Monday, April 26, 2010

उच्चारकल्लोळ

कुणी मला सांगीतलं की "मी माझं नाव लिहीतो 'खरे' पण म्हणतो 'खोटे'", तर मी म्हणेन खर्‍याची दुनिया नाही राहिली राव! हो, मग दुसरं काय म्हणणार? उच्चार जर 'खोटे' करायचाय तर 'खरे' लिहायचंच कशाला? 'खोटे' च लिहीना लेका! हे असं मला तरी वाटतं, तुम्हालाही तसंच वाटेल कदाचित! कारण, आपल्या देवनागरी लिपीत अक्षराप्रमाणे आणि अक्षराला लावलेल्या काना, मात्रा वेलांटी इ. इ. प्रमाणे नेमका उच्चार सूचित होतो. काही शब्दं हुलकावणी देऊन जातात, नाही असं नाही.. उदा. तज्ञ हा शब्द तज्ज्ञ असा लिहीला जातो, तर सिंह चा उच्चार सिंव्ह असा होतो... पण बहुतांशी उच्चार नीट करायला जमतात.

देवनागरी लिपीत अक्षरांचे उच्चार जमले की बहुतेक शब्दांचे उच्चार जमतात.. अर्थात, थोड्या गोच्या वगळता. मराठीतल्या 'च' चा उच्चार काही शब्दांमधे 'च्य' असा होतो, उदा. चप्पल.. उच्चार च्यप्पल न करता चप्पल असा केला तर चांगलं गाणं ऐकताना मधेच जबरी खरखर आल्यासारखं वाटतं. 'ज' चं पण तसंच आहे. 'लक्ष्य' चित्रपटात अमिताभने एका मराठी माणसाची भूमिका केली आहे.. कॅप्टन दामले त्याचं नाव.. त्यात एकदा तो एक मराठी म्हण म्हणतो.. कुठली ते आता आठवत नाही.. त्यात तो नको तिथे 'च' चा उच्चार 'च्य' असा करून तिडिक आणतो. 'चुकार चंदूने चरखा चालवता चालवता चारोळीयुक्त चमचम चोरून चाखली' हे वाक्य 'च्युकार चंदूने च्यरखा च्यालवता च्यालवता च्यारोळीयुक्त च्यमच्यम च्योरून च्याखली' असं वाचणार्‍याच्या असतील नसतील त्या सर्व पिढ्यांचा उध्दार करावासा वाटेल की नाही? तसंच. अशी घोडचूक अमिताभसारख्या नटानं केल्याबद्दल त्याला योग्य शासन काय करावे याचा मी बरेच दिवस विचार करीत होतो. पण परवा कुणी तरी हा प्रश्न परस्पर सोडवला.. क्वालालंपूर विमानतळावर त्याने अमिताभला शाहरुख खान अशी हाक मारून योग्य ती जागा दाखवली.

अक्षरांच्या उच्चारां इतकच महत्व शब्दांतल्या अक्षरांवरील आघाताला (अ‍ॅक्सेंट) आहे! शब्दांच्या अक्षरांवरील आघातात थोडा जरी बदल केला तरी कीर्तनाला जाऊन रॅप संगीत ऐकल्यासारखं होतं. उदाहरणार्थ, निवडणूक हा शब्द म्हणताना आपण तो निवड-णूक असा तोडतो. याचे निव-डणूक असे तुकडे केले किंवा कणकवलीचे तुकडे कणक-वली असे केले तर तो शब्द पटकन कळतच नाही. तसंच 'याला काही अर्थ आहे का?' या वाक्यातल्या 'अर्थ' या शब्दाचा उच्चार इंग्रजी Earth ( अsर्थ् ) सारखा केला तर कानाची आग मस्तकात जाते.

मी उच्चारग्रस्त व्हायला माझ्या आयुष्यात आलेले बहुतेक सगळे कारणीभूत आहेत.. जास्त करून मास्तर आणि मित्रमंडळी. एकीकडे, मराठी हिंदी सारख्या विषयांचे मास्तर स्पष्ट उच्चार करा म्हणून डोकंफोड करायचे. आणि इंग्रजी मधे, शब्दोच्चाराबद्दल 'स्पष्ट न बोललेलेच बरे' असा सूर असायचा. कधी इंग्रजी शब्दातल्या अक्षरांचे उच्चार करायचे नसतात तर कधी नसलेल्या अक्षरांचे उच्चार करायचे असतात. हे गौडबंगाल मला अजूनही कळालेलं नाही. त्यामुळे काही अक्षरांचे उच्चार नको तेव्हा केल्या / न केल्याने मी लोकांची खूप करमणूक केली आहे. इंग्रजीत R चा उच्चार न करायची एक प्रथा आहे. काय अघोरी प्रथा आहे! मराठीत नाही आहे ते किती बरं आहे ना? नाही तर 'नदीला पूss आला' म्हणावं लागलं असतं.

मराठी शाळेत इंग्रजी शिकण्याचा प्रमुख तोटा बरोबर उच्चार ऐकायला न मिळणे हा एक आहे. J चा उच्चार ज्ये करायचा असतो हे कळण्यासाठी मला बरीच उमेदीची वर्ष खर्च करायला लागली. Deaf चा उच्चार डेफ, डीफ नाही.. त्याचा उच्चार Leaf सारखा करायचा नसतो.. Oven चा आव्हन, Computer चा कंप्युटर, Sarah चा सेरा आणि Diana चा डायाना अशा अनेक उच्चारांची मौलिक भर माझ्या हितचिंतकानी कॉलेजात आणि नंतरच्या आयुष्यात घातली.

मात्र अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर माझ्या बर्‍याच उच्चारांचं पानिपत झालं. अमेरिकन लोकं O चा उच्चार बर्‍याच शब्दात 'आ' असा करतात.. उदा. Project चा प्राजेक्ट व Honest चा आनेस्ट. तसंच ते 'I' चा उच्चार काही शब्दात 'इ' ऐवजी 'आय' करतात.. उदा. Vitamin चा व्हायटामिन किंवा Carolina चा कॅरोलायना. आपल्याकडच्या सुनीता (Sunita) या नावाचा उच्चार अमेरिकेत सनायटा होण्याची खूप शक्यता आहे. ज्या शब्दांचा शेवट tory ने होतो अशा काही शब्दांच्या अमेरिकन उच्चारात शेवटी टोरी येतो, उदा. Observatory आब्झर्व्हेटोरी, Inventory इन्व्हेटोरी. पण Laboratory चा उच्चार लॅब्रेटोरी कसा काय होतो ते ब्लडी अमेरिकनच जाणे! अजून काही उल्लेखनीय अमेरिकन उच्चार असे आहेत.. Niagara नायाग्गरा, Z चा झी, Connecticut कनेटिकट, Newark नुवर्क, Illinois इलिनॉय, Mature मॅटुअर, Tuition ट्युईशन, Coupon क्युपॉन.

अमेरिकेत असताना Schedule ला शेड्युल ऐवजी स्केड्युल म्हणायचं वळण जिभेला महत्प्रयासानं लावलं होतं. आता इंग्लंडात आल्यावर ते वळण परत सरळ करायचा आटोकाट प्रयत्न चाललाय. एकदा, Garage या शब्दाचा नेमका उच्चार काय हे माहीत नसल्यामुळे मी नेटवरच्या एका स्थळाची मदत घेऊन तो ऐकला. त्यानं मला गराज असा उच्चार सांगीतला. नंतर माझ्या गाडीचा इन्श्युरन्स काढायच्या वेळेला मला 'रात्री गाडी कुठे ठेवणार?' हा प्रश्न टाकताच, मी ऐटीने 'गराज' असं सांगीतलं. त्यावर २/३ मिनीटं विचार करून त्यांनं मला 'म्हणजे गॅरेज का?' असा प्रतिप्रश्न करताच माझा बँड वाजला. तिकडे त्याच्या चेहर्‍यावरचे 'न जाने कहाँ कहाँसे चले आते हैं' असे भाव मला फोन मधून स्पष्ट दिसले.

इंग्लंडमधेही मला सर्व सामान्य तर्काला तोंडघशी पाडणारे खूप उच्चार ऐकायला मिळाले. Edinburgh हे वाचल्यावर मी त्याचा पीटसबर्ग सारखा एडिन्बर्ग असा उच्चार केला. त्याचा खरा उच्चार एडिन्बरा ऐकल्यावर मात्र कानात 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' चे सूर घुमायला लागले. Gloucester, Bicester, Leicester, Worcester या गावांचे उच्चार अनुक्रमे ग्लोस्टर, बिस्टर, लेस्टर, वूस्टर असे होतात. त्यांच्या स्पेलिंग मधल्या ce या अक्षरांना उच्चारात काडीची किंमत नाही. पण Cirencester याचा उच्चार मात्र सायरनसेस्टर असा व्यवस्थित स्पेलिंगप्रमाणे होतो. 'H' चा उच्चार काही लोक 'हेच्य' असा करतात. हा उच्चार मी ऑस्ट्रेलियन आणि काही तमिळ लोकांकडूनही ऐकला आहे. Norwich चा नॉर्विच नसून नॉरिच, Greenwich ग्रिनिच आणि Derby चा डर्बी नसून डार्बी आहे. Plymouth Portsmouth चे उच्चार प्रथम दर्शनी प्लायमाउथ पोर्टस्माउथ असे वाटतील, प्रत्यक्षात ते प्लिमथ पोर्टस्मथ असे होतात. काही उल्लेखनीय उच्चार - Magdalen मॉडलेन, Tortoise टॉटस, Caius कीज.

शब्दांच्या शेवटी ham येत असेल तर त्याचा हंबरल्यासारखा 'हम' असा उच्चार होतो. उदा. Birmingham बर्मिंगहम, Fareham फेर्‍हम. याच नियमाने Cheltenham चा चेल्टन्हम असा व्हायला पाहीजे. निदान, माय फेअर लेडी मधे रेक्स हॅरिसन तरी तसा करतो. पण त्याचा सर्रास चॉल्टन्हम असा थोडा विचित्र उच्चार होतो. जॉर्ज बर्नार्ड शॉला असले उच्चार ऐकून किती हताश व्हायला झालं असेल याची आता मला थोडी फार कल्पना यायला लागली आहे. इंग्लंड मधे उत्तरेला न्यू कॅसल गावाच्या आजुबाजूला इंग्रजी या नावाखाली जे काही उच्चारतात ते इथल्या भल्याभल्यांना देखील पहिल्या फटक्यात कळत नाही. त्या उच्चार पध्दतीला जॉर्डी म्हणतात. त्यात dead डेडे, cow कू, house हूस, strong स्ट्रांग, out ऊट असे भयानक उच्चार होतात. याच्याही उत्तरेकडचे स्कॉटिश लोकांचे काही उच्चार असे आहेत.. Earth एर्थ, Pound पौंड, Time टैम.

रोमन लिपी बर्‍याच युरोपियन भाषेतले लिखाण करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे या लिपीतल्या काही अक्षरांचा उच्चार भाषेप्रमाणे वेगवेगळा होतो. माझ्या मते 'J' हे अक्षर सगळ्यात जास्त प्रदूषित आहे. त्याचा स्पॅनिश भाषेत 'ह' असा उच्चार होतो. उदा. San Jose सॅन होजे, Jalapeno हालापेनो, Natasja नताशा. जर्मन भाषेत 'J' चा उच्चार 'य' असा होतो. उदा. Ja या, Jung युंग, Jogurt योगर्ट. एका भाषेत, बहुतेक स्विडीश, भाषेत 'J' चा उच्चार 'इ' असा होतो. उदा. Fjord फिओर्ड, Bjorn बिऑन. तसंच 'V' चा उच्चार जर्मन भाषेत काही वेळा 'फ' असा होतो. उदा. Volkswagon फोक्सवॅगन, Von Neumann फोन नॉयमन.

इंग्रजी भाषेत इतर भाषांमधले भरपूर शब्द घुसले आहेत आणि त्यांचा जमेल तसा उच्चार केला जातो. Avatar या चित्रपटाच्या नावाचा अ‍ॅवॅटार असा प्रचंड विनोदी उच्चार केला जातो. Memoir मेम्वा, Paris पारी, Artois आर्ट्वा, envelope आन्व्हलोप, Peugeot पेजो, Renault रेनो, Louis लुई असे काही फ्रेंच शब्दांचे उच्चार आहेत. यांचे भलतेच इंग्रजी उच्चार ऐकून फ्रेंचांचीही बहुधा करमणूक होत असेल, कारण माय फेअर लेडी च्या 'व्हाय कान्ट द इंग्लिश लर्न टू स्पीक' या गाण्यात म्हंटल्याप्रमाणे ते कडवे उच्चारवादी लोक आहेत..

Why can't the English
Teach their children how to speak
Norwegians learn Norwegian
The Greeks are taught their Greek
In France every Frenchman
Knows his language from A to Zed
The French don't care what they do actually
As long as they pronounce it properly

इतकी वर्ष इतका शब्दच्छळ करून, ऐसे उच्चार मेळवून मी एवढंच तात्पर्य माझ्यापुरतं काढलंय की कुणीही उच्चाराबद्दल काही सांगीतलं तर फारसं मनावर घ्यायचं नाही.

(टीप :- हा सर्व लेख ऐकीव माहितीवर आधारित आहे. )

====== समाप्त======

11 comments:

Mahendra said...

सुंदर.. आवडला.`

भानस said...

नेहमीप्रमाणे मस्तच झालायं रे लेख. लिहीत जा की जरा लवकर लवकर. :) इथे नावांची लागणारी वाट तर इतकी कधी कधी भयंकर असते तर कधी अतिशय हसवणारी... माटे चे हमखास मेट, वेद चे वेड, भाग्यश्री चे भागायशरी... एकदा माझा एक अमेरिकन कलिग सारखा ती कमिनी आहे नं... मी बुचकळ्यात... हा कोणाला कमिनी म्हणतोयं... त्याला म्हणायचे होते कामिनी... :) त्याला सांगितले अरे बाबा ती XXX आहे रे... असे नको म्हणू. काही शिकागो म्हणतील तर काही चिकागो... मजा आली रे. मॉर्निग मॉर्निग अजूनच फ्रेश झाले.

हेरंब said...

अतिशय उत्तम लिहिलं आहे. मस्तच.. सगळे प्रसंग, उच्चार जसेच्या तसे डोळ्यापुढे आले :-)

तृप्ती said...

are tujha blog paN aahe malaa mahiti navhate. aaj MB var paN baghitala lekh. mala vaaTale chori ka maal ki kaay ;) ajun purNa vachala nahiye. vachun punha comment dete :-)

~Cindi

Naniwadekar said...

देवनागरीतली अ‍ेक मोठी अ‍ुणीव म्हणजे अ‍े-काराचा अ‍ुच्चार कधी लांबवायचा याची माहिती शब्दाकडे पाहून मिळत नाही. Pain आणि Pen हे दोन्ही भिन्न अ‍ुच्चारांचे शब्द 'पेन' असेच लिहिले ज़ातात.

Vikram said...

माझ्या एक चोरगे (Chorge) आडनावाचा मित्र आहे. त्याचा खुपदा चौर्ज असे नामकरण झाले आहे अमेरिकेत असताना.

Vijay Deshmukh said...

australians pronounce ay as IE....

So "Did you come here toDAY " is pronounce as
"Did you come here toDIE"
marayala aale aahe kaa ? hahahahah

Nice article.

Satya said...

Lekh aavadala...
mazyasathi tar to karamanuki barobar prabodhanpar hi hota :)

Saee said...

Ha blog mala sapadlyamule mazya khaDtar ayushyat bahar ali ahe. Me tumche/tuze sagle posts reader war dhada-dhad share kele ahet. =)
Well done. :)

प्रशांत said...

"Why can't the English teach their children how to speak?
This verbal-class distinction, by now, should be antique!
If you spoke, as she does, Sir, instead of the way you do,
Why you might be selling flowers too?"

My fair lady ची ही कविता मस्तच आहे आणि तुमचा लेखही.

Unknown said...

लेख मस्तच आहे. हसून-हसून पुरेवाट लागली.