सोबती

पहाटेचे ६ वाजलेले असतात. मी कामावर जाण्यासाठी म्हणून गाडीपाशी येतो. उशीरा निघालो तर ऑफिसला जायला २ तासांच्यावर वेळ लागतो म्हणून लवकर निघण्याचा खटाटोप! गाडीवर भरपूर फ्रॉस्ट जमलेले असते. एकंदरीत थंडीचे दिवस उदासवाणेच असतात.. छोटा दिवस, जास्त अंधार, येताजाता धुकं व बर्फ, दणकट थंडी आणि भेसूर दिसणारे निष्पर्ण वृक्ष! शिव्या घालत घालत निरुत्साहाने बर्फ काढतो आणि गाडी घेऊन निघतो. हाताला लागेल ती सिडी सरकवून गाणी लावतो. "आखोंमें तुम दिलमें तुम हो".. हाफ टिकट मधलं किशोर व गीता दत्तचं गाणं लागतं. पिक्चरमधले प्रसंग डोळ्यासमोर तरळू लागतात आणि हळूच ओठांच्या कोपर्यातून हसू फुटतं. मन प्रफुल्लित होतं. आपोआप मी गुणगुणायला लागतो. डोळ्यावरची झोप उडून जाते. मघाचा वैताग कुठल्याकुठे पळून जातो. परक्या देशात अचानक जुना जवळचा मित्र भेटल्याचा आनंद होतो. कधी एकदाचा संपतोय हा प्रवास असं वाटायच्या ऐवजी आता संपूच नये असं वाटतं! हाफ टिकट मधे किशोरनं काय अशक्य अभिनय केलाय! कधी कधी असं वाटतं की दिग्दर्शक त्याला फारसं काही सांगायच्या फंदात पडला नसावा.. 'सेटवर जा आणि पाहीजे तो गोंधळ घाल!' एवढंच सां...