रिसेशन - एक काथ्याकूट
(टीपः या लेखातील पात्रे 'ठरविले अनंते' या लेखातून उचलली आहेत. तो लेख माझाच असल्यामुळे लेखकाची पूर्वपरवानगी घेण्याची गरज वाटली नाही. किंबहुना, लोकांनी तो लेख वाचावा या निर्मळ हेतुनेच हा प्रपंच केला आहे.) "अरे चिमण्या, आजकाल सगळं ग्लोबल झालंय. तिकडे खुट्ट झालं की इकडे पटापट दारं लावतात. तिकडे माशी शिंकली की इकडे लोकं सर्दीची औषधं घेतात. इकडच्या बिळात अल कायदा सरपटला तर तिकडचे लोक काठ्या घेऊन मारायला निघतात. इतकंच काय, साधं वॉर्मिंग पण ग्लोबल झालंय तर!".. 'रिसेशन ग्लोबल आहे की नाही' या माझ्या भाबड्या प्रश्नावर दिल्यानं आख्यान लावलं होतं. आमची साप्ताहिक सभा भरली होती. मी, सरिता, दिल्या आणि कल्पना एवढेच उपस्थित होते.. मक्या आणि माया अजून उगवले नव्हते. मला अजूनही कल्पनाच्या डोळ्यांकडे पहायचं डेरिंग होत नाही. काहीतरी बोलायचं म्हणून मी दिल्याला चावी मारली होती अन् माझ्या कर्माची फळं भोगत होतो. कल्पना तन्मयतेनं दिल्याचं बोलणं ऐकत होती.. दिल्याच्या गाढ्या नॉलेजवरचा विश्वास उडण्या एवढे दिवस त्यांच्या लग्नाला झाले नव्हते, त्याचं हे लक्षण. सरिता सुध्दा मन लावून त्याचं ब...