अवकाश वेध

ऑक्सफर्डच्या हिस्टरी ऑफ सायन्स म्युझियम मधे अॅस्ट्रोलेब (Astrolabe) या एका जुन्या बहुपयोगी उपकरणाबद्दलची माहिती ऐकण्याचा योग नुकताच आला. ते यंत्र पूर्वी त्या म्युझियममधे पाहिलेलं होतं पण त्याचा वापर तेव्हा कसा करायचे ते समजलं नव्हतं. त्यामुळे ते भाषण ऐकायला उत्सुकतेने गेलो. अॅस्ट्रोलेब हे वेळ बघण्यासाठी तसेच आकाशातील ग्रह व तारे यांच्या जागा शोधण्यासाठी वापरलं जायचं. ते ८ व्या शतकात मुस्लिम देशामधे वापरायचे. तिथून १२ व्या शतकात ते युरोपात आले. भाषणात ते यंत्र दाखवून ते कसं वापरायचं याचं व्यवस्थित प्रात्यक्षिक दिलं. त्या दिवसापासून यावर एक लेख लिहायला पाहीजे असं डोक्यात घोळत होतं. पण प्रत्यक्ष हातात यंत्र न घेता आणि तुम्ही समोर नसताना तुम्हाला ते कसं सांगावं याचा विचार चालू होता आणि अधिक माहितीसाठी गुगल करणंही चलू होतं. इंटरनेट हे एक मोठं रद्दीच दुकान आहे, त्यात काहीही सापडतं किंवा कधी कधी काहीच नाही. सुदैवाने माझ्या हाती एक खजिनाच हाताला लागला. हा लेख त्या मिळालेल्या खजिन्याबद्दल आहे. अॅस्ट्रोलेबचा इतिहास इथे आहे. या व्हिडिओत अॅस्ट्रोलेबने वेळ कशी बघायची याचं प्रात्यक्षिक दिस...