एका परंपरेचा अस्त
ज्यानी कुणी आपल्या वाढत्या वयातली महत्वाची वर्षं पुणे विद्यापीठात काढली (घालवली आहेत असं मी म्हणणार नाही) आहेत त्यानं विद्यापीठातल्या 'अनिकेत' कँटिनबद्दल ऐकलं नसेल तर तो एकतर ठार बहिरा असला पाहीजे किंवा त्याला स्मृतिभ्रंश तरी झाला असला पाहीजे. कारण ते नुसतं कँटिन नव्हतं.. ती एक मास्तर विरहित शिक्षण संस्था होती.. हल्ली HR ची लोकं, त्यांच्या नोकर्या जस्टिफाय करायला, कसले कसले सॉफ्ट स्किलचे ट्रेनिंग प्रोग्रॅम घेऊन बिचार्या कर्मचार्यांचा जीव नकोसा करतात ते सगळं ट्रेनिंग इथे नकळत होऊन जायचं. तिथले पदार्थ फार चविष्ट होते अशातला काही भाग नव्हता, पण स्वस्त मात्र होते. खरं आकर्षण तिथल्या वातावरणाचं होतं. भारत क्रिकेटची मॅच जिंकत असेल तर मैदानावर जसं वातावरण असतं तसं वातावरण कायम! पीढीजात सुतकी चेहर्यावर देखील स्मित झळकवण्याची क्षमता त्या वातावरणात होती. परीक्षेत नापास झाल्याचा वैताग, मास्तरनं झापल्यानं आलेली कटुता, बापाशी झालेल्या भांडणाचं वैषम्य, प्रेमभंगाचं दु:ख, आपल्याला आयुष्यात काही करायला जमणार नाही ही भीति.. असल्या मन पोखरणार्या विचारांचा निचरा करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे...