सsप्राईज! सsप्राईज!
मोठा झाल्यावर बापाचं नाव काढणार असं सतत कानावर पडल्यामुळे मी माझं नाव प्रकाश महादेव माटे या ऐवजी प्रकाश माटे असं सुटसुटीत करून टाकलं. नाही. नाही. माझं श्री. म. माट्यांशी काही नातं नाही. काही लोकांना उगीचच नावांची यमकं जुळवायची खोड असते म्हणून आधीच सांगीतलं. तर गु. ल. देशपांड्यांचा पु. ल. देशपांड्यांशी जेवढा संबंध असेल तेवढाच माझा श्री. म. माट्यांशी आहे. एके दिवशी माझ्या कंपनीनं माझी भारतातून उचलबांगडी करून इंग्लंडच्या एका बारक्या गावात तिथल्या सरकारचं काम करण्यासाठी एक वर्षाकरीता पाठवलं. तीन वर्ष उलटून गेली तरी ते वर्ष संपायचं आहे कारण सरकारी कारभार सगळीकडे थंडच चालतो. असल्या बारक्या गावात कुणी भारतीय असेल की नाही ही मला चिंता नव्हती. भारतीय आणि चिनी माणूस ढेकणासारखा सर्व विश्वात पसरलाय. हे एलियन दुसरे तिसरे कुणी नसून यापैकीच कुणीतरी आहे असा काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. सांगायची गोष्ट ही की माझी भारतीय माणसाशी भेट लगेचच झाली. एकदा मी दूध घ्यायला जवळच्या दुकानात घुसलो, दूध घेतलं व पैसे द्यायला काऊंटरवर गेलो आणि दुकानाच्या मालकानं एकदम गुजराथी भाषेत सरबत्ती केली. आधीच माझा गुजराथीचा...