियातला Ph.D. आहे आणि आम्हाला क्वांटम शिकवणार आहे. गबाळ्या संशोधकांबद्दल पूर्वी नुसतच ऐकलं होतं प्रत्यक्ष पहायची वेळ प्रथमच आली!! त्यांच बोलणं संपल्यावर मग आम्ही लेक्चर हॉल कुठे आहे ते विचारून यथावकाश तिथे प्रवेश करते झालो.

माझा कंपू आधीपासूनच वर्गात होता... असं कसं झालं? पहिलं लेक्चर म्हणून असेल कदाचित... आम्ही दोघे गुपचुप एका बाकावर बसलो. मास्तर स्वतःची ओळख करून देत होता. मी अमुक अमुक.. अमुक अमुक ठिकाणी शिकलो... इंग्लंडमधे सॉलीड स्टेटमधे Ph.D. केली.... च्यायला.. इंग्लंडमधे?.. इथं एकंदरीत पोचलेली मंडळी दिसताहेत.. मास्तरची ओळख संपली आणि त्यानं आम्हाला आपआपली ओळख करून द्यायला सांगितलं. आली का पंचाईत! मनातल्या मनात दोन ओळी बराच वेळ घोकल्या आणि चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करत माझ्या पाळीची वाट पहात बसलो. दरम्यान मास्तरनं बिनधास्तपणे वर्गातच एक सिगरेट पेटवली. चला... निदान मोकळं वातावरण तरी दिसतंय...मनाला थोडा दिलासा मिळाला... होता होता ओळख परेड संपली आणि मास्तर निघून गेला. तो जाता क्षणीच माझ्या नव्या मित्रानं पटकन जाऊन टेबलावरून काहीतरी उचललं. ते मास्तरचं सिगरेटचं पाकीट होतं. मनात म्हंटल - आता हा मास्तरला ते परत करून भाव खाणार. तर तो ते पाकीट माझ्याकडे घेउन आला आणि म्हणाला "चलो, अभी एक एक फोकटका बिडी पीते हैं!" मग काय तो, मी व माझा कंपू या सगळ्यांनी दिवसभर ते पाकीट पुरवून पुरवून वापरलं आणि हां हां म्हणता तो आमच्या कंपूचा एक अविभाज्य घटक झाला. हळूहळू त्याच्या बद्दलची माहिती कळत गेली. त्याचं नाव वेंकट होतं. तो आणि त्याचा शाळेपासूनचा मित्र शेखर हे दोन्ही आमच्या वर्गात होते. दोघे रास्ता पेठेत रहायचे. शेखर अर्धवेळ नोकरी करून फावल्या वेळात शिकत होता.

आम्ही त्यांना यंडुगुंडु म्हणायचो..ते दोघे एकमेकात तमिळ भाषेत बोलायचे म्हणून. यंडु म्हणजे शेखर आणि गुंडु..कधी कधी अण्णा सुध्दा म्हणायचो..म्हणजे वेंकट. एकमेकांना सरळ नावांने हाक मारून पुरेशी जवळीक निर्माण होत नाही यावर आमचा ठाम विश्वास होता.. बनकर नावाचा एक मुलगा होता त्याला सगळे बन्या म्हणायचे आणि कधी कधी "यार! तू कुछ बनकर दिखा!" असा टोलाही द्यायचे. मनोज रमेश माने या नावातली आद्याक्षरे उचलून कुणीतरी त्याला मनोरमा म्हणायला सुरुवात केली. कधी कधी त्याच स्वागत "कोई माने या न माने जो कलतक थे अनजाने" या गाण्यानेही व्हायचं. नंतर कुणीतरी उठवलं की तो आमच्याच टोळक्यातल्या विद्या नावाच्या मुलीबरोबर जास्त वेळ गप्पा मारत बसलेला असतो म्हणून मग त्याला विद्याधर नाव पडलं. मुलींना दुय्यम मानणं आमच्या टोळक्याच्या DNA मधे बसत नव्हतं म्हणून त्यांनाही नावं ठेवली होती. प्रियाचा चेहरा कायम चिंताक्रांत असायचा, चेहर्‍यावर आनंद अभावानेच दिसायचा म्हणून तिला नाराजकन्या पदवी देण्यात आली. विद्या प्रचंड बडबडी म्हणून तिची टकळी झाली. मास्तरांना तर सगळेच नावं ठेवतात. मग आमचा अपवाद कसा असणार? इंग्लंडच्या Ph.D. मधे इंग्रजांचा खडूसपणा पुरेपूर मुरला होता. त्याला काही प्रश्न विचारला की "अहो! एवढं कसं समजतं नाही तुम्हाला?" असं भू भू करून अंगावर यायचा म्हणून त्याचा टॉमी झाला. कॅलीफोर्नीयाचा Ph.D. हा एक नामांकित गोंधळी होता... शिकवायला सुरुवात करायचा अन् मग चुकलं चुकलं म्हणून सगळं खोडून परत पहिल्यापासून सुरुवात करायचा... त्याला कंफ्युशस असं नाव पडलं. आमचा इलेक्ट्रॉनीक्सचा मास्तर कायम हातात सोल्डर गन घेउन इकडे तिकडे फिरताना दिसायचा म्हणून त्याला मॅन विथ द सोल्डर गन अशी उपाधी मिळाली.

आमचं टोळकं जरी अनेक भाषीक लोकांनी भरलेलं होतं आणि मराठी सगळ्यांना यायचं तरी टोळक्याची प्रमुख भाषा हिंदी..धेडगुज्री हिंदी.. होती. आणि बोलताना हिंदी पिक्चर मधल्या निवडक बोअर डायलॉगची फोडणी दिली जायची. डायलॉग नाही सापडला तर अजित, राजकुमार किंवा देवानंद असल्या एव्हरग्रीन लोकांच्या स्टाईली मारत संभाषण व्हायचं. म्हणजे कधी कुठं जायला उशीर झाला तर कोणी "जल्दी चलो! लेट हो गया!" असं मिळमिळीत बोलायच्या ऐवजी "जल्दी चलो, टाईम बाँबमे टाईम बहोत कम है!" असं बकायचे. किती चहा आणायचे हे विचारायला शोलेतल्या अमजदखानचा आधार घेतला जायचा "अरे ओ सांबा! कितने आदमी है?"."तू खुदही गिनले जानी!" एखादा राजकुमार त्याला परस्पर कटवायचा.

हळूहळू कळलं की गुंडू एक अस्वस्थ आत्मा आहे. त्याला कायम काहीना काहीतरी सणक यायची. चांगल्या गप्पा चालू असताना मधेच उठून तो कधी "चलो! गच्चीपे जाके पतंग उडाएंगे!" तर कधी "येरवडामे अच्छी पिक्चर लगी है, चलो जाएंगे!" असं काहीही म्हणू शकायचा. पहीले काही महीने बसने आल्यावर त्याला सायकलने यायची सणक आली... त्या काळात स्कूटरनं फिरणं परवडायचं नाही... परवडलं तरी स्कूटरला असणारी waiting list बघता ती मिळवणं दुरापास्तच होतं. गुंड्याला सायकलचा कंटाळा यायला आणि बाजारात रमोना नावाची मोपेड यायला एकच गाठ पडली. ती एकदम जोरात पळते हे ऐकल्यावर यंडुगुंडू तातडीने trial घेऊन आले. "अरे! क्या भागती है! एकदम हवासे बातें करती है!" यंडुगुंडूनी नुसताच जोरदार प्रचार केला नाही तर दोघांनी प्रत्येकी एक एक गाडी बुक पण केली. "गुंड्या, ये सचमुच भागती है क्या?" आमच्यापैकी काहींनी ती रस्त्यात पाहीली होती पण इतकं बारकं यंत्र माणूस घेउन पळू शकेल यावर कोणाचाच विश्वास नव्हता. "हाँ हाँ! बिलकुल भागती है! आनेके बाद देखले!" इती गुंड्या. होता होता एकदाची त्याची गाडी आली पण त्याच्या चेहर्‍यावर म्हणावा तेव्हढा उत्साह दिसत नव्हता.
"हो गई क्या हवासे बातें?" बन्यानं बहुतेक दुखर्‍या भागावर बोट ठेवलं.
"अरे, नहीं यार, गाडीमे कुछ तो भी प्रॉब्लेम है! बिलकुलही नहीं भागती!" गुंड्या आयुष्यात निराश झालेला दिसत होता.
"तूने गिअर बदलके देखे क्या?" एक एक जण रेशन घ्यायला लागला.
"यंडूकी गाडी मैंने चलाके देखी, वो एकदम तेज चलती है!".. गुंड्यानं प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं.
"गुंड्या इसको दो दो स्टँड क्यूं है?" मनोरमानं साळसूदपणे विचारलं.
"वो स्टँड नहीं है! वो किक है! थोडी नीचे आयेली है!" गुंड्या.
"ये क्या है?" मी सीटच्या पाठीमागे असलेल्या एका उघड्या नळकांडीकडे बोट करून विचारलं.
"अरे, ये तो टूलबॉक्स है! आते आते टूल्स सब गिर गये, लगता है!" गुंड्याला वेग सोडता बाकीचे प्रश्न क्षुल्लक वाटत होते.
"चलो मैं एक चक्कर मारता है!" मानेनं गाडी घेतली आणि मला मागे बसण्याची खूण केली. खरच गाडीला काही वेग नव्हता. कुठल्याही गिअरमधे १० च्या वर काही स्पीड जात नव्हता. सायकलवाले हसत हसत आमच्या पुढे जात होते. मग मधेच मानेला काय सण्णक आली कुणास ठाउक. त्यानं खाड्खाड सगळे गिअर ४-५ वेळा बदलले आणि अचानक स्फोटासारखा फाSSट असा मोठा आवाज आला. मला गाडीची वाट लागल्याची शंका आली. पण काही क्षणातच गाडी वेगाने धावू लागली. सायलेंसरमधे पॅकींगचा बोळा तसाच राहीला होता तो मानेच्या उपद्व्यापामुळे फाडकन उडाला होता.
"अरे यार! तू तो एकदम जिनीअस निकला! डीलरके लोगोंकोभी ये प्रॉब्लेम नही समझा था!" गुंड्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
"वो जिस स्कूलमे पढते है ना, उस स्कूलके हम हेडमास्टर रह चुके है!" मानेच्या फुशारक्या लगेच सुरू झाल्या. बँड लावायची संधी मिळाली की मुळीच सोडायची नाही असा आमचा दंडक होता.

अण्ण्याची ही गळित गात्र गाडी रोज काहीतरी ..कधी मडगार्ड तर कधी सायलेंसर.. गाळून आमची चांगलीच करमणूक करायची. पण गुंड्याला याचा कधीच वैताग आला नाही. त्याला त्यात गंमतच वाटायची.
"चल, उतर" एकदा गुंडू स्कूटर कँटीनच्या बाहेर थांबवता थांबवता म्हणाला. मला त्याच्या स्कूटरच्या मागे कुणीच बसलेलं दिसलं नाही. मग हा बंब्या कोणाला उतर म्हणतोय हे मला कळेना. तेवढ्यात तो परत "हां चल, उतर" असं म्हटल्यावर मात्र मी न राहवून म्हंटल - "अरे गुंडू, हवासे बाते कर रहा है क्या? तेरे पीछे तो कोई है नहीं!". अजूनही 'हवासे बाते'ला एक ऐतिहासीक महत्व होतं.
"मेरे पीछे टकळी बैठी थी, पता नही कहाँ गई! चल, हम उसको ढूंढते हैं!"तो आता पुरता भंजाळलेला होता.
"अबे अकलके अंधे! मै तेरे साथ आया तो तू उसको किधर बिठाएगा?" हे त्याला पटलं व तो लगेच तिला शोधायला निघाला. थोड्या वेळाने तो आणि लंगडणारी विद्या आल्यावर सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला.
"काय टकळे? अशी ठुमकत ठुमकत का चालतेयस?" बन्यानं तिला डिवचलं आणि आम्ही सगळ्यांनी दात काढले.
"अरे, तुमचं काय जातय रे दात काढायला? इथं मी पडलेय, तुम्हाला काय त्याचं सुखदु:ख. सहानुभूती दाखवायची सोडून दात काढताहेत. तुम्हीच तोंडावर पडायला पाहीजे होतात म्हणजे चांगले दात घशात गेले असते." विद्या पिसाळली की तिची फिल्डींग करायला २-३ जणं तरी लागतात पण आज थोडक्यात आवरलं.
"तू तोंडावर पडलीस तर लंगडत का चालतेयस?" मानेनं आगीत तेल घातलं.
"जब बडे बात करते है तब बच्चे बीचमे बोला नही करते!" विद्याने एका बोअर डायलॉगचा आधार घेउन बाजी उलटवली.
"पण काय झालं ते सांग ना!" प्रियाची उत्सुकता शीगेला पोचली होती.
"अगं! गुंड्या मला रस्त्यात भेटला आणि म्हणाला लिफ्ट देतो! म्हणून मी त्याच्या मागे बसले. एका चौकात गुंड्यानं दोन सायकलवाल्यांना लॅप टाकून भसकन overtake केलं आणि मी पडले, माझा पाय मुरगळला. मी थांब थांब ओरडले पण त्या ठोंब्याला कळलंच नाही, तो तसाच निघून गेला. आजुबाजुचे लोक फिदीफिदी हसायला लागले. शेवटी मी लंगडत लंगडत निघाले आणि थोड्यावेळाने तो परत येताना दिसला. मला पडल्याचं दु:ख नाही, तो थांबलाच नाही याच आहे." विद्येची खरी चिडचिड बाहेर आली. गुंड्या कधी कधी पिसाटासारखा ओव्हरटेक करायचा. एकदा मी मागे बसलेलो असताना त्यान उजवीकडे वळणार्‍या ट्रकला उजवीकडून ओव्हरटेक केलं होतं. आ वासून अंगावर येणारा ट्रकचा जबडा पाहून मला स्वर्ग दोन बोटं उरणं म्हणजे काय ते उलगडलं होतं.
"गुंड्या, इतके दिवस तू गाडीचे पार्ट पाडत होतास, आता माणसं पण पाडायला लागलास का?" मी गुंड्याकडे मोर्चा वळवला.
"और तेरेको टकळीकी बडबड अचानक बंद हो गई, ये भी नहीं समझा?" माने परत सुटला.
"हाँ! मुझे लगा के गाडी थोडी लाइट लग रही है! मगर मैने आज सर्व्हीसींग किया था शायद इसलिए..." अण्णाचं विश्लेषण बर्‍याच वेळेला तर्काशी विसंगत असायचं. म्हणून आम्ही त्याला analysis च्या ऐवजी ANNA-lysis (अण्णा लिसीस) असा वेगळा शब्दच केला होता.
"तेरा अण्णा लिसीस बंद कर और सबको चाय लेके आ!" मानेनं सुचवल्याप्रमाणे अण्णा लगेच चहा आणायला गेला आणि प्रकरण तिथेच थांबलं.

दिवस भराभर चालले होते पण फिजिक्स काही फारसं झेपत नव्हतं. सामान्य बुध्दिमत्तेमुळे ते आपल्याला कधीच सुधरणार नाही हेही सगळ्यांना माहीत होते. मग उगीच शिकण्यात वेळ फुकट घालवण्यापेक्षा खेळण्यात घालवलेला काय वाईट असा सूज्ञ विचार करून आम्ही कॅरम टीटी क्रिकेट अशा खेळांना उदार आश्रय दिला होता. सकाळपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आम्ही टीटीचं एक टेबल आणि कॅरमचा एक बोर्ड कायम अडवून ठेवलेला असायचा. त्या नंतरसुध्दा आमची खेळायची तयारी असायची पण विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे ६ वाजता recreation hall बंद व्हायचा म्हणून आमचा नाईलाज होता. मामा काळे या कर्मचार्‍यावर त्या हॉलची जबाबदारी होती. त्याला पटविण्यासाठी तो आला की आम्ही
"मामा काळे, ओ, मामा काळे अब तेरी गलीतक आ पहुंचे" या ओळी
"दिलवाले, ओ, दिलवाले अब तेरी गलीतक आ पहुंचे"या गाण्याच्या चालीवर गाऊन त्याचं जोरदार स्वागत करायचो. पण त्या लाडीगोडीचा काही परीणाम त्याच्यावर झाला नाही. शेवटी एकाला आयडिया सुचली. त्याला आम्ही रोज एक चहा-बिडी पाजायला सुरवात केली. मग तो ६ वाजता असलेल्या सगळ्यांना हाकलून, हॉल बंद करून किल्ली आम्हाला आणून द्यायला लागला. थोडी सामसुम झाली की आम्ही जे खेळायला लागायचो ते रात्री १० लाच थांबायचो. एकदा असच रात्री उशीरा घरी जायला निघालो. गुंड्या त्याची गाडी आणायला गेला पण बराच वेळ झाला तरी येईना म्हणून आम्ही त्याला बघायला निघालो. रस्त्याला चांगल्यापैकी अंधार होता. विद्यापीठातल्या कर्मचार्‍यांचा मंद कारभार संध्याकाळी दिवे चोख चालवत असत. थोड्यावेळाने भांडण्याचा आवाज यायला लागला. गुंड्या आणि एक टांगेवाला यांच्यात जुंपली होती. नेहमीप्रमाणे हवासे बाते करण्याच्या नादात गुंड्याची लॅप सरळ टांग्यात गेली होती. गाडीचे काही अवयव गळाले होते, पुढच्या चाकाचा द्रोण झाला होता.
"चल चौकीवर! दिवा न लावता टांगा चालवतो. माझं नुकसान दे भरून!" गुंड्या तणतणत होता. खर म्हणजे गुंड्याच्या गाडीला पण दिवा नव्हता. त्याच्या दिव्याने काही दिवसापूर्वीच मान टाकली होती. टांग्याचं पण थोडं नुकसान झालेलं दिसत होतं.
"ए चल शाणा बन! तुझ्या गाडीला पण दिवा नाहीये. मला काय सांगतो?" टांगेवाला सोडायला तयार नव्हता.
"तुला नाय तर काय घोड्याला सांगू काय?" गुंड्या सरकला तरी त्याची विनोदबुध्दी शाबुत होती. दादापुता करून कसंतरी ते भांडण मिटवलं. गुंड्याच्या पायाला बरच लागलं होतं त्याला शेखर बरोबर घरी पाठवून दिलं आणि आम्हीपण घरी गेलो. दुसर्‍या दिवशी पायाला बँडेज बांधून गुंड्या लंगडत लंगडत आला.
"पतली दोरीपर चलनेवाला बाजीगर जेजे आज जमीनपरभी सीधा नही चल सकता!" डॉन मधल्या प्राणच्या डायलॉगने मी स्वागत केलं.
"काय तैमुरलंग, तू काल घोड्यावर चढाई केली असं ऐकलं".
"तो घोड्याचा मुका घ्यायला गेला होता".
"नाही नाही खरतर त्याला टांगेवालीचा मुका घ्यायचा होता पण घोडा मधे आला" कुणीतरी टांगेवाल्याचं लिंग सोयीस्करपणे बदललं. दिवसभर असल्या विनोदांना ऊत आला होता. हसून हसून पोटं दुखायला लागली. मधे थोडीशी गॅप पडली की कुणीतरी घोड्यासारखं खिंकाळून चावी मारून द्यायचे की परत सुरू! दुपारपर्यंत बर्‍याच वेळा कालचं पुराण सांगून सांगून त्याचा पेशन्स संपला. नंतर मग "काय लागलं?" या प्रश्नाला तो तिरसटपणे फक्त "घोडा लागला" असं सांगायला लागला आणि ऐकणार्‍याचा भांबावलेला चेहरा बघून आमचं काय होत असेल ते तुम्ही समजून घ्या.जितक्या सहजतेने गुंड्या आमच्या कळपात आला तितक्याच सहजपणे त्यानं इतर कळपातही प्रवेश मिळवला. डिपार्टमेंट तसं छोटं असलं तरी टोळकी बरीच होती... सीनिअर मुल/मुली, रीसर्च करणारे, इतर डिपार्टमेंटचे ग्रुप शिवाय हॉस्टेलमधल्या पोरां/पोरींचा ग्रुप... ईथर सारखा तो सर्वदूर असायचा. त्याचा अस्थिर आत्मा हे कारण असेल कदाचित पण तो बारा पिंपळावरचा मुंजा होता हे खरं! एक रीसर्च करणारा ग्रुप फारच वैशिष्ट्यपूर्ण होता..त्यात दोघेच जण होते... पण चांगलेच दर्दी होते... न्युक्लीअर फिजिक्समधे रीसर्च करायचे. त्यांच्या लॅबमधे रसायनं ठेवण्यासाठी एक फ्रीज होता..फक्त त्यांच्यासाठी. रोज दुपारी कलिंगडाला रमची इंजेक्शनं मारून ते फ्रीजमधे ठेवायचे आणि रात्री सामसुम झाली की कापून खायचे. गुंड्यानं त्यांचा रीसर्च पेपर एकदा टाईप करून दिल्यामुळे त्याला या कलिंगड पार्टीचं अधुनमधुन आमंत्रण मिळायचं आणि आमची जळजळ व्हायची. गुंड्याला टाईपिंग पण येतं हे तेंव्हा कळलं. पुढं त्यानं आमचे प्रोजेक्ट रिपोर्ट सुध्दा टाईप केले.

परीक्षा जवळ आल्यामुळे पास होण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं. सर्वानुमते माझ्या घरी रोज रात्री बसायचं ठरलं. अभ्यासाचं फक्त निमित्त होतं, टाईमपासच जास्त चालायचा. सारखी कुणाला तरी सिगरेट नाहीतर चहाची तल्लफ यायची की त्याच्याबरोबर सगळे बाहेर! सिगरेटी परवडेनाशा झाल्या की खाकी विड्या... सिगरेटी/बिड्या घ्यायला, जवळच्या थेटरमधल्या पानवाल्याकडं जायचो. एकदा बिड्या घेता घेता कुणीतरी म्हंटल "ये नया पिक्चर लगता है ना?" झालं.. भानावर आलो तेंव्हा १२ वाजून गेले होते... त्या रात्रीचा बिडी ब्रेक ३ तास चालला. असं नंतर २-३ वेळा झाल्यावर सगळ्यांना आपण पिक्चर बघायला जमतो का अभ्यासाला असा संभ्रम निर्माण झाला. मग ज्याच्या घराशेजारी थेटर नाही त्याच्या घरी जमायचं ठरलं. पण असं कुणाचच घर नाही हे कळल्यावर सगळे हताश झाले.
"अब हमे बचनेका कोSSई चान्स नही!" माझ्या तोंडून अजित गरजला.
"आपुन हॉस्टेलमे पढ सकते है!" गुंड्याने खडा टाकला.
"नको. तिथून जवळ राहुल थेटर आहे." बन्याला खात्री नव्हती.
"अरे भुईनळ्या! मग काय सिंहगडावर जायचं का?" मी थयथयाट केला.
"अरे तिथं फक्त इंग्रजी पिक्चर लागतात. तुला एकतरी डायलॉग कळतो का? मला तर सगळं डोक्यावरनं जातं." माने सगळ्यांच्या मनातलं बोलला.
"पण हॉस्टेलवरनं रात्री घरी कसं जायचं? बस कुठं असते रात्री?" बन्या एक वातुळ प्राणी आहे... सारख्या शंका काढून वात आणतो.
"बस रात्री डेपोत असते" मानेची बॅटींग सुरू झाली.
"घर कायको जानेका? उधरीच सोनेका". फिजिक्समधली Principle of least action, Principle of least time अशी तत्वं ऐकून गुंड्यानं स्वतःच Principle of least trouble असं एक खास तत्व बनवलं होतं... म्हणजे कुठल्याही समस्येचं निराकरण आपल्याला कमितकमी त्रास करून कसं करता येईल ते बघायचं.
"हॉस्टेलवर आपण कसं झोपायचं?" बन्याला हॉस्टेलवर झोपणं स्मशानात झोपण्याएवढं भीषण वाटत होतं बहुतेक.
"अरे! घरी झोपतो तसच झोपायचं" मानेला फुलटॉस मिळाला.
"बाहेरची खूप लोकं हॉस्टेलवर राहतात. त्यांना पॅरासाईट म्हणतात. रेक्टर चुकून चक्कर मारायला आलाच तर ते गॅलरीत लपून बसतात." गुंड्याला हॉस्टेलवर राहण्याचा थोडा अनुभव होता.
"बन्या, तू काळजी कशाला करतो? अगर हम हैं तो क्या कम हैं?" मानेन एका फडतुस डायलॉगच्या आधारे फुशारकी मारली.
"तू है वोही गम है" बन्याची मानसिक तयारी अजूनही झाली नव्हती पण एकट्यानं अभ्यास करणं त्याला जमणार नव्हतं म्हणून नाईलाजाने तो तयार झाला.

हॉस्टेलच्या पोरांनाही आमच्याबरोबर अभ्यास करण्यात रस होताच... नाही म्हंटल तरी आमच्यातल्या काहीजणांना थोडफार फिजिक्स यायचं. हॉस्टेलवर बसण्याचा एक फायदा होता... बिड्या प्यायला बाहेर जायला लागायचं नाही... चहाला मात्र जावं लागे... फार रात्र झाली तर चालत शिवाजीनगर बस स्टँडपर्यंत!! गुंड्या स्वतः फारसा खादाड नसला तरी इतरांसाठी नेहमीच काहीना काही तरी चरायला आणायचा... मेसच्या खाण्याला वैतागलेले बुभुक्षित त्यावर वखवखल्यासारखे तुटून पडायचे. एकदा गुंड्यानं डबाभर इडल्या आणल्या. सगळ्यात वरती त्याच्या आईने मोठ्या प्रेमाने तिखट चटणीचा गोळा ठेवला होता. आधीच गच्च भरलेल्या एका रूममधे गुंड्या घुसला आणि लाईट गेले. अंधारात करायचं काय म्हणून कुणीतरी खाण्याची आयडिया टाकली."अरे हाँ! मैं इडली लेके आया है!" गुंड्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच त्याच्या जवळ बसलेल्या मानेनं चाचपडत डबा हिसकावून घेउन तो उघडला आणि अंधारात पहिलं जे हाताला लागलं त्याचा बकाणा भरला.. नेमका तो चटणीचा गोळा होता.. एवढी तिखटजाळ चटणी तोंडात गेल्यावर माने ४४० व्होल्टचा धक्का बसल्यासारखा हवेत तीनताड उडाला. अंधारामुळे त्याला बाहेर बेसीनकडेही जाता येईना आणि तोंडातलं थुंकूनही टाकता येईना. त्याला जागच्याजागी उड्या मारण्यापलीकडे काही पर्याय राहीला नाही. कुणालाच काय झालंय हे कळलं नव्हतं.. ते आरामात इडल्या खात होते आणि मधेमधे मानेला कसला झटका बसला यावर उद्बोधक चर्चा करत होते.
"मानेला शॉक बसला!" एकानं परीस्थितीवर प्रकाशझोत टाकला.
"कुणाच्या?" खोटंखोटं वेड पांघरून पेडगावला जाण्याची काहींना सवयच असते.
"लाईट गेल्यावरसुध्दा कुणाला शॉक बसू शकतो हे मला माहीत नव्हतं." एकानं टाकला.
"उड्या मारून पोटात जागा करतोयस काय? गव्हाचं पोतं हलवून हलवून करतात तशी?".. दुसरा.
तेवढ्यात लाईट आले. उजेडात तोबरा भरल्यामुळे मारुतीसारखं दिसणारं तोंड, डोळ्यात पाणी आणि अंगाला सुटलेला घाम पाहून सगळे खिंकाळायला लागले.
"अगदी, उठला तर मारुती बसला तर गणपती, दिसतोय" अजुन एक जण. माने तसा शरीरानं आडदांडच होता. त्या वयातही त्याचं पोट सुटलेलं होतं.
"डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी".. याला कुठल्या प्रसंगी कुठलं गाणं म्हणाव याचा काही पाचपोचच नाही.
"अरे! मारुतीला घाम आला! मारुतीला घाम आला!" मी अफवा उठवली.
माने ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, धावतपळत बाहेर जाउन तो तोंड धुऊन आला आणि मग आम्हाला खरा प्रकार कळला.
"या पै. मारुती माने" बन्यानं स्वागत केलं.
"पै म्हणजे काय रे?" गुंड्याला मराठी येतं असलं तरी बारीकसारीक गोष्टी त्याला माहीत नव्हत्या.
"पैगंबरवासी" बन्यानं मानेला होत्याचा नव्हता करून टाकला.
"आता तू हवा सोडलीस तर जाळ येईल कारे?" कुणाच्या तरी अंगातला निद्रीत संशोधक जागा झाला.
"तू गरम पाणी पी म्हणजे बरं वाटेल. लोहा लोहेको काटता है!" गुंड्याही डायलॉगबाजीत मागे नव्हता.. बरं झालं, याला मेडीकलला प्रवेश नाही मिळाला ते... आगीनं होरपळलेल्या लोकांनासुध्दा यानं गरम पाण्यानं आंघोळ करायचा सल्ला दिला असता.
"च्यायला! मला पोचवता काय भ..*$@&. थांबा. एकेकाच्या कानाखाली जाळ काढतो चांगला" मानेनं खोट्या खोट्या रागानं बन्याचं मानगुट धरलं.
"सरदार! सरदार! मैने आपका नमक खाया है! सरदार!" बन्यानं शोलेच्या डायलॉगनं करुणा भाकली.
"अब गोली खा!" मानेनं खिशातून लिमलेटची गोळी काढून दिली. गोळ्यांनी बिड्यांचा वास मारला जातो असा एक (गैर)समज आहे म्हणून प्रत्येक फुकणार्‍याकडे गोळ्यांचा स्टॉक हा असतोच.

एवढा जालीम अभ्यास केल्यावर पास व्हायची काय बिशाद होती.. प्रत्येक जण कमितकमी एका विषयात नापास झालाच. पुढच्या सेमिस्टरला सॉलीड अभ्यास करून सर्व विषय सोडवायचे असा निर्धार करून सगळे जोमाने कॅरमवर बसले. अभ्यासात मार खात असले तरी खेळ आणि संगीत या क्षेत्रात सगळेच पुढे होते. प्रत्येकजण कमितकमी दोन खेळात तरबेज होता. गुंड्या कॅरम व क्रिकेट चांगला खेळायचा. तो आमचा विकेटकीपर कम् बॅट्समन होता म्हणजे विकेटकीपर कम, बॅट्समन जादा. त्याच्या बॅटींगमुळे आम्ही बरेच सामने जिंकले होते. बरीचशी खेळातली पदकं आमच्या टोळक्यातच असायची. शास्त्रीय संगीत जरी फारसं कुणी शिकलं नव्हतं तरी तालासुराचे प्राथमिक ज्ञान सगळ्यांना होते... बाथरूम घराण्याच्या गायकीत तरबेज असले तरी सुरात गाणी म्हणायचे... गुंड्या "एक हसीन शामको दिल मेरा खो गया" हे गाणं उत्तम म्हणायचा... ज्यांचा आवाज चांगला नव्हता ते काहीना काहीतरी वाजवायचे. गॅदरींगच्या काळात आमच्या ग्रुपला बराच भाव असायचा... अर्थात आमच्याकडे त्या काळात आदराने बघणार्‍या नजरा नंतर सहानुभूतिनं ओथंबायच्या... 'बरी मुलं आहेत पण वाईट संगत लागली' अशा अर्थाच्या!!

दरम्यान बन्याची विकेट पडली. फिजिक्स आपल्याला अजिबात झेपणार नाही असा साक्षात्कार झाल्यानं त्यानं गुपचुप एका बँकेची परीक्षा देउन ऑफीसरची जागा मिळवली... पण पार्टीशिवाय असल्या बातम्या लोकांच्या मनात ठसत नाहीत. मग संध्याकाळी सगळे त्याच्या पार्टीला जमले. बोलता बोलता, एका मिनटात जास्तीतजास्त बिअरच्या बाटल्या पिण्याची पैज लागली. अतिरेकी गुंड्यानं ती एका मिनटात पावणे दोन बाटल्या पिऊन जिंकली. पण पुढचा सबंध वेळ त्याला काहीही सुधरत नव्हतं... नुसता सुम्म्म्म बसला होता... त्याला चालता पण येत नव्हतं. अशास्थितीत त्याला घरी कसा पाठवायचा म्हणून मग हॉस्टेलवर पोचवला.

दुसरं सेमिस्टर आलं आणि गेलं.. आमच्या स्थितीत षस्पसुध्दा फरक पडला नाही. तिसरं सेमिस्टर सुरू झालं. नवीन बॅचमधे एक आशा नावाची मुलगी होती. ती मला गुंड्यानं कारण नसताना चिकटवली. निमित्त तिच्याशी फक्त एक-दोन वेळा बोलण्याचं झालं. तिला आशू म्हणतात हे कळल्यावर मला आशुतोष नाव पाडण्यात आलं. आमच्या गँगच्या पोरीही अशा डांबरट.. तिला मुद्दाम कँटीनमधे आमच्या टेबलवर गप्पा मारायला घेऊन यायच्या.. आणि कँटीनच्या मॅनेजरला सांगून "आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जबानपर" हे गाणं लावायच्या. पुढचे ७-८ महीने रोज मला --

आशा अगं आशा
कधी समजेल तुला
माझ्या डोळ्यांची भाषा

किंवा

इकडे आशा तिकडे निराशा
मधे चिमण्याचा तमाशा

असल्या टुकार कविता व मधे मधे "चिमण्या नुसत्या आशेवर जगू नकोस! काहीतरी कर!" असले डायलॉग ऐकवून जीव नकोसा केला. शेवटी माझं आणि गुंड्याचं जोरदार भांडण झालं.. "मी M.Sc. सोडलं, परत येणार नाही" असं ठणकावून मी घरी गेलो ते दोन दिवस आलोच नाही. गुंड्या मानेबरोबर हारतुरे घेऊन समेटासाठी घरी आला.
"क्या यार चिमण्या, तुम तो आजकल कहीं दिखताहीच नहीं!" अमिताभच्या अमर अकबर अँथनी मधल्या डायलॉगनं गुंड्याचं ओपनिंग.. जसं काही त्या टोणग्याला माहीतच नव्हतं.
"अरे चिमण्या, तुझ्याशिवाय आमची करमणूक कशी होणार?" माने जरुरी पेक्षा जास्त स्पष्ट बोलतो.
"अरे पण काही लिमीट आहे का नाही" मी अजून धुमसतच होतो.
"तुला मित्र हवेत का कुत्री?" मानेच्या रोखठोक सवालाला माझ्याकडं काही जवाब नव्हता. मी परत जायला लागलो. अधुनमधुन आशा प्रकरण डोकं वर काढायचं पण खूपच कमी झालं होतं.

आशा प्रकरण चालू असताना गुंड्याला दोन नवीन नाद लागले - एक भविष्य बघण्याचा आणि दुसरा ट्रेकिंगचा. काय त्याला एवढा स्वतःच्या भविष्यात रस होता देव जाणे. पण लकडी पुलावरचा पोपटवाला, हात बघणारे आणि पत्रिका बघणारे यांच्याकडे त्याच्या चकरा चालायच्या. त्याला पोपट पिंजर्‍यातून येऊन चोचीनं पान उचलून देतो ते बघायला फार आवडायचं. जाताना पोपटवाल्याला हमखास थोडे जास्त पैसे देऊन पोपटाला नीट खाउ-पिउ घाल असं बजावायचा. आम्ही "आपलं भविष्य आपल्या तळहातात नसून ते त्या मागच्या मनगटात असतं" असं काहीबाही सांगायचो, पण तो बधला नाही.

दर रवीवारी गुंड्या कुठल्याना कुठल्या ट्रेकवर जायचा. उन्हातान्हाचं, नाही ते डोंगर कारण नसताना चढणं आमच्यासारख्या आळशी व निवांत लोकांना जमणं शक्यच नव्हतं म्हणून आमच्यापैकी कोणी जायचं नाही. उलटं आम्ही त्याला "अरे अण्ण्या! ये ट्रेकिंगकरके कायको जवानी बरबाद करता है?" म्हणून परावृत्त करायचा प्रयत्न करायचो, पण त्याचा उपयोग नाही झाला. आजुबाजुचे गड पालथे घातल्यावर एका सुट्टीत मनालीला दोराच्या सहाय्यानं अवघड डोंगर चढायचं शिक्षण घेऊन आला... येताना माझ्यासाठी एक बाजा (माउथऑर्गन) घेऊन... पुण्याच्या दुकानात मला मनासारखा बाजा मिळाला नव्हता ते त्यानं लक्षात ठेवलं होतं. मी फारच खूष झालो... लगेच २-३ गाणी बसवून टाकली.

एका ट्रेकला जायच्या आदल्या शनीवारी रात्री नेहमीप्रमाणे आम्हाला 'अच्छा' करून तो गेला तो कायमचाच.. एका मित्राच्या घरी गाड्या लावून ते पुढे बसने जाणार होते. रमोनावरून पहाटे पहाटे जाताना एका ट्रकनं निर्दयपणे त्याला आयुष्यातून उठवलं... नेहमी आईच्या 'दही खाऊन जा' या सांगण्याला नकार देणारा माणूस आज नेमका दही खाऊन निघाला होता... आजही नसता थांबला तर... कदाचित...!!!

हवासे बाते करणारा एक स्वच्छंदी तितक्याच सहजपणे खुदासे बाते करायला निघून गेला. आयुष्याची दोरी बळकट नसेल तर तरबेज गिर्यारोहकालासुध्दा जीवनाचा डोंगर चढता येत नाही.

रवीवारी बातमी कळल्यावर मी पायातलं त्राण जाऊन मटकन खाली बसलो. कसंबसं सावरून धावत पळत नंतर ससून मधे गेलो. गेलेला माणूस दुसराच कोणीतरी असेल ही वेडी आशा खोटी ठरली... तो तोच होता... चेहर्‍यावरचं नेहमीचं स्मितं विधात्यानं कायमचं पुसलं होतं... सगळेच सुन्न झाले होते... अश्रू आवरत नव्हते... एवढी टिंगलटवाळी करूनसुध्दा माणसं एकमेकांच्या इतकी जवळ जातात?

त्याच्या अवेळी जाण्यानं एक वादळ आलं आणि माझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेलं... मी जास्त हळवा झालो... दुसर्‍यांच्या भावना मनाला भिडायला लागल्या... सिनेमातले हळवे प्रसंग हसू आणायच्या ऐवजी डोळ्यांच्या कडा ओलावू लागले.

अजूनही मी तो बाजा जपून ठेवला आहे... पण आता तोही त्याच्यासारखा अबोल झाला आहे.

8 comments:

सत्य,आशा व प्रयत्नवादी said...

Tumhi atyant pradnyawant lekhak ahaat.Tumachyashi adhik samwaad sadhayachi icchaa ahe.Krupaya sampark kara.
young.explorer19@gmail.com

Anonymous said...

Great. That was avery nice, entertaining yet thoughtful presentation. Thanks.

sharad

Anonymous said...

kasla danger shevat kela ahes...ofc madhye asunhi dolyat chatkan pani ale...

स्मिता पटवर्धन said...

jabaradast lihilays
shevat helavun taknara aahe,
kitidahi vacahl tari navin vatat

Satya said...

Lekh apratim aahe!!!

Lekhachya madhya paryant mi pot dharun hasat hoto pan lekhane shevati atyant anapekshit aani dukhi turn ghetala..

As a result I am having confused emotions... Should I put in smiley :) or sad smiley :( ...

संकेत आपटे said...

तुमच्यात प्रतिभा आहे भाऊ. यू रियली आर वेरी टॅलेंटेड. काय मस्त लिहिला आहे लेख. शेवट वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावल्या. आणि आधीचा लेख वाचताना आलेलं कसू दाबून ठेवण्यासाठी मला कोण यातायात करावी लागली! मी ऑफिसमध्ये असताना तुमचा लेख वाचत होतो. त्यामुळे हसताना आवाज येऊ नये म्हणून एका हाताने तोंड दाबून लेख वाचत होतो. खूपच छान आहे लेख. एकदम मस्त. नेट-भेटमध्ये तुमचा एक लेख वाचला आणि मग सगळे वाचायचं ठरवलं. मस्तच लिहिता एकदम. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. फक्त लिखाणाची फ्रिक्वेन्सी थोडी वाढवलीत तर बरं होईल.

Satish said...

khupach mhanaje... khupach... ekdam tudumb chhan....

Tejali said...

:) :'(