गोट्याचा घोळ
"... सीआयडी मागे लागलाय".. घरातून बाहेर पडता पडता मला गोट्याचं बोलणं अर्धवट ऐकू आलं. तो शेजारच्या दीपाशी बोलत होता. गोट्या म्हणजे आमचं एकुलतं एक कार्ट. गोट्याचे कारनामे हळूच कान देऊन ऐकायला मला आवडलं असतं, खरं तर.. पण कामाला जाणं भाग होतं.. अनिच्छेनेच मी निघालो. मला नेहमी भरपूर काम असतं.. डोकं वर काढायलाही फुरसत नसते.. पण दिवसभर 'आयला! ह्या गोट्यानं काय घोळ घातला?' या प्रश्नानं मला, चपलेला चिकटलेल्या च्युईंगम सारखं छळलं. मग बँकेतून दिल्याला फोन करून सीआयडी ऑफिसातून काही माहिती मिळतेय का ते पहायला सांगीतलं. त्याला काही फारशी माहिती मिळाली नाही. सीआयडीचे लोक काळाबाजार करणारे, तस्करी करणारे नाही तर अतिरेकी लोकांच्या मागावर असतात अशी एक मोघम माहिती मिळाली. विमनस्क अवस्थेत संध्याकाळी घरी आल्यावर सरीताला झालेला प्रकार सांगीतला.
सरीता: "अय्या खरंच सीआयडी मागे लागलाय? मला बघायचाय खराखुरा सीआयडी कसा दिसतो ते.".. हिचा बालिशपणा कधी उफाळून येईल त्याचा काही नेम नसतो.
मी: "सीआयडी म्हणजे काय गणपतीची आरास आहे का बघायला? दारावर विकायला येणार्या माणसांसारखी अगदी सामान्य दिसणारी माणसं असतात ती. मुद्दामच तशी माणसं घेतात ते. मी सुध्दा त्यांच्यापुढे हिरोसारखा वाटेन तुला. त्यापेक्षा गोट्याकडे बघ. त्यानं काही तरी जबरी घोळ घातलाय. आधीच लग्न ठरत नाहीये त्याचं.. त्यात आता हे. तुला काही त्याच्यात बदल जाणवलाय का एवढ्यात?"
सरीता: "अंsss हो! थोडा विचित्र वागतो हल्ली."
मी: "हां म्हणजे हल्ली जास्त तिरसटासारखा करतो... नेहमी खोलीचं दार बंद करून बसतो... आपण खोलीत गेलो की चिडचिड करतो न् लगेच लॅपटॉप बंद करतो.. हेच ना? मला वाटतं, त्याला त्याचं लग्न ठरत नाही याचं जास्त टेन्शन आलंय, त्यामुळे असेल. त्याच्या बरोबरीच्या सगळ्यांची लग्न झाली की आता."
सरीता: "ते असेल रे! पण त्याहून थोडा जास्त विचित्र."
मी: "म्हणजे?"
सरीता: "हल्ली तो मधुनच मुलीसारखा बोलतो."
मी: "काssssss य? मुलीsssssssssssssss?" मी जोरात ओरडलो. आधीच माझा आवाज ठणठणीत.. त्यातून मी ओरडलो की संपलंच. माझा ठणाणा ऐकून दीपा धावत आली.
दीपा: "काय झालं अंकल?" अंकल? हल्लीच्या पोरांना कुणी तरी काका म्हणायला शिकवा हो! सगळ्या शब्दांना मराठीत शब्द नाहीत असं का वाटतं यांना?
त्याक्षणी दीपाला समोर बघायची माझी मानसिक तयारी मुळीच नव्हती.. मला काय झालं तेही तिला मुळीच सांगायचं नव्हतं. गोट्या मुलीसारखा बोलतो ही काय तिला सांगायची गोष्ट आहे? पण खरंच सांगीतलं असतं तर तिची काय प्रतिक्रिया आली असती? 'अय्या! कित्ती गोssड!' असं काहीतरी निरर्थक बोलून नवीन मैत्रीण मिळाल्याचा आनंद व्यक्त केला असता तिनं कदाचित! या नवीन पीढीचं काही सांगता येत नाही.
मी: "काही नाही. काही नाही. हिला मुलगी... आपलं.. एक उंदीर दिसला." मला तिचा वीक पॉईन्ट माहिती होता.
सरीता: "काहीही काय बोलतोस? कुठाय उंदीर? आपण तर..." बाप रे! माझ्या डोळ्यांच्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करून गेम टाकणार आता ही.
मी: "हो! हो! आपणच तर त्याला या दारावरून त्या वायर वरून त्या दाराकडे जाताना पाहीलं ना!" मी बरेचसे अतिरंजित हातवारे करत बोलल्यावर तिच्या डोक्यात थोडा प्रकाश पडल्यासारखा वाटला. तेवढ्यात दीपाच्या बापानं तिला हाक मारली.. "दीपा! काही विशेष झालेलं नाही.. तू जा आता.. त्या उंदराला काय हवं नको ते मी बघतो." दीपाची पीडा 'बाssय' म्हणून गेल्या गेल्या मी सरीताला जाब विचारायला लागलो..
मी: "काय गं? तुला माझ्या खाणाखुणा कळत नाहीत का? तोंड उघडण्यापूर्वी बघावं एकदा माझ्या चेहर्याकडे!"
सरीता: "काय राहीलंय तुझ्या चेहर्यात बघण्यासारखं?" माझ्यासमोरून एक कवटी खालच्या दोन हाडांच्या फुली सकट तरंगत गेली. पाहिलंत ना! कुठला विषय कुठे नेला ते तिनं? हेच मी तिला बोललो असतो तर तडक माहेरी निघून गेली असती.. असो. विषय कवटीवरून हलवणं भाग होतं..
मी: "बरं ते जाऊ दे! गोट्या काय मुलीसारखा वागतो?"
सरीता: "अरे तो मधेच मुलीसारखा बोलतो.. मग लगेच चूक सुधारतो. परवा मी त्याला चहा प्यायला बोलावलं तर आधी म्हणाला 'आले! आले!'. मग लगेच म्हणाला 'आलो! आलो!'. असं बर्याच वेळेला झालंय हल्ली.. मला सांगायचंच होतं तुला."
मी: "मग तो काय साडी घालायची वाट बघत होतीस? आधी का नाही सांगीतलंस?"
सरीता: "अरे पण माझी खात्री व्हायला हवी ना आधी!"
मी: "हे सगळं तुझ्या मुळे झालंय. तूच लहानपणी त्याचा उल्लेख मुलीसारखा करायचीस.. 'उठली का माझी छकुली?' असं काहीतरी!"
सरीता: "आणि तू पण त्याला मुलींचे कपडे आणायचास!"
मी: "ते मी एकदाच आणले होते, तेही तुझ्यासाठी." चूक लपविण्याचा माझा आटोकाट प्रयत्न!
सरीता: "माझ्यासाठी? लहान मुलीचे कपडे?"
मी: "हो! तू लहान मुलीसारखी वागतेस म्हणून." माझ्या कवटीचा माफक बदला घेण्यात यशस्वी झालो.
सरीता: "हेच ते नेहमीच तुझं! अंगावर उलटलं की एक फालतू जोक करायचा."
मी: "बरं ते जाऊ दे. इथं पोराला आयडेंटिटी क्रायसिस झालाय आणि तू भांडत बसली आहेस. त्याला कुठल्या पोरीनं झपाटलं असेल का?"
सरीता: "आयडेंटिटी क्रायसिस नाही त्याला जेंडर क्रायसिस म्हण. प्रेमात पडल्यावर असं होतं का पुरुषांना?"
मी: "मी कुठे प्रेमात पडल्यावर म्हणालो? आणि बापाचं झालेलं माकड पहाता तो प्रेमात पडेल असं वाटत नाही कधी. मला म्हणायचं होतं की कुठल्या स्त्रीलिंगी भुतानं झपाटलं असेल का त्याला?"
सरीता: "स्त्रीलिंगी भूत नाही रे म्हणत.. हडळ म्हणतात." अख्ख्या जीवनात समस्त मास्तर वर्गानं काढल्या नसतील एवढ्या माझ्या चुका तिनं आत्तापर्यंत काढल्या आहेत.
मी: "बाकीच्या पुरुषांच माहीत नाही. पण तुझ्या प्रेमात पडल्यावर मला नेहमी पायाचे अंगठे धरायला लावलेल्या विद्यार्थ्यासारखं वाटायचं. असो. तू त्याच्यावर बारीक लक्ष ठेव. मी बघतो काय करायचं ते."
मी गोट्याच्या पाळतीवर रहायचं मनोमन ठरवलं. दुसर्या दिवशी गोट्या कुणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं की गोट्या आणि फोनवरचा किंवा फोनवरची लक्ष्मी रोडवरच्या महालक्ष्मी रेस्टॉरंट पाशी भेटणार आहेत. गोट्या गेल्यावर, त्याला संशय येऊ नये म्हणून, तब्बल ५ मिनीटांनी निघालो. मला ते रेस्टॉरंट नक्की कुठे आहे ते माहीत नव्हतं.. पण म्हंटलं ते शोधायला असा किती वेळ लागणार? लक्ष्मी रोडच्या एका टोकापासून सुरुवात करून दुसर्या टोकापर्यंत आलो.. रेस्टॉरंट सापडलं नाही.. मग एका दुकानात विचारलं.. त्याला माहीत नव्हतं.. परत पहिल्या टोकापासून शोधत आलो.. तरीही दिसलं नाही म्हणून अजून एका दुकानात विचारलं आणि पुणेरी झटका बसला.. 'अहो! मगाशी तुम्ही मलाच विचारून गेलात. मी तेव्हाच तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगीतलं. सक्काळी सक्काळी लावली काय?' ते शेवटचं वाक्य फक्त पुणेरीच म्हणू शकतात. माझा चेहरा दोन वेगळे बूट घालून ऑफिसला गेल्या सारखा झाला.. त्याला कसंबसं सॉरी म्हंटलं आणि त्या दुकानाचा नाव पत्ता लिहून घेतला.. हो! नाहीतर परत त्याच्याचकडे जायचो चुकून.. या भानगडीत त्या रेस्टॉरंटचं नाव मी विसरलो.. मग लोकांना कडकलक्ष्मी पासून महामाया पर्यंतची सर्व वैविध्यपूर्ण नावं विचारून मी बरीच स्कूटरपीट करून घेतली.. काही लोकं काय बदमाश असतात.. मुद्दाम चुकीचा पत्ता सांगतात. दोन तासानंतर आता काय करावं असा विचार करीत मी उभा होतो तेव्हा अचानक ते समोर दिसलं.. तोपर्यंत फारच उशीर झाला होता.
यापुढे गोट्याचा जवळूनच पाठलाग करायचा असं ठरवलं.. त्यानं मला ओळखू नये म्हणून मिशी लावली.. गोलमाल पिक्चर स्टाईल.. मग काय.. गोट्या निघाल्यावर लगेच त्याच्या मागे निघालो.. एका ठिकाणी गोट्या थांबला.. ५ मिनिटांनी तिथे एक फाटका माणूस आला.. गोट्यानं त्याला एक पुडकं दिलं.. त्यानं गोट्याला पैसे दिले.. आयला! गोट्या गर्द वगैरे विकतो की काय? नो वंडर, सीआयडी त्याच्या मागावर आहे.. मग गोट्या निघाला आणि त्याच्या ऑफिसात गेला.. मी स्कूटर लांब लावून चालत ऑफिसपाशी गेलो.. ऑफिसातून तो संध्याकाळ शिवाय निघणार नाही हे लक्षात येताच मी तिथून निघणार, तेवढ्यात खांद्यावर कुणीतरी हात ठेवला.. वरती 'बाबा! तुम्ही काय करताय इथे?' असे शब्द आले.. मागे वळून पाहीलं तर खुद्द गोट्याच होता.. बोंबला! हा माझ्या नकळत ऑफिसच्या बाहेर कसा आला? कोण कोणावर पाळत ठेऊन आहे नक्की? पण त्याला ओळख दाखवून चालणार नव्हतं.. ती गोलमाल मोमेंट होती.. आता उत्तम अभिनयच मला तारु शकणार होता.. तशी मी कॉलेजात अभिनयाची उत्तेजनार्थ बक्षीसं मिळवली होती म्हणा.. ते आठवून जरा आत्मविश्वास आला.. मग एकदम वळलो.. त्याला शांतपणे आपादमस्तक न्याहाळलं.. मग थंड कोरड्या आवाजात आणि आवाज थोडा बदलून मी म्हंटलं -
मी: "तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिस्टर. मी तुमचा बाप नाही."
गोट्या: "काहीतरी काय बोलताय बाबा! मी गोट्या! तुमचा मुलगा! तुमच्या डोक्याला मार वगैरे लागलाय का? काहीच कसं आठवत नाहीये तुम्हाला?"
मी: "सॉरी! मला मुलगा नाहीये".. मग त्याच्याकडे थोडं निरखून पाहिल्यासारखं करत मी पुढचा बाँब टाकला.. "तुम्ही... अंss.. तू चिमणचा मुलगा का? चिमण माझा जुळा भाऊ! विनायक माझं नाव! मी लहानपणी घरातून पळून गेलो होतो म्हणून बाबानी माझ्याशी संबंध तोडले आणि सगळ्यांना तोडायला लावले. कसा आहे चिमण?"
एव्हाना गोट्या पुरता भंजाळल्यासारखा वाटत होता.. माझ्याकडे अविश्वसनीय नजरेने बघत होता.. मी मनातल्या मनात मला अजून एक उत्तेजनार्थ बक्षीस देऊन टाकलं.
गोट्या: "अंss! बाबा ठीक आहेत. तुम्ही घरी या ना रात्री."
मी: "छान! सांग त्याला मी भेटलो होतो म्हणून." मग शून्यात बघत एक खोल उसासा टाकत मी पुढे म्हणालो.. "काही गोष्टी परत जुळवता येत नाहीत, गोट्या! चल! मला आता जायला पाहीजे. आनंद वाटला तुला भेटून." गोट्याला बोलायची काही संधी न देता मी तिथून फुटलो.
संध्याकाळी घरी आल्यावर गोट्या आणि सरीताचं बोलणं ऐकलं - "आई! बाबांच्या डोक्यावर परिणाम झालाय."
सरीता: "त्याच्या नाही तुझ्याच झालाय".. वा! वा! बायको असावी तर अशी.
गोट्या: "अगं आई! खरंच झालाय. आज मला ऑफिस बाहेर भेटले होते. ओळखच दाखवली नाही. वरती मी बाबांचा जुळा भाऊ आहे असं म्हणत होते."
सरीता: "जुळा भाऊ? मला कसं माहीत नाही त्याबद्दल".. इथं मी नाट्यमय एंट्री घेतली.. आवाज अगदी नेहमीसारखा ठेवला..
मी: "कुणाचा जुळा भाऊ?"
सरीता: "हा सांगत होता तुला जुळा भाऊ आहे म्हणून. त्याला भेटला होता म्हणे." ते ऐकताच मी अजून एक उत्कृष्ट अभिनयाचा नमुना पेश केला.. गोट्याचे खांदे पकडून गदागदा हलवले आणि आनंदातिरेकाने म्हंटलं - "कोण विनायक? विन्या भेटला होता तुला?". उत्तरादाखल गोट्या खो खो हसत सुटला. माझ्या अभिनयाची ही किंमत? बर्याच वेळाने हसणं कसंबसं थांबवून म्हणाला - "तो माणूस गेल्यावर मी वॉचमनला त्याच्या गाडीचा नंबर लिहून आणायला सांगीतला." मला नासकं अंड अंगावर बसल्यासारखं झालं.. प्रचंड चिडचिड झाली.. कानातून धूर यायचा बाकी होता फक्त.. माझ्या अभिनयाचं बेअरिंग पडून इतस्ततः बॉल बेअरिंग सारखं घरंगळायला लागलं. तिकडे सरीताची उत्सुकता शिगेस पोचली.
सरीता: "मग?"
गोट्या: "मग काय? तो आपल्याच गाडीचा नंबर होता."
सरीता: "असं कसं झालं?" गोट्यानं कपाळावर हात मारला.
गोट्या: "अगं आई! तो माणूस बाबाच होता. मला उगाच जुळ्याच्या बंडला मारल्या त्यांनी. बाबा! काय अँक्टिंग मारता पण! निदान कपडे तरी वेगळे घालायचे ना!" मी मला दिलेलं उत्तेजनार्थ बक्षीस चडफडत रद्द केलं आणि वैतागून खिशातली मिशी कचर्यात टाकली.
सरीता: "का रे तू असं केलंस?" यावर मी जुळ्याच्या भूमिकेतून डिटेक्टिव्हच्या भूमिकेत शिरलो.
मी: "गोट्या! तू काही विकण्याचा धंदा करतोयस काय?"
गोट्या: "छे!"
मी: "मी आजच तुला एका माणसाला एक पुडकं देताना पाहीलंय."
गोट्या: "ओ! ते होय! तो माझ्या ऑफिसमधल्या एकानं त्याच्यासाठी परदेशातून आणलेला पर्फ्यूम होता." .. मी आता डिटेक्टिव्हच्या भूमिकेत पार आत पर्यंत गेलो होतो.
मी: "अच्छा! तू एकाने दुसर्यासाठी आणलेला पर्फ्यूम फक्त देण्याचं काम केलंस तर! पण तू एक छोटीशी चूक केलीस. त्याच्याकडून पैसे घेतलेस. ते का?"
गोट्या: "कमाल आहे बाबा? अहो ते पर्फ्यूमचे पैसे होते. ते ऑफिसमधल्या कलीगला द्यायचे आहेत." .. मी त्याला एवढ्यावरच सोडला तर मी कसला डिटेक्टिव्ह? माझी केस वॉटरटाईट होती.
मी: "गोट्या! कुणीतरी तुझ्या मागे लागलंय.. बरोबर ना?" गोळी बरोबर बसली.. गोट्या लगेच वरमला.
गोट्या: "अं अं अं हो! पण तुम्हाला कसं कळलं?" मी लगेच विजयी हास्य केलं. पुढे जाऊन गोट्याच्या छातीवर बोट आपटत म्हणालो "हॅ हॅ हॅ! हमारे जासूस चारो तरफ फैले हुए हैं!"
सरीता: "हो रे गोट्या? कोण मागं लागलंय तुझ्या? आणि कशाला?"
गोट्या: "हरे राम! आता मला सांगावच लागणार सगळं. अगं आई! मी मायबोली नावाच्या साईटवर रजिस्टर झालोय."
सरीता: "ते काय असतं? वधूवर सूचक मंडळ आहे का?"
गोट्या: "नाही गं!"
सरीता: "मग वधूवर मेळाव्याचं ठिकाण आहे का?"
गोट्या: "अगं नाही गं! थांब मी तुला दाखवतोच.".. गोट्याला मायबोलीची अब्रू नुकसानी पहावेना.. २ मिनिटानी गोट्या आतून त्याचा लॅपटॉप घेऊन उगवला. "ही ती साईट. इथे वेगवेगळ्या देशातले मराठी बोलणारे लोक असतात. काही गप्पा मारतात. काही कविता/लेख लिहीतात."
सरीता: "मग हे 'गजरा', 'खट्याळ' काय आहे? अशी त्यांची नावं आहेत?"
गोट्या: "अगं ही त्यांची खरी नावं नाहीयेत काही. टोपण नावं आहेत. त्याला आयडी म्हणतात."
सरीता: "बरं बरं! तुझा आयडी काय आहे?"
गोट्या: "सदाखुळी"
सरीता: "शीsss! असला कसला आयडी? आणि हा तर मुलीचा वाटतोय."
गोट्या: "हो मुद्दाम मी मुलीचं नाव घेतलंय."
सरीता: "का?"
गोट्या: "म्हणजे मग जास्त संशय न येता इतर मुलीं बरोबर ओळख वाढवता येईल की नाही? मला या जेट-सेट युगात थेट-नेट प्रेम करायचंय."
सरीता: "अच्छा! तरीच तू हल्ली मुलीसारखा बोलतोस.. बोलतेस.. मग तू काय करतेस... करतोस?" जेंडर क्रायसिसची लागण सरीतालाही झाली आता.
गोट्या: "मी कविता करतो.. जास्त करून विडंबनं."
सरीता: "तू कविता करतेस... करतोस?" यावर पायाच्या अंगठ्यानं जमिनीवर रेघा काढल्यासारखं करत गोट्यानं अंग घुसळलं. कसं होणार या गोट्याचं देव जाणे. "अरे वा! दाखव बघू तुझं एखादं विडंबन." गोट्यानं एक पान उघडून वाचायला दिलं.. सरीतानं ते मोठ्यांदा वाचलं....
'शब्दा वाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले' चे विडंबन
चपले वाचुन खुपले सारे, चपलेच्या पलिकडले
प्रथम तिला काढियले आणिक रुतू नये ते रुतले
टोच नवी पायास मिळाली
खोच नवी अन् बोच निराळी
त्या दिवशी का प्रथमच माझे खूर सांग कळवळले
आठवते देवाच्या द्वारी
पादत्राण लांबवले रात्री
खट्याळ तुझिया हास्याने मम दु:ख अजुनि फळफळले
सरीता: "मस्त आहे रे गोट्या! पण या सगळ्याचा आणि तुझ्या मागे कुणी लागण्याचा संबंध काय?".. गोट्यानं त्याच्या विचारपुशीचं पान वाचायला दिलं.. "हे बघ! टकलूहैवान नावाच्या आयडीनं मला काय काय लिहीलं आहे ते वाच!"
तिनं मोठ्यांदा वाचलं..
'तुझ्याकडे प्रचंड प्रतिभा आहे. तुला न विचारताच अगं तुगं करतोय चालेल ना?'
'काय धमाल विडंबन करतेस गं तू? अगदी हहपुवा!'
.....
.....
.....
'मला तुझ्याशी ओळख वाढवायला आवडेल. आपण कुठेतरी भेटु या का?'
.....
.....
'तुझ्या गळा माझ्या गळा' च्या चालीवर माझं पण एक विडंबन
सदाखुळे सदाखुळे
मी भरकटलो तुझ्यामुळे'
.....
'तुला भेटल्या शिवाय मला करमणार नाही. मला फोन कर - ५२३२२ ७८५६४'
सरीता: "पण तुझ्या मागे सीआयडी लागला होता ना?"
गोट्या: "सीआयडी? कुणी सांगीतलं?"
सरीता: "अरे तू दीपाला तुझ्या मागे सीआयडी लागलाय म्हणून सांगीतलंस ना? बाबानं ऐकलं ते."
गोट्या: "बाबांना काहीही ऐकू येतं. परवा तू त्यांना गवार आणायला सांगीतलीस तर ते मटार नाही का घेऊन आले? तसंच. मी तिला एक आयडी मागे लागलाय म्हणून सांगीतलं फक्त." .. आता सरीताला हसू आवरेना.. माझा डिटेक्टिव्ह पार भुईसपाट झाला होता.
सरीता: "कान आहेत का भोकं आहेत रे तुझी? मी आता या टकलूहैवानाला फोन करून फैलावर घेते चांगला. तुझ्यामुळे भरकटतोय काय?" .. तिनं फोन लावला.. जे मला मुळीच अपेक्षित नव्हतं.. कारण माझा, ऑफिसनं नुकताच मला दिलेला मोबाईल वाजला.. माझं बिंग फुटलं.. आणि ती किंचाळली
सरीता: "म्हणजे तू टकलूहैवान? चिमण! ही काय भानगड आहे?"
मी: "कसली भानगड? अगं हा गोट्या आपला कायदेशीर मुलगा आहे! भानगड नाहीये काही."
सरीता: "तू परत फालतू जोक मारून वेळ मारून नेऊ नकोस. माझ्या नकळत तू पोरीबाळींच्या मागे फिरतोयस, खरं ना?"
मी: "हे बघ! पोरीबाळींच्या मागे फिरायचं असेल तर तुला सांगून कसं फिरणार? तुझ्या नकळतच फिरणार ना? आणि तुला जे वाटतंय ते मुळीच खरं नाहीये. मी गोट्यासाठी मुली शोधत होतो. माझ्यासाठी नाही काय." .. पुढं बरच पानिपत झालं.. शेवटी एका तहावर सुटका झाली.. डिटेक्टिव्हचा आता एक पराजित योध्दा झाला होता. मी मायबोलीवर कधीही जायचं नाही, तिचं अखंड मांडलिकत्व पत्करायचं, तिला वर्षातून २५ साड्या व ४ सोन्याचे दागिने नजराणा द्यायचा.. या बोलीवर मोठ्या मनानं, तिनं माहेरी जायचं रद्द केलं.
काही दिवसांनी गोट्यानं मला आणि सरीताला त्याच्या थेट-नेट प्रेमाचा गौप्यस्फोट केला. त्याचं मायबोलीवरच्या पिपाणी नावाच्या आयडीशी जमलं होतं. ती पिपाणी दुसरी तिसरी कुणी नसून आमच्याच शेजारी वाजणारी दीपा निघाली.
मी: "कसला मठ्ठ आहेस तू? लहानपणापासून तिला ओळखतोस, तरी तुला कळलं नाही?"
गोट्या: "अहो बाबा! प्रेम आंधळं असतं ना?"
सरीता: "अगदी बापावर गेलाय. त्याला तरी कुठे कळलं होतं?"
म्हणतात ना.. काखेत कळसा अन् नेटला वळसा.
-- समाप्त --
(तळटीपः टकलूहैवान हा आयडी विकावू आहे. इच्छुकांनी माझ्याशी संपर्क करावा. आयडी सोबत पासवर्ड फुकट मिळेल.)

Comments
या धर्तीच्या लेखनात तुमचा हातखंडा आहे.
पुलेशु