Sunday, April 26, 2009

गिरमिट

काल परत एकदा ते घडलं. परीक्षा द्यायला बसलो होतो. पेपर बघून तोंडाला फेस आला होता. प्रश्न ओळखीचे होते पण पाठ केलेलं काहीच आठवत नव्हतं. शेजारच्या बाकावर बसलेल्या मक्याकडे पाहीलं. तो ठणाठण लिहीत सुटला होता. ह्याला कशी काय आज माझी मदत लागत नाहीये? नेहमी आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो. आम्हा दोघांना बर्‍याच वेळा पूर्ण उत्तर, पहिले एक दोन शब्द सांगीतल्याशिवाय, आठवतच नाही. एकदा शब्द कळाले की पुढचं धडाधड बाहेर पडतं. ते एक दोन शब्द आम्ही एकमेकांना हळूच सुचवत असतो. पण आज हा गडी बघायलाच तयार नाही. आता पेपर कोरा जाणार. म्हणजे एक वर्ष गेलं ना कामातून! भयाण टेंशन आलं. अंगाचा थरकाप झाला. प्रचंड घाम फुटला आणि मला जाग आली. शेजारी बायको निवांत झोपली होती. हळूहळू स्वप्न पडल्याचं लक्षात आलं आणि सुटकेचा निश्वास टाकला. हुश्श!

ही अशी परीक्षेची स्वप्नं मला अजून पडतात. तेच तेच पेपर मी परत परत देत असतो.. अगदी स्वप्नात सुध्दा पूर्वी हा पेपर दिला आहे याची मला जाणीव असते. लोकांना कशी गोड गोड स्वप्नं पडतात? असल्या स्वप्नांच्या मागे कोवळ्या वयातले, मनावर खोलवर परिणाम करणारे, धकाधकीचे प्रसंग लपलेले असतात असं मी कुठेतरी वाचलेलं होतं.. ते इतकं खरं असेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. काही म्हणा, आपला मेंदू पण काय सॉलीड यंत्र आहे ना? योग्य नोंदी न ठेवता भलभलत्याच ठेवतो. मी सगळ्या परीक्षा (कशाबशा का होईना) पास झाल्याची मेंदूत काहीच कशी नोंद नाही? आहे ती फक्त परीक्षा आल्यावर तंतरण्याची किंवा परीक्षा हुकल्याची.

का बरं हे परीक्षेचं भूत अजूनही पछाडतंय मला? माझ्या डोक्याला जबरी भुंगा लागला आणि माझी प्राणप्रिय झोप उडाली. अशा किती परीक्षा दिल्या मी? शाळेपासून विद्यापीठापर्यंतच्या सर्व परीक्षा... अधिक स्कॉलरशिप नावाच्या दोन भीषण परीक्षा.. त्यात एसेसीच्या, अनाठायी गाजावाजा झालेल्या, मी कष्ट घेऊन विसरायचा प्रयत्न केला तरीही इतरांनी टोचून टोचून सतत लक्षात आणून दिलेल्या, परीक्षेचा विशेष उल्लेख हवा.. मग नोकरी साठी दिलेल्या परीक्षा आणि मुलाखती.. या सगळ्यांनी पुरेसा छळ होत नाही म्हणून मायक्रोसॉफ्ट, ऑरॅकल सारख्या बड्या बड्या धेंडांनी काढलेल्या त्यांच्या त्यांच्या प्रमाणपत्र परीक्षा!

कधी कधी तर मला वाटतं की माणसानं माणसावर केलेला बौध्दिक अत्याचार म्हणजे परीक्षा. एकेक विषय म्हणजे लांब पल्ल्याची शोकांतिका.. सुरवातीचा आणि मधला भाग थोडा फार वेगळा असला तरी शेवट एकच.. तोंडाचं पाणी डोळ्यावाटे बाहेर काढणारा. शाळेत चित्रकला या विषयानं मजबूत काव आणल्याचं मला चांगलं स्मरतंय. माझं नि चित्रकलेचं पीढीजात वैर.. आमच्या घराण्यात एकही चित्रकार झाला नाही हा त्याचा ठसठशीत पुरावा! खुराड्यापेक्षा आकाराने मोठ्या कोंबड्या, अर्धांगवायू झाल्यासारखी वाटणारी माणसं असे माझ्या चित्रांचे काही ठळक नमुने.. नाही म्हणायला, एक चित्र मला त्यातल्या त्यात जमायचं - दोन डोंगर, मधे उगवणारा सूर्य, एक वाहणारी नदी, उडणारे पक्षी इ.इ. बाकी माझी चित्रं, कोंबडीच्या पायांना रंग लावून तिला कागदावर भांगडा करायला लावल्यास जे काही होईल, तशी असायची.. मॉडर्न आर्ट म्हणून नक्की खपली असती.. पण दुर्देवाने माझ्या चित्रकलेच्या मास्तरला तेवढी समज नव्हती.. आणि भारत देश एका अभिजात कलावंताला मुकला. मास्तरनं मला काठावर पास करून वरच्या वर्गात ढकलून द्यायची सहृदयता दाखवली म्हणून वाचलो, नाहीतर आयुष्यभर शाळेतच रहायची वेळ आली असती.. अर्थात् नुसता मीच वाचलो असं म्हणणं तितकसं बरोबर नाही.. मास्तरही वाचला असं म्हणायला पाहीजे खरं. आता तर मला हे दुसरंच कारण जास्त उचित वाटायला लागलंय.

चित्रकला विषय सुटल्यावर मी सुटलो असं वाटलं होतं पण गणित, विज्ञान यातल्या आकृत्यांनी परत डोकं उठवलं. आकृत्यांमधे तर काय सरळ रेषाच जास्त करून काढायच्या असतात.. पण पट्टी पेन्सील वापरून देखील माझ्या रेषा कधी सरळ यायच्या नाहीत. कधी पट्टीला नको तिथे पडलेल्या खळ्या माझ्या रेषांना पडायच्या, कधी पेन्सीलीच्या पिचलेल्या टोकामुळे दोन दोन सरळ रेषा यायच्या, कधी रेघ मारताना पट्टीच हलायची, तर कधी पट्टीवर ठेवलेल्या बोटाचा आकार रेघेला प्राप्त व्हायचा. भूमितीतले माझे त्रिकोण क्वचितच तीन कोनी व्हायचे. कधी टेस्टट्युबच्या रेघा सरळ मारण्यात महान यश मिळालंच तर ते क्षणभंगुर ठरायचं.. कारण त्या दोन समांतर रेघा, रेल्वेचे रूळ जसे लांबवर पाहिल्यावर एकमेकांना भेटल्यासारखे वाटतात, तशा भेटायच्या.

इतिहासात माझा दारुण पराभव हमखास ठरलेला. 'अफझलखानाचा वध कुणी केला, सांग' असं मास्तरनं दरडावून विचारलं की 'मी.. मी नाही केला' एवढंच चाचरत चाचरत सांगू शकायचो. इतिहासाची परीक्षा म्हणजे, कुणी कोणावर कधी हल्ला केला, कुठल्या राजानं काय सुधारणा केल्या, अमुक राजाचा जन्म केव्हा झाला असल्या निव्वळ टिनपाट प्रश्नांची बजबजपुरी.. यांचा अभ्यास पाठांतर न करता कसा करणार? एके दिवशी वैतागून 'अभ्यास कसा करावा' असं एक पुस्तक घरी आणलं. त्यात त्यांनी विषय नीट वाचून त्याचे मुद्दे काढावेत व त्यांच रोज मनन करावं असं लिहीलं होतं. सनावळ्यांचे काय डोंबल मुद्दे काढणार? फायदा एवढाच झाला की पाठांतराला मनन असा नवीन शब्द समजला.

त्याच पुस्तकात उत्तरं कशी लिहू नयेत याचंही एक उदाहरण होतं. प्रश्न होता, 'शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन करा'. उत्तर होतं, 'अहाहा! काय तो राज्याभिषेकाचा थाट! अहाहा! काय ती त्यांची भवानी तलवार! अहाहा! काय ते त्यांचे सिंहासन'. असे बरेचसे 'अहाहा' झाल्यावर उजव्या बाजुला लाल अक्षरात परीक्षकानं 'अहाहा! काय ते मार्क!' असं लिहून पुढे मोठ्ठ शून्य काढलं होतं. हे उत्तर चुकीचं कसं काय आहे हे मला अजूनही कळलेलं नाहीये.

इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इंग्रजीतली स्पेलिंग, व्याख्या, प्रमेय, संस्कृत हे आणि असे इतर कितीतरी गनीम तर केवळ मननाचे आयटम. परीक्षा आली की धुण्याची काठी घेऊन मी मननाला बसत असे. प्रश्नाचं उत्तर वाचायचं नि मग मोठमोठ्या आवाजात (घरच्यांना कळलं पाहीजे ना, मी अभ्यास करतोय ते), पुस्तक बंद करून, ते म्हणायचं. मग पुस्तक उघडून सगळं बरोबर आलं की नाही ते पहायचं. चुकलं की जोरात काठी आपटायची. या भानगडीत किती काठ्या मोडल्या याचा हिशेब आमच्या दुकानदाराकडे असेल. नंतर नंतर परीक्षा जवळ आली की आई धुण्याची काठी लपवून ठेवायला लागली. माझ्या पुढील शैक्षणिक र्‍हासाला ते एक मोठ्ठ कारण झालं.

कॉलेजच्या पहिल्या वर्षी जीवशास्त्र नामक जीवघेणं शास्त्र जीव खाऊन मागे लागलं. जगातल्या निरनिराळ्या जीवांचे वर्गीकरण करणे हा या शास्त्राचा आवडता छंद! माझ्या मते जगात फक्त दोनच प्रकारचे जीव होते.. एक पिडणारे आणि दुसरे पिडलेले.. पण आमच्या बाईचा पुस्तकी ज्ञानावर गाढा विश्वास असल्याने माझं सुटसुटीकरण तिच्या पचनी पडलं नाही. शिवाय, या विषयात येता जाता अगणित चित्रं काढायला लागायची.. त्यानं माझं उरलं सुरलं अवसान गळालं. त्यातल्या त्यात मला अमिबाचं चित्र थोडं फार जमायचं.. कारण कुठल्याही प्राण्याची मी काढलेली चित्रं साधारण अमिबा सारखीच यायची.. पण मी अमिबा म्हणून काढलेल्या माझ्या चित्रास, 'हे काय काढलंय?' असा हिणकस शेरा आमच्या कॉलेजच्या जीवशास्त्राच्या बाईनं मारला.. त्यानंतर मात्र मी पहिल्या संधीला त्या शास्त्राला कायमचा रामराम ठोकला.

गणित, शास्त्र हे विषय नस्ते उपद्व्याप, चांभारचौकशा आणि नस्ती उठाठेव करणार्‍या काही विकृत लोकांनी जन्माला घातलेत. आर्किमिडीज हा विकृत माणूस होता. त्याशिवाय तो रस्त्यावर त्या विशिष्ट अवस्थेत कसा पळाला असता? भारतात पळाला असता तर लोकांनी त्याला परत त्याच्या टबमधे घालून बुडवला असता. त्रिकोणाच्या कोनांची बेरीज १८० अंश का असते? लोखंड पाण्यात बुडते पण लोखंडी जहाज का तरंगते? असल्या प्रश्नांना चांभारचौकशा आणि त्याची उत्तरे शोधण्यासाठी केलेल्या उद्योगांना नस्ते उपद्व्याप म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? काटकोन त्रिकोणातल्या दोन बाजुंच्या लांबीवरून तिसर्‍या बाजूची लांबी काढायचं सूत्र पायथागोरसनं काढलं त्याला नस्ती उठाठेव या शिवाय अन्य काही समर्पक शब्द नाही. हा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा सरळ तिसर्‍या बाजूची लांबी मोजावी ना?

भाषा विषय पण चांगले पीळदार असतात. मराठी मातृभाषा असूनही तिचा अभ्यास करताना तिच्याबद्दलचा अभिमान वगैरे गळून पडायचा. अमुक अमुक वृत्त चालवा म्हंटलं की माझ्या मनात निवृत्तीचे विचार घोळायचे. सगळ्यात जालीम प्रकार म्हणजे रसग्रहण. बालकवींच्या फुलराणी कवितेचं माझं सरळसोप्पं, निरागस रसग्रहण असं सुरु व्हायचं - 'फुलराणीचा वेळ जात नव्हता म्हणून ती गवतावर खेळत होती'.. कशाचंही काय रसग्रहण करायचं? उद्या, 'भैरु उठला, भैरुनं दात घासले, नाश्ता करून भैरु गवतावर खेळत बसला', याचंही रसग्रहण करा म्हणतील. संस्कृतच्या परीक्षेत भाषांतरं पाठ केली की पोटापाण्यापुरते मार्क मिळायचे. परीक्षा आली की गाईड आणि काठी घ्यायची, की सुरु - झक्कू ताड्या घोट्या, घण घण घण. इंग्रजी भाषेत स्पेलिंग आणि उच्चार यांचा एकमेकांशी नाममात्रच संबंध आहे. उदा. कर्नल या शद्बाचा उच्चार मराठी माणसानं केला असावा किंवा स्पेलिंग बोबड्या माणसानं केलं असावं याबद्दल तुमचं काय मत आहे? इंग्रजीतून निबंध लिहीणं ही मोठ्ठी सर्कस होती.. आधी मराठीतून वाक्य तयार करायचं, मग त्यासाठी मनातल्या मनात इंग्रजी शब्द शोधायचे. ते कधी सापडायचे नाहीतच. मग मराठी वाक्य बदलून परत शोध चालू. हे सगळं करता करता वेळ संपायला आला की मी टेन्स होऊन वाक्यांच्या टेन्सचा खून करायचो.

असे कितीतरी विषय आणि त्यांच्याशी झालेल्या खडाजंगी लढाया! एक एक विषय मास्तरांनी डोक्याला गिरमिट लावून घुसवला. परिणामतः डोकं सच्छिद्र झालं व त्यात काहीच शिल्लक राहीलं नाही. मग डोकं गमावलेल्या मुरारबाजी प्रमाणे मी परीक्षा लढलो यात नवल ते काय? आणि आता इतक्या परीक्षांतून गेल्यावर चरकातून बाहेर पडलेल्या उसाच्या चिपाडासारखं वाटतंय.

असो. आता मी थकलोय. फार झोप यायला लागलीय. हे वाचून तुम्हाला असली स्वप्नं न पडोत एवढीच प्रार्थना! एवढा सखोल विचार करूनही शेवटी स्वप्नांचं मूळ सापडलं नाही ते नाहीच. तुम्हाला काही सुचलं तर सांगा. शुभ पहाट!

--- समाप्त --

9 comments:

Yawning Dog said...

ashakyaaaaaaaaaa.
Ulimate post ahe, dhunyachya katheecha prakaar tar bhannat ahe

bhaanasa said...

भन्नाट!! खूपच मजा आली.शाळा,कॊलेजच्या अनेक आठवणी एकदम मुसंडी मारून जाग्या झाल्या.

Aniket Samudra said...

तुमचं पाठांतर नक्कीच दांडग असलं पाहीजे नाहीतर इतके सगळे आठवणे म्हणजे अशक्यच. मला ही असले परीक्षांची स्वप्न पडतात आणि मग झोपमोड होते. तिनही वर्ष कॉलेज मध्ये टॉपर असुनही कॅपस मध्ये कधीच सिलेक्शन झाले नाही. का तर मला ते ऍप्टीट्युड जमलेच नाही.

काय तर म्हणे एक आगगाडी 'क्ष' वेगाने चालली आहे. विरुध्द दिशेने एक पक्षी 'क' वेगाने उडतोय. मध्ये इतक्या मैलावर एक खांब आहे. तर किती वेळाने दोनही गोष्टी एकाच वेळी त्या खांबापाशी पोहोचतील? हा काय प्रश्न झाला? अरे मी संगणक अभियंता आहे, पक्षी तदन्य किंवा रेल्वेतील कारकुन नाही असे ओरडुन सांगावेसे वाटायचे...

बाकी लेख आवडला.

सर्किट said...

mastach. :) ekdum awaDya.

pu.la. nchya "bigri te matric" chi athavan zali. :)

Sonal said...

सॉलिड सॉलिड सॉलिड आणि सॉल्लिड या पलिकडे काही शब्दच सुचत नाही! प्रत्येक पॅरॅग्राफला ह.ह.पु.वा!

Aparna said...

sahichh!!! :)

Mugdha said...

baapre..evdhi pot dhardhraun hasle mi ...ajunhi hasatach ahe...thanks chimanrao thanks :)

संकेत आपटे said...

भन्नाट. मलाही कधीकधी अशीच स्वप्नं पडतात. परीक्षेत नापास झाल्याची! दुर्दैवाने यातली काही नापास होण्याची स्वप्नं खरीही झालेली आहेत...

इंद्रधनु said...

अहाहा!!! :D